आसवांना वेळ नाही!

Submitted by अमेलिया on 7 September, 2012 - 01:49

पुन्हा कुठूनशी ती गाण्याची धून पमीला ऐकू आली. एक मस्त ठेका होता त्या गाण्याला. ते ऐकला की पमीच्या हृदयाचे ठोके जलद व्हायचे, अंगभर एक विजेची लहर सळसळत जायची आणि पाय आपसूकच ठेका धरायचे. मग ती हवेतच हात हालवायची, टाळ्या वाजवायची उभी राहून एखादी गिरकीही घेऊन पहिली होती तिने. पण तेवढ्यात आक्काची हाक कानावर येऊन आदळायची. "पमे, गधडे, धडपडायचे हाय का? एका जागी बसून रहावं त्ये बी समजंना का बे तुला आता? आमाला काय कामं-धामं न्हाय्ती का? का तुझ्याकडच बघत बसू दिसभर? ते समुर काम दिल्यालं हाय न्हवं, कर की मुकाट... ना धड कामाची.. काय गून उधळनार हाय कुनास ठाऊक… " ही वाक्य एकामागून एक कानावर येऊ लागली की पमी कावरीबावरी होऊन जाई. आतून आतून खूप काही बाहेर पडू पाहणार एकदम कुठे हरवून जाई. ती मुकाट्याने पुढ्यातल्या कापसाच्या वाती वळू लागे.

" पमे ह्ये बग ना.. म्या कसलं छान चित्तर काढलं हाये.." बाळ्या कधीमधी येऊन तिच्या हाताला झोंबू लागे. त्याच्या हातात कसलासा कागद असे. ती त्या कागदाला हात लावून म्हणे,"माजा गुनाचा बाळ्या त्यो..छान हाय रे तुज चित्तर..." पण हे चित्तर काय असतं हे मात्र तिला अजून नीटसं कळलं नव्हतं. आपला लहान भाऊ काहीतरी छान करतोय आणि ते त्याला आवडतंय ह्याचंच तिला फार बरे वाटे. पण आक्काला मात्र तिला वाटणारं ते कौतुकही आवडत नसे. मग ती बाळ्यालाही ओरडे आणि म्हशी चारायला पिटाळे.

आज आक्का खुश होती. तिच्या लेकीला, निर्मिलेला, वर्ध्याच्या पावण्यांकडून होकार आला होता. आपल्या लेकीला कुठे ठेवू नि कुठे नको असं झालं होतं आक्कीला. बहिणीची ही दोन मुलं, पमी आणि बाळ्या, बहिणीच्या मृत्युनंतर तिच्याच गळ्यात आली होती. इथ हाता-तोंडाशी गाठ होती आधीच आणि त्यात एकादशीच्या घरी महाशिवरात्र आली होती. आक्काचा सगळा राग मुलांवर नाही निघाला तर काय! पण आता ती खुश होती. तिची निम्मी बऱ्या घरात पडणार होती. पमीला देखील आनंद झाला होता.पण तिला वाईटही वाटत होतं.

निम्मी तिची छान मैत्रीणही होती. तिची मार्गदर्शक होती. साऱ्या जगाच्या खबरा तिला तिच्याकडून कळायच्या आणि त्यावरची निमीची खुसखशीत टिप्पणीही ऐकायला मजाही यायची. ती निमीला प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. आणि निमी तिला उत्तरादाखल अनेक कथा तिखट-मीठ लावून सांगत असे. दोघा बहिणींची एकदम गट्टी होती. मुख्य म्हणजे तिच्याकडून तर पमीला मस्त मस्त गाणी ऐकायला मिळत. आणि कधी कधी त्या गाण्यांच्या सुरस कथादेखील. गाणी केवळ ऐकायची नसतात तर त्यांच्या लयीवर, ठेक्यावर नाचताही येतं हे देखील तिला कळलं होतं. आपल्याला कधी खूप छान वाटतं तेव्हा आपण ज्या उड्या मारतो, हातपाय हलवतो त्यालाच नाचणं म्हणतात का हे मात्र तिला नीटसं समजलं नव्हतं.

