कराचीच्या लालाजींची आणि लोकमान्य टिळकांच्या आवाजाची गोष्ट

Submitted by चिनूक्स on 18 September, 2012 - 14:16
गायकवाडवाड्यात त्या रात्री बरीच गर्दी जमली होती. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचं गायन होणार होतं. लोकमान्य टिळक मंडालेहून परतले त्याला आता वर्ष झालं होतं. यंदाच्या उत्सवात बखलेबुवांचं गाणं व्हावं, असं कृष्णाजी खाडिलकरांनी लोकमान्यांना सुचवलं होतं. लोकमान्यांना बखलेबुवांबद्दल प्रचंड आदर होता, त्यामुळे त्यांनी खाडीलकरांची ही सूचना मान्य केली. खुद्द लोकमान्यांनी दिलेलं आमंत्रण बखलेबुवांनीही लगेच स्वीकारलं. कार्यक्रम रात्री ठीक दहा वाजता सुरू झाला. सुरुवातीला मा. कृष्णरावांचं गायन झालं. नंतर बालगंधर्व गायला बसले. काही नाट्यगीतांनंतर लोकमान्यांच्या गुणवर्णनपर ’जो लोककल्याण साधावया’ हे मालकंसातलं पद ते गायले. या दोन्ही तरुण गायकांना श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. दोन्ही गायक श्रोत्यांचे लाडके, आणि त्यांच्या नाट्यगीतांनी तमाम गानरसिकांना वेड लावलं होतं. मध्यरात्री एक वाजता भास्करबुवा बैठकीवर आले. त्यांनी गायनाला सुरुवात केली, आणि प्रेक्षकांमध्ये चुळबूळ सुरू झाली. बुवांना हा अनुभव नवीन नव्हता. बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि बुवा या तिघांचे जलसे भारतभर सतत होत असत. या जलशांना तोबा गर्दी उसळत असे. पण प्रत्येक ठिकाणी बालगंधर्व आणि मा. कृष्णराव यांच्या पदांना भरपूर दाद मिळे. बुवांचं शास्त्रीय गायन सुरू झालं, की श्रोत्यांचा बैठकीतला रस ओसरे. बुवांच्या नाटकातल्या पदांना मात्र जोरदार दाद मिळे, त्यांनी नाट्यगीतं गावीत, असा आग्रह होई. नाट्यगीतांनी श्रोत्यांना वेड लावलं, तरी शास्त्रीय गायनात आता त्यांना रुची राहिली नव्हती, याचं बुवांना फार वाईट वाटे.

गायकवाडवाड्यात त्या रात्री भास्करबुवांचं गाणं सुरू होताच श्रोत्यांनी गडबड करायला सुरुवात केली. अनेकजण बुवा गात असतानाच उठून जाऊ लागले. बैठकीला लोकमान्य उपस्थित होते. भास्करबुवांसारख्या थोर गायनाचार्यांचा असा अपमान त्यांना सहन होणं शक्यच नव्हतं. ते उभे राहिले, आणि श्रोत्यांना म्हणाले, "आजचा कार्यक्रम गणपतीउत्सवाचा आहे. ठरल्याप्रमाणे गायनाचार्य बखलेबुवा यांच्या गायनाला सुरुवात झालेली आहे, आणि ते तुम्ही शांतपणानं ऐकावं, अशी माझी इच्छा आहे. कोणी गडबड केली तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं, पण ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. भास्करबुवांच्या गाण्याबद्दल मला जे काही वाटतं, ते वाटतं म्हणजे असं की, त्यांची कला फार मोठी आहे, आणि त्याबद्दल विचार करण्यासारखं खूप आहे. आणि म्हणून भास्करबुवांना मी मुद्दाम तसदी दिली. ते इथे आले, आणि कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे. त्यांनी उत्तमप्रकारे काम केलं आहे, याबद्दल मी सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो, आणि गणपतीनं, प्रत्यक्ष गजाननस्वरूप आहे ते, वारंवार असा प्रसंग येऊ द्यावा, अशी प्रार्थना मी करतो."


लोकमान्य टिळकांचा आवाज -



लोकमान्यांच्या या दटावणीनंतर श्रोते अर्थातच शांत झाले, आणि पुढचा कार्यक्रम उत्तम पार पडला. बुवा अडीच तास गायले. गाणं संपल्यानंतर लोकमान्यांनी सर्वांना घरात नेलं, आणि बुवांच्या गाण्याची मनापासून प्रशंसा केली. मोठ्या प्रेमानं जरीचं उपरणं लोकमान्यांनी बुवांच्या अंगावर घातलं. नंतर लोकमान्य कंदील घेऊन उंबर्‍या गणपती चौकापर्यंत बुवांना सोडायला आले होते.

bakhale_tilak.jpg

बुधवार, दि. २२ सप्टेंबर, १९१५ची ही गोष्ट. त्या रात्री पंधरासोळा वर्षांचा एक तरुण आपल्या ध्वनिमुद्रणयंत्रासह थेट कराचीहून गायकवाडवाड्यात गाणं ऐकायला आला होता. या तरुणानं ध्वनिमुद्रिकेत कैद केलेला लोकमान्य टिळकांचा आवाज गेल्या महिन्यात केसरीवाड्यात पुन्हा एकदा निनादला. लोकमान्यांची छायाचित्रं, त्यांचे अग्रलेख, त्यांचे ग्रंथ हे सारं व्यवस्थित जपून ठेवल्यानं आजही उपलब्ध आहे. लोकमान्यांच्या आवाजाची ध्वनिमुद्रिका मात्र अजून मिळाली नव्हती. १९१५ साली केलेलं ध्वनिमुद्रण प्रकाशात आल्यानं ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्यासाठी सामान्यजनांमध्ये स्फुल्लिंग चेतवणारा हा आवाज तब्बल ९७ वर्षांनंतर लोकांना ऐकता आला. हे साध्य झालं ते हे ध्वनिमुद्रण करणार्‍या शेठ लखमीचंद ईसरदास नारंग यांच्यामुळे, हे ध्वनिमुद्रण जपून ठेवून ते जतन करणार्‍या श्री. मुकेश नारंग यांच्यामुळे आणि ते लोकांसमोर आणण्यासाठी प्रचंड कष्ट केलेल्या माधव गोरे, मंदार वैद्य व श्रीमती शैला दातार यांच्यामुळे.

Lalaji_0.jpgसेठ लखमीचंद ईसरदास नारंग हे कराचीतले धनवंत व्यापारी. आधुनिक कराचीचे एक शिल्पकार. १८९९ सालचा त्यांचा जन्म. वडिलांचा, म्हणजे ईसरदास नारंगांचा, हिर्‍यांचा व्यापार होता. कराचीतल्या मीठादर भागातल्या बावन्न खोल्यांच्या भल्यामोठ्या हवेलीत नारंग कुटुंबीय राहत असत. लालाजी, म्हणजे सेठ लखमीचंद, विलक्षण हुशार, हरहुन्नरी आणि कष्टाळू होते. त्या काळच्या शिरस्त्याप्रमाणे, आणि ईसरदास नारंगांचं वय होत आल्यामुळे, वयाच्या दहाव्या वर्षी ते वडिलांच्या व्यवसायात उतरले. शालेय शिक्षण सुरू होतंच, पण त्यांचा खरा ओढा होता तो व्यवसायाकडे. मूळचा हिर्‍यांचा व्यापार होताच. जोडीला आता अनेक परदेशी कंपन्यांच्या एजन्स्या आल्या. सुईपासून हिर्‍याच्या दागिन्यांपर्यंत अनेक वस्तूंची आणि यंत्रांची आयातनिर्यात ते करत असत. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे त्यांचे आवडीचे विषय. यंत्रांशी त्यांची मैत्री होती. युरोपात आणि अमेरिकेत झपाट्यानं नवनवीन यंत्रं, नवनवीन उपकरणं शोधली जात होती. त्या देशांमध्ये यंत्रयुग अवतरल्यामुळं झालेली भरभराट, यंत्रांमुळे झालेली प्रगती त्यांना ठाऊक होती. इंग्रजांमुळे लवकरच भारतातही आता लवकरच यंत्रयुग अवतरेल, हे त्यांनी जोखलं होतं, आणि त्या दिशेनं त्यांनी आपला व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. जबरदस्त बुद्धिमत्ता आणि उत्तम ग्रहणशक्तीच्या जोरावर लवकरच ते स्थिरावले, आणि त्यांचा व्यवसाय कितीतरी पटींनी विस्तारला. कुबेरही लाजेल एवढी अमाप संपत्ती त्यांनी दहाव्याबाराव्या वर्षापासून मिळवायला सुरुवात केली. लवकरच निम्मंअधिक कराची त्यांच्या मालकीचं झालं. दोनतीन मजल्यांच्या भव्य, देखण्या अशा सदतीस इमारती लालाजींनी बांधल्या. या इमारती दुकानांसाठी, कार्यालयांसाठी, हॉटेलांसाठी त्यांनी भाड्यानं दिल्या. शिवाय एक तीनशे खाटांचं मॅटर्निटी होम त्यांनी बांधलं होतं. इथे फुकट शस्त्रक्रिया आणि औषधोपचार होत असत.

