सम्यक मार्गाचे विवेचन

Submitted by rkjumle on 21 September, 2011 - 07:57

भगवान बुध्द बोधगयेला चार आठवडे ध्यानमग्न चिंतन करीत असतांना त्यांना ज्ञान प्राप्ती झाली त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्स्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्स्या आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्स्या.
त्यानंतर भगवान बुध्द त्यांना सोडून गेलेल्या पाच परिव्राजकांना धम्मोपदेश करण्याकरीता सारनाथ येथील इषिपतनच्या मृगदायवनात आले. त्या पाच परिव्राजकांसमोर भगवान बुध्दाने पहिले प्रवचन दिले. त्याला ’धम्मचक्क पवत्तन सु्त्त’ असे म्हणतात.
या प्रवचनात त्यांनी पहिल्या प्रथम विशुध्दी मार्ग समजावून सांगितला. ते म्हणतात की, “ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत, ही विशुध्दी मार्गाची शिकवण आहे.”
विशुध्दी मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे म्हणजे पंचशील. १. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे, २. चोरी न करणे अर्थात् दुसर्‍याच्या मालकीची वस्तू न बळकावणे. ३. व्यभिचार न करणे, ४. असत्य न बोलणे व ५. मादक पेय ग्रहण न करणे.
प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करु शकेल आणि ही पाच तत्वे माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे.
त्यानंतर त्यांनी सदाचाराचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग समजाऊन सांगितला. अष्टांगिक मार्ग म्हणजे- १. सम्यक दृष्टी, २. सम्यक संकल्प, ३. सम्यक वाचा, ४. सम्यक कर्म, ५. सम्यक आजीविका, ६. सम्यक व्यायाम, ७. सम्यक स्मृती व ८. सम्यक समाधी.
१. सम्यक दृष्टी
अष्टांगिक मार्गातील पहिला मार्ग सम्यक दृष्टी हा आहे. सम्यक दृष्टीचा उद्देश अविद्येचा विनाश करणे हा आहे. मनुष्याला दु:खाचे अस्तित्व आणि दु:खनिरोधाचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच अविद्या होय. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चार आर्यसत्य समजणे म्हणजेच सम्यक दृष्टी होय. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. कर्मकांडावर विश्वास न ठेवणे, निसर्ग नियमाविरुध्द कोणतीही गोष्ट न करणे, काल्पनिक अनुमानावर विश्वास न ठेवता वास्तवतेच्या व अनुभवाच्या सिध्दांतावर विश्वास ठेवणे इत्यादी गोष्ठी सम्यक दृष्टीमध्ये येतात. सम्यक दृष्टी आपल्या मनाला योग्य त्या दिशेने घेऊन जाते आणि आपल्या मनाला योग्य वळण लावते.
२. सम्यक संकल्प
अष्टांगिक मार्गातील दुसरा मार्ग सम्यक संकल्प हा आहे. जीवनातील अत्युच्च ध्येय प्राप्‍तीसाठी सम्यक संकल्प अत्यंत महत्वाचे आहे. जीवनामध्ये ध्येय प्राप्‍तीचा संकल्प मोलाचे कार्य करतो. इतर धर्मामध्ये ध्येय प्राप्‍तीसाठी ज्याला मिथ्या संकल्प म्हणता येईल असे देवाची आराधना करण्याचा संकल्प करतात. तथापी भगवान बुध्दांनी साधकाला सम्यक संकल्पाचा जो उद्देश सांगितला तो निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे. निर्वाण हा जीवनातील अत्यंत श्रेष्ट अवस्था आहे. सार्‍या समस्‍येचे मूळ तृष्णा आहे. तृष्णेच्या मागे सारे प्राणी धावत असतात. जीवनामध्ये दु:ख उत्पन्न करणार्‍या राग, द्वेष आणि मोह यामध्ये ते गुरफटून जातात. त्यांना पराजित करण्याचे व त्यातून मुक्‍त होण्याचे कार्य केवळ सम्यक संकल्पामुळे होऊ शकते. दु:खाचे मुळ तृष्णा आहे. निर्वाण तृष्णेचा नाश करतो. तृष्णेचा नाश करण्याचे कार्य सम्यक संकल्पच करु शकते. म्हणून मिथ्या संकल्पाऎवजी भगवान बुध्द सम्यक संकल्पाकडे घेऊन जातात. सम्यक संकल्पात उदात्त आणि प्रशंसनीय अशी ध्येये, महत्वाकांक्षा आणि आकांक्षा याचा समावेश होतो. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावीत हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. मनामध्ये चांगले अथवा वाईट विचार येत असतात आणि म्हणून या विचारांना योग्य अशी दिशा देण्याच्या दृष्टीने सम्यक संकल्प अत्यंत महत्वाचे अंग आहे. जगामध्ये दु:ख आहे आणि या दु:खाला दूर करणे हा सम्यक संकल्पाचा मुख्य हेतू आहे. जीवनात यशस्वी होण्याकरीता जशी सम्यक दृष्टी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे यशस्वी होण्याच्या मार्गाला प्राप्‍त करण्यासाठी सम्यक संकल्पाची आवश्यकता आहे. बुध्द, धम्म आणि संघ या त्रिसरणाचे अनुसरण करणे, पंचशीलाचे पालन करणे, अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिताला आपल्या जीवनात रुजविणे याकरीता सम्यक संकल्प आवश्यक आहे. श्रध्दा, वीर्य, स्मृती, समाधी व प्रज्ञा हे पाच बळ प्राप्‍त करण्याकरीता सम्यक संकल्पाची अत्यंत आवश्यकता असते. जीवनात भगवान बुध्दापासून ते भिक्‍खू-भिक्‍खूणी, उपासक-उपासीका यांनी जे यशाचे अत्युच्च शिखर गाठले ते सम्यक संकल्पामुळेच गाठले.
३. सम्यक वाचा
अष्टांगिक मार्गातील तिसरा मार्ग सम्यक वाचा हा आहे. सम्यक वाचा पुढील शिकवण देते. १) माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे. २) असत्य बोलू नये. ३) माणसाने दुसर्‍याविषयी वाईट बोलू नये. ४) माणसाने दुसर्‍याची निंदानालस्ती करण्यापासून परावृत व्हावे. ५) माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरु नये ६) माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७) माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करु नये. त्यांचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे असे भगवान बुध्दांनी ‘सुत्त निपातात व दीघ निकायात’ सांगितले आहे.
सम्यक वाचा म्हणजेच सम्यक वाणी. वाणी ही चांगल्या आणि वाईट गोष्टी निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. भांडण, तंटा वादावादी हे वाईट वाणीमूळे तर प्रेम, ममता चांगल्या वाणीमूळे ऊत्पन्न होत असते. प्रबोधन, जागृती हे वाणीमूळेच शक्य आहे. म्हणून जीवन जगत असतांना वाणी हे महत्वाचे घटक आहे.
४. सम्यक कर्म
अष्टांगिक मार्गातील चवथा मार्ग सम्यक कर्मांत हा आहे. जीवनाच्या नियमांशी सुसंगत वर्तन करणे, दुसर्‍यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करणे म्हणजे सम्यक कर्मांत होय.
५. सम्यक आजीविका
अष्टांगिक मार्गातील पाचवा मार्ग सम्यक आजीविका हा आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले चरितार्थ चालवायचा असतो. परंतू चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. त्याच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो, ते वाईट मार्ग होत. दुसर्‍यांची हानी अथवा अन्याय न करता जगण्यापुरते मिलविण्याचे जे मार्ग ते चांगले होत. याला सम्यक आजीविका म्हणतात.
६. सम्यक व्यायाम