निम्मीच लग्न पार पडलं ती सासरी गेली आणि पमीचा तर जणू जगाशी संपर्कच तुटला. दिवसभर पडेल ते काम जमेल तसं करत रहावं आणि आपल्या कोपऱ्यात गप पडून रहावं असं तिचं आयुष्य मिटून मिटून गेलं. डोळ्यांपुढे अंधार तर होताच.. तो अधिकच गहिरा झाला.

आणि एके दिवशी निम्मी परत आली. कायमचीच परत आली. तिच्या नवऱ्याने तिला हाकलून दिले होते. कारण तिच्या पायावर एक पांढरा डाग आला होता. आणि पांढऱ्या पायाची मुलगी कोणी लक्ष्मी म्हणून घरात ठेवतं का? महारोग होता तो असं गावातला डॉक्टर म्हणाला. आक्का पार कोलमडून गेली.

"जाऊ द्या ना आक्का, आता अजून किती तरास करून घेणार आहात जीवाला? नशिबात आसल त्येच व्ह्यतय बगा... नाहीतर इक्ती गुणाची आपली निम्मी तिला द्येवानं असा श्याप दिला नसता बगा.." अनसूयाबाई आक्काची समजूत घालायचा आटोकाट प्रयत्न करत होत्या. निम्मीच्या पायावर उमटलेला तो पांढरा डाग आक्काच्या नशिबावर ही उमटला होता. इतकी धुतल्या तांदळागत स्वच्छ पोर कायमची माहेरी येऊन पडली होती सहाच महिन्यांत. डाक्तरही म्हणाला होता कुष्ठरोगच तो. होतोय बरा आताशा. पण हे जावयांना कसा पटवावं? आक्काच्या आणि निम्मीच्या डोळ्याच्या पाण्याला खळ नव्हतं.

पमीला कळत नव्हतं नक्की काय झालंय. कसला डाग न काय? अन त्यात निम्मीच्या नवऱ्याला का नकोय ती? पांढरा पांढरा म्हणतात ते एवढं काय वाईट असतंय? निम्मी न तिचा नवरा का मरणार होते? आता निम्मी जाणारंच नाही का परत? आणि मग गावात सगळीकडे तिला नावं ठेवतायत ते का? कुष्टरोग बरा होतो म्हणतायत न डॉक्टर? मग? पमीच्या डोक्यात प्रश्नांची गर्दी झाली होती नुसती. पण विचारावं तरी कुणाला? निम्मीच्या दु:खापुढ पमीला कोण विचारणार होतं आता?

"आक्का, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिथे खरंच आनंद वसतोय हो. तुमची निम्मी फक्त बरीच होणार नाही तर सुखातही राहील तिथे. आम्ही तर म्हणतो या पमीलाही पाठवा सोबत. तिचीही चांगली सोय होईल बघा. भाऊंनी या अशा लेकरांसाठीच तर हा यज्ञ चालू ठेवलाहे अखंड." ते काका आक्काची समजूत काढत होते. त्यांचे बोलणे पमीच्या कानांवर पडत होते. आनंदवनातून म्हैसकर काका त्यांना भेटायला आले होते. निम्मिची कहाणी त्यांना कुठूनशी कळली आणि त्यांनी जाणले, आक्कांना गरज आहे ती मानसिक बळाची. अशा परिस्थितीत आनंदवनात नाही जाणार तर कुठे? कुष्टरोगी, अपंग, असहाय आणि समाजाने बहिष्कृत करून जणू मरायला सोडलेले हजारो जीव तिथे नव्याने जगायला शिकत होते. स्वतःच्या पायावर उभे राहून स्वाभिमानाने जगत होते. हे आनंदवन काय असेल, पमीला जाम उत्सुकता वाटत होती. निम्मीचं आणि तिचंही आयुष्य आनंदाचं होईल म्हणत होते ते काका. आक्के, आता नको म्हणू नकोस ग... जाऊ दे, अनुभवू दे हे आनंदवन काय आहे ते. पमी मनातल्या मनात आक्काला विनवत होती.

