लग्नाला यायचं हं!!!!!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

खाली लिहिलेला मजकूर कुठल्या कॅटॅगरीत घालावा हा प्रश्ण मला आधी पडला होता. (जुन्या मायबोलीत हे पत्रिका प्रकरण मी आधीच लिहून चुकलेय. तीथे हा ताप नव्हता!) पण नव्या मायबोलीनं खास सोय केलीय. ह्या खर्‍याखुर्‍या लग्नपत्रिकांनी आमची बरीच 'करमणुक' केली म्हणून विषय : करमणुक! Happy ह्या आमंत्रणपत्रिकांचा आम्ही घेतला तसाच आपण देखिल 'आस्वाद' घ्यावा ही विनंती!!

नमुनेदार पत्रिका.. (अर्थात "लग्नाला याय्चं हं!!)-भाग १

'हिरवाकंच शालु लेवून...
गंधधुंद करणार्‍या निशिगंधाचा हार घेऊन...
अंतरपाटापलीकडे असेल 'ती' उभी! !
तीचे थरथरणारे ओठ.. अबोल!
फडफडणार्‍या पापण्या...

वरच्या ओळींत 'अंतरपाट' हा शब्द आल्यामुळे ही थरथर-फरफर लग्नाच्या वेळाची असावी हा अंदाज बरोबर!
नवरदेव हौशी कवी असल्यानं लग्नात सगळं कसं काव्यात्मक, तरीही शब्दांपलीकडलं हवं (म्हणजे नेमकं काय?) असा त्याचा आग्रह होता.
"पत्रिका मीच लिहिलिय वहिनी! वाचून बघा!"
"छानच हं!" (जास्त बोलले तर मला खीक करून हसु येईल याची भिती वाटली.)
बरं आता प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशीची मजा! शालुचा हिरवा रंग हा सासुचा चॉइस असल्यामुळे नवरीनी (अर्थातच) लाल शालु निवडला होता! अंतरपाटापलीकडे उभी राहून ती नको तीतकी बडबडंत होती!
"ताई, माझा शालु मागुन जरा नीट कर! परकर नाही नं दिसंत?" वगैरे वगैरे...! कसली अबोल डोंबलाची!
पत्रिकेतल्या प्रमाणे फक्त अंतरपाट आणि निशिगंधाचा हार येव्हड्या दोनच गोष्टी बरोबर होत्या.
निशिगंध अज्जीबात 'गंध धुंद' वगैरे करणारा नसला तरी स्वयंपाकघराच्या दिशेनी येणारा सकाळच्या न्याहारीच्या इडल्यांच्या मिश्रणाचा अंबुस वास मात्र आम्हाला सुसह्य झाला होता!

***
लग्नाला याय्चं हं-भाग २

आता हा पत्रिकेचा दुसरा नमुना!

"बारा वर्षांपूर्वीचा १ फेब्रुवारीचा दिवस! शाळेच्या पहिल्या मजल्यावरून, दप्तरातून निसटलेली होम इकॉनॉमिक्सची माझी वही कुणी बरं झेलली असावी? शंतनूनी!!!" हे लाल शाईत छपलेलं होतं! (शंतनु हे नवरदेव).
"तीथेच माझी आणि 'उत्तरेची' पहिली नजरानजर झाली!" हे निळ्यात!
असली सटरफटर १०-१२ वाक्य आलटून पालटून लाल निळ्या शाईत लिहिली होती १२ वर्षांपासूनच्या प्रेमाच्या चाळ्यांचा आढावा घेतला होता.
'लग्नाजोगं वय झालंय! इतकी वर्ष भटकलेत! नशीब धरसोड केली नाही!एकदाच्या ह्या दोन कार्ट्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या की सुटलो!' असा विचार दोन्ही घरच्या शहाण्यासुरत्या मंडळींनी केला असावा. म्हणून लग्नाची तारीख, वेळ, स्थळ नीट लिहिलं होतं!
लग्नाच्या हॉलमधे, "आत्ता कळालं उतू, तुला बारावीला इतके प्रयत्न का लागले!" हे शेजारच्या काकुंनी तीच्या कानात कुजबुजायची काही गरज होती का?

