सिनेमा सिनेमा- पुन्हा एकदा

Submitted by शर्मिला फडके on 2 May, 2012 - 00:47

भारतीय सिनेमा शंभर वर्षांचा झाला. आजवर या सिनेमामुळे मनाला असीम आनंद मिळाला. सिनेमांचं ऋण मनावर सुखाचं ओझं ठेवून आहे, ते अंशतःही उतरवण्याची इच्छा नाही मात्र या निमित्ताने आवडत्या सिनेमांवर लेख लिहून निदान कृतज्ञता तरी व्यक्त करणे मस्ट आहे.

मला सिनेमा बघायला आवडतो, त्यावर लिहायला, इतरांनी लिहिलेलं वाचायला आवडतं, जो सिनेमा पाहिलेला नाही त्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं, जे सिनेमे आवडले नाहीत, त्यांच्यावरही बोलायला आवडतं, ते का आवडले नाहीत त्याबद्दल विचार करायला आवडतं. थोडक्यात सांगायचं तर मला सिनेमा कसाही आवडतोच.

काही सिनेमे बुद्धीने बघायचे, काही नजरेने, काही मनाने. काही उगीचच.
काही सिनेमे कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही, काही सिनेमे नक्की का आवडले हे समजत नाही, समजावूनही देता येत नाही.

प्रत्येकाचा सिनेमा वेगळा, प्रत्येकाकरता सिनेमा वेगळा. एकच सिनेमा एकाला आवडतो, एकाला नाही. आपल्याला सिनेमा का आवडला हे कोणी कोणाला पटवून द्यायला जाऊ नये. दुस-याने सांगून सिनेमा समजत नाही, दुसर्‍याला आवडला म्हणून तिसर्‍याला आवडेलच असं नाही.

सिनेमाला जितका जबरदस्त नॉस्टेलजिया चिकटून असतो तितका इतर कोणत्याच गोष्टीला नाही. सिनेमाचा नॉस्टेलजिया म्हणजे खरं तर तो सिनेमा ज्या दिवसांमधे बघीतला, ज्यांच्यासोबत बघीतला त्यांचा नॉस्टेल्जिया असतो. सिनेमाला आजूबाजूच्या जगाचे संदर्भ चिकटून असतात आणि आवडत्या सिनेमांच्या तुकड्यांसोबतच ते मनात येतात.

सिनेमा आठवतात आणि आवडतात तेव्हा अनेकदा त्यातले तुकडे तुकडेच आठवतात. आवडत्या सिनेमांवर बोलताना किंवा लिहिताना त्यांचं मग एकसंध कोलाज मनात तयार होतं. सिनेमा पॅराडिसोमधल्या त्या शेवटच्या दृश्याप्रमाणे ते विलोभनीय असतं.

सिनेमांमधल्या प्रत्येक आवडत्या गोष्टींचं एक स्वतंत्र युग असतं. एखादं युग दिलिपकुमारचं, एखादं अमिताभचं, कधी ते बिमलदांचं असतं, कधी व्ही.शांतारामांचं.
प्रत्येकाचं वैयक्तिकही एक युग असतं. त्या त्या वयात आपण त्यातून प्रवास करतो.
माझ्याबाबतीत कधी एक युग कृष्ण-धवल सिनेमांचे, इस्टमन कलरचे, प्यासा-कागझ के फूलचे, दिलिप-राज-देव-शम्मीचे, एसजे-खय्याम, रवी, मदनमोहन आणि असंख्य आवाजांचे. दिग्दर्शकांचेही एक स्वतंत्र युग. गुरुदत्त पासून ऋषिकेश मुखर्जीं, बासू चटर्जींचे, बासू भट्टाचार्यांच्या अमर-मानसी ट्रिलॉजीचे, गुलझारचे, सत्यजित रेंच्या चारुलता, पाथेरपांचालीचे..
सिनेमांचे ऋतू वेगळे आणि प्रत्येकाचे त्यातल्या आठवणींचे तुकडेही वेगळे. कुणाच्या कोलाजमधे मधुबाला असते कुणाच्या वहिदा, कधी देवचा स्टायलिश रोमान्स मनात उरतो कधी शर्मिला टागोरच्या खळ्या, स्मिताच्या नजरेचे, अमोल पालेकरच्या साधेपणाचे, राजेश खन्नाच्या हळव्या लुक्सचे काही तुकडे असतात. अमिताभच्या मैं और मेरी तनहाईचे, लालजर्द गालिच्यावर नाचणार्‍या पाकिझाचे, तारोंका जाल मेरे दिल निसार पुछो ना हाल मेरे दिल का.. म्हणणा-या नुतनच्या सावळ्या, प्रसन्न हास्याचे असतात, साधनाच्या विलभनीय साध्या सौंदर्याचे असतात.. तेरा मेरा प्यार अमर, फ़िर क्युं मुझको लगता है डर.. चंद्र आकाशात असतो, दुधाळ चंदेरी प्रकाश तिच्या अंगाखांद्यावरुन निथळत असतो.. कधी त्यात आख्ख्या मोगलेआझमही असतो. त्याचे तुकडे करणंच अशक्य.

