मायबोली गणेशोत्सव २००८ : स्पर्धा घोषणा!!!

Submitted by संयोजक on 19 August, 2008 - 23:14

Ganesh08SpardhaGhoshana.jpg

मंडळी, गावागावात खेड्यापाड्यात शहरात नगरात इतकच काय अगदी परदेशात सुद्धा सगळेजण गणपतीच्या तयारी ला लागलेत. अगदी घरगुती गणपतींपासून मोठमोठी मंडळे मूर्ती, आरास, प्रसाद, कार्यक्रम ह्यांचा मागे लागलीयेत. महाराष्ट्राच्या ह्या लाडक्या सणाची धांदल हळूहळू सगळीकडेच सुरू झालीये.

आपण मायबोलीकर तरी ह्या सगळ्यात मागे कसे रहाणार?
चला तर मग गणेशाला वंदन करून येणार्‍या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी कंबर कसूया. काढा आपल्या लेखण्या, कॅमेरे, कढया, झारे आणि घ्या बरोबर उत्साहाचं भांडार, प्रतिभेची थैली, विनोदाची झालर आणि कोपरखळ्यांची पोतडी आणि लागा आपल्या लाडक्या दैवताच्या आगमनच्या तयारीला.

मायबोली गणेशोत्सव २००८ घेऊन येत आहे वेगवेगळ्या स्पर्धा, लिखित आणि श्राव्य कार्यक्रम आणि भरपूर अवांतर गोष्टी.

ज्या स्पर्धांसाठी स्पर्धकांना वेळ लागणार आहे आणि पूर्वतयारी आवश्यक आहे अश्या स्पर्धा आधी जाहीर करत आहोत.
स्पर्धांची सुरवात गणेश चतुर्थीला होईल आणि आपापल्या प्रवेशिका दरवर्षीप्रमाणे योग्य स्पर्धाफलकावर पोस्ट करायच्या आहेत.

*******************************************************************
'इथला तिथला पाऊस' - प्रकाशचित्र स्पर्धा

कधी चिंब भिजून, कधी छत्रीखालून, कधी रेनकोटातून तर कधी घरातच भजीसोबत गरम गरम चहाचे घुटके घेत अनुभवला असेल.. क्वचित शब्दांत पकडला असेल.. तर असा हा पाऊस आता तुम्हाला कॅमेर्‍यात पकडायचा आहे. आपल्या फोटो स्पर्धेचा विषय आहे- 'पाऊस'. चला तर मग कॅमेरा तयार ठेवून वरुणराजाची वाट पहा किंवा आधीच घेतलेले एखादे छायाचित्र शोधा..

स्पर्धेचे नियम :
१. पावसासंबंधी असलेला कशाचाही फोटो चालेल.
२. फोटो स्पर्धकाने स्वतःच काढलेला असावा.
३. फोटो काढतांना वापरलेला कॅमेरा आणि असलेले/ठेवलेले कॅमेर्‍याचे सेटींग (नक्की माहीत नसेल तर साधारण सेटींग) सांगावे.
४. फोटोत एखाद्या सॉफ्टवेअर ने काही बदल केले असतील तर तसे सांगावे. तसेच सहभागी झालेल्या आयडीने स्वतःच हे बदल केलेले असावेत.
५. एका आयडीला एकापेक्षा जास्त फोटो पाठवता येतील.
६. फोटो स्पर्धेपूर्वी मायबोलीवर प्रकाशित केलेला नसावा.
७. विजेत्याची निवड जनमत चाचणी (पोलिंग) नुसार होइल.

