विषय क्र. १ : लिंगुबाचा डोंगुर आभाळी गेला

Submitted by विशाल कुलकर्णी on 29 August, 2012 - 06:30

कसं होतं ना, बर्‍याच वेळा आपली अवस्था 'देता किती घेशील दो कराने' अशी होवून जाते. म्हणजे बघा ना, मी म्हणतो मी लताबाईंच्या आवाजाचा भक्त आहे, तेवढ्यात मला जाणवतं की अरे याला बाळासाहेबांचं संगीत आहे जी आपल्यासाठी नेहमीच एक पर्वणी वाटत आलेली आहे, त्या संगीतात रमतोय न रमतोय तोवर लक्षात येतं की अरे हे आपल्या आवडत्या कविचे शब्द आहेत. आपण नकळत त्या शब्दात गुरफटायला लागतो आणि तेवढ्यात डोळ्यासमोर उभा राहतो तो जिवंत, नैसर्गिक अभिनयाचा मुर्तीमंत आविष्कार साक्षात स्मिता पाटील, जरा कुठे स्मिताच्या डोळ्यात हरवून जायला बघावं तर मागे स्क्रीनवरची लिंगोबाची हिरवीगार झाडी, निसर्गाचं ते मनोहारी, नयनरम्य दृष्य खुणावू लागते. अरे माझी झोळी एवढी मोठी नाहीये रे परमेश्वरा. तू देता है तो छप्पर फाडके देता है ये तो सुना था, पण सगळ्या जाणिवांना भेदूनही असं काही हवंहवंसं देवून जातोस हे पहिल्यांदाच अनुभवतोय. मग अलगद मन हळू हळु मागे जायला लागतं. 'जैत रे जैत' बद्दल संबंधित दिग्गज कलावंतांकडून ऐकलेल्या, वाचलेल्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर फेर धरायला लागतात.

चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी या चित्रपटाच्या निर्मीती प्रक्रियेबद्दल सांगताना सांगितलं होतं...

काही दिवसांनी बाळासाहेबांचा पुन्हा फोन आला, ‘तुम्ही गो. नी. दांडेकरांची ‘जैत रे जैत’ ही कादंबरी वाचली आहे काय? नसल्यास जरूर वाचा. त्या कथानकात संगीताला उत्तम वाव मिळेल असं मला वाटतं. हवं तर आपण अप्पासाहेब दांडेकरांशी बोलू या.’

जब्बारसाहेबांनी कादंबरी वाचली. त्यांना ती आवडलीही कारण त्या कथेत चित्रपटाच्या दृष्टीने प्रचंड असं रॉ मटेरीयल होतं. पण डॉक्टरांना ही कादंबरी जशीच्या तशी पडद्यावर आणायची नव्हती. जब्बारसाहेब हे मुळचे नाटकवाले, त्यामुळे 'जैत रे जैत' ही चित्रपटरुपात आणताना कथानकाचा मुळ फॉर्म बदलायचा असं त्यांनी ठरवलं. त्या आधी डॉक्टरांनी घाशीराम कोतवाल, तीन पैशाचा तमाशा यासारखी संगीतिका म्हणता येतील अशी नाटके केलेली होती. तो अनुभव लक्षात घेवुन, कदाचित त्यामुळेच 'जैत रे जैत' या चित्रपटाला पाश्चात्य देशातील संगीतिकेचा फॉर्म देण्याचे डॉक्टरांनी ठरवले होते. ‘जैत रे जैत’ ची कथा आदिवासी ठाकर समाजात घडते. पाश्चात्य संगीतिकांमध्ये ज्याप्रमाणे सूत्रधार असतो त्या धर्तीवर या चित्रपटात ठाकर समाजातल्याच दोघांना सूत्रधार म्हणून ठेवावं असा विचार झाला. मंगेशकर कुटुंबियांनाही ही कल्पना आवडली आणि सर्वानुमते पटकथेवर काम करायला सुरुवात झाली.

