पत्रकार, संपादक, आणि ताळतंत्र

Submitted by मंदार-जोशी on 12 April, 2012 - 04:35

गेले काही दिवस वर्तमानपत्रात एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटनेसंबंधी बातमी गाजत आहे. मुलगाच हवा या हव्यासापोटी बंगळूरूमधे एका बापाने मुलगी झाली म्हणून नाराज होऊन त्या मुलीला सतत शारिरीक क्लेश दिल्याने तिचा मृत्यू झाला. तपशीलात फार अधिक लिहीणे मला अशक्य आहे. तसेच बातमी जगजाहीर असल्याने उगाच पाल्हाळही नको.

मला सगळ्यात चीड आली ती पुढील बातमीत त्या पत्रकाराने किंवा संपादकाने जे प्रकाशचित्र छापायचा निर्णय घेतला ते बघून. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात तारतम्य म्हणजे काय ते शिकवत नसतील असे नव्हे, पण मग ते काय परीक्षा दिली की तिथेच ठेऊन बाहेर पडायचं का? अभ्यासक्रमात शिकवो न शिकवो, काही गोष्टी यांना समजत नाहीत का? की सवंग लोकप्रियता आणि जास्तीतजास्त खपाच्या हव्यासापोटी वर्तमानपत्रांनी अक्कल गहाण टाकली आहे? कुठले फोटो फोटो छापायचे याची अक्कल कधी येणार या लोकांना?

या ठिकाणी फोटोत फक्त रडणारी आई दाखवून भागलं नसतं का? हा असा छापला असता तर?
Afreen.JPG

त्या बातमीचा दुवा - पूर्ण फोटो तिथेच बघायला मिळेल:
http://punemirror.in/article/4/20120412201204120315256874dc42755/Baby-Af...

ते प्रकाशचित्र पाहिल्यावर मी इतका हादरलो की संपादकांना पुढील प्रतिसाद लिहीला आहे:

Story is really hard rending, but I sincerely wish Pune Mirror stop carrying photographs of dead babies. It is not appropriate, in addition to being extremely disturbing. I hope the editor understands what I am trying to say here.

तुमच्यापैकी कुणी याच्याशी सहमत असल्यास कृपया अशा अर्थाचा प्रतिसाद तिथे लिहावा.

बातमीच्या खालीच प्रतिसादाचा फॉर्म आहे. तिथे आपण आपला प्रतिसाद लिहू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदार तुझी कळकळ पोहोचतेय. पण आजकाल असे फोटो छापल्याशिवाय बातमीचा सिरियसनेस लोकांपर्यंत पोहोचत नाही(असा समज आहे) टिव्हीवर एकेक चॅनल्स कोणतीही ब्रेकिंग न्यूज दिवसभर दाखवत राहतात, वर्तमानपत्रांना सुद्धा अशा 'न'दाखवता येणार्‍या बातम्या फक्त वाचायला लावून खुमासदार करायच्या असतात, त्या या अश्या..
सगळं वाईट आहे पण नुसतंच आफ्रिनची आई शोकाकूल होती असं लिहिलं तर वाचकांना ती बातमी मिळमिळीत वाटेल बहुतेक. Sad

मंदार, आमच्याकडे विदर्भात सकाळ , लोकमत अशा अग्रगण्य वृत्तपत्रांमधून, अपघात, गळफास, विषप्राशन केलेल्यांचे सर्रास फोटो छापतात, मी वारंवार असे फोटो छापू नये यासाठी वाचकांच्या पत्रव्यवहारातून पत्र पाठविले, माझे पत्र कधीच छापले गेले नाही.. Sad

सारीका, मोठ्यांचे छापावेत असे नाही, पण निदान लहान मुलांच्या मृतदेहांचे फोटो तरी छापू नयेत ना! ते ही इतक्या लहान!!

पत्रकारितेत काही गोष्टी शिकवतात. उदाहरणत:, बलात्कारित स्त्रीची ओळख पटेल असे काहीही छापू नये, वगैरे. तेच तारतम्य का नाही इथे दाखवलं जात हे मोठं कोडंच आहे.

लंडन इथे जमीनीखालच्या रेल्वे मधे स्फोट झाले तेव्हा तिथल्या लोकांनी आणि पत्रकारांनी रक्ताळलेले मृतदेह, त्यांचे तुटलेले अवयव यांचे फोटो छापले नव्हते फारसे. इथे पाश्चात्य आणि पौर्वात्य यांच्यात तूलना करण्याचा अजिबात हेतू नाही. हे फक्त एक उदाहरण म्हणून देतो आहे. तिथेही सनसनाटी बातम्या छापणारे कमी नाहीत.