ब्लॅक ऍन्ड व्हाईट सिनेमांमधे काहीतरी अनोखी जादू होती.
माझ्या मनातल्या कोलाजवर जास्तीत जास्त तुकडे ब्लॅक ऍन्ड व्हाईट हिंदी सिनेमाचे आहेत, मधाळ आणि मॅजिकल तुकडे.. काळजात रुतून बसलेले, अनाडीतली वो चांद खिला.. मधे चंद्राच्या प्रकाशात नहाणारी नुतन, आणि जाने क्या तुने कही.. म्हणत मान वेळावून मागे पहाणारी वहिदा पहावी तर कृष्णधवलच.
कोलाजमधे ’हम नशे में है संभालो हमे तुम.. असा आसमानावर तरंगणारा लताचा आवाजही आहे आणि त्यासोबतच्या लाखो चमकत्या चांदण्याही आहेत.

पहिला आठवणीतला थिएटरमधे बघितलेला सिनेमा शोले. धुवांधार पाऊस होता आणि मी, माझी बहिण आणि आई थिएटरवर आधी जाऊन उभे होतो, छत्रीतही भिजवणारा पाऊस होता तो, बाबा आणि माझा धाकटा भाऊ, तो तर जेमतेम चार-पाच वर्षांचा, ते नंतर येणार होते. आम्ही आपली वाट बघतोय, भिजतोय, बाबा काही येईनात, सिनेमा सुरु झाला, खच्चून भरलेलं थिएटरचं आवार सुनसान झालं. आम्ही तिघी आपल्या भिजतोच आहोत. आणि मग अर्ध्या तासांनी बाबा आले. भाऊ त्यांच्या खांद्यावर झोपून गेलेला. त्यांना वेगळ्याच थिएटरमधे सिनेमा आहे असं वाटलेलं. ठाण्याच्या पूर्व भागातल्या आनंदमधे आम्ही उभ्या आणि बाबा पश्चिमेच्या वंदना, आराधना सगळीकडे फ़िरुन आलेले. त्यानंतर आईबाबांचं कडाक्याचं भांडण झालं होतं का आठवत नाही, पण त्या दिवशी अर्ध्यातून बघितलेल्या त्या शोलेची एक एक दृश्य मनावर कोरुन आहेत. त्यानंतर पुन्हा आम्ही मिनर्व्हाला ७० एमएमच्या भव्य पडद्यावर शोले पाहीला. मग असंख्य वेळा पाहीला.

सिनेमा आपण नक्की का बघतो हा विचार माझ्या डोक्यात जाणीवपूर्वक कधी आलेला आठवत नाही, तसा तो कोणी करत असेल असंही वाटत नाही. हिंदी सिनेमा इतक्या आपल्या डीएनए मधेच फ़िट बसवलेला आहे.
भानू अथैयांच्या स्टुडिओत माझं भान हरपून जातं. कारण तिथे आजूबाजूला सगळीकडे माझ्या आवडत्या सिनेमांच्या खुणा पसरुन असतात. साहिब बिबि और गुलाममधल्या मीना कुमारीची छोट्या बहुच्या रेशमी साडीतली, अनोख्या बंगाली घडणीच्या दागिन्यांनी सजलेली, भांगात सिंदूर भरलेलं भारवून टाकणारी तस्बिर असते, वक्त, पाकिझा, संगम या सिनेमांमधल्या पोषाखांच्या डिझाईन्सने भरलेली स्केचबुक्स असतात आणि भानूकडे तर हजारो आठवणींचा अनमोल खजिनाच असतो. मला पाऊलही उचलवत नाही तिथून. भानू शम्मी कपूरच्या देखणेपणाबद्दल, चार्मबद्दल बोलत असते, वहिदा रेहमानच्या ग्रेसफ़ुल हालचालींबद्दल बोलत असते आणि मी फ़क्त ऐकत असते.
तेव्हा मला हिंदी सिनेमा किती आवडतो हे पुन्हा एकदा समजतं.

हिंदी सिनेमा पिढ्यांमधला पूल आहे.
आई तिने पाहिलेल्या सिनेमांच्या, देव आनंदच्या, राजकपूरच्या आवाराच्या गोष्टी सांगते, मी शाळेत असताना आईने आणि मी एकमेकींसोबत बघितलेल्या अमिताभ बच्चनच्या, ऋषिकेश मुखर्जींच्या आणि अमोल पालेकरच्या सिनेमांच्या कहाण्या आम्ही मिळून आता माझ्या मुलींना सांगतो तेव्हा त्यात सिनेमाची कथानकं नसतात, पण तरीही त्या सिनेमांच्याच कहाण्या असतात. माझ्या आईला सिनेमांचं जबरदस्त वेड. आम्ही बहुतेकवेळा दर शुक्रवारी रिलिज होणार्‍या सिनेमांपैकी निदान एक तरी पहायचोच. ठाण्याला थिएटर्स खूप. आणि त्यातलं मल्हार तर घराच्या अगदीच जवळ.
माझ्या मुलींना माहीत असतं सिनेमातलं अमुक एक दृश्य आलं, गाण्यांमधला अमुक एक शब्द, कडवं आलं की आई असेल तिथून येणार आणि स्क्रिनवर नजर खिळवणार, त्या मग त्याकरताच हाका मारुन मारुन बोलावतात.

