घोरासुराचं आख्यान की काळसर्पाचा विळखा?

Submitted by अजय on 18 November, 2011 - 15:59

असं वाटतं झोप झाल्यावर?? की मी अजून स्वप्नात आहे !!?>

२० ऑक्टोबर २०११ ची सकाळ मी कधीही विसरू शकणार नाही.

कारण पूर्ण झोप झाल्यावर कसं वाटतं ते मी पहिल्यांदाच अनुभवलं. किंवा कदाचित पूर्वी अनुभवलं असेल तर ते इतक्या वर्षांपूर्वी असावं की मला आठवतच नाहीये. मला सध्या १० वर्षांनी तरूण झाल्यासारखं वाटतंय. यातला प्रत्येक शब्द खरा आहे. ही काल्पनिक कथा नाही तर एक वैद्यकिय सत्यकथा आहे.

मला आठवतंय तेव्हापासून मला झोप प्रचंड प्रिय आहे. कधीही कुठेही मला झोप लागते. इतकच नाही तर मी १० तास झोपून झाल्यावर परत झोपायला मिळाले तर मी परत ८-९ तास झोप काढलेली आहे. माझ्या जवळचे मित्रमंडळी नातेवाईक यांच्यात तो एक चेष्टेचा विषय आहे. दारुड्याला दारू मिळाली नाही तर तो जसा वागेल तसा मी झोप मिळाली नाही तर वागत असे. माझ्या आयुष्यातल्या अनेक संधी मी माझ्या झोपेत व्यत्यय येइल म्हणून मी जाणीवपूर्वक सोडून दिल्या आहेत.

गेले काहि वर्ष झोप आणखी कमी झाल्यासारखं वाटायचं. मी रात्री उशिरापर्यंत वेबवर काम करतो म्हणून हे असं होतं असं घरच्यांचं मत. झोपेत घोरणंही खूप वाढलं होतं. त्यामुळे इतका घोरत असतो सारखा आणि झोप कशी कमी होते तुझी असंही विचारलं जायचं. त्या घोरण्यामधे पण एक वेगळेपणा होता. मधेच ते थांबायचं. आणि माझ्या चेहर्‍यावर वेदना दिसायच्या आणि मी पुन्हा घोरायला लागायचो. मला उठवलं तर हे काहीही आठवायचं नाही.

यातच एक नवीन गोष्ट कळाली म्हणजे Sleep Apnea. भारतात हे कधी ऐकलं नव्हतं. डॉ, दाखवून sleep study केलि तर त्यात सगळं नॉर्मल होतं. डॉ. म्हणाला घोरण्यावर काही उपाय नाही. तुला झोप झाल्यासारखं वाटतंय ना मग काळजी नाही. पण झोप झाल्यावर काय वाटतं तेच मी विसरून गेलो होतो. त्यामुळे जे वाटतं तेच नॉर्मल असं वाटायचं.

मग एका मित्राची भेट झाली. त्यालाही Sleep Apnea नव्हता. त्याचं घोरण्यावर उपाय म्हणून एक ऑपरेशन झालं. आणि त्याचं आयुष्य बदललं (चांगल्या अर्थाने) असं तो म्हणायचा. मी डॉक्टरला विचारले तो म्हणाला तुला मी हे करायला सांगणार नाही कारण ते ऑपरेशनच यशस्वी होण्याची फक्त ५०% शक्यता असते. ऑपरेशन केलेले इतरही काहि भेटले. त्यांचं सगळ्यांचं आयुष्य बदललं होतं ऑपरेशन नंतर. पण डॉ. ही बरोबर होता कारण काही जणांना ३-४ वर्षांनी परत त्रास सुरु झाला होता.

त्यातच Sleep Apnea च्या मेडीकल डेफिनेशनबद्दल आणखी माहिती मिळाली. ती "आहे किंवा नाही " अशी गोष्ट नसते. तुमच्या झोपेत अमुक इतक्या टक्केवारीने जर तुम्ही तमुक करत असाल तर Sleep Apnea ठरतो. त्या टक्केवारिच्या खाली असाल तर तो धरत नाही. माझ्या मते मला तो आहे पण वैद्यकिय व्याखेच्या मर्यादा रेषेच्या थोडा खाली असावा.

