सदस्य प्रवेश |
कॉलनीच्या गोष्टी - ८ जी आर ई आय ट्वेंटी इत्यादीगोडबोल्यांना दोन मुली - मोठी माधुरी, दुसरी ऋजुता. मोठी आईच्याच वळणावर होती - आईचं नाव प्रसन्ना होतं पण त्यांना कधीही पहा सतत कोणावर तरी वैतागलेल्या, चिडलेल्या असत. त्यांचा दिवसच मुळी रागाने, आरड्या ओरड्याने सुरू होत असे. दूधवाल्याने जरा उशीरच केला, पेपर वाल्याने दाराला पेपर अडकवताना तो चुरगळूनच गेला, मिस्टर गोडबोल्यांनी गीझरच नीट लावला नाही, अशा सारख्या प्रत्येक गोष्टींसाठी त्या त्या व्यक्तीवर तोंडाचा पट्टा चालवल्या खेरीज त्यांना करमत नसे. माधुरी पण तशातलीच. बोरकर आजी तिला गमतीने ' सोनूबाई' म्हणत. इंग्रजी माध्यमातून शिकणार्या माधुरीला ' नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा' कुठलं माहित असणार. तिला वाटे बोरकर आजी आपल्याला कौतुकाने तसं म्हणतात. आधीच भांडकुदळ, त्यातून कॉलनीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारी मुलं मुली कमीच. त्यामुळे माधुरीला फारशा मैत्रिणी नव्हत्या. कॉलेजला जायला लागली तो पर्यंत कॉलनीतल्या जवळ जवळ प्रत्येक मुलीशी तिचं भांडण झालं होतं. ऋजुता चं मात्र नाव सार्थ होतं. तिचा आवाज चढलेला कधी ऐकला नव्हता कोणी कॉलनीत. सगळ्यांशी मैत्री होती तिची. शाळेत पण मैत्रिणी भरपूर. माधुरीचे आणि आईचे सारखे खटके उडत. दोघी अजिबात माघार घ्यायला तयार नसत. मिस्टर गोडबोले बायकोला तर घाबरायचेच पण माधुरीला ही घाबरायला लागले होते. ऋजुताच दोघींना समजवत असे. एक दोन दिवसात परत कुठल्यातरी कारणावरून माय लेकींची खडाजंगी होत असेच. माधुरी बारावी नंतर मेडिकल ला गेली होती. सायनला, पटवर्धनांच्या सलील ला दोन वर्षं ज्युनिअर होती. तेंव्हापासून मिसेस गोडबोल्यांनी तिच्याशी बोलणं टाकलं होतं. तिला खरं तर एस पी ला पण प्रवेश मिळत होता. त्यांच्या मनात तिने तिथे जावं असं होतं. तिला खरं तर मेडिकल काय किंवा इंजीनीयरींग काय दोन्ही चाललं असतं पण आईच्या मनाविरुद्ध काही तरी करायचं या विचाराने तिने मेडिकल ला ऍडमिशन घेतली होती. कॉलेजच्या पहिल्याच वर्षानंतर ती हॉस्टेलवर रहायला गेली होती. ऋजुताने तरी इंजीनीयरिंग ला जावं अशी त्यांची फार इच्छा होती. माधुरी हट्टाने मेडिकलला गेली तेंव्हापासून तर त्या ऋजुताला सारखं इंजीनीयरिंग ला जाण्याबद्दल सांगत. "कुठलीही ब्रॅन्च घे, पण इंजीनीयरिंग ला जा." बारावीच्या वर्षी ऋजुताने आय आय टी ची परिक्षा दिली तेंव्हा मात्र त्यांना थोडंसं वाईट वाटलं होतं. व्हि जे टी आय किंवा एस पी च्या पलीकडे जायची त्यांची तयारी नव्हती. एक वेळ पुण्याला सी ओ ई पी मधे पाठवलं असतं त्यांनी. पण आय आय टीत