कॉलनीच्या गोष्टी ७ - दाम्याच्या बायकोचे लग्न

दाम्याच्या बायकोच्या लग्नाचं सांगायचं म्हणजे अगोदर दाम्याच्या लग्ना बद्दल सांगायला पाहिजे. त्याही अगोदर दाम्याबद्दल सांगायला पाहिजे. दाम्या म्हणजे रांगणेकरांचा मोठा मुलगा. कॉलनीच्या मेम्बरांमधे रांगणेकर वयाने बरेच मोठे होते. कुंदगोळांच्या बरोबरीचेच जवळपास. रांगणेकरांना तीन मुलगे आणि तीन मुली. मोठा दाम्या म्हणजे दामोदर, त्यानंतर गण्या म्हणजे गणेश. त्याच्या पाठीवर सरला, सुशीला, सुरेखा, सगळ्यात धाकटा विठ्ठल. दाम्याला सगळी कॉलनी दाम्या म्हणे. कॉलनीत रहायला आले तेंव्हाच तो पंचविशिच्या पुढचा होता. त्याला पाहता क्षणी समोरच्याला कळत असे ' मामला गडबड है'. कायम खाकी रंगाची अर्धी विजार आणि अंगात बंडी. गळ्यात जानव्याच्या सोबतीला अनेक धागे दोरे, कसले कसले ताईत . केस अगदी बारीक कापलेले. कानाला एक पेन्सिल. अन स्वारी सतत स्वतःशीच बडबडत असणार.

गावात कोणाच्या तरी श्राद्धाचं जेवण पितरांसाठी नदीत टाकायला गेले होते म्हणे सगळे रांगणेकर. त्यावेळी दाम्या अगदी लहान होता. सगळ्यांची नजर चुकवून तो कधी पाण्यात गेला ते कळलंच नव्हतं. तो कुठेही दिसत नाही म्हणून शोधाशोध झाल्यावर कोणीतरी नदीत शोधलं होतं आणि दाम्या मरता मरता वाचला होता. पण त्यावेळेस नाका तोंडात पाणि जाऊन तो गुदमरला होता आणि बराच काळ प्राणवायू न मिळाल्याने त्याच्या मेंदूवर परिणाम झाला होता म्हणत.

रांगणेकर त्याला अगदी लाडाने वागवत. बाकी सगळे मात्र त्याला कस्पटासमान वागवत. कॉलेजात कधी गेला नव्हताच. मट्रिक तरी पास झालाय की नाही असं वाटत असे. बाकीची भावंड एकदम हुशार होती. व्यवस्थित शिकून सवरून नोकरीला लागेल होते.गणेश मेकेनिकल इंजीनियर, पुण्याला टेल्को मधे होता. सरला आणि सुशीला कॉलेजात शिकवत एकटी केमिस्ट्री शिकवे आणि एकटी फिजिक्स. सुरेखा डेंटिस्ट होती. तिघींची लग्न झाली होती. चांगल्या घरी पडल्या होत्या तिघी. धाकटा विट्ठल पवईच्या आय आय टी मधनं शिकला होता अन लार्सन & टुब्रो मधे कामाला होता. विठठ्लची बायको ताजमहाल इन्टरकॉन्टिनेंटल मधे कामाला होती.