पमीचे भविष्य तरी काय खूप आशादायक होते? प्रकाश, उजेड, दिवा, ज्योत या सार्या शब्दांनी तिला कधीच अर्थ समजू दिला नव्हता त्यांचा. डोळे नावाचा अवयव तिच्या देहात केवळ नावालाच होता. जग समजायला लागलं तिला ते स्पर्शातून, ध्वनीतून, तिच्या दोन हातांच्या संवेदनशील बोटांतून. गेली अकरा वर्षे हेच तर साथीदार तिला शिकवत होते जग काय असतं ते. खूप काही मनात येत राहायच.. पमी कल्पनेच्या विश्वात हरवून जायची. न दिसणाऱ्या गोष्टींची वर्णने ऐकून ऐकून तिने तिचीच एक वेगळी डिक्शनरी बनवली होती. त्यांच्या चष्म्यातूनच ती पहायची तिचे जग. जे स्पर्शाच्या पलीकडचे होते, त्यालाही आकार होते तिच्यासाठी. निळे आकाश म्हटले की धुंदावणाऱ्या पावसाच्या थेंबांचे डोक्यावरले भले-थोरले तळे होते. सूर्य म्हणजे थंडीमधल्या उबेचा हवासा आणि उन्हामधल्या नकोश्या उष्म्याचा उगम होता. जे जे दिसते ते ते सगळे मऊ, कडक, खडबडीत, टोचणारे, हवे-नकोसे स्पर्श होते. सुरेल, भसाडे, गोड, कर्कश्श आवाज होते...

आणखीही काही होतं... उभं शरीर साथ द्यायचं ती एक अंतःप्रेरणा होती. संगीताचे सूर कानी आले की नाचू नाचू व्हायचं. एका लयीत झुलायचं, एका ठेक्यावर डोलायचं, आपसूक हात मग हवेमध्ये नक्षी काढायचे, मग सभोवतालचे जग विरून जायचे. स्वतःत रुजलेले, स्वतःतून उभे राहणारे एक आभासी असणे उरायचे. पमी गुंगून जायची, बघता येत नाही, दिसत नाही हे सत्यदेखील विसरून जायची. पण काय उपयोग होता त्याचा? डोळे असूनही कोणाला दिसणार होती ही तिची आंतरिक ओढ?

' डोला रे डोला रे डोला रे डोला.. हाये डोला दिल डोला मन डोला रे डोला'... पमी भान हरपून नाचत होती.. तिच्या कानांवर फक्त येत होते शब्दांना लपेटून घेणारे सूर आणि त्यातून उत्पन्न होणारी बेभान लय... तिचे घुंगरू बांधलेले पाय थिरकत होते. तिच्यासोबत आशी, पद्मी, मंजी आणि संगी पण अशाच नाचत होत्या. त्यांच्या सर्वांगाला जणू डोळे असावेत अशी त्यांची एकमेकिंसोबत सुरेख लय जुळली होती.. नृत्यातल्या सामुहिक जागा त्या इतक्या लीलया घेत होत्या की पाहणाराला वाटावे, आपसातल्या नेत्रपल्लवीनेच जुळलेत ह्यांचे सूर. हिची गिरकी की तिचे चक्र, हिची हस्तमुद्रा की तिचा पदन्यास.. अगदी अगदी आखीव-रेखीव, ताला-सुरात. पमीने शेवटचा ठुमका घेतला आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

आक्काच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती. ही पमी आपल्याला कधीच दिसली कशी नाही याचे तिला नवल वाटत होते. जे डोळ्यांना दिसत होते त्यावर विश्वास बसत नव्हता. लाल रंगाच्या साडीत खुलून दिसणाऱ्या, स्टेजवर मोहक नाचणाऱ्या पमीला तिनं स्वप्नातही कल्पिल नव्हतं. आणि तिची कुष्ठरोगाचा डाग लागल्याने लाथाडलेली निम्मी त्याच स्टेजवर माईक हातात घेऊन गात होती, निर्भय, सुरीले.

