'लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री' चर्चा

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2012 - 14:00

महिला दिन २०१२ च्या निमित्ताने घडवलेला निरभ्र : लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री परिसंवाद विशेषांक तुम्ही वाचला असेल किंवा वाचत असालच.

अंकामधे जाहिर केल्याप्रमाणे या विषयाच्या सर्व पैलूंवर सर्व बाजूने चर्चा होणे अतिशय गरजेचे आहे. त्याशिवाय विशेषांक पूर्ण होणार नाही.

या धाग्यावर लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख (आयडेन्टिटी) या विषयाची चर्चा करूया. चर्चा करताना काही थोडीशी पथ्ये पाळूया.
१. विशेषांकातल्या लेखांतले, लेखांबाहेरचे सर्वच मुद्दे घेऊन अवश्य चर्चा करू. विशेषांकामधे काय बरोबर नाही, संपादक मंडळाचे कुठे चुकते आहे याचा उहापोह इथे नको. तो त्या त्या लेखाच्या धाग्यावर करू.

२. आपली भाषा, आपण वापरत असलेली उदाहरणे या सगळ्यांचा सभ्यतेच्या संदर्भातून विचार करणे अतिशय गरजेचे. धागा मॉडरेटेड असणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.

- संपादक मंडळ

विषय: 

बाफवर चाललेली चर्चा ही भिन्नलिंगी सहजमैत्री वर चालू आहेसं वाटतं. लिंगाचा विचार होणार असेल तर त्या मैत्रीला लिंगनिरपेक्ष म्हणू नये हा सूक्ष्म फरक आहे.

हे फार टोकाचे विधान आहे. माणूस आज आदिमानव नाही. समाजात राहतो. त्याला विचार करता येतो. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवता येते. समोरच्या प्रत्येक व्यक्तीकडे लिंगनिरपेक्षतेने पहावे असे कोणीच म्हटलेले नाही. लिंगनिरपेक्षता म्हणजे संन्यास नव्हे>>

सन्यास ठरवून घेतला जातो मयेकर!

(मला तरी) एक गोंधळ (पुन्हा) जाणवत आहे (ही टीका नव्हे) की लिंगनिरपेक्षता ही एखादी ठरवून केली जाण्यासारखी अथवा 'करावी अशी' बाब आहे असे काहींना (/ अनेकांना) वाटत आहे. लिंगनिरपेक्ष होताच येणार नाही हे तितकेसे मान्य होत नाही आहे. लिंगनिरपेक्षता कशी काय अंगी बाणता येईल यावर कृपया चर्चा होऊ शकेल का असे एक विचारायचे आहे. Happy

===============================

<<<असं ठरवून कोणाकडे आकर्षित नाही होता येत. भिन्नलिंगी आकर्षणात प्रत्येक भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटतं का? लैंगिक विचार मनात येतात का?
समलैंगिकता ठरवून अंगिकारता येते हे अज्ञानमूलक विधान आहे.

मुळात लिंगनिरपेक्षता आणि लैंगिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे समजून घ्यायची गरज आहे. (ते मान्य नसेल तर पुढे बोलण्यात अर्थ नाही)>>>

मयेकर, पुन्हा एक मुद्दा नोंदवायचा प्रयत्न करतो. (वरील, आकर्षित होणे वगैरे ही केवळ लिंगनिरपेक्षतेच्या अस्तित्वातील काही व्हर्जन्स होती. तितके म्हणजेह लिंगनिरपेक्षता असे मला म्हणायचेच नाही आहे)

पुन्हा आधीचा मुद्दा लिहिण्याचा प्रयत्न करतो:

शारिरीक आकर्षण (एखाद्या क्षणी किंवा बहुतांशी वेळा) नसणे याचा अर्थ माणूस तेव्हा लिंगनिरपेक्ष झालेला असतो असे नव्हे. Happy

तो केवळ कामेच्छेपासून दूर गेलेला असतो.

दुसरी व्यक्ती पुरुष आहे की स्त्री याबाबत तो ठामच असतो.

आयुष्यात कधीही शरीरसंबंध न केलेले ब्रह्मचारी किंवा काही स्त्रिया याही लिंगनिरपेक्ष नसतातच.

धन्यवाद

पण म्हणून लिंगनिरपेक्षता संपूर्णपणे नाकारायची का? नाकारू शकतो का? तर नाही असे मला वाटते.>>

आता चर्चा स्त्री पुरुष समानता येथून दुसरीकडे वळल्याचे स्पष्ट लक्षण (मला तरी) जाणवले (व हे विधान आगाऊ वाटल्यास क्षमा करा).

पार्शल लिंगनिरपेक्षता असू शकते का? तर मलाही वाटते की असू शकते. जसे तान्हे मूल हे मुलगी आहे की मुलगा, आई ते विसरू़न त्याचे संगोपन करते. यात मुलाचे (अपत्याचे) लिंग महत्वाचे नसते. पण ही लिंगनिरपेक्षता एकतर्फी म्हणावी लागेल कारण त्या अपत्याचे तस्सेच संगोपन त्याचे वडील करू शकत नाहीत किंवा (फॉर द सेक ऑफ अर्ग्युमेन्ट ) एखादी दुसरी (/ अननुभवी) स्त्री करू शकणार नाही. (मात्र गंमतीचा विरोधाभास असा की त्याहीवेळी आईला मुलाचे लिंग काय याची ठाम जाणीव सातत्याने असेल आणि त्या तान्ह्या मुलाला मात्र हे माहीतच नसेल की आईचे जे काही लिंग आहे त्याव्यतिरिक्त काही लिंग जगात असते व त्यापुरते ते लिंगनिरपेक्ष झालेले असेल) Happy

असे नाते सातत्याने नसले तरी एखाद्या क्षणी भिन्नलिंगीयांमध्ये नक्कीच निर्माण होउ शकेल.