Haveli.jpgवयाच्या पंधराव्या वर्षी लालाजींची ओळख कराचीतील एक प्रतिष्ठित, दयाळू आणि धनवान असामी म्हणून होती. एक मोठ्ठं साम्राज्य त्यांनी कोवळ्या वयात उभं केलं होतं. साहजिकच भारतातल्या तमाम संस्थानिकांशी, उद्योजकांशी आणि राजकीय नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. पं. मोतीलाल नेहरू तर त्यांचे कायदेशीर सल्लागार होते. कराची हे बॅरिस्टर जिनांचं जन्मगाव. त्यामुळे कराचीला आले की ते लालाजींना भेटून जात. सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय, जवाहरलाल नेहरू अशा अनेकांशी लालाजींचं सख्य होतं. लालाजींच्या पदरी दोनेकशे नोकर होते. त्यांपैकी बहुतेक सगळे ब्रिटिश होते. अगदी माळ्यास्वयंपाक्यापासून खाजगी सचिवापर्यंत सारे ब्रिटिश. ’तुम्ही मारे गुलामगिरीच्या गोष्टी करता. माझ्याकडे बघा. माझ्या पदरी कितीतरी ब्रिटिश नोकर आहेत. ब्रिटिश भारतावर राज्य करतात, पण मी त्यांना पगार देतो. राज्य करणंही एक कला आहे हो..’, असं लालाजी आपल्या या मित्रांना चिडवत असत. एवढं वैभव पदरी असूनही लालाजींची राहणी मात्र अतिशय साधी होती. कपड्यालत्त्याचा किंवा आपल्या संपत्तीचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. जगभरातल्या घडामोडींमध्ये त्यांना अधिक रस होता. अमेरिकेतली, युरोपातली वृत्तपत्रं, नियतकालिकं ते मागवत असत. आपल्या अवतीभवती होणारी तांत्रिक प्रगती त्यांना सुखावत असे. डोळ्यांना झापडं लावून जगणं जणू त्यांना ठाऊकच नव्हतं. जोडीला होती सौंदर्यदृष्टीची देणगी. त्यामुळे देशविदेशातल्या सुरेख चीजवस्तू ताबडतोब लालाजींच्या हवेलीत हजर होत. चेकोस्लोवाकियातलं दीड लाख रुपये किमतीचं एक अफाट सुंदर झुंबर लालाजींच्या दिवाणखान्यात होतं. यंत्रांमध्ये तर त्यांना रस होताच. मेकॅनिकल इंजिनीयरिंगची पदवी त्यांनी मिळवली होती. त्यामुळे अत्याधुनिक यंत्रं बाजारात येताक्षणीच ते विकत घेत असत. कॅडिलॅक, रोल्स रॉइस, बेन्टले, ब्यूक अशा पन्नासेक अलिशान गाड्या त्यांच्या मालकीच्या होत्या. वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी पहिलं विमान विकत घेतलं. हे विमान उतरवण्यासाठी कराचीला धावपट्टी हवी, म्हणून ’कराची एरो क्लब’ची त्यांनी स्थापना केली. स्वखर्चानं धावपट्टी बांधली. पुढे १९२९ साली त्यांनी डीएच - ६० मॉथ हे त्या काळी सर्वांत आधुनिक असलेलं दुसरं विमान विकत घेतलं. मग या विमानाला अपघात झाला म्हणून लगेच पुढच्या वर्षी तिसरं विमान त्यांनी विकत घेतलं. १९३० साली ते विमानोड्डाणाची परीक्षा उत्तीर्ण झाले, आणि त्यांना वैमानिकाचं लायसन्स मिळालं. हे लायसन्स मिळवणारे ते ब्याऐंशीवे भारतीय होते. १९३२ साली विमानोड्डाणाची विद्या कराचीच्या एरो क्लबात शिकून औंधचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी विमान चालवत कराचीहून औंधला आले ते लालाजींच्याच विमानातून. पुढे वेळोवेळी कराचीचं विमानतळ आधुनिक व्हावं, यासाठी लालाजींनी पुढाकार घेतला, आणि कराची एरो क्लबामार्फत भरघोस आर्थिक मदतही केली. अनेक वर्षं ते कराची एरो क्लबाचे अध्यक्ष होते. लालाजींचं हे यंत्रप्रेम जितकं गाढ, तितकंच प्रखर होतं त्यांचं संगीतप्रेम.

ईसरदास नारंग व्यवसायाच्या कामांनिमित्त अनेकदा मुंबईला जात असत. या मुंबईभेटींमध्ये शास्त्रीय गायनाच्या बैठकींना, संगीतनाटकांना हजेरी लावणं ठरलेलं असे. अगदी लहानपणापासून लालाजी आपल्या वडिलांबरोबर मुंबईला अशा कार्यक्रमांना जात. या काळात कानी पडलेलं गाणं आणि एकुणातच गाण्याची असलेली उपजत आवड यांमुळे लालाजीही वयाच्या दहाव्याबाराव्या वर्षापासून बैठकींना हजेरी लावू लागले. हे संगीतप्रेम दृढमूल झालं ते अमेरिकेत लागलेल्या ध्वनिमुद्रिकांवर आवाज सुईच्या मदतीनं कैद करण्याच्या शोधामुळे.

एडिसनच्या इन्व्हेन्शन फ्याक्टरीत फोनोग्राफचा शोध लागला, आणि जगभरात एका नव्या युगाला सुरुवात झाली. यंत्रात आवाज बंदिस्त करण्याची जादू लोकांना दाखवण्यासाठी अनेक कंपन्या पुढे सरसावल्या.’ग्रामोफोन अ‍ॅण्ड टाईपरायटर लि.’ ही कंपनी भारतात आली त्याच्या आधीपासूनच अनेक भारतीय आणि ब्रिटिश कंपन्या कोरे सिलिंडर्स, फोनोग्राफ आणि ध्वनिमुद्रिका युरोपातून आयात करत होत्या. १८९८ साली डिसेंबर महिन्यात सिलिंडर फोनोग्राफचं पहिलं प्रात्यक्षिक कलकत्त्यात दाखवण्यात आलं. हे प्रात्यक्षिक दाखवणारी ’महाराज लाल अ‍ॅण्ड कंपनी’ १८९५ साली स्थापन झाली होती. त्या काळातल्या सिलेंड्रिकल रेकॉर्डी बांगड्यांच्या चवडीप्रमाणे दिसत आणि त्यांना म्हणूनच ’चूडियाँ’ किंवा ’बांगड्या’ म्हणत. भारतातल्या अनेक गायकगायिकांची अशी बांगडी ध्वनिमुद्रणं बाजारात उपलब्ध होती. मात्र हे तंत्रज्ञान लवकरच मागे पडलं आणि ७ इंची, १० इंची, १२ इंची व्यासाच्या ग्रामोफोनावर वाजणार्‍या तबकड्या बाजारात आल्या. १९०२ साली कलकत्त्याला पहिलं स्थानिक ध्वनिमुद्रण केलं गेलं. गौहरजान ही भारतात ध्वनिमुद्रण करणारी पहिली गायिका ठरली, आणि त्यानंतर एका मागोमाग एक ध्वनिमुद्रिका बाहेर पडत राहिल्या. मिस गौहर, मिस सुशीला, मिस विनोदिनी, मिस अचेरिया, मिस किरणदेवी, मिस राणी या जीटीएल कंपनीच्या यशस्वी गायिका ठरल्या. या कंपनीनं मिळवलेलं यश बघून ’ड्वार्किन अ‍ॅण्ड सन्स’, ’युनिव्हर्सल’, ’नायकोल’, ’एच. बोस’, ’सिंगर’, ’ओडियन’, ’द बेका’, ’राम-ए-फोन डिस्क’, ’एलिफोन’, ’बिनापानी’, ’कमला’ अशा असंख्य भारतीय, अमेरिकी, युरोपीय कंपन्या या घोडदौडीत सामील झाल्या. भारतात ध्वनिमुद्रिकांच्या व्यापाराला प्रचंड वाव होता. लोकसंख्या भरपूर, शिवाय या देशात अनेक भाषा बोलल्या जात. जोडीला संगीतप्रेम होतंच. या देशातला प्रत्येक माणूस काहीही बरंवाईट झालं की संगीताचा आधार घ्यायचाच. ध्वनिमुद्रिका बनवणार्‍या कंपन्यांना आणखी काय हवं होतं?

