लढाई

Submitted by vandana.kembhavi on 28 July, 2012 - 03:23

गोट्याने गाडीतून उतरून मागच्या सीट वरचे दप्तर घेतले आणि आईला हात हलवून निरोप दिला. गाडी दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच उभा राहिला आणि मग हळूहळू त्याने शाळेच्या दिशेने चालायला सुरुवात केली. शाळेत शिरल्यावर आधी त्याचे लक्ष शाळेच्या मैदानात गेले. त्याने सभोवार बारकाईने पाहिले आणि त्याच्या नजरेने एक जागा टिपली. नंतर मग तो वर्गाच्या दिशेला वळला. सभोवती मुलांची गर्दी, गडबड, गोंधळ, यातलं काही गोट्याच्या डोक्यात शिरत नव्हत. त्याच्या डोक्यात फिरत होती फक्त "बचाव नीती" वरवर शांत राहिलेल्या गोट्याच्या डोक्यात प्रचंड वादळ घोंघावत होतं.
पाय ओढत, हातातली आधाराची काठी सावरत, खांद्यावरच्या दप्तराचे ओझे सांभाळत, खाली मान घालून तो वर्गाकडे निघाला होता. आजूबाजूच्या गर्दीकडे बघायची त्याची इच्छा नव्हती, किंबहुना तो ती गर्दी टाळता येईल तर बरे, असाच विचार करत असे. आजूबाजूचे फिदी फिदी हसण्याचे आवाज त्याला बेचैन करत. आई नेहेमी म्हणते," अरे, तुला नाही हो कोणी हसत, त्यांचे ते हसत असतात." असेल हि पण आईला काय सांगायचे....डोके झटकून तो पुढे निघाला. काही जणांचे पालक अजून आजूबाजूला उभे होते, त्याचे गोट्याला बरे वाटले, कुठेतरी आधार वाटला, आईपण आत पर्यंत आली असती तर? असे त्याला वाटून गेले, पण तेवढ्या पुरतेच..आपल्याला सोडून तिला ऑफिस गाठायचे असते, किती घाईत असते ती, आणि ...आणि तिला जर हे कळले तर? नकोच...त्यापेक्षा या अनोळखी लोकांचाच त्याला आधार वाटून गेला.

तसाच पाय ओढत तो सावकाश जिने चढू लागला. शक्यतो गर्दीच्या मध्ये न येता तो एका बाजूने जिने चढत होता, मनातून प्रचंड घाबरला होता पण कान,डोळे आजूबाजूच्या प्रत्येक हालचाली टिपत होते. जिन्यात मध्ये काही शिक्षक, शिक्षिका उभ्या होत्याच पण इतक्या गर्दी कडे लक्ष देण काही सोपी गोष्ट नव्हती. गोट्याने मात्र त्यांच्या जागा टिपल्या आणि तीन जिने चढताना धोक्याच्या जागा जिथे शिक्षक पाहू शकणार नाहीत त्या सवयीने त्याच्या लगेच लक्षात आल्या आणि कुठे जास्त काळजी घ्यायला हवी हे ताबडतोब त्याच्या लक्षात आल. थोडस दुर्लक्ष झालं आणि झालाच पहिला वार...सुमितने चालताना पटकन त्याचा पाय गोट्याच्या काठीत अडकवून त्याची काठी मागे ढकलली आणि बेसावध गोट्या धडपडला...बाजूने पुन्हा ते फिदी फिदी हसणे ...गोट्या आधार घेऊन उभा राहिला आणि सुमितने दाखवलेल्या अंगठ्याकडे दुर्लक्ष करत तो अजून सावध होऊन पुढे निघाला...पुढे एक शिक्षक उभे होते त्यामुळे गोट्याचा तेवढा प्रवास चांगला झालं, यावेळी धोक्याच्या जागेकडे गोट्याचे पूर्ण लक्ष होते त्यामुळे परेशने मागून दप्तर ओढले तरी तो धडपडला नाही. वार फुकट गेल्यामुळे परेश मात्र चिडला आणि तुला बघून घेईन अशी खुण करून पुढे गेला. गोट्याने खाली मान घातली कारण ओठावरच हसू त्याला लपवायचे होते...आता एकच जिना...मागून ढकलाढकली करत प्रणवने गोट्याला सपशेल खाली पाडले आणि परेश कडे बघून अंगठा उंचावला....अपमानित गोट्याने डोळ्यांच्या कडेला आलेले अश्रू तिथेच थोपवून ठेवले आणि निमूट उठून वर्गाकडे चालायला सुरुवात केली. रोज ह्या कसरतीने गोट्या दमून जातं असे. आंघोळ झाल्यावर देवाला नमस्कार करताना तो नेहेमी मानसिक शक्ती साठी प्रार्थना करायचा त्याची त्याला आठवण आली. एक मोठा श्वास घेऊन गोट्या वर्गात शिरला.

