रताळ्याचे "गोडुले"

Submitted by सुलेखा on 5 July, 2012 - 23:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ किलो रताळी.
३/४ [पाऊण] वाटी साखर..
३/४ वाटी खोबरा बूरा.[डेसिकेटेड कोकोनट]
पाउण वाटी मिल्क पावडर.
१ टेबलस्पून तूप
बदामाचे काप.
godule.JPG

क्रमवार पाककृती: 

रताळी धुवुन साधारण २ तास पाण्यात बुडवुन ठेवावी.
जाड किसणीने त्याचा कीस करावा.
१ टेबलस्पुन तूप मावेत पातळ करुन घ्यावे.त्यात हा कीस घालुन परतुन घ्यावा.
हाय पॉवर वर २ मिनिटे झाकुन मावे.त शिजवावा.
एकदा परतुन कीस शिजला नसल्यास पुन्हा १ मिनिट ठेवावा.
शिजलेला कीस ओलसर दिसला पाहिजे.
त्यात खोबरा बूरा व मिल्कपावडर मिसळुन पुन्हा २ व २ मिनिटे ठेवावा.
२ मिनिटानंतर झाकण उघडुन कीस परतायचा आहे.
आता त्यात साखर घालुन मिश्रण पुन्हा परतुन घ्या व २ व पुन्हा २ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा.
[इथे प्रत्येक २ मिनिटानंतर मिश्रण ढवळुन घ्यायचे आहे व पुन्हा झाकण ठेवुन २ मिनिटे शिजवायचे आहे .रताळ्याचा कीस किती प्रमाणात आहे व प्रत्येक मावे चे पॉवर याचा अंदाज घेवुन टायमर सेट करावा.] मिश्रण एकदा परतुन, मिश्रण छान शिजले आहे का ते पाहा त्या अंदाजाने आवश्यकता असेल तर पुन्हा २ मिनिटासाठी ठेवा.
मावेतुन लगेच बाहेर काढु नका.१० मिनिटानी तयार कीस बाहेर काढुन पुन्हा एकदा छान ढवळुन घ्या.वरुन बदामाचे काप पसरा.
रताळ्याचे "गोडुले" तयार आहे.
जेव्हा साखर घालुन २ मिनिटे मिश्रण शिजवले कि परतुन चव पहा.गोड कमी वाटले तर अजुन साखर घाला. रताळी गोड असली तर लिहील्याप्रमाणे साखर पुरते.तसेच मिल्क पावडर ही गोड असते. त्यामुळे बराचसा "अंदाजपंचे"कारभार आहे.
मावें नसेल तर नॉन-स्टीक कढईत/ कढईत मध्यम गॅसवर करावा.
आज खास "चतुर्थी"निमित्त "गोडुले"केले आहे.

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलेखा, तोंपासु, आता तुझ्याकडे चक्कर मारलीच पाहिजे. अंबा लाडू आणि गोडुले साठी.
तु पुण्याला येताना प्लिजच डब्यात घालून आण माझ्यासाठी. Happy

वत्सला, तिकडे मेलबर्नमधे भारतातल्यासारखी रताळी मिळतात का गं तुला? मला इथे केशरी स्वीट पोटॅटो मिळतात त्यांचा असा हलवा पिवळसर-केशरी होइल अस वाटतय... बघते करुन.

लाजो,त्या केशरी स्वीट पोटॅटोचे गोडुले केले.खुपच सुंदर रंग व चेव येते. त्या चा हि.मि.-दाणेकुट्-साखर्-मीठ घालुन तिखट कीस खुपच मस्त होतो.अजुन एक ,कीस खुप कमी वेळात शिजतो.

व्वा! सुलेखा ..मस्तच!
आणखी एक प्रकार रताळ्याचा.........
रताळी किसायची. स्वच्छ धुतली तर सालंही काढायला नको. आता हा कीस पाण्यात बुडवून २ मिनिटांनी चांगला पिळून ठवायचा. एका नॉन स्टिक पॅनला तुपाचा हात चांगला फिरवायचा. रताळ्याच्या कीसाचा गोळा तव्यावर ठेऊन थालिपीठ लावतो तसं उजव्या हाताने दाबायचा आणि त्याच वेळी डाव्या हाताने सारखा करत एक मीडियम जाड गोल तव्यावर थापायचा. मध्यभागी भोक पाडायचं. झाकण ठेवायचं. चुर्र आवाज आला की सावकाश ते उलटून पालथं करायचं. जरा अंदाज घेऊन पुन्हा उलथन्याने जरासंच दाबायचं, पुन्हा झाकण. १/२ मिनिटांनी उलथन्याने हळूच प्लेटमधे काढून त्यावर गरम असतानाच पिठी साखर भुरभुरवायची. आणि गरमगरमच खायचं म्हणजे ते क्रिस्पी असेल. अगदी थंड झाल्यावर ते मऊ पडते.
करून पहा मुलींनो(सुगरणींनो!)

लाजो, नाही मिळत भारतातल्यासारखी रताळी इथे. मी इथेलीच वापरते!

सुलेखा, आज मी जे रताळं आणलं आहे ते पपईच्या आकाराचं आहे! Sad
ते किसण्याचं कठीण काम करायचं मला कंटाळवाणं वाटयत!
काही सोप्पा उपाय आहे का?

उद्या एकजण येणारेत त्यांची एकादशी आहे. त्यांच्यासाठी करते आहे. पण एकादशीला खोबरे चालते का? (कुठल्यातरी उपासाला बहुदा प्रदोष चालत नाही असे अंधुकसे आठवते आहे!)

कृपया सल्ला द्या!

वत्सला.सगळ्याच उपासाला खोबरे / नारळ चालते. मोठी रताळी असली तर आधी कूकरमधे उकडुन घे.नंतर बाकीची कृति..कदाचित मी उशीरा प्रतिसाद देत आहे.

हो का?
सुलेखा, मी त्या भयंकर रताळ्याचे ८ भाग केले आणि ४ किसले.

खुप खुप आवडला हा प्रकार! बिन-उपासी लोकांनी पण आवडीने खाल्ला! रेसिपी विचारली! Happy

धन्यवाद सुलेखा!
rataLe godule.jpg

या वाटीतला रताळ्याचा हलवा फोटोपुरता उरवला होता. तो आज संपला!

Sulekha,
Khup chan receipe ahe. Pan
हे गोडुल् मावे ऐवजि gas var nahi karu shakat ka?

गोडुले हे नावच किती गोडुलं आहे, अगदी छोटं गुटगुटीत बाळ डोळ्यांसमोर आलं.

रेसिपी पण मस्त, तुमच्या रेसिपीस अगदी सोप्या आणि नावीन्यपूर्ण असतात. आंबा लाडू सारखेच हे गोडुलेही करुन बघणार.
साखर साधी वापरली आहे की पिठीसाखर?

साखर नेहमीची जाड वापरली आहे.मावे.ऐवजी गॅस वर करता येते.पूर्वी मावे कुठे होते.पॅन मध्ये करता येते.कढई त केले तर तळाला लागु देवू नये.त्यासाठी कढई खाली तवा ठेवावा