चित्रपट जर संगीतिकेच्या रुपात बनवायचा असेल तर त्यात मोठ्या संख्येने गाणी असणं हे अत्यावष्यक होतं. बरीच नावे चाळून झाल्यावर शेवटी गीतलेखनासाठी निसर्गकवि ना. धों. महानोर यांचं नाव पक्कं झालं. एकेक गाण्यावर विचार सुरु झाला. या प्रक्रियेवर बोलताना एका ठिकाणी जब्बारसाहेबांनी सांगितलं होतं...

" त्या नंतर महानोर आणि बाळासाहेबांसोबत बैठका सुरू झाल्या. ‘प्रभुकुंज’मधल्या छोटय़ाशा खोलीत बाळासाहेब हार्मोनिअम घेऊन बसायचे. महानोर झराझरा गाणी लिहून द्यायचे. बाळासाहेब गाण्याच्या ओळीवर विचार करत डोळे मिटून बसलेयत.. मधूनच त्यांची बोटं हार्मोनिअमवर फिरतायत आणि एकेक चाल ते गुणगुणतायत.. अधूनमधून दीदी, उषाताई याही लक्षपूर्वक ऐकतायत.. चहाचे कप, खाण्याचे पदार्थ यांच्या साथीनं तासनतास कसे निघून जातायत हे कळत नाही. मधूनच बाळासाहेबांनी दुसऱ्या एखाद्या अल्बमसाठी केलेल्या चाली ऐकविल्या की मला हेवा वाटायचा आणि ती चाल आपल्याला वापरता येईल का, असं मी विचारायचो. पण बाळासाहेबांचं उत्तर असे, ‘नाही नाही, तुम्हाला या चालींवर मी तुम्हाला डल्ला मारू देणार नाही.’ तरीदेखील एक चाल मी अक्षरश: ‘ढापली’च. दीदींसाठी केलेल्या ‘मी रात टाकली’ या गाण्यात एक कोरसचा तुकडा आहे, ‘हिरव्या पानात, हिरव्या पानात..’ ही चाल बाळासाहेबांनी दुसऱ्या एका अल्बमसाठी राखून ठेवली होती, पण ती या गाण्यात वापरावी असा हट्टच मी धरला. अखेर ते राजी झाले. "

'मी रात टाकली' हे गाणं जर नीट ऐकलं असेल तर त्या कोरसची जादु तुम्हालाही नक्कीच जाणवली असेल. हे गाणं ऐकता ऐकता आपण नकळत त्या सुरात, स्मिताच्या त्या गावरान रुपात स्वतःला हरवत जातो आणि मग त्यातल्या एका एका शब्दाची ताकद आपल्याला कळायला लागते. इथे तर पं. हृदयनाथजींच्या हाताशी महानोरांसारखा शब्दप्रभूच होता. काही म्हणा, पण काही काही योग असे जुळूनच यावे लागतात आणि ते जेव्हा जुळून येतात तेव्हा इतिहास घडतो. 'जैत रे जैत' च्या गाण्यांनी असाच इतिहास घडवला. गोनिदांनी जेव्हा ही कादंबरी लिहीली तेव्हा त्यांना वाटले तरी असेल का? की ही कादंबरी पुढची कित्येक दशके चित्रपटाच्या माध्यमातुन रसिकांना विलक्षण आनंद आणि तृप्ततेची जाणिव देत राहणार आहे.

मुळात हा चित्रपट म्हणजे एक छान प्रेमकथा आहे. त्याबरोबरच ती एक सुडकथाही आहे, त्याबरोबरच ती एक सामान्य माणसाच्या जिद्दीचीही कथा आहे. राणीमाशीला नमस्कार केल्यानंतरही ती नाग्याचा डोळा फोडते म्हणून राणीमाशीला उध्वस्त करायच्या जिद्दीने पेटलेला नाग्या, लहानपणी वडीलांनी केवळ पुण्यवंतालाच राणीमाशीचे दर्शन घडते असे सांगितल्यावर 'मला पुण्येवंत व्हायचय' या इच्छेन पछाडलेला नाग्या !

