सीता ...And The Story Of Princess

तिसाव्या मजल्यावरुन दिसणारा न्यूयॉर्कचा तो झगमगाट बघतांनाही सीता मनानं अजुनही भारतातच होती. सकाळीच महिन्याभरानंतर भारतातून परतलेली सीता मागचे कित्येक तास हनुवटी गुड्घ्यांवर टेकवुन खिडकीतून एकटक खाली रस्त्याकडे बघत होती. दुपार उलटुन संध्याकाळ केव्हाच झालीये पण सीता अजुनही खिडकीत, अविचल, अगम्य, एकाकी स्वतःच्याच मनाला भूतकाळातून वर्तमानात खेचुन आणायचा केविलवाणा प्रयत्न करतेय.

मागचा पूर्ण महिना प्रचंड वादळी गेलाय माझ्यासाठी. कल्पनेच्या पलिकडलं जग, मानवी नाती, निसर्ग, नशीब काय काय नाही अनुभवलय मी या महिन्याभरात. काय मिळवायला गेले होते मी? काय मिळवलय मी आणि काय मिळालय मला? या चकचकीत, सुरक्षित, साचेबद्ध आयुष्याबाहेरच, या महिन्याभरात पाहिलेल जग किती अनोख, अविश्वसनीय आणि अतर्क्य होतं माझ्यासाठी. इतरांच्या आयुष्यातले कितीतरी नवीन पैलु कितीतरी नवीन कंगोरे छाप सोडुन गेलेत माझ्या आयुष्यावर.

आई-बाबांची खूप आठवण येतेय आज. त्यांना भेटुनही दोन वर्ष होत आलीयेत. कशी असेल आई? भारतात असतांना कीत्तीवेळा वाटलं, धावत जाउन तिला मिठी मारावी, तिच्या कुशीत आसवांना मुक्त वाट करुन द्यावी ! मागे तिला मॅगेसेसे मिळालं तेव्हा शेवटचं बोलले होते तिच्याशी फोनवर, पण त्यालाही आता वर्ष लोटलंय. बाबा नक्कीच शिकागोमध्येच असणार आत्ता, त्यांनी तर स्वतःला ग्लोबल वार्मिंगच्या संशोधनाला वाहुनच घेतलय ! फोन करु त्यांना ? नाही ! नको ! त्यानंतर फाटणार्‍या माझ्या मनाला टाके घालायच बळ नाहीये माझ्यात. ती दोघं या घरातून जेव्हा गेली तेव्हा मीच म्हणाले होते.....................

'मला वाटेल त्यादिवशीच मी तुम्हाला भेटेन, तुम्ही मला भेटायचा मुळीच प्रयत्न करु नका, माझ्या आयुष्याच्या न सुटलेल्या गणितांची ऊत्तर मला मिळाली की येईन मी पुन्हा तुमच्याकडे परतून'
किती शांत आणि अविचल होती दोघही माझा तो निर्णय ऐकतांना, कदाचित माझा निर्णय आणि माझ्या क्षमतेवर गाढ विश्वास होता त्यांचा. आई-बाबांचे ते शेवटचे शब्द अजुनही आठवतायेत मला,
'बेटा जगाच्या पाठीवर कुठेही असशील ? फक्त एक हाक मार चिमणे, असेल तिथुन धाव घेऊ आम्ही तुझ्याकडे.'

काय घडलं असं दोन वर्षांपूर्वी? माझा काय दोष होता म्हणुन माझ्या वाट्याला ते दु:ख आलं? का मी असा कठोर निर्णय घेतला? आणि का आजही त्याची शिक्षा मी आई-बाबांनाही देतेय? दोन वर्षे झाली त्या घटनेला पण त्याचा ओरखडा अजुनही ताजा आहे माझ्या मनावर. पंचविसावा वाढदिवस होता ना त्यादिवशी माझा, त्याचदिवशी तर शेवटच बघितलंय मी आई-बाबांना. त्याचदिवशी तर ती वीज कोसळली.....................................

पंचवीस वर्षे ! कशी स्वप्नवत होती नाही माझी ती पंचवीस वर्ष ! मखमली, सुगंधी राजवाडयातल्या राजकुमारीसारखी. राजकुमारीच तर होते मी माझ्या आई-बाबांची. फुलासारखही नाही पिसासारखं आयुष्य होत माझं, हळुवार ऊडणारं, स्वच्छंदी.
बाबा U.N. मध्ये ग्लोबल वार्मिंग कमिटीचे हेड, आई प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती, भारत आणि अमेरिका सरकारचे कितीतरी पुरस्कार मिळालेत दोघांना त्यांच्या कामाबद्द्ल, आणि या दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या आईबाबांची मी एकुलती एक लाडकी लेक, त्यांची सीता. अर्धी भारतीय, अर्धी अमेरिकन. आणि मी तरी कुठे कमी होते होते माझ्या क्षेत्रात? हार्वर्ड मधुन इकॉनॉमिक्स्च गोल्डमेडल मिळवलय मी, यंग अचिव्हर म्हणुन कितीतरी इंटरव्ह्युज छापुन आलेत माझे. किती तरी मल्टिनॅशनल कंपन्यांनी मला जॉब ऑफर्स केले होते मला. जे जे करावसं वाटलं ते ते केलय मी. ऍड्व्हेंचर स्पोर्टस, पायलट ट्रेनिंग, मॉडेलिंग आणि काय काय नाही ? गीता, रामायण, आयुर्वेद काय काय नाही वाचलंय मी, किती शिकलेय मी या सगळ्यातुन. कित्ती देश कित्ती कल्चर्स पाहिलेत मी जवळुन? बाबांमधला संशोधक आणि आईमधलं भारतीयत्व पक्के ऊतरलेत माझ्यात.
फुलपाखरासारखं आयुष्य होतं माझं. आनंदान, उत्साहान ओसंडुन वाहणारं. "Ours was a just perfect family" आई-बाबांनीही किती एन्जॉय केलय लाईफ माझ्याबरोबर, त्यांच्या प्रिंसेसबरोबर. तो फॉरेस्ट गम्प म्हणतो तसा "Mamaa says, Life is a box of Chocolate........." माझं लाईफ बॉक्सच नाही तर चॉकलेटचा राजमहाल होता ज्याची मी राजकुमारी होते.

इकॉनॉमिक्सचं एवढं सक्सेसफुल करियर सोडुन "मी डिस्कव्हरी चॅनेलला जॉईन करतेय, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणुन" अस मी जेव्हा त्यांना सांगितलं, कापसाएवढा ही धक्का नाही बसला त्यांना, उलट आईनेतर मला आनंदान मिठीच मारली, मनस्वी पण करारी आईबाबांची मुलगी मी थोडीच त्यांच्यापेक्षा वेगळी असणार होते. त्यांनीही आत्तापर्यंत्त कसोशीन मनाला जे आवडलं, भावलं त्यातच स्वतःला झोकुन दिल होतं.

निसर्ग, मला भावलेला पहिला जादुगार, जमेल तेवढं त्याच्याजवळ जायच, त्याच्या अंतरंगात शिरायच हेच माझ स्वप्न होतं. त्याला कितीही समजण्याचा प्रयत्न केला तरी अजुन गुढ, अनाकलनीय होत जातो तो. रंग ऊधळणारं त्याच रुप क्षणात लाव्हा उधळतं तर वाळुच्या समुद्रावर क्षणात बर्फाच वादळ उसळतं. त्याच्या कोड्यांनी लहाणपणापासुन वेड लावल होतं मला. खुळ्यासारखी त्याची विविध रुप, त्या छटा माझ्या कॅमेरात ऊतरवत भटकायचे मी.

कॅमेरा माझ्या आईबाबांनंतरचा माझा सगळ्यात जवळचा सोबती. त्या क्लिकची नशा कायमची भिनलीय माझ्या नसानसात. जन्मभर तरी नाही उतरायची नक्की.
आईबाबांनाही माझ हे वेडं प्रेम ठाऊक होत नक्की म्हणुनच माझ्या डिस्कव्हरी जॉईन करण्याच्या निर्णयावर कित्ती खूष होते दोघेही.

पण आज का असं सारखं नॉस्टेल्जिक व्हायला होतय? का मन सारखं आई-बाबांकडे धाव घेतंय? मागच्या आठवड्यात भारतात डोळ्यांसमोर घडलेला तो प्रसंग !! ती छोटी प्रिंसेस तिचे प्रेमळ आई-बाबा............ !!!!! त्यांच्यामुळेच तर नव्हे? असेल बहुतेक..................................................

उद्या वाढदिवस आहे ना माझा, म्हणुनच खरं तर आई-बाबांची आठवण येतेय. माझ्या पंचवीसाव्या वाढदिवसाला आई-बाबांनी दिलेलं ते गिफ्ट ! पूर्ण आयुष्यच बद्लुन गेलंय माझं त्या दिवसानंतर, बाबांचे ते शब्द अजुनही कानात ठिणग्यांसारखे उडतायेत.