दादरच्या शारदामधे काश्मिर की कलीतलं एकही गाणं ऐकू आलं नव्हतं. म्युझिक सुरु झालं रे झालं की पब्लिक उभं राहून आरडाओरडा करत टाळ्या पिटत गाणी म्हणायला लागायची. तो माहोल अनुभवताना अंगावर काटा उमटला.
राज कपूर 'तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी..' गाताना समोर बसलेल्या टवटवीत चेहर्‍याच्या नुतनकडे बघत मिश्किलपणे डोळ्यांतून हसत एक भुवई उंचावत 'मै जो मरता हूं तो क्या, और भी मरते होंगे..' म्हणतो तेव्हा कलिजा खलास होतो.
राजेश खन्ना 'वो शाम मस्तानी मदहोश किये जाय.. ' गात नायिकेभोवती रुंजी घालत फिरतो तेव्हा हृदय (माझंच) आनंदाने भरुन जातं.
अमिताभ बच्चन जखमी नजरेने पहात कोणतेही संवाद म्हणतो तेव्हा काळजाच्या आत हलतं.

माझा रोमान्स हिंदी सिनेमातल्या या सगळ्या चार्मिंग, हॅन्डसम नायकांसोबत सुरु झाला तो आजतागायत.
हिंदी सिनेमाच तुम्हाला ही मुभा देत असतो. आपला हिरो शोधण्याची.

जेम्स बॉन्डचे सिनेमे बघण्याचं, शोधून शोधून मॅटिनीला लागलेले सिनेमे बघण्याचं कॉलेजातलं वेड आठवतं तेव्हा खरे आठवतात त्यावेळचे धमाल, उनाडक्यांचे दिवस, पावसातल्या भटकंतीचे, बिनाकारणाने खिदळत रहाण्याचे, स्वत:ला ग्रेट समजत माना उंचावत रस्त्यातून बघितलेल्या सिनेमावर ’अभ्यासू’ चर्चा करत चालण्याचे दिवस.
आणि मग होणार्‍या नवर्‍यासोबत इरॉस, एक्सलसियरमधे बघितलेले, आता नावही आठवत नसलेले सिनेमे. अनेकदा त्याच्या घरी कोणी नाही याची संधी साधून त्याच्याकडच्या व्हिसिडी प्लेयरवर बघितलेले सिनेमे.
नवर्‍याच्या आणि माझ्या त्यानंतर कधी सिनेमांच्या आवडी जुळल्या नाहीत, पण काही फ़रक पडत नाही आम्हाला, सिनेमांची आवड कॉमन आहे इतकंच पुरतं.
हिंदी सिनेमा नॉस्टेल्जिया जागवतो.

माझा आवडता हिंदी सिनेमा अशा तुकड्यांमधे आहे. कधी तो गाण्याच्या टेकिंगमधे असतो, कधी दिग्दर्शनात, कधी सेट-डिझाइनिंगमधे, कधी कॉस्च्युम डिझाइनिंगमधे. गीतकारांच्या शब्दांमधल्या भावनेत, संगीतकारांच्या स्वरांत आणि गायक गायिकांच्या आवाजाच्या समुद्रात माझे असंख्य आवडते सिनेमे डुबक्या मारतात.

मेरा सायामधल सुनिल दत्त कातर, हळव्या आठवणींच्या जाळ्यात गुरफ़टून असतो, त्याला सारखी सारखी साधनाची आठवण येते, तशी मला आत्ता सिनेमातल्या आवडत्या दृश्यांची येतेय. कारण मला हिंदी सिनेमा आवडतो.

कोणते सिनेमे बघायला जास्त आवडतात या प्रश्नाचं उत्तर माझ्याबाबतीत सोपं आहे. मानवी नात्यांची गुंतागुंत, स्त्री-पुरुष नात्यातले आकर्षणाचे, प्रेमाचे, दुराव्याचे, तीरस्काराचे, पुन्हा एकमेकांकडे परतून येण्याचे, प्रगल्भतेचे पैलू ज्या सिनेमांमधून दिसतात ते सिनेमे मला बघायला जास्त आवडतात. माणसांमधलं अमूर्त नातं पडद्यावर खुलत जाताना बघायला मला आवडतं.
मात्र सिनेमामधे परिसरही दिसायला हवा. त्यात प्रवास हवा. नात्यांचा आणि माणसांचा.

सिनेमा म्हणजे नटनट्या नाही, कथानकही नाही. सिनेमा या सगळ्याच्या पलीकडचा असतो.
जागतिक सिनेमा बघताना हे पलिकडचं दिसायला आणि समजायला लागलं.

सिनेमा जास्तीतजास्त पाहीला जातो कॉलेजच्या वर्षांमधे. मी सुद्धा सर्वात जास्त संख्येने सिनेमे ८०-९० याच दशकात पाहीले. पण का कुणास ठाऊक नंतरची बरीच वर्षं ८० ते ९० हे दशक सिनेमांच्या दृष्टीने सर्वात टुकार दशक असं अनेकदा वाटायचं. त्यामागचं कारण कदाचित ’गाणी’ हे असण्याची शक्यता आहे. आवडती, वारंवार ऐकायला येणारी, गाजलेली गाणी सगळी ६० ते ७० दशकातली. गाण्यांच्या बाबतीत म्हणजे जर ६० ते ७० हे दशक सुवर्णाचे मानले तर ८० ते ९० हे दशक तद्दन प्लास्टीकचे.