जायचं ते सुद्धा मुम्बईत नाही मिळाली ऍडमिशन तर फार दूर जावं लागेल. माधुरी हॉस्टेलवर गेली तेच त्यांना फार लागलं होतं. आता ऋजुता पण शिक्षणाच्या निमित्ताने दूर गेली तर? आपण मुलींना इतरांच्या मुलांच्या बरोबरीने वाढवलंय, मुली अभ्यासात चांगल्या आहेत. मन लावून अभ्यास करतात. चांगले मार्क्स मिळवतात याचा त्यांना अभिमान होता. पण मुली घरापासून दूर जातील हा विचार ही त्यांना नकोसा वाटे. मुलींचे कधी लाड केले नाहीत की त्यांच्या शी कधी दोन शब्द न ओरडता बोलल्या नाहीत. कॉलनीतल्या इतर आयांना वाटे ' आमच्या मुलांनी असा अभ्यास केला तर आम्ही त्यांना एका शब्दाने कशाबद्दल ओरडलो नसतो.' पण मिसेस गोडबोले मुलींच्या प्रत्येक छोट्या मोठ्या चुकांवर तोंडसुख घेत. ऋजुताला पवईच्या आय आय टी मधे प्रवेश मिळाला. त्या काळात मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रीकल ची चलती होती तेंव्हा तिने केमिक इंजीनीयरिंग निवडलं. ती पवईला गेली तेंव्हा सुरवातीचे काही दिवस मिसेस गोडबोल्यांना फार जड गेले. त्याच सुमारास माधुरी पण फारशी घरी येत नव्हती. आपण अगदी एकटे पडलो आहोत असं त्यांना वाटत असे. त्यांच्याबरोबर काम करणार्यांशी आणखीनच खटके उडू लागले. ऋजुता आरोहीला एक वर्ष ज्युनिअर होती. आरोही रुईया मधनंच बी एस सी करत होती. ती एकुलती एक मुलगी, तिची आई घरीच असायची, असं असूनही ती 'साधं' बी एस सी करतेय अन आपल्या दोघी मुली असल्या तरी एक मेडिकलला अन एक आय आय टी ला याचा गर्व त्यांना गप्प बसू देईना. कॉलनीतल्या इमारतींना नावं सुचवण्याच्या वेळेपासून त्यांचं अन राजेबाईंचं वाकडं होतंच. आरोहीचे किलबिल मधे कार्यक्रम झाले होते तेंव्हादेखील मिसेस गोडबोलेंना फार पोटशूळ उठला होता. येता जाता त्या आरोहीला काही ना काही कारणाने डिवचू लागल्या. तिचं कॉलेज सकाळचं होतं. दुपारी अभ्यास करून व्हायचा. संध्याकाळी ती कधी अंगणात दिसली की तिला काही तरी आडून बोलायच्या. ' तुला स्थळं बघायला लागले असतील नै घरचे? तुला काय नोकरी वगैरे करायची नसेलच शिकून झाल्या वर?' म्हणतील. कधी म्हणतील ' कॉलनीतल्या कोणाच्याही वशिल्याने बँकेत नोकरी मिळणार नाही या दिवसात. निदान डिग्री मिळवावी लागेल अन परिक्षा पास व्हायला लागेल. अगदी डिसूझाचा सुद्धा वशिला चालणार नाही.' आरोहीलाच काय, सगळ्या कॉलनीला त्यांच्या टोमण्यांची सवय होती. कोणी फारसं मनावर घेत नसे. पण तरी आरोही कंटाळली होती. बी एस सी झाल्यावर तिने बी एड करायचं ठरवलं होतं. बी एस सी ची फायनल परिक्षा झाल्यवर निकाल येई पर्यंत तिला काही व्याप नव्हते. त्या सुटीत ती मैत्रिणींबरोबर बरंच फिरणार होती. चिरमुल्यांना तिने