बाजरीच्या गोड वड्या

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन कप बाजरी, पाऊण कप गूळ वा साखर, (चवीनुसार कमीजास्त ), अर्धा कप नारळाचे वा साधे दूध, दोन चमचे तीळ, दोन चमचे साजूक तूप, मुठभर काजू (ऐच्छीक ), वासाला वेलची.

क्रमवार पाककृती: 

हा पदर्थ मी कदाचित आधी लिहिला असेल, पण परत विचारणा झाली म्हणून लिहित आहे.
बाजरी स्वच्छ धूवून पाच कप पाण्यात, सहा सात तास भिजत घालावी. नीट भिजली कि पाण्यासकट मिक्सरमधे बारिक वाटून घ्यावी. हा चोथा गाळण्यावर घालून सत्व काढावे. परत एकदा पाणी घालून वाटावे व चोथा पिळून घ्यावा. हे मिश्रण एकदा परत गाळून घ्यावे. हे भांडे दोन तीन तास स्थिर ठेवावे. सत्व खाली बसेल व पाणी वर येईल. ते पाणी अलगद ओतून टाकावे. त्यात दूध व साखर वा गूळ मिसळून घ्यावा. वेलचीपूड घालावी.
एका ताटाला तूपाचा हात पूसून घ्यावा. एका जाड बूडाच्या पातेल्यात, तूप तापवून त्यात तीळ घालावेत. ते तडतडले कि काजूचे तूकडे घालावेत. मग बाजरीचे मिश्रण घालून मंद आचेवर सतत ढवळत शिजवावे. झाकण ठेवून एक वाफ द्यावी. मग तूप लावलेल्या ताटात ओतावे. थंड झाले कि वड्या पाडाव्यात.
या वड्या थंड खायला छान लागतात. अगदी चवदार लागतात. या प्रमाणात केल्यास वड्या जमायला हव्यात, नाहीच जमल्या तर खीर म्हणून देखील खाता येईल.

वाढणी/प्रमाण: 
चार जणासाठी.
अधिक टिपा: 

बाजरी बाधत असेल, तर फक्त थंडीत खाव्यात.

माहितीचा स्रोत: 
हा प्रकार कूठे करत असतील तर मला माहित नाही. घरात नाचणीच्या ऐवजी बाजरी आली, त्यावर यशस्वी प्रयोग केला.

दिनेश, बाजरीच्या कापण्या उत्तम होतात. मी मागे लिहिले होते त्याबद्दल. आमच्या विदर्भात बाजरी थंडीतच खातात. बाजरी आणि उडद डाळ एकत्र दळून आणायची आणि त्याच्या मग खमंग 'मिसळच्या भाकरी' होतात. ठेच्यासोबत एकदम रुचकर लागतात.



का का बी, मिसणीच्या भाकरी ची आठवण करुन देलिस...... आता केव्हा घरी जाइन आणी आई च्या हातची गरम गरम भाकरी त्यावर तेल आणी ठेचा खाते अस झालय........



या भाकरीसाठी बाजरी + उडीद डाळ काय प्रमाण घ्यायचं?



या भाकरीपेक्षा हा प्रकार करायला खुपच सोपा आहे. ज्वारी आणि अख्खे उडीद एकतर दळुन ( ४ : १ ) या प्रमाणात पण उत्तम भाकर्‍या होतात. या भाकर्‍या करायला सोप्या असतात कारण उडदामूळे पिठाला चिकटपणा आलेला असतो. या भाकर्‍या लाटूनही करता येतात.
पण तरीही या वड्या सोप्या आहेत. रुचकर लागतात.



जितकी बाजरी त्याच्या अर्धी उडदाची डाळ घ्यायची. डाळ गावठी असेल तर आणखी छान लागते ही भाकरी. दिनेश म्हणालेत तसे ही भाकरी लाटल्या जाते त्यामुळे ज्यांना भाकरी जमत नाही त्यांच्यासाठी बरे आहे. मी दरवेळी भारतातून हे पिठ आणतो पण लगेच संपतं आणि जर नाही संपवल तर कालांतराने पिठाची ती चव निघून जाते.



उडदाची डाळ साला सकट जास्त छान लागते



धन्यवाद. आमच्याकडे काय आहे, ज्वारी चांगली मिळत नाही, बाजरी मिळते.. तर वड्या अन भाकर्‍या करून पाहिन या हिवाळ्यात. स्मित
भाकरी तर करायची सवय आहे, पण वडया जमतील की नाही वाटतय, नायतर खीरीचा पर्याय आहेच. स्मित



नाही सालविरहीतच डाळ हवी. साल असलेली डाळ घातली तर भाकरी काळपट येईल ना म्हणून.



हो काळपट दिसते पण चवीला मस्त लागते