2qu52dh.jpg

तसेच लग्न करीन तर स्वतःला आवडलेल्या पुरुषाशीच म्हणून जिद्द करणार्‍या, त्यासाठी ठरलेल्या नवर्‍याला सोडून येणार्‍या, राणीमाशीने डोळा फोडल्यावरही कुरुप झालेल्या नाग्यासाठी आपले सर्वस्व शेवटी प्राणही पणाला लावणार्‍या चिंधीची कथा आहे ! तसं बघायला गेलं तर 'जैत रे जैत' ही केवळ 'नाग्या आणि चिंधी'ची कथा नाहीये, तसं तर ती केवळ लिंगोबाच्या डोंगराच्या कुशीत राहणार्‍या आदिवासी पाड्याचीही कथा नाहीये आणि तसं पाहायला गेलं तर ती लिंगोबाच्या डोंगरावर सापडणार्‍या प्रत्येक दगडाचीही कथा आहे. Line between the scenes हा प्रकार डॉक्टरांनी खुप समर्थपणे हाताळलेला दिसून येतो या चित्रपटात.

'नाग्या' हा लाक्षणिक अर्थाने चित्रपटाचा नायक आहे. पण नाग्याचं पात्र म्हणजे केवळ सुडाने पछाडलेला एक नायक एवढ्याच भावनेपुरतं मर्यादित नाहीये.

2yts5zt.jpg

मुळात नाग्याच्या मनाची, त्याच्या विचारांची जडणघडण पाहिली तर तो केवळ आपण वर्षानुवर्षे जिची पुजा करत आलोय, जिचा आदर करत आलोय त्याच राणीमाशीने आपला डोळा फोडला म्हणून तिचा सुड घ्यायला निघतो, त्यासाठी प्राणांची बाजी लावतो हे अजिबातच पटत नाही. "मला पुण्येवंत व्हायचय' या भावनेने पछाडलेला असतानाही आपल्या पाड्यावर पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार उंदीर पकडून खायची, उंदीर हेच आपलं अन्न मानायची विचित्र परंपरा तो नाकारतो. त्यासाठी सगळ्या पाड्याचा विरोधही सहन करतो. तो नाग्या असल्या सुडाच्या भ्रामक कल्पनेच्या आहारी जाईलच कसा. इथे राणीमाशी हे परंपरेने लादल्या गेलेल्या जाचक रिती-रिवाजांचे, समाजाच्या मुर्ख अंधश्रद्धांचे प्रतीक आहे. भोळेभाबडे 'ठाकर' राणीमाशीला मनापासुन मानतात. तिला डिवचल्यास आपल्यावर लिंगोबाचा कोप होइल या भीतीने कोणीही राणीमाशीच्या पोळ्याला धक्का लावायला जात नाही. पण 'नाग्या' राणीमाशीचं हे पोळंच (पर्यायाने चुकीच्या रुढी-परंपरा) उध्वस्त करायचं ठरवतो. इथे जब्बारसाहेबांनी 'नाग्या'ला दिलेली भुमिकाही त्याच्या विचारसरणीचंच प्रतिक आहे. नाग्या पाड्याचा 'ढोलिया' आहे. पाड्यासाठी तो 'देवाचा माणुस' आहे.

11.jpg

पण नाग्या आपल्या ढोलाचा वापर जुनाट रुढी-परंपरांच्या विरुद्ध यल्गार पुकारण्यासाठी करतो. त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या आपल्या पाड्यावरील अडाणी, अंधश्रद्ध लोकांना जागे करण्यासाठी करतो. गंमत म्हणजे हे सगळे करत असताना तो कुठेही समाज सुधारकाच्या, क्रांतिकारकांच्या भुमिकेत दिसत नाही. कारण आपण काहीतरी वेगळं करतोय ही भावनाच मुळी नाग्याच्या वर्तणुकीतही जाणवत नाही, ते त्याच्या गावीही नाहीये आणि पहिल्या वेळी चित्रपट पाहताना आपल्यालाही हे सहजपणे लक्षात येत नाही. हे यश गोनिदांच्या समर्थ लेखणीचं म्हणायचं की डॉक्टर जब्बार पटेलांच्या दिग्दर्शन कौशल्याचं म्हणायचं ?

