खंत

Submitted by मनोमयी on 26 July, 2012 - 08:17

त्याच्या दूर जाणाऱ्या पाठ्मोऱ्या आकृतीवर तिची नजर कितीतरी वेळ खिळली होती.त्याची आकृती दिसेनाशी होताच तिची नजर शुन्यात हरवली. गतकाळाने तिच्या डोळ्यांपुढे अगदी थैमान घातला.कितीतरी स्मृतींची वलये तीच्या मन:पटलावर फेर धरु लागली.
त्याने एकदा मागे वळून पाहावे, आपल्यासाठी थांबावे अशी फोल आशा तिला का वाटावी? ज्या व्यक्तिचा तिने सदैव तिरस्कार केला, तो आपल्या आयुष्यातून निघून जाण्याची स्वप्ने पाहिली त्याने आज तिच्यासाठी का म्हणून थांबावे?
ज्याला तिने कधिच प्रेम दिले नाही,त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा तिने का ठेवावी? अश्या अनेक प्रश्नांपुढे ती आज निरुत्तर झाली होती. आपण कुठेतरी चुकलो याची आज नकळत तिच्या मनाला बोचणी लागली. आपल्या पतीच्या गुन्ह्याची शिक्षा आपण त्याला का दिली? त्याची त्यात काय चुक? त्याने फ़क्त तिच्याकडे प्रेमाची,थोड्या सहानभुतीचीच अपेक्षा केली होती ना! एवढेही त्याला देणे तिला श्यक्य न व्हावे?.
तिला तो दिवस आठवला जेंव्हा डॉक्टरांनी तिच्यापुढे ‘ती कधिच आई होऊ शकत नाही’ या कटुसत्याचा उलघडा केला होता. तिच्या पायाखालची जमिनच सटकल्याचा भास तिला झाला होता. कदाचीत देवाने जे केले ते योग्यच होते असे क्षणभर तिला जाणवले. आपली खरीच आई होण्याची लायकी नाही असे तिला वाटून गेले. दैवानेही आपल्या मातृत्वाची अशी कठीण परिक्षा घ्यावी आणि आपण त्यात अयशस्वी व्हावे. पण आजच हा विचार तिला का सतवावा? आई व्हायच भाग्य तिने स्वत:च लाथाडून टाकल्याची जाणीव आज तिला होत होती. आपण एवढे स्वार्थी कसे झालो? तिच तिलाच कळेनास झालं.
पतिचे परस्त्रीशी संबंध असावे आणि त्याही पुढे पापाची साक्ष म्हणून की काय त्यांना एक मुलगा असावा हेच आधी तिच्या संस्कारी मनाला धक्कादाय़क होते. त्यावर पतिने त्याला निलाजरेपणे घरी आणावे व आपल्या कृत्याचे असे समर्थन करावे तिला या गोष्टीची तेंव्हा प्रचंड चीड आली होती. जेंव्हा जेंव्हा ती त्या मुलाकडे पाही तेंव्हा तेंव्हा पतिच्या दुशकृत्याची चालती बोलती निशाणीच पाहत असल्याचा तिला
भास होई. तिच्या मनात त्या मुलाबद्दल राग, द्वेश, घ्रुणा, किळस असे कितीतरी भाव नकळत जागे होत. या साऱ्याचा ऊद्रेक त्या मुलावर होणे सहाजीकच होते. त्याची आई गेली आणि समाजात एक पाप एवढीच त्याची किंमत उरली असताना ते पाप माझ्या माथी का यावे, तिच्या तळपायाची आग मस्तकात जाई.
परंतु त्या निष्पाप मुलाने ती कशीही वागली तरीही तिला आपली आई या दॄष्टिनेच प्रेम केले होते. तिने कितीही झिडकारले कितीही ढकलले तरी पुन्हा पुन्हा तो कोडग्या प्रमाणे तिच्याकडे आई म्हणून धाव घेई. तिच्या पतिच्या त्या दुषकृत्यात खरी त्याची काय चुक? फ़क्त दोन प्रेमच्या शब्दांची त्याला तेंव्हा गरज होती. पण तेही तिला जमले नाही. पतिला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्याचे भयानक दुर्धर रोगाने निधन होणे हा एक शिक्षेचाच भाग असावा. पण त्यानंतर खऱ्या अर्थाने पोरक्या झालेल्या त्या मुलाला ती कधिच आपल म्हणू शकली नाही. एवढ का तिच काळीज दगडाच झालेल? खरच माणुसकीही विसरली होती का ती?
जे झाल ते झाल, पण जीवनाच्या या उतारवयात जेंव्हा ब्लडकॅन्सर होऊन ती बिछान्याला खिळली तेंव्हा आता तिला त्या मुलाच्या सहानभुतीची, प्रेमाची गरज वाटावी! आता त्याने आपल्याला आधार द्यावा असे वाटावे! जरी ती त्याची आई होऊ शकली नाही तरी त्याच्यासाठी ती आईच होती ना? मग त्याने आपल्या आईला अश्या कठीण प्रसंगी असे एकटे टाकून जावे... तिला स्वत:च्याच अश्या स्वार्थी विचारांचा किळस वाटला आणि हाय रे दैवा! तिचा रक्तगट त्याच्या रक्तगटाशी जुळावा पण त्याने तिला रक्त देण्यास नकार देऊन तडक असे निघुन जावे... तो आता जे काही वागला ते तिला योग्यच वाटले. तिने असे त्याचे वागणे योग्य ठरवून स्वत:चे सांन्त्वन केले. बिछान्यावर पडून असताना तिची नजर शेजारच्या टीपॉय वर गेली. तिथे एक चिठ्ठी वाऱ्यावर फ़डफ़डत होती. कुणाची असावी बर ती चिठ्ठी? आणि असे आहे तरी काय त्यात?. तिने थरथरणाऱ्या हाताने ती चिठ्ठी उचलली. चाचपडत टिपॉयवरील चष्मा तिने उचलून डोळ्यांना लावला.
चिठ्ठीवाचण्यासाठी ती जरा ऊशीवर वर सरकली व वाचु लागली.

