कधी कधी अजूनही
होते सैरभैर
तुझ्यासोबत असूनही
दाटे हुरहूर
एकाएकी शांतता ही
होते अलवार
तुझ्यामाझ्यातले कुणी
आठवते फार
कधी कधी अजूनही....
कधी कधी याद येते
जुन्या दिवसांची
तुझ्यामागे फिरायाची
सुई घड्याळाची
उजाडत होते तेव्हा
एकमेकांसाठी
मावळून जातानाही
हात असे हाती
तेव्हा कसा कोण जाणे
असायचा वेळ
वेळातून काढूनही
उरायचा वेळ
आताच का धावायला
लागले हे जग
तेव्हा कुठे होती
सेकंदांची लगबग
कधी कधी अजूनही...
कधी थेट भेट कधी
फोन , चॅट , मेल
एवढे बोलुनी पुन्हा
सुरू घालमेल
अजूनही आठवे ते गूज
तुझे माझे
बोलायाचे एक आणि
सांगायाचे दुजे
निरर्थक शब्दांतून
लागायाचे अर्थ
एका स्पर्शापुढे सारे
संभाषण व्यर्थ
आता किती तेच तेच
बोलतो आपण
आणि ऐकायाचे तेच
ऐकतो आपण
आताच का सारे सारे
सांगावे लागते
तेव्हागत आता कुठे
स्पर्शाने भागते
कधी कधी अजूनही ...
अजूनही कधी कधी
वाटते मनाला
कुठे कोण जाणे पण
झाला .. घात झाला
कुठेतरी हातातून
वेळ निसटला
कधीतरी नजरांचा
खेळ आटोपला
हळू हळू , होता होता
सराईत झालो
सराईत होता होता
ति-हाईत झालो
रोज रोज ओळखीची
खूण लागते गं
अनोळखी प्रवासाची
भीती वाटते गं
कधी कधी अजूनही
कधी कधी म्हणूनच
होते सैरभैर
तुझ्यासोबत असूनही
दाटे हुरहूर
अजूनही असे कसे
तिथेच आपण
एवढे जवळ आणि
तेवढेच दूर !!!
वैभव....
काय गुर्जी, बर्याच दिवसांनी..?
अजूनही असे कसे
तिथेच आपण
एवढे जवळ आणि
तेवढेच दूर !!! --- हे मात्र खरं.. जमायला अवघड.. पण जमलं तर यासारखी दुसरी मजा नाही.
कविता आवडली असं वेगळं सांगायला हवं का ?
कधी कधी अजूनही
तशी वेळ येते..
नजर ही पुन्हा पुन्हा
फोनकडे जाते..
रिकामाच मेलबॉक्स..
नाही चॅट विंडो
मनातून अजूनही

पटते ओळख...
कुणीतरी आपल्या
असे बरोबर..
नसू दे रे संभाषण,
नको थेट भेट..
स्नेहाचा हा दिप,
मंद उरो अंतरात..
~~~~~~~~~
~~~~~~~~~
हळू हळू , होता होता
सराईत झालो
सराईत होता होता
ति-हाईत झालो >>> क्या बात है!!
वाह ! खास !
अजूनही असे कसे
तिथेच आपण
एवढे जवळ आणि
तेवढेच दूर !.. .. .. वाह वैभवा! जियो!
वॉव... वैभवा... अगदी खुप दिवसांनी पाहिले तुला इथे..
अन अगदी फुलला की गुलमोहर...
आता मात्र इतकी वाट पहायला लावु नकोस तुझ्या पुढच्या कवितांची...
कविता.. अप्रतिम.. नेहमी सारखीच...
आह.....क्या बात है जनाब...! सीधा सीधा कत्ल.... ये ठीक नही हुजूर
खूप दिवसांनी तुझे शब्द बघितले आणि अगदी आधाशासारखे वाचले.... कविता अफलातून झालीये.