वेगवेगळ्या कारणांमुळे तुमच्या घशाचे स्नायू झोपेत शिथील पडतात आणि त्यामुळे श्वासनलिकेत अडचण येऊन घोरण्याचा आवाज वाढतो. कधी कधी ते शिथील स्नायू श्वास घ्यायला अडचण करतात. हे मेंदूला कळले तर मेंदूचा काहि भाग जागा होतो. स्नायू पुन्हा आखडले जातात. श्वसनमार्ग पुन्हा मोकळा होतो. आणि पुन्हा मेंदू झोपी जातो. पण हे फक्त काही सेकंदात होते त्यामुळे त्या व्यक्तीला हे होते आहे याची काहिच जाणीव नसते. पण हे एका तासात अनेकदा होते. त्यामुळे REM नावाचा अत्यंत महत्वाचा झोपेचा टप्पा मेंदू गाठू शकत नाही. त्यामुळे जरी तो माणूस ७ तास झोपला असला तरी त्याचा मेंदू २-३ तासच झोपला असू शकतो. इतकंच नाहि तर झोपेतच हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते.

यावर बरेच उपाय आहेत. तोंडावर एक प्रकारचा मास्क घालून झोपणे हा बराच कॉमन असलेला उपाय मी केला नाही. Breath right नावाच्या नाकाला लावायच्या पट्ट्या मिळतात त्याचा काही उपाय झाला नाही. ऑपरेशन करावे याच्या विचारात होतो पण केले नाही.
वेबवर snoremender नावाचा एक उपाय सापडला. करुन तर पाहू म्हणून ते मागवले आणि तेंव्हापासून माझी सकाळ बदलली आहे. ही जाहिरात नाही तर माझ्या दृष्टिने व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. पण आता फक्त चार आठवडे होतायत. त्यामुळे हे किती दिवस टिकेल माहिती नाही म्हणून इतक्यातच इतरांना सुचवणार नाही. हे लंडनहून येते. इथे अमेरिकेत स्वस्तात काही मिळेल का याच्या शोधात आहे. याचे काही दुष्परिणाम होतात का याचाही शोध घेतो आहे.

पहिले दोन आठवडे सकाळी जबडा चांगलाच दुखायचा (उठल्यावर अर्धा तास). आता दुखत नाही पण अजूनही काही दात, दाढा सकाळी थोड्यावेळ दुखतात. पण उठल्यावर जो ताजेपणा मिळतो त्याच्यापुढे हे दु:ख काहीच नाही. ही अतिशयोक्ती वाटेल. माझा मित्र ऑपरेशन नंतर म्हणाला तेंव्हा मलाही तसेच वाटले. पण वर्षानुवर्षे पुरेशी झोप न मिळाल्यानंतर जेंव्हा ती मिळते तेंव्हा काय वाटते ते शब्दात सांगणे अशक्य आहे.

तुमच्या माहितीत कुणी घोरत असेल तर कृपया जरूर हा लेख वाचायला द्या. सगळेच घोरणे धोकादायक असते असे नाही. पण विशेषतः मधेच ते बंद होऊन एकदम परत चालु होत असेल ते चांगले नाहि. आपल्याला ती व्यक्ती काय मस्त झोपली आहे असे वाटत असते. पण खरे तर घोरण्यामुळे त्या व्यक्तीलाही झोप मिळत नसते आणि त्याच्या नकळत त्याचे आयुष्य धोक्याकडे वाटचाल करत असते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>वेबवर snoremender नावाचा एक उपाय सापडला. करुन तर पाहू म्हणून ते मागवले आणि तेंव्हापासून माझी सकाळ बदलली आहे. ही जाहिरात नाही तर माझ्या दृष्टिने व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. पण आता फक्त चार आठवडे होतायत. त्यामुळे हे किती दिवस टिकेल माहिती नाही म्हणून इतक्यातच इतरांना सुचवणार नाही. हे लंडनहून येते. इथे अमेरिकेत स्वस्तात काही मिळेल का याच्या शोधात आहे. याचे काही दुष्परिणाम होतात का याचाही शोध घेतो आहे. >>

आता इतक्या काळानंतर लेखक अथवा इतर कोणी snoremender किंवा त्या प्रकारच्या उपायांबद्दल काही अभिप्राय देऊ शकतील का ? घ्यायचा विचार आहे म्हणून माहिती मिळाली तर बरे होईल. Happy

snoremender चा मला खूपच उपयोग झाला आणि गेले काही वर्षे मी snoremender आणि इतरही काही उपाय करून पाहिले. माझ्या डॉक्टरलाही (आणखी एका डॉ. ) विचारले आणि त्याने जर तुला चांगली झोप लागत असेल तर जरूर वापर असे सांगितले. एका डेंन्टीस्टने वापरू नको असे सांगितले त्यापेक्षा माझ्या जबड्याला योग्य असे उपकरण तयार करून घे असे सांगितले. पण नेहमीच्या डॉ. बिनधास्त वापर सांगितल्याने मी ते वापरतो आहे,

१) snoremender या साईटवरून मिळणारे (पूर्वी मिळणारे) रेग्युलर snoremender माझ्यासाठी ३-४ महिन्यानंतर कुचकामी ठरू लागले. त्याचे प्लास्टीक मऊ असल्याने काही दिवसांनी त्याचा ताण कमी व्ह्यायचा.