कॉलनीत रहायला आले तेंव्हा दाम्या सोडून रांगणेकरांची बाकी मुलं कॉलेजात शिकत होती. दाम्या घरीच असे. कॉलनीत मेम्बर्स नव्याने रहायला येत होते तसतसं एकेक घरातून सुतारकाम चालू असे. पेलमेट बनवणे,टेबल खुर्च्या, पलंग, सामान ठेवायचे लॉफ्ट असत त्यांना दरवाजे बसवणे, स्वैपाकघरात शेल्फं बनवणे अशी कामं सगळ्यांकडे चालत. बहुतांश मेम्बरांची कामं लक्ष्मणरावांकडे असत. कॉलनीत त्यांना पहिलं काम मिळालं होतं बोरकरांच्या कडे. त्यांच्या ओळखीने एका मागे एक कामं मिळत गेली आणि जवळजवळ वर्षभर लक्ष्मणराव आणि त्यांचा असिस्टंट कॉलनीत कामं करत होते. दाम्याचा जास्तीत जास्त वेळ त्यांची कामं निरखून बघण्यात जाई. इतरही कोण न क्कोण सुतार, पलम्बर, इलेट्रिशन, गाद्यांचा कापूस पिंजणारे, भांड्यांना कल्हई लावणारे येतच असत. त्या सर्वांचं काम अगदी लक्षपूर्वक बघत असे दाम्या. सुरुवातीला सगळे कारागीर बिचकत. पण हळू हळू सगळ्यांना त्याच्या बघण्याची सवय झाली. बघून बघू दाम्याला पण बर्‍याच गोष्टी कळू लागल्या होत्या. लक्ष्मण राव सुतार फर्निचर ला कमीत कमी चार वेळा पॉलिश लावतात. मोतीराम जेमतेम दोन वेळा लावतो. लक्ष्मण रावांची हत्यारं ते फार काळजी पूर्वक वापरतात. त्यांच्या करवती, रंधे वगैरे एकदम धारधार असतात हे सगळं त्याच्या लक्षात लगेच येत असे.

कॉलनीत कोणाच्याही घरी काही बारिक सारिक कामं असली की ती दाम्या करून लागला. कधी पैसे मिळत, कधी नवे कपडे. साठ्यांनी घड्याळ दिलं तेंव्हा कसला खुश झाला होता दाम्या. जवळ जवळ महिनाभर घड्याळात बघून वेळ सांगायला शिकला होता. त्याच्या भावंडांची शिक्षणं सम्पली, यथावकाश सगळ्यांची लग्नं झाली. दाम्या आपला कॉलनीतली फुटकळ कामं करत राहिला होता.

एकदा सगळे रांगणेकर गावी गेले तेंव्हा त्यांच्या दूरच्या नात्यातल्या मुलीचे वडील रांगणेकरांना भेटायला आले होते. त्यांची परिस्थिती बेतास बात होती. पदरी चार मुली- त्यात एकीचा पाय थोडा अधू होता. त्यांनी आधी रांगणेकर काकूंशी बोलून दाम्याचं अन आपल्या लेकीचं लग्न करावं असा प्रस्ताव मांडला. रांगणेकर काकांच्या मनात दाम्याचं लग्न करायचं नव्हतंच. स्वत:च्या पोटापाण्याची सोय त्याला जेमतेम करता येत असे. त्यात बायकोची , संसाराची जबाबदारी कशाला त्याच्या डोक्यावर असा साधा विचार होता त्यांचा. पण त्या गृहथांनी आधी दाम्याच्या आईचं मन वळवलं. आपल्या माघारी दाम्याला त्याचे भाऊ भावजया कितपत सांभाळतील याची दाम्याच्या आईला सतत काळजी असे. निदान त्याचं लग्न केलं तर त्याची बायको तरी त्याच्या कडे लक्ष देईल, त्याचा सांभाळ करेल या विचाराने त्या कबुल झाल्या. त्याच मुक्कामात घरच्या घरी दाम्याचं लग्न लागलं होतं.

लग्नानंतर गौरी मुम्बई ला आली तेंव्हा अगदी हरखून गेली होती.कॉलनीतलातला त्यांचा ब्लॉक तिला अतिशय आवडला होत. नळाला चोवीस तास पाणी, घरात सगळीकडे ट्यूबलाईट, पंखे, रंगीत टि व्ही, फ्रीज, सगळ्याच गोष्टींच अप्रूप वाटत असे तिला. एक मिक्सर मात्र तिला अजिबात आवडत नसे. सुरवातीला विट्ठलची बायको वैतागलेली असायची. "आधीच दीर वेडसर त्यात त्याची गांवढळ बायको. एक गोष्ट धडपणे करता येत नाही, बोलणं चालणं पण बेशिस्त" असं तिला वाटत असे. पण जसं जसं गौरी ने स्वैपाकघराचा ताबा घेतला तसतसं विठ्ठलची बायको जरा सुखावली. ताज पर्यंत जाण्या येण्यातच ती दमून जात असे. कामावरून येऊन सगळ्यांच्या जेवण खाण्याचं बघणं म्हणजे तिचा जीव मेटाकुटीला येत असे. गौरी हौसेने स्वैपाक करत असे. त्यांच्या लग्नाच्या वेळेपर्यंत रवा, गहू, तांदूळ, साखर वगैरे रेशनच्या लाईनीत उभं ने राहताही मिळत. घरात दूध दुभतं, भाजीपाला, फळं भरपूर येत असे. त्यामुळे ती अगदी खुशीने वेगवेगळे प्रकार करत असे. रांगणेकर काकूंबरोबर सिद्धीविनायकाला, महालक्ष्मीला जात असे. हळु हळू त्यांना कुठेही जायचं झालं तर गौरीच सोबत जात असे. एकटी जाऊन भाजीपाला,इतर फुटकळ खरेदी करून येत असे.