जसे, विमान कोसळल्यानंतर समजा दोनच माणसे जिवंत राहिली, एक स्त्री आणि एक पुरुष! तर ते एकमेकांना वाचवतील किंवा (म्हणजे ते पूर्ण शुद्धीत असले व वाचवायची क्षमता असली तर) तसा प्रयत्न तरी करतील. (हे केवळ मानवतावादी माणसांना लागू आहे व त्यांचे जीव एकमेकांच्या जीव जाण्यावर अवलंबून असतील तर ते तसा प्रयत्न करणार नाहीत हे खरेच). त्यावेळेस त्यांच्यातील लैंगीक भेदभाव बर्‍याच प्रमाणात नष्ट झालेला असेल असे मला वाटते.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मुलगी वयात आल्यानंतरच्या समस्या ती वडिलांबरोबर शेअर करत नाही. आईबरोबर करते. इथंच आपली लिंगनिरपेक्षता संपते. इथे आई तिची मैत्रीण होऊ शकते. वडील मित्र होऊ शकतात पण काही बाबतीत नाही. असं अर्धवटपण का येतं ? मेंदूच्या बॅक अप मेमरीमधे कायम लिंगभिन्नतेचा विचार असल्याने. हे संस्कार एकदा झाले कि पुढे लिंगनिरपेक्षता कशी बाणवली जाऊ शकेल ? ती घरापासूनच सुरू व्हायला हवी. मैत्रिणीबरोबर होऊ शकणारी चर्चा एका चांगल्या मित्राबरोबर नाजूक गोष्टींबाबत होऊ शकत नाही. म्हणजेच कॉमन इश्युज वर मैत्री हे तर कुठल्याही मैत्रीचं लक्षण आहे. कॉमन इश्युज वर एकत्र आलं तरी पुढे मैत्री झाल्यावर पडदे गळून पडतात. हे भिन्नलिंगी मैत्रीत कितीदा घडतं ?

म्हणूनच भिन्नलिंगी सहजमैत्री हा शब्दप्रयोग वापरला जावा असं सुचवावंसं वाटतं. दोन व्यक्तीतल्या मैत्रीमधे त्यांच्यातली लिंगभिन्नता विसरली जाणे हे लिंगनिरपेक्ष या संज्ञेमधे अपेक्षित आहे. या संज्ञेचा इतिहास अन्यत्र दिलेला आहे. इथं देत नाही , त्याची गरज आहे असं वाटतही नाही.

माझ्याकडून या चर्चेला पूर्णविराम.

मेंदूच्या बॅक अप मेमरीमधे कायम लिंगभिन्नतेचा विचार असल्याने. हे संस्कार एकदा झाले कि पुढे लिंगनिरपेक्षता कशी बाणवली जाऊ शकेल ? ती घरापासूनच सुरू व्हायला हवी.>>

वा

आता आठवले की मी हे व असेच काही माझ्या लेखात म्हणालो होतो Happy

निसर्गाला मुळातच लिंगनिरपेक्षता अभिप्रेतच नाही. निसर्ग सांगतो की लैंगीक परिचयाला पूर्ण महत्व द्याच द्या. >>

निसर्ग म्हणजे नक्कि काय? त्याला हेतु / भाव भावना विचार कसे चिकटवता येतील? डार्वीनच्या उत्क्रांती सिद्धांता नुसार सभोवतालच्या प्रिस्थितिवर मात करु शकेल अशा सजीवांच्या पिढ्या निर्माण करणे ह्या एकमेव उद्देशाने सजीवांचे प्रजनन चालते. त्या नुसार उत्क्रांतीच्या कुठल्यातरी टप्यावर 'नर' आणि 'मादि' ही जैवीक रचना यशस्वी ठरली व ती त्यानंतरच्या उत्क्रांतीतील सजीवांच्या जीवनाचा भाग झाली. ह्यात कुठेही निसर्गाचा खास हेतू नाही. बरेच इन्वेर्टिब्रेट्स दोन्ही लिंगाचे असु शकतात [संदर्भ१, संदर्भ२] व प्रजोत्पादनातील दोन्ही पार्ट्नर नर किंवा मादी म्हणुन वागू शकतात. माणसाची उत्क्रंती अशा प्राण्यापासुन झाली असती तर?

नर व मादी ह्यानी प्रजोत्पादनास अनुकुल वेळॅस एक्त्र यावे ह्या करता उत्क्रंतीच्या रेट्यात सजीवांनी वेगवेगळॅ मार्ग शोधले. बरेच प्राणी ठरावीक काळात प्रजोत्पादनास अनुकुल असतात. ही अनुकुलता रासायनिक बदलानी निर्देशीत होते व ह्या काळातच नर व मादी एक्मेकाच्या कडे खेचले जातात. हे रासायनिक बदलांचे घड्याळ पर्यावरणाशी उत्क्रांतीने बांधलेले असते.

नर व मादी हे जेंव्हा एकत्र येउन प्रजनन करतात तेंव्हा प्रत्येक वेळेस मादीच त्या प्रजननीत जीवाची काळजी वाहते असेही नाही. निसर्गात सजीवाच्या उत्क्रांतीत जे टिकले ते राहिले ह्या तत्वावर काहि प्राण्यात [सीहोर्स ) नर हाच प्रजननीत अप्त्याची काळजी वहातो. मादीचा त्यात कहीही सहभाग नसतो.

माणसाच्या माकड ते माणुस ते तंत्रविशारद माणुस ह्या प्रवासात पाहिले तर. माकडांची समाज रचना ही पुढे माणसाच्या समाजरचनेचा पाया आहे हे लक्षात येते. अल्फा मेल व त्याच्या साम्राज्यातिल त्याच्या मालकीच्या माद्या ह्या रचनेचा खोलवर ठसा माणसाच्या पितृसत्तक प्रणालीवर आहे असे मला वाटते. ह्यात लिंगाधिष्टित कामाची विभागणी , मादिच्या प्रजनन व अपत्य संगोपन ह्या जबाब्दार्या व त्याच्या सभोवतानी रचलेली व जन्माला आलेलेई संस्कृती ह्यांचा समावेश होतो. ही समाज रचना माकडासाठी योग्य असली तरी आजच्या तंत्राधिष्टित मानवासाठी कितपत योग्य आहे हा खरा प्रष्ण आहे.

तंत्राच्या जोरावर उत्तम प्रजोत्पादनासाठी नर व मादी शरिरांची मानव नावाच्या सजीवाला आवश्यकता नाही हे प्रजनन इतर प्रकारे करु शकता येते. जसे जसे हे समाजमन्य व सोपे होइल तशी नर व मादी ह्या शरिर वैशिष्यांचि गरज उरेल का?

आजच्या जिवनक्रमात भिन्न लिंग व्यक्तीतील लिंगाधिष्टित दृष्टिकोन सामाजीक कंडिशनींगमुळेच आहे असे मला वाटते. व हा दृष्टिकोन सामजीक कंडिशनिंगनीच जाउ शकतो. त्या दृष्टिने पुर्णतः लींगनिरपेक्ष असणॅ शक्य आहे असे मला वाटते. निसर्गाचा ह्यात कुठलाही खास विचार असण्याचे कारण नाही....