***
लग्नाला याय्चं हं-भाग ३
ह्या पुढल्या पत्रिकेत वरमाय कवयित्री! पत्रिकेतला काही भाग येणेप्रमाणे..

सप्तपदीची सात पावलं
साताजन्मांच्या गाठी..
यायलाच हवं तुम्हाला
मंदार-अपर्णा साठी...
अपर्णा कन्या दातारांची
तीन भावंडात मोठी...
मंदारही घरात मोठा
आमची म्हातारपणची काठी...

असलं बरंच 'ठी-ठी' वाचल्यावर म्हणावसं वाटलं..'साठी-बुद्धी नाठी'
मंदारच्या बिचार्‍या वडलांना पत्रिका देताना संकोच होत असावा. आम्हाला हळूच म्हणाले,
"आम्ही निघाल्यावर वाचली तरी चालेल!"
लग्नात मंगलाष्टकं पण वरमायच्याच कृपेनी! त्यातही 'मंदार अमेरिकेत, न्यु यॉर्कला स्थाईक झालाय, अपर्णानी 'इंटिरिअर डिझाईनिंग'चा कोर्स केलाय हे सगळं कोंबलं होतं! पत्रिका आणि मंगलाष्टका हे काहीही म्हणा पण लग्नातले हायलाइट होते!

***
लग्नाला याय्चं हं-भाग ४
दूधवाल्या भय्याच्या लग्नाची पत्रिका आली. ..

"भेज रहे हैं प्रेमपत्रिका
प्रियवर तुम्हे बुलानेको..
हे मानसके राजहंस
तुम भूल न जाना आनेको!"

नो कमेंट्स!

विषय: 
प्रकार: 

एकदा एका तीन पानी पत्रिकेत नवर्‍यामुलीचा लहानपणीचा फोटो, मग ती लहान पणा पासून कशी गुणी वगगैरे होती हे वर्णन, त्यानंतर तरूण पणीचा फोटो होता. त्याच्या खाली 'लेक लाडकी या घरची' असे लिहिले होते. त्यानंतर आवाज मासिकातल्या खिडकी चित्रासारखी काहीतरी आयडिया केली होती. पान उघडले की मुलीचा विवाहितेच्या वेशातला फोटो .. त्याखाली लिहिले होते की 'होणार सून मी त्या घरची' .

यापेक्षा जास्त विनोदी पत्रिका तुम्ही पाहिली आहे का?

मुलीचा लग्नाआधीच मंगळसूत्र वगैरे घलून कसाकाय फोटो काढला असा प्रश्नही मला पडला होता.

Rofl
अरे हे कुठे होतं इतके दिवस!!!!

भेज रहे हैं प्रेमपत्रिका
प्रियवर तुम्हे बुलानेको.. >>>>>>>>> Lol हे म्हणजे विवाहाच्या आमंत्रणासोबत "वि बा सं" करताही आमंत्रण दिल्यासारखं आहे!

>> मी अमि, कायच्याकाय >>
माझ्या आधीच्या ऑफिसातल्या एका व्यक्तीला कोणीतरी ती पत्रिका देऊन गेले होते. त्या व्यक्तीने कौतुकाने 'बघ कशी पत्रिका छापलीय (म्हणजे बघ किती खर्च केलाय पत्रिकेवर Happy )' म्हणून मला दाखवली. मी पत्रिका पाहून कसेबसे हसू दाबले.

मस्त मस्त मस्त ..... जबरदस्त लिहिलंय. Rofl

आमच्याकडे कामाला असणार्‍या एका बाईच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका. निमंत्रितात एका बाजूला पुरुष आणि त्यांच्या समोर त्याच्यात्याच्या बायकोचं नाव अशी विभागणी. काही बाया गंभा हे बिरुद लावून हजर होत्या आणि त्यांचे जोडीदार चक्क कै. पदवीधारक असूनही निमंत्रण द्यायला जातीने हजर होते. असे डायरेक्ट 'तिकडून'च आमंत्रण आल्यामुळे घाबरून नाही का जाणार लोकं? Happy

रच्याकने : गावाकडे लग्नात आलेले आहेर तत्काळ उघडून माईकवरून अनाउन्सही करतात.