कॉलनीतल्या इतर बायकांशीही तिचं चांगलं जुळलं होतं. लहान मुलांशी तर तिची खास गट्टि होती. मुलांना वेगवेगळे खेळ शिकवणं, गाणी म्हणून दाखवणं, उखाणे घालणं असं करत तिची बरेच जणांची ओळख झाली. विठ्ठल आणि विनीताला एक मुलगी झाली. ती इशा वर्षा दीड वर्षाची असताना अमेय झाला. गौरी दोन्ही मुलांना अगदी लाडाकोडाने वाढवत होती. दाम्याची कॉलनीत आणि जवळपासच्या घरात छोटी मोठी कामं चालू असत. काहीच काम नसेल तर दाम्या घरकामात मदत करत असे. स्वतःला मूलबाळ नसल्याची खंत गौरी कधी दाखवत नसे. लग्नाच्या एक दोन वर्षात पाळणा हलण्याची चिन्हं दिसली नव्हती तेंव्हा रांगणेकर काकूंनी दोघांच्या तपासण्या करवून घेतल्या होत्या. दोघांमधे काहीच दोष नसल्याचं सांगितलं होतं डॉक्टरांनी. मग रांगणेकर काकूंनी बरेच नवस सायास केले, कुठून कुठून प्रसाद, मंतरलेला अंगारा वगैरे पण करून झाले. पण कशाचा परिणाम होत नव्हता. इशा अन अमेय मोठे होत होते, आई वडीलांपेक्षा काका काकूंच्या अंगा खांद्यावर जास्त वाढत होते.

दाम्याच्या लग्नाला सातेक वर्षं झाली असतील तेंव्हा जवळच्या एका घरी रंग काम करताना तो पडला. एका पायाचं हाड मोडलं, कंबरेला दुखापत झाली, पडल्यातिथे खाली काही हत्यारं वगैरे असावीत. ती लागून धनुर्वात झाला. महिनाभर हॉस्पिटल मधे काढून तिथेच गेला तो. शेवटच्या आठ दिवसात घरच्यांना कल्पना आली होती की दाम्या काही यातून वाचत नाही. पुण्याचा भाऊ येऊन भेटून जाई, बहीणी आलटून पालटून भेटायला येत. गौरी सतत उशा पायथ्याशी असे. पण त्याच्या आयुष्याची रेघ तुटलीच.

गौरीचे वडील भेटायला आले. त्यांनी काही बोलायच्या आतच रांगणेकरांनी ओळखलं की ते काही गौरीला माहेरी परत नेणार नाहीत. रांगणेकरांनी त्यांना सांगितलं "कन्यादानाच्या वेळीच ती आमची झाली. आता तिची जबाबदारी माझ्यावर. तुम्ही निश्चिंत असा."

नंतर रांगणेकर काकू म्हणाल्या होत्या" अहो, दाम्या जिवंत होता, थोडं फार कमावत होता तेंव्हासुध्दा विनीताला ह्या दोघांचा भार वाटत असे. आता त्यांचा वाढता संसार, दोन दोन मुलांची शिक्षणं व्हायचीत. आपल्या माघारी गौरी ला सांभाळणार आहेत का ते?"