बेफिकीर , तुमच्या आधीच्या पोस्ट्समधील पुनरुत्पादनाची प्रक्रिया, तदनुसार परस्पर आकर्षण, इ.इ.मुद्द्यांना धरून माझ्या पोस्ट्स होत्या. तुमच्या पोस्ट्सचा सूर लिंगनिरपेक्षता ही लैंगिकतेतही येईल की काय, त्यामुळे पुनरुत्पादनाची प्रक्रिया खंदित होईल.... असा सूर होता.

<लिंगनिरपेक्ष होताच येणार नाही हे तितकेसे मान्य होत नाही आहे.>
मान्य नाहीच आहे.

समोरची व्यक्ती (किंवा मी स्वतः) स्त्री आहे की पुरुष आहे याने परिस्थितीत/वर्तनात/विचारात फरक पडत नाही अशी मनोधारणा म्हणजे लिंगनिरपेक्षता ही व्याख्या पटेल का? यात जीवशास्त्रीय क्रिया बाजूला सारल्या तर लिंगसापेक्षताच्या धारणा सोशल कंडिशनिंगमुळेच तयार होतात हे स्पष्ट व्हावे.

पुनश्च - मला वाटते जेंडरलेस आणि सेक्सलेस यात मराठीत फरक करता येत नसल्याने चर्चा जीवशास्त्रीय मुद्द्यांत घुसते आहे.

समान कामासाठी समान पगार.
पुनरुत्पादन, वैषयिक प्रेम इत्यादीशी संबंधित नाती सोडल्यास इतर ठिकाणी केवळ व्यक्ती म्हणून वावरणे. (जाणीवपूर्वक नव्हे, आपोआप) ही जेंडरलेस ओळख. ती शक्य आहे आणि आवश्यकही आहे. सानीच्या लेखातील एकत्र आंघोळी करणार्‍या जर्मनांचे उदाहरण पहावे.
माझ्या जर्मन मैत्रिणीने तिच्या इंग्रज जोडीदाराचा पहिल्या अश्या सार्वजनिक आंघोळीचा अनुभव सांगितला. की त्याला संकोचाने मान वर करणे कठीण झाले. शिवाय लैंगिक भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण वाटले. तो ५/ १० मिनिटात तिथून बाहेर पडला. मात्र पुढे सरावाने त्यालाही निवांतपणे सार्वजनिक आंघोळ जमू लागली.
बालपणापासून असे संस्कार झाले तर अर्थातच अवघडलेपण येत नाही.

ह्या चर्चेत खालील माहिती उपयुक्त ठरेल म्हणून देत आहे.

(एका एड्स जागृती विषयी काम करणार्‍या संस्थेच्या संस्थळावर ही माहिती इंग्रजीत उपलब्ध आहे)

लिंग / सेक्स = तुम्ही ज्या शरीर-रचनेला घेऊन जन्मलात त्यानुसार ठरते. (स्त्री / पुरुष)

जेण्डर = तुमची इतर लोकांच्या संदर्भातील ओळख व वर्तणूक. सामाजिक संकल्पनेनुसार तुम्ही स्वतःला स्त्री / पुरुष म्हणून ओळखणे व तुमचे त्यानुसार वर्तन.

खालील प्रश्न स्वतःला विचारून पाहा :

# स्त्रिया व पुरुषांमध्ये काही सामायिक विशेषता/ खासियत आहे का? की त्यांच्यातील विशेषता ही केवळ त्या त्या लिंगाशी संबंधितच आहे?

# स्त्री व पुरुष यांच्यात फरक असेल तर तो नक्की कोणता? मुलाला जन्म देणे अथवा दाढी असणे हे शरीराच्या लिंगावरून ठरते का?

# जर स्त्री-पुरुषांच्या दोन्ही समूहांमध्ये शरीराशी संबंधित नसलेल्या अनेक प्रकारच्या विशेषता समान असतात/ असू शकतात तर मग दोन्ही समूहांमध्ये भेद-भाव का केला जातो?

'जेन्डर' व 'सेक्स' या दोन संकल्पनांत अनेकदा बराच गोंधळ असतो.

खालील विधाने बरोबर अथवा चूक हे न ठरवता तुम्हाला ते जेन्डर शी निगडित आहे की सेक्सशी निगडित वाटते, याचे प्रामाणिक उत्तर स्वतःच स्वतःला द्या.

१. पुरुष स्वयंपाक करू शकत नाहीत. (जेन्डर / सेक्स)
२. स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी पैसे मिळवतात. (जेन्डर / सेक्स)
३. स्त्रिया बाळांना स्तनपान करू शकतात. (जेन्डर / सेक्स)
४. बायकोच्या बदलीच्या ठिकाणी / गावी पती आपली बदली करून घेऊ शकत नाही. (जेन्डर / सेक्स)
५. मुलांपेक्षा मुलींमध्ये शाळा अर्धवट सोडून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. (जेन्डर / सेक्स)
६. पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख असतो. (जेन्डर / सेक्स)
७. पुरुष रडत नाहीत. (जेन्डर / सेक्स)
८. पत्नी आपल्या पतीसमवेत शरीरसंबंधाविषयीची चर्चा करू शकत नाही. (जेन्डर / सेक्स)
९. स्त्रियांना पाळी येते, पुरुषांना येत नाही. (जेन्डर / सेक्स)
१०. मुलगी मुलाला मागणी घालू शकत नाही. (जेन्डर / सेक्स)
११. स्त्री धार्मिक नेता बनू शकत नाही. (जेन्डर / सेक्स)
१२. पुरुष गर्भधारण करू शकत नाहीत. (जेन्डर / सेक्स)

-------------------------------------------------------------------------

या प्रश्नांमधून खालील उत्तरापर्यंत पोहोचायला मदत होते :

सेक्स / लिंग :
१. जैविक / शारीरिक असते.
२. व्यक्तीच्या जन्मापासून असते.
३. त्याला बदलता येत नाही. (सर्जिकल हस्तक्षेपाशिवाय)
४. हे सार्‍या विश्वात एकसमान आहे.

जेन्डर :

१. सामाजिक रूपात निर्माण होते व शिकविले जाते.
२. कालानुरूप बदलू शकते.
३. वेगवेगळ्या समाजात, देशांत, काळात हे वेगवेगळे असू शकते.

इथे एक गंमत सांगावीशी वाटते. सोशल कंडिशनिंग हा एक भाग झाला. नैसर्गिक ऊर्मी हा दुसरा. दोन्हीही एकमेकाला पूरक असतात. जसे, जेव्हा मनुष्यसंख्या कमी होती तेव्हा "आपसूकच" समाजात मुले जन्माला घालायची स्पर्धा होती. आज मनुष्यसंख्या प्रमाणाबाहेर आहे तेव्हा "आपसूकच" समाजात कमी मुले जन्माला घालण्याची स्पर्धा सुरू आहे. हे जे नैसर्गिक ऊर्मी व समाजशास्त्राची एकमेकांत असणे आहे त्यानुसार उत्क्रांती होत असते.