प्रिय आई,

अग कितीही झाले तरी तुच माझी आई आहेस. माझ्या स्वत:च्या आईला मी कधिच पाहिले नाही. जर पाहिले असेन तर मला आठवत नाही. जेंव्हा पासून मला कळायला लागले तेंव्हापासून आई म्हणून तुच होतीस ग माझ्यासाठी.
भले तू मला कितीही झिडकारलेस, कितीही नाकारलेस, कितीही दूर लोटण्याचा प्रयत्न केलीस पण तरीही माझ्या मनातील तुझ्याविषयीचे प्रेम कधीच कमी झाले नव्हते आणि होणारही नाही.
तु मला आपला मुलगा म्हणुन कधीच जवळ ओढले नाहीस पण तुझ्या आधाराची उबदार गोधडी होती माझ्यासाठी. खर सांगु तिला पांघरल ना की कशाचीच भिती वाटत नव्हती. माझी आई आहे माझ्यासाठी ही जाणिव सदैव होती.
पण आज मला माझ्या कर्तव्यापासून दूर जावे लागते आहे. आज जेंव्हा तुला माझी खरी गरज आहे, तेंव्हाच मी तुझ्याकडे नाही. कदाचीत तु माझ्या अश्या वागण्यावर रागावली असशील. मला नमकहराम समजुन दुषणेही दिली असशील. पण आई मी तसा नाही, खरच मी तसा नाही.
आई आज मी खरच तुझ्या प्रेमासाठी नालायक ठरलो. दैव दूर्विलास बघ आई माझ्या वडिलांच्या पापाची शिक्षा आजही मीच भोगत आहे. आत्ताच माझा रक्त चाचणीचा रिपोर्ट माझ्या हाती आला. मी त्याच दूर्धर रोगाने ग्रसीत झालोय ज्या रोगामुळे माझ्या वडिलांचा अंत झाला. माझ दूर्भाग्य की आता ईच्छा असूनही मी तुझा आधार बनू शकत नाही. आज मला खंत वाटते की मी आज खऱ्याअर्थाने तुझा मुलगा होण्यास अपात्र ठरलो. यापुढे मी स्वत:ला जगण्यास लायक समजत नाही. मी तुझ्या आयुष्यातून कायमचा निघुन जात आहे. जमल तर मला माफ कर, माफ कर मला.
तुझा अभागी मुलगा
विवेक
तिच्या हातातील चिठ्ठी नकळत गळून गेली, व कितीतरी वर्षे त्याच्याबद्दल मनात साठवलेले कलुषित विचारही आज तिच्या डोळ्यांतून नकळत गळून गेले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथेचं बीज चांगलं आहे, थोडं फुलवलं असतं तर वाचायला अजून मजा आली असती.
त्या मुलाची 'ती' आई कुठे आहे गोष्टीत? आणि पतीला झालेला दुर्धर रोज 'दुसर्‍या स्त्री'ला आणि मुलाला झाला. पण पत्नीला नाही झाला याचं आश्चर्य वाटलं.

आपल्या अमुल्य प्रतिक्रियेबद्दल मन:पुर्वक धन्यवाद,
मी नक्की प्रयत्न करीन कथेला आणखी खुलवण्याचा...
त्याची खरी आई गेल्याचा उल्लेख कथेत केलेला आहे. आपली पत्नी अपत्य देऊ शकत नाही म्हणून पती परस्त्री कडे आकर्षिला जाऊ शकतो...
त्या बाई पासून त्याला झालेला रोग जरूरी नाही त्याच्या पत्नीसही व्हावा...

कथेचं बीज चांगलं आहे, थोडं फुलवलं असतं तर वाचायला अजून मजा आली असती.
>>>>>>>
+११११

आणि हवी तितकी फुलवू शकला असता... ही खरेच खूप छोटी झाली..

पण छान लिहिता.. पुलेशु.. Happy

मनोमयी, खरच एक चांगलं कथाबीज आहे. तुझ्याकडे ते अगदी समोर घडतय तसं फुलवण्याची ताकदही दिसतेय...
तुझ्या पुढील कथांची वाट बघते...

तिच्या पतीला आणि त्या परस्त्रीला एकच रोग झाला होता असं का समजतोय आपण? तसं कथेत कुठे सुचित आहे का? (माझ्या नजरेत्तून सुटतय बहुदा)

विषय उत्तम.......... वरच्या सर्वांशी सहमत.
अजून खुलविता आली असती. जसजसे अधिक लिखाण(आणि वाचन) होईल तसतसे तुमच्याच लक्षात येत जाईल. पु.ले.शु. Happy

मनोमयी:

छान कथा. वर सर्वांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच चांगल कथाबीज! फुलवायला खूप स्कोप आहे आणि तुम्ही सतत लिहा वाचा, मनन करा म्हणजे फुलवायची कला पण अवगत होइल, नव्हे तरबेज व्हाल. पु.ले.शु.!