"त्यांच्यावर गौरीचा भार पडणार नाही हे मी पाहतो ना. तू चिंता करून नकोस. तुला काय वाटतं विनीता अन विठ्ठल ला मी ओळखत नाही. सध्या त्यांना मुलांना सांभाळण्या साठी गौरीची गरज आहे, तो पर्यंत ते तिला काहीही म्हणणार नाहीत. पुढे मी काहीतरी मार्ग काढीनच. दाम्याला वचन दिलंय मी."

"कधी बोलला दाम्या येवढं तुमच्याशी? त्याला कळलं होतं की काय, आपण वाचत नाही म्हंणून?"

" गण्या आला होता नं भेटायला तेंव्हा बोलला. गण्यांन. त्याला काहीतरी मृत्युपत्र वगैरे विचारलं होतं. 'मला मृत्युपत्र करायचंय बाबा. माझ्या वाटणीला जे काही तुमच्या कडुन आलं असतं ते सर्व गौरीला मिळावं अशी व्यवस्था करायचीय' म्हणाला होता."

"काय बाई गण्याचा चोम्बडेपणा तरी? सगळी सून बाईची शिकवण असणार हो. ती दूर असते म्हणून या घरात वाटा मिळणार नाही असं वाटत असणार तिला."

"दाम्या ला वचन दिलंय मी की पोटच्या मुलीसारखं वागवीन. तिला अंतर देणार नाही."रांगणेकर काकांना पुढे बोलवेना.

रांगणेकर काकांनी किती सांगितलं तरी गौरीने सगळे दाग दागिने उतरवून ठेवले. कपाळावर एक बारकीशी काळी टिकली तेव्हढी लावत असे. बाकी रहाणी आधीच साधी होती. आता फक्त पांढर्‍या, सुती साड्या नेसू लागली. इशा, अमेयशी, अन कॉलनीतल्या मुलांशी बोले तेव्हढंच. बाकी इतर कोणाशीही कामाव्यतिरिक्त बोलेनाशी झाली. काळ पुढे जात राहिला. दाम्याच्या वर्षश्राद्धाला गौरीचे वडील मुम्बईला आले तेंव्हा मुलीकडे बघून तेही काळजीत पडले. आठ पंधरा दिवसांसाठी गौरीला माहेरी नेण्याबद्दल त्यांनी रांगणेकर काकांकडे चौकशी केली. ते तयार झाले, काकूही म्हणाल्या ' जाउ दे चार दिवस तेव्हढाच तिला आराम मिळेल." विनीताच्या कपाळावरची आठी फक्त रांगणेकर काकांनी टिपली.

गौरी निघाल्या दिवसापासून रांगणेकर रोज दिवसभर बाहेर जात होते. रांगणेकर काकूंनी खोदून खोदून विचारलं तरी काही सांगेनात. दिवसभर फिरून फिरुन थकून जात, तरी संध्याकाळी कॉलनी मधे कोणाकोणाच्या घरी जाऊन येत. शेवटी विनीताला रहावेना. तिची खात्री होती की इस्टेटिच्या वाटणीचं काढलं असणार रांगणेकरांनी. तिने विट्ठल शी बोलून पाहिलं. तो म्हणाला "बघ, बाबा आपल्याला घराबाहेर काही काढणार नाहीत.आणि समजा काढलंच तर आपल्याला काय झोपडपट्टीत नाही जायला लागणार. घेऊ कुठेतरी जागा. त्या बिचार्‍या गौरीवर तू का इतकी खार खाउन आहेस? माझ्या भावाची बायको आहे ती. तिला सोडून देऊन कसं चालेल. उद्या इशा अन अमेय ने एकमेकांशी असंच वागावं का?"

नाइलाजाने तात्पुरती गप्प बसली ती. पण तिने गण्याच्या कानावर ही बातमी घातलीच. पुढच्याच शनिवारी ' काही नाही,सहजच आलो' म्हणत आला गण्या मुम्बईला. त्याला पाहून रांगणेकर काका खूश झाले. "बरं झालं तू आलास. तुला कसा निरोप द्यावा म्हणजे तू लगेच येशील असा विचार करतच होतो मी कालपासून. आता शांतपणे जेवा सगळे. उद्या बोलू सविस्तर."