पण खरं तर हिंदी सिनेमांमधला ख-या अर्थाने कटेम्पररी सिनेमा ८० ते ९० मधलाच. अंकुर, निशांतने सत्तरच्या दशकात सुरु केलेली नव्या, समांतर सिनेमाची चळवळ हिंदी सिनेमाच्या पारंपारिक प्रेक्षकांपासून जरा दूरच राहीली होती. मात्र या दशकातल्या कटेम्पररी, नव्या विषयाच्या सिनेमांच्य बाबतीत असं झालं नाही. कलात्मक आणि व्यावसायिकतेचं उत्तम भान या दशकातल्या सिनेमांना होतं. प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला.
कथा, चष्मेबद्दूर, अर्थ, सिलसिला, अर्धसत्य, मासूम, उत्सव, सारांश, उमराव जान, अंकुश, पुष्पक, मिर्चमसाला, कयामत से कयामत तक, तेजाब, मिस्टर इंडिया, मैने प्यार किया.. असे अनेक तर्‍हांचे सिनेमे या दशकात येऊन गेले आणि त्याचा ठसा अजूनही आहे.

प्रत्येकाचा सिनेमा वेगळा. प्रत्येकाची सिनेमा बघण्याची कारणे वेगळी. प्रत्येकाकरता सिनेमाचा अर्थही वेगळा.

सिनेमांवर अभ्यासूपणाने, बारिकसारीक संदर्भांसहीत, तांत्रीक गोष्टी, दिग्दर्शन, अभिनय सर्वांवरच लिहिणारे, बोलणारे, चर्चा करणारे, चर्चासत्र भरवणारे असंख्य जण आजूबाजूला असतात.

सिनेमावर कोणी जुन्या आठवणी उगाळत, नव्या सिनेमांवर कडवटपणे लिहितात, कोणी एखादा दिग्दर्शक पकडून त्याच्या सिनेमांची चिरफ़ाड करत, स्क्रिप्ट उतरवून काढल्यासारखे लेख लिहितात, कोणी गाणी एके गाणी करत त्यावरच लिहितात, कोणी निरस तांत्रिक बाबींवरच चर्चा करतात.. कोणी अती भावूकपणे डोळ्यातून टिपं गाळणारे लेख लिहितात, कोणी उथळ लिहितात, कोणी भरभरुन लिहितात.. मी सगळंच वाचते.
कारण मला हिंदी सिनेमा आवडतो.

दोन्ही हातांनी हिंदी सिनेमाच्या डिव्हिडीज उलट्या पालट्या करताना मनाला विलक्षण आनंद होत असतो.. मनातलं कोलाज झगमगून उठत असतं.

त्या त्या दिवसांतले मित्र-मैत्रिणी, जातात, रहातात, अधून मधून भेटतात किंवा कायमचेही दुरावतात. पण सिनेमा कायमच सोबत रहातो.

आठवणींमधे रुतून बसलेल्या, कायम सोबत असणार्‍या, आवडत्या सिनेमांबद्दल इतरांना सांगूनच सिनेमाचं देणं फ़ेडता येऊ शकेल कदाचित.

वाचत रहा..

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅडमिन/मॉडरेटर

कृपया माझ्या आधीच्या 'सिनेमा आणि संस्कृती' लेखमालेमधे आपण हा आणि याच्या पुढे येतील ते लेख गुंफाल का?
तसंच हा चुकून गप्पांचा तर धागा झालेला नाही ना हेही पहाल का? मागे एकदा माझ्या हातून तसं झालं होतं म्हणून धास्ती.

धन्यवाद.

हे अशक्य जबरी आहे.. आणि ह्यातलं प्रत्येक वाक्य मला जवळचं आहे असं मला वाटतंय.... खलास !

मी कोणत्याही भाषेतला, कितीही ड्युरेशनचा, कोणताही सिनेमा, कितीही वेळा पाहू शकते.. आवडीनं ... कारण तो सिनेमा असतो म्हणून !

जुन्या मायबोलीवर मी "रार की नजरसे" म्हणून लिहायचे सिनेमाबद्दल त्याची आठवण झाली... Happy

वा, लेख आवडला.
माझ्या बाबतीत सिनेमा डोळसपणे बघायचे युग आत्ता आत्ता सुरु झालेय. हिंदी सिनेमा
प्राणप्रिय आहेच, पण सध्या जगभरात जे प्रयोग होताहेत, ते तितक्या दमदारपणे
आपल्याकडे होताना दिसत नाहीत.
परदेशी चित्रपट बघताना, ते चेहरे, ती संस्कृती बघताना, जरा विचार करावा लागतो.
भारतीय चित्रपटांच्या बाबतीत ते तितकेसे अनोळखी वाटणार नाही, पण तसे प्रयोग
मात्र व्हायला हवेत असे वाटते. केवळ मनोरंजन, आणि तेसुद्धा त्यांच्या कल्पनेप्रमाणे,
हे आता थांबावे असे वाटते.

मस्तच !! Happy

माझ्या मुलींना माहीत असतं सिनेमातलं अमुक एक दृश्य आलं, गाण्यांमधला अमुक एक शब्द, कडवं आलं की आई असेल तिथून येणार आणि स्क्रिनवर नजर खिळवणार, त्या मग त्याकरताच हाका मारुन मारुन बोलावतात.

>>> हे माझ्याही घरात होतं. Happy

शिवाय लागेल त्या जुन्या सिनेमांमधली सगळी गाणी तुला कशी पाठ असतात - असा आदित्यला नेहमी प्रश्न पडलेला असतो. Lol

एखादा जुना सिनेमा 'कसा आहे?' या त्याच्या प्रश्नाला अनेकदा माझं उत्तर असतं - 'मस्त आहे, गाणी भारी आहेत.' तर, त्याला हा क्रायटेरियाच पटत नाही Proud

जबरी! एकदम मस्त लिहीले आहे! "पॅशन" दिसते शब्दा शब्दात अगदी!