'नाग्या'नंतर दुसरं महत्त्वाचं पात्र आहे, ते म्हणजे 'चिंधी'चं.

10.jpgमी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली

लताबाई बेधुंद करत गात असतात. आपल्या डोळ्यासमोर असते चिंधी. मुक्त आणि मनस्वी स्त्रीचा एक मुर्तीमंत आविष्कार. 'मला आवडेल त्या पुरुषांचीच होणार' अशी ठामपणे सांगणारी चिंधी. आपल्या नवर्‍याला सोडून आपल्या प्रियकराच्या शोधात निघालीय. आपला भुतकाळ तीने मागेच कुठेतरी सोडून दिलाय. जो कधी आपला वाटलाच नाही, त्या मोडक्या संसाराबद्दलची आसक्ती, लाज कधीच सोडून दिलीय. जुनाट झालेली कात टाकून देवून नागीण जशी नव्या रसरशीतपणाने पुढचे आयुष्य जगायला सिद्ध होते तशी तिने आपली जुनी जिनगानी त्यागून टाकलीय. तिला जगाची फिकर नाही, तथाकथित रुढी परंपराची चाड नाही. या क्षणी ती फक्त एक प्रिया आहे, आपल्या प्रियकराकडे मिलनाची मागणी करणारी एक प्रेमवेडी प्रेयसी. ती बंडखोर आहे, क्वचित उद्धटही आहे पण अविचारी नाही. आपल्याला काय हवय ते तिला पक्कं ठाऊक आहे. ते मिळवण्यासाठी काय करायला हवं हेही तिला पक्कं माहीत आहे. ती ते करतेही. आजच्या युगात सगळीकडे स्त्री-मुक्तीच्या संकल्पनेला बळकटी लाभत असताना, त्या काळी १९७७ साली म्हणजे जवळ जवळ ३५ वर्षापुर्वी आलेल्या या चित्रपटातही 'चिंधी' आजच्या स्वतंत्र विचारसरणीच्या, मुक्त स्त्रीचं मुर्तीमंत प्रतीक बनुन डोळ्यात ठसते. पण हे आपल्यासमोर ठसवतानाच जब्बारसाहेब चिंधीचं अजुन एक मोहक रुप आपल्यासमोर आणतात.

ती बंडखोर असली तरी तिच्या तना-मनात, गात्रा-गात्रात तिचा साजण भिनलाय. चिंधी पुर्णपणे नाग्यामय झालीय. स्वतःचे असे काही अस्तित्वच उरलेले नाहीये. गंमत बघा स्वतःच्या नवर्‍याला, स्वतःच्या संसाराला सोडून येण्याची प्रचंड हिंमत असलेली ही भिंगर भिवरी प्रत्यक्षात मात्र आपल्या प्रियकरासाठी सर्वस्व सोडायला निघालीय. जणु काही त्याची सावलीच बनुन गेलीय. चिंधीचं हेही एक वैशिष्ठ्य आहे. प्रत्यक्षात ती अतिशय स्वतंत्र मनोवृत्तीची, बंडखोर स्वभावाची स्त्री आहे. आपल्या विचारांसाठी, आवडी निवडीसाठी सगळ्या जगाशी झुंजण्याची ताकद तिच्यात आहे. पण हि सगळी ताकद, हे सामर्थ्य तिला तिच्या नाग्यावरच्या प्रेमाने दिलेले आहे. त्याच्या प्रेमासाठीच ती एवढी हट्टी, मनमानी करणारी झाली आणि आता त्याच्याच प्रेमामुळे ती स्वतःला विसरून त्याच्यात सामावून जाऊ पाहतेय. कदाचित त्यामुळेच पोटात बाळ असताना देखील ती तशा अवघडलेल्या अवस्थेत नाग्याच्या 'राणीमाशी'वर सुड उगवण्याच्या कार्यात ठामपणे त्याच्या पाठीशी उभी राहते एवढेच नव्हे तर स्वत: सहभागी देखील होते. नाग्या राणीमाशीचे घर उध्वस्त करण्यासाठी लिंगोबाच्या डोंगरावर चढाई करत असताना त्याला प्रोत्साहन देण्यासाठी डोंगराखाली ढोल वाजवत उभी राहीलेली गरोदरावस्थेत असलेली 'चिंधी' बघणे हा अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव ठरतो. या युद्धात शेवटी राणीमाशीला पळवून लावण्यात यशस्वी तर होतो, पण त्यामुळे संतप्त झालेल्या माश्या घोंगडी पांघरलेल्या नाग्यावर काही असर होत नाही हे पाहताच, समोर येइल त्यावर हल्ला करत सुटतात आणि त्या हल्ल्याला 'चिंधी' बळी पडते. अंगाला असंख्य मधमाश्या डसत असतानाही बेभान होवुन ढोल वाजवणारी चिंधी बघताना अंगावर काटा उभा राहतो. इथे जब्बारजी मानवी आयुष्यातला विचित्र विरोधाभास दाखवतात. नाग्या राणीमाशीचा पराभव करुन तिला पळवून लावण्यात तर यशस्वी होतो पण ते करताना त्याच्या 'राणी'ला मात्र गमावून बसतो. 'जैत रे जैत' नाग्याच्या विजयाची दुदुंभी वाजवतानाच रुढी-परंपरांशी लढताना सर्व सामान्य माणसाला कराव्या लागणार्‍या बलिदांनावर, तडजोडींवरही भाष्य करुन जातो.