'उद्या' गौरी परत यायची होती. तिने यायच्या आत काय ते विचारून घेतलं पाहिजे असं गण्याला वाटत होतं. विट्ठला मात्र अगदी शांत होता. रांगणेकर काकू मात्र उद्या गौरी यायची म्हणून खुश होत्या. दहाच्या सुमारास गौरी अन तिचे बाबा आले. त्यांच्या पाठोपाठ सरला आणि सुशीला आपापल्या घरच्यांबरोबर आल्या. न कळवता इतकेजण आले म्हणून विनीता वैतागली. पण गौरीने लगेच स्वैपाकघराचा ताबा घेतला. थोड्या वेळात सुरेखा पण आली. काही विशेष कारण नसतानाही सगळी मुलं नातवंडं एकत्र आली म्हणून रांगणेकर काकू सुखावल्या. हसत खेळत जेवणं झाली. गौरीला गावची ख्याली खुशाली विचारून झाली.

"पानाचा डबा द्या इकडे आणि तुम्ही सगळे बसा. मला एक चांगली बातमी सांगायचीय." रांगणेकर काका म्हणाले. गण्या अन विठ्ठल दोघे चपापले. विनीता पण काळजीत पडली. गौरीचे बाबा आपण पण तिथेच बसावं की निघावं या संभ्रमात होते. पण त्यांना हाताला धरून बसवलं काकांनी.
"गेले पंधरा दिवस स्थळ शोधत होतो मी. अनेक ठिकाणि खेपा घातल्या, अनेक जणांशी बोललो. कॉलनीतल्यांशी, इतर परिचितांशी बोललो. वधू वर सूचक मंडळांशी बोललो. शेवटी काल एक चांगलं स्थळ मिळालं. महाडिकांच्या ओळखीचे आहेत. गिरगावात राहतं घर आहे. फोर्टात होलसेल कागद आणि स्टेशनरीचं दुकान आहे. एकुलता एक मुलगा आहे. सून बाळंतपणात गेली दोन वर्षांपूर्वी. आजी सांभाळते नातीला. मोठ्या प्रयत्न्नाने लग्नाला तयार झाला आहे. फोटो मी दाखवलेतच अन त्यांना पसंत पण आहे. एकदा प्रत्यक्ष भेटून मग लग्नाचा मुहूर्त काढावा असं त्यांचं म्हणणं आहे. आता पाच वाजता येतील केळकर मंडळी. थोडी घाई होत्येय खरी, पण गौरीचे बाबा उद्याच परत जातील. त्यांनी असतानाच सगळी बोलणी झाली तर बरं. "

गौरीच्या बाबांचे डोळे इतके भरून आले, त्यांना काही बोलवेना. गौरी पण एकदम गप्प होती. विठ्ठल अन गण्या ला सुद्धा काय बोलावं सुचेना.

"केळकरांच्या काही अपेक्षा नाहीत. अगदी थोडक्यात, साधेपणी लग्न करायचंय त्यांना. तिचे जे काही दाग दागिने आहेत ते सर्व देऊच. शिवाय माझ्या तिन्ही मुलींना लग्नात दिलं तेव्हढं सोनं मी देईन. लग्नाचा खर्च अर्धा अर्धा वाटून घ्यायचा आहे. म्हणजे आम्ही आन केळकर हो. गौरीचे बाबा, तुम्ही नाही. तुम्ही अन आई अक्षता टाकायला या आमच्या लेकी वरती."

मग केळकरांना गौरी आवडलीच, लगेच महिन्याभरात लग्न झालं, कॉलनीतल्या महिलामंडळाने खपून रुखवताची तयारी केली होती. दाम्याच्या बायकोच्या पाठवणीच्या वेळी इशा अन अमेय जास्त रडले की गौरीचे आईबाबा की दाम्याचे आई बाबा हे सांगणं कठीण आहे.


संपली एकदाची ही गोष्ट.



शोनु शेवट वाचतांना अगदि डोल्यात पाणि आल, असेहि सासरे असतात म्हण्जे?