रार - त्या लिन्क्स दे. आम्हाला शोधायला लावू नको Happy

८० ते ९० हे दशक सिनेमांच्या दृष्टीने सर्वात टुकार दशक>>> याच्याशी सहमत. जे लोक तेव्हा कॉलेज मधे होते, त्यांना कल्पना असेल की त्या वर्षांत कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींनी एकत्र जावे असे चित्रपट फार आले नाहीत. गाण्यांचा दर्जाही खूप घसरला होता. रफी गेला, किशोरही खूप कमी गाणी करत होता. ७० च्या दशकतील दिग्गज एलपी, कल्याणजी-आनंदजी, आरडी यांची प्रतिभा ओसरली होती, नवीन संगीतकार, नवीन गायक यांना स्वतःचा सूर सापडला नव्हता. त्यामुळे फारशी मजा नव्हती. ८२-८३ पर्यंत अमिताभ तरीही जोरात होता, पण नंतर त्याची चित्रपट निवड अतिशय चुकली, राजकारण आले, वाढच्या वयामुळे त्याचा आधीचा "लुक" बदलला. त्याच्याबरोबरचे इतर स्टार्सही म्हातारे दिसू लागले. अनिल कपूर, जॅकी, सनी वगैरे नवीन लोक आले, पण आमच्यासारख्यांना ते अधूनमधूनच आवडले.

गाण्यांच्या बाबतीत ६०-७० चे दशक मात्र जरा वादग्रस्त होईल. आपल्या आधीच्या पिढीचे समीक्षक ५०-६० च्या दशकाला हिन्दी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ म्हणतात. मला स्वतःला ६०-७० च्या दशकातील गाणी फारशी आवडत नाहीत. आणि किशोरच्या गाण्यांचा सुवर्णकाळ सगळा ६९-७० व पुढे होता. ६५ च्या पुढच्या चित्रपटांतील गाणी पाहिली तर खूप तोच तोच पणा दिसतो. घे रफी आणि दे त्याला असतील नसतील तेवढी गाणी असा प्रकार बर्‍याच संगीतकारांत तेव्हा दिसतो (विशेषतः शंकर-जयकिशन - तेव्हाची सर्वात लोकप्रिय जोडी). ६९ मधे एसडी-किशोर-राजेश खन्ना मुळे मग एकदम सगळे बदलले.

पण ८०-९० चे दशक, त्यातही ८५-९० हा काळ प्लॅस्टिक युग हे मात्र अगदी सहमत. "त्या वेळची गाणी आता किती ऐकावीशी वाटतात" हा निकष लावून पाहिले तरी हेच जाणवते.

सुरेख.

कॉलेजात असताना काही काळ पाश्चात्य सिनेमाचं भूत डोक्यावर होतं. अजूनही आहे पण त्या काळात हिंदी सिनेमा म्हणजे गाण्यांनी भरलेला, मेलोड्रामॅटिक प्रकार अशी तुच्छतेची भावना निर्माण झाली होती. सुदैवाने ही काही काळच टिकली. नंतर लक्षात आलं की हिंदी सिनेमा हा ऑपेरासारखा एक स्वतंत्र कलाप्रकार मानायला हवा. जर मॉडर्निस्ट चळवळींमधून भारतीय समाज गेलाच नाही तर मग भारतीय सिनेमाला कुरोसावा आणि अंतोनियोनीच्या फूटपट्ट्या लावून का मोजायचं? तिकडे लोक नव्या वाटा चोखाळत असताना आपले वाडवडील स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत होते. कालमानसात (zeitgeist) इतका फरक असताना तो कलाप्रकारांमध्ये दिसणार नाही हे अशक्य आहे. याचा अर्थ पाश्चात्य सिनेमाचा प्रभाव पडलाच नाही असं नाही. जिथे तो पडला तिथे रे, बेनेगल, निहलानी यांनी स्वतंत्र मार्ग चोखाळले. पण म्हणून 'मेन स्ट्रीम' हिंदी सिनेमा हा कलाप्रकारच टाकाऊ होतो असं वाटत नाही.

>>सिनेमाला आजूबाजूच्या जगाचे संदर्भ चिकटून असतात आणि आवडत्या सिनेमांच्या तुकड्यांसोबतच ते मनात येतात.>>
१००% सहमत. वर जी ट्यूबलाईट लागली त्याला कारणीभूत हीच जाणीव होती. चांगला असो की टाकाऊ, हिंदी सिनेमा लहानपणापासून रक्तात भिनलेला आहे. डॉन कितीही वेळा पाहिला तरी अमिताभची जादू कमी होणं शक्य नाही, मग भले समीक्षक काही म्हणोत. जुने चित्रपट, गाणी आणि भूतकाळ यांची वीण इतकी घट्ट झाली आहे की आता त्यात फरक करता येणंच अवघड झालं आहे.