'बेटा आजचं तुझं हे पंचविसावं गिफ्ट, तुझ्या आईने आणि मी खूप वर्षे आधीपासुन ठरवुन ठेवलय त्याबद्दल..........' बाबांचा आवाज थोडा वेगळाच होता त्यावेळी.
'काय बाबा? लवकर सांगाना, तुमचं गिफ्ट नेहमीच अनोखं आणि अनमोल असतं माझ्यासाठी, माझा पहिला कॅमेरा ते मागची दक्षिण ध्रुवावरची सफर, तुमची गिफ्ट नेहमीच अमेझिंग असतात.......' केवढ्या उत्साहात विचारलं होतं मी.
'बेटा यावेळचं गिफ्ट अनोखं आहे पण अनमोल .........' आणि बाबा थांबले होते.
'ए आई सांगना ग लवकर काय आहे? मला नाही रहावत आहे आता, ए प्लीज, प्लीज सांगना.......' मी आईचा हात पकडत म्हंटल होतं
आई मंद हसली आणि बाबांजवळ गेली, बाबांनी डोळ्यांवरचा चष्मा काढला.......
'राणी माझ्या पिला, कळत नाहिये आम्हा दोघांनाही कस द्याव हे गिफ्ट तुला, पण हे गिफ्ट आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातलं एक सत्य आहे, एक धागा आहे.'............ आई माझ्याकडे न बघताच म्हणाली होती.
'कसलं सत्य, काय बोलताय तूम्ही? '........ माझा चेहरा प्रश्नार्थक झाला होता.
'तू आमची पोटची मुलगी नाहीस बेटा, आम्ही तुला ऍडॉप्ट केलं होतं तू सहा महिन्यांची असतांना............... भारतातून.............. पुण्यातल्या एका अनाथ आश्रमातून..............' विजेचा लोळ अंगावर यावा तस बाबांच ते वाक्य माझ्या कानांवर आदळलं.
'मी तुमची मुलगी नाही म्हणजे? मला काहीच कळत नाहीये'........ मी काय बोलतेय माझं मलाच कळंत नव्हतं. सर्वस्व हिरावुन घेतल्यासारखं झालं होतं. वादळानं चिमणीच इवलुस घरटं उध्वस्त करावं तसं उध्वस्त वाटत होतं.
'हे कसं शक्य आहे, मी तर तुमचीच सीता आहे ना?' माझ्या दोन्ही डोळ्यातनं आसवं वहात होती.
'आईsss..........बाबा हे काय म्हणतायेत, सांगना हे सगळं खोटं आहे म्हणुन..........' मी रडतच आईकडं बघितलं
तशी आई माझ्याजवळ आली आणि मी आईच्या गळ्यात पडले.
'हे खरं आहे बाळा, पण त्याने काहीच तर फरक पडत नाहीये आपल्या नात्यात. एक कर्तव्य म्हणुन तुझ्या कळत्या वयात आम्ही तुला हे सांगितलं बस्स, यापलिकडे काहीच तर अर्थ आणि महत्त्व नाहीये त्या सत्याला, तू आमचीच सीता आहे, आमची छोटी प्रिंसेस..............................' आईचा हात माझ्या डोक्यावरुन फिरत होता. मी मात्र ढसाढसा रडत होते.
'बेटा आम्ही खूप आधीच ठरवलं होतं, तू पंचवीस वर्षांची झाली की तुला हे सांगायच. नाहीतर सतत हे सत्य तुझ्यापासून लपवुन ठेवायचा सल मनात राहिला असता.......................' बाबा खांद्यावर थोपटत म्हणाले होते.
'का सांगितलंत तुम्ही मला हे? नव्ह्तं ऐकायचं मला हे सत्य ! का असं केलंत तुम्ही माझ्याबरोबर.........' मी रडतच बोलत होते.
'आई सांगना मला तुम्हीच माझे खरे आईबाबा आहात, सांगना खरच तुम्हीच आहात ना'...... मी आईच्या कुशीत शिरत म्हंटल.
'हो रे बाळा आम्हीच आहोत तुझे आईबाबा........ तु आहेस म्हणुन तर आम्ही आईबाबा आहोत............' आईचा प्रेमळ हात पाठीवरुन फिरतच होता. कितीतरी वेळ आईच्या कुशीत पडुन मी रडत होते.

का हे माझ्याच बाबतीत घडत होतं? का हे सत्य मला अजगरासारखं गिळु पहात होतं? हेच माझे आईबाबा तर का नाही मी त्यांच्याच पोटी जन्माला आले? नाही आले म्हणुन मी त्यांची मुलगी नाही काय? म्हणजे आईबाबांनी दिलेल प्रेम खर्‍या आईबाबांच प्रेम नव्हतं का? नाकारतेय मी हे सत्य ! पण कितीही नाकारायचं ठरवलं तरी ते सत्य लपणार होतं का? विसरता येणार होतं का? एका क्षणात अस अंधारुन का आलंय?
आईच्या कुशीत रडतांना मला तर ती माझीच आई वाटत होती, पण ही तीच कुस नव्हती काय ज्यात मी पहिल्यांदा रडले होते? बाबांचा खांदा ही तोच नव्हता का ज्याच्यावर मी पहिल्यांदा बागडले होते? त्या एका सत्याने माझे आईबाबा माझ्यासाठी परके झाले आहेत का? माझा चॉकलेटचा राजमहाल वितळुन फॉरेस्टच्या बॉक्स पेक्षाही छोटा झाला होता. किती विचित्र विचारांची वावटळ उठली होती मनात. आणि मी रडता रडता अचानक उठले.

'कोण आहेत मग माझे खरे आईबाबा.........?' मी डोळे पुसत विचारलं, दोघेही बावरले होते माझ्या त्या अचानक प्रश्नाने.
'बेटा माहीत नाही, पण तू अनाथ आश्रमाच्या पायर्‍यांवर सापडली होतीस.......' बाबा आईकडे बघत म्हणाले.
'का त्यांनी मला असं पायर्‍यांवर सोडलं, का मी त्यांना नकोशी झाले होते? का आज एवढ्या वर्षांनंतर ते सत्य माझ्या या सुंदर आयुष्यात निखारे ओतत होतं? मला ऊत्तरं हवी आहेत आईबाबा........ मला ऊत्तरं हवीत.....' माझ्या आसवांनी भरलेल्या नजरेत राग कधी उतरला माझं मलाच कळालं नव्हतं.

' कशी मी आता परत तुमची सीता बनु? कशी बनु मी तुमची प्रिंसेस सांगाना , प्रिंसेस जी मी कधी नव्हतेच. कसं मागु ते प्रेम मी परत तुमच्याकडे? कशी घेऊ ती माया आणि कसा देऊ तो आनंद परत तुम्हाला? ती माया जिच्यावर कधी हक्कच नव्हता माझा, सांगना ग आई कशी मारु मी हाक तुला? तु ओ देशील ही पण माझ मन उगीचच त्यातली आर्तता मोजत राहील'............... माझ रडणं अजुनही थांबलेलं नव्हतं.

' बाळा असं का बोलतेस तू? आम्ही आत्तापर्यंत तुझ्यावर जेवढी माया केलीय जेवढं प्रेम दिलंय, आमच्या पोटचा गोळा समजुनच ना, कधी कसूर नाही होऊ दिली त्यात. राणी आपलं नातं अजुनही अगदी तसंच घट्ट खर आणि एकत्र बांधलेलं आहे.
नाळ जुळली नसली म्हणुन काय झालं जीव तर तुटतो ना आपला एकमेकांसाठी............' आई व्या़कुळ होत म्हणाली होती.

'नाही आई!! मी नाही करु शकणार हे ! मी नाही तुमच्याजवळ राहु शकणार आता, तुमचा सहवास दररोज माझ्या या जखमेवरची खपली काढत रहाणार, तुमच प्रेम, ऊपकाराच ओझ बनुन रोज माझ्या मनावरचा भार मणामणाने वाढवत रहाणार, मी नाही अशी या ओझ्याखाली जगु शकणार आई.......... नाही मी अशी जगु शकणार........' आणि मी रडतच आत पळत गेले होते, कोंडुन घेतल होतं मी स्वतःला रात्रभर, आख्खी रात्र मी स्फुंदत होते, रडत होते. कधीच विसरणार नाही मी ती भयाण रात्र.

दुसर्‍यादिवशी सकाळी आईबाबा निघाले तेव्हा मी त्यांना माझा तो निर्णय सांगितला, मला वाटेल तोवर न भेटण्याचा.....
दोघांनीही माझ्या त्या निर्णयाचा आदरच केला होता. त्यांना माहित होतं मी माझा निर्णय कदापि बदलणार नाही म्हणुन.
त्यांची मुलगी नसले तरी त्यांनीच घडवलं होतं ना मला. मी ही त्यांच्यासारखीच हट्टी, मनाला जे पटेल तेच करणारी आणि तडीस नेणारी.

आजही माझ्या या कठोर निर्णयाची शिक्षा देतेय मी त्यांना, मारतेय मी त्यांना रोज थोडं थोडं त्यांनी केलेल्या प्रेमासाठी, कळतंय मला, इवलासाही तडा नाही गेलाय आमच्या नात्याला त्या गोष्टीमुळे, ते घट्ट प्रेमाचे बंध, बारीकसा धागा ही नाही निसटलाय त्यातन अजुन, पण कसं समजाऊ माझ्या मनाला मी हे? राहुन राहुन ते, तू नाहीस त्यांची सीता, कोण कुठली तू, नाहीस तू त्यांची प्रिंसेस, असं ओरडुन ओरडुन सांगतय.

कोण होते मी? काय अस्तित्त्व होतं माझं? काय हक्क होता माझा त्यांच्यावर? कुठे जुळली होती माझी नाळ? का मला असं कुणी पायर्‍यांवर सोडुन गेलं होतं? पायर्‍यांवर सोडणारे कसे माझे आईबाबा असू शकतात? का त्यांच्यावर ही वेळ आली होती?छोट्या बाळाला पायर्‍यांवर सोडतांना त्या आईचा जीव हेलावला नसेल का? मी त्यांच्या कुकर्माच फळ म्हणुन नकोशी झाली होते का त्यांना? अनोरस आहे का मी ''Am I a bastard child'' ? म्हणजे मी माझ्या आईबाबांची सीता नव्हते का?

सीता !! सीताच तर होते मी !! मैथिली, वैदेही सीता !! तिला ही तिच्या आईबाबांनी असंच तर टाकुन दिलं होतं, त्यांनाही ती नकोशी झाली होती........... ती सुद्धा एक अभागी प्रिंसेस, राजमहलात रहाणारी !!! तिला नाही का पडला असा प्रश्न कधी, कोण आहेत आपले आईबाबा का त्यांनी मला असं टाकुन दिलं? आहे का मी खरच प्रिंसेस या राजमहालाची?............................. नसेल का खरंच तिला कधी छळलं या प्रश्नांनी? नसेल का तिला कधी शोध घ्यावासा वाटला तिच्या खर्‍या आईबाबांचा?

पण मी घेणार आहे शोध माझ्या खर्‍या आईबाबांचा ! जाब विचारायचाय मला त्यांना, का त्यांनी त्यांच्या पोटचा गोळा असा सोडुन दिला पायर्‍यांवर? का मी त्यांना नकोशी झाले होते? सांगणार आहे मी त्यांना, नाहीयेत तुम्ही माझे आईबाबा, नाहीये मी तुमची मुलगी, नाहीये मी तुमची सीता, तिरस्कार वाटतो मला तुमचा. ज्यांनी मला घडवलं तेच माझे खरे आईबाबा आणि त्यांच्याकडेच रहाणार मी.