साधारणपणे जेव्हा समाजात स्त्रियांनी घराबाहेर पडायला सुरुवात झाली, तेव्हा समाजातील एकत्र कुटुंबपद्धती कमी होऊ लागली. त्यामुळे आज न्यूक्लिअर फॅमिलीज आपण बघतो आहोत. अर्थात असे होण्यात स्त्रियांना दोष देण्याचा विचार नसून "काय घडले" हे सांगण्याचा प्रयत्न आहे.

न्युक्लियर कुटुंबपद्धतीच फायदा हा की प्रत्येकाला "स्वातंत्र्य" मिळाले. तोटा हा की प्रत्येक जण "स्वतंत्र" झाला!! या दोन्हींत "रुक्ष वृक्ष" व "नीरस तरु" असा दृष्टिकोणांतील मूलभूत फरक आहे. (वठलेले झाड तेच पण एखादा रसिक भाषेत त्याला "नीरस तरु" म्हणतो तर एखादा निगेटीव्ह, अरसिकपणे त्याला "रुक्ष वृक्ष" म्हणतो). पण त्यामुळे जीवनदृष्टीत जमीन-अस्मानाचा फरक पडतो.

थोडक्यात, सोशल कंडिशनिंग शेवटी निसर्गतःच होत असते...............

अरुंधती कुलकर्णी:
१. पुरुष स्वयंपाक करू शकत नाहीत. (जेन्डर / सेक्स)
२. स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी पैसे मिळवतात. (जेन्डर / सेक्स)
३. स्त्रिया बाळांना स्तनपान करू शकतात. (जेन्डर / सेक्स)
४. बायकोच्या बदलीच्या ठिकाणी / गावी पती आपली बदली करून घेऊ शकत नाही. (जेन्डर / सेक्स)
५. मुलांपेक्षा मुलींमध्ये शाळा अर्धवट सोडून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. (जेन्डर / सेक्स)
६. पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख असतो. (जेन्डर / सेक्स)
७. पुरुष रडत नाहीत. (जेन्डर / सेक्स)
८. पत्नी आपल्या पतीसमवेत शरीरसंबंधाविषयीची चर्चा करू शकत नाही. (जेन्डर / सेक्स)
९. स्त्रियांना पाळी येते, पुरुषांना येत नाही. (जेन्डर / सेक्स)
१०. मुलगी मुलाला मागणी घालू शकत नाही. (जेन्डर / सेक्स)
११. स्त्री धार्मिक नेता बनू शकत नाही. (जेन्डर / सेक्स)
१२. पुरुष गर्भधारण करू शकत नाहीत. (जेन्डर / सेक्स)

वरील प्रश्नांपैकी प्रश्न क्र. ३, ९ व १२ ही सेक्स शी संबंधी विधाने आहेत व इतर सर्व जेन्डर शी. बरोबर?

माफ करा..

सोशल कंडिशनिंग ही आपणच निर्माण केलेली गोष्ट आहे. सेक्स आणि जेण्डर हा वाद निरर्थक आहे. जेण्डर हे सेक्सच्या निमित्ताने सोशल कंडिशनिंगमधून निर्माण झालेली गोष्ट आहे. इथे खूप गोष्टी एकत्र करून त्याचा गोंधळ चालू आहे.

जर जेंडरलेस ओळख हा मुद्दा असेल तर ही संकल्पना आता रूजलेली आहे आणि गेल्या पंधरा वर्षात एक समाज म्हणून आपण खूपच प्रगत झालेलो आहोत. याचाच अर्थ या संकल्पनेचं रूजणं किमान पंधरा वर्षांच्या मागे सुरू झालेलं आहे. त्या दृष्टीने ही कल्पना इतकीही नवी नाही कि त्यावर सेक्स आणि जेण्डर सारखा गोंधळ व्हावा. समान वेतन वगैरेच्या मुद्द्यात बेफिकीर म्हणतात तसे स्त्री - पुरूष समानता हे मुद्दे मिक्स होताहेत.

जेण्डरलेस मैत्री कि भिन्नलिंगी सहज मैत्री - मुळात मैत्री कशाला म्हणायचं हे क्लिअर आहे का ? तर जेण्डरलेस मैत्रीबद्दल बोलता येऊ शकेल. यावर इथं आणि अन्यत्र भाष्य केलेलं असल्याने सध्या तरी त्यावर पुन्हा भाष्य करण्याची गरज वाटत नाही.

बरोबर दीपक. अर्थात प्रत्येक व्यक्तीचे आपापल्या आकलनानुसार उत्तर वेगळे येऊ शकते. कारण मनात सेक्स + जेण्डर विषयी असलेला गोंधळ.

सभोवतालच्या प्रिस्थितिवर मात करु शकेल >>>

हे डार्वीनने मानवाचे वर्णन केले की निसर्गाचे? मानवाने स्वतः जी प्रगती केली (अश्मयुगापासून जाळ निर्माण करणे, शिकारीपासून शेती, चार पायांपासून दोन पायांवर चालणे, उघड्या जगात राहण्यापासून घर बांधणे) या सर्वात मानवाचे संशोधन व प्रगती प्रत्यक्षात येण्यास लाखो वर्षे गेली, मात्र ते संशोधन प्रत्यक्षात आल्यावर त्याला समजले की हे आधीच करता आले असते व अशी अशी रासायनिक, भौतीकशास्त्रीय अथवा जैवशास्त्रीय प्रक्रिया झाली की असे असे होतेच. हे मानवाला निसर्गानेच शिकवले. काय खायचे हे वाढ झालेला मानव कसे समजतो? अश्मयुगातील मानव दगडाने जिवंत प्राण्यांची शिकार करण्याऐवजी दगडच का खायचा नाही? आपली शरीररचना काय खायला योग्य आहे हे त्याला कसे समजायचे? याचाच अर्थ निसर्ग नावाची एक बाब तेव्हाही अस्तित्वात होती व ती मानवाला ग्रॅज्युअली विविध धडे देत होती. हे पटले तर निसर्गाला काय अभिप्रेत असेल किंवा नसेल असा मुद्दा पटू शकावा असा अंदाज आहे. उत्क्रांतीवादाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मानव निर्माण होण्याआधीही इतर सजीव होते. निसर्ग तेव्हाही होता. निसर्गाला अधिकाधिक जाणणे याच प्रवासात सर्व उत्क्रांतीवाद आणि सर्व सजीव आहेत. निसर्गाचे अस्तित्व मान्य झाल्यावर निसर्गाच्या आवडीनिवडी असू शकतात हे मान्य व्हावे असे वाटते आणि मला तसे वाटत आहे. अर्थात, ते तसे नसणे कसे शक्य आहे हे सिद्ध झाल्यावर ( / झाले तर) आपोआपच माझा समज बदलेल.