मस्त लेख.. Happy
पण ८०-९० चे दशक, त्यातही ८५-९० हा काळ प्लॅस्टिक युग हे मात्र अगदी सहमत. "त्या वेळची गाणी आता किती ऐकावीशी वाटतात" हा निकष लावून पाहिले तरी हेच जाणवते.<<<
अगदी अगदी.. खरंतर ८५ - ९५ असा काळ पकडायला हवा यात. इथेही फार भलं काही घडलं नाही. ९०-९५ दरम्यान सुद्धा काही सन्माननीय अपवाद वगळता सिनेमावर प्रेम करायला आशिकी, मोहरा, खिलाडी, कुली नं वन आणि इतर सगळे नं वन, कुमार सानू आणि त्याचे नाकात गाणे, लेगोमटन स्लीव्हज + ए लाइन तंबू कट ड्रेसेस, मल्टिकलर बांगड्या, सागर वेणी आणि नक्षीदार टिकल्या, प्रचंड ढगळ ब्लेझर्स, फ्लिक्स वाढवलेले हिरो, तुम तो ठहरे परदेसी ते चढ गया उपर रे ... एवढंच उपलब्ध होतं..
किती ते दुखभरे कॉलेजचे दिवस आमचे Sad Proud

मानवी नात्यांची गुंतागुंत, स्त्री-पुरुष नात्यातले आकर्षणाचे, प्रेमाचे, दुराव्याचे, तीरस्काराचे, पुन्हा एकमेकांकडे परतून येण्याचे, प्रगल्भतेचे पैलू ज्या सिनेमांमधून दिसतात ते सिनेमे मला बघायला जास्त आवडतात. माणसांमधलं अमूर्त नातं पडद्यावर खुलत जाताना बघायला मला आवडतं.
मात्र सिनेमामधे परिसरही दिसायला हवा. त्यात प्रवास हवा. नात्यांचा आणि माणसांचा. >>>> मस्त.. Happy

सही लिहीलय. श्र, ट्युलिप, फारेंड, अँकी वगैरे लोकांनीही सविस्तर लिहा ह्यावर..

८० ते ९० हे दशक सिनेमांच्या दृष्टीने सर्वात टुकार दशक>>> बहुधा हे तितकेसे योग्य होणार नाही. 'अगदीच टुकार नसेल'! Happy

सागर

राम तेरी

अमिताभचे अनेक (बहुतेक डॉन, मुकद्दर, नटवरलाल, शक्ती, शराबी )

कयामतसे कयामत तक (नक्की साल माहीत नाही)

तो 'कबूतर जा जा जा' गाणे असलेला (त्या काळापुरता ट्रेंड बदलणारा होता)

(वरील बहुतेक चित्रपट आज सामान्य वाटू शकतील, पण त्या काळापुरते ते गाजले होते.) (अर्थात, आजच्या दृष्टीने टुकार हे विशेषण योजायचे असल्यास माहीत नाही)

आणि ह्यातलं प्रत्येक वाक्य मला जवळचं आहे असं मला वाटतंय.. >>>> हेच लिहायचे होते.. पूर्ण लेखच खूप रिलेट झाला.. आमचही असच होते.. शुक्र ऐवजी मी, आई, ताई रैवारी सिनेमाला जायचोच.. टीव्ही ही नव्हते ना तेव्हा.. नंतरही टीव्ही चक्क ८७ ला आला आमच्याकडे.. त्यामुळे आम्ही करमणुकीकरता सर्वस्वी तंबू टॉकिजवर अवलंबून .. पत्र्याची होती म्हणा चांगली. पण आकार डोम किंवा तंबूसारखा.. Happy

तुमच्या प्रत्येक वाक्याला हजार हजारदा अनुमोदन..! आज खूप दिवसांनी इथे आले आणि अगदी खुश करुन टाकणारं काहीतरी वाचायला मिळालं.. जियो.. प्रत्येक अन् प्रत्येक वाक्य माझ्या मनातून आल्यासारखं वाटलं. बेष्टंच..!!
आणि "कोणते सिनेमे बघायला जास्त आवडतात या प्रश्नाचं उत्तर माझ्याबाबतीत सोपं आहे. मानवी नात्यांची गुंतागुंत, स्त्री-पुरुष नात्यातले आकर्षणाचे, प्रेमाचे, दुराव्याचे, तीरस्काराचे, पुन्हा एकमेकांकडे परतून येण्याचे, प्रगल्भतेचे पैलू ज्या सिनेमांमधून दिसतात ते सिनेमे मला बघायला जास्त आवडतात. माणसांमधलं अमूर्त नातं पडद्यावर खुलत जाताना बघायला मला आवडतं.
मात्र सिनेमामधे परिसरही दिसायला हवा. त्यात प्रवास हवा. नात्यांचा आणि माणसांचा" >>> हे तर सगळ्यांत डिक्टो.. Happy म्हणूनच बर्गमन काळजात रुतून बसलाय कायमचा.. आणि मग वूडी अ‍ॅलन, कुरासावा.. बरेच..!
आता विषय निघालाच आहे तर एक सिनेमा सजेस्ट करतेच.. sukkar banat (caramel) २००७ ची फिल्म आहे. वन ऑफ द ऑल टाईम फेव्हरेट..! Happy

आणि हिंदी सिनेमाच्या शताब्दीच्या शुभेच्छा..! Happy

छान लेख... अगदी पटला. एकदम जिगर के पास वाटला. तो देव, तो राज, तो शम्मी, ती वहीदा, तो अमिताभ, ती नुतन, तो संजीव कुमार, तो शोले, तो जंजीर, तो मौसम..... हाय हाय हाय.

ललिता ला अनुमोदन.