याचबरोबर नाग्याच्या आई वडीलांच्या भुमिकेत असलेले कै. निळुभाऊ आणि सुलभाताई देशपांडे ही दोन पात्रेही तेवढीच महत्वाची. नाग्याच्या जडणघडणीत या दोघांचाही खास करुन त्याच्या बापाचा जास्त मोलाचा वाटा आहे. राणीमाशीच्या रुपातील रुढी-परंपरांची ओळख करुन देतानाच तो नाग्याला 'ती फक्त पुण्यवंतांनाच दिसते' हे सांगत नितीमत्तेचं महत्वही शिकवून जातो. आधी 'चिंधी'चा राग राग करणारी आणि नंतर एक स्त्री म्हणून तिला पाठिंबा देणारी सुलभाताईंची 'सासु'ही अप्रतिमच !
"जैत रे जैत" मधलं अजुन एक तितकंच महत्त्वाचं पात्र म्हणजेच 'सुत्रधार' ! गंमत म्हणजे इथे एक नाही तर दोन-दोन सुत्रधार आहेत श्रीराम रानडे आणि चंद्रकांत काळे या दोन प्रतिभावंतांनी हा सुत्रधार अगदी समर्थपणे उभा केला आहे. (खरेतर या दोघांबरोबर एक स्त्रीदेखील प्रत्येक वेळी दिसत राहते).

1yn9k0.jpg

चित्रपटाची पुर्ण कथा या सुत्रधारांच्या तोंडुन आलेल्या पार्श्वगीतांतून पुढे सरकत राहते. अगदी प्रत्येक गाण्यातही हे तिघे अधुन मधुन डोकावत राहतात. एक संगीतिका म्हणुनच चित्रपटाची रचना असल्याने गाणी हा चित्रपटाचा प्राण आहे. मुळातच उषाताई आणि हृदयनाथ मंगेशकर यांची निर्मीती असल्याने सुमधुर संगीत हा चित्रपटाचा स्थायीभाव असणे साहजिकच होते. 'जांभुळ पिकल्या झाडाखाली, डोंगर काठाडी ठाकरवाडी, नभ उतरु आलं, आम्ही ठाकर ठाकर, वाडीवरल्या वाटा अशी वेड लावणारी गाणी हृदयनाथजींनी या चित्रपटासाठी ना.धों. महानोरांकडून लिहून घेतली होती. असं म्हणतात की या चित्रपटासाठी ना.धों. नी एकुण एकोणीस गाणी लिहीली होती. त्यापैकी बारा गाणी हृदयनाथजींनी चित्रपटात वापरली. लतादीदी, आशाबाई, उषाताई, रवींद्र साठे यांच्यासारख्या दिग्गजांनी ही गाणी अशा काही पद्धतीने गायली आहेत की आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची गोडी कायम आहे. आजही ही गाणी तितक्याच आवडीने ऐकली, गायली जातात. आजही महाराष्ट्रात होणार्‍या प्रत्येक मराठी चित्रपट संगीतावर आधारीत कार्यक्रमात 'जैत रे जैत'चे एक का होइना गाणे असतेच असते. हा महानोरांच्या लेखणीचा आणि हृदयनाथजींच्या सुमधुन, अवीट संगीताचा असर तर आहेच, पण त्याच बरोबर ही गाणी गाऊन अजरामर करणार्‍या गायकांचा देखील आहे.