विचारांनी नुसतं थैमान घातलं होतं तेव्हा डोक्यात. कितीतरी दिवस घरातून बाहेर नव्हते पडले मी. नंतर कितीवेळा भारतात गेले त्या जन्मदात्या आईबाबांचा शोध घ्यायला. ते अनाथआश्रम, ते पत्ते, ती शहरं, ती गावं, ती विचारपूस कित्ती शोधलं मी त्यांना ते निराश दिवस नि त्या हताश रात्री कशा जगले मी माझ मलाच माहित. कशासाठी हे सगळं? ऊत्तरं हवी होती मला, जाब विचारायचा होता ना मला. खूप ओरडायच होतं मला त्यांच्यावर. प्रचंड चीड येते मला त्यांची, कसे असतील त्यांचे चेहरे? नक्की काळेकुट्ट्च असणार, पण प्रयत्न करुनही कल्पनेतही नाही दिसत मला त्यांचे चेहरे, दिसतात फ्क्त माझ्या आईबाबांचे सतेज, प्रेमळ चेहरे.
कुठे असतील ते राक्षसी आईबाबा, आपला पोटचा गोळा असा लाथाडल्यानंतर कुठे घरंगळत गेलाय याची थोडीही शहानिशा नसेल करवीशी वाटली त्यांना कधीच? की आहेत ते माझ्या आजुबाजुलाच पण ओळख देत नाहियेत. श्शी !! घृणा वाटते मला स्वतःची, त्यांचा विचार करुन, माझ्या प्रेमळ आईबाबांना माझ्यापासून दूर ठेवुन का शोधु मी त्यांना. तेवढीही लायकी नाहीये त्यांची. असे नालायक जन्मदाते असावेत माझे? मारुनच का नाही टाकलं मग त्यांनी मला? असं बांडगुळासारखं झाडाच्या सावलीत वाढणं कदापी मान्य नाहीये मला त्यापेक्षा रोपासारखं उन्हात जळुन जाईन मी. ज्यांनी मला फुलासारखं जपायला हव होत त्यांनीच मला लाथाडलं. म्हणजे केवळ नशीबानेच ईथवर पोहोचलेय मी ! ही माझी जागा नाहीये मुळीच. देवा का रे हा खेळ खेळलास तू माझ्याबरोबरच? तुझ्याशिवाय कोण देऊ शकणार माझ्या प्रश्नांची उत्तरं? की कोणी देवदुत येणार होता?

कुणाच्या तरी उसन्या प्रेमावर वाढ्लेय मी? कुणाच्या तरी उसन्या मायेवर पोसलेय मी? पण हेच मन सांगतय खबरदार !! त्या मायेला, त्या प्रेमाला उसनं म्हणालीस तर ! निर्भेळ आणि निर्मोह आहे त्यांच प्रेम. त्याला कलंकित करायचा काही एक अधिकार नाहीये तुला.

कधी संपणार माझा हा शोध? कधी संपणार माझ्या मनाची ही होरपळ? कधी शमणार विचारांचा हा वणवा? मला जगायचय, पंख पसरुन उडायचय, फुलासारख बागडायचय. पण त्याआधी मला उत्तर हवी आहेत. माझ्या अस्तित्त्वाचा उगम हवा आहे. तोवर नाही बनु शकणार मी आईबाबांची प्रिंसेस. तोवर मी फक्त सीता, लाथाड्लेली, गाड्लेली, टाकलेली, फेकलेली फक्त एक सीता, प्रिंसेस नाही मुळीच. प्रिंसेस............... प्रिंसेस!!!

अरे!! ती छोटीशी गोड प्रिंसेस, मोठ्या बोलक्या डोळ्यांची, पिटुकल्या नाकाची प्रिंसेस ! कशी असेल ती? छानच असणार, खरीखुरी प्रिंसेस झालीय ना आता. कित्ती प्रेम करतात तिचे आईबाबा तिच्यावर. एक आठवडा झालय, तिला बघुन. खूप आठवण येतेय तिची. तिचा निरागस चेहरा आठवला की माझ्या अस्तित्त्वाचे ते विचार, शोधाची ती तगमग मागे पडते. तिच्यामुळेच खरतर त्या जीवघेण्या विचारांना थोडासा का होईना आवर घालायला शिकलेय मी या आठड्याभरात. कशी भेटली मला प्रिंसेस?

महिन्याभरापूर्वी टीमबरोबर नवीन प्रोजेक्ट्साठी बिबट्यांवर डॉक्युमेंट्री करायला भारतात जायचय कळाल्यावर नाखुषच होते मी. आणि तेही 'जुन्नरला', पुण्याजवळच लोकेशन, म्हणजे पुन्हा तेच शहर तीच गावं त्याच गल्ल्या ज्या मी आत्तापर्यंत आईबाबांच्या नावाने हाकारे करत पालथ्या घातल्या होत्या. कितीही नाकारायचं म्हंटल तरी माझा तो काटेरी भूतकाळ फिरुन फिरुन माझ्या वर्तमानात रुतु पहात होता. नव्हतंच जायच मला मुळी पण स्टीव्ह, रॅचेल, जेनी, रॉब आणि मायकी सगळ्यांनी हटट्च धरला. इंडिया प्रोजेक्ट वर मीच हवी होते त्यांना त्यांच्याबरोबर, भारत फिरवायला. नुकत्याच पार पडलेल्या मसाईमारा प्रोजेक्टचाही प्रचंड अनुभव मला होता म्हणुन बॉसन तर अगदी प्रोजे़क्ट लीड आणि प्लॅनर बनवलं मला. सगळी टीम उत्साहान अगदी बिथरलेली होती. बिबट्यांच शुटींग...... Tiger Hunt for Camera....such a thrilling.... आणि पुन्हा ताजमहल, राजस्थान, काष्मीर, प्रयाग भ्रमण, सगळे चेकाळले नसते तर नवलच. जशी मी चेकाळले होते माझ्या पहिल्या प्रोजेक्टच्यावेळी ईजिप्त, नाईल आणि पिरॅमिड्सच्या डॉक्युमेंट्रीवर. त्यांना भारत पहिल्यांदाच बघायला मिळणार होता. भारत आणि भारतीय संस्कृतीच सगळ्या जगाला आहे तसच सुप्त आकर्षण त्यांनाही होतं.

पण मी का चालले होते या प्रोजेक्टवर मनात नसतानांही, कधीच माझ्या मनाविरुद्ध न जाणारी मी, मला कसलं आकर्षण होतं............? माझी आई...........ती होती ना भारतात, मनात आलं तर !! नव्हे कदाचित मनानं परवानगी दिली तर आईला भेटता येईल म्हणुनच ऍक्सेप्ट केला होता मी तो प्रोजेक्ट तेव्हा. त्या आठवड्यातच टाईम्समध्ये आईचा फोटो पाहिला होता, केवढी अशक्त झाली होती ती धरणग्रस्तांसाठी उपोषणं आणि आंदोलनं करुन.

पण बहुतेक प्रिंसेस भेटणार होती म्हणुनच की काय 'Tigers in Manlands' प्रोजेक्टसाठीच्या प्रेपवर्क आणि प्लॅनिंग वर मी काम सुरु केल होतं. केवढी खूष होती सगळी टीम मी तयार झाले म्हणुन. रॉब आणि रॅचेलने तर बक्कळ खरेदी चालवली होती भारतीय कपड्यांची. मायकी तसा जुनियर, त्याचा तो पहिलाच प्रोजेक्ट होता. तो उगीचच जरा माझ्या नावाच्या दडपणाखाली वाटला सुरवातीला. पण त्याच्याशी बोलल्यावर मग तोही एकदम मिसळला सगळ्यांमध्ये. जेनी आमची डॉक्टर होती. मी, स्टीव्ह, रॉब आणि जेनीन किती तरी धाडसी प्रोजेक्टस् पार पाडले होते. ऍमेझॉन आणि मसाईमारानंतर तर आमची टीम एकदम हीट्ट झाली होती सगळीकडे 'Big Cat Hunters' म्हणुन. मागे कुणीतरी भारतात 'जिम कॉर्बेट नॅशनल पार्क' वर केलेल्या डॉक्युमेंट्री चा बेस घेउन मी आणि स्टीव्हन नवीन प्रोजेक्ट प्लॅन जवळजवळ पूर्ण ड्राफ्ट केला होता. रॉबला कॅमेरांच्या बाबतीत फार इन्स्ट्रक्शन्स द्यायची गरज नव्ह्ती, तो आमचा मास्टर कॅमेरामन होता. बाकी लोकल गाईडस् आणि लाईफगार्डस् भारतातच जॉईन होणार होते. त्या महिन्याभराच काटेकोर प्लॅनिंग रेडी होतं, प्रचंड काम करायच होतं आम्हाला. साईटस् निवडण, कॅमेरा प्लेसमेंटस्, नॅरेशन, रिपोर्टस् बनवणं, रिसर्च नोट्स अगदी सगळं सगळं, दिवसाचा प्रत्येक तास आखुन रेखुन तयार होता. लीगल परमिशन्स, महिन्याभराचा सगळ्यांचा Indian Visa, प्रोजेक्ट फंडिंग, जर्नी प्लॅन्स, ऍकोमडेशन्स सगळ काही मलाच तर बघायच होतं. सुत्रधार, दिग्दर्शकच होते मी सगळ्यांची पुढच्या महिन्याभराच्या मिशनसाठी. वीस दिवस नॉनस्टॉप काम, तीन दिवस रिपोर्टस्, रिसर्च नोट्स आणि फुटेज एडिटिंगसाठी आणि शेवटचे सात दिवस भारत भ्रमण अस शेड्युल असणार होतं आमचं.

