पन्हाळगडचा वेढा (इ.स. १७०१)

Submitted by वेताळ_२५ on 2 August, 2011 - 08:10

Picture 1252.jpg

मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याच्या इराद्याने जवळजवळ दीड तप दक्षिणेत तळ ठोकून बसलेल्या औरंगजेबाला राजाराममहाराजांच्या मृत्यूची (२ मार्च १७००) बातमी समजल्यावर मनोकामना पूर्ण झाल्याचा आनंद झाला. खाफीखान लिहतो, "बादशाहाला ही बातमी कळली...त्याने परमेश्वराचे आभार मानले आणि शहाजाणे वाजविण्याची आज्ञा केली." मोगल लष्करातील लहान मोठ्या अधिकार्‍यांची प्रतिक्रिया खाफीखानने पुढील शब्दात व्यक्त केलेली आढळते. 'या दुष्ट मराठ्यांची पाळेमुळे नाहीशी झाली. त्याच्या (राजाराम) मागे त्याची लहान मुले आणि निराधार बायका राहील्या आहेत त्यांचा निकाल लावणे म्हणजे अगदी सोपे आणि क्षुल्लक काम आहे.'
परंतु औरंगजेबाचा आणि त्याच्या पदरी असलेल्या मोगल अधिकार्‍यांचा लवकरच भ्रमनिरास झाला. राजारामाच्या मृत्यूनंतरही मराठ्यांचे राज्य धुळीस मिळविता येणे अशक्य आहे याची औरंगजेबाला खात्री पटली. राजारामाची विधवा पत्नी ताराबाई हिने मराठा सरदारात चैतन्य निर्माण केले आणि मर्दुमकीने अनेक आघाड्यांवर मोगलांचा प्रखर प्रतिकार करण्यास सुरवात केली. खाफीखाननेच म्हटल्याप्रमाणे ताराबाईने विलक्षण धामधूम उडविली. स्वातंत्र्यप्रिय मराठ्यांची चिवट आणि निकराची झुंज पाहून मोगल बादशहा हताश झाला. तरीही मोठ्या जिद्दीने मराठ्यांचे कील्ले जिंकून घेण्याची मोहीम औरंगजेबाने पुन्हा हाती घेतली. या मोहीमेत त्याने अनेक किल्ले घेतले. परंतू हे किल्ले घेताना मोगल सरदारांचे सामर्थ उपयोगी पडले नाही. किल्लेदारांना अफाट लाच देऊन किल्ले ताब्यात घेण्याचे तंत्र औरंगजेबाने स्विकारले. परंतू अशाप्रकारे हाती आलेले किल्ले मोगलांची पाठ फिरताच मराठ्यांनी जिंकून घेतले. त्यामुळे खजिनाही रिकामा झाला आणि किल्लेही गेले असे म्हणण्याची पाळी औरंगजेबावर आली अखेरीस मोहीमेचा हा शेवटचा कालखंड त्याच्या दृष्टीने शोकपर्यवायी ठरला.

औरंगजेबाच्या अपयशला प्रामुख्याने ताराबाईचे कर्तॄत्व आणि मराठे सरदारांची स्वातंत्र्यलालसा कारणीभूत झाली. पावसाळा येईपर्यंत किल्ले झुझंवायचे आणि त्यानतंर मोगलांकडून भरपूर लाच घेऊन ते त्यांच्या हवाली करावयाचे ही नीती मराठ्यानी स्विकारली होती. पावसाळा संपताच पुन्हा किल्ले जिंकून घेऊन वर्चस्व प्रस्थापित करणे मराठ्यांना अशक्य नव्हते. मराठ्यांच्या या धूर्तपणाची औरंगजेबाला नीटशी कल्पना झाली नाही असेच म्हणावे लागेल. सतत कील्ले जिंकत रहाणे, एवढे एकच ध्येय त्याने उराशी बाळगले होते. 'तारीके दिल्कुशा'चा लेखक भिमसेन सक्सेना याने म्हटल्याप्रमाणे बादशाहाला मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्याचे वेडच लागले होते. मराठ्यांनी स्विकारलेले तंत्र ज्याप्रमाणे औरंगजेबाच्या अपयशाला कारणीभूत झाले, त्याप्रमाणे मोगल अधिकार्‍यांची भ्रष्टाचारी वृत्ती, मोहीमेविषयीची उदासिनता, आपापसातील द्वेषभाव आणि वेळकाढूपणा इत्यादी दुर्गुणही कारणीभूत झाले. जवळ जवळ दीड तप आपापली घरेदारे सोडून परप्रांतात डोंगराळ प्रदेशातील किल्ले जिंकण्याचे बिकट काम मोगल सैन्य करत होते. बादशहाचा अधिकार म्हणून त्याची आज्ञा मानावयाची आणि पडेल ते काम केवळ कर्तव्य म्हणून करावयाचे अशी प्रवृत्ती मोगल सेनेत निर्माण झाली होती. मोगल सेनेच्या संसाराची दुर्दशा कशी झाली होती याचे चित्र भिमसेन सक्सेनाने मार्मिकपणे रेखाटले आहे. मोगल अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराचे दाखलेही विपुल प्रमाणात मिळतात.