सांगितलं तेंव्हा ते खुश झाले होते. "फार चांगली गोष्ट करतेस बेटा तू. डोळे उघडे ठेवून बघून ये सगळं." चौघी मैत्रिणी मिळून आधी पुण्यात एकीच्या आजोळी जाणार होत्या. तिथून दुसरीच्या गावी मनमाडला. तिथून एखाद दिवस नाशिक वगैरे बघुन मग औरंगाबादला आरोहीच्या मामांकडे. तिथे आठवडाभर राहून मुम्बईला परत. तो पर्यंत आरोही मुंबईच्या बाहेर फक्त कॉलेजच्या ट्रिप करता गेली असेल तेव्हढंच. अगदी लहान असताना मामांकडे गेली होती, पण तिला ते काही आठवत नव्हतं. राजे बाईंना खरंतर मनात नव्हतं. चौघी तशा वयाने लहानच, विशीच्या आत बाहेरचं वय. मुम्बई बाहेरची काही माहिती नाही. कसं पाठवायचं असं त्यांना वाटत होतं. पण आरोहीचा हट्ट. शिवाय मिस्टर राजे म्हणाले "अगं सगळी तिकिटं मी स्वतः बूक केलीयेत. दिवसाचा प्रवास आहे सगळी कडे.त्या मुली जिथे जिथे उतरणार आहेत त्या सगळ्यांकडे फोन आहेत. आपण दर दिवशी सुद्धा फोन वर बोलू शकतो सगळ्यांशी, जाउ दे तिला." तेंव्हा त्या नाईलाजाने तयार झाल्या. पुण्याला जायच्या एशियाड मधे बसवून बस सुटेपर्यंत त्या सारख्या सूचना देत होत्या. पुण्याची ट्रिप व्यवस्थित आटोपून मुली मनमाडला गेल्या. तिथल्या मैत्रिणीच्या, ज्योतीच्या आजोबांच्या शेतावरच्या घरी जाणार होत्या. ज्योतीचे दोन काका, ज्योतीचे आजोबा-आजी मनमाडला रहात. जवळ एक खेड्यात थोडी शेती होती. गावात एक सायकल, स्कूटर वगैरे दुरुस्त करायचं दुकान होतं . शहरातल्या मुलींना घेऊन दोन दिवस शेतावर जायचा बेत होता. दुसर्या दिवशी गावात फिरायला म्हणून गेल्या सगळ्या मुली. बाजाराचा दिवस होता नेमका. त्यामुळे गावात गर्दी होती. दोघी तिघींनी बांगड्या भरवून घेतल्या. बाजारात इकडे तिकडे फिरून झाल्यावर ज्योतीची एक चुलत बहीण म्हणाली ' चला इथली शाळा पाहूया घरी जाता जाता.' रस्त्याला लागून असलेली छोटी एक मजली बिल्डिंग, बिल्डिंग कसली धारावी ला लोकांच्या खोल्या बर्या म्हणायच्या तशी शाळा होती. चार भिंती अन एक छप्पर होतं खरं, पण भिंतींना भेगा पडलेल्या, रंग तर एकदा लावलेला तोच, छपराची परिस्थिती सुद्धा बेतास बातच होती. तीन खोल्यांमधून सातवी पर्यंतचे वर्ग चालत होते. शाळेत पिण्याचं पाणी, मुलांसाठी अन शिक्षकांसाठी बाथरूम, प्रयोगशाळा यांचा अभाव सुद्धा कोणाला जाणवत नव्हता. पहिली अन दुसरीचे वर्ग घेणार्या बाईंनी ज्योतीच्या घरच्यांना ओळखलं अन त्या या सगळ्यांशी बोलायला उठून आल्या. मुंबईच्या मुली म्हणजे परग्रहावरचे पाहूणे असतील अशा कुतुहलाने शाळेतली मुलं मुली त्यांच्या कडे वाक वाकून बघू लागली. शाळेतून परत येताना बाकीच्यांचा चिवचिवाट चालू होताच, पण आरोही थोडी गप्प होती. घरी येऊन