माझ्या मुलीला ही हाच प्रश्ण पडतो. हल्ली तिला पण जुन्या गाण्यांचं वेड लागलं आहे. सोनी मिक्स वर रात्री ९ नंतर सगळी जुनी गाणी दाखवतात. ती नेहेमी बघते. जुने बरेच चित्रपट आमच्या संग्रही आहेत. ते पण तिला दखवायला सुरुवात केली आहे. मराठी सुध्धा. मलाच मजा येते आहे. दर शनिवारी रात्री हा कार्येक्रम असतो.

अफाट अफाट अफाट!!!!!!!!!!!! प्रचंड आवडले.
तो तुकड्यांचा परिछेद तर अप्रतिम. पाठमोर्‍या आमिर खानचे कसेकतचे (कयामतचे स्पेलिंग 'क्यू' ने सुरु करणारे) पोस्टर, आशिकीचे फुलपाखरु, अगदी 'शिवा'च्या पोस्टरवरची सायकल चेन गुंडाळलेली मुठ हे माझ्या मनात रुतून राहिलेले काही तुकडे.

हिंदी सिनेमा पिढ्यांमधला पूल आहे.>>> ह्याचा अत्यंत हृद्य अनुभव काही दिवसापूर्वीच आला. मी, माझे वडील आणि माझा १६वर्षीय लंडनमधेच वाढलेला चुलतभाऊ अशा तीन पिढ्यांनी मिळून 'श्री४२०' पाहिला. नुसता पाहिला नाही तर एंजॉय केला. ते कथानक, तो अभिनय, तो नैतिक झगडा, ती गाणी.....आम्हाला सलग बांधून ठेउ शकली हा त्या कलाकृतीचा मोठेपणा.

त्या त्या दिवसांतले मित्र-मैत्रिणी, जातात, रहातात, अधून मधून भेटतात किंवा कायमचेही दुरावतात. पण सिनेमा कायमच सोबत रहातो. >>> या वाक्यासाठी सलाम!

लेख आवडला हे सांगायचे राहून गेले . क्षमस्व. Happy

फार एन्ड यांच्या विपूनंतर हे गुगलून काढले. Happy

१९८० -

http://en.wikipedia.org/wiki/Bollywood_films_of_1980

१९९० -

http://en.wikipedia.org/wiki/Bollywood_films_of_1990

या लिंक्स केवळ त्या दोन वर्षांच्या आहेत व त्यामधल्या कालावधीतील चित्रपटांच्या नाहीत. बर्‍यापैकी नावे दिसत आहेत. Happy

चर्चा भरकटवायचा उद्देश अजिबात नाही. पण असे वाटते की (मायबोलीवरील सरासरी वय ३० ते ४० च्या दरम्यान असावे व १९८० ते १९९० च्या कालावधीत बहुतेक लोक महाविद्यालयात असावेत, ज्या काळात चित्रपटांबाबत अपेक्षाही जास्त असतात व स्वतःची मानसिक प्रगती अती वेगात होत असल्याने चित्रपट न आवडण्याची शक्यताही आढू शकते) त्या वयात ते तसे वाटणे शक्य असावे. Happy

शिरीष कणेकर त्यांच्या माझी फिल्लमबाजी या कार्यक्रमाच्या शेवटी एक पाच मिनीटांचे स्वगत्/निवेदन करतात. या सिनेमाच्या वेडाबद्दल. डोळ्यात पाणी येतं कारण हे सगळं आपणही अनुभवलेलं असतं. प्रत्येक सिनेमावेडा या अनुभुतीतून गेलेला आहे. मी पण त्यातलाच एक. मी तसा खुप नशिबवान आहे. कारण आमच्या शहापूर मध्ये माझ्या लहानपणी एकच थिएटर होतं - श्याम टॉकीज नावाचं. शहरातल्या थिएटरच्या पुढे डब्बा. नविन चित्रपट दाखवण्याची हौस त्या मालकाला परवडायची नाही. पण त्यामुळे मला खुप जुने चित्रपट बघायला मिळाले. फक्त एक रुपया तिकिट होतं. पण त्यासाठी सुद्धा आईचा ओरडा, मार खुप वेळा खाल्लाय. काय नाही बघीतलं त्यावेळेला. दिलीपकुमार, राज कपूर, शम्मी कपूर, देव आनंद पासून दक्षिणेतले डब चित्रपट - एन्.टी.रामाराव, एम्.जी.आर. यांनी भुमिका केलेले विर अभिमन्यु, विर अर्जून, रामायण. जेमिनीचे चित्रपट - त्यातली सुरवातीची ती ट्रंपेट वाजवणारी मुलं. प्रभातची तुतारी. आठवलं की अजून अंगावर रोमांच उभे रहातात. दारासिंगचे देमार चित्रपट. मी दिलीप्-देव यांचा एकत्र केलेला एकमेव चित्रपट - ईन्सानियत - वयाच्या दहाव्या वर्षी पाहीला. (माझा जन्म १९७० चा). चंद्रलेखा नावाचा जेमिनीचा चित्रपट - त्याच्या शेवटचे ते नगारा नृत्य. आजही जसेच्या तसे लक्षात आहे. दुर्दैवाने या चित्रपटांच्या सि.डी.ज आज उपलब्ध नाहीत. आज माझी मुलगी माझ्या कडून या चित्रपटांबद्दल ऐकते तेव्हा तिला हे सगळे माझ्या जन्मानंतरचे वाटतात. पाचवीत असताना सहामाही परिक्षेच्या शेवटच्या दिवशी मी मित्रांबरोबर गुमनाम बघीतला होता. नंतर दोन दिवस तापाने आजारी होतो. तरी देखील उत्सुकता म्हणून एप्रिल मधे बिस साल बाद बघायला गेलो. सुरवातीच्या खुना नंतर पळून जाण्याचा विचार होता. पण एका माणसाने थांबवलं. माझी भिती घालवली. मला म्हणाला मी सरकारी हॉस्पीटल मधे पोस्टमार्टेमचं काम करतो. भुत-बित काही नसतं. असतं तर त्यांनी मला नसतं पकडलं. नंतर मात्र मी (न घाबरता) बरेच चित्रपट बघीतले. मुमताज ने काम केलेले "एक नन्ही मुन्नी लडकी थी" आणि रामसेंचा "दो गज जमिन के निचे" हे त्यातले सर्वांत थरारक. मी पृथ्वीराज कपूर-सोहराब मोदींचा "सिकंदर" पाहीलाय. त्यातले पृथ्वीराज हुबेहुब शशी कपूर सारखे कसे दिसतात हे त्यावेळी पडलेलं कोडं होतं.
किती आणि काय सांगायचं या सिनेमाच्या वेडा बद्दल. आजही माझ्या मोबाईल मधे दोन-तिन तरी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट असतातच. प्रवासाचा वेळ असा सत्कारणी लागतो. Happy