अष्टांगिक मार्गातील सहावा मार्ग सम्यक व्यायाम हा आहे. सम्यक व्यायाम म्हणजे मनाचा व्यायाम होय. सम्यक व्यायामामुळे अविद्या नष्ट करण्याचा प्रयत्‍न करता येतो. सम्यक व्यायामाचे चार हेतू आहेत. १) आपल्या मनात वाईट विचार येत असतील तर ते येऊ न देणे, २) आपल्या मनात वाईट विचार आले असतील तर ते काढून टाकणे, ३) आपल्या मनात चांगले विचार येत असतील तर ते येऊ देणे व ४) आपल्या मनात चांगले विचार आले असतील तर त्याचे संवर्धन करणे, वाढ करणे. अशा प्रकारे आपल्या मनाला योग्य व्यायाम देवून आपले चित्त शुध्द करता येते. चित्त शुध्दीकरीता सम्यक व्यायामाची अत्यंत आवश्यकता असते.
७. सम्यक स्मृती
अष्टांगिक मार्गातील सातवा मार्ग सम्यक स्मृती हा आहे. सम्यक स्मृती म्हणजे योग्य प्रकारे स्मरण करणे, मनाची जागरुकपणा व विचारीपणा होय. जीवनामध्ये जे कार्य करावयाचे आहे ते जागरुकतेने करायचे असते, हीच स्मृती आहे. सम्यक स्मृती दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवते.
८. सम्यक समाधी
अष्टांगिक मार्गातील आठवा आणि शेवटचा मार्ग सम्यक समाधी हा आहे. भगवान बुध्द म्हणतात की, “सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प,. सम्यक वाचा,. सम्यक कर्म,. सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम व सम्यक स्मृती प्राप्त करुन घेण्यासाठी पाच अडथळे निर्माण होतात. त्या म्हणजे- लोभ, द्वेश, आळस, संशय व अनिश्चय. हे अडथळे दूर करण्याचा मार्ग म्हणजे . सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची सवय लावते.
मनाला स्थायी व कायम स्वरुपाचे वळण सम्यक समाधीद्वारे लावता येते. चित्ताला स्थिर करण्याचे कार्य सम्यक समाधी करतो. सम्यक समाधी मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेचे काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते. त्यामुळेच अकुशल कर्माकडे आकर्षित होणार्‍या मनाच्या प्रवृतीला दूर ठेवते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचा़च नेहमीच विचार करण्याची संवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.
या अष्टांगिक मार्गालाच मध्यम मार्ग म्हणतात. जीवनाची आत्यंतीक अशी दोन टोके आहेत. एक सुखोभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा, प्या, मजा करा. कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो सर्व वासना मारुन टाका. कारण त्या पुनर्जन्माचे मुळ आहेत. हे दोन्हीही मार्ग भगवान बुध्दाने नाकारुन मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगमार्गाची शिकवण दिली.
भगवान बुध्दांनी हा मार्ग समजावून सांगितल्यानंतर शेवटी परिव्राजकांना प्रश्‍न केला की, “जर प्रत्येकाने अष्टांगिक मार्गाचा म्हणजेच सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसर्‍या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानूषपणा दूर होणार नाही काय?” परिव्राजक उत्तरले, ’होय.’ म्हणून आपणही सदाचाराचे जीवन जगण्यासाठी प्रतिज्ञा करावी की, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणून आपणही सदाचाराचे जीवन जगण्यासाठी प्रतिज्ञा करावी की, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.”

छान

( हा लेख धार्मिक गटात असला तरी तो सर्वाना खुला ठेवा.. स्म्पादनमध्ये जाऊन खाली धागा सार्वजनिक की ग्रुपपुरता असा ऑप्शन असतो, तिथे सार्वजनिक केला तर जास्त लोकाना दिसेल.)

जागोमोहनप्यारेजी,
मला ही बाब माहिती नव्हती. आपल्या सुचनेप्रमाने लेख सार्वजनिक केला आहे. तसाच दुसरा लेख अष्टांगिक मार्ग सुध्दा सार्वजनिक केला आहे.
आपण उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!