जेवणं आटपली तरी आरोही आपली शांतच. ज्योतीच्या काकूंनी विचारलं सुद्धा ' घरची आठवण येतेय का तुला? अशी गप्प गप्प का आहेस? बरं नाही वाटतंय का?' त्या दिवसापासून आरोही बदलून गेली. म्हणजे कादंबर्यांमधून, सिनेमामधून माणसं जशी एका पानात किंवा एका सीन मधे बदलतात तसं नाही . पटकन कोणाच्या लक्षातही येणार नाही अशी ती बदलत गेली. फक्त चिरमुले मास्तरांना जाणवला तिच्यातला बदल. चिवचिवाट कमी झाला, मैत्रिणींबरोबर भटकणं, सिनेमे पाहणं कमी झालं. बी एड करायच्या ऐवजी तिने टाटा इन्स्टिट्यूट मधून सोशल वर्क चा दोन वर्षांचा कोर्स करायचं ठरवलं. तिला ऍडमिशन देखील मिळाली तिथे. आरोही च्या आई बाबांना तर त्या कोर्सची, त्या इन्स्टिट्यूटची काही माहिती नव्हतीच, कॉलनी मधे सुद्धा कोणाला त्याची माहिती नव्हती. आरोहीच्या बाबांनी देवनार ब्रँच मधल्या कलीगना विचारून खात्री करून घेतली होती की खरंच तिथे एक कॉलेज आहे, मुलं शिकतात, तिथल्या डिग्रीला काही तरी किम्मत आहे आणि मग आरोहीला फी भरायला पैसे दिले होते. आरोहीचं देवनारचं कॉलेज सुरू झालं तोपर्यंत माधुरीचं पेडियाट्रिक्स मधे एम डी संपत आलं होत. ती जवळपासच्या डॉक्टरांकडे 'लोकम' म्हणून काम करत होती. स्वतंत्र प्रॅक्टीस करावी की एखाद्या अनुभवी डॉक्टरच्या हाताखाली थोडे दिवस काम करावं याचा विचार चालला होता. कॉलनी मधला गणपतीचा कार्यक्रम जोरदार होत असे. कॉलनी मधली मुलं मुली बरेच कार्यक्रम करत. आरोही चं गाणं ठरलेलं असायचं दरवर्षी. त्यावर्षी तिने आपल्या कॉलेजातल्या मुला मुलींना घेऊन 'स्त्री शिक्षण' या विषयावर एक छोटा कार्यक्रम सादर केला. पथनाट्याच्या धर्तीवरच्या कार्यक्रमात अजून लहान गावांमधून शिक्षणाच्या सोयी कशा तुटपुंज्या आहेत, शहरातलं शिक्षण आणि खेड्या पाड्यांमधलं शिक्षण यात किती तफावत आहे असे प्रश्न तर हाताळले होतेच, शिवाय शहरातल्या तथाकथित शिकल्या वाचलेल्या मुली सुद्धा स्वावलंबी होत नाहीत. ज्या नोकरी मुळे चांगलं स्थळ मिळेल, जी नोकरी अथवा करीयर लग्नानंतर सांभाळायला सोपी पडेल अशीच नोकरी करण्याकडे मुलींचा अन पालकांचा कल असतो यावर ही भाष्य होतं. पहिला भाग कॉलनीतल्या सर्वांना आवडला होता. पण शहरी सुशिक्षित स्त्रियांवर काढलेले ताशेरे मात्र कोणालाही पचले नाहीत. गणपती गेले, चार दिवस कोणाला चैन पडेना वगैरे झालं पण ते तितकंच. शाळा, कॉलेज, नोकरी या रहाटगाडग्याचं चक्र चालूच राहिलं. दिवाळीच्या सुटीत आरोहीच्या कॉलेजचा कॅम्प होता डहाणु पालघर भागात., तिथे काम करणार काही माजी विद्यार्थी नव्या विद्यार्थ्यांकरता दहा दिवसांचं शिबीर भरवत. मुलांना सोशल वर्क ची प्रत्यक्ष ओळख व्हावी हा एक