"काका" अशोक मांकड

आजच्या विशी-तिशीतल्या क्रिकेटप्रेमींना अशोक मांकडबद्दल जास्त माहीती नसावी... पण माझे क्रिकेट समजणे.. गावस्करच्या उदयापासुन सुरु झाले.. म्हणजे १९७१-१९७२ पासुन.. त्यावेळच्या वाडेकरच्या टिमने भारताला इंग्लंड व वेस्ट इंडिजच्या दौर्‍यात प्रथमच विजय मिळवुन दिला होता.. त्या वेळेला अशोक मांकड हा सुनील गावस्करचा सलामी भागीदार म्हणुन काही टेस्टमधे खेळला होता... पण अशोक मांकड खर्‍या अर्थाने रणजी ट्रॉफी मॅचेसमधेच चमकला... त्याच्या दु:खद निधनानिमित्ताने मी इथे त्याच्याबदलची... मी स्वतः पाहीलेली एक ठळक आठवण टाकत आहे...

माझ्या लहानपणी.... म्हणजे ७० च्या दशकामधे ब्रेबॉर्न स्टेडिअमवर(१९७५ पर्यंत) व नंतर वानखेडे स्टेडिअमवर नुसत्या टेस्ट मॅचेसलाच गर्दी होत नसे तर रणजी ट्रॉफी फायनल व इराणि ट्रॉफी मॅचेसना सुद्धा तोबा गर्दी व्हायची... त्या काळात टेस्ट क्रिकेट्पटु रणजी मॅचेसमधेही भाग घ्यायचे ...कारण त्यावेळचे क्रिकेट कॅलेंडर आजच्या इतके बिझी नसायचे.. तर अश्या बर्‍याच रणजी ट्रॉफी मॅचेस व इराणि ट्रॉफी मॅचेस मी आधी वडिलांबरोबर व नंतर स्वतः जाउन पाहील्या आहेत. पण एक मॅच मात्र माझ्या स्मृतीत कायमची घर करुन गेली आहे.. ती म्हणजे १९८० ची मुंबई विरुद्ध दिल्ली रणजी फायनल....

वार्षिक परिक्षा झाल्या होत्या त्यामुळे वानखेडेवर ५ दिवस हा सामना बघायला जायची पर्वणी मी सोडणार नव्हतो... मला वानखेडेवरचे ते रणजी फायनलचे वातावरण खुप अवडायचे... नॉर्थ स्टँड मधे बसुन मुंबईची टिम कशी खेळते हे पाहणे म्हणजे एक पर्वणीच असायची... बाहेर... रॅलिफॅन किंवा तत्सम कंपनींज... कार्डबोर्ड कागदाच्या.... मागे इलॅस्टिक रबर असलेल्या...कॅप्स वाटायच्या.. मग त्या लाल-निळ्या रंगाच्या कॅप्स घालुन सगळे लोक वानखेडेवर आत यायचे... नॉर्थ स्टँड मधे बसुन्(टाटा एंड) समोर गरवारे पॅव्हेलियनची माणसे दिसतात..... गरवारे पॅव्हेलियनच्या डाव्या बाजुला... विट्ठलदास दिवेचा स्टँड दिसतो तर डाव्या बाजुला इस्ट स्टँड (आता त्याला बहुतेक सुनील गावस्कर स्टँड म्हणतात..) व त्याच्या वर उंच इन्कम टॅ़क्सची बिल्डिंग दिसते.. उजव्या बाजुला विजय मर्चंट स्टँड (वेस्ट स्टँड) व त्या मागुन मरिन ड्राइव्ह समुद्र किनार्‍यावरुन अधुन मधुन येणार्‍या.. मुंबईच्या उन्हाळ्यात आल्हाददायक वाटणार्‍या.. हवेच्या झुळुका.... अश्या त्या विहंगम सेटींगमधे क्रिकेट पाहणे .. तेही रणजी ट्रॉफी फायनल.. व तेही त्यावेळची मुंबईची रायव्हल टिम.. दिल्ली बरोबरची मॅच.... म्हणजे सर्व क्रिकेटप्रेमींना एक पर्वणीच होती...

बर एवढे सारे असुनही या सामन्याला अजुन एक वलय होते.. ते म्हणजे दिल्लीचा कप्तान बिशनसिंग बेदी व मुंबईचा लेजेंडरी डावखुरा फिऱकी गोलंदाज पद्माकर शिवलकर... या दोघांचेही हे बहुतेक रणजीमधले शेवटचे वर्ष होते... बेदीबद्दल तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे.. तो, प्रसना व चन्द्रशेखर.. या तिघांनी मिळुन १९६५ ते १९७९.. तब्बल १४ वर्षे.. सर्व क्रिकेट जगाला आपल्या फिरकी गोलंदाजीने अक्षरशः नाचवले होते... पण मुंबईचा पद्माकर शिवलकर हाही अव्वल दर्जाचा डावखुरा फिऱकी गोलंदाज होता व आपल्या फिरकी गोलंदाजीने त्याने एक वेळ मुंबईला १९६२ ते १९७५ .. अशी तेरा वर्षे लागोपाठ रणजी ट्रॉफी जिंकुन देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.... पण आमच्या दुर्दैवाने या सामन्यात बिशन सिंग बेदीने एकही चेंडु टाकला नाही .. दिल्लीतर्फे गोलंदाजीचा सर्व भार मणिंदर सिंग, अतुल वॉल्सन व मदनलाल यांनीच उचलला व पद्माकर शिवलकर उर्फ पॅडी...हाही मुंबईतर्फे या सामन्यात पुर्णपणे निष्प्रभ ठरला...

पण हा सामना सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या लक्षात राहीला तो केवळ अशोक मांकड याच्या जबरदस्त...बॅटींगमुळे.. १९८० पर्यंत.. एके काळी बलाढ्य मुंबई संघाचा कप्तान असलेल्या अशोक मांकडने.. कप्तानीची धुरा सोडुन दिली होती.. या सामन्यात एकनाथ सोलकर मुंबईचा कप्तान होता.. पण मॉरली मात्र अशोक मांकडच टिमचा लिडर होता...

पहिल्या डावात बलविंदर सांधुने दिल्लीची त्रेधातिरपिट उडवुन दिलेली मला आठवते... व पहिल्या दिवसअखेर दिल्लीचा पहिला डाव संपुष्टात देखील आला होता... मुंबईची त्यावेळी सलामीची जोडी होती.. रामनाथ पारकर व गुलाम परकार.. दोघेही डोमॅस्टिक क्रिकेटमधे जबरी खेळाडु होते.. रामनाथ पारकर अस्तास जात होता तर गुलाम परकार उदयास येत होता... पण मदनलालने रामनाथ पारकरला लवकर आऊट करुन पहिल्या दिवसखेरीस दिल्लीला थोडी आशा दिली..

दुसर्‍या दिवशी जेव्हा गुरु गुप्तेही(हा गुरु गुप्ते... राहुल मांकड सारखाच... अशोक मांकडने... तो त्याच्या मफतलाल टिममधला असल्यामुळे... वशिल्याने मुंबईच्या टिममधे बहुतेक घुसवलेला होता...) चिपली आउट झाला तेव्हा सगळ्यांना वाटले की मुंबईचीसुद्धा दिल्ली सारखीच परिस्थिती होणार...पण नंतर अशोक मांकड मैदानावर उतरला.. व त्यानंतर दिवसभर दिल्लीला फक्त गुलाम परकारचीच विकेट घेता आली.. तेही दिवसाच्या शेवटी शेवटी.. परकारची सेंचुरी झाल्यावर.. व तो पर्यंत अशोक मांकड दिडशेच्या आसपास पोहोचला होता... मला आठवत आहे.. मैदानावर अशोक मांकड चौकारावर चौकार लगावत होता तर दिवसभर वानखेडेवरचे मुंबईचे प्रेक्षक.. " काका..... मार अजुन एक चौका...." ' काका.. मार अजुन एक चौका..." असे नारे लगावत होते... मुंबईचे प्रेक्षक अशोक मांकडला प्रेमाने "काका" या टोपण नावाने हाका मारायचे. त्याचबरोबर... मदनलाल बॉलिंग टाकायला रन अप घेत असताना... पेक्षक त्याला... " मदनलाल... भैय्या..... मदनलाल...... भैय्या...." असेही दिवसभर हिणवत होते.

तिसर्‍या दिवशीही मांकडने दिल्लीच्या बोलर्सना बदड बदड बदडले... व शेवटी २७० का २८० रन्स करुन तो आउट झाला तेव्हा मुंबईचा स्कोर ५०० च्या वर झाला होता...

दुसर्‍या डावात मग मुंबईच्या सुरु नायक व बलविंदर सांधुने दिल्लीचा परत एकदा खुर्दा करुन मुंबईला एका डावाने विजय मिळवुन दिला... पण माझ्या मते त्या बोलिंग फ्रेंडली पिचवर ज्या सहजतेने "काका" अशोक मांकडने फलंदाजी केली.. त्यासाठी मी त्यालाच मुंबईच्या त्या वर्षीच्या रणजी ट्रॉफीच्या विजयाचा शिल्पकार म्हणीन......