मराठी साहित्याच्या पाउलखुणा--भाग १

Submitted by विनीता देशपांडे on 12 October, 2011 - 00:37

सन १८४० च्या सुमारास नवकाव्यपरंपरेचा शुभारंभ झाला.या परंपरेचे आधारस्तंभ म्हणजे समाजात रुजलेले तत्कालीन तीन प्रमुख काव्यप्रवाह होते: संत साहित्य, पंडिती साहित्य, शाहिरी साहित्य अर्थात संत-पंत-तंत काव्य.संत काव्य मराठी काव्याचा एक अनमोल ठेवा आहे.याचा कालखंड म्हणजे तेराव्या शतकातील श्री.ज्ञानेश्वर ते सोळाव्या शतकातील समर्थ रामदासस्वामींच्या साहित्यनिर्मितीपर्यंतचा काळ.यादवांच्या राजवटीत समाजात वर्णभेद ,जातिभेद , विषमता यांसारखे अंतर्द्वंद्व सुरु होते.यात अडकलेल्या सर्वसामांन्यांना स्वार्थातून परमार्थ साधण्याचा मार्ग संतांनी दाखविला. तत्वज्ञानाला विवेकाची जोड देउन एक आदर्श आयुश्याची संकल्पना सांमान्यांनपुढे संतांनी ठेवली. कर्म -निती यांचे महत्व त्यांनी अभंगवाणीने समृध्द केले. म्हणुनच इतक्या शतकांनतरही संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार होतच आहे. मराठी साहित्यात संत साहित्य शाश्वत आहे.
संत काव्यासोबत संस्कृत स्तोत्र ,श्लोक इ.रचनांमार्फत शास्त्री मंडळी पंडिती काव्यपरंपरा जोपासत होती.पंडितीकाव्य म्हणजे कवी मुक्तेश्वर, रघुनाथ पंडित, वामन पंडित, श्रीधर, सामराज, विठ्ठल, निरंजन माधव आनि मोरोपंत या पंडितांनी निर्माण केलेले साहित्य.पंडित काव्याची प्रेरणा संस्कृत काव्य होते.हे काव्य संस्कृत, अलंकारयुक्त व वृत्तांच्या चौकटीत होते, ते संस्कृत जाणणा‌र्‍यांनाच उपयुक्त ठरले. तसेच पंडित काव्यात मुख्यत्वे पौराणिक संदर्भ व तत्वज्ञान मांडले होते आणि त्यातील भाषा सर्वसामान्यांची नसल्यामुळे ती एका ठराविक वाचक वर्गात घुटमळत राहिली, सामान्यवर्गात ती रुळलीच नाही.
शाहिरी काव्य हे तत्कालीन घटना, व्यक्ती, त्यांचे पराक्रम आणि तत्कालीन सामाजिक घडामोडींवर आधारित होते. हे काव्य लोकसमुहापुढे विशिष्ट नाट्यपध्दतीने मांडल्यामुळे जनमानसात पटकन रुळले.या साहित्यात पोवाडे, लावणी या प्रकारांनी क्रांतीकाळात एका प्रकारे जनजागृतीचे कार्य केले.इंग्रजी राजवटीत याला फारशी मान्यता मिळाली नसली तरी तत्कालीन शाहिरांनी हा प्रकार समाजात यशस्वीपने रुजवला,ज्याचा परिणाम वैचारिकक्रांतीचा प्रसार आनि जनजागृतीच्या स्वरुपात बघायला मिळतो.तत्कालीन गाजलेले शाहिर म्हणजे अनंतफंदी घोलप(सन १७४४-१८१९), रामजोशी(सन १७५८-१८१३), होनाजी बाळा(स =न१७५४-१८४४) यांनी आपल्या उत्स्फुर्त रचनांनी एक कालखंड गाजवला.आजही अनेक भुपाळ्या,पोवाडे, लावण्या घरोघरी गुणगुणल्या जातात. साहिरी साहित्याचे वैशिष्ट्ये म्हणजे शौर्यगाथा, सहजरम्य वर्णन,प्रासादिक भाषा आणि नाट्यमय तालबद्द आविष्कार.