********************************************************************
'करूया भटकंती' - प्रवासवर्णन स्पर्धा

प्रवास म्हटलं की कसं सगळ्यांच्या अंगात उत्साह संचारतो. काही क्वचित खेददायक प्रसंगांसाठी केलेला प्रवास सोडता प्रवास नेहमीच आनंद देऊन जातो. प्रवास मग तो अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत, खानदेशापासून विदेशापर्यंत, शनिवारवाड्यापासून राणीच्या राजवाड्यापर्यंत किंवा पर्वतीपासून एव्हरेस्ट पर्यंत कुठचाही असला तरी निखळ आनंद आणि अनुभवांची शिदोरी नेहमीच देत असतो. कधीकधी अगदी ४/५ महिने आधी माहिती काढून, हॉटेल, विमान, रेल्वे, लोकल टूर्स सगळं नीट आखून केलेला असतो तर कधी आदल्यादिवशी रात्री १२ वाजता "हवा मस्त आहे..विकएंड ला कोकणात ड्राईव्ह करून यायचं का?" असा फोन आल्याने २ मिनिटात ठरलेला असतो. कधी कामानिमित्त सकाळी जाऊन संध्याकाळी परत अशी बिझनेस ट्रिप असते तर कधी ऑफिस मधल्या मंडळीं बरोबर केलेली पिकनिक असते. कधी वारीमधे किंवा ट्रेक मधे चालत केलेला १/२ दिवसांचा प्रवास असतो तर कधी विमान, क्रुझ ह्यानी केलेला ऐश-आरामाचा प्रवास असतो.

कधी प्रवासाच्या तयारीची धांदल होते तर कधी अगदी व्यवस्थित तयारी केलेली असली तरी कल्पना न केलेल्या समस्या उभ्या राहून गोंधळ उडतो. कधी प्रवासात पाहिलेली प्रेक्षणीय स्थळे, शिल्प, वास्तू, निसर्ग अतिशय अद्भुत असा अनुभव देऊन जातात तर कधी प्रवासात भेटलेल्या व्यक्ती मनात कायमचं घर करून बसतात. कधी एखाद्या गावाचा, शहराचा चेहरामोहरा आपल्याला आवडून जातो तर कधी एखाद्या ठिकाणाबद्द्ल आपल्या मनात असलेल्या प्रतिमेशी ते ठिकाण न जुळल्याने अपेक्षाभंग होतो.

तुम्ही केलेल्या प्रवासाचे, ह्या प्रवासाची तयारी करताना झालेल्या धांदलीचे, प्रवासात घडलेल्या गमती जमतींचे, पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांचे, प्रवासात भेटलेल्या विविध व्यक्तींचे आलेले अनुभव आम्हाला सांगाल?

स्पर्धेचे नियम :
१.एका आयडीला एकच प्रवेशिका टाकता येईल.
२. फोटोचा वापर चालेल. फक्त फोटो प्रवासात स्वत: काढलेले असावेत.
३. विजेत्याची निवड जनमत चाचणी (पोलिंग) नुसार होईल.
४. शब्दमर्यादा नाही. पण निकाल वोटिंग द्वारे असल्याने वर्णन जितके सुटसुटीत तितके अधिकाधिक वाचकांकडून वाचले जाईल.
५. प्रवासवर्णनाला साजेसे शीर्षक द्यावे.

********************************************************************
'न्याहरी- झटपट, चविष्ट आणि पौष्टीक' - पाककला स्पर्धा

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे "Eat breakfast like a King, lunch like a common man and dinner like a beggar".
सकाळची न्याहरी हे आपल्या दैनंदिन खाण्यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं खाणं आणि तरीही आजच्या धकाधकीच्या काळात दुर्लक्षिलेलं. आहारतज्ञांच्या मते प्रत्येकाला सकाळच्या न्याहारीतून दिवसभर लागणार्‍या ऊर्जेतली १/३ ते १/४ ऊर्जा आणि जीवनसत्वं मिळायला हवीत.

आपल्यातले बरेचजण नुसता चहा किंवा दूध घेऊन कामावर पळत असतील किंवा कधी कधी गडबडीत काहीच न घेतासुद्धा. लहान मुलांची वेगळीच तर्‍हा, त्यांना काही खाण्यापेक्षा इतर सर्व गोष्टी करायला जास्त आवडते. घरोघरी प्रत्येक गृहिणीला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे 'खायला काय करु'? आवडत्या पदार्थांपेक्षा नावडत्या पदार्थांची यादी नेहमीच मोठी असते.

आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर नक्कीच आपण आवडत्या पदार्थांची यादी मोठी करु शकतो. चला तर मग सज्ज व्हा आणि कामाला लागा.