पुण्यातल्या जुन्नर गावाजवळच्या एका वस्तीच ठिकाण निवडलं होतं आम्ही प्रोजेक्टसाठी साईट म्हणुन, नवीनच वस्ती होती ती, आजुबाजुच्या उसाच्या शेतांवर काम करणार्‍या गरीब कष्टकरी लोकांची, वेगवेगळ्या राज्यांतून कामाच्या शोधात आलेले हे लोक, काम मिळेल तिथ वस्ती करीत होते. एकमेकांशीही फार ओळख नसावी बहुतेक त्या लोकांची. या वस्तीवर मागच्या सहा महिन्यात बिबट्याने चाळीस हल्ले केल्याचं आमच रेकॉर्ड सांगत होतं. माणसान आपल्या मतलबासाठी त्याच घर, त्याच जंगल उद्ध्वस्त केलं, त्यालाही पोट होतच की, मतलबासाठी नाही पण पोटासाठी, त्याच्या अस्तित्वासाठीच ते जनावर झगडत होतं अन् त्याच्याशी अस्तित्वासाठीच झगडत होते ते कष्टकरी लोक आणि..मी.......मी..झगडत होते..... माझ्या अस्तित्त्वाविरुद्ध्.

प्रोजेक्टचे पहिले वीस दिवस अगदी प्लॅन केल्याप्रमाणे पार पडले होते. आल्या आल्या पहिल्या दोन दिवसात कॅमेरा प्लेसमेंट अगदी परफेक्ट झालं होत. वस्तीवरच्या लोकांकडुन मिळालेल्या माहितीवरुन, काही आमच्या निरिक्षणावरुन सगळे हिडन मायक्रो कॅमेरे व्यवस्थित प्लँट करुन झाले होते, त्यांच्या लोकेशन्सचा मॅप ही रेडी होता. बिबट्याच्या पिल्लांच सुरेख टेस्ट फुटेजही मिळालं होतं आम्हाला दुसर्‍याच रात्री. केवढी गोजिरवाणी पिल्लं होती ती त्यांचे हिरवे डोळे रात्रीच्या अंधारातही स्पष्ट दिसत होते.
हे हिडन मायक्रो कॅमेराज म्हणजे ऑप्टिकल टेक्नॉलॉजीचा एक ऊत्कृष्ट शोध होता. टेबलटेनिस बॉल एवढा हा कॅमेरा म्हणजे निसर्गाला त्याच्याच डोळ्यांनी बघायचा चष्मा. त्याच्या स्कोपमधल्या गवताच्या इवल्याश्या पात्याची हालचाल ही नाही सुटत त्याच्या नजरेतुन, प्राण्यांच्या चेहर्‍यावरचे बदलते भावही अचुक टिपले जातात. मसाईमारा मध्ये मी आणि स्टीव्हन असे वीस कॅमेरे एकावेळी वापरुन सिंहीणींनी केलेली झेब्र्याची शिकार शुट केली होती, केवढं प्रचंड कोतुक झाल होतं आमचं त्या फुटेजसाठी.
दर दोन दिवसांनी त्या कॅमेराची रेकॉर्ड झालेली फिल्म बद्लुन त्यात नवीन कोरी फिल्म टाकायची आणि तो पुन्हा आधीचे जास्ती पॉझिटिव्ह फुटेज जिथे मिळाले असेल त्या स्पॉटवर प्लँट करायचा, हे काम मी मायकीकडे दिलं होतं. आम्ही रोज रात्री मायकीन आणलेल्या फिल्म्सच ऍनालिसिस करत होतो.

आणि दिवसभर सगळी टीम उघड्या जीपमधुन पूर्ण एरिया बिबट्यांच्या मागावर पिंजुन काढत होती. कधी काहीच हाती लागत नव्हतं तर कधी एकदम बिबट्याच कुटुंबच समोर येई. एकदा तर सरळ झेपच घेतली जीपवर त्या पिल्लांच्या आईनं, पण स्टीव्ह आणि लोकल गार्डने मोठ्या हिमतीन परतावुन लावल तिला. स्टीव्हला या बिग कॅटसना हँडल करायचा खूप दांडगा अनुभव आहे. एका रात्री बिबट्यानं गाईच्या गोठ्यावर केलेल्या हल्याचा बाजुच्या झोपडीतुन आम्ही घेतलेला अनुभव तर निव्वळ थरारक होता.

जुन्नर जवळ्च्या त्या छोट्याश्या वस्तीवर ते वीस दिवस कसे उडुन चालले होते कुणालाच कळत नव्हतं. वस्तीनेही खूपच मदत केली होती आम्हाला. बिबटया दिसल्याच्या खबरी असोत की सामान हलवायला मदत असो. त्यांना त्या गोर्‍या लोकांबद्दल कोण कुतुहल वाटे आणि रंगान त्यांच्यासारखीच सावळी मी त्या गोर्‍या लोकांना ऑर्डर्स देते आणि ते चक्क ऐकतात याच कोण अप्रुप. जेनी तर त्यांची खूप लाडकी झाली होती, हल्ल्यात जख्मी झालेल्या गाईंवर तिनेच ऊपचार केले होते.
बिबट्यांनी घातलेला धुमाकुळ, दुष्काळी परिस्थिती, रोजचे मरेपर्यंतचे कष्ट तरीही उपाशी पोट, घरात दारिद्र्याचा अंधार आणि थंड, अचेतन प्रशासन सगळी दु:ख विसरुन ती वस्ती आमच्या टीमचाच एक भाग बनुन गेली होती. पण त्यांची दु:ख हा आमच्या प्रोजेक्टचा भाग नव्हता.

आणि तो एकवीसावा दिवस आला नव्हे एकवीस आणि बावीस अशा दोन तारखांचा मिळुन एकच दिवस होता तो. मला अजुनही स्पष्ट आठवतय, त्यादिवशी मायकीच नाहीतर आम्ही सगळेच कॅमेरा पिक अपसाठी जाणार होतो, कारण त्यादिवशी नुसत्या फिल्म्सच नव्हत्या बदलायच्या तर सगळे प्लँट केलेले कॅमेरे व्यवस्थित काढून आणायचे होते. सगळ्यात पहिला कॅमेरा वस्तीपासुन साधारण पाचशे मीटर्सवर होता, वस्तीला लागुन असलेल्या शेताच्या मधोमध एका मोठ्या झाडाजवळ, दोन दिवसांपूर्वीच तिथं आम्हाला बिबट्याच्या जोडीच्या पावलांचे ठसे मिळाले होते. आणखी चार कॅमेरे पलिकडच्या सुकलेल्या शेतात, पाच डोंगर उतारावर आणि तीन कोरड्या पडत आलेल्या नदीजवळ होते.

टीम सकाळीच निघाली होती कॅमेरा पिकअपसाठी, पहिला कॅमेरा उचलण्यासाठी आम्ही वस्तीतुन बाहेर पडतच होतो तोच वस्तीपासुन दोनशे मीटर्सवर शेताच्या बाहेर माणसांचा काहीतरी गलका चालु होता, वस्तीतुनही जो तो त्याच दिशेला पळत होता.
कुणाला थांबवुन विचारावं म्हंटल तर कुणालाच काही माहित नव्हतं जो तो नुसती माणसं जमलीत म्हणुन उगीच पळत होता. आम्हीही न रहावुन पळतच तिथं पोहोचलो. सगळ्यांनी एकच घोळका केला होता, कुणाच्या तरी बारीक रडण्याचा आवाज येत होता पण नक्की काय झालंय काहीच कळत नव्हतं. मी, जेनी आणि स्टीव्ह एकेकाला मागे सारत घोळक्याच्या मधोमध येऊन पोचलो आणि समोरच दृष्य बघुन हादरलोच, जीव हेलावण काय असत ते मी अनुभवत होते, जेनीतर मोठ्यांदी किंचाळलीच होती........ "Oh my God, Jesus Christ"

जेमतेम हातभर व्यासाच्या जवळजवळ वीस फुट खोल खड्ड्यातून अडीच-तीन वर्षांची एक मुलगी जीवाच्या आकांतान रडत होती, तिच्या किंकाळ्या थेट ह्रुदयाला जाउन भिडत होत्या.
'अरे देवा !! कशी पडली ही आत, लागलं तर नसेल ना तिला खूप, कसं काढणार हिला आता वर' विचार करुनच अंगावर काटा येत होता. सगळे लोक त्या खड्ड्यात अगदी जवळुन वाकुन बघत होते. त्यांच्या पायामुळे आत माती पडतेय हे बघताच स्टीव्ह आणि रॉबन सगळ्यांना मागे रेटलं होतं. आमची सगळी टीम खड्ड्याभोवती रिंगण करुन उभी राहिली. नोकरीचा एक भाग म्हणुन अशा दुर्घटनांना हाताळण्याच थोडफार ट्रेनिंग मिळाल होतं आम्हाला. पण दोर सोडुन तिला वर खेचणं केवळ अशक्य होतं, स्वतःच वजन पेलवण्याएवढी ताकत कुठली असणार होती तिच्या कोवळ्या हातांमध्ये. त्या खड्ड्याची रुंदी बघता कुणा माणसाला त्यामध्ये उतरणंही इंपॉसिबल होतं आणि परत उतरतांना माती पडुन तो छोटासा जीव गुदमरला तर. अशी कुठलीच रिस्क आम्हाला घ्यायची नव्हती. पडतांना खूप लागलय का तिला ते ही कळत नव्हतं. काहीच सुचत नव्हतं आम्हाला तेव्हा, लोकांनाही आवरणही कठीण जात होतं

शेवटी मी आमच्या लोकल गाईडला जीप घेऊन शहरात पाठवलं, पोलिस, फायरब्रिगेड, ऍम्ब्युलन्स जे मिळेल ते घेऊन ये म्हणुन सांगितलं होतं, आणि मायकीला पुन्हा एकटयालाच सगळ्या कॅमेरा पिकअपसाठी पाठवलं. हा खड्डा कुणी आणि का खणला होता त्याची माहिती रॉब आणि रॅचेलन गार्डच्या मदतीन काढली होती. जमिनीतून पाणी उपसण्यासाचा पंप बसवण्यासाठी पंचायतीन खणलाय म्हणे, पण वीस फुटांवरही पाणी लागलं नाही म्हणुन पंप न बसवता तसाच सोडुन दिला होता.
'How they can leave it open like this, It’s a danger to life, isn't there a 911 emergency service' ... स्टीव्हचा वैताग मला कळत होता. सोफिस्टीकेटेड वातावरणात वाढलेले हे लोक, प्रशासनाचा असा गलथानपणा त्यांना केवळ अनाकलनीय होता. फोनही न पोहोचलेल्या त्या वस्तीवर ९११ सर्व्हिस म्हणजे, चंद्रावर मॅक्डोनाल्ड.