इंग्रज राजवट येण्यापूर्वीच अस्थिर सामाजिक जीवनामुळे मराठी काव्याची व्याप्ती हळुहळु आकसत गेली.या अस्थिर काळात प्राचीन परंपरेतील भक्तीपरता पूर्ण नष्ट नहोता समाजात टिकुन होती. किंवाभक्तीपरतेमुळेच समाजात एकात्मता,जीवनमुल्ये,आदर्श टिकुन होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्रात इंग्रज राजवट आल्यावर इंग्रजी साहित्याची हळूहळू ओळख होत असतांना प्राचीन काव्याचे पडसाद जनमानसात रेंगाळत होते. उदबोधन व लोकरंजनासाठी विचार व्यक्त करण्याचे अनेक माध्यम जसे लेख, कथा, कादंबरी, नाटक इ. गद्यसाहित्याची लोकप्रियता वाढत होती. आधिच आक्रस्त मराठी काव्याचे क्षेत्र आणखी आकुंचित होत गेले.या परिस्थितीची जाणिव होताच तत्कालीन साहित्यिकांनी प्राचीन व संस्कृत रचनांचे मराठीत भाषांतर -अनुकरण करुन मराठी काव्याला एक वळण एक दिशा देण्याचा प्रयत्न केला.त्यांचे हे प्रयत्न काळाच्या पडद्याआड जाण्याअगोदर त्यांचा उल्लेख करणे महत्वाचे आणि गरजेचे वाटते.
* श्री.विठोबा अण्णा दप्तरदार,श्री.भास्कर दामोदर पाळंदे आणि श्री.नारायण धोंडोदेव खांडेकर यांचे
भक्तीपर काव्य.
* संतकाव्याचे मंथन करुन "काव्यामृताचा नवनीत भेला " रचणारे श्री.परशूराम तात्या गोडबोले.
* "मेघदूत "वर आधारित श्री.जग्गनाथ पंडित यांचे "करुणाविलास" व "विरहिविलाप" या
खंडकाव्याचा श्री.कृष्णशास्त्री चिपळुणकर यांनी केलेला अनुवाद.या अनुवादाने मराठी काव्य
परत बहरु लागले.
* श्री.गणेशशास्त्री लेले यांचा "रघुवंशाला", "अमरुशतकाला"व "महिम्न्स्तोत्र" चे मराठीत रुपांतर.
* श्री.कृष्णशास्त्री राजवाडे यांचे वर्षभरातील सणांचे वर्णन करणारा " उत्सवप्रकाश " हा ग्रंथ.
* श्री.दातार(श्री.कृष्णशास्त्री चिपळुणकर यांचे नम्रसेवक व विद्यार्थी म्हणवुन घेणारे)यांचे कुमारसंभव
याच्या सातव्या सर्गाचे मराठीत भाषांतर.
* श्री.पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी यांची ऋतुसंहारावर आधारित "षडऋतुवर्णन" ही रचना.
या भाषांतरीत साहित्यावर इंग्रजी साहित्याचा कुठलाच प्रभाव आढळुन येत नाही.या साहित्याने अभिजात संस्कृत रचनांची मराठीत ओळख करुन देण्याचे कार्य केले. या साहित्याची भाषा पंडित कवींच्या वळ्णाची असली तरी त्यातील आत्मा मराठी होता.त्या काळी मराठे काव्याचे क्षेत्र जरी आकुंचित झाले असले तरी तिची योग्यता खालावली असे म्हणता येणार नाही.त्यापुरती काव्यप्रभावाची व्याप्ती कमी होती एवढेच.ही तत्कालीन मराठी काव्याची एक बाजू झाली.
याच काळात इंग्रजी साहित्याचा विलक्षण प्रभाव काही साहित्यिकांवर झाला.ते म्हण्जे:
* बाजबा रामचंद्र प्रधान यांचे सर वॉल्टर स्कॉट लिखित "लेडी ऑफ द लेक" चे थोडे भाषांतर थोडे
अनुकरण असा साहित्यप्रकार म्हणजे "दैवसैनी" हे खंडकाव्य.