आज ज्या तंत्रज्ञानाने प्रत्यक्ष समागमाशिवाय पुनरुत्पादन होऊ शकते ते मानवाला शोधक वृत्तीमुळे मिळाले असले तरी तशी तशी प्रकिया केल्यावर मानवी जीव जन्मू शकतो ही शक्यता निसर्गाने आधीच मान्य केल्याचाही अर्थ त्याला आहे. (इतकेच काय तर पुरुषाच्या स्कीनमध्ये असलेल्या एका विशिष्ट कुलूपस्वरुपी डी एन ए घटकामुळे एकटा पुरुष मूल जन्माला घालू शकत नाही हेही संशोधनांती समजलेले आह, ते कुलूप नसते तर एकाच लिंगाच्या एकाच व्यक्तीने सजीव जन्माला घातले असते आणि ते निसर्ग होऊ देत नाही आहे.) ते निसर्ग होऊ देत नाही यात लिंगनिरपेक्षता निसर्गाला अभिप्रेत नाही असा अर्थ आहे असे मी वाटून घेतले आहे.
========================================================

<<<समोरची व्यक्ती (किंवा मी स्वतः) स्त्री आहे की पुरुष आहे याने परिस्थितीत/वर्तनात/विचारात फरक पडत नाही अशी मनोधारणा म्हणजे लिंगनिरपेक्षता ही व्याख्या पटेल का?>>>

माझ्यामते तुम्ही स्वतः असे वागू शकत नाही. तसेच एखादी स्त्री तसे वागू शकत नाही. आता तो आंघोळीचा जो प्रसंग आहे तोच कल्पून बघितला तर एखाद्या विशिष्ट संस्कृतीतील माणसासमोर दुसर्‍या संस्कृतीतील स्त्री आंघोळ करणार नाही हे तिचे व त्याचे झालेले कंडिशनिंग ठरेल. पण लिंगनिरपेक्षतेमध्ये हा मुद्दा 'चर्चेलाच' येणार नाही. दोघांनाही काही वाटणारच नाही. लिंगनिरपेक्ष माणसांना भावनांवर नियंत्रण न राहणे व संकोच वाटणे या भावना अ‍ॅप्रिशिएटच करता येणार नाहीत. (हे झाले 'अ‍ॅबसोल्यूट लिंगनिरपेक्षतेबाबत'!) पण 'पार्शल लिंगनिरपेक्षतेत' आपण जे म्हणता तसे विचारात, वर्तनात अथवा परिस्थितीत फरक न पडणे हे व स्त्री पुरुष समानता यातील सीमारेषा कोणती इतकाच माझा प्रश्न होता व आहे.

===================================

<<<पुनरुत्पादन, वैषयिक प्रेम इत्यादीशी संबंधित नाती सोडल्यास इतर ठिकाणी केवळ व्यक्ती म्हणून वावरणे. (जाणीवपूर्वक नव्हे, आपोआप) ही जेंडरलेस ओळख. ती शक्य आहे आणि आवश्यकही आहे>>>

म्हणजे समजा असे उदाहरण घेतले की एक मुलगा (५ वर्षांचा) आणि एक मुलगी (३ वर्षांची) यांना तिसरा माणूस नसलेल्या (बाकी अन्न पाणी निवारा असलेल्या) प्रदेशात मुद्दाम ठेवले व ते वयात आल्यानंतर यथावकाश त्यांचे 'लैंगीक' व 'अलैंगीक' वर्तन पाहिले तर एकदा लैंगीक वर्तन सुरू झाल्यानंतर (म्हणजे पहिल्या वेळेस त्यांनी प्रेम केल्यानंतर - जर केले तर) नंतर ते ती भावना पूर्णपणे मनापासून लांब ठेवून एकमेकांशी वागू शकतात असे आपल्याला म्हणायचे आहे. (कंडिशनिंग नसले तरीही).

माझ्यामते लैंगीक आकर्षण हेही निसर्गानेच इन्स्टॉल केलेले असल्याने त्यांना एकत्र ठेवल्यापासूनच त्यांच्यात सूप्तपणे असे आकर्षण जन्मास येईल व वयात आल्यावर व काय करायचे हे कळल्यानंतर ते प्रत्यच करणे ही केवळ त्या आकर्षणाची प्रत्यक्ष परिणती ठरेल व त्यानंतर ते एकमेकांमधील लैंगीक नाते कधीच विसरू शकणार नाहीत व क्षणोक्षणी त्यांना त्याची जाणीव होईल. कंडिशनिंगने बहिण कोण आणि मैत्रीण कोण हे समजेल किंवा आंघोळ दार लावूनच करावी हे समजेल, पण कंडिशनिंगशिवायही लैंगीक आकर्षण निर्मां होईल जे वयाच्या फारच आधीच्या काळापासून सुप्तावस्थेत असून केवळ तारुण्यात कृती स्वरुपात व्यक्त होईल.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफिकीर

तुमच्या वरच्या पोस्टमधे त्यांच्यात जे नातं असेल ते सेक्शुअली वा नॉन स्केशुअली प्लेटोनीक रिलशनशिपच्या अपेक्षित पातळीजवळ जाणारे असेल. जेण्डरलेस हा क्रायटेरिया इथे पूर्ण होतो. पुढची अट - अध्यात्मिक ओढीची.. ती साध्य होईलच असं नाही. त्याला प्रशिक्षणाची गरज आहेही आणि नाहीही.

लिंगनिरपेक्षता:- मानवी आचार-विचारांची एक अशी पातळी जिथे लैंगिकतेचा कोणताही परिणाम न होऊ देता एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला स्वतः इतक्याच सन्मानाने वागवते...

या पुस्तकाचा सारांश असा दिला आहे:
Though a lot of things go into constructing gender identity of boys and girls, their exposure to popular literature as a social process, stands out different, since it occurs in their private and inner space. The fear, insecurities, dreams and aspirations which the child must have acquired through socialization, get re-organized or reconstructed through the child's reflections on the experience of going through popular literature. This study is but an attempt to understand how genres of such literature come into play in the construction of identity of boys and girls. The author also explores different nuances of 'othering' each boy or girl confronts and negotiates with triggered by the milieu and characters of the book.