एक तास झाला होता आम्हाला तिथं येऊन, जीवाच्या आकांतान तो कोवळा जीव ओरडत होता, तिच्या आर्त किंकाळ्या त्या कोलाहलातही स्पष्ट ऐकू येत होत्या, तिच ते करुण विव्हळणं कानांना असह्य होत होतं. पण तेच विव्हळण कुठेतरी त्या खोल अंधारात तिच्या अजुनही तेवत असेलेल्या प्राणज्योतीची शाश्वती देत होतं.

एवढ्या वेळानंतरही तिची विचारपूस करणारं कुणीच आलं नव्हतं, तिचे आईबाबा कुठे होते ते, त्यांना अजून नव्हतं का कळालं, त्यांची ईवलीशी पोर त्या खोल खोल खड्ड्यात वेदनांनी विव्हळत होती. तिच्या त्या किंकाळ्या नव्ह्त्या का त्यांच्यापर्यंत पोहोचल्या अजून. कुठे होते ते? कित्तीतरी वेळानंतर वस्तीतून कुणीतरी रडत ओरडत आमच्या दिशेने धावत येत होतं, तिचे आईबाबा असावेत ते बहुतेक,
'माझी पोर पडली, माझी पोर पडली' म्हणत ती बाई धाय मो़कलुन रडत होती, तिच्याबरोबरचा माणुसही खूपच रडवेला वाटत होता. मला तर पहिल्यांदी त्यांना बघुन रागच आला होता, कसे आईबाबा होते ते, छोट्याश्या मुलीला अस एकटीला सोडुन गेले, पण त्यांचही बरोबरच होतं म्हणा, पोटामागं पळतापळता असं दुर्लक्ष होण सहाजिकच होतं. ती माऊली प्रचंड आक्रोश करत होती, एक-दोन जणी तिला आवरायचा प्रयत्नही करीत होत्या पण त्यांना काहीही करुन त्यांच्या मुलीला बघायचं होतं. त्यांच्या भावना मी समजु शकत होते. क्षणभर मला त्या लहानगीचा हेवा वाटला. ती दोघ खड्ड्याजवळ जाउन जोरजोरात तिला हाका मारत होती,
'ए पोरी.... ए पोरी.... मी माय हाय ग बघ तुझी, ओ दे ग माझ्या बाळे... ओ दे ग' ..... अजुनही ती आत जीव खाउन रडतच होती. त्या दोघींचा तो आक्रोश बघुन माझ्या पोटात तेवढाच खोल खड्डा पडत होता.

दोन एक तास झाले होते गाईडला शहरात जाऊन तोपर्यंत आम्ही दोराला बांधुन खड्ड्यात पाणी आणि बिस्किटं सोडायची व्यवस्था केली होती. तिच रडणं आता थोडं कमी झालं होतं वार्‍यामुळे धुळ आत जाऊ नये म्हणुन खड्ड्याच तोंड प्लॅस्टिकन कव्हर केलं होतं. तिच्यासाठी जे जे काय म्हणुन चांगल होतं ते ते आम्ही करत होतो. परदेशातली शिकली सवरलेली माणसं आणि मागच्या वीस दिवसांत मिळवलेला थोडाफार आदर म्हणून की काय वस्तीनही आमच्यावर विश्वास टाकला होता. सगळेच शहरातून येणार्‍या मदतीची वाट पहात होते.

शेवटी पोलिसांची गाडी आली, पण एकंदर परिस्थिती बघुन ही आपल्या हाताबाहेरची केस आहे हे त्यांना कळालं होतं. बर्‍याच वेळानंतर त्यांनी आमच्या प्रश्नांच्या भडिमाराला कंटाळुन फायरब्रिगेडला वायरलेस मॅसेज पाठवला. तेवढ्यातही ते आम्हाला 'कोण, कुठले, इथे कशाला आलात? परवानगी घेतली होती का?' असले भलतेसलते प्रश्न विचारत होते. मला त्यांचा तो ऍटिट्युड खूपच विचित्र वाटला होता.

मायकी कॅमेरे घेउन परतला होता, तोही आमच्यात सामील झाला. बाजुच्या शेतात कुणा जोडप्यानं पेस्टीसाईड पिऊन आत्महत्त्या केल्याच तो सांगत होता. मागच्या त्या वीस दिवसातली ती तिसरी आत्महत्या होती. थकलेलं कर्ज, सावकारी पाश, दुष्काळ यांनी हतबल झालेला शेतकरी यातून सुटण्यासाठी मरणाला कवटाळत होता. आस्मानी आणि सुल्तानी दोन्हींशी लढतांना हरत होता, आणि आम्ही......त्या छोटीसाठी निसर्ग आणि शासन दोघांशीही लढत होतो.

तेवढ्यात एक मोठी गाडी धुराळा ऊडवत आमच्या दिशेने येतांना दिसली. ती फायरब्रिगेड तर नक्कीच नव्हती, कोण होते ते लोक? गाडी थांबली आणि एक न्यूज रेपोर्टर आणि कॅमेरामन गाडीतून उतरले. चॅनेलवाले होते ते. मला का कुणास ठाऊक, पण प्रचंड राग येतो या लोकांचा, सत्य दाखवण्याच्या नावाखाली माणुसकी लाथाडुन आणि भावनांचा अनादर करुन कुठेही पोहोचतात हे लोक, मग अमेरिका असो की भारत सगळे सारखेच. कुठुन त्यांना या घटनेचा सुगावा लागला कोण जाणे पण येताच त्यांनी खड्ड्याकडे धाव घेतली. स्टीव्ह आणि रॉबलाही बाजुला लोटत होते ते. पण गावकर्‍यांचा एकंदर आवेष बघुन त्यांनी आवरतं घेतलं होतं. खड्ड्याच्या आतलं लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी त्यांनी आमची मनधरणी चालवली होती. खड्ड्यात कॅमेरा आणि लाईट सोडणार होते ते. आमच्या लोकल गाईडन त्यांना बाजुच्या शेतातल्या आत्महत्येच्या ठिकाणी जाण्यासाठी सुचवलं, तर म्हणे ते रोजचंच आहे, त्यात काही एक्सायटिंग नाहीये, ब्लडी मोरॉन्स. त्या बिचारीच्या विव्हळण्यात एक्साईटमेंट दिसत होती त्यांना. पण तिला बघायला मिळेल, तिची अवस्था कळेल, तिच्यासाठी अजुन काहीतरी सोय करता येईल या आशेनं आम्हीही त्यांना योग्य ती खबरदारी घेऊन टेलिकास्टची परवानगी दिली.

फायरब्रिगेड ही तोपर्यंत येऊन पोहोचलं होतं, पण अशा अतर्क्य आणि विचित्र दुर्घटनेशी निपटण्यासाठी काहीच तयारी आणि साधनं नव्ह्ती त्यांच्याकडे. स्टीव्हन पुन्हा एकदा त्रागा केला कसलं भुक्कड फायरब्रिगेड आहे हे म्हणुन. जिथल्या प्रशासनालाच लोकांच्या जिवाची यत्किंचितही काळजी नव्ह्ती तिथं फायरब्रिगेडची काय कथा. शेवटी फायरब्रिगेडनं जवळच्या आर्मी कँपकडे मदत मागायचं ठरवलं. सगळेच हतबल होते पण सगळयांची तिला त्या खड्ड्यातून सोडवण्यासाठीची तळमळ दिसत होती.

थोड्याच वेळात त्या भागाचे मंत्री महोदय आपला गाड्यांचा ताफा घेऊन तिथं धडकले. त्या बिचारीच्या अवस्थेबद्दल काही एक विचारपूस न करता ती बाहेर येताच तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च आपण करणार असल्याचं त्यांनी जाहीर करुन टाकलं. मला हसावं की रडावं असं झालं होतं ती घोषणा ऐकुन, किळसच आली होती मला त्याची, काय प्रसंग आणि काय बरळतोय हा माणुस, श्शी !! . आधीच होरपळलेल्या, चिडलेल्या गावकर्‍यांनी आपल्या गार्‍हाण्यासाठी त्यांना गराडा घालताच त्यांनी तिथुन काढता पाय घेतला.

सात तास उलटले होते आम्हाला तिथ येऊन, कुणास ठाऊक ती बिचारी कधी आत पडली होती?, थोडं थोडं अंधारुन यायला लागलं होतं, थंडीही ही जाणवत होती. तिचं रडणं कमी होताच काळजाचा ठोका चुकत होता. त्या माऊलीची नजरही थंड थिजलेली वाटत होती, मला उगीचच तिला तिच्या छकुलीच नाव विचारावंस वाटत होतं, पण तिच्या त्या खड्ड्यात विरघळलेल्या नजरे़कडं बघून मी मनाला आवर घातला होता. आर्मीचे लोक कधी येणार? त्याआधीच अंधार पडला तर कसं होणार? मला खूपच काळजी वाटत होती तिची. ती बाहेर येईपर्यंत आपण ईथुन हलायचं नाही असं टीमन ठरवलं होतं. नेहमीच माणसांपासुन दूर जंगली जनावरांच्या जगात जगणार्‍या माझ्या त्या अमेरिकी मित्रांच्या डोळ्यात मला त्या पोलिस आणि मंत्र्यापेक्षा जास्तीच माणुसकी दिसत होती.

शेवटी दोन तासांच्या खटाटोपानंतर चॅनलवाल्यांचा कॅमेरा चालू झाला आणि आम्हाला समोर टी.व्ही.वर ती दिसली,
रडुन रडुन थकलेला चेहरा, डोळ्यातल्या पाण्यामुळे गालांवर चिकटलेली माती, पडतांना फाटलेला फ्रॉक, खरचटलेले हात, ठेचकाळलेले गुडघे, खूपच केविलवाणी दिसत होती ती. मलुल चेहर्‍याने वरच्या लाईटकडे आणि कॅमेराकडे बघत होती. त्या गोजिर्‍या मुलीची ती दीनवाणी अवस्था बघणारा प्रत्येक जण मूक झाला होता, हळहळला होता.. मला तर त्या बोलक्या डोळ्यांच्या, पिटुकल्या नाकाच्या फाटक्या बाहुलीकडं बघतांना सारखं गलबलून येत होतं. केवढ भोगलं होतं त्या कोवळ्या जीवान मागच्या काही तासांत. तिची आईतर राहुन राहुन टीव्हीकडं धाव घेत होती. तिच्या नवर्‍यालाही तिला आवरणं कठीण जात होतं, जन्मदात्या आईची माया... आणि माझी जन्मदात्री.....पायर्‍यांवर सोडुन निघुन गेली होती मला. आटली होती का तिची माया मला सोडतांना.