२) त्याच साईटवरून मी Hard Material चे केलेले snoremender मागवायला सुरुवात केली. त्याचा मला सगळ्यात जास्त फायदा झाला. ते एक ८-९ महिने पुरत असे. मी आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा हे मागवले आहे आणि बहुतेक मित्रांना मी हे घ्या असे सुचवले आहे.
या दोन्ही प्रकारात तोंड उघडे राहते.

३) डोक्याला गुंडाळायची (डोक्यापासून हनुवटीला) एक पट्टी मिळते. ती लावली की तोंड घट्ट राहते. पण त्या पट्टीचा मला लगेच त्रास होऊ लागला आणि सकाळी उठल्यावर खूप डो़के दुखायचे. त्यामुळे ती लगेच बंद केली.

४)snorex.com वरून आणखी एक उपकरण मागवले. त्यामुळे तोंड बंद राहते. झोपेसाठी खूप चांगला अनुभव आला. पण त्यामुळे खूप वेळ जबडा दुखायचा. snoremender नेही जबडा दुखतो पण अर्ध्यातासाने थांबतो. पण स्नोरेक्स ने दिवसभर दुखायचा म्हणून ते वापरणे बंद केले.

५) snoremender.com वरुन त्यांचे लेटेस्ट उपकरण वापरले. पण त्यांच्या पहिल्या आणी दुसर्‍या वर्जनने जसा लगेच फायदा झाला तसा यामुळे झाला नाही. त्याला adjust करून वापर करणे चालू आहे. सध्या फक्त १ महिनाच झाला आहे. पण त्यांच्याकडे जुने वर्जन मिळते का ते अजून विचारले नाही. त्यांच्या जुन्या वर्जनसारखे दिसणारे इतर प्रॉडक्ट्स आहेत ते अजून वापरले नाहीत.

डॉक्टरांच्या सल्ल्याने CPAP यंत्र दोन दिवस पूर्वी घेतल. आईला किती फरक पडला ते मी इथे नक्की कळविन.
प्रतिसाद साठी सगळ्यांचे आभार

२०१७ मध्ये काय अपडेट आहे? आता इतक्या काळानंतर लेखक अथवा इतर कोणी snoremender किंवा त्या प्रकारच्या उपायांबद्दल काही अभिप्राय देऊ शकतील का ? घ्यायचा विचार आहे म्हणून माहिती मिळाली तर बरे होईल.

गेली ६ वर्षे snoremender नियमीत वापरत आहे. सहसा २-३ महिन्यातून एकदा मुद्दाम ते न वापरता झोपतो तेंव्हा नीट झोप होत नाही असे लक्षात येते. पण तरी हे करून पाहतो. मी अजूनही त्यांचे Hard Plastic Version वापरतो ते साधारण ८-९ महिने टिकते. snoremender सारखे पण थोडे वेगळे असे बरेच ब्रँड चाचणी करून झाले. पण मला तरी snoremender इतका फायदा इतर कशामूळे झाला नाही. आता सवय झाल्यामूळे सकाळी उठल्यावर जबडा दुखत नाही.

snoremender वापरणार असाल तर त्यांच्या रेग्युलर सॉफ्ट वर्जन पासून सुरवात करा असे सुचवेन. सॉफ्ट् ने जबडा सुरुवातीला कमी दुखेल आणि सवय करायला सोपे जाईल. तुम्हाला ते लागू पडते का नाही याचाही अंदाज येईल. सॉफ्ट चा तोटा इतकाच की ३-४ मिहिन्यांनंतर त्याचा परिणाम कमी होईल. हार्ड ८-९ महिने टिकते.

गेल्या एक दोन महिन्यात वजन बर्‍यापैकी कमी झाल्यावर , न वापरण्याच्या वेळा थोड्या वाढवून बघतो आहे. काही वेळा अजिबात घोरत नाही तर काही वेळेस थोडाफार घोरतो. पण अजून सलग काही दिवस snoremender न वापरता आणि न घोरता झोप कशी येते याचा अजून अंदाज आला नाही.