मंदार मीही सहमत आहे तुझ्याशी. कारण सकाळी कधी नव्हे तो मी आज मुंबई मिर्रर वाचायला घेतला आणि हा फोटो पाहुन मन खुप विचलित झालं. जर माझ्यासारख्या नॉर्मल मुली ची ही अवस्था तर ज्या गरोदर आहेत, ज्यांच्या घरात अजुनही मुलगा मुलगी वरुन वाद होतात त्यांच्या मनावर किती परिणाम झाला असेल. Sad

मंदार, मोठ्यांचे काय किंवा लहानांचे काय मृतदेहाचे फोटो कशासाठी..? पुर्वी वृत्तापत्रातून असे प्रक्षोभक फोटो टाळले जायचे, एखाद्या वाहनाला जर अपघात झाला तर अपघातग्रस्त वाहनाचे फोटो, किंवा कोणाकडे चोरी झाली तर अस्ताव्यस्त घराचे फोटो इतपत ठिक आहे..
छिन्नविछीन्न मृतदेहांचे, अपघाती मृत्युचे फोटोसह बातम्यांसाठी पोलीस टाइम्स आहेच की..

सारिका पुर्वी पेपर बातम्या वाचण्यासाठी घेतला जायचा... आता जर असे फोटो छापले नाहीत तर यांचे पेपर कोण विकत घेईल अशी परिस्थिती आहे.. Angry

राखी +१ फार महत्वाचा मुद्दा मांडलास तू.
आणि अशा बातम्या मसाले लावून आणि फोटो देऊन छापल्या तर अन्य एखादा मुलगीद्वेष्टा बाप यातून प्रेरणा(??) घेऊन अजून एका निष्पाप जीवाची बिनधोक हत्या करेल Sad

अगदी बरोबर दक्षिणा.. आणि आपल्या देशात कायदा आणि सुव्यवस्था किती चोख आणि काटेकोर आहे ते मी वेगळे सांगायला नको.. Angry

मंदार. सर्वात आधी हे सांगते की तुमचे मत बरोबर आहे. कुठल्याही संवेदनशील माणसाच्या मनात हे प्रश्न उठणारच. माझ्या मताशी सहमत असणारे फार थोडे असतील किंवा नसतीलही. तरीही मी हे मत इथे लिहत आहे. हे खालचे सर्व काही फक्त आणि फक्त "वर्तमानपत्रे" यांच्याशी संबंधित आहे. न्युज चॅनल्स व इतर प्रसारमाध्यमांबद्दल नाही.

सर्वात आधी पुणे मिरर हे एक टॅब्लॉइड आहे. टॅब्लोईड जर्नालिझम बद्दल वाचा.

त्यामुळे बातमी अधिक सनसनाटी करणे हा त्यांचा हेतू नव्हे तर धंदा आहे. पत्रकाराने समाज सुधारायचा ठेका घेतलेला असतोच, त्याचबरोबर त्याला त्याचे वर्तमानपत्रदेखील खपवावे लागते. एक वर्तमानपत्र छापण्यासाठी येणारा खर्च आणी आपण विकत घेत असणार्‍या वर्तमानपत्राची किंमत यातला फरक समजून घेतला तर "जाहिरातदार" ही किती आवश्यक गोष्ट आहे हे लक्षात येइल. आणि जाहीरातदार जास्तीत जास्त खपाच्या वर्तमानपत्रानाच प्राधान्य देतात, त्यामुळे खप ही आवश्यक बाब आहेच आहे.
म्हणून आपली बातमी जास्तीत जास्त आकर्षक (हा शब्द चुकीचा आहे. इथे मला "कॅची"ला समानार्थी शब्द हवा आहे.) करणे हे गरजेचे असते.