तिला कुठे कुठे लागलं म्हणुन बघायला आम्ही तिच्यावरुन सगळीकडे कॅमेरा फिरवला, डावा गुडघा फुटला होता तिचा, हातानांही बरच खरचटलं होतं, नाकावरही ओरखडे होते आणि मला तिच्या ऊजव्या हातावर गोंदलेलं तिचं नाव दिसलं. "प्रिंसेस". का कुणास ठाऊक क्षणात मला ती एकदम जवळची वाटली, 'प्रिंसेस' किती छान नाव होतं नाही. मी प्रिंसेस नव्हते पण जगले होते प्रिंसेस बनुन, जिचा राजमहाल केव्हाच वितळला होता. पण ही तर तिच्या खर्‍या खर्‍या आईबाबांची प्रिंसेस होती.

तासाभरात आर्मीचे दोन ट्रक्स सगळ्या सामानासहित तिथं येऊन पोहोचले होते. त्यांची तयारी, त्यांच्याजवळ्ची ती इक्विपमेंटस्, लाईट्स आणि ती मोठी क्रेन पाहुन सगळ्यांचाच जीव भांडयात पडला होता. सगळ्यांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या. आपसुकच तिथला सगळा कंट्रोल आमच्याकडुन आर्मीच्या हातात गेला. जवळ जवळ तीस लोकांची टीम होती त्यांची. येताच त्यांनी प्लॅनिंग आणि जागेची मोजमापं चालु केली होती.

एव्हाना त्या न्यूज रिपोर्टरनही सगळ्या फुटेजच लाईव्ह टेलिकास्ट चालु केलं होतं. भारतातल्याच नाहीतर जगातल्या बर्‍याच चॅनल्सवर त्या कव्हरेजचं टेलिकास्ट चालू होतं. प्रिंसेसच्या सुखरूपतेसाठी जगाच्या कानाकोपर्‍यातून अगणित फोन येत होते त्या चॅनलवाल्यांना. सगळे लोक प्रार्थना करत होते प्रिंसेससाठी. शे-सव्वाशे झोपड्यांच्या त्या वस्तीजवळ हजारोंनी माणसे गोळा झाली होती. सगळा देश आर्मीच ते ऑपरेशन डोळ्यात प्राण आणुन बघत होता. मिडीयाची सामान्य जनतेला एकत्र बांधण्याची ताकत केवढी अफाट आहे नाही, फक्त तिचा हवा तसा उपयोग केला जात नाही.

रात्र पडत होती, दहा तास झाले होते, प्रिंसेसला पडुन. शेवटी एकदाच आर्मीच प्लॅनिंग फायनल झाल आणि एक प्लॅन पक्का झाला होता. त्या खड्ड्याच्या बाजुला सहा फुटांवर समांतर असा एक अजुन खड्डा खोदायचा आणि वीस फुटांवर पहिल्या खड्ड्याला जमिनीखालून एक आरपार भुयार. सगळ्यांच्या मते हाच प्लॅन कमी रिस्कवाला होता. पण त्यासाठी लागाणारा वेळ होता कमीतकमी सहा-सात तास. अजुन सहा-सात तास, माझा जीव प्रिंसेसच्या काळ्जीन थोडा थोडा होत होता. मी राहुन राहुन तिला टीव्हीवर बघत होते, ती थोडी पेंगुळल्यासारखी वाटत होती.

मध्यरात्र झाली होती, तेरा तास ऊलटून गेले होते, क्रेनच्या त्या जीवघेण्या आवाजान प्रिंसेस खूपच भेदरलेली होती. काय चाललय त्या खड्ड्याच्या बाहेर काहीही कल्पना नव्ह्ती त्या बिचारीला. थंडी आता चांगलीच झोंबत होती अंगाला, सकाळपासून अन्नाचा एक कणही नव्हता गेला आमच्या पोटात. आम्ही सगळेच एकमेकांना धीर देत होतो. ती माऊली प्रिंसेस बाहेर येण्याच्या वाटेकडं एकटक डोळे लाऊन बसली होती. चॅनलवाले सगळ्या जगाला आर्मीच्या कामाच्या प्रगतीची मिनिटा-मिनिटांची माहिती सांगत होते.

सोळा तास झाले आणि आर्मीन यशस्वीपणे भुयार खणुन पूर्ण केलं. देशातल्या प्रत्येकाने टीव्हीवर तो आर्मी मॅन प्रिंसेस जवळ पोहोचलेला पाहिला. मला तर ती पुढची दहा मिनिटं मागच्या सोळा तासांपेक्षाही मोठी वाटत होती. आणि प्रिंसेस बाहेर आली. सगळ्यांनी एकच जल्लोष केला, कित्येकांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिल्याच आठवतंय मला. आमच्या टीम मध्ये सगळ्यांनीच एकमेकांना कड्कडुन मिठ्या मारल्या. अतिशय खडतर आणि वेदनामय प्रवास करुन आली होती इवलीशी पोर. तरी एकदाही तिने जगण्याची जिद्द सोडली नव्हती की त्या थंड, भयाण अंधारासमोर मान टाकली नव्हती.

ती बाहेर येताच तिला पहिल्यांदा चेकअपसाठी जेनीकडे आणि नंतर तिच्या आईबाबांकडे देण्यात आलं. वेड्यासरखे पापे घेत होती तिची आई तिचे. तिचे बाबा ही तिला केवढ्या प्रेमाणे कुरवाळत होते. जणु आजच जन्मली होती त्यांची एकुलतीएक पोर त्यांच्यासाठी.

ऊभ्या देशान तो प्रसंग अक्षरश: जगला होता. किती लोकांनी देव पाण्यात ठेवले होते आणि किती लोकांच्या प्रार्थनेला देव पावला होता. आर्मीचं ही केवढं कवतुक केलं होतं सगळ्यांनीच. केवढ्या माऊल्यांचे आशिर्वाद मिळवले होते त्यांनी. स्टीव्ह आणि रॉबन तर फोटो ही काढले त्यांच्याबरोबर. प्रिंसेसवर तर जगाच्या कानाकोपर्‍यातून पैशांचा वर्षाव झाला होता. खरीखुरी प्रिंसेस झाली होती ती देशाची.

पण प्रिंसेस...... खूपच घाबरलेली होती अजुनही प्रिंसेस, आजुबाजुला एवढे सगळे लोक, गर्दी गोंधळ पाहुन अजुनही भेदरलेली होती ती. आईच्या कुशीतही केवढीतरी अस्वस्थ वाटत होती, अडीच्-तीन वर्षाची पोर ती अजुनही जीव काढुन रडत होती.
नंतर मी तिला घेतलं तेव्हाही ती त्या धक्क्यातून सावरल्यासारखी वाटत नव्हती. कॅमेरे, मोठे लाईट्स वगैरे बघुन ती अजुनच कावरीबावरी होत होती.

दुसर्‍यादिवशी वस्ती पुन्हा पहिल्यासारखीच ओस पडली होती. आमच्या रिपोर्टस् आणि फुटेज एडिटींगच्या कामाचे दोन दिवस या सगळ्या विचित्र गोधळात खर्ची पडले होते. शेवटी ते काम आता अमेरिकेत जाऊनच करायच आणि पुढचे सात दिवस भारतभ्रमण छान एंजॉय करायच अस टीमन ठरवलं होतं.

संध्याकाळी निघतांना प्रिंसेसला बघुन निघायच ठरलं होतं सगळ्यांच. ती अजुनही अस्वस्थच वाटत होती. जेनीच्या मते तिच्या कोवळ्या मनाला घाबरल्यामुळे खूपच धक्का बसला होता, पण दोन दिवसातच ती पुन्हा छान खेळायला लागेल.आम्ही सगळ्यांनी तिच्याबरोबर खूप फोटोज काढले. मायकीन तर विदुषकी चाळे करत केवढं हसवलं तिला. मी व्हिडिओ टेप ही काढली होती त्या दोघांची. तिचा निरोप घेऊन निघालो तरी तिचा तो बोलका चेहरा आणि ते मोठ्ठे डोळे नजरेसमोरुन जातच नव्ह्ते. ती सारखं काहीतरी शोधतेय असं उगीच वाटत होतं. ते डोळे मनाला हुरहुर लावत होते. जातांना तिची आई मायेन माझ्या चेहर्‍यावरुन हात फिरवत म्हणाली .....'देवाचा दुत बनुन आलायसा तुम्ही आमच्यासाठी !!'..................देवदुत....मी देवदुत.....मीच माझ्या ऊत्तरांच्या शोधात माझ्या देवदुताची वाट बघत होते.

पुढचे सात दिवस टीम बरोबर राजस्थान, काष्मीर फिरतांना आईला भेटायची परवानगी मनाकडं मागत होते पण माझं मन काहीकेल्या मला ती देत नव्हतं. प्रिंसेसचा तो प्रसंग आणि बिबट्यांच्या पिल्लाच्या आईची ती झेप आठवुन माझ्या त्या जगवेगळ्या क्रुर जन्मदात्यांचा शोध घेऊन त्यांना जाब विचारायची माझी उर्मी वाढतच होती.

प्रिंसेस खूप आठवण येतेय तिची आज. तिला सारखं बघावसं वाटतयं, तिचा व्हिडीओ आहे ना माझ्याकडे, बघायचय मला आत्ताच प्रिंसेसला. का कुणास ठाऊक खूप आपलीशी वाटली ती त्या काही तासांतच. तिची ती शोधक नजर आठवली की एक अनामिक हुरहुर वाटते मनाला. मी मनाशीच म्हंटलं आणि बॅगेतून व्हिडीओ टेप्सचा बॉक्स काढला.
'श्शी !! आता या टेप्सच्या जंजाळात कशी शोधु ती प्रिंसेसची टेप मी?, हा मायकीपणना सगळ्या फिल्म्स् एकत्र ठेवल्या मूर्खाने. कॅमेरे पिकअप केल्यानंतर त्यांच्या फिल्म्सवर नंबर तरी टाकायचेना याने. येडचाप, वेंधळा कुठचा !'. टेप सापडतांना माझा वैताग वाढतच होता आणि मी मायकीला उगीचच शिव्या घालतेय हे माझ्या लक्षात येत होतं. सगळाच गोंधाळ झाला होता त्यादिवशी, तो तरी बिचारा काय करणार.