मला व्यवस्थित झोप लागते पण मी झोपल्यावर घोरतो हे मला कळत नाही पण बायकोला कळते. त्यामुळे बायकोला झोप लागत नाही. आम्ही गेली काही वर्षे वेगवगेळ्या बेड रुम मधे झोपतो. पुर्वी मी घोरत नसे. जसे वय वाढत जाते तसे माणसाची घोरायला सुरवात होते.. बायकोला अगोदर झोप लागली तर माझ्या घोरण्याचा तिला त्रास होत नाही. पण मी अगोदर झोपलो तर तिला झोप येत नाही. एक दोनदा ट्रिपला गेल्यावर एका खोलीत असल्याने तिला तेवढे रात्री झोप आली नाही. तिला अगोदर झोप लागणे ही तिच्या वा माझ्या हातातील गोष्ट नाही. एक बर आहे की तिला झोप लागल्यावर मी घोरलो तर तिला झोपेतून जाग येत नाही. तिला स्वतंत्रपणे ही झोप लागणे वा न लागणे या दोन्ही गोष्टी घडतात. पण तिला झोप न लागण्याचे प्रमाण व शक्यता जास्त असते.
हल्ली मला आपण घोरत असल्याचे लक्षात येवून तात्पुरती जाग येते. तसा मी झोपाळू आहे. बसल्या बसल्याही मी पेंगुळतो. संगणकावर बसल्यावर ही गुं गुं इफेक्ट येतो. डुलकी लागता लागता कधी मानेला झटका बसला की जाग येते. की परत पेंगुळतो.
दोन बेडरुम असल्याने वेगळे झोपता येत पण एकच बेडरुम असेल तर अशक्य आहे आता. पुरेशी झोप झाली नाही कि चिडचिड होण स्वाभाविक असते.
ज्यांना झोप येत नाही ही समस्या असते ते म्हणतात की बरय ना बसल्या बसल्या झोप येते ते! आम्हाला झोपेची आराधना करावी लागते.
मला झोपेत स्वप्नेही भरपूर पडतात.

वजनाचा मुद्दा वर आलाच आहे त्या बरोबरच
रात्रीचे जेवण कमी आणि लवकर करणे , जेवण नंतर थोड्या वेळानी थोडे चालणे
ह्या उपायांनी सुद्धा थोडा तरी फायदा नक्की होईल

घोरणे हा त्रास नसून घोरण्यामुळे इतरांना झोप येत नाही हा त्रास आहे. उपाय योजना यावर काय असू शकते हा व्यावहारिक मुद्दा आहे

भरत दुष्परिणाम लिहिले आहेत हे बरोबर पण घोरणार्‍या व्यक्तिला तो त्रास म्हणून जाणवत नाही अशा अर्थाने.

घोरणे हा खरोखर ऐकणाऱ्याला खूपच त्रासदायक प्रकार आहे , आणि मजा म्हणजे ज्याच्या मुळे इतर माणसं झोपू शकत नाहीत तो मात्र मस्त घोरत पडलेला असतो. खोकला वैगरे असेल तर ही बाकीचे झोपू शकत नाहीत पण तो स्वतः खोकणारा ही झोपू शकत नाही .

घोरण्याचं प्रमाण बायकांपेक्षा पुरुषांच्यात अधिक असते हे माझं निरीक्षण. एकंदरच बायकाच शरीर सैलावून न झोपण्याचं कंडिशनिंग झालेलं असत त्यामुळे ही बायका कमी घोरत असतील.

कधी कधी झोपण्याच्या ट्रेन मध्ये ही कोणीतरी वाघाने डरकाळ्या फोडाव्यात असा घोरत असतो आणि बाकीच्या प्रवाशांच्या झोपेचं खोबरं करत असतो.

घोरण्यामुळे घटस्फोट ही होतात अस ऐकलंय जे अगदीच समजू शकते.
आपल्या घोरण्याचा त्रास होतो असे वाटत असेल तर dr कडे जाऊन ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे पण त्याचा उपयोग नाही झाला तर अतिरेकी विचार वाटेल पण घोरणाऱ्या व्यक्तीने गजर लावून उठावे , जागे रहावे आणि इतरांना थोडा वेळ तरी झोपू द्यावे. थोडक्यात पाळी पाळीने झोपावे. अर्थात इतरांच्या त्रासाची कल्पना असेल तरच हे होईल . नाहीतर घोरणारा घोरत पडेल आणि बाकीचे जागे रहातील.

Pages