आता आपण तुम्ही उदाहरण दिलेल्या बातमीबद्दल. बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे. वाचल्यावर मनात संताप येतोच येतो. एखाद्या माणसाकडून हैवानगीचा असा तमाशा बघून मनात खळबळ होते. आफरीन ही भारतातली पहिलीच मुलगी नव्हे, जिचा अपराध हा फक्त "मुलगी असणे" हा होता. भारतातल्या किती गावामधल्या किती रूग्णालयामधे रोज अशा केसेस भर्ती होत असतील? प्रत्येक केस जनसामान्यापर्यंत पोचतेच असे नाही. तरीदेखील बेबी फलक आणि बेबी आफरीन याच्यासाठी अख्ख्या भारतातून मीडीयाने आवाज उठवला होता. मुद्दा फक्त सनसनाटी बातमीचाच नव्हता, तर एका अत्यंत चुकीच्या पडणार्‍या पायंड्याचा देखील आहे. मुलगी झाल्यावर तिला छळून, अमानुषपणे मारून टाकण्याच्या घटना हल्ली वाढीस लागल्या आहेत. गर्भलिंगचाचणीचे दर ज्याना परवडात नाहीत ते या गटात मोडतात. या अशा घटना घडू नयेत म्हणून समाजामधे त्याची जागृती घडणे जितके गरजेचे आहे. तितकेच किंबहुना त्याहूनही जास्त गरजेचे आहे, अशा घटनामधील गुन्हेगाराला जरब बसण्याची. या अशा बातम्यामधून (फोटोमधून) त्या घटनेमागची भयाणता, नराधमता आणि नीचता मनामधे एखाद्या बुलेटसारखी शिरते आणि तिथेच रूतून बसते.

रेश्माबानू आता आक्रोश करत आहे, पण तीन महिनी जेव्हा तो नराधम मुलीला छळत होता तेव्हा तिला तक्रार नोंदवता आली नाही. हॉस्पिटलमधे गेल्यावर देखील त्यानी नवर्‍याविरूद्ध तक्रार नोंदवू नका अशी विनंती डॉक्टराना केली होती. त्यामागची कारणे तेव्हाची परिस्थिती आणि मानसिकता यावर आता चर्चा करून उपयोग नाही. पण....

वरचा फोटो पाहून जर एका आफरीनच्या बापाच्या मनात धडकी भरली. एक जरी रेश्माबानू आपल्या बाळाला मारणार्‍या नवर्‍याविरूद्ध तक्रार नोंदवू शकली. आणि एक जरी गरोदर बाई गर्भलिंग चाचणी साठी ठामपणे नकार देऊ शकली तरी रग्गड. या अशा बातम्या मीडीयातर्फे दिल्या जाण्याचं ते सार्थक होइल.

मन्दार, बर्‍याच अंशी सहमत.
पण यालाही जबाबदार पब्लिकच आहे. साध रस्त्यावर काही घडल की कोन्डाळ करुन पुढेपुढे घूसून आधी स्वतःला ते बघायला मिळण्याची उत्सुकता दाबू न शकणारे, किन्वा असे काही घडून पहायला मिळावे याच इच्छेत असलेल्यान्चे "पर्सेन्टेज" फारच वाढत्या सन्ख्येचे आहे. सबब, असे काही घडल्यास, त्याचा तत्काळ विविध अ‍ॅन्गलने विविध मुड्स मधले फोटो काढुन अशा पब्लिक समोर ते मान्डले तर धन्दाच धन्दा! यावर कायद्याने काही बन्दी असेल असे वाटत नाही.
मूळात पुत्राच्या मृत्युच्या दु:खाने हमसाहमशी रडण्यार्‍या स्त्रीचा फोटो काढायचीच गरज का भासावी? अन बातमी ऐकणार्‍या/वाचणार्‍यान्ना तरी "तिला तशी रडताना" बघायचा विकृत सोस का हवा? मृतदेहान्चे फोटो हा तर एक वेगळा विषय आहे.
अर्थात, बघणार्‍या सगळ्यान्चाच तसा सोस अस्तो असे नाही, व बरेचदा "पब्लिकलाच आवडते/हवे असते/मागणी तसा पुरवठा" या नावाखाली खरे तर आपल्याला जे पुरवायचे अस्ते (पुरविण्याच्या नावाखाली पब्लिकच्या माथी मारायचे अस्ते - हीच ती आधुनिक पत्रकारीता) तेच इतक्या भरघोस सन्ख्येने पब्लिकच्या नजरेसमोर उतरविले जाते की हळू हळू पण थोडक्याच वेळात पब्लिकला तेच सवईचे होऊन, "येईच्/ऐसाईच तो चलता है" असे अलिखितनियमसदृश भासायला लागते.
इन एनी केस, सम्पादक झोपा काढतोय का असे "सौम्य सहिष्णूपणे" विचारायचा प्रघात आहे.