हेतू अन आपल्या कामाकरता नवे स्वयंसेवक, समाजसेवक तयार करावेत हा पण एक हेतू. कॉलनीतल्या अनेक घरांमधून काम करणार्या 'बाई' नेटवर्क मधून ही बातमी गोडबोलेंच्या घरी पण पोचलीच. एक दिवशी माधुरीने आरोहीला विचारलं 'मी पण येऊ का तुमच्या कॅम्प ला? मी आमच्या कॉलेज तर्फे असल्या रुरल कॅम्प ला गेलेय एक दोनदा. मला आवडलं होतं ते काम' आरोही एकदम खूश झाली. तिने शब्द टाकला माधुरी साठी. डहाणूचे कार्यकर्त्यांनी अगदी उत्साहाने होकार दिला. आरोही अन माधुरी दोघी गेल्या त्या कॅम्पला. आरोहीला तर खूप शिकायला, पहायला मिळालंच पण माधुरीला तिथलं काम फार आवडलं. तिने आठवड्यातून एक दिवस डहाणू मधल्या प्रॉजेक्टवर काम करायचं कबूल केलं. दर शनिवारी ती त्या प्रॉजेक्टवर जाऊ लागली. एम डी करत असतानाच तिचा रागीट स्वभाव थोडा निवळला होता. त्या प्रॉजेक्टवर काम करतानाच्या अनुभवांनी तर ती चक्क शांत म्हणावी इतकी बदलली. अर्थात याचं श्रेय सगळं अशोक सरांना होतं. माधुरी डहाणूला पहिल्यांदा गेली तेंव्हाच मिसेस गोडबोले तिच्यावर वैतागल्या होत्या. तिने तिथे आठवड्यातून एक दिवस काम करायचं ठरवल्यावर मायलेकींच एकदम जोरदार भांडण झालं होतं. त्याचे तपशील 'बाई' नेटवर्क ने सगळ्या घरातून पुरवले होते. वरुन ' जल्ला लक्षन गोडबोले बाईचा. पोरगी कायतरी समाजसेवा करते. चांगलाच हाय. काय शिनेमात नाचायचा काम करत. कशाला पोरीला बोलते द्येवाला ठाऊक?" अशी पुस्ती पण जोडली होती. तिने 'अशोक सरांशी' आपलं लग्न ठरवल्यावर मात्र मिसेस गोडबोले बिथरल्याच होत्या. चांगली एम डी झालेली मुलगी, तिला तिच्याच सारखा डॉक्टर नाहीतर निदान इंजीनियर नवरा शोधायची स्वप्नं पहात होत्या त्या. या वेळेस मात्र कॉलनी तल्या बहुसंख्य बायकांची अन बाई नेटवर्कची सहानुभुती गोडबोले बाइंना होती. पण माधुरी बधली नाही. शेवटी मुलीचा हट्टापायी मिसेस गोडबोलेंनी माघार घेतली. मिस्टर गोडबोले कधीच बायकोच्या शब्दाबाहेर नव्हते. अशोक सरांच्या आग्रहाप्रमाणे फक्त मंगळसूत्र घालून माधुरीचं लग्न झालं. आरोहीचा कोर्स संपल्यावर लहान गावातून शाळा उभ्या करायच्या, असतील त्या शाळा सुधारायच्या, मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवून द्यायचं अशी काम करणार्या संस्थेत ती काम करू लागली. गोडबोले बाई तिला आता येता जाता डिवचेनाशा झाल्या. संपत आली गोष्ट. पण ते जी आर ई वगैरे म्हटलंय वरती ते राहिलंच की. माधुरीच्या लग्नाची बोलणी चालली होती त्या सुमारास ऋजूता तिच्या सगळ्या मित्र मैत्रिणीं सारखीच या जी आर ई स्कोअर, रेकमेंडेशन,ऍप्लिकेशन इत्यादी मधे गुंतली होती. एक दोन युनव्हर्सिटी मधनं तिला ऍडमिशन पण मिळाली