प्रार्थनेची बेल वाजेपर्यंत वर्गात थांबणे म्हणजे गोट्याला नेहेमीच मोठी शिक्षा वाटे कारण शिक्षक वर्गात नसत आणि मुलांची मस्ती चालू असे. त्यात सुमित आणि त्याची मित्रमंडळी टपूनच असत. गोट्याला वर्गात शिरताना पाहिला आणि सुमितने पुढे येत त्याची कॉलर धरली आणि त्याला ढकलायला सुरुवात केली. मागे मागे ढकलत त्याला पार मागच्या भिंतीपाशी नेउन आदळले. वर्गातली सारी मुले निमूट पाहू लागली, सुमिताशी चार हात करायची इच्छा व तयारी कुणाचीच नव्हती, गोट्याकडे एक केविलवाणा कटाक्ष टाकून बाकीचे आपल्या गप्पांकडे वळले. गोट्याला माहित होते कि कुणीही आपल्याला मदत करणार नाही, आपल्याला घाबरून चालणार नाही, धीराने तोंड द्यायची तयारी ठेवून त्याने सुमितकडे धीटपणे पाहिले. पण परिणाम उलटाच झाला....सुमितने हा घाबरत नाही हे पाहून चिडून गोट्याच्या पोटात एक गुद्दा मारला, गोट्या कळवळला....तेवढ्यात प्रार्थनेची बेल वाजली आणि शिक्षक वर्गात शिरले तसे सुमितने हात खाली घेतला आणि तो पटकन त्याच्या बाकावर जाऊन बसला. प्रार्थना संपली तरी गोट्याची वेदना कमी झाली नव्हती, तो तसाच ओठ घट्ट मिटून बाकावर बसला. आता मधली सुट्टी होईपर्यंत आपल्याला या मारापासून व अपमानापासून सुटका या भावनेने गोट्या शांत झाला....

शिक्षकांनी शिकवायला सुरुवात केली. गोट्या मात्र विचारात बुडून गेला.... सकाळची एक लढाई संपली होती, अजून दिवसभरात अशा कितीतरी लढाया त्याला रोज लढाव्या लागत...कुठून शक्ती आणायची? सुरुवातीला तो रोज रडत असे, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही उलट जे त्याला मारत नसत ते हि त्याला "रडूबाई" म्हणून चिडवू लागले आणि कुणीही त्याच्या जवळ येईना. घरी तर यातले काहीही बोलण्याची सोय नव्हती....आई बिचारी नोकरी, घर, गोट्याचे दवाखाने, त्याची फीजिओथेरपि , त्याचा अभ्यास याने पूर्ण पिचून गेली होती. तिला जर हे कळले तर ती अजून दुःखी होईल हे गोट्याला माहित होते, आणि तिला दुःखी पाहणे गोट्याला कधीच आवडत नसे. तिची धडपड वाया जाऊ नये म्हणून तो नेहेमी जमेल ती मेहेनत घेत असे. आणि बाबा? बाबा खूप तापट आहेत, त्यांचेही आपल्यावर जीवापाड प्रेम आहे पण त्यांना हे कळले तर ते काय करतील? चिडतील, या मुलांना मारतील कि आपल्याला शाळेतून काढून घरी बसवतील? गोट्याला काही अंदाज येईना....शिक्षक त्याच्या बाकासमोर येऊन उभे राहिल्यावर गोट्या आपल्या विचारातून बाहेर आला..."वही दप्तरातून काढा, यासाठी आमंत्रण हवे आहे का आपल्याला श्रीलेश कुमारजी?" सरांच्या या वाक्यावर सारा वर्ग खो खो हसला...सुखावून सरांनी वर्गाकडे नजर टाकली आणि त्यांच्या हसण्यात सामील झाले. गोट्याला पटकन दप्तर उघडून वही देखील काढता येईना, त्याची धडपड पाहून सर पुन्हा म्हणाले " आजच काढा हो वही" आणि साऱ्या वर्गात पुन्हा हसण्याची लाट उसळली...मग मात्र सरांना दया आली आणि ते फळ्याकडे वळले.