त्याच बातमीमधे सगळ्यात शेवटी "शरियत कायद्याचे" समर्थनसदृश बातमी देखिल आहे. खरच गरज होती का त्याची? अन शरियतच का? स्वतन्त्र भारतात फासावर लटकवायचा कायदा आहे ना? मग तो सोडून जो कायदा इथे चालतच नाही त्याची या बातमीच्या निमित्ताने कुणाच्या तोन्डी मजकुर घालून जाहिरात कशाकरता?
[तुझ्या नजरेतुन बरे सुटले हे? ऑ? ]

>>> बातमी जास्तीत जास्त आकर्षक (हा शब्द चुकीचा आहे. इथे मला "कॅची"ला समानार्थी शब्द हवा आहे.) <<< वेधक हा शब्द कसा वाटतोय?

>>> या अशा बातम्या मीडीयातर्फे दिल्या जाण्याचं ते सार्थक होइल. <<< बातमी देणे याबद्दल वाद नाहीये, तर कशाप्रकारे काय काय दिल जातय ते विक्षिप्त/विकृतच आहे.
अन सार्थकाचेच म्हणशील, तर "शेवटच्या शरियत कायद्याच्या अनाहुत परिच्छेदातून पत्रकारितेच्-समाजप्रबोधनाच्या ठेक्याच सार्थक" केलच केल आहे Proud

मंदार, हे उद्वेगजनक आहेच. कुठल्याही जखमींची, मृतदेहांची चित्रे दाखवताना, किमान काहि भाग धूसर केले जावेत, एवढी तरी अपेक्षा ठेवू शकतो का आपण.
आपल्याच प्रसारमाध्यमाकडे जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित व्हावेत, आपला खप
वाढावा, जाहिराती वाढाव्यात असे साधे सोपे गणित आहे हे.
आणि हेही तितकेच खरे आहे कि अशा दृष्यांनी विचलित होणारी, कदाचित
तूमची शेवटची पिढी असेल.

मंदार... विषण्णं झालंय मन..
शहारे आले फोटो पाहताना.. Sad
वर्तमान पत्र असो कि टीवी वरच्या बातम्या असोत.. घडलेल्या वाईट घटना,मॅटर ऑफ फॅक्ट सारखं लिहायचे सोडून , वाईट्ट रीतीने वर्तमानपत्रातून ,टीवी च्या काही चॅनल्सवरून एकसारख्या प्रसारित होत असतात्,त्यावर खरच बॅन घातला पाहिजे.

अशा सनसनीखेज बातम्या,फोटो छापताना या लोकांना स्वतःला त्रास कसा होत नाही?? Angry

>>>> अशा सनसनीखेज बातम्या,फोटो छापताना या लोकांना स्वतःला त्रास कसा होत नाही?? <<<<
कोडगे/निर्लज्य वगैरे बनल्याखेरीज असे करता येत नाही. तसे बनायला पत्रकारीतेच्या अभ्यासक्रमात कसे काय शिकवितात माहित नाही, पण मुम्बैच्या जेजे स्कुल अन अन्य ठिकाणच्या आर्टस्कुल्स मधे मात्र कोडगा/निर्लज्य/भावनारहित कलाकार बनणेकरता समोर जिवन्त नागडी मॉडेल्स बसवुन त्यान्ची चित्रे काढून घेतात, ते माहिते. अन त्याचे अहमहमिकेने समर्थन करणारे सुद्धा बहुसन्ख्येने(च) आहेत तर त्या नागड्या जिवन्त वास्तवापुढे खर तर या पान्ढर्‍या कापडात गुन्डाळून झाकलेल्या अत्यल्पवयीन शिशूचे प्रेत म्हणजे किस झाडकी पत्ती! नै का?

कमाल आहे, वृत्तपत्रात फोटो छापला म्हणुन तुम्ही रागावतायेत उलट त्या नराधमाने जे कृत्य केले त्याच्याबद्दल अवाक्षर पण नाही. त्याचे सुध्दा हेच हाल करुन वृत्तपत्रात द्यावे. फोटोसहित.

नंदिनी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तू मांडलेले मुद्दे मत विचार करण्यासारखे निश्चितच आहेत.
पण फोटोने कुणाच्या मनात धडकी वगैरे नाही गं भरणार. मुळात मुलगा काय मुलगी काय काहीही होवो अशी मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत कसलेही आणि कितीही फोटो छापा काहीही होणार नाही. शिवाय त्याने बाळाला सरळ समुद्रात किंवा एखाद्या जलाशयात फेकून दिलं असतं तर कसला डोंबलाचा मृतदेह मिळणार होता फोटो काढायला?!!