"'लिंगनिरपेक्ष ओळख" असा कुठेही उल्लेख नाहिये. मग मुळात ही कविकल्पना आली कोणाच्या सुपीक डोक्यातून?

कवीकल्पना कुठून का येईना
लिंगनिरपेक्षता / लिंगनिरपेक्ष ओळख ही प्रत्यक्षात येऊ शकते. येतेय, आहे.

लिंगनिअपेक्ष मैत्रीबद्दल पूर्वी याहू ग्रुप्स आणि नंतर ओर्कुट कम्युनिटीजमधे खूप छान छान चर्चा पहायला मिळायच्या. त्यात एकाने एक सुंदर वाक्य कोट केलं होतं

ज्या दिवशी अ‍ॅडम आणि इव्हने सफरचंद खाऊन वस्त्र परिधान केली त्या दिवशी त्यांच्यातली जेंडरलेस मैत्री / संबंध संपले.

याच घटनेभोवती तिथे खूप विचारमंथन केलेलं आढळलं. न्युड सोसायटी या कल्पनेला आपल्याकडे हास्यास्पद समजले गेले तरी त्यामागे मूळ विचार हाच आहे. हा टोकाचा आहे हे सांगायला नकोच. लिंगनिरपेक्ष संबंध / मैत्री ही थोड्याफार प्रमाणात वैद्यकिय पेशातल्या स्त्रीपुरूषांमधे पहायला मिळते. पेशाच असा आहे कि निषिद्ध असं काही मानलं जात नसल्याने स्त्री / पुरूष भेदापलिकडे जाऊन गप्पा अथवा मैत्री पहायला मिळते.

चर्चेत एकुणच प्रचंड गोधंळ दिसत आहे. तो मराठी लिंगनिरपेक्ष शब्दामुळे. कारण तो ढोबळमानाने जेण्डर लेस अन जेण्डर बायस असा इथे अनेकजण हवा तेंव्हा वाकवत आहेत.

चर्चेत दोन गोष्टी वेगवेगळ्या असायल्या हव्यात. स्त्रि पुरूषांमधील निसर्गनिर्मित फरक आणि मानव निर्मित फरक अरुंधतीचे प्रश्न जेण्डरलेसच्या जवळ नेऊ शकतात. आता स्त्रिया आणि पुरूष ह्यात फारसा काही फरक उरला नाही. (निसर्गनिर्मित आहे तो सोडून) त्यामुळे इथे जेण्डरलेस म्हणजे मानवनिर्मित फरक जो आहे त्यावर चर्चा अपेक्षित आहे.

ज्या दिवशी अ‍ॅडम आणि इव्हने सफरचंद खाऊन वस्त्र परिधान केली त्या दिवशी त्यांच्यातली जेंडरलेस मैत्री / संबंध संपले >> नाही वाटत कारण आजही (रादर काही वर्षांपूर्वी) अदिवासी समाजात नग्नतेकडे "कॉमन" म्हणूनच पाहिले जाते. केवळ जेंव्हा इच्छा निर्मिती होते तेंव्हा लैंगिक दृष्टीने पाहिल्या जात असे. त्या समाजा सर्व कामे सर्व करत त्यामुळे तो खरा लिंगनिरपेक्ष समाज असे म्हणायला हवे. दुसरे उदाहरण म्हणजे दिंगबर अवस्थेतील जैन साधू. अर्थात माझ्या ह्या उदाहरणाने तुमच्या मुद्याला पुष्टी मिळते आहे पण हा मुद्दा ह्या चर्चेतच येऊ नये कारण कुठलाही समाज "जेण्डर लेस" समाज असू शकत नाही. "जेण्डर बायस" हे थोडे वेगळे असते. आणि चर्चा फक्त "बायस" वर व्हावी असे वाटते.

तरिही ..

मला बेफिकीर ह्यांनी मांडलेले काही मुद्दे पटले. उदा त्यांचे हे वाक्य "ते वर्तन लिंगनिरपेक्ष नसते 'कामेच्छाविरहीत' असते" हे अगदी योग्य आहे. बरेचदा सुप्तावस्थेत ही बाई, तो पुरुष असे वर्तन स्त्री आणि पुरूष दोघांकडूनही आपोआप होत असते मग त्याला तुम्ही कुठलेही नाव द्या. फारतर इथे असे काहीच नसते असे म्हणून बोळवण होऊ शकते पण अस्तित्वात मात्र हे असते.

स्वातीने आधी लिहिल्यासारखे हा लढा (असेलच तर) वैयक्तीक आहे. जेण्डर बायस असू नये असे मला वाटते पण जेण्डर लेस काही पटणार नाही. अहो तिकडे एखादी सुंदर स्त्री दिसली तर, क्या बात है असे अगदी मनातही म्हणालो नाही तर निसर्गनिर्मितीचा अपमानच! तसेच एखादा हंक दिसला तर तर स्त्रियाही म्हणतातच की! आणि असे म्हणल्याबरोबर तो किंवा ती कामुक दॄष्टीनेच त्याच्या /तिच्याकडे पाहतो असा समज करून घेणे पण हास्यास्पद्च ठरेल. कारण मग परत "कामेच्छा" रोल प्ले करते.

तसं नव्हे "बिनआयडीचे खाते" (!), मला म्हणायचंय की मुळात हा लेख तनया मोहंती यांनी "This study is but an attempt to understand how genres of such literature come into play in the construction of identity of boys and girls"' यासाठी लिहिला असे या सारांशात म्हटाले आहे. मराठीत याचा अर्थ साधारणपणे असा होतो : "हा अभ्यास अशासाठी केला गेला की "अशा तर्‍हेचे" (पॉप्युलर) साहित्यप्रकार मुले व मुलींच्या लैंगिक ओळखीच्या धारणेवर काय परिणाम घडवतात हे पाहणे"
पुढे असेही लिहिले आहे : The author also explores different nuances of 'othering' each boy or girl confronts and negotiates with triggered by the milieu and characters of the book. अर्थात, :"अशा पॉप्युलर साहित्यप्रकारांतून प्रत्येक मुलाला वा मुलीला "इतरपणाची" जी न्यून जाणीव येते त्यावर ही मुले कशी मात करतात हे पाहणे". (इथे केवळ इंग्रजीतला सारांश दिला असल्याने कुठ्ल्या कॉन्टेक्स्ट मध्ये इंग्रजीतला सारांश दिला आहे हे कळत नसल्याने माझे भाषांतर थोडे रस्ता बदलून जात असल्याची शक्यता आहे.) पण मूळ मुद्द हा की "'लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री' हा विषय कुठे आणि मुळात संयोजकांनी दिलेल्या संदर्भात काय लिहिले आहे ते कुठे? असे नाही वाटंत?

