आज तुझ्या मी नावे करतो

Submitted by निशिकांत on 1 August, 2012 - 05:33

आज तुझ्या मी नावे करतो

भाग्यामधल्या सुखास माझ्या आज तुझ्या मी नावे करतो
हास्य असूदे तुझिया ओठी दु:ख तुझे मी खुशीत जगतो

बाग लावली कधीच नव्हती फुले अंगणी तरी उमलली
चाहुल येता आगमनाची तुझ्या भोवती वसंत फुलतो

झोप कशाने तुझी हरवली? तिष्टत बसलो मी केंव्हाचा
एक शुभेच्छांचा गुलदस्ता स्वप्नी येवुन द्यावा म्हणतो

नभांगणीच्या कैक तारका जरी भाळल्या माझ्या वरती
एकच माझी शुक्रतारका जिला बघाया मी धडपडतो

प्रेम व्यक्त जर केले असते लाज सारुनी जळण्याआधी
चितेवरूनी उठून वेडे पुन्हा एकदा जगलो असतो

शिकलो आता लावुन चेहरा जगावयाला हळू हळू मी
भूक जळू दे, पण लोकांना रवंथ मी करताना दिसतो

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा भगवी छाटी नेसुन, ढोंगी
मोहामध्ये बरबटलेला हिणकस कोणी साधू बनतो

सत्त्यमेव जयते हा नारा काळाच्या ओघात हरवला
सत्त्याची गळचेपी होते समाज हिजडा टाळी पिटतो

ओठामध्ये जे अडखळते नजर बोलकी सांगुन जाते
सांगायाचे राहुन गेले "निशिकांता"ला भ्रम हा छळतो

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अख्खी गझल सहज्-सुन्दर आहे काका
प्रचंड आवडली
काही शेर पर्सनली जास्त आवडले ........

झोप कशाने तुझी हरवली? तिष्टत बसलो मी केंव्हाचा
एक शुभेच्छांचा गुलदस्ता स्वप्नी येवुन द्यावा म्हणतो

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा भगवी छाटी नेसुन, ढोंगी
मोहामध्ये बरबटलेला हिणकस कोणी साधू बनतो

सत्त्यमेव जयते हा नारा काळाच्या ओघात हरवला
सत्त्याची गळचेपी होते समाज हिजडा टाळी पिटतो

ओठामध्ये जे अडखळते नजर बोलकी सांगुन जाते
सांगायाचे राहुन गेले "निशिकांता"ला भ्रम हा छळतो

धन्यवाद काका

मस्तच, खुप आवडली. खालील शेर तर खासच

भाग्यामधल्या सुखास माझ्या आज तुझ्या मी नावे करतो
हास्य असूदे तुझिया ओठी दु:ख तुझे मी खुशीत जगतो

ओठामध्ये जे अडखळते नजर बोलकी सांगुन जाते
सांगायाचे राहुन गेले "निशिकांता"ला भ्रम हा छळतो

गझल छानच आहे. चर्चा मात्र करत आहे. Happy

भाग्यामधल्या सुखास माझ्या आज तुझ्या मी नावे करतो
हास्य असूदे तुझिया ओठी दु:ख तुझे मी खुशीत जगतो<<< ओळी उलट सुलट लिहिल्यास अधिक प्रभावी वाटावे.

बाग लावली कधीच नव्हती फुले अंगणी तरी उमलली
चाहुल येता आगमनाची तुझ्या भोवती वसंत फुलतो<< वा

(बाग कधी लावलीच नव्हती - असे अधिक बोलल्यासारखे व्हावे) (तसेच, तरी उमलली फुले अंगणी)

झोप कशाने तुझी हरवली? तिष्टत बसलो मी केंव्हाचा
एक शुभेच्छांचा गुलदस्ता स्वप्नी येवुन द्यावा म्हणतो<<< छान आहे. (उर्दूसारखा वाटला). Happy

नभांगणीच्या कैक तारका जरी भाळल्या माझ्या वरती (माझ्यावरती - एक शब्द) Happy
एकच माझी शुक्रतारका जिला बघाया मी धडपडतो << शेर काहीसा सपाट आहे. पण गोड आहे.

प्रेम व्यक्त जर केले असते लाज सारुनी जळण्याआधी
चितेवरूनी उठून वेडे पुन्हा एकदा जगलो असतो

(पहिली ओळ संबोधनात्मक झालेली नाही.)

लाज सारुनी प्रेम व्यक्त करतीस तुझे... मी जळण्याआधी - अशी पहिली ओळ सुलभ वाटावी.

शिकलो आता लावुन चेहरा जगावयाला हळू हळू मी - चेहरा या शब्दात एक मात्रा वाढली असावी.
भूक जळू दे, पण लोकांना रवंथ मी करताना दिसतो

(शेरातील खयाल अतिशय नावीन्यपूर्ण आहे) (पण अभिव्यक्ती 'मला' अस्पष्ट 'वाटली')

शिकलो आता भरल्यापोटी दिसणारा चेहरा ठेवण्या
भूक न भागे पण लोकांना रवंथ करताना मी दिसतो

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा भगवी छाटी नेसुन, ढोंगी
मोहामध्ये बरबटलेला हिणकस कोणी साधू बनतो <<< शेर सपाट वाटला. प्रभावी समारोप वाटावा अशी आशयाची दोन ओळींत विभागणी हवी होती असे जाणवले.

सत्त्यमेव जयते हा नारा काळाच्या ओघात हरवला
सत्त्याची गळचेपी होते समाज हिजडा टाळी पिटतो<< वा वा, स्वच्छ व चांगला

ओठामध्ये जे अडखळते नजर बोलकी सांगुन जाते
सांगायाचे राहुन गेले "निशिकांता"ला भ्रम हा छळतो <<< चांगला मक्ता आहे. खूप चांगला.

कृपया गैरसमज नसावा, लहान तोंडी मोठा घास घेतला.

-'बेफिकीर'!

संपूर्ण गजल अतिशय सुंदर.

फक्त हा शेर अनाठायी वाटला (वै मत, आपल्या गजललेखनाविषयी संपूर्ण आदर राखून.....)
<<<सत्त्यमेव जयते हा नारा काळाच्या ओघात हरवला
सत्त्याची गळचेपी होते समाज हिजडा टाळी पिटतो >>>

मस्तच.