'मी रात टाकली' या आजही आवडीने ऐकल्या जाणार्‍या गाण्याची जादु गेली ३५ वर्षे मराठी रसिकांना रिझवीत आलेली आहे. या गाण्यात आपण लताबाईंच्या सुरात गुंतत जात असताना अचानक कानावर कोरसचे सुर घुमायला लागतात. स्पेलबाऊंड म्हणजे नेमके काय असते त्याचा जिवंत अनुभव देणारी ती जाणिव असते. जैत रे जैत हा संपुर्ण चित्रपट पटेलांनी सुत्रधाराच्या नजरेतुन आपल्यासमोर मांडलाय. हे सुत्रधारच आपल्यालाच नाग्या आणि चिंधीची कथा गाण्यांमधुन सांगत जातात. एखाद्या संगीतीकेसारखी ही कथा आपल्यापुढे उलगडत जाते.

या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा अनुभव सांगताना श्री. रवींद्र साठे यांनी सांगितलं होतं ...

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या चालींचं वैशिष्टय़ म्हणजे ती चाल कितीही अवघड वाटली, तरी गाण्याच्या गाभ्याशी किंवा गाण्याच्या भावाशी कधीच हटकून नसते. पण त्यांनी केलेलं प्रत्येक गाणं हटकेच आहे. मी जैत रे जैत या चित्रपटासाठी त्यांच्याकडे पहिल्यांदा गायलो. मी आणि चंद्रकांत काळे आम्ही घाशीराम कोतवाल या नाटकात गात असू आणि जब्बार पटेल यांनी आमचं नाव पंडितजींना सुचवलं. मी रात टाकली या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं त्यावेळी माझं वय २७ वर्ष आणि अनुभवही कमीच. पण ते गाणं झाल्यानंतर खुद्द लतादीदींनी सांगितलं की, खूप दिवसांनी एवढा सुरेल कोरस ऐकला. जैत रे जैत या एका चित्रपटातील गाणी ऐकली, तरी पंडित हृदयनाथांच्या श्रेष्ठत्वाबद्दल कल्पना येते.

गंमत बघा हे गाणं अजरामर झालं त्यात लताबाईंचा वाटा सिंहाचा होता. पण त्यांना मात्र कौतुक गाण्यातल्या कोरसचं. ही सगळी मोठी माणसं इतकी साधी, विनम्र कशी काय राहू शकतात बुवा?

१९७७ साली आलेला हा चित्रपट दिग्दर्शीत केला होता डॉ. जब्बार पटेलांनी. नाग्याच्या भुमिकेतले डॉ. मोहन आगाशे आणि 'चिंधी'ला अजरामर केलेली 'स्मिता' आजही डोळ्यापुढून हटत नाहीत. आजच्या सरकारी अनुदानाच्या मागे लागलेल्या मराठी निर्मात्यांसाठी, मराठी चित्रपटाचं बजेट खुपच कमी असतं हो अशी सतत कुरकुर करत राहणार्‍या मराठी निर्मात्यांसाठी फारसे बजेट नसताना, कुठल्याही चकचकाटाचा आधार न घेता निर्माण झालेला 'जैत रे जैत' हे उत्कृष्ट चित्रपट कसा असावा? याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण ठरावे. डॉ. पटेलांसारखा दिग्दर्शक कदाचित मराठी चित्रपट सृष्टीला मिळेलही, डॉ. मोहन आगासे, स्मितासारखे कलावंतही मिळतील, त्या तोडीचे संगीत देणारे संगीतकार आणि गायकही मिळतील पण तरीही उगाचच वाटत राहते की 'जैत रे जैत' सारखी कलाकृती आता पुन्हा होणे नाही.