औरंगजेबाच्या मोहीमेच्या अपयशाचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे किल्ले जिंकण्यासाठी मोगलांनी स्विकारलेले चुकीचे तंत्र हे होय. डोंगरी किल्ले जिंकून घेण्यासाठी दमदमे उभारणे, साबात किव्हा भुयारी मार्ग खोदणे इत्यादी अत्यंत खर्चीक क्लेशकारक मार्गांचा मोगलानी अवलंब केला. दमदमे उभारण्यासाठी आणि 'साबात' तयार करण्यासाठी लाखो रुपये मोगल अधिकार्‍यांनी खर्च केले. परंतू कचखाऊ प्रवृत्तीमुळे किल्ल्यांच्या तटाला खिंडार पाडून प्रवेश करणे आणि जय मिळवने त्यांना फारसे जमले नाही.
किल्ले ताब्यात घेण्यासाठी मराठ्याना भरपूर लाच देण्याचे सत्र या अधिकार्‍यांनी सुरू केले. अशा प्रकारे मोगलांच्या खजिन्यालाच खिंडार पडून तो रिकामा होण्याची वेळ आली. खाफीखान लिहतो. 'शहाजान बादशहाने साठविलेला सगळा खजिना बादशहाने ओतला...पण मराठ्यांचा पराक्रम वाढतच गेला.'