१९१० सालापर्यंत भारतात ध्वनिमुद्रिकांचं उत्पादन व्हायला सुरुवात झाली होती. कलकत्त्यात ध्वनिमुद्रिका बनवणारे कारखाने सुरू केले गेले. ध्वनिमुद्रणंही आता स्थानिक तंत्रज्ञच करत असत. मात्र तवायफांच्या कोठीमध्ये, श्रीमंत संस्थानिकांच्या दिवाणखान्यांमध्ये बंदिस्त असलेलं संगीत बाहेर पडलं, तरी अजूनही सामान्यजन ही बोलकी यंत्रं आणि तबकड्या फारसे विकत घेत नसत. ग्रामोफोन कंपन्यांची खरी गिर्‍हाइकं होती श्रीमंत व्यापारी आणि जमीनदार. दिवाणखान्यात ग्रामोफोनाचा चकचकीत कर्णा असणं हे स्टेटस सिम्बल होतं. कंपन्यांचे एजंट या धनिकांशी संपर्क राखून असत. नव्या ध्वनिमुद्रिका बाजारात आल्या की लगेच त्या श्रीमंतांच्या घरी पोचत्या केल्या जात. लालाजींची बात जरा वेगळी होती. फक्त ग्रामोफोनानं त्यांचं समाधान कसं होणार? त्यांच्याकडे १९१० सालापासूनच ध्वनिमुद्रण करणारी यंत्रं होती. तबकड्यांवर आवाज कैद करण्याचं तंत्रज्ञान त्या काळी झपाट्यानं विकसत होतं. दर दोनतीन वर्षांनी मोठे बदल होत होते. लालाजींचं तांत्रिक ज्ञान अफाट असल्यानं ध्वनिमुद्रणाच्या तंत्रात थोडीशीही प्रगती झाल्यास ते लगेच त्या तंत्राचा अवलंब करीत. बाजारात नवं ध्वनिमुद्रण यंत्र, किंवा नव्या तबकड्या येताक्षणी त्या हवेलीत दाखल होतील, याची तजवीज त्यांनी करून ठेवली होती.

लालाजी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायात स्थिरावले आणि त्यांचं संगीतप्रेम अधिकच बहरलं. नुकतीच पं. विष्णू दिगंबरांमुळे जालंधरच्या हरिवल्लभ संगीतमहोत्सवाला नवसंजीवनी मिळाली होती. लालाजी दरवर्षी तिथे हजेरी लावू लागले. भारतभरातले बिनीचे कलावंत या संगीतमहोत्सवात आपली कला सादर करत. लालाजी या उत्सवाचा पूर्ण आनंद लुटत. मात्र लालाजींना खरी भुरळ घातली होती ती महाराष्ट्रातल्या बखलेबुवांनी आणि त्यांच्या शिष्यांनी. महाराष्ट्रातला त्या काळचा एकंदर माहौल संगीताच्या विकासाला पूरक होता. गाणं सादर करण्याची पद्धत, गाण्याकडे बघण्याची दृष्टी, गाण्याचं रसग्रहण, अभ्यासाची पद्धत अशा अनेक गोष्टी आता बदलत होत्या. गायकगायिकांची विचारसरणी आता अधिक खुली होत होती. शिवाय उत्सव, जत्रा, समारंभ यांच्या निमित्तानं संगीताच्या बैठकींची रेलचेल असे. भारतात इतरत्र जलशांचे मुख्य आश्रयदाते असत ते शहरातले धनिक. संगीतादी कलांना आश्रय देणारे म्हणून त्यांचा लौकिक होता. महाराष्ट्रातही थोडीफार अशीच परिस्थिती होती, पण महाराष्ट्रात संगीत सामान्यांपर्यंत पोहोचलं होतं. संगीतनाटकांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बखलेबुवा, वझेबुवा, बालगंधर्व, मा. दीनानाथ, संगीतसूर्य केशवराव भोसले, मा. कृष्णराव, गोविंदराव टेंबे हे रसिकांच्या गळ्यातले ताईत होते.

Bakhale.jpgगायनाचार्य भास्करबुवा बखले आणि त्यांचे शिष्य नारायण श्रीपाद राजहंस, म्हणजेच बालगंधर्व हे संगीत मानापमानापासून सुरू झालेल्या नव्या पर्वाचे शिल्पकार होते. भास्करबुवा खर्‍या अर्थानं अभिजात नाट्यसंगीताच्या परंपरेचे प्रवर्तक होते. ग्वाल्हेर घराण्याच्या फैज महंमद खान, आग्रा घराण्याच्या नथ्थन खान आणि जयपूर घराण्याच्या अल्लादिया खां यांसारख्या महान संगीतोपासकांकडे ते शिकले होते. त्यामुळे या तिन्ही घराण्यांच्या गायकीचं सौंदर्य त्यांच्या गाण्यात उतरलं होतं. ख्याल, ठुमर्‍या, नाट्यसंगीत ते सारख्याच सहजतेनं आणि ढंगदारपणे गात. एक परिपूर्ण गायक, अशीच त्यांची ओळख होती. विद्याहरण, सौभद्र, द्रौपदी, स्वयंवर अशा कितीतरी नाटकांतल्या पदांच्या चाली त्यांना बांधल्या, आणि बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, तारा शिरोडकर, बापूराव केतकर, गोविंदराव टेंबे, केसरबाई केरकर, विलायतहुसेनखाँसाहेब, सनईवादक शंकरराव गायकवाड असे अनेक शिष्योत्तम घडवले. लालाजींना बखलेबुवांच्या आणि त्यांच्या शिष्यांच्या गाण्यानं पुरतं काबीज केलं होतं. संधी मिळेल तेव्हा आणि तिथे ते या मंडळींच्या बैठकींना जात, आणि गाण्याचा पुरेपूर आनंद लुटत.

त्या काळातल्या संगीताला आश्रय देणार्‍या धनवंतांपेक्षा लालाजी वेगळे होते. कलेइतकंच त्यांचं कलावंतांवर प्रेम होतं. प्रचंड पैसा मिळवला तरी कलावंताला, त्याच्या कलेला मान देणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटत असे. त्यामुळे बालगंधर्व, मा. कृष्णराव यांसारख्या गायकांबरोबरच, अब्दुल करीम खाँसाहेब, उस्ताद फैय्याजखाँसाहेब, सुरेशबाबू माने, केसरबाई केरकर अशा अनेक दिग्गजांशी त्यांचा स्नेहबंध निर्माण झाला. लालाजी या थोर गायकांच्या बैठकींना आवर्जून हजेरी लावत, किंवा त्यांना आपल्या घरी आमंत्रण देत. त्यांचं गाणं मनसोक्त ऐकत. या महान कलावंतांचं गाणं जतन करून ठेवणं अत्यावश्यक आहे, हे लालाजींनी ओळखलं होतं. प्रत्येकच कलावंत काही व्यावसायिक ध्वनिमुद्रणांसाठी अनुकूल नसे. शिवाय अशा खाजगी बैठकींची ध्वनिमुद्रणं बाजारात कशी उपलब्ध असणार? आपल्या दिवाणखान्यातल्या या मौल्यवान स्वरांचा आनंद नंतरही लुटता यायलाच हवा, म्हणून ते बैठकी ध्वनिमुद्रित करून ठेवत. खरं म्हणजे संगीतातली नजाकत, बारकावे आणि शुद्धता या ध्वनिमुद्रणयंत्रामुळे लोप पावतात, अशी तत्कालीन दिग्गजांना खात्री होती. त्यामुळे ध्वनिमुद्रणं करण्यासाठी ते नाखूश असत. पण लालाजींच्या संगीतप्रेमाबद्दल, त्यांच्या दिलदार वृत्तीबद्दल, त्यांच्यातल्या माणूसपणाबद्दल या कलावंतांच्या मनात यत्किंचितही किंतु नव्हता. त्यामुळे हे कलावंतही लालाजींसमोर गाताना भरभरून गात. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे ध्वनिमुद्रण करू देत. १९१० सालापासून लालाजींनी अशी ध्वनिमुद्रणं करायला सुरुवात केली होती.

मग १९२० साली मायक्रोफोनाचा शोध लागला, आणि १९२५ साली मेकॅनिकल ध्वनिमुद्रण जाऊन इलेक्ट्रिकल ध्वनिमुद्रण आलं. त्याच वर्षी केपहार्ट कंपनीनं आपली ध्वनिमुद्रण यंत्रं बाजारात आणली, आणि लालाजींनी ताबडतोब दोन अत्याधुनिक यंत्रं विकत घेतली. एक केपहार्ट रेकॉर्डर - प्लेयर आणि दुसरं केपहार्ट प्लेयर. त्या काळातली ध्वनिमुद्रणासाठीची हे सर्वांत आधुनिक अशी यंत्रं होती. एका कपाटाच्या आकाराची ही यंत्रं. रेकॉर्डर - प्लेयरमध्ये एकावेळी २४ तबकड्या एका स्टॅकमध्ये मावत. या तबकड्या जर्मनीहून किंवा अमेरिकेहून मागवल्या जात. त्या टर्नटेबलावर ठेवून पुढे संगमरवरी ठोकळ्याचा मायक्रोफोन ठेवायचा. यंत्रात दोन हात होते. एका हाताला सुई होती. ध्वनिमुद्रण करताना हा हात तबकडीवर ठेवायचा, आणि मग ती सुई खाचा तयार करायची. दुसरा हात तबकडीची एक बाजू संपली की दुसरी बाजू वर करायचा. दोन्ही बाजूंना ध्वनिमुद्रण झालं, की हा हात तबकडी त्या गठ्ठ्याच्या खाली तबकडी सरळ करून ठेवायचा. प्लेयरमध्येसुद्धा अशीच यंत्रणा होती. यात २८ तबकड्या स्टॅकमध्ये राहायच्या. एका मागोमाग एक या तबकड्या दोन्ही बाजूंनी वाजायच्या. एका तबकडीवर एका बाजूनं वीस मिनिटांचं ध्वनिमुद्रण होऊ शकत असे. ही ध्वनिमुद्रणं आतून बाहेरच्या दिशेनं केली तर त्यांच्या दर्जा अधिक चांगला असतो, असं या यंत्राच्या माहितीपत्रकात लिहिलेलं होतं. मात्र लालाजींना सुरुवातीला कदाचित ठाऊक नसावं, कारण काही तबकड्यांवर याच्या बरोब्बर उलट्या तंत्रानं ध्वनिमुद्रण केलं आहे. नंतर त्यांना आपली चूक लक्षात आली असावी. केपहार्ट यंत्रानं लालाजींनी असंख्य ध्वनिमुद्रणं केली. ही दोन्ही यंत्रं वापरून जुन्या तबकड्याही त्यांनी पुन्हा एकदा नव्या तबकड्यांवर साठवून ठेवल्या असाव्यात.