'हं ही असावी बहुतेक, सगळ्या सारख्याच तर आहेत, पण कुठुनतरी सुरुवात तर करावीच लागणार, हीच ट्राय करते आधी.' , मी स्वतःशीच पुटपुटले आणि एक टेप कॅमेरात टाकुन तो टीव्हीला कनेक्ट केला.

'शेतातलं झाडं, हा तर हिडन मायक्रोकॅमेराचा स्पॉट होता. श्शी ! चुकीची टेप लागली.' मी परत माझ्यावरच वैतागले.
टेप बदलायला ऊठणार तोच टीव्हीवर प्रिंसेस दिसली.
'अरे ही कशी या टेपमध्ये झाडाजवळ, ७:५५ चा टाईम दाखवतोय कॅमेरा म्हणजे ती पडली त्या दिवसाच्या आधीची संध्याकाळ, बहुतेक तिथं खेळत असणार. चला हसरी प्रिंसेस तरी बघायला मिळतेय, तेच बोलके डोळे तेच पिटुकलं नाक.' मी स्वतःशीच विचार करत प्रिंसेसला बघुन मनोमन सुखावत होते.

'अरे हे लोक कोण येऊन बसले झाडाजवळ? प्रिंसेसचे आईबाबा? नाही ते तर नाही वाटंत. आणि प्रिंसेस त्या बाईच्या मांडीवर बसतेय सरळ ?' माझी उत्सुकता वाढतच होती. ती बाई आणि तो माणुस काय बोलतायेत ते ऐकण्यासाठी मी रिमोटन टीव्हीचा व्हॉल्युम वाढवला. बाईचा चेहरा खूप रडवेला वाटत होता. तो माणुसही सर्वस्व गमावल्यासारखा हताश, निराश वाटत होता.

'दुसरा कायबी उपाय न्हाय राह्यला का ओ धनी? ' बाईने रडतरडतच विचारलं, म्हणजे दोघं नवरा-बायको होते तर?
' तुच सांग लक्ष्मे आता, आजुक कन्चा उपाय करायचा ठिवलाय माग म्या ?' तिचा धनी काकुळतीला येउन म्हणाला.
'दोन दिस झाल्याती काम मागत उन्हातुन भिकार्‍यावाणी भटकतोया आपण, प्वाटात अन्नाचा एक कण बी न्हाय, का माह्या बायडीला दोन घोट दुध बी न्हाय दोन दिसापासुन. पावसाबिगर कर्जान घेतलेलं बियाण बी करपून गेल, दवापाणी न्हाय म्हणुनशान बैल बी शेतात बसला. त्या मुक्या जनावरानबी काय कमी साथ दिली व्हय? कर्ज थकलं म्हणुन सावकारान कोर्‍या कागदावरचा अंगठा दाऊन शेत अन् घर तेच्या घशात घातलं. तरी हरलो न्हाय म्या. कुणी सांगितलं हिकडं कारखान्यावर काम मिळतया म्हणुन उरलासुरला गाठीचा पैका मोडुन हितवर आलो, तर हिथ रोजचं काम मिळवायलाबी मारामारी, सगळीच आपल्यावाणी पोळलेली हिकडुन तिकडुन आल्याली...... तुच सांग लक्ष्मे आता कन्चा ऊपाय बाकी हाय?'......डोक्याच पागोटं जमिनीवर आपटल त्यान. एवढा धिप्पाड गडी पण परिस्थितीन अगदी वाकला होता, आणि तो प्रिंसेसला काय म्हणाला बायडी म्हणजे प्रिंसेस त्याची मुलगी तर नाही?
'आता एक डाव, एकच शेवटला उपाय आन मग कायमची मुक्ती आण ती बाटली हिकडं.' म्हणत तो त्याच्या बायकोकडे वळला.
'धनी !! पुन्यांदा इचार कराना धनी, आपल्या माग काय व्हणार आपल्या बायडीच आपल्याबिगर? का तिचा बी जीव घेणार हायसा ..............' ती बाई रडतरडत प्रिंसेसच्या डोक्यावरुन हात फिरवत होती. तो इवलासा जीव अंगठा चोखत कधीच झोपी गेला होता.
'कसाई न्हाय ग म्या, माझा सर्जा शेतात बसला तरी सुदीक न्हाय दिला म्या त्याला कापाया, ह्या ह्या दोन खांद्यावर यकट्यान नांगर वढला म्या. पण आता नशीबानच हिथवर आणुन सोडलया, तिथ माझ हे खांद बी लुळं पड्ल्याती. तिचं मायबाप जितं असत्यांनाबी एवढं हाल व्हत्यात तिच तर मंग आपल्या माग कोण हाय तिच्याकड बघणारं, गिधाडांनी भरलेल्या ह्या दुनियेत कुठ सोडु म्या माझ्या चिमणीला, सांगना लक्ष्मे तुच सांग............
ज्यान जन्माला घातलं त्यो हात बी देत्यो म्हणत्यात पण हाताला काम तर न्हाय देत ना त्यो ? काम आसन तरी वरुन दुष्काळ ओततो ना त्यो दगडीचा........... लक्ष्मे रोज उपाशी र्‍हाऊन थोड थोड मरण्यापरीस एक डावच सुटका व्हईन, रोज लचकं तोडणार्‍या त्या सैतान दुनियेपरीस ते जनावर तरी बर एकदाच वार करतंय आन् माणुस मोकळा'..... शून्यात नजर लाऊन तो बोलतच होता.

'काय करणार हायसा माझ्या बापडीच तुम्ही, राजकुमारी म्हणायचा नव्ह?, इंग्लिस साळेलाबी घालाणार व्हता , हातावर गोंदुन घेतलं होतं नव्ह राजकुमारी इंग्लिसमधुन, मंग आता तिला बी हे ईष घालणार व्हय तुमी? का नरडी दाबणार हाये तिची. म्या न्हाय पाहु शकायचे धनी....... म्या न्हाय पाहु शकायचे?...... तिचे डोळे अखंड वहात होते तिचा विलापही जीवघेणा होता.

'लक्ष्मे, रामाच्या त्या सीतेला गाडली होती नव्ह तिच्या मायबापांनी त्या काळ्या आईच्या पोटात तशीच देणार हाय मी तिला त्या काळ्या आईकडं. मायच हाय नव्ह ती समद्यांची, घेईन तिला बी आपल्या पोटात, ईवलुसा बी तरास न्हाय होऊ द्यायाची बघ ती आपल्या चिमणीला जीव जातांना. इपरित घडल्यावर आईची कुस सोडुन जातया तरी कुठ लेकरु, तु, मी बी तिच्याच कुशीत जाणार हाय नव्ह? मेल्यानंतर, भेटणच की ती तिथच आपल्याला. पांडुरंगा म्या न्हाय पापी त्या कोवळ्या जीवाचा, तुच हाय पापी, जन्माला घालतुया आन रोज मारतुया.'

मी हे काय ऐकतेय आणि काय बघतेय माझा माझ्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता, सुन्न झालं होतं सगळं, डोकं बधीर झाल होतं, सगळ्या संवेदना कुठेतरी असह्य ताणल्या जात होत्या. काळजाचे ठोके प्रचंड वेगाने पडतायेत. चुकेल एखादा नक्कीच आता. असं विव्हल असाहय्य जीवनही असु शकतं या जगात?

आणि त्याने प्रिंसेसला आईच्या मांडीवरुन उचललं ते बाळ अजुनही झोपेतच होतं
'शेवटलं पाहुद्या ओ धनी मला माह्या बापडीला, माझ्या पोटचा गोळा हाय त्यो, तळहाताच्या फोडावाणी जपलय म्या तिला आत्तापतुर, अशी कशी जाउ देऊ म्या तिला? जलम दिला हाय न्हव म्या तिला, कस तिच्या गळ्याला नख लावु? माय हाय न्हव तिची मी. नरकातबी जागा न्हाय द्यायचा त्यो मला. अशी कशी राक्षशीन हाय म्या सवताच्या पोरीच्या जीवावर ऊठले. सात जलमाची वैरीण बी न्हाय जीव घ्यायाची झोपलेल्या लेकराचा'......... आणि ती दोघही रडतरडत प्रिंसेसचे पटापट मुके घेत होती.
माझ्या दोन्ही डोळयातून माझ वितळलेलं मन कधी वहायला लागलं मलाही नाही कळालं
तिला तसच रडत सोडुन तो प्रिंसेसला घेऊन जडजड पावल टाकत निघुन गेला.मला फक्त ती असह्य आक्रोश करणारी, डोकं आपटत, हंबरडा फोडणारी आई दिसत होती....................... पिल्लांसाठी आमच्यावर झेप घेतलेली तीही एक आईच होती, दोघीही असहाय्य होत्या, हतबल होत्या, पण तरीही त्यांची प्रेरणा वेगळी होती.

पाचच मिनिटात तो परतला प्रिंसेस नव्हती त्याच्याबरोबर. 'त्यानेच तर नाही तिला त्या...........अरे देवा, परमेश्वरा..... कुठे आहेस तु? बघतोयेस ना? तुझे डोळे तरी दगडाचे असावेत नाहीतर काळीज तरी. आपल्या स्वतःच्या मुलीला आपल्याच हातांनी त्या खोल खोल अंधारात फेकुन आलाय तो, देवा यापेक्षा अजुन काय दु:खद आणि क्लेशदायक असु शकतं या जगात. परिस्थितीन की नशिबान, कुठे आणुन सोडलं होतं त्यां आईबाबांना, आपल्या पोटच्या गोळ्यालाही मारायला निघाले होते ते? मारायला की सोडवायला? मुक्त करायला?