अफाट मस्त लिहिलंस. अनुमोदन देण्याजोगी वाक्ये वरच्या प्रतिसादांतून आधीच उद्धृत झालीत. ("सिनेमा पिढ्यांमधला पूल आहे" यासाठी तर तुला स्पेशल बक्षीस. Happy ) पण त्यातही-

मानवी नात्यांची गुंतागुंत, स्त्री-पुरुष नात्यातले आकर्षणाचे, प्रेमाचे, दुराव्याचे, तीरस्काराचे, पुन्हा एकमेकांकडे परतून येण्याचे, प्रगल्भतेचे पैलू >>>
मात्र सिनेमामधे परिसरही दिसायला हवा. त्यात प्रवास हवा. नात्यांचा आणि माणसांचा.>>>
प्रत्येकाचा सिनेमा वेगळा, प्रत्येकाकरता सिनेमा वेगळा. >>>
प्रत्येकाची सिनेमा बघण्याची कारणे वेगळी. प्रत्येकाकरता सिनेमाचा अर्थही वेगळा. >>>
Happy

८० ते ९० च्या दशकाबद्दल जे लिहायचं होतं ते फारेंडानच लिहिलं आहे. शिवाय ६०-७० च्या गाण्यावाल्या दशकाबद्दलही.

'सिनेमा आवडतो' म्हणाजे नक्की काय- यासारखा अवघड प्रश्न नसेल.. सिनेमा किती काय काय करत असतो आपल्यासाठी. स्वप्न दाखवतो. आशा दाखवतो. मार्ग दाखवतो. खट्टु झालेल्या मनाला गुदगुल्या करतो, चटका बसलेल्या आपल्यावर फुंकर आणि थंड शिडकावा घालतो आणि पराभव झाल्यावर पाठीवर हातही ठेवतो. 'हिंदी सिनेमा आपल्या डी एन ए त फिट केलाय'- हेच खरं.

हिंदी सिनेमा हा ऑपेरासारखा एक स्वतंत्र कलाप्रकार मानायला हवा. जर मॉडर्निस्ट चळवळींमधून भारतीय समाज गेलाच नाही तर मग भारतीय सिनेमाला कुरोसावा आणि अंतोनियोनीच्या फूटपट्ट्या लावून का मोजायचं? >> अगदी आणि अगदीच! Happy

आणखी एक म्हणजे- आजकाल बाहेर चारचौघांत आता रडता येत नसतं. अनेक शिक्के आणि अनेक प्रश्न. थिएटरच्या अंधारात कुठचा तरी मेलोड्रामा दाखवून सिनेमा रडायला लावतो, ते माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे कारण असं रडायला मिळणं दुर्मिळ झालेलं असतं. तो मेलोड्रामा हे फक्त निमित्त म्हणून पुढे येतं, खरं तर प्रत्यक्ष जीवनातल्या मागच्या अनेक प्रसंगांत रडायचं राहून गेलेलं असतं. रडणं जगण्यासाठी फार फार आवश्यक आहे. सिनेमा रडू देतो, हे त्याचं मोठं देणं आहे.

आजकाल बाहेर चारचौघांत आता रडता येत नसतं. अनेक शिक्के आणि अनेक प्रश्न. थिएटरच्या अंधारात कुठचा तरी मेलोड्रामा दाखवून सिनेमा रडायला लावतो, ते माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे कारण असं रडायला मिळणं दुर्मिळ झालेलं असतं. तो मेलोड्रामा हे फक्त निमित्त म्हणून पुढे येतं, खरं तर प्रत्यक्ष जीवनातल्या मागच्या अनेक प्रसंगांत रडायचं राहून गेलेलं असतं. रडणं जगण्यासाठी फार फार आवश्यक आहे. सिनेमा रडू देतो, हे त्याचं मोठं देणं आहे.

- साजिरा - अगदी अगदी ! तुमचं डायग्नॉसीस अचुक आहे ! जियो ! Happy

Pages