स्पर्धेचे नियम :
१. शाकाहारी व मांसाहारी अश्या दोन्ही प्रकारच्या कृती चालतील.
२. या स्पर्धेसाठी वेळमर्यादा नाही तरीही पाककृती वेळखाऊ नसावी. तयारीसाठी लागणारा वेळ जास्त असला तरी चालेल पण पदार्थ करायला लागणारा वेळ हा सकाळी नोकरदार वर्गाच्या होणार्‍या घाई गडबडीशी सुसंगत असावा.
३. पाककृती घरातल्या नेहमी वापरल्या जाणार्‍या स्वयंपाकाच्या साधनांचा वापर करुन करता यायला हवी. (मायक्रोवेव्ह किंवा ओवनचा वापर नको) तसेच नवशिक्या व्यक्तींना पण करता येईल अशी सुटसुटीत असावी.
४. पाककृती स्वनिर्मीत किंवा पारंपारीक कॄतीत बदल केलेली असावी.
५. प्रत्येक पाककृतीसोबत तिच्या पौष्टीक मूल्यांची साधारण माहिती दिली जावी.
६. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
७. एका आयडीला एक प्रवेशिका पाठवता येईल.
८. पाककृती स्पर्धेसाठी 'फोटो अनिवार्य' ही अट काढून टाकली आहे. फोटो पाठवू शकत असाल तर जरुर पाठवा. फोटो नसल्यास गुणांवर परिणाम होणार नाही पण जर दोन पाककृतींना समान गुण मिळाले तर क्रमांकासाठी विचार करताना फोटोसहीत असलेल्या पाककृतीला प्राधान्य दिले जाईल.

********************************************************************

बाकीच्या स्पर्धांचा आणि कार्यक्रमांचा तपशील योग्य वेळी जाहीर करूच.

वरचे चित्र पाहूनच उत्सुक्ता वाढली आहे. काय काय लिहा वाचायला मिळेल... Happy

सुरूवात मस्त, संयोजक, अभिनंदन!!
--
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!

मला तर मुखपृष्ठावरील गणपतीची सुबक नक्षी व त्यातल्या त्यात लाल रंगाच्या विविध छटा फारच सुन्दर दिसताहेत.. असो पुढे उत्सुकता आहेच.... संयोजकाना शुभेछा

व्वा! हे वरच चित्र खूपच छान आहे हं!
ड्रॉईन्ग आणि फोटोन्चा बॅलन्स चान्गला जमलाय, लाल रन्गाची उधळण देखिल सुन्दर! Happy
हे कोणि केलय कळू शकेल काय?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मायबोलीवरील गणेशोत्सवाचे माझे हे पहिलेच वर्ष ... मुखपृष्टावरुन तर तो बहारदारच असणार याची खात्री वाटतीये... मी उत्सव सुरु होण्याची अधिरतेने वाट पहात आहे.

आरे व्वा!!! ह्या वेळेस गणेशोत्सव जोरात होणार म्हनजे !!
संयोजक समीती चे मना पासुन अभिनंदन !!
आणि हो, जरा अजुन कार्यक्रमा नुसार सविस्तर महिति दिली तर बरे होयिल !!!
--------------------

व्व्वा संयोजक ... नुसते चित्र पाहूनच डोळ्याचे पारणे फिटले... उत्सुकतेने बाप्पांची वाट बघतोय Happy

  • लाल रन्गच्या विविध छटा त्यात रेखिव गजानन फारच सुन्दर !
  • एकुणच गणपति जोरात!

हे चित्र कॉपी करुन वापरले तर चालेल काय?

पोस्टर मधील चित्र इंटरनेटवरच्या रॉयल्टी फ्री वेबसाईट (sxc.hu) वरुन नॉनकमर्शीयल युज या कॉपीराईट खाली घेतलेले आहे. आणि त्यात योग्य ते बदल करुनच मग मायबोलीवर वापरले आहे.
कोणाला ते वैयक्तिक वापरासाठी हवे असेल तरच ते वापरता येईल. या फोटोचा कमर्शीयल वापर करता येणार नाही.
तसेच या रॉयल्टी फ्री वेबसाईटचा संदर्भ देणे आवश्यक आहे.

स्पर्धा इंटरेस्टींग दिसताहेत एकदम. नेहमीच्या यशस्वी पण आहेत नां? वाद-विवाद वगैरे Proud

ट्युलिप, तुला बर्‍या वाद-विवाद स्पर्धाच आठवल्या बरोबर... Proud

संयोजक, पाककृती स्पर्धेसाठी प्रवेशिकेबरोबर पाककृतीचा फोटो अनिवार्य नका ना ठेऊ.... वाटल्यास फोटो पाठवल्यास गुण जास्त द्या पाककृतीला, पण माझ्यासारखे बरेच जण असतील ज्यांना फोटो काढून अपलोड करणं सहज शक्य नाही.