प्रत्येक सेकंदागणिक ऊसवणार माझं मन माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवायला तयार नव्हतं, तुडुंब डोळे मनान शिवलेला बांध मानायला तयार नव्ह्ते, आणि त्यांच्या द्वंद्वात सापडले होते मी. म्हणजे प्रिंसेसला मारल त्यानं? पण ती तर जिवंत होती!! म्हणजे ती त्या खड्ड्यात पूर्ण रात्रभर विव्हळत होती रडत होती आक्रोश करत होती. कसे सैतानी, काटेरी ह्रुदयाचे होते तिचे आईबाबा , तिच्याएवढं दुर्दैवी कुणी असेल का? ............असेल कुणी......?

त्याला येतांना पहाताच ती दोन्ही हातांनी चेहरा झाकुन अजुन मोठ्याने रडु लागली. त्याच्या डोळ्यात तिला तिच्या मुलीच शेवटच रुपडं दिसत होतं. त्यान तिच्या पुढ्यातलं गाठोडं ऊघडलं, मला ती दोघं लाल बाटलीतून काहीतरी पितांना दिसली, पेस्टीसाईड असावं ते बहुतेक आणि दुसर्‍याच क्षणी दिसली त्यांची ती असह्य, जीवघेणी तगमग. आईग !! जीव जातानांही एवढ्या वेदना ? एवढा प्रचंड त्रास? केवढी कासावीस !! तडफडतायेत दोघही. एकमेकांचा हात सुटत नाहीये तरी. देवा!!! केवढं दु:ख आहे तुझ्या या जगात मरतानांही, माणसाला मरणही एवढ कष्टप्रद इतकं वेदनामय? याचसाठी का मरणाचा तो अट्टहास होता?
रक्त येतय दोघांच्याही तोंडातून...................... नाही............. नाही बघवत आहे मला त्यांची तगमग ते जीवघेणी तडफड. कधी गेलेल्या माणसाचा चेहराही नाही पाहिलाय मी आणि आज हे काय घडतंय माझ्या डोळ्यांसमोर आत्त्महत्या आणि ती ही अशी जीवाचा एक एक धागा तुटत?
मी टीव्ही बंद केला आणि ढसाढसा रडत डोळ्यातल्या आसवांना मुक्त वाट करुन दिली. मला समोर कारपेटवर प्रिंसेसचे निपचित पडलेले आईबाबा धुसर दिसत होते.

आई......बाबा......लवकर या, बघाना हे लोक काय करुन बसलेत, केवढं अपार दु:ख भरलय या जगात, पराभवान माणुस एवढा प्रचंड खचु शकतो की पुन्हा लढण्याची ताकत कायमची गमावुन बसतो. आपल्या पोरांच्या, स्वत:च्या जीवाच मोल देऊन सुटायच त्याला यातुन? असा जीव काढुन ठेवला की दु:ख नाहीशी होतात का?

खरंच एवढे असहाय्य होते का प्रिंसेसचे आईबाबा? कुणाकडे मदत नसते का मागु शकले ते? निदान प्रिंसेससाठी तरी? कुणी नव्हतं का त्यांच दु:ख समजावुन घेणारं? कुणाकडे जाणार होते ते? कुणाकडे मदतीची याचना करणार होते ते? एकट्याने नांगर ओढणार्‍या त्याच्या खांद्याना असं झुकणं मान्य झालं असत का कुणासमोर? कुणाला आपलं गार्‍हाण सांगणार होते ते? त्या थंड, निर्ढावलेल्या, लोकांच्याच जीवावर ऊठलेल्या सरकारला? कुणाची दार ठोठावणार होते ते? त्या रक्तपिपासू सावकारांची की त्या लाकडी दाराआडच्या दगडी शिल्पाची? कसे सोडु शकणार होते ते प्रिंसेसला या गिधाडांच्या दुनियेत? खरंच त्यांनी ऊचलेलं पाऊल चुकीचं होतं का? होता का त्यांच्याकडे दुसरा एखादा उपाय त्या दारिद्र्यावर त्या परिस्थितीवर मात करण्याचा? कोण जबाबदार होतं त्यांच्या या लक्तरांना? त्यांच नशीब, निसर्ग, सावकार, शासन की तो पांडुरंग? पण त्या नशीबान, निसर्गान, शासनान आणि पांडुरंगानेच तर वाचवलं होतं प्रिंसेसला. पण मग ते कोण ज्यांनी प्रिंसेससाठी ती पडल्यावर एवढा आक्रोश केला होता. ते तिचे आईबाबा नाहीतर कोण होते? ते नक्कीच माझ्या आईबाबांसारखे प्रिंसेसचे नवे आईबाबा असणार. तिला सांभाळण्यासाठी त्या पांडुरंगानेच त्यांना तशी बुद्धी दिली असणार. प्रिंसेसचे बाबा म्हणाले तस ती खरंच सीता झाली होती. त्या काळ्या आईन तिला आपल्या कुशीत अगदी व्यवस्थित सांभाळलं होतं. आपल्या लेकराची काळजी नक्कीच घेतली होती तिने. मिळेल का तिला सीतेसारखं एका प्रिंसेसचं आयुष्य. आठवतील का तिला तिचे खरे आईबाबा. कळतंय मला आत्ता का एवढी अस्वस्थ होती ती त्यावेळी? काय शोधत होती तिची नजर?

कळतंय मला आता, माझे ही जन्मदाते आईबाबा असेच असहाय्य असणार त्यावेळी, म्हणुनच त्यांना मला असं पायर्‍यांवर सोडावं लागलं. पण त्यांनी नसेल ना जीव दिला असा........नाही नाही, ते आहेत ईथच कुठेतरी माझ्या आसपास, माझं मन सांगतय मला. त्यांचे चेहरे काळेकुट्ट नाही दिसत मला, अगदी माझ्या आईबाबांसारखेच दिसतायेत मला त्यांचे चेहरे. त्यांनी निष्चितच मला जिवंत ठेवण्यासाठीच सोडलं असणार त्या पायर्‍यांवर. त्यांची पुण्याई म्हणुनच माझ्यावर एवढं प्रेम करणारे आईबाबा मला मिळालेत. बांडगुळ नाहीये, मी तर वेल आहे, एकदिवस झाडाएवढीच मोठ्ठी होणारी. माझे आईबाबा मला नक्कीच नाही जळु देणार उन्हात. मी दुर्दैवी नाहीये. माझ्या अस्तित्वाचा ऊगम अनोरस नाहीये. मला नाही वाटत त्यांच्याबद्दल घृणा, मला असं सोडतांना किती वेदना झाल्या असतील माझ्या आईला, किती भोगाव लागलं असेल तिला. ते मला भेटले तर मी म्हणेन त्यांना, 'आई-बाबा बघा कित्ती मोठ्ठी झालीये मी, नाही मला काही जाब विचारायचा तुम्हाला, नकोयेत मला कुठली उत्तरं, सगळी उत्तर मिळालीयेत मला. सगळे प्रश्न संपलेत माझे. तसच काहीसं जीवघेणं कारण असणार म्हणुन तर तुमचा अर्धा जीव तुम्हाला असा पायर्‍यांवर सोडावा लागला. मी तुमची खरोखर ऋणी आहे. महितेय मला मी तुमच्याजवळ असते तर तुम्हीही मला तुमची प्रिंसेस बनवुन ठेवलं असतं. हो !! मी आहे तुमची सीता................. आहे मी तुमची प्रिंसेस.'

मी आणि प्रिंसेस खरच किती जवळचं होतं आमचं नातं, सातासमुद्रापार हजारो मैलांवर कुठेतरी दुरवर माझ्यासाठी देवदुत बनुन आली होती ती, माझ्या सगळ्या प्रश्नांची ऊत्तर घेऊन. नक्कीच दुर्दैवी नव्हतो आम्ही दोघी.

आईबाबांची खूप आठवण येतेय, फोन करतेय मी त्यांना, ते लगेच येतील धावतपळत माझ्यासाठी........................... त्यांच्या प्रिंसेससाठी.

समाप्त.


Bo-vish, सुंदर गोष्ट. सीतेचा प्रिन्सेसकडून पुन्हा सीतेकडे होणारा प्रवास, जीवघेणा असला तरी आवडला.



एकदम सही ......



नि:शब्द, बो-विश! सुंदर कथा! विषय, मांडणी, भाषा, सगळच. दत्तक आई-वडिलांचं आणि मुलांचं नातं.... हा किती गहन विषय होऊ शकतो... त्याचे किती अन कसे पापुद्रे निघतात आणि ते व्यक्तं करणं किती कठीण.
सुंदर संभाळलय सगळं ह्या कथेत.
पुढच्या लिखाणाची वाट बघते.



अप्रतीम !!!



चांगली झालीये कथा..... फक्त ते 'प्रिन्स' प्रकरण एकही शब्द न बदलता जसंच्या तसं कथेत वापरलंय. ते खटकलं....



हं ... मंजुला अनुमोदन...

कथा छान आहे .सुरुवातीला बरीचशी खरी वाटणारी शेवटी अचानक जरा फिल्मी झाल्यासारखी वाटतेय. माझ्य मते तो मोह तुम्ही टाळायला हवा होता. हे माझं मत ...

-प्रिन्सेस...



मंजु, या कथाप्रकाराला तू फॅक्शन (फॅक्ट + फिक्शन ) असं म्हणु शकतेस,
आता हेच बघना 'टायटॅनिक', 'दा-विंची कोड' किंवा अगदी गेलाबाजार "हे ! राम" याच कथा-प्रकरात मोडतील, 'समुद्र' ही बहुतेक. ही फक्त उदाहरणं म्हणुन दिलीयेत.
म्हणजे एका सत्य घटनेला उपकथानकची अशी जोड की उपकथानकच कथेचा गाभा बनून राहील.

प्रिंसेस, या कथेचा कॅनव्हास तसा खूपच मोठा होत गं म्हणजे, रामायण, सीतेची मनस्थिती, बिबट्यांची डिस्कव्हरी, प्रिंसेस प्रकरण आणि शेतकर्‍यांचे प्रश्न त्यामुळे मलाही ती थोडी विस्कळीत मांडली गेल्यासारखी वाटतेय, पण तू म्हणालीस तसा तिचा व्हिज्युअल ईफेक्ट नक्कीच जाणवतोय, बहुतेक यालाच सिनेमॅटीक लिबर्टी की काय म्हणत असावेत. स्मित

तुमच्या आणि सगळ्यांच्याच प्रतिसादाबद्दल धन्यवाद!! पुढल्या लिखाणात चुका नक्की सुधारेन. !