होती. काही कारणाने अशोक सर त्यांच्या घरी आले होते. त्यांनी ऋजुताला या सगळ्या प्रोसेस बद्दल चिकार प्रश्न विचारले. परिक्षा कशी असते ( भयंकर कठीण.) , तू युनिवव्हर्सिटी कशा निवडल्यास ( आमचे सिनियर जिथे गेले, त्याच युनिव्हरसिटी. सगळे तेच करतात.), तू तिथे नक्की काय शिकणार ( सध्या एम एस, मग नोकरी मिळाली तर नोकरी नाही तर पी एच डी अन मग नोकरी.), तू ते एस ओ पी म्हणालीस ते कसं लिहिलंस ( ह्या! त्यात काय, सगळ्यांकडे जुन्या एस ओ पी अन रेको च्या कॉपीज असतात. त्यातनंच बनवायचं काही तरी)., मग तुला स्वतःला कशासाठी जायचंय अमेरिकेत शिकायला ( हा काय प्रश्न झाला? आय आय टी वाले सगळे हेच करतात.) चांगली आय आय टी मधनं इंजिनीयर झालेली आपली मुलगी पालघरला कॉलेजात शिकवायची नोकरी करायला लागल्यावर गोडबोले बाईंनी मौनव्रतच धारण केलं होतं. बाकी कोणी नाही तरी मिस्टर गोडबोले आपल्या दोघी मुलींवर भयंकर खूश होते. |
|
सुरेख लिहितेस शोनू.. ऐकायला जसं काही 'रसाळ' वाटतं, तसंच तुझं हे लिखाण अगदी 'रसाळ' आहे..
पण ही लेखमाला चालू ठेव.. गणेशोत्सवाबरोबर संपवू नकोस...
शूनू,
तुझी दाम्याच्या बायकोचे लग्न नी हा भाग आवडला.
अगदी अगदी कोलनीतल्याच गोष्टी ....
काय ती जळजळ्,अभिमान,टोमणे वगैरे. तुला ती सारस्वत कॉलनी माहीती आहे का चेंबूरची,सगळे पै,शानबाग्,कामत भट वाली?, माझी मावशी इथे राहयची.
नाहीतर ती बी ए र सी कॉलनी, तिथे हाच प्रकार चालायचा. कोणाची कारटी मेडीकल्,कोणाची ईंनजीरींग ह्याचीच चर्चा(तू तिथली का?).
मनःस्विनी, पूनम
धन्यवाद.
मनःस्विनी
चेम्बूर? शी कैतरीच काय? मी पश्चिम उपनगरातली हो! ती सुध्दा वेस्ट साइडची
मनु, एक सल्ला देतेय, विचार कर पटतेय का ते.
सतत कोणाचीतरी जात पात, प्रांत, भाषा यावर टिप्पणी केलीच पाहीजे का? तु खुपदा असे लिहिलेले वाचले आहे आणि तुझे मेसेजेस डिलीट पण केले गेलेत त्यामुळे. परवा गणपतीच्या प्रसादावरुन उगीच जातीवर उतरायची गरज नव्हती आणि इथे अभिप्राय देताना पण.
लोक कदाचीत बालीश म्हणुन खपवुन घेतही असतील पण त्याचा अर्थ ते सतत करत रहावे असे नाही.
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
शोनू छानच जमल्यात सगळ्या गोष्टि!!..(अजुन आहेत ना! प्लिज इतक्यात संपवु नकोस)
मस्त आहे गोष्ट न विषय सुध्दा खुप चांगला.
मंडळी धन्यवाद. इथे, गुलमोहरमधे अन मला मेल पाठवून कौतुक करणार्या सर्वाना धन्यवाद.
नाटक जमेल तसं लिहीत आहे. तिथे तारीख अपडेट होत नाहीये. सम्पलं की समाप्तचा बोर्ड ( की पडदा म्हणू ) लावीनच. त्यानंतर अजून एक समारोपाची गोष्ट राहिलिये.
( स्वत:शी बडबडत "नवरात्र सुरू व्हायच्या आधी सम्पेल का सगळं लिहून?" )