>>वरचा फोटो पाहून जर .........................एक जरी रेश्माबानू आपल्या बाळाला मारणार्‍या नवर्‍याविरूद्ध तक्रार नोंदवू शकली. आणि एक जरी गरोदर बाई गर्भलिंग चाचणी साठी ठामपणे नकार देऊ शकली तरी रग्गड.

हे कदाचित होऊ शकेल. आणि व्हावं अशी इच्छा!! Sad

लिंबूकाका, तो उल्लेख सुटला नाही नजरेतून, पण फोटो बघितल्यावर तर सगळी बातमी वाचण्याची इच्छा मरुन गेली होती. आत्ता पूर्ण बातमी वाचली. त्या शरियतच्या कायद्याच्या उल्लेखात त्या इमामाने, आफरीनच्या बापाविषयी चीड व्यक्त केली आहे. कायदा लागू नसेल, पण निदान त्याने तरी अशा कृत्यांचं समर्थन केलेलं नाही हे बघून जरा बरं वाटलं. शिवाय माझ्या आणि आपल्यापैकी अनेकांच्या मनात जे आलं असेल (की त्या बापाला ठेचावा वगैरे) तेच त्याने वेगळ्या प्रकारे व्यक्त केलं आहे.

>>> शिवाय माझ्या आणि आपल्यापैकी अनेकांच्या मनात जे आलं असेल (की त्या बापाला ठेचावा वगैरे) तेच त्याने वेगळ्या प्रकारे व्यक्त केलं आहे. <<< तो "वेगळा प्रकार" अन त्याची बातमी निमित्ताने जाहिरात सगळ्यात अधिक धोकादायक आहे. कारण तुला वा मला काहीही वाटले की ठेचावे/मारावे वगैरे तरी आपण लगेच आपले "धार्मिक कायदे" उघडुन बसत नाही, नै का? फार फार तर विचारतो की आपल्या घटनात्मक कायद्यात तशी तरतुद नाही का! हो की नाही? पण "आपल्या भारतीय घटनात्मक कायद्यास" न मानणारे मात्र बाहेरील-परकीय मागास "कायदे" त्यातिल तरतुदीन्चे समर्थन करीत इथे मान्डु लागले तर ते कसे चालावे? मला तरी नै चालत बोवा!
मृत मुलीचे बापास शिक्षा व्हायलाच हवी, पण ति शरियतमार्फत नव्हे तर सार्वभौम भारतीय प्रजासत्ताकाचे विहित कायद्यानुसार! अन हे साध गणित जाणुनबुजून विसरलेले सम्पादक अन पत्रकारच, अशा दुर्दैवि घटनान्चे बातमीचे निमित्ताने आपले प्यादे पुढे पुढे केल्याप्रमाणे शरियत वगैरे सारख्या मागास कायद्यातील दगडाने ठेचणे वगैरे मतान्चा प्रसार करीत असतात, त्याचाही मी विरोध / निषेध करतो कारण स्वातन्त्र्यानन्तर ६० वर्षे उलटुन गेल्यावरही, स्वतन्त्र भारतीय प्रजासत्ताकाच्या कायद्याचा केवळ विसरच नव्हे तर त्याऐवजी भलतेच कायदे वापरण्याचे बोलले जात असेल, तर तीच मला सर्वात मोठी धोक्याची घण्टा वाजते असे वाटते, अन ही घण्टा तर आजकाल नव्हे फार पूर्वीपासून अशीच ठणाठणा वाजत आली आहे.
फरक इतकाच, की या वाजलेल्या घण्टा वेळीच थण्ड पाडण्याचे कार्य पूर्वापार इमानेइतबारे केले जाते, तर नक्षली/ब्रिगेडीन्ची घण्टाच काय त्यान्च्या बन्दुकीच्या गोळ्यान्च्या रोजच्यारोज मारल्या जाणार्‍या फैरीन्नी अन त्यामुळे मरणार्‍या शेकडोन्च्या किन्काळ्यान्च्या आवाजानेही आम्हाला काडीचीही जाग येत नाही, याचे वैषम्यही आहे.

बरोबर आहे लिंबूकाका.
रच्याकने, तुम्ही त्या संपादकांना निषेधात्मक विपत्र / प्रतिसाद लिहीलेत का?