शिवाय, नानबा यांनी मराठीतील अनुवाद म्हणून जे दिले आहे, त्याचा उल्लेख सारांशात अजिबातच कसा नाही? असे वाटल्यावाचून राहत नाही. संपादक मंडळाने यावर प्रकाश टाकल्यास उत्तम.

Happy अहो "बिनआयडीचे खाते"!! तुमचे नाव (अर्थात आयडी हो) तुम्हाला कोणी सुचवले की तुमचे तुम्हीच? मस्त कल्पना आहे तुमची. पण हाक मारताना ते हिंदी सिनेमासारखे "बिन ***** की ****" असे काहीतरी म्हणतात ना, तसे वाटते. Happy

दीपक भिडे,
१. मी ज्याचा अनुवाद केला आहे तो लेख स्वत: तनया मोहांतीनीं ह्या उपक्रमासाठी लिहून दिला आहे - तो ह्या गुगल डॉक्युमेंट वरच्या लेखातून घेतला नाहिये.
२. उपक्रमाचा विषय तनया मोहांतीच्या लिंगनिरपेक्षतेच्या/सापेक्षतेच्या अभ्यासावरुन प्रेरित होऊन घेतलेला नसून, विषय विचार करण्यासारखा वाटला म्हणून घेतला आहे. तनया मोहांतींचा ह्या विषयात अभ्यास असल्यानं त्यांना रिक्वेस्ट करुन लेख मागवला होता.
पण तरिही इतर लिहिणार्‍यांची/वाचकांची वेगळी बाजू, वेगळा अनुभव असू शकतोच.

परिसंवादाचा हेतू दोन्ही बाजूंवर चर्चा घडवून आणणे (जेणेकरुन विषयावर विचार होऊन ते अधिकाधिक स्पष्ट होत जातील)
संपादक मंडळाची वैयक्तिक भूमिका काय हे लेख निवडताना बाजूला ठेवण्यात आलेलं आणि म्हणूनच लिंगनिरपेक्षता "शक्य असते" आणि "व्यवहारात ती शक्य नसते" असं म्हणणार्‍या दोन्हीही बाजूंचे लेख अंकात दिसतील.

माझ्यामते लैंगीक आकर्षण हेही निसर्गानेच इन्स्टॉल केलेले असल्याने त्यांना एकत्र ठेवल्यापासूनच त्यांच्यात सूप्तपणे असे आकर्षण जन्मास येईल व वयात आल्यावर व काय करायचे हे कळल्यानंतर ते प्रत्यच करणे ही केवळ त्या आकर्षणाची प्रत्यक्ष परिणती ठरेल व त्यानंतर ते एकमेकांमधील लैंगीक नाते कधीच विसरू शकणार नाहीत व क्षणोक्षणी त्यांना त्याची जाणीव होईल. कंडिशनिंगने बहिण कोण आणि मैत्रीण कोण हे समजेल किंवा आंघोळ दार लावूनच करावी हे समजेल, पण कंडिशनिंगशिवायही लैंगीक आकर्षण निर्मां होईल जे वयाच्या फारच आधीच्या काळापासून सुप्तावस्थेत असून केवळ तारुण्यात कृती स्वरुपात व्यक्त होईल.
>> बेफिकिर,
लिंगनिरपेक्ष ओळख (आयडेंटिटी किंवा मैत्री) म्हणजे काय - मला अगोचा लेख ह्याकरता खूप छान सेल्फ एक्स्पनेटरी वाटलेला.
स्वत:च्या लैंगिक गरजा नाकारणं, आपण बाई आहोत किंवा पुरुष आहोत हे नाकारणं असा अर्थ नाहिये ह्याचा.
मैत्रीबद्दलः जेव्हा तुमची भिन्नलिंगी व्यक्तीशी मैत्री होते तेव्हा प्रत्येक व्यक्तीबद्दल तुम्हाला लैंगिक आकर्षण/विरुद्धलिंगी आहे म्हणून घृणा वाटते का - का लिंगापलिकडे जाऊन फक्त मैत्री म्हणून विचार होतो? हा कळीचा प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसार - माझे जे मित्र आहेत त्यांच्याशी बोलताना ते पुरुष आहेत हा मुद्दा येत नाही. ते केवळ मित्र असतात - मात्र त्यांच्यातला 'पुरुष' (कुठल्याही अर्थानं) मधे आला तर मैत्री टिकेल का हा प्रश्न आहेच.
ह्याचउलट नवर्‍याच्या केस मधे नवरा बायकोचं नातं असतानाही ह्याच नात्यात जेंडरलेस मैत्री अनुभवायला मिळते. ह्यात जसा जेंडर स्टिरिओटाईपच्या बाऊंडरिज मोडणं हा मुद्दा आहे तसाच दिनेशदांच्या, आगाऊच्या लेखात सांगितलेल्या मैत्रीच्या छटाही आहेत. म्हणजेच ह्या नात्यात - शारिरिक आकर्षण असतानाही जेंडरलेस मैत्री असू शकतेच.
---
आयडेंटिटी बद्दल वरचे अकुचे प्रश्न आयडेंटिटी बद्दल बोलताना कळीचे आहेत. जर जेंडर ही कल्पना काळानुसार बदलणार असेल, सांस्कृतिक संदर्भांनुसार बदलणार असेल - तर भविष्यात जेंडरलेस आयडेंटिटी हे सत्यही होऊ शकतं (उदा. मुलींनी नाटकात कामं करणं हे अगदी आधी सहज शक्य होतं - नटीला मान होता. मग काही शतकं ते अशक्य झालं म्हणून पुरुषच बायांच्या भूमिका करायला लागले आणि मग सध्या पुन्हा एकदा नटीला मान असण्याचे दिवस आलेत. तसंच कुठल्या जेंडरनं काय काम करावं हे कालप्रवाहाच्या कसोटीवर टिकणारं नसेल तर एक दिवस असाही येईल की जेंडर कल्पनेच्या बाऊंडरीजच सरळ सोप्या होऊन जातील.. Happy )

अजून बरच निरुपण करु शकले असते, पण ऑफिसचं काम आहे - ते करते आणि मग येते परत इथे.