लालाजी दरवर्षी चारपाच महिने पुण्यात येऊन राहत असत. गाणं ऐकण्यासाठी. लालाजी येणार त्याच्या महिनाभर आधी बसमधून त्यांचे सेवक पुण्यात दाखल होत. गणेशखिंड रस्त्यावर मफतलाल बंगल्याशेजारी डनलेवन हाऊस नावाचा मोठा बंगला होता. हा बंगला लालाजींनी भाड्यानं घेतलेला असे. तिथे लालाजींचे सेवक अगोदर सारी व्यवस्था लावत. मग एका ट्रकातून लालाजींची ध्वनिमुद्रण यंत्रं कराचीहून येत. मग विमानातून लालाजी पुण्याला येत. गणेशोत्सवाच्या जरा आधीच लालाजींचं आगमन होई. गणेशोत्सवात पुण्यात दररोज जलसे असत, आणि बालगंधर्व व मास्तर कृष्णराव यांचं गाणं या जलशांमध्ये ऐकायची संधी मिळत असे. शिवाय इतरही दिग्गज गायक गणरायाच्या चरणी आपली सेवा अर्पण करत असत. लालाजी क्वचित पाचगणीला जात. तिथे ’सकाळ’च्या संस्थापक-संपादक असलेल्या डॉ. नानासाहेब परुळेकरांच्या बंगल्यावर त्यांचा मुक्काम असे. या मुक्कामात रोजच गाण्यांच्या बैठकी होत. लालाजी गायकांना मोठ्या मानानं पुण्याला बोलावत. त्यांचा आदरसत्कार करत. त्यांच्या बैठकी आयोजित करत, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या बैठकींचं ध्वनिमुद्रण करत. पुण्यात किंवा आसपासच्या शहरात ’गंधर्व नाटक कंपनी’चा मुक्काम असेल, तर लालाजी नाटकांना हजेरी लावत. नाटक संपल्यानंतर कंपनीतल्या प्रत्येकाला चांदीची नाणी भरलेला चांदीचा तांब्या देत.

MastarLalaji.jpgभास्करबुवांच्या आणि अब्दुल करीम खाँसाहेबांच्या गाण्याबद्दल लालाजींना विशेष ममत्व होतं. बालगंधर्व आणि मास्तर कृष्णराव तर त्यांच्या विशेष आवडीचे होतेच, पण भास्करबुवांच्या इतर शिष्यांचं गाणं ऐकण्यासही ते आसुसलेले असत. ताराबाई शिरोडकर यांचं गाणं ऐकण्याचा त्यांना अनेक वर्षं योग आला नाही. ताराबाई या बुवांच्या शिष्या. बुवांच्या मृत्यूनंतर त्यांनी गाणं बंद केलं आणि त्या सोलापूरला निघून गेल्या. लालाजींना ताराबाईंचं गाणं ऐकण्याची प्रचंड इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मास्तर कृष्णराव सोलापूरला गेले, आणि ताराबाईंनी पुण्याला यावं, अशी त्यांना विनंती केली. ताराबाईंनी अर्थातच नकार दिला. पण मास्तरांनी फारच आग्रह केल्यावर त्या तयार झाल्या. अट एकच. मास्तरांनी त्यांची अगोदर महिनाभर तालीम घ्यायची, आणि त्यांचं समाधान झालं तरच त्या गातील. ताराबाईंनी मग पुण्याला राहून महिनाभर तयारी केली, आणि लालाजींसमोर आपलं गाणं सादर केलं. या गाण्याचं ध्वनिमुद्रण अर्थातच लालाजींनी केलं असणार. त्यांच्या गुणग्राहक वृत्तीमुळे बिनीचे गायक त्यांच्यासाठी आपली कला सादर करायला तयार होत. अब्दुल करीम खाँसाहेबांचीही ध्वनिमुद्रणं लालाजींनी अनेकदा केली. सुरेशबाबू माने हे खाँसाहेबांचे पुत्र आणि शिष्य. हिराबाई बडोदेकर, प्रभा अत्रे, माणिक वर्मा यांचे गुरू. सुरेशबाबू माने ऐन विशीत असताना लालाजींनी त्यांचं गाणं ध्वनिमुद्रित केलं होतं. पाचगणी, कराची इथेही नेहमी बैठकी होत, आणि या बैठकींची ध्वनिमुद्रणं होत असत. अनेकदा गाणं ऐकावंसं वाटलं की लालाजी कराचीहून मुंबईला, पुण्याला आपलं विमान पाठवत आणि गायकाला बोलावून घेत. मीठादरातल्या हवेलीत या पाहुण्यांची उत्तम बडदास्त ठेवली जाई. सारा नोकरवर्ग त्यांच्या दिमतीस असे. कमीत कमी चार दिवसतरी रोज बैठकी रंगत. कधी लालाजी शहरातल्या गानप्रेमींना आमंत्रण देत, तर कधी फक्त ते आणि त्यांच्या मातु:श्री हे श्रोते असत.

सुरेशबाबू माने यांनी गायलेला राग चंद्रकंस -



MukeshNarang1.jpgफाळणीनंतर नारंग कुटुंबीय पुण्याला आले. लालाजी १९३८ साली निवर्तले होते. पुण्याशी लालाजींचा जुना ऋणानुबंध होता, त्यामुळे दुसर्‍या शहरात स्थायिक होण्याचा प्रश्नच नव्हता. पुण्यात येताना त्यांना आपली बहुतेक सारी संपत्ती मागे ठेवून यावं लागलं. मात्र लालाजींच्या पत्नींनी, पिप्परीबाईंनी, त्यांची दोन्ही ध्वनिमुद्रण यंत्रं आणि नऊशेच्या आसपास ध्वनिमुद्रिका सुखरूप पुण्यात येतील, याची काळजी घेतली. हिरेजवाहिरांपेक्षा, महागड्या गाड्यांपेक्षा नारंग कुटुंबियांना या ध्वनिमुद्रिका महत्त्वाच्या वाटल्या. लालाजींच्या चिरंजीवांनी, तेजूमल नारंगांनी, या ध्वनिमुद्रिका सांभाळून ठेवल्या. ते २००४ साली निवर्तले, आणि या ध्वनिमुद्रिकांचा ताबा लालाजींच्या नातवाकडे, मुकेश नारंगांकडे, आला. या ध्वनिमुद्रिका कमीत कमी ऐंशी वर्षं जुन्या होत्या. त्यात अमूल्य आवाज बंदिस्त आहेत, हे मुकेशजींना माहीत होतं. त्यांना या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दस्तऐवजाचं मोल ठाऊक होतं. आपल्याकडे अतिशय महत्त्वाचा ठेवा आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी या ध्वनिमुद्रिकांचं संगणकीकरण करण्यास सुरुवात केली. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा विकत आणली. प्रत्येक ध्वनिमुद्रिका अगोदर लालाजींच्या केपहार्टच्या प्लेयरवर ऐकायची, आणि मग त्यातले आवाज संगणकावर उतरवून घ्यायचे. हे आवाज फार स्पष्ट नसत. यंत्राची खरखर असे, इतर काही आवाज असत. म्हणून मग हे आवाज स्वच्छ करावे लागत. एकुणात अतिशय वेळखाऊ आणि किचकट असं हे काम होतं.