लिंबू, बास्स.

पण फोटोने कुणाच्या मनात धडकी वगैरे नाही गं भरणार.>> भरेल. भरते. तेच तर फोटो जर्नालिझमचे वैषिष्ट्य आहे. आता इथे कुणी स्वत:हून कबूल करणार नाही इतकेच. पण याचा सायकोलॉजिकल ईफेक्ट होतोच होतो.

शिवाय त्याने बाळाला सरळ समुद्रात किंवा एखाद्या जलाशयात फेकून दिलं असतं तर कसला डोंबलाचा मृतदेह मिळणार होता फोटो काढायला?!!<>> या घटनेचे गांभीर्यच ते आहे मंदार. मुलीला मारून टाकण्याऐवजी त्याने तिला "हालहाल"करून छळून मारलं. किती मुली साळीचं दूध पिऊन मरतात, किती मुली घागरीत बुडून मरतात, किती मुली कचराकुंडीत सोडून दिल्या जातात. पण या घटनेमधे तिच्या नशीबात असा सहजासहजी मृत्यू नव्हता, त्याऐवजी नुसता छळ होता. त्या बापाला तिला नुसतं मारायचं नव्हतं तर छळायचं होतं. ही विकृती आणी त्या विकृतीला इतराची मूक संमती हा या घटनेतला मूळ गाभा आहे. दुर्दैवाने मीडीयाने हा विषय उचलून धरला आणि म्हणून हा इसम तुरूंगात गेला. इतर घटनामधे कुणालाच काही पडलेलं नसतं. (त्या बाळाच्या आईसकट!!)

समाजाची मानसिकता बदलायला हवीच आणी अशा धक्कादायक बातम्यामुळे ती थोडीफार बदलते. हेही नसे थोडके.

सेलेब्रीटींच्या फालतू लफड्याबद्दल वाचण्याऐवजी अशा बातम्या जास्तीत जास्त रीत्या प्रसिद्ध व्हायला हव्यात.

>>> दुर्दैवाने मीडीयाने हा विषय उचलून धरला आणि म्हणून हा इसम तुरूंगात गेला. <<<
यातिल दुर्दैवाने हा शब्द बदलुन सुदैवाने असा लिहीशील का? Happy
अन बास्स तर बास्स!
मला बातमी का उचलली याबद्दल म्हणायचेच नाही, ती उचलता उचलता अन्य चावटपणेही केलेत, ते मी मान्डलेत, पटले तर घ्या नै तर नका घेऊ, पण तशा शरियत वगैरेतील निमित्तमात्रे पेरलेल्या उल्लेखान्चाही "सायकोलॉजिकल ईफेक्ट होतोच होतो" जो मात्र समाजस्वास्थ्याचे दृष्टीने विपरित आहे असे माझे म्हणणे आहे.

लिंबू. त्याच्या दुर्दैवाने. थोडे दिवस आधी त्या बाईने तक्रार नोंदवली असती तर बाळ राहिले अस्ते. Sad

अशा सनसनीखेज बातम्या,फोटो छापताना या लोकांना स्वतःला त्रास कसा होत नाही??>> वर्षू, त्रास होत नाही म्हणजे काय? तुम्ही पेपरात छापून आलेला एक फोटो बघता तर तुमच्या जीवाची घालमेल होते. मग जी व्यक्ती स्वत: तिथे उभी आहे, फोटोकाढत आहे तिलाकाहीच त्रास होणार नाही का? त्रास झाला तरी त्याना त्यांचे काम करावेच लागते. पत्रकार हे समाजाचे शॉक अ‍ॅब्सॉर्बर असतात. कुठल्याही घटनेचा पहिला धक्का ते पचवतात आणी मग ती घटना इतर जनतेपर्यंत सौम्यरीत्या पोचते.

नंदिनी शी पुर्णता: सहमत

..अरे फोटोचे काय घेऊन बसले ..त्या नराधमाला चांगलेच ठेचावे अश्यावेळेस त्याच गावतील लोकांनी.....
आताची नागपुरची.. घटना.... तिन तिन महिन्याचे गर्भ बॉटल मध्ये टाकुन ..कचर्‍यात सापडले.... व एक ७महिन्याचे सापडले... त्यांचे सुद्धा फोटो आले.... ... पण मला चिड त्या फोटो पेक्षा त्या निर्दयी बाईची आली...

Pages