किल्ले घेण्यासाठी मोगल अधिकारी किती यातायात करीत आणि अखेरीस ते अपयशी कसे ठरत याची कल्पना इ.स. १७०१ मधील पन्हाळगडाच्या वेढ्याच्या हकिकतीवरून येण्यासारखी आहे.
औरंगजेबाचा एक विश्वासू अधिकारी साकी मुस्तैदखान हा या मोहीमेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित होता. त्याने आपल्या 'मासिरे आलमगीरी' या फारसी ग्रंथात पन्हाळगडच्या वेढ्याचे (९ मार्च ते २८ मे) वर्णन तपशीलाने दिले आहे. खाफीखानाने आपल्या 'मुन्तखबुललुबाब' या ग्रंथात पन्हाळ्याच्या वेढ्याची हकीकत दिली आहे. साकीमुस्तेदखानाने तरबियतखान, फत्तेहुल्लाखान इत्यादी मोगल सरदारांच्या कर्तृवाची आणि अकलमंदीची केलेली तारीफ आढळते. खाफीखानाने मात्र पन्हाळ्याच्या वेढ्याचा तपशील देताना तरबियतखान हा मोगल अधिकारी फत्तेहुल्लाखान, महमंद मुरादखान या कर्तृत्ववान अधिकार्‍यांचा द्वेष करीत असे हे स्पष्ट केले आहे. 'बादशाहाची दक्षिणेकडील मोहीम लांबण्याचे मुख्य कारण म्हणजे सरदारांतील मतभेद आणि त्यांच्यातील एकीचा अभाव हे होय' असे प्रमाणिक मत खाफीखानाने व्यक्त केलेले आढळते. परंतु मोगल अधिकार्‍यांच्या अपयशावर खरा प्रकाश सर विल्यम नॉरीस या ब्रिटिश राजदूताने टाकलेला दिसून येतो. पन्हाळगडचा वेढा चालू असताना विल्यम नॉरीस औरंगजेबाच्या भेटीसाठी लष्करी तळावर आला होता. त्याने स्वत: वेढ्याचे निरीक्षण केले. साकी मुस्तेदखाना प्रमाणे नॉरीसनेही पन्हाळ्याच्या वेढ्याची हकीकत लिहून ठेवली; त्यावरुन मोगलानी स्वीकारलेले मोहीमेचे तंत्र किती चुकीचे होते याची कल्पना येते.
साकी मुस्तेदखानाने वेढ्याचे वर्णन करताना तरबियतखानाने तयार केलेल्या 'साबात' ची किंव्हा भुयारी मार्गाची माहीती दिली आहे. हा मार्ग खडकाळ जमीन खणून तयार करण्यात आला होता. एकाच वेळी तीन सशस्त्र माणसे जाऊ शकतील एवढा तो रूंद केलेला होता. त्याशिवाय भुयारी मार्गात एका विशिष्ट ठिकाणी वीस सैनिक बसू शकतील असे स्थळ तयार करण्यात आले होते. या ठिकाणाहून सैनिकाना किल्ल्याच्या सफेलीवर किंव्हा पडकोटावर असलेल्या लोकांवर मारा करण्यासाठी खास सोय करण्यात आली होती. याचाच अर्थ या स्थळाला आणि भुयारी मार्गाला जंग्यांची (Loopholes) तरतूद करण्यात आली असावी. 'बुरजाचा खालचा भाग खणून इतका पोकळ करण्यात आला होता की खालील पोकळीत मोगलांचे एक पथक पहारा देत असे. दुसर्‍या बाजूने फतेहुल्लाखानाने किल्ल्याच्या तटापर्यंत अशाच प्ररकारचा भुयारी मार्ग तयार केला. 'खाफीखानानेही या दोन्ही मार्गाची माहीती दिलेली आहे. औरंगजेबाने एप्रिल १७०१ मध्ये फतेहुल्लाखानाने तयार केलेल्या भुयारी मार्गाचे निरीक्षण केले असे नॉरीस लिहीतो.

परंतु अशा प्रकारचे भुयारी मार्ग तयार करूनही मोगलांना किल्ला सर करण्याची हिंमत होईना. खाफीखान लिहतो. 'हे सर्व करूनही किल्ल्यावरील लोक हवालदील झाल्याचे चिन्ह दिसेना.' खाफीखानाने त्याचे कारण दिले नाहीं. नॉरीसने केलेल्या निरीक्षणात मोगल अधिकार्‍यांच्या कचखाऊ प्रवृत्तीचे दर्शन होते.
'The fort, it seemed, had no more guns than the besiegers and not more than three hundred men and though there were two or three breaches in the wall; yet the mughal army dared not attempt to enter or make an assault '

या कचखाऊ प्रवृत्तीची कारणमींमसा करताना नॉरीसने अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचारी वर्तनाला दोष दिला आहे. औरंगजेबाने एक लाखापेक्षा अधिक सैनिक पगारावर ठेवले असताना प्रत्यक्षात वीस हजार सैनिकच खर्‍या अर्थाने लढत होते. खोटी हजेरी पुस्तक तयार करणे आणि भरपूर पैसा खाणे ही गोष्ट अधिकार्‍यांना चांगलीच मानवलेली होती. नॉरीस लिहतो, "Ye cheifest Gaine of all ye officers for a General yt has ye pay of 8,000 horse wch is about 25,000 sterling a month (as Ased Choun has) if he keepes 1,500 it is reckond a greate deale and ye Rest put in his pockett and sae all ye Rest."
औरंगजेबाच्या तोफखान्यावर काम करणार्‍या एका इंग्लिश माणसानेही पुढीलप्रमाणे उदगार काढले होते; `ye top to ye bottom there is nothinge but cheatinge and treachery and basenesse in ye Highest degree.' बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मोगल लष्करातील नोकरांचे पगारही थकले होते असे नॉरीसला दिसून आले.