MadhavGore.jpgया कामी मुकेशजींना मदत केली ती माधव गोरे यांनी. माधव गोरे यांची ध्वनिमुद्रणाच्या आणि छायालेखनाच्या तंत्रावर जबरदस्त हुकुमत आहे. मुकेशजींकडे असलेल्या ध्वनिमुद्रिकांचं संगणकीकरण निर्दोष व्हावं, यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. माधव गोर्‍यांशी भेट होण्यापूर्वी मुकेशजींना काही थोड्या ध्वनिमुद्रिकांचं संगणकीकरण करून ठेवलं होतं. यांपैकी एका ध्वनिमुद्रिकेत फक्त मिनिटभराचा एक आवाज होता. हा आवाज वगळता ती ध्वनिमुद्रिका कोरी होती. मुकेशजींच्या संग्रहात असलेल्या कुठल्याही ध्वनिमुद्रिकेवर काहीच लिहिलेलं नसल्यानं हा आवाज कोणाचा, हे कळण्यास अजिबात वाव नव्हता. मुकेशजींनी हा आवाज संगणकावर उतरवून घेतला. हे काहीतरी खास आहे, हे मुकेशजींच्या लक्षात आलं होतं. कारण या ध्वनिमुद्रणातली व्यक्ती भास्करबुवा बखल्यांबद्दल आदर व्यक्त करून श्रोत्यांना ’शांतपणे ऐका, नाहीतर चालते व्हा’ असं सुनावत होती. ही गोष्ट साधारण सहा वर्षांपूर्वीची. माधव गोरे या कामात सहभागी झाल्यावर मुकेशजींनी हा आवाज एकदा त्यांना ऐकवला. हा आवाज ऐकताक्षणी त्यांच्या अंगावर सर्रकन काटा आला. भास्करबुवा बखल्यांच्या तोडीच्या अधिकारी व्यक्तीचा हा आवाज आहे, हे त्यांनी ओळखला. मात्र या आवाजाचा धनी कोण, हे कळायला मार्ग नव्हता. एरवी ध्वनिमुद्रिकांचं संगणकीकरण केलं की मुकेशजी संगीतक्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तींना त्या आवाजांबद्दल विचारत, कारण ध्वनिमुद्रिकांवर नाव नसे. पण हा आवाज मात्र का कोण जाणे, मुकेशजींकडून कोणाला ऐकवला गेला नाही.

MandarVaidya.jpgकाही महिन्यांपूर्वी मंदार वैद्यला घेऊन गोरे मुकेशजींकडे गेले. मंदार वैद्य हा संगणकशास्त्राचा पदवीधर. संकेतस्थळं तयार करणं हा त्याच्या व्यवसाय. अनेक शास्त्रीय गायकांची आणि सवाई गंधर्व संगीतमहोत्सवासारख्या उत्सवांची संकेतस्थळं त्यानं तयार केली आहेत. किल्ल्यांवर आणि संगीतावर याचं मनापासून प्रेम. या प्रेमामुळेच संगीताचं दस्तऐवजीकरण करण्यासाठी तो गेली वीस वर्षं झटतो आहे. पं. जितेंद्र अभिषेकी, पं. जसराज, पं. मल्लिकार्जुन मन्सूर अशा गायकांच्या खाजगी मैफिलींमधली ध्वनिमुद्रणं मिळवून त्यांची सूची करण्याचं अवघड काम तो करतो आहे. अभिषेकीबुवांनी गायलेल्या १२२ रागांची सूची त्यानं शौनक व रश्मी अभिषेकी यांच्या मदतीनं तयार केली आहे. गेले काही महिने तो अब्दुल करीम खाँसाहेबांवर लघुपट तयार करण्याच्या कामात व्यग्र आहे. या लघुपटासाठी वापरता येतील अशी लालाजींनी केलेली अब्दुल करीम खाँसाहेबांची अनेक अप्रकाशित ध्वनिमुद्रणं मुकेशजींकडे आहेत, हे मंदारला माधव गोर्‍यांकडून कळलं, आणि ध्वनिमुद्रणं संगणकावर उतरवून घेण्याच्या कामात तोही सामील झाला.

अब्दुल करीम खाँसाहेबांवर लघुपट करावा, ही मूळ कल्पना प्रख्यात गायिका मीना फातर्पेकरांची. मंदार मीनाताईंबरोबर ’स्वरवेल’ नावाचा एक कार्यक्रम करतो. अब्दुल करीम खाँसाहेब आणि त्यांची सुरेशबाबू, हिराबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे ही तीन मुलं यांच्या किराणा घराण्यातल्या गायकीवर आधारित असा हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम करताना दृकश्राव्य माध्यमातल्या दस्तऐवजीकरणाची गरज मीनाताईंना जाणवली, कारण खाँसाहेबांच्या आयुष्याबद्दल, गाण्याबद्दल एकत्रित माहिती कुठे फारशी मिळत नाही. कपिलेश्वरी बुवांनी त्यांचं चरित्र लिहिलं आहे खरं, पण दृकश्राव्य माध्यमात त्यांची काही ध्वनिमुद्रणं आणि छायाचित्रं वगळता काहीच उपलब्ध नाही. अब्दुल करीम खाँसाहेबांची थोरवी अतुलनीय आहे. किराणा घराण्याला त्यांनी वजन मिळवून दिलं. आज किराणा घराणं ज्यांच्या नावानं ओळखलं जातं, त्या भीमसेन जोशी, गंगुबाई हनगळ, फिरोज दस्तुर, प्रभा अत्रे यांच्या गुरूंचे हे गुरू. काळाच्या फार पुढे जाऊन खाँसाहेबांनी काम केलं. १९०२ साली त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका बाजारात आली होती. खाँसाहेबांच्या ध्वनिमुद्रिकांचं ऋण भीमसेन जोशी, पं. जसराज यांनी अनेकदा मान्य केलं आहे. त्यामुळे हा लघुपट लवकरात लवकर तयार व्हावा, अशी सार्‍यांचीच इच्छा होती.

अब्दुल करीम खाँसाहेबांनी गायलेलं 'दे हाता या शरणागता' हे नाट्यगीत -



अब्दुल करीम खाँसाहेबांच्या आजवर अप्रकाशित अशा ध्वनिमुद्रणांवर काम करण्यासाठी मंदार मुकेशजींकडे एक दिवस गेला असताना मुकेशजींनी त्याला सहा वर्षांपूर्वी सापडलेला तो आवाज ऐकवला. ७२ सेकंदांचं ते भाषण ऐकताक्षणीच मंदारला गायकवाडवाड्यात १९१५ साली घडलेल्या प्रसंगाबद्दल वाचलेलं आठवलं. ज्येष्ठ गायिका आणि भास्करबुवांच्या नातसून शैला दातारांनी ’देवगंधर्व’ या बुवांच्या चरित्रात लोकमान्यांनी बुवांच्या गाण्याच्या वेळी झालेला गोंधळ आटोक्यात आणला, या प्रसंगाचं वर्णन केलं आहे. मास्तर कृष्णराव आणि गणेश नरहर श्रीगोंदेकर या दोघांनी लिहून ठेवलेल्या आठवणींचा आधार त्याला आहे. २१ स्पटेंबरच्या 'केसरी'त या कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मंदारनं लगेच शैलाताईंना या ध्वनिमुद्रणाबद्दल सांगितलं. घडलेल्या प्रसंगाच्या वृत्तांताशी त्या ध्वनिमुद्रणातला प्रत्येक शब्द जुळतो, याची शैलाताईंना खात्री पटली. पण हा आवाज लोकमान्यांचाच आहे, याची अधिक खात्री करून घेणं आवश्यक होतं.

नकलाकार गोपाळ विनायक भोंडे लोकमान्य टिळक, भालाकार भोपटकर, शि. म. परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, रँग्लर परांजपे, लोकनायक बापूजी अणे अशा अनेकांच्या हुबेहूब नकला करत असत. लोकमान्यांसारखीच वेशभूषा करून ते मंचावर येत, आणि लोकमान्यांच्या आवाजात, बोलण्याच्या लकबीत त्यांनी पूर्वी केलेल्या भाषणाची नक्कल करीत. भोंड्यांच्या चरित्रात त्यांच्या लोकमान्यांच्या बोलण्याच्या लकबीविषयी लिहिलं आहे - भाषणात निर्भयता व खडखडीतपणा. खंजीरवजा छोटीं छोटीं व ठसठशीत वाक्यें. स्पष्ट उच्चार व अर्थानुसार शब्दावर जोर देण्याची लकब. सोपे अर्थगर्भ शब्द. सहज पटतील अशा समर्पक उपमा व दृष्टांत. ध्वनिमुद्रणातलं भाषण या वर्णनाशी जुळणारं होतं. मग मंदारनं भोंडे कुटुंबियांकडून भोंड्यांचं एक अतिशय जुनं ध्वनिमुद्रण मिळवलं. भोंड्यांच्या नकलेच्या आवाजाचा पोत आणि तबकडीतल्या आवाजाचा पोत बराचसा सारखा होता. हे पुरावे पुरेसे होते. शिवाय कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी लोकांना तंबी देणारं, त्यांना ’ऐकायचं नसेल तर उठून जा, पण कार्यक्रम होणारच’ असं गायकवाडवाड्यात सांगणारं लोकमान्यांशिवाय अजून कोण असू शकेल? एक मात्र खरं, की या ध्वनिमुद्रणात लोकमान्यांचा आवाज किंचित थकल्यासारखा वाटतो. लोकमान्य तेव्हा मंडालेहून परतले होते. सहा वर्षं ते तिथल्या तुरुंगात होते. तिथे प्रचंड हालअपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या. खाण्याचे हाल झाले. त्यांचं वजन झपाट्यानं कमी झालं. शिवाय मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे प्रकृतीवरचा ताण त्यांच्या आवाजातही जाणवतो.
भास्करबुवांचं गाणं ध्वनिमुद्रित करत असताना केलं गेलेलं हे ध्वनिमुद्रण आहे. हे चुकून ध्वनिमुद्रित झालेलं भाषण नव्हे. लोकमान्य बोलायला उभे राहिल्यावर लालाजींनी ध्वनिमुद्रण सुरू राहू दिलं असणार. या ध्वनिमुद्रणाचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी ते नव्या तबकडीवर पुन्हा मुद्रित केलं असण्याची शक्यता आहे. कारण या तबकडीवर ७२ सेकंदांचं हे भाषणच केवळ आहे. लोकमान्य बोलायला उभे राहिले, त्याआधी आणि नंतर ध्वनिमुद्रण सुरू असण्याची दाट शक्यता आहे. हे ध्वनिमुद्रण दुसर्‍या तबकडीवर मुकेश नारंगांच्या संग्रहात सापडलं, तर आजवर ऐकता न आलेला भास्करबुवांचा आवाज, त्यांचं स्वर्गीय गाणं ऐकता येईल.
नकलाकार भोंडे यांनी लोकमान्य टिळकांच्या आवाजाची केलेली नक्कल -