मी अमि, तु म्हणतेस तशी पत्रिका मी ही नुकतीच पाहिलेय. Proud

ओळखीतल्या एक वयस्क बाईंचा कुटुंबातील कोणत्याही प्रसंगाकरता महाकाव्य रचण्यात, त्यात सर्व संबंधितांची नावं आणि जमल्यास त्यांनी घेतलेले कष्ट वगैरे गुंफण्यात हातखंडा. शिवाय शेवटच्या ओळीत स्वत:चे नाव आडनावासकट अ‍ॅडजस्ट झालेच पाहिजे याकडे कटाक्ष. त्यांच्या पहिल्यावहिल्या नातीच्या लग्नात मंगलाष्टकांच्या मंगलशतका झाल्या होत्या. Happy

ह्म्म.. आणि कोपरगावच्या एका पत्रिकेत "भांड्याचा आहेर चालणार नाही" अशी (स्पष्ट आणि शुद्ध) सुचना होती Happy

नानबा, कोपरगावच्याच काय. हल्ली यु. एस. मध्ये काही भारतीयांच्या लग्न पत्रिकेत असतं " No Box Gifts" म्हणजे कॅश द्या. एका भारतीय बाईने आपल्या मुलीच्या बेबी शॉवरच्या आमंत्रणात लिहिलं होतं. " Please donate towards baby's education fund". अजून बेबी जन्मायची होती. पण कॅश द्या असा अर्थ.

भेज रहे हैं प्रेमपत्रिका
प्रियवर तुम्हे बुलानेको..

>>>>>>>>हे म्हणजे विवाहाच्या आमंत्रणासोबत "वि बा सं" करताही आमंत्रण दिल्यासारखं आहे!<<<<<<<<<

बास्सच....आता यापेक्षा जास्त काहीही वाचणे आणि हसणे मला आज तरी शक्य नाही....

मामी....<<< काही बाया गंभा हे बिरुद लावून हजर होत्या आणि त्यांचे जोडीदार चक्क कै. पदवीधारक असूनही निमंत्रण द्यायला जातीने हजर होते. असे डायरेक्ट 'तिकडून'च आमंत्रण आल्यामुळे घाबरून नाही का जाणार लोकं?>>> अत्यंत आवडलं! Happy
मृण्मयी.... मस्तच!

लेख आणि प्रतिसाद दोन्ही Lol
माझ्या भावाच्या ओळखीचे एक धनाढ्य उद्योगपती कुटूंब आहे त्यांच्याकडे लग्न निघाले,
पत्रिका द्यायला आले आणि पत्रिके ऐवजी एक सुशोभित कॅरीबॅग दिली. नंतर निवांत पहा म्हणाले.
भावाने उघडून पाहिले तर एक सिडी आणि पोर्टॅबल सिडी प्लेअर होता.
ती सिडी लावून पाहिली तर त्यामधे यांच्या सजवलेल्या बंगल्याचे शुटीन्ग ज्यांच्या मुलाचे / मुलीचे लग्न आहे ते आईवडिल बंगल्याच्या दारात हात जोडून उभे आणि लग्नाला अवश्य यायच अशी प्रार्थना करत आहेत, इ.
साखरपुड्याचे फोटो, इ. मालमसाला पण होता. आहेक्का आवाज कुणाचा ? Happy

भन्नाट !