वा!!! बरेच दिवसांनी तुझी कविता वाचली
नेहमीप्रमाणेच सही...
साधे सरळ शब्द आणि थेट भिडणारी...
================
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!
वा.......
सुरेख रे
वेलकम बॅक वैभव.....
तुझे नाव दिसताच बाकि सगळ्या पोस्ट सोडुन इकडे क्लिक केले... अभिप्राय काय देउ.... अप्रतिम्(नेहमीसारखीच!)
>>आताच का सारे सारे
सांगावे लागते
तेव्हागत आता कुठे
स्पर्शाने भागते
किती गोड..!
साधे सरळ शब्द आणि थेट भिडणारी... अगदी अगदी...
वैभवा... तुझ्या कवितांच वैभव दिवसांगणिक असेच वाढत राहो...
वैभव
मस्तच कविता
हळू हळू , होता होता
सराईत झालो
सराईत होता होता
ति-हाईत झालो
आणि
अजूनही असे कसे
तिथेच आपण
एवढे जवळ आणि
तेवढेच दूर
हे तर खासच.
सुधीर
हे खरच खरं आहे का? वैभव खरच इथे येऊन गेला का? अब आयेगा मजा... उगीचच मरगळल्यासारखं का वाटत होतं...... ते आत्ता कळलं
कविता खासच..... पण त्यातला तो 'तेव्हागत' अगदी अगदी.....
वैभव,
सुंदरच्...अप्रतिम.
हळू हळू , होता होता
सराईत झालो
सराईत होता होता
ति-हाईत झालो
खासच.
अनघा
छान...
मस्त कविता वैभव!
शब्द न् शब्द परत परत वाचावा! किती सुंदर!
छान वैभव.. आवडली.. पोहोचली..
vaibhavaa,
खास 'वैभव' टच. व्यक्ती ते सार्वत्रिका पर्यन्त विस्तारत जाणारा अनूभूतीचा अगदी उत्कट विस्तार. भाषा साधी, अनलन्कृत आणि कसल्याच कसरती, करामती न करताही साधलेली छानशी लय. ह्या एका सहज सुन्दर मध्यवर्ती कल्पनेला 'गझल'च्या अलामत, काफिया, रदीब, वजन, जमीन, बहर इ.इ. ऊन्च ऊन्च टांगत्या झूल्यांवरून कोलांट्या उड्या मारायला लावण्याचा मोह टाळल्याबद्दल विशेष अभिनन्दन !
खास करून मला ह्या ओळी भिडून गेल्या :
"बोलायाचे एक आणि
सांगायाचे दुजे
निरर्थक शब्दांतून
लागायाचे अर्थ
एका स्पर्शापुढे सारे
संभाषण व्यर्थ
आता किती तेच तेच
बोलतो आपण
आणि ऐकायाचे तेच
ऐकतो आपण
आताच का सारे सारे
सांगावे लागते
तेव्हागत आता कुठे
स्पर्शाने भागते"
- बापू करन्दिकर
खूप सुंदर.. किती दिवसांनी मायबोलीवर वैभव जोशीची कविता वाचायला मिळाली!
जुने दिवस आठवले..! गुलमोहोर फुललेला असायचा अगदी!
धन्यवाद !!!
धन्यवाद्..मनःपूर्वक धन्यवाद.
ब-याच दिवसांनी सर्वांची भेट झाली. झकास वाटलं. असाच स्नेह असावा ही विनंती.
बापू..
तुम्ही मेलमधे पाठवलेल्या कवितेमुळे पुन्हा मुक्तछंदात शिरलो . ती आज पोस्ट करून टाकतो.
व्वा !! क्या बात है! अप्रतीम!
परागकण
वरच्या सगळ्यांच्याच प्रतिसादाला डीट्टो!
वैभव
छान कविता..
मनाला स्पर्श करुन गेली, कसे सुचतात
शद्ब.
मान गये उस्ताद !!!!
वै एकदम सै...