बखलेबुवांचं, बालगंधर्वांचं, मा. कृष्णरावांचं गाणं हे लालाजींच्या आयुष्याचा एक अविभाज्य हिस्सा होतं. हे गाणं कानी पडावं यासाठी केवढा आटापिटा त्यांनी केला! बुवांचं गाणं आपल्या गळ्यात रुजावं, अशीही त्यांची फार इच्छा होती. लालाजींनी मग गानविद्येचा ध्यास घेतला. प्रत्यक्ष भेट झाली की मा. कृष्णराव त्यांना गाण्यातले धडे देत असत. मास्तरांच्या समोर बसून, हाती तंबोरा घेऊन लालाजी गाणं शिकत. पण या भेटींमध्ये सातत्य नसे. मास्तरांनी मग बापूराव केतकर या आपल्या गुरूबंधूंना कराचीला राहून लालाजींना बुवांच्या घराण्याचं गाणं शिकवण्याची विनंती केली, आणि बापूरावांनी ती मान्य केली. बापूरावांना मुंबईहून कराचीला आणण्यासाठी लालाजींनी अख्खी रेल्वेगाडी आरक्षित केली होती. काही काळ लालाजी बापूरावांकडे गाणं शिकले. पण बुवांच्या घराण्याचं गाणं आत्मसात करण्याची त्यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. लालाजी हिवतापानं आजारी पडले. त्याकाळी हिवतापावर काही इलाज नव्हता. लालाजींचा आजार बळावला तसा कराचीहून मुंबईला ट्रंककॉल गेला. आपला अंत:काळ आता जवळ आला आहे, हे लालाजींना कळलं होतं, आणि हे जग सोडताना बालगंधर्वांचे, मास्तरांचे स्वर कानी पडावेत, ही त्यांची शेवटची इच्छा होती. या दोघांना आणण्यासाठी कराचीहून मुंबईला खास विमान आलं. पण मास्तरांची प्रकृतीही ठीक नव्हती. बालगंधर्व होते नागपुरात. लालाजींच्या आजाराची बातमी कळताच कर्ज काढून मजलदरमजल करत ते कराचीला पोहोचले. पण बालगंधर्वांना पोहोचायला उशीर झाला होता. लालाजी हे जग सोडून गेले होते. त्यांनी डोळे मिटले तेव्हा बालगंधर्वांची ध्वनिमुद्रिका त्यांच्या उशाशी वाजत होती. जाण्यापूर्वी त्यांनी बालगंधर्वांच्या नावे पन्नास हजार रुपयांचा धनादेश लिहून ठेवला होता. दुसर्‍या दिवशी लालाजींच्या अंत्यसंस्कारांनंतर बालगंधर्वांनी तो धनादेश फाडून टाकला.

सेठ लखमीचंद नारंग यांनी गायलेला भीमपलासी -



बालगंधर्वांना लालाजींनी प्रचंड मदत केली. अनेकदा त्यांची आर्थिक अडचण सोडवली, त्यांची कर्जं फेडली. बालगंधर्वांनाही लालाजींच्या मोठेपणाची जाणीव होती. लालाजींबद्दलच्या अतीव प्रेमापोटी बालगंधर्व आपल्या नातवाला लाला म्हणत. नाटक कंपनी बंद पडल्यावर प्रॉपर्टीतल्या अनेक चीजवस्तू त्यांनी नारंग कुटुंबाला देऊन टाकल्या होत्या. लालाजींनी जसं कलावंतांना कधी काही कमी पडू दिलं नाही, तसंच संगीतावर प्रेम करणार्‍या मर्मज्ञ रसिकांसाठी कलेचा अमोल ठेवा ध्वनिमुद्रिकांद्वारे दिला. संगीतावरच्या या विलक्षण लोभामुळे त्यांनी केलेलं दस्तऐवजीकरणाचं महत्त्व प्रचंड आहे. आजच्या पिढीला ज्यांची नावंही कदाचित माहीत नसतील, अशा अद्वितीय कलावंतांची कला लालाजींमुळे जिवंत राहिली. भारतात कलाप्रकारांच्या दस्तऐवजीकरणाला अजिबात किंमत दिली जात नाही. पूर्वी झालेल्या मैफिली, तो काळ गाजवलेले महान कलावंत, त्यांचं आयुष्य, त्यांनी पादाक्रांत केलेली शिखरं, त्यांना मिळालेलं रसिकप्रेम आणि त्यांच्यासमोरची आव्हानं हे सारं काळाच्या उदरात गडप झालं आहे. त्या काळातल्या आत्मविलोपी कलाकारांना दस्तऐवजीकरणाचं महत्त्व नसावं, कारण त्यांच्या दृष्टीनं सर्वाधिक महत्त्वाची होती ती त्यांची कला. संगीत जाणून घेण्यात आणि संगीताची मजा लुटण्यात आयुष्य घालवणार्‍या कलंदर कलावंतांना संगीताचं दस्तऐवजीकरण बिनमहत्त्वाचं वाटत राहिलं. त्यामुळे भारतीय संगीताचा इतिहास बराचसा कोरा राहिला आहे. काही पानं भरली आहेत ती वर्षानुवर्षं प्रसृत होत राहिलेल्या आख्यायिकांनी. अशावेळी लालाजी, मुकेशजी, माधव गोरे, मंदार वैद्य यांसारख्या कलेच्या दस्तऐवजीकरणाचं महत्त्व जाणून त्यासाठी उरस्फोड करणार्‍यांचं ऋण कसं फेडावं हे कळत नाही.

बालगंधर्व यांनी गायलेले 'सौभद्र' नाटकातलं एक पद -


BalGanpati.jpg

कोरेगाव पार्कात मुकेश नारंगांचा बंगला आहे. या बंगल्यातल्या पहिल्या मजल्यावरच्या एका खोलीत ते आपल्या आजोबांच्या ध्वनिमुद्रिका संगणकावर उतरवून घेण्याचं काम करतात. आजवर पाचशे ध्वनिमुद्रिका त्यांनी संगणकावर उतरवल्या आहेत. त्यांतले जेमतेम पंधरावीस आवाज ओळखता आले आहेत. अजून चारेकशे ध्वनिमुद्रिकांचं काम बाकी आहे. या खोलीत पाऊल ठेवताक्षणी समोर बखलेबुवांचं मोठं तैलचित्र दिसतं. शेजारच्या दोन भिंतींवर बालगंधर्वांच्या स्त्रीवेषातल्या अस्सल तसबिरी आहेत. कुठलंही विशेषण लावलं तरी ते थिटं वाटावं असं ते अनुपम सौंदर्य, आणि तितकाच अनुपम बालगंधर्वांचा आवाज. याच खोलीत बालगंधर्वांनी ’कान्होपात्रा’ नाटकात वापरलेली विठ्ठलाची मूर्ती आहे. ’द्रौपदी’ नाटकातले पितळी पांडव आहेत, आणि रंगमंचावर पाऊल ठेवण्यापूर्वी बालगंधर्व ज्या गणपतीची पूजा करत, त्या गणपतीची सुरेख, घाटदार मूर्ती आहे. या मूर्तीकडे, बालगंधर्वांच्या तसबिरीकडे पाहिलं की भरून येतं. ती मूर्ती सतत पूजली जावी, ते सौंदर्य अबाधित राहावं, तो आवाज तसाच तळपता राहावा, यासाठी लालाजींनी केलेले परिश्रम केवळ अविश्वसनीय! पौगंडावस्थेत आवाज फुटल्यावर किर्लोस्कर नाटक कंपनीतून अपमानित होऊन बाहेर पडलेले, आणि नंतर भारतभरात सर्वश्रेष्ठ गायक असा लौकिक कमावणारे, अजोड शिष्य निर्माण करणारे भास्करबुवा बखले, लहानपणापासून गायनानं लोकांना वेड लावणारे बालगंधर्व, दहाव्याबाराव्या वर्षी एक भलंमोठं साम्राज्य उभारणारे, आणि कलावंत व त्याची कला कायम चैतन्यमय राहावेत, म्हणून धडपडणारे लालाजी, आणि कलावंताचा, कलेचा सन्मान कसा करायचा, हे लोकांना शिकवणारे लोकमान्य. सप्तपाताळ ते अंतराळ उंचीची ही माणसं. भास्करबुवा, लालाजी यांचं कर्तुत्व आता फारसं कोणाला ठाऊक नाही. त्यांची आयुष्यं जाणून घेण्यासाठीही असंख्य तुकडे जुळवावे लागतात. मात्र त्यांचे आवाज, त्यांच्या चारदोन आठवणी कलेचं, कलावंताचं आणि या दोहोंना जिवंत ठेवण्यासाठी कराव्या लागणार्‍या दस्तऐवजीकरणाचं महत्त्व एखाद्याला जरी पटवून देऊ शकले, तरी लालाजी, मुकेशजी, माधव गोरे आणि मंदार वैद्य यांच्या परिश्रमाचं चीज होईल, हे नक्की.