लग्नात मंगलाष्टकं पण वरमायच्याच कृपेनी! त्यातही 'मंदार अमेरिकेत, न्यु यॉर्कला स्थाईक झालाय, अपर्णानी 'इंटिरिअर डिझाईनिंग'चा कोर्स केलाय हे सगळं कोंबलं होतं! >>>
आमच्या ओळखींच्यात केत्येक लग्नात, बारशांमध्ये मी अशा प्रकारची अति उत्साही सदस्यांनी केलेल्या मंगलाष्टका, पाळणे इ. ऐकले आहेत. त्यात जवळच्या सर्व नातेवाईकांची, भावंडांची नावे गुंफतात. व त्या सदस्यांचा स्वतःचा आवाजही बरा असेल तर स्वतःच माईकवर त्या मंगलाष्टका, पाळणे इ. गातानाही पाहिले / ऐकले आहे. पण हा प्रकार इतका काही हास्यास्पद वाटला नाही मला. Uhoh
समारंभाला आलेली सर्वच मंडळी जवळच्या ओळखींतली नसतात. मग नवर्‍या मुलीचे शिक्षण, नवर्‍या मुलाचा जॉब वै. जुजबी माहीती या प्रकारे निमंत्रितांना सांगणे हा ही एक उद्देश असू शकेल. Uhoh (उगीच मोठेपणा मिरविणे, बढा-चढाके फुशारक्या मारणे या उद्देशाने त्या मंगलाष्टका होत्या का? म्हणजे तसले उल्लेख पदोपदी त्यात होते का? की जेणे करून "मंगलाष्टका" हा विषय त्या लग्नाच्या निमंत्रितांमध्ये इतका चर्चेचा विषय ठरला?)

लेखा मध्ये क्र. २ च्या किश्श्यामध्ये त्या नवरोजींना इतके ओशाळवाणे का वाटावे? आपल्या मुलाचे अथवा मुलीचे लग्न हा कुठल्याही आई-वडीलांसाठी स्पेशल समारंभच असतो. त्याला आपापल्या पद्धतीने चारचांद लावण्याचा प्रयत्न सगळेच करतात. स्पेशल प्रसंगी उखाणा घ्यायची वेळ आल्यावर पण कित्येक जण स्वतः आपल्या स्पेशल व्यक्ती साठी रचलेला उखाणा घेतात. किंवा प्रिय व्यक्तीसाठीच्या भावना कविता वा तत्सम प्रकारे सार्वजनिक रित्या एखाद्या समारंभात व्यक्त करतात. मग भलेही ती व्यक्तीला कवितेतला ओ का ठो येत नसेल. कविता कशाशी खातात हे माहीत नसेल.

मागे एकदा ढकलपत्रामध्ये विनोदी लग्न-निमंत्रणपत्रिका आल्या होत्या. मला तर तो प्रकार अगदी क्रिएटिव्ह व्हाटला होता. नेहमीच्या टिपीकल निमंत्रणपत्रिकांपेक्षा वेगळे काहीतरी. किस्सा क्र. २ चा प्रकार मला तसा वाटला. थोडा बालिशपणा, मिस्किलपणा करायचा प्रयत्न वाटला.

अफलातून आहे हे

भेज रहे हैं प्रेमपत्रिका
प्रियवर तुम्हे बुलानेको..

>>>>>>>>हे म्हणजे विवाहाच्या आमंत्रणासोबत "वि बा सं" करताही आमंत्रण दिल्यासारखं आहे!<<<<<<<<<
Happy Happy

स्वरचितमंगलाष्ट्कं हा एक भारी प्रकार आहे...भटजींचा चेहरा बघण्यासारखा असतो अशा वेळेस

बर्‍याच काळापूर्वी भूमिगत झालेला हा बाफ वर काढून आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद मंडळी. (ज्यांच्यामुळे मला हा वर उगवल्याचं कळलं त्यांनाही धन्यवाद!)

ओशाळवाणं वाटलं तर चुकीचं आहे असं अजीबात वाटत नाही. बायकोनं लग्नपत्रिकेसाठी ठ ला ठ जुळवून केलेलं काव्य नसेल पसंत, तर काय माहिती आपल्याला? शेवटी तिच्या भावनांची कदर केलीच असावी, म्हणून तर कविता आली पत्रिकेत! त्याला तर विरोध केला नसावा, किंवा जुमानण्यात आला नसावा. Proud

अरे हे वाचलच नव्हत. भारी लेख आणि त्याहून भारी प्रतिसाद!!..
काही पत्रिकांमध्ये ते सप्तपदी, त्याचा अर्थ वगएरे निबंध असतो तेहि बोर वाटते...कुणाचे लग्न, कधि कुठे केव्हा...ईतके बास झाले ना...पण नाही...

Pages