साहित्यिका॑ करिता काव्य लेखन स्पर्धा आहे का

फोटो टाकण हे मस्त आहे. पण जसे मन्जू म्हनते की mandatory नको पण marks ज्यस्त मिळतील असे option असेल तरच प्रतीसाद मिळेल.
खरे जेवण अर्धे अधीक रंग बघून होते तसेच फोटो पाहून करावीशी वाटते(माझ्या मते बाकी admin सांगतील ते).

पाककृती स्पर्धेसाठी 'फोटो अनिवार्य' ही अट काढून टाकली आहे. फोटो पाठवू शकत असाल तर जरुर पाठवा. फोटो नसल्यास गुणांवर परिणाम होणार नाही पण जर दोन पाककृतींना समान गुण मिळाले तर क्रमांकासाठी विचार करताना फोटोसहीत असलेल्या पाककृतीला प्राधान्य दिले जाईल.

पाककृती स्पर्धेसाठी कृती नेहमीप्रमाणेच साहित्यलेखन मध्ये टाईप करून पाठवायची का? कल्पना......

सगळ्या स्पर्धा गणेश चतुर्थीला सुरु होतील आणि अनंत चतुर्दशी पर्यंत चालतील. तेव्हा या काळातच स्पर्धेचे वेगळे बातमी फलक (बाफ/बीबी) उघडले जातील तिथेच प्रवेशिका पोस्ट करायच्यात इतरत्र कुठेही पाठवायच्या नाहीत.

गणपती बाप्पा मोरया Happy

निलेश

संयोजक महोदय....... माझी मेल मिळाली का...... मला पोच आली नाही म्हणून विचारतेय.

ही पाककृती पुर्णपणे स्वताचीच हवी आहे का?
का आधी इथेच प्रसिद्ध झालेली स्वतची लिहिलेली चालेल का?

नमस्कार ,
खरंच खुप छान स्पर्धा आहेत .
आम्ही नक्की सहभागी होऊ.

www.devbappa.combappa.jpg

आईशपथ,
खुद्द बाप्पा स्पर्धेत सामील?
आम्हाला कोण विचारणार मग??

कसला गोडूला बाप्पा आहे!! Happy

खरंच खूप गोड दिसतय गणेशाचं बालरुप. गेल्या वर्षी गजानन देसाईंनी गणपतीच्या आदल्या दिवशी टाकलेलं असंच एक सुरेख पोस्ट (स्किटच होतं ते लहानसं) आठवलं. संयोजक शक्य असेल तर ते परत टाका नां इथे.

व्वा, हा छानच गणपती हे हं!
अगदी आमच्या पुर्वापार, गावोगावी स्थापन झालेल्या अनेक "बाल गणेश मित्र मण्डळान्करता" साजेस! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

@ मनुस्विनि,

ही पाककृती पुर्णपणे स्वत:चीच हवी आहे का?
का आधी इथेच प्रसिद्ध झालेली स्वतची लिहिलेली चालेल का? >>>

पाककृती ही पुर्णपणे स्वनिर्मीत असावी अशी अट नाही मात्र पारंपारिक पाककृतीत तुम्ही स्वतः काही बदल केल्याशिवाय ती स्पर्धेसाठी ग्राहय धरण्यात येणार नाही. उदा. इडलीची पाककृती जशीच्या तशी टाकता येणार नाही पण जर त्यात तुम्ही अधिक पौष्टीक व्हावी म्हणुन बदल केले असतील तर ती पाककृती चालेल.
तुम्ही आधी मायबोलीवर प्रकाशित केलेली तुमची स्वतःची पाककृती स्पर्धेसाठी चालेल मात्र ती वर लिहील्याप्रमाणे पारंपारिक पदार्थाची असु नये. त्यात काही बदल केलेले असणे आवश्यक आहे.

ठिक आहे तर मी स्वताची बदल केलेली टाक्ते इथे फोटोसहीत. धन्यवाद.

मनु,
अग इथे नाही टाकायची पाककृती काही. वर संयोजकांनी लिहीलय ना उद्या स्पर्धा सुरु झाल्यावर योग्य त्या बीबी वर टाकायची म्हणुन. Proud

Pages