***


ध्वनिमुद्रणांचा तपशील -

१. ध्वनिमुद्रण क्र. १ - लोकमान्य टिळकांचा आवाज

२. ध्वनिमुद्रण क्र. २ - सुरेशबाबू माने यांनी गायलेला राग चंद्रकंस. सुरेशबाबू माने यांचं हे एकमेव ध्वनिमुद्रण आहे. सुरेशबाबू साधारण विशीचे असताना लालाजींनी हे ध्वनिमुद्रण केलं असावं, असा अंदाज आहे.

३. ध्वनिमुद्रण क्र. ३ - अब्दुल करीम खाँसाहेब यांनी गायलेलं 'दे हाता या शरणागता' हे नाट्यगीत. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेल्या या पदाची चाल गोविंदराव टेंब्यांनी बांधली आहे.

४. ध्वनिमुद्रण क्र. ४ - नकलाकार भोंडे यांनी न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका कार्यक्रमात लोकमान्य टिळकांची नक्कल केली होती, त्याचं ध्वनिमुद्रण.

५. ध्वनिमुद्रण क्र. ५ - सेठ लखमीचंद ईसरदास नारंग यांनी गायलेला राग भीमपलासी.

६. ध्वनिमुद्रण क्र. ६ - बालगंधर्व यांनी गायलेलं 'सौभद्र' नाटकातलं पद. वसंत शांताराम देसाई यांनी लिहिलेल्या या पदाची चाल मास्तर कृष्णरावांनी बांधली आहे.

***


छायाचित्रांचा तपशील -

चित्र क्र. १ - वझे तालमीशेजारी असलेल्या भटगुरूंच्या वाड्यातली शास्त्रीय गायनाची बैठक. फोटोवर १ ऑक्टोबर, १९१५ अशी तारीख आहे. डावीकडे पांढरा अंगरखा घातलेले बालगंधर्व गात आहेत. शेजारी बसले आहेत ते गायनाचार्य भास्करबुवा बखले. उजवीकडे कोपर्‍यात लोकमान्य टिळक.

चित्र क्र. २ - शेठ लखमीचंद ईसरदास नारंग

चित्र क्र. ३ - कराचीतल्या मीठादर भागातली लालाजींची हवेली.

चित्र क्र. ४ - देवगंधर्व भास्करबुवा बखले

चित्र क्र. ५ - मास्तर कृष्णराव आणि सेठ लखमीचंद ईसरदास नारंग, कराचीतल्या हवेलीत.

चित्र क्र. ६ - श्री. मुकेश नारंग. त्यांच्या मागे असलेली विठ्ठलाची मूर्ती 'कान्होपात्रा' नाटकातली आहे. या मूर्तीच्या पायाशी पाच पांडव आणि द्रौपदी यांच्या फूटभर उंचीच्या पितळी मूर्ती आहेत. त्या 'द्रौपदी' नाटकातल्या.

चित्र क्र. ७ - श्री. माधव गोरे

चित्र क्र. ८ - श्री. मंदार वैद्य

चित्र क्र. ९ - बालगंधर्वांच्या गणपतीची मूर्ती

***


या लेखातली सेठ लखमीचंद ईसरदास नारंग यांची सर्व छायाचित्रं आणि लोकमान्य टिळक, अब्दुल करीम खाँसाहेब, सुरेशबाबू माने, बालगंधर्व यांची ध्वनिमुद्रणं श्री. मुकेश नारंग यांच्या खाजगी संग्रहातली आहेत, आणि त्यांनी ती मायबोली.कॉमला उपलब्ध करून दिली आहेत. नकलाकार भोंडे यांचं ध्वनिमुद्रण प्रकाश भोंडे यांनी उपलब्ध करून दिलं आहे. ही सारी ध्वनिमुद्रणं यापूर्वी कुठेही प्रकाशित झालेली नाहीत. या ध्वनिमुद्रणांचा किंवा छायाचित्रांचा कुठलाही व्यावसायिक वापर करण्यास, किंवा संगणकावर उतरवून घेण्यास, किंवा इतर कुठल्याही मार्गाने प्रसारित करण्यास परवानगी नाही.

***


या लेखात वापरलेली ध्वनिमुद्रणं आणि छायाचित्रं उपलब्ध करून दिल्याबद्दल मुकेश नारंग, माधव गोरे आणि मंदार वैद्य यांचे मनःपूर्वक आभार. लेखासाठी संदर्भ उपलब्ध करून दिल्याबद्दल सुधीर व शैला दातार यांचे आभार.

***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकमान्यांचा आवाज ऐकताना अंगावर सरसरून काटा आला!
लेख तर सुरेखच. कसा होता तो काळ? आज चुटकीसरशी होणार्‍या गोष्टींसाठी केवढी यातायात करावी लागत असे. पण ते धन जपून ठेवण्याची ऐपत आणि गुणग्राहकता लालाजींमध्ये होती हे आपलं भाग्य.

हे जमवण्यासाठी अफाट कष्ट ज्या सर्वांनी घेतले आहेत, त्यासर्वांचे मनःपूर्वक आभार!

साक्षात लोकमान्यांचा आवाज ऐकायला मिळनं हा एक अफाट थरार होता..!

लेखाचं कौतुक करावं तितकं थोडंच. पुन्हा वाचेन आणि ध्वनीमुद्रणेही पुन्हा ऐकेन आता. Happy

लोकमान्यांचा आवाज ऐकताना अंगावर सरसरून काटा आला!
लेख तर सुरेखच. कसा होता तो काळ? आज चुटकीसरशी होणार्‍या गोष्टींसाठी केवढी यातायात करावी लागत असे. पण ते धन जपून ठेवण्याची ऐपत आणि गुणग्राहकता लालाजींमध्ये होती हे आपलं भाग्य.

हे जमवण्यासाठी अफाट कष्ट ज्या सर्वांनी घेतले आहेत, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! >>> +१०००००......

चिनूक्सलाही विशेष धन्यवाद.......

अतिशय सुरेख लेख. लोकमान्यांचा आवाज ऐकून अंगावर काटा आला. ही सगळी गोष्ट अद्भूत आहे. अब्दुल करीम खाँ आणि सुरेशबाबू माने ह्यांचं गाणं ऐकताना काय वाटलं ते शब्दांत सांगू शकणार नाही. नारंगसेठांनी गायलेला भीमपलास ऐकायलाही छान वाटलं. त्या काळातला हा अमूल्य ठेवा आपल्या सुदैवाने लुप्त झाला नसला तरी क्षीण झालाय ह्याचं फार वाईट वाटतं. वरच्या क्लिपिंग्ज ऐकताना डोळ्यांवर अर्धपारदर्शक पट्टी बांधून ताजमहाल बघितल्यासारखं वाटलं. ते गाणं स्वर्गीय आहे हे कळतंय पण स्पष्ट,समोर बसून गायल्यासारखं ऐकू आलं असतं तर काय झालं असतं असं सतत वाटत राहतं.
गायनाचार्य बखल्यांचा वरचा फोटो ( रंगीत ) आमच्या घरी भिंतीवर लावलेला होता. मी चार-पाच वर्षांची असताना का कोण जाणे त्या फोटोतलं त्यांचं उपरणं मला केळीच्या सालीसारखं दिसायचं. एकदा आबांना ते सांगून खुदखुदल्यावर त्यांनी मला फोटोतली व्यक्ती कोण, त्यांचं कार्य काय हे मुद्दाम बसवून सांगितलं होतं. हा फोटो इथे पाहिल्यावर हे एकदम आठवलं आणि आपण त्यांचं गाणं कधीच ऐकलं नाहीये ह्याची जाणीव पहिल्यांदाच इतक्या प्रकर्षाने झाली. लोकमान्यांचं भाषण मिळालं तसं त्यांच्या गाण्याचं रेकॉर्डिंगही लवकर सापडूदे.
हा वारसा जतन करण्याच्या कामाला ज्या कुणाचे हातभार लागले त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

भास्करबुवांच्या नावाने महाजालावर शोध घेतला तेव्हा हे एक ध्वनीमुद्रण सापडले.....जेमतेम एक मिनिटाचे ध्वमु असून त्यात भरपूर खरखर आहे....हे भास्करबुवाच आहेत की अजून कुणी हे सागणं तसं कठीणच आहे....कारण त्यांचं गायन आपल्यापैकी कुणी कधी ऐकलेलं असण्याची शक्यता खूपच धूसर आहे.....
ऐका आणि तुम्हीच ठरवा.... मी खाली दिलेल्या दुव्यावर ते चढवलंय.
http://www.divshare.com/download/19611749-0fb

bhaskarbuvancha konatahi adhikrut dhvanimudran upalabdha nahi. Ek bangdi recording sapadala hota, pan te bhaskarbuvancha ahe ki nahi, he thauk nahi, karan awaj aiku yet nahi. Mastar krushnarao yanchya athavaninusar buvancha vyavasayik recording kadhich zala navhta. magehi buvanchi mhanun don dhvanimudrana baher ali hoti, but te recordings buvanchi navhti.