घटकामुळे एकटा पुरुष मूल जन्माला घालू शकत नाही हेही संशोधनांती समजलेले आह, ते कुलूप नसते तर एकाच लिंगाच्या एकाच व्यक्तीने सजीव जन्माला घातले असते आणि ते निसर्ग होऊ देत नाही आहे.) ते निसर्ग होऊ देत नाही यात लिंगनिरपेक्षता निसर्गाला अभिप्रेत नाही असा अर्थ आहे असे मी वाटून घेतले आहे >>

हे कहिच्या काही आहे! बरेच एकपेशिय जीव जसे की बॅक्टेरिआ हे एसेक्शुअल असतात! क्लोनिंग्द्वारे त्यांच्या पुढच्या पिढ्या जन्म घेतात. सभोवतालच्या परिस्थितिवर अवलंबुन लिंगाधारीत वा लिंगविरहीत प्रजनन हे उत्क्रांतीमधे दिसते ह्यात निसर्गाला हे मान्य ते अमान्य असला 'देव आहे का नाहि" टाइप ड्रुष्टिकोनाची काय गरज? आज सस्तन प्राण्यांचेयुग आहे ह्याचे कारण उत्क्रांतीच्या एका टप्यावर सरपटणारे नामशेष झाले. आता ह्याला निसरगाला हेच 'हवे' होते हे म्हणायचे असेल तर काय म्हणावे?

समोरची व्यक्ती कुथल्या लिंगाची आहे हे माहिती असणे म्ह्णजे लिंगनिरपेक्षता संपली असा अर्थ कसा घेता येइल? जशी धर्म निरपेक्षता जात 'निर्पेक्षता तशाच अर्थी लिंगनिरपेक्षता अपेक्षीत आहे. समोरचा कोणत्या जातीचा आहे ह्यावर त्याचे समाजातील स्थान त्यने करावयाचि व न करावयाचि कामे अवलंबून होती. तसेच त्याच्याशि कसे वागावे हे संकेत समाजाने फर्मावलेले होते. आज समोरच्याची जात जरी माहीती असली तरि त्याबद्दलचा सामाजीक बायस 'जात न मानणार्यात' अजीबात नसतो. जरी समाजाच्या रेट्यात जात विसरणे /माहीत नसणे अशक्य असले तरी माणसे जात निरपेक्ष असतात. मला एक दृश्टिने लिंगाधिष्टित ओळख हा जातीचाच प्रकार वाटतो. समोरची व्यक्ती कुठल्या लिंगाची आहे हे माहित असली तरी त्याने काय फरक पडतो? समोरचा डोक्टर आहे हे कळल्यावर कपडे उतरवून 'हं मला तपासता का? माझे अमके तमके दुखते आहे' असे म्हणत नाही ना? तसेच हे आहे... लिंग माहित असणे व त्या माहीतीचा वापर करणे ह्या दोन भिन्न गोष्टि आहेत. लिंगनिरपेक्षीता हा ह्या अर्थाने अपेक्षीत आहे असे वाटते!

>>नंतर ते ती भावना पूर्णपणे मनापासून लांब ठेवून एकमेकांशी वागू शकतात असे आपल्याला म्हणायचे आहे.

बेटावर सोडलेल्या लहान मुलांचे काल्पनिक उदाहरण घ्यायची गरज नाही, जर्मनांचे उदाहरण समोर असताना. Happy तरी -
कोणताही मनुष्य २४ तास वैषयिक प्रेमात घालवत नाही. त्यामुळे बेटावरची मुले देखील वयात आल्यानंतर, लैंगिक संबंधांखेरीज इतर दैनंदिन कामांत जेंडरलेस वागतील. उदा. जर ती मुलगी वेगवेगळ्या पायवाटा, नकाशे लक्षात ठेवण्यात जास्त हुशार असेल तर प्रवासाची दिशा ठरवण्याचे तिचे असेल. केवळ ती मुलगी म्हणून तिला नकाशे कमी समजतात असा पूर्वग्रह नसेल.

बाकी उत्क्रांती माणसाची आत्ता आहे तशी जात निर्माण झाल्यावर थांबलेली नाही. म्हणजे इतर प्राणी, कीटक, जीवजंतूंच्या नवनव्या जाती निर्माण होत आहेत. उदा डीडीटीचा परिणाम न होणारे डास. दुसरे म्हणजे दगड खाऊ नये, फळे खावीत हे माणसाला कसे समजले हा छानच प्रश्न आहे. ते अनुभवातून समजले. म्हणजे दगड खाऊन बघितले, फळे खाऊन बघितली, मुंग्या खाऊन बघितल्या, विषारी पदार्थ खाऊन बघितले; आणि हे खाल्लेल्ल्यांचे काय झाले हे ज्ञान पिढी दर पिढी पुढे पुढे दिले गेले. तसे पाहिले तर मीठासारखा क्षार स्फटिक आपण खातोच. या एकत्रित ज्ञानामुळे आज आपल्याला तयार व्हायला महिनोन्महिने लागणारी वाइन सारखी पेये उपलब्ध झाली आहेत.

माझ्यासाठी लिंगनिरपेक्षता म्हणजे त्या व्यक्तीचे स्त्री/पुरुष असणे ही मैत्री करताना, कामाच्या ठिकाणी किंवा इतर व्यवहारात गौण बाब असणे. मैत्री करताना, एकत्र काम करताना निव्वळ लिंगावरून नकारात्मक भूमिका नसते आणि प्रेफरन्सही नसतो. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या स्त्री/पुरुष असण्याचा मला पूर्ण विसर पडतो का? तर याचे उत्तर - 'नाही'. कारण नैसर्गिक आणि सामाजिक असमानता.

धर्मनिरपेक्षता व जातनिरपेक्षता हे मानवतावादी दृष्टिकोनातून मानवाने मानलेले ध्येय व त्यासाठी केलेले प्रयत्न या सदरात येते.

लिंगनिरपेक्षता हीसुद्धा जर (सर्वांच्या मते) मानवतावादी दृष्टिकोनातून काही प्रभावित घटकांच्या पुनर्वसनासाठी किंवा त्यांना समान दर्जा देण्यासाठी आहे असे असेल तर स्त्री पुरुष समानता व लिंगनिरपेक्षता यात (माझ्यामते) फरक उरणार नाही.

लिंगनिरपेक्षता म्हणजे जर स्त्रीपुरुष समानता असे अभिप्रेत असेल तर या चर्चेतून या मुद्यापुरता मी बाजूला होत आहे.

चर्चा उत्तम झाली व सर्वांचे मनापासून आभार. Happy

मी लिंगनिरपेक्षतेचा जो अर्थ घेत होतो तो (पुन्हा माझ्यामते) काव्यमय, सुंदर व अधिक व्यापक होता व जवळपास काल्पनिक होता. त्याच कारणाने त्या मुद्यामुळे मी प्रचंड प्रभावित झालो होतो. माझा लेख विचारात घेण्याबद्दल व चर्चेत सहभागी करून घेण्याबद्दल आभारी आहे. Happy

-'बेफिकीर'!

Pages