फ्रुटदोसा आणि खमंग रोस्टी

Submitted by चिन्नु on 10 September, 2008 - 14:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फ्रुटदोसा साठी:
लहान आकारात कापलेली फळे, वेलची पावडर, बदाम-पिस्ते-इतर ड्रायफ्रुट्सचा कूट., फ्रुटजॅम.
उरलेले दोश्याचे पीठ (असेल तर उत्तम) किंवा थोडासा रवा+थोडा मैदा+तांदळाचे पीठ आणि भिजवायला ताक व पाणी
चवीपुरते मीठ., तेल

रोस्टीसाठी:
कुठल्याही प्रकारच्या शेवया, गाजर, टमाटे, कांदा, बटाटा ई. भाज्या. चिरून उपम्यासाठी, गाजराचा कीस/कोशिंबीर.
फोडणीला: तेल/तूप, उडदाची डाळ, चणाडाळ, आवडत असल्यास लाल मिरच्या, मीठ, थोडेसे आले, इतर फोडणीचे साहित्यः जीरे, मोहरी, हिंग.
शॅलोफ्राय करायला तेल/तूप.

क्रमवार पाककृती: 

फ्रुटदोसा:

दोश्याचे पीठ असेल तर तेलावर छोटे अगर मध्यम आकाराचे दोसे घालणे.
हे पीठ नसल्यास थोडा रवा आणि मैदा आणि तांदळाचे पीठ ताकात भिजविणे. (प्रमाण ऐच्छीक. मी १ वाटी तांदळाच्या पीठाला अर्धी मूठ रवा आणि मैदा घालते. चिमुटभर मीठ घालणे. करायच्या अर्धा तास तरी हे पीठ भिजले पाहीजे. तव्यावर तेल पसरून मध्यम जाळावर दोसे/घावन घालणे.
सर्व फळे लहान आकारात कापून घेणे. त्यात वेलचीपूड आणि ड्रायफ्रुट्सची पूड घालणे. फळे गोड नसल्यास साखर किंवा १/२ चमचे फ्रुट्जॅम घालणे.
दोसे किंवा घावनावर हे फळांचे मिश्रण घालून रोल करणे. गरम गरम वाढा.

रोस्टी:
शेवयांना सुचनेप्रमाणे शिजवून घ्या.
कढईत तेल/तूप घालून १/२ चमचा चणाडाळ, उडदाची डाळ, सुक्या मिरच्या, जीरे, मोहरी, कडीपत्ता घालून खमंग फोडणी करा. चिरलेल्या भाज्या, किसून आले आणि चवीपुरते मीठ घाला. अश्या प्रकारे शेवयांचा उपमा करून घ्या.

तव्यावर तेल/तूप पसरा. तेल थोडे गरम झाले की लहान दोश्यासारखे शेवयांचा उपमा पसरा. ह्यात तुमच्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव आहे. आवडत्या आकाराचे रोस्टी घाला. खालची बाजु खमंग झाली की लगेच काढा. उपमा आधीच शिजल्यामुळे फार वेळ रोस्ट करू नये. खालून लागायची शक्यता असते. ताटात रोस्टी काढून त्यावर गाजराचा कीस, कोशींबीर किंवा केचपने डोळे/नाक काढून मुलांना द्या.
वरील दोन्ही प्रकार डब्यात द्यायला उत्तम.

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना भरपूर
अधिक टिपा: 

१. कुठलीही Seasonal fruits वापरता येतील. जर सकाळी उशीर होत असेल तर फळे आदल्या रात्री कापून मिश्रण तयार ठेवता येइल.
२. Dryfruits बेताचे तुकडे करूनही आयत्या वेळी मिश्रणात घालता येतील. पण काही मुलांना dryfruits आवडत नाही. अश्या वेळी पूड करून घातल्यास गंडविता येते.
३. शेवयांच्या उरलेल्या उपमा रोस्टीने सत्कारणी लावता येतो. जर सकाळी घाई होत असल्यास हा उपमा आधी करून ठेवता येतो. काही मुलं गिळगिळीत उपमा खात नाही. अशी मुलं रोस्टी आवडीने खातात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्नु,
तुम्ही ही पाककृती स्पर्धेसाठी प्रवेशिका आधी टाकुन मग मायबोली गणेशोत्सव गृपचे सदस्यत्व घेतले का? कारण ही प्रवेशिका स्पर्धेत दिसत नाहीये. तुम्ही ती संपादित करुन परत एकदा टाकु शकाल का स्पर्धेत?

मायबोली गणेशोत्सव २००८

संयोजक, बदल केलाय. आता दिसत आहे का गृपमध्ये?

चिन्नु,
तुला या पेजवर http://www.maayboli.com/node/3280/contests 'पाककला स्पर्धेतल्या प्रवेशिका पहा' या लिंकवर तू टाकलेले पोस्ट दिसत असेल तर याचा अर्थ प्रवेशिका बरोबर टाकली गेलीये.

दिसली रे दिसली!
धन्यवाद रुनि Happy