हो, पांडू नृपती जनक जया...हे गाणं संगीत सौभद्र मधील आहे आणि ते अरब्बी या रागातील आहे...

चिनूक्स, तू फार सुंदर लिहितोस. मुख्य म्हणजे जे लिहितोस ते तुला भावलेले असते असे तुझे लिखाण वाचून वाटते.
असेच लिखाण तुझ्या हातून घडत राहो. श्री गजानना कडे हीच प्रार्थना!

तू ज्या संगीत सूचींबद्दल लिहिले आहेस त्या आंतरजालावर ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत का? त्याचे दुवे मिळतील का?

भास्करबुवांच्या नावावर शोधले असता खालील लिंक मिळाली. मी गाणे अजून ऐकले नाहीये. खरे-खोटे माहीत नाही.

http://www.mombu.com/music/indian/t-pt-bhaskarbua-bakhale-m-may-6525142....

अप्रतिम लेख... टिळकांचा आवाज कधी एकायला मिळेल असं वाटलच नव्हतं...
धन्यवाद!!!!! सुंदर लिखाण, टिळकांचा दुर्मिळ आवाज आणि उत्क्रुष्ट माहिती.... या सा-याबद्द्ल आभारी आहे.. खुप मोठा आनंद दिलात... Happy

गेले २ दिवस हा लेख उघडून, चाळून पुन्हा बंद करत होते. अजिबात व्यत्यय येणार नाही अशा वेळी एकसलग वाचायचा, वाचनात ज्या क्रमाने ध्वनीमुद्रणे येतील, त्याच क्रमाने ती ऐकायची असं ठरवलं होतं. आज अखेर ते जमलं. (मधे एकदाही फोन किंवा दारावरची बेल वाजली नाही हे नशीब!)

सर्व ध्वनीमुद्रणं ऐकून, लालाजींबद्दल वाचून काय वाटलं हे शब्दांत मांडणं अशक्य आहे. दळणवळणाची, संपर्काची तुटपुंजी आणि वेळखाऊ साधनंच जेव्हा उपलब्ध होती, तेव्हाही या थोर लोकांनी एकमेकांशी राखलेला संपर्क, संवाद, स्नेह याला तोड नाही. (नाहीतर कराचीहून पुण्याला ट्रक येणं - याला काय म्हणावं!)

अजून एका विचारानं अंगावर काटा आला, तो म्हणजे, 'कराची' या उल्लेखानिशी आज आपल्या मनात जे तरंग/विचार उमटतील, त्यांचा या लेखातल्या काळात मागमूसही नव्हता. लेख वाचताना त्या काळात जगत असल्याची जी भावना थोडाकाळ मनात उमटते, त्यादरम्यान वाचन मधे थोडाकाळ थांबवून मी तसं कल्पून पाहिलं. फार रोमांचकारी होता तो विचार.
फाळणीनंतर लालाजींचं कुटुंब पुण्यात येऊन स्थायिक झालं हे आपलं नशीबच. कर्तृत्वाच्या जोरावर मिळवलेल्या गडगंज संपत्तीचा त्याग करताना त्यांना काय यातना झाल्या असतील याचा विचारही करवत नाही. पण त्याचवेळी स्वतःजवळची ध्वनीमुद्रणे त्यांनी त्यागली नाहीत या विचाराने त्यांचे अक्षरशः पाय धरावेसे वाटले.

या लेखासाठी झटलेल्या सर्वांना त्रिवार सलाम!

सुन्दर लेख. Just one observation: गणपतीची मुर्ति उजव्या सोन्डेची आहे.

चिनूक्स - आभारी आहे.
हे सर्व (म्हणजे लेखामधे जे जे लिहिले आहे ते) साध्य करताना ज्यान्ची मदत झाली त्यांचेहि आभार.

skamble,

>> Just one observation: गणपतीची मुर्ति उजव्या सोन्डेची आहे.

एकदम योग्य निरीक्षण. उजव्या सोंडेच्या गणपतीचं सोवळंओवळं फार कडक असतं. बालगंधर्व कसे सांभाळत असतील कोण जाणे!

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद चिनूक्स. Lifetime achievement म्हणावी अशी ही माहिती, ती मिळवण्यामागले परिश्रम घेणार्‍या सर्वांचेच आभार.
कुठे ती सारी भव्य व्यक्तिमत्वे अन कुठे आजचे समाज- राजकारण.. र्‍हासपर्व.

लोकमान्यांचा आवाज ऐकला, भारावून गेल्यासारखे वाटले.

मायबोलीने हा आवाज आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल मायबोलीचे, चिनुक्स चे आणि सर्व सहभागी मंडळीचे मनपुर्वक आभार

लोकमान्य टिळकांचा आवाज अक्षरशः घरबसल्या ऐकवलास, त्यासाठी तुझे शतशः आभार चिन्मय...आणि अगदी ह्या मुद्देसूद लेखनासाठीही तुझे अभिनंदन....

हे ध्वनिमुद्रण जपून ठेवून ते जतन करणार्‍या श्री. मुकेश नारंग यांच्यामुळे आणि ते लोकांसमोर आणण्यासाठी प्रचंड कष्ट केलेल्या माधव गोरे, मंदार वैद्य व श्रीमती शैला दातार यांच्यामुळे. >>>>> खूप आभार ह्या सर्वांचे, स्वराज्याची निडर घोषणा देत इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळविणार्‍या त्या बुलंद आवाजाबद्दल कायम कौतुक आणि जिज्ञासा होती, तोच आवाज ऐकायला मिळाला म्हणून खूप आनंद झाला..

लेखात दिलेल्या ध्वनिफिती ऐकू येत नाहीयेत Sad
काय समस्या असावी ? प्ले आयकॉन वर क्लिक केले की प्ले होत आहे पण आवाज अजिबात येत नाहीये.
अर्थात व्हॉल्यूम म्यूट नाहीये तरी असे का व्हावे ? Sad

माझ्याच संगणकात काही समस्या होती, ती दूर झाली आणि आत्ताच लोकमान्यांचा आवाज ऐकला, तिन चार वेळा ऐकला. माझ्या मनात त्यांच्या आवाजाबद्दल एक समज होता (जो कदाचित शब्दात सांगता येणार नाही) पण साधारण त्याच्याशी बरेच साधर्म्य आहे मुळ आवाजाचे. हा आवाज जतन करणारे त्याचे आधुनिकीकरण करून आपणापर्यंत पोहोचविणारे, सर्वांचे मनःपुर्वक आभार !

या लेखाबद्दल, व इथे उपलब्ध करुन दिलेल्या ध्वनिमुद्रणाबद्दल चिनुक्स यान्ना धन्यवाद Happy
लेखामागिल कष्ट समजुन येत आहेत.
लेख मात्र इतिहासातील संदर्भ नीट समजुन घेत पुन्हा दोन तिनदा वाचावा लागेल Happy अन संदर्भ समजुन घेता घेता न पाहिलेल्या गत काळात रमणे होणारच, त्यासाठी थोडा वेळ काढूनच बसावे लागेल.
पुनःश्च धन्यवाद

limbutimbu,
tumhala he fakta maayboliwarach aikta yeil. Download karta yenar nahi.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांचा आवा़ज ऐकायला मिळणं ही एक पर्वणीच! शिवाय इतर दुर्मिळ आणि अनुपम ध्वनिमुद्रिका, म्हणजे सोनेपे सुहागा! आणि त्यासोबत इतका अभ्यासपुर्ण लेख! अगदी तृप्त झालं मन Happy

महान लेख आहे.
हिमालयाच्या उंचीएवढी उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत ही सगळी!
हा लेख आणि आवाज आपल्यापर्यंत आणण्यासाठी काम केलेल्या सगळ्यांचे शतशः आभार!

Pages