हजारो लोकांनी खचाखच भरलेले सभागृह भारावले होते, हेलावले होते. त्यांच्या डोळ्यांसमोर आज अभूतपूर्व चमत्कारच घडत होता. पमीसारख्या अंध मुली सराईत नर्तीकेसारख्या सुरेख नाचत होत्या..., कानांना ऐकू न येणारी मुले समोर बसलेल्या सरांच्या सूचनांनुसार गाण्याच्या बोलांवर तालात थिरकत होती..., दोन्ही पायांनी अधू असणारे तरुण एखाद्या कसलेल्या गायकाच्या तोडीस तोड गाणे गात होते... आणि या साऱ्यांनी सगळी इंद्रिये शाबूत असलेल्या हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. समोर घडणारा दैवी चमत्कार म्हणावा की दैवाने हिरावून घेतलेल्या मूलभूत हक्कांवर विजय मिळवून दाखवणारा मानवी अंतःशक्तीचा साक्षात्कार म्हणावा हे त्यांना कळेनासे झाले होते. मोकळ्या मनाने तो जनसमुदाय ह्या विशेष मुलांच्या कौतुकात बुडून गेला होता. एके काळी खायला काळ अन भुईला भार म्हणून हिणवल्या जाणाऱ्या या अंध, अपंग, मूक जीवांनी त्यांच्या कलेच्या जोरावर लाखो रुपये मिळवून दाखवले होते.

ज्याच्या त्याच्या हृदयात अपार कृतज्ञता दाटून आली होती ती फक्त भाऊंसाठी. आनंदवनाच्या भाऊंनी या नीरस, टाकाऊ, मातीमोल जिण्याला एक झगमगती झालर लावून दिली होती. रुसलेल्या इंद्रियांवर मात करून जपता येणाऱ्या अंगभूत कलेची जाणीव करून दिली होती, तिचा आनंद घ्यायला शिकवलं होतं, इतकंच नव्हे तर ज्या समाजांन दूर लोटलं होतं त्यालाच या अद्भुत किमयेन थक्क करून सोडलं होतं. खरोखर भाऊ एक देवदूत बनून आले होते!

पमी आनंदवनात आली. तिथली आपुलकी, करुणा, समानता, स्वच्छता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही संकटावर मात करून पुढे जाण्याची जिद्द यांनी पमीला जणू नवसंजीवनीच दिली. निम्मीचा आजार वेळीच आणि उत्तम उपचार मिळाल्यामुळे बरा झाला. पमीला नाचाचे अंग आहे हे ताईंच्या लक्षात आले अन कलासमितीच्या मृणालताई येत त्यांच्या हाताखाली पमीचे नृत्याचे धडे सुरु झाले. दुलई, चादरी बनवणारी तिची कुशल बोटे आता नृत्यातल्या हस्तमुद्रा डौलात करू लागली. हे सारे करताना पमीचा आनंद काय विचारता! तो तर गगनात मावेनासा झाला. आत आत पुसटसं उमटणारं काही आता खुले आम बाहेर पडू लागलं, आविष्कृत होऊ लागलं. तिच्याबरोबरीन आशी, संगीसारख्या दृष्टी गमावलेल्या सख्यानाही नृत्यकलेसारखं स्वतःला व्यक्त करू देणारं मोलाचं साधन मिळालं.