सर्व छायाचित्रे आंतरजालावरुन साभार.

विशाल कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

मस्त आहे लेख..............
.
.
मी पाहिलेला पहिला मराठी चित्रपट जैत रे जैत......... लहानपणा पासुनच गांधीलमाशीची भीती या चित्रपटामुळेच बसली...

सुरेख लेख... मी अगदी विचारच करत होते... विशाल..... की जैत रे जैत वर तुच लिहशील म्हणुन.......

मी जैत रे जैत दोन वेळा बघितला .. पहिल्यांदी हा सिनेमा बघितला तेव्हा काहिच कळले नाही... पण दुसर्‍यावेळेस कळला आणि प्रचंड आवडला... ' मी रात टाकली, गाणे खुपच आवडते आहे माझे Happy

अभिनंदन, शोले सारखा जैत रे जैत ही मस्ट होता या मालिकेत. Happy
अजून गाण्यांचा उल्लेख आणि सविस्तर लिहायला हवं होतंस. यातली गाणी इतकी सुरेख होती की ती कुणी मोठ्या संगितकाराने संगितबद्ध केली आहेत किंवा मोठ्या गायकांनी गायली आहेत असं वाटतच नाही.. खूप जवळचे आपले आपले लोकच गातायत असं वाटतं गाणी ऐकताना. पैकी १-२ गाण्यात सुलभा देशपांडे, स्मिता यांनीही एक दोन ओळी गायल्या आहेत. Happy

सुरेख लेख रे.. Happy

सुरेख लेख... मी अगदी विचारच करत होते... विशाल..... की जैत रे जैत वर तुच लिहशील म्हणुन.......
>>>>>>
+१११

आता जरा "रात टाकली" हे गाणे आधी गुणगुणून घेतो.. मग लेख वाचतो सावकाश.. Happy

अवांतर - स्मिता पाटील बोले तो आजही तिचा जैत रे जैत मधीलच चेहरा डोळ्यासमोर येतो.

<<<<असे म्हणतात की या चित्रपटासाठी महानोरांनी एकुण १९ गाणी लिहीली होती. मला खात्री नाही पण यापैकी प्रत्यक्ष चित्रपटात बहुदा १२ च गाणी वापरली गेली. निदान माझ्या माहितीत तरी तेवढीच आहेत.
>>>> <<< असं म्हणतात की या चित्रपटासाठी ना.धों. नी एकुण एकोणीस गाणी लिहीली होती. त्यापैकी बारा गाणी हृदयनाथजींनी चित्रपटात वापरल>>>> अश प्रकारे एकच गोष्ट २ दा आली आहे .... मी लेखन वगैरे बाबतीत खूप मठ्ठ्ठ आहे .... सो चूक काढायचा हेतू नाही ... पण लक्षात आले म्हणून सांगितले ....बाकी लेख मस्त जमला आहे

जामोप्या, तो ही माझाच लेख आहे पण तो फक्त 'मी रात टाकली' या गाण्याविषयी आहे. गाण्याचं रसग्रहण म्हणा हवं तर. हा लेख 'जैत रे जैत' या चित्रपटाविषयी आहे, त्यातल्या पात्रांविषयी आहे. हा आता तो लेखही माझाच असल्याने त्यातील काही वाक्ये जशीच्या तशी इथे घेतली आहेत Happy

दक्षिणा, गाण्याबद्दल सविस्तर नाही लिहीले कारण मला 'जैत रे जैत'च्या कथानकाबद्दल, त्याच्या पात्रांबद्दल बोलायचे होते. या चित्रपटातल्या गाण्यांबद्दल आतापर्यंत इतक्या वेळा लिहीले गेले आहे त्यामुळे त्याबद्दल पुन्हा लिहीण्याचा मोह टाळला मी.

