भंगलेले स्वप्न फिरुनी जोडणे मंजूर नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 12 August, 2012 - 04:34

गझल
भंगलेले स्वप्न फिरुनी जोडणे मंजूर नाही!
जो न माझा मार्ग, त्यावर चालणे मंजूर नाही!!

लाट आहे मी स्वत:! झेपावणे हा धर्म माझा;
कागदी नौकांसवे हे खेळणे मंजूर नाही!

अस्मितेमध्ये कधी, तडजोड मी करणार नाही;
फायद्यासाठी कुठे, घोटाळणे मंजूर नाही!

खूप झाले लाड दु:खांनो! शहाणा जाहलो मी!
आसवे कोठेच आता ढाळणे मंजूर नाही!!

वाटले दुनियेस मी फुकटात सारे शेर माझे!
शायरी माझी, मला कवटाळणे मंजूर नाही!!

मान्य आहे की, नसे काहीजणांशी सख्य माझे;
मानतो मततभेद! पण, हेटाळणे मंजूर नाही!

का स्वत:ची वाट बदलू? का बरे माघार घेवू?
सामना वस्तुस्थितीशी टाळणे मंजूर नाही!

ह्या खटाटोपात नाही स्वार्थ माझ्या एकट्याचा;
हा पिढ्यांचा –हास मजला पाहणे मंजूर नाही!

जीवना! नाही मलाही सोस असल्या धाडसांचा;
रोजचा अन्याय सुद्धा सोसणे मंजूर नाही!

चालताही येत नाही, अन् पळाया पाहतो मी!
बेगडी शहरामधे ह्या थांबणे मंजूर नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काही जाणकार नाही पण ज्या चालीत म्हणून पाहिली तीत दोन चार ठिकाणी यती भंग होतेय असं वाटलं.

लाट आहे मी स्वतः !, खूप झाले लाड दु:खांनो इ. .. अर्थात दुस-या कुठल्या लयीत शक्य असेल कदाचित.

एक वै. मत

भंगलेले स्वप्न फिरुनी जोडणे मंजूर नाही!
ही ओळ सुरेख. मला गझलियत वगैरे कळत नाही पण पूर्वार्धात जि इफेक्ट साधला गेला त्याला उत्तरार्ध साजेसा वाटत नाही.
जो न माझा मार्ग, त्यावर चालणे मंजूर नाही!!

इथे त्यागला जो मार्ग त्यावर.............................. हे योग्य झाले असते.
किंवा राहिला जो मार्ग मागे हे ही योग्य वाटलं असतं. आशय एकच असला तरी मूड कायम रहावा असं आपलं वाटलं.

लाट आहे मी स्वत:! झेपावणे हा धर्म माझा;
कागदी नौकांसवे हे खेळणे मंजूर नाही!

अस्मितेमध्ये कधी, तडजोड मी करणार नाही;
फायद्यासाठी कुठे, घोटाळणे मंजूर नाही!

वाटले दुनियेस मी फुकटात सारे शेर माझे!
शायरी माझी, मला कवटाळणे मंजूर नाही!!

मान्य आहे की, नसे काहीजणांशी सख्य माझे;
मानतो मततभेद! पण, हेटाळणे मंजूर नाही!

का स्वत:ची वाट बदलू? का बरे माघार घेवू?
सामना वस्तुस्थितीशी टाळणे मंजूर नाही!

जीवना! नाही मलाही सोस असल्या धाडसांचा; शब्द खटकला.
रोजचा अन्याय सुद्धा सोसणे मंजूर नाही!

हे शेर आवडले...

बेगडी शहराचा या शेरात दोन ओळीत ओढून ताणून संबंध लावावा लागतोय.

एकूणात आवडली गझल.

बेगडी शहराचा .........या शेरात दोन मात्रा कमी जाणवल्या पहिल्या ओळीत

चालताही येत नाही, अन् पळाया पाहतो मी
बेगडी शहरामधे ह्या थांबणे मंजूर नाही!

गझल अख्खीच्याअख्खी आवडली

वैवकु!
“मी” लिहायचे धांदलीत राहिले होते. निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारी आहे.
दुरुस्त केले आहे.
प्रा.सतीश देवपूरकर