अशाच पन्नास कलाकारांना घेऊन भाऊंनी एक कार्यक्रम बसवला. हे करताना त्यांनी केवळ या मुलांना त्यांची कला ओळखायलाच नव्हे तर ती घडवायला, तिचा आनंद घ्यायलाही शिकवलं. आणि दिला भरभरून आत्मविश्वास! हे जीवन सुंदर आहे हे जाणवून दिले. आपल्या दुःखांना कुरवाळत बसले तर ती आपल्याला फक्त आसवेच देतात, मात्र त्यांना ओलांडून पुढे गेले तर एक खूप मोठा आनंदाचा ठेवा आपली वाट बघत असतो हे जाणवून दिलं. शारीरिक व्यथा-वेदनांनाच शस्त्र बनवून त्यांच्याशीच लढायला शिकवलं. आपल्यापेक्षाही दुःखातले अभागी जीव पहिले अन एका सहवेदनेतून सह-अनुभूतीचा जन्म झाला. मग साकार झाला गायन, वादन, नृत्य सारेच प्रदर्शित करणारा असा हा अभूतपूर्व कार्यक्रम! साऱ्या मुलाखात फिरून मुलांनी मोठ्या उत्साहानं तो सादर केला. रुसलेल्या इंद्रियांनी असलेल्या इंद्रियांना भरभरून आनंद दिला!

बाळ्याच्या चित्रातही नाचणारी पमी दिसू लागली आणि ते चित्र 'पाहून' समाधानानं हसणारी पमी तिला आनंदवनात आणल्याबद्दल देवाचे आभार मानू लागली. आपल्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या भाऊंना आपणही आनंद द्यायचा असा निश्चय करत बाबांनी त्यांच्या सर्वांसाठी लिहिलेली प्रेरणादायी प्रार्थना ती मनापासून म्हणू लागली," शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही"

-समाप्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्कास आणि सुरश, मनापासून धन्यवाद! Happy
खरं तर कथा लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे त्रुटी असतीलच. पण तुमच्या प्रोत्साहनपर प्रतिसादामुळे खूप बरे वाटले. Happy
हा कार्यक्रम प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला होता... तेव्हापासून आतून खूप हलल्यासारखे झाले होते... एक विचित्र अस्वस्थता आली होती... देवाने काही अत्यावश्यक मूलभूत क्षमतांपासून वंचित ठेवले असूनही सॄजनशीलता, कला या आविष्कृत झाल्याशिवाय राहात नाहीत, त्यातून मिळणारा आनंद कोणीही हिरावून घेउ शकत नाही हे लख्ख कळले... मात्र हे जाणून ते करण्याचा आत्मविश्वास देणारा भाऊंसारखा देवदूत आयुष्यात यावाच!

छानच

सुरेख, अमेलिया... पहिलाच प्रयत्नं म्हणतेयस... छानच.
<<....निळे आकाश म्हटले की धुंदावणाऱ्या पावसाच्या थेंबांचे डोक्यावरले भले-थोरले तळे होते. सूर्य म्हणजे थंडीमधल्या उबेचा हवासा आणि उन्हामधल्या नकोश्या उष्म्याचा उगम होता. जे जे दिसते ते ते सगळे मऊ, कडक, खडबडीत, टोचणारे, हवे-नकोसे स्पर्श होते. सुरेल, भसाडे, गोड, कर्कश्श आवाज होत<<....>>
अंधत्वाचं सुरेख वर्णन... स्पर्श, आवाज, गंध ह्याच्या गहिर्‍या अनुभुतींनी साकारलेलं त्यांचं जग...
एकच सांगू?... निमीचं आनंदवनात जाणं कळतय... पमीनंही जाणं का? कसं? असा प्रश्नं पडतोय... थोडा तुकडा पडल्यासारखं झालय तिथे कथेचं, असं मला वाटतय
(वाटलं तर अजून बदलू शकतेस कथा)
खूप खूप लिही... तुला भेटलेला अनुभव, आमच्यापर्यंत पोचवण्याची तुझी असोशी, अगदी अगदी जाणवतेय. लिहिण्यासाठी ही तगमग सगळ्यात महत्वाची... अन ती आहेच. तुझ्या पुढल्या लेखांची वाट बघते.

महेश, सखी-माउली, भाग्यश्री अमित खूप धन्यवाद! Happy सन्मि Happy
दाद, अगदी बरोबर.. मी हे पुरेसे स्पष्ट नाहीये केलेले की पमी का जाते आनंदवनात. नक्कीच बदल करेन.
मला खूप छान वाटतेय तुमचा इतका मनःपूर्वक प्रतिसाद बघून. खूप खूप आभार! Happy