अवना, धन्यवाद , बदल करतो मी !

धन्यवाद मंडळी !

मस्त जमलाय रे लेख विशाल!
लेखातून पुन्हा एकदा 'जैत रे जैत' पाहिला.
लहान असताना एका शनिवारी संध्याकाळी 'जैत रे जैत' पाहिल्याचे आठवतंय.
चित्रपटातले (पडद्यावरचे आणि पडद्यामागचे) कलाकार किती ग्रेट आहेत ते कळायचं वय नव्हतं पण काहीतरी वेगळं आणि खास बघतोय हे त्या वयातही जाणवलं होतं.

सर्वप्रथम विशालदा, तुला खुप शुभेच्छा, आणि धन्यवाद देखील..
प्रचंड आवडत्या चित्रपटाबद्दल लिहीलंस, वाचताना काटा येत होता अंगावर..
सुरेख लिहिलं आहेस.
या कादंबरीची आणि या चित्रपटाची अक्षरशः पारायणं झाली आहेत..
अप्रतिम लोकेशन्स, उत्कृष्ठ संगीत, कसलेले कलाकार, खरंच हा योग पुन्हा येणे नाही.
या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी स्मिताला खरोखर मधमाश्या चावल्याचं खुद्द पंडीतजींनी (हृदयनाथ) सांगितलं होतं..

धन्यवाद मंडळी !
माझ्यासाठी 'जैत रे जैत' ही कादंबरी काय किंवा चित्रपट काय दोन्ही एखाद्या व्यसनासारखे आहेत. हा चित्रपट किती वेळा बघीतलाय देवच जाणे. कधी 'चिंधी'साठी, कधी त्यातल्या गाण्यांसाठी, कधी पुन्हा पुन्हा रिवाईंड-फॉरवर्ड करुन रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळेंनी गायलेला तो 'कोरसचा तुकडा' ऐकण्यासाठी....
तर कधी 'मी बाजिंदी मनमानी' म्हणणार्‍या चिंधीच्या जिवघेण्या अदा बघण्यासाठी Happy

ना. धो. महानोरांनी लिहिलेली जैत रे जैत ची गीतं इतकी गाजली... की त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने धो धो महानोर म्हणू लागले.. Happy

Happy

अतिशय सुरेख लिहिलंस रे...

नुसतंच या चित्रपटातल्या गाण्यांविषयी, अभिनेत्यांविषयी लिहिलं नाहीस तर या चित्रपटाची मर्मस्थळं नीट जाणून इथे ती अतिशय सुंदर पद्धतीने मांडलीस याबद्दल तुझे कौतुक करावे तितके थोडेच...

मी कॉलेजमधे असताना प्रदर्शित झाला होता हा चित्रपट -यातली गाणी काही ठराविक संवाद आम्हा मित्रमंडळीत अगदी फेमस होते - एक दोघांचा तर पूर्ण चित्रपट पाठ होता अगदी.... वेडच लावलं होतं या चित्रपटाने..

कथानक, दिग्दर्शन, मांडणी, पात्रनिवड, अभिनय, गाणी, संवाद, संगीत - सर्वच सशक्त - कुठे बोट दाखवायला जागा नाही....

मी बाजिंदी मनमानी..!! वाह..:)

मस्त लिहीलेस विकू... तुझ्या शब्दातील 'चिंधी'चे चित्रण आवडलेच!

मस्त लिहिल आहेस रे. Happy

हा चित्रपट टिव्हीवरच पहायला मिळाला.
सगळी गाणी वेड लावणारी आहेत. Happy

सुरेख लेख... मी अगदी विचारच करत होते... विशाल..... की जैत रे जैत वर तुच लिहशील म्हणुन.......

>>>> +१११

पण मिथुन वरचा लेख पाहुन आशा सोडली होती! धन्यवाद! (लिहिल्याबद्दल!) Happy

अत्यंत चपखल शब्दात मनातले मांडतात तुम्ही!
एकदम आवडेश! Happy

शुभेच्छा!

Pages