* डॉ. कान्होबा रणछोडदास किर्तीकर यांचे "इंदिरा" हे खंडकाव्य टेनिसन लिखित "प्रिन्सेस" ची
अनुकृती होती.ईंदिराच्या निमित्याने कवीने यात स्त्री वैधव्य,वपनविधी,पुरुषांचे बहुपत्नीकत्व,दास्य
अशा अनेक अन्यायांना वाचा फोडली.यांचे अजुन एक वैशिष्ट्ये म्हणजे स य स य हे गण असलेले
बारा अक्षरांचे वृत्त वापरुन त्यास इंदिरा असे नाव दिले.मणिबंधवृत्ताचा त्यांनी जातीत रुपांतर केले.
वृत्त्बध्दरचनांचे नवनवीन प्रयोग करण्याचा आदर्श किर्तीकर यांनी येणार्‍या कवींपुढे ठेवला.
* श्री.विष्णु मोरेश्वर महाजनी यांनी वर्ड्स्वथ, शेले,कीटस,कोलरीज,बायरन,ब्लॅक,बर्न्स,स्कॉट इ.कवींच्या
एकूण ४१ कविताम्चे मराठीत रुपांतर करुन सन १८६६ साली" कुसुमांजली " हा काव्यसंग्रह
प्रसिध्द केला.किर्तीकरांप्रमाणेच महाजनी यांनी यमक च्या दृश्टीने नवे काव्य प्रयोग केलेत.
* श्री.महादेव मोरेश्वर कुंटे लिखित "राज शिवाजी" हे नाट्यमय शौर्य काव्य त्या काळी खूप गाजले.
कुंटे यांचे उल्लेखनीय साहित्य म्हणजे "आर्य लोकांच्या हिंदुस्थानातेल सुधारणा क्रमाचा इतिहास"
या प्रबंधास रोम येथे पारितोषिक मिळाले. तसेच त्यांचे तात्विक काव्य "मन" खूप प्रसिध्द झाले.
प्राचीन व परंपराप्रिय मराठी साहित्य आणि इंग्रजी साहित्याचा प्रभाव असलेले मराठी साहित्य अशा संमिश्र वातावरणात जनमानसात स्वतंत्र कवितेचे अस्तित्व हळूह्ळू आकर घेत होते.प्राचीन मराठी-संस्कृत काव्याचे पडसाद,इंग्रजी साहित्याचा प्रभाव आणि स्वंतंत्रपणे विकसनशील मराठी कविता या तिन्ही स्थितींकडे दृष्टीक्षेप टाकता ल्क्षात येते की प्राचीन परंपरेतील भक्तीपरता पूर्ण नष्ट न होता समाजात टिकून होती. नववृत्तनिर्मितीच्या प्रक्रियेला सुरवात झाली होते.जुन्या क्लिष्ट वृत्तांची शृंखला सैल होत होती,इंग्रजी साहित्याचा प्रभाव आणि अनुकरणामुळे स्फुट कविता,भावकविता बहिर्मुख वृत्ती सोबत आत्मपर काव्याची निर्मिती होत होती.परमार्थ व पौराणिक कवितांमधुन काव्य प्रचलित सामाजिक प्रश्नांकडे वळत होते.वास्तवप्रधान कविता आकार घेत होती.तात्पर्य हेच की कविता आशय आणि अभिव्यक्तीच्या परिवर्तनाकडे वाटचाल करु लागली आणि सन १८८५ च्या उत्तरार्धात आधुनिक कवितेची मुहुर्तमेढ रोवल्या गेली.
सन १८४० ते १९२० या कालखंडातील मराठी कवितेचे अवलोकन करतांना लक्षात येते की त्या काळी परंपरावादी आणि सांस्कृतिक धोरण जपणारी एक काव्यधारा आणि यासोबत प्रगतीशील
व नवविचारांचा संयोग साधणारी काव्यधारा अशा दोन काव्यधारा अस्तित्वात होत्या.या काव्यधारेतील साधारण व असाधारण असे काव्यकतृत्व अस्तित्वात होते.,जे आजच्या विस्तारित काव्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या पाउलखुणा काळाच्या लाटात विरुन जाण्यागोदर त्यांना अर्पण केलेली ही एक काव्यांजली.

क्रमशः........
विनीता देशपांडे

गुलमोहर: