गाथा इराणी

मीना प्रभुंचे " गाथा इराणी " हे नवे कोरे पुस्तक ( मौज प्रकाशन, किंमत ३०० रुपये, पृष्ठे ३७६ ) नुकतेच वाचून संपवले.
खरे तर आम्ही त्यांचे चाहते, रोमराज्यची, गेली दोन वर्षे वाट बघत आहोत, पण हा त्यानी आम्हाला दिलेला सुखद धक्काच आहे.
आर्यनाम क्षेत्रम, असे मूळ नाव असणारा हा देश आणि या पुस्तकाच्या शीर्षकातील, गाथा हा शब्ददेखील, मूळ पारसीच.
इराणी रेस्टॉरंट्स आपल्याला परिचित. त्या कनवाळु लोकांचा देश कसा आहे, याचा अगदी सुंदर आढावा या पुस्तकात आहे. मीना प्रभुंच्या पुस्तकात छायाचित्र कमी असली, तरी त्यांच्या नेमक्या वर्णतून तो प्रदेश, तिथल्या इमारती, शिल्पकला, अगदी डोळ्यासमोर उभ्या राहतात. शिवाय इराणच्या खजिन्यातील ज्या संपत्तीचे मूल्यमापनही होवू शकत नाही, असे काहि नमुने, आपल्याला छायाचित्रातून दिसतात. प्रकाशनमूल्य, अगदी अव्वल दर्ज्याची आहेत.

इराणचे आणि आपले सांस्कृतिक धागे इतके एकमेकात गुंतले आहेत कि, पानोपानी, त्याचा अनुभव येत राहतो. तीनला ते से म्हणतात, आणि एक ला येक. बाकि दोन आणि चार ते दहा, सर्व अंक शब्दात तेच. इतिहासातही सतत आमनेसामने होतीच, ते संदर्भही इथे येत राहतात. औरंगजेबाने, शहा अब्बासला पाठवलेल्या एका पत्रात, आलमगीर अशी सहि केली होती, त्याला उत्तर देताना शहाने लिहिले होते, तुझ्याच देशात, तुझ्या दक्षिणेला असलेल्या शिवाजी नामक काफ़रालाही तू जिंकू शकत नाहीस, तू कसला आलमगीर ( जगाचा राजा )

इराणमधली अप्रतिम वास्तूकला, तर इथे अचंबित करते. निव्वळ प्रकाशाच्या मोराचे, वर्णन तर मूळातूनच वाचायला पाहिजे. एखादा पूल, किती देखणा, असू शकतो. तोही इथे भेटतोच.

पारसी लोकांच्या धर्माची इथे ओळख आहेच पण मुसलमानाच्या प्रतिमक्केला, दिलेली भेटही आहेच.
पण तरिही सगळे आलबेल आहे असे नाही. तिथे स्त्रियाना हिजाबचीच नव्हे तर चादोरची पण सक्ति आहे. लेखिकेला तर अगदी विमानात प्रवेश करण्यापासूनच त्या सक्तिचा सामना करावा लागला. आणि त्याबद्दलचा निषेध, लेखिकेने वेळोवेळी, जो भेटेल त्याच्याकडे केला. एका मुल्लाला सुद्धा त्यानी सोडले नाही. आणि या सर्वाचे परिणामहि त्यानी भोगले.

लेखिकेची देवधर्माविषयी मते, मला अत्यंत प्रिय आहेत. या पुस्तकात ती मते, अत्यंत धारदारपणे व्यक्त झाली आहेत.

आम्ही मस्कतला असताना, इराणी ओले पिस्ते, डाळिंब, केशर, हलवा यांचा मनसोक्त आस्वाद घेतला होता. पण प्रत्यक्ष तिथे मात्र लेखिकेचे जेवणाचे हालच झाले. सारखा क नावाने सुरु होणारा एक पदार्थ खावा लागला. या पदार्थाचा लेखिकेला इतका वैताग आला होता कि शेवटी, त्याचा उल्लेख देखील, त्याना नकोसा झाला होता.

आपल्या कडव्या धार्मिक आणि राजकिय मतानी, इराण जगभर बदनाम आहे. देश असा तर माणसे कशी असतील, असे लोक समजत असतात, पण या समजाला मात्र लेखिकेने पुर्णपणे खोटे ठरवले आहे.

पण या सर्वांपेक्षा पुस्तकभर व्यापून राहिला आहे तो, इराणी लोकांचा जिव्हाळा. हा जिव्हाळा त्यांचा राष्ट्रीयधर्म असावा, इतक्या निष्ठेने ते लोक तो पाळतात. भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे, हि ओळ अक्षरशः खरी ठरते तिथे. आपण आपल्या परिचिताना, मित्रमैत्रिणीना सुद्धा जितका जिव्हाळा दाखवू शकत नाही, तितका जिव्हाळा, तिथले लोक, एका परदेशी प्रवाश्याला दाखवतात. ज्या लोकांशी लेखिकेचे वाद झाले, त्यानीदेखील हा जिव्हाळा जपला आणि लेखिकेला शरमिंदे केले. आणि हे सगळे खास मीना प्रभुंच्या निखळ प्रामाणिक लेखनातून आपल्यापर्यंत पोहोचते. हे सर्व प्रसंग मूळातूनच वाचण्याजोगे आहेत. लेखिकेच्याच शब्दात सांगायचे तर,
जीवनाच्या व्यवहारात स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र होण्याच्या नादात मी किती रुक्ष कोरडी झाले आहे. सगळं देणंघेणं किती मोजूनमापून करते आहे या जाणीवेने माझे डोळे उघडले. सारखे पाणावत असले तरी नक्की उघडले. असलं वेडं प्रेम शिकून घ्यायला हवं पुन्हा. ----
या मातीचा हा गूण असलेला हा प्रेमळपणा मला आतून उसवून पिंजून काढतो आहे. आता विचारा मला पुन्हा कुठल्या देशात जावंसं वाटतय ? इराण, निःसंशय इराण.


ईथली लेखिकेबद्दलची चर्चा स्वतंत्र विभागात हलवली आहे.

http://www.maayboli.com/node/2733



'गाथा इराणी' (अतिशय प्रयत्नपूर्वक) वाचलं.

३७६ पृष्ठांच्या या पुस्तकात 'हिजाब', 'कबाब खाऊन आलेला कंटाळा', 'इस्लाम किती वाईट' आणि 'मला बघा कशी सगळ्यांनी मदत केली' हे किमान साडे तेरा हजार वेळा येतं.
नेटानं पुस्तक पुरं केलं.



हाहा तुझ्या शर्थीची धन्य आहे.

    ***
    It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
    - Gore Vidal



    सहमत आहे चिन्मय. मलाही हे पुस्तक अतिशय कंटाळवाणे वाटले. त्याच त्याच गोष्टि इतकेदा सांगितल्या आहेत. दरवेळी किमान ३०० पाने असायलाच हवित असं काही मौज वाले अट घालतात का बाईंना?त्यापेक्षा छोटेखानी पुस्तक काढले असते तर बरे झाले असते.
    .
    मुस्लिम धर्म कसा वाईट या बरोबर मी कशी देव मानत नाही हे इतकेदा आहे की त्या स्वतःच एक "नास्तिक धर्म प्रचारक" झाल्यागत वाटु लागले.



    --------------प्रतिसादावर काम चालू.------------ फिदीफिदी