सर भराभर फळ्यावर लिहू लागले आणि गोट्याच्या मनात आले, चला दुसऱ्या लढाईला सुरुवात झाली...फळ्यावरची अक्षरे लिहिताना गोट्या नेहेमी भांबावून जात असे. त्याला ती दिसत, समजत देखील पण तो वेग त्याला जमत नसे आणि थोड्याच वेळात ती सारी अक्षरे त्याच्या भोवती फेर धरून नाचू लागत. आणि मग आपण कुठली ओळ लिहित होतो हेच त्याला आठवेनासे होई. सारा वर्ग खाली मान घालून लिहितो आहे हे पाहून गोट्याला काय करावे हेच समजेना. त्याने वही समोर धरली आणि फळ्याकडे पाहून तो वहीतल्या ओळींवर गोळे गोळे काढून लिहिण्याचे नाटक करू लागला. तो त्यात इतका रमून गेला कि तास संपल्याची घंटा झाल्यावरच भानावर आला...पटकन त्याने वही मिटून टाकली, कुणी पाहिलं तर? पुन्हा हसण्याचे निमित्त होण्याची ताकद त्याच्यात राहिली नव्हती. मधल्या सुट्टीपर्यंत एकामागोमाग एक अशा अनेक लढाया लढून बिचारा थकून गेला होता. मधली सुट्टी झाली आणि गोट्या पुन्हा सतर्क झाला. जागेवरच बसून डबा खाता येणार नव्हता कारण सुमित उठून त्याच्याकडे येईपर्यंत त्याला हालचाल करणे भाग होते.

गोट्याने डबा उचलला आणि वर्गातल्या गर्दीमधून तो पटकन बाहेर पडला. जमेल तेवढ्या भरभर जिना उतरून तो मैदानाकडे आला, तोपर्यंत सुमितच्या लक्षात आलेच होते आणि गोट्याला वरून सुमितच्या हाका ऐकू आल्या. आता तो तीन जिने उतरून खाली येईपर्यंत गोट्याला त्याने सकाळी हेरून ठेवलेल्या जागेपाशी पोहोचायचे होते आणि तसे तो पोहोचताच धपकन खाली बसला. त्या श्रमाने तो थकून गेला होता. इथे सुमितला यायला थोडा वेळ लागेल याची त्याला खात्री होती त्यामुळे त्याने डबा उघडला आणि त्याने भराभरा खायला सुरुवात केली...कसाबसा डबा संपवून गोट्या लपलेल्या जागेवरून उठला आणि मैदानावरच्या गर्दीत मिसळून गेला...सुमित मात्र खवळला होता, अर्थात त्याला गोट्याला शोधणे काही कठीण गेले नाही पण रिकामा डबा पाहून तो चिडलाच. त्याने गोट्याला बदडायला सुरुवात केली. गोट्या खूप बावरून गेला, त्याला स्वतःला कसे वाचवावे हेच कळेना, धडपडून खाली पडलेल्या गोट्याने घाबरून आपले डोळे मिटून घेतले आणि तो सुमितच्या मारासाठी मानसिकरित्या तयार झाला, शारीरिक वेदना त्याला सहन करणे कठीण जाई पण सरावाने तो हे सगळ मानसिकरित्या सहन करायला मात्र शिकला होता. बराच वेळ झाला तरी सुमितचा वार येत नाही हे जाणवून गोट्याने डोळे किलकिले केले आणि एका मोठ्या मुलाने सुमितचा हात धरलेला आणि सुमित तो सोडवण्यासाठी धडपडत होता हे दृश्य पाहून गोट्या उठून उभा राहिला. कसाबसा हात सोडवून गोट्याकडे रागाचा कटाक्ष टाकून सुमित तेथून निघून गेला आणि आजची लढाई वाचली याचा आनंद गोट्याच्या चेहेऱ्यावर पसरला. आपल्याला वाचवणाऱ्या मुलाचे आभार मानून गोट्या मैदानाच्या कडेने चालू लागला.

चालताना गोट्याचे विचार चालूच होते, आज वाचलो, रोज कोण आपल्याला मदत करणार? सुमित पासून वाचायचे तर काहीतरी वेगेळे केले पाहिजे? आणि असे सुमित आपल्याला रोज भेटणारच, आपले संरक्षण आपल्याला करावे लागणार, कुणाचीही मदत न घेता आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार...सहज त्याने मैदानावर आणि शाळेच्या इमारतीवर नजर फिरवली, त्याच्या चेहेऱ्यावर आनंद पसरला. त्याला त्याची शाळा, हे वातावरण नक्कीच आवडत होते. आपल्याला अभ्यास कितपत जमेल हे त्याला माहित नसले तरी या वातावरणात राहण्याचा आपल्याला देखील हक्क आहे हे त्याला मनापासून जाणवत होते. इथे यायला आपल्याला किती आवडते हे कुणालाच सांगून समजणार नाही हे त्याला माहित होते. रोज इतक्या लढाया लढून संध्याकाळी तो थकून जात असे पण सकाळी उठल्यावर शाळेत जाण्याच्या विचाराने त्याला आनंदाव्यतिरिक्त कुठलीही भावना जाणवत नसे. सुमितच्या किंवा इतर कुणाच्याही भीतीने त्याला घरी बसावे असे कधीही वाटत नसे.....आपण अशा सगळ्या सुमितना पुरून उरायचे हे त्याने अगदी नक्की ठरवले, वेळ लागेल पण आपल्याला ते नक्की जमेल....विश्वासाने पावले उचलत गोट्या पुन्हा वर्गाकडे निघाला.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी "गणुचे़ कुतुहल" गोष्ट तुम्ही आवडीने वाचलीत त्याबद्दल मनापासुन आभार! ही गोष्ट तुम्हाला आवडेल अशी आशा वंदना.

वंदना मागची गणूची गोष्ट तर झक्कास होती. ही गोट्याची गोष्ट मात्र कारुण्याची छटा दर्शवते. दुसरी गोष्ट कथेत जरा मागील गोष्टींचा जरा फोकस दाखवला असता तर बरे झाले असते. फोकस म्हणजे गोट्याची अशी अवस्था का आहे? गोट्याच्या घरी आईबाबां व्यतीरीक्त अजून कोण आहे? म्हणजे त्याला मानसीक आधार आणखीन कोणाचा ? शाळेतील शिक्षक वर्गाला त्याच्या विषयी करुणा आहे की तिरस्कार? गोट्याला कुणीच मित्र नाहीत का? तो सुमीतला धडा शिकवेल का?

कथा आणखीन वाढवली असती तरी आवडलेच असते.

कथा आवडलीच आहे, पण बघ माझ्या सुचना आणी प्रश्न पटतात का? रागवु नकोस्.:स्मितः

धन्यवाद! @ टुनटुन गोट्या हा शाळेत त्रास सहन करणा-या मुलांचे प्रतिनिधित्व करतो आहे, त्याला काय झाले आहे पेक्षा रोज त्याला कुठल्या दिव्यातुन जावे लागते याकडे लोकांचे लक्ष जावे हि प्रामाणिक अपेक्षा. मला त्या मुलाचे प्रश्न लोकांसमोर आणायचे होते आणि तुला पडलेल्या प्रश्नांवरुन मला माझा हेतु सफल झाल्यासारखे वाटले. कथा वाचल्याबद्दल सर्वांचे आभार Happy

आवडली. तुमची शैली खरच चांगली आहे.
गोष्ट इथवरच येवुन थांबली हे मला वैयक्तितरित्या खुप आवडले. कारण दिवसाच्या सुरवातीपासुनचा त्याचा दुर्बलतेचा मानसिक प्रवास एका ठाम निर्णयावर येवुन थांबतो.
शुभेच्छा पुढील सगळ्या लेखनासाठी अगदी मनापासुन. Happy

वंदना, खूप आवडली.. त्या घाबरलेल्या गोट्याचं शाळेतलं वावरणं अगदी डोळ्यांसमोर उभं केलयस... खरच खूप सुंदर.
.......>तरी या वातावरणात राहण्याचा आपल्याला देखील हक्क आहे हे त्याला मनापासून जाणवत होते. इथे यायला आपल्याला किती आवडते हे कुणालाच सांगून समजणार नाही हे त्याला माहित होते.>>

ह्यातच सगळं आलं...
सुंदर
(गणूचं कुतुहल... केवळ अप्रतिम होती...)

सुरेख लिहिली आहे कथा. पण वाचून बिचार्‍या गोट्याचं फार वाईट वाटलं . लवकरात लवकर लढाई लढण्याचं बळ त्याच्या अंगी येवो.

छान

वन्दना ताई, या कथेतील गोट्या माझ्या शाळेच्यादिवसात अगदी जवळून पाहिला आहे. तस तो गोट्या मलाच समजला तरी चालेल. अगदी इयत्ता ३री ते ७वी पर्यन्तचा. या गोट्याची कथा वाचताना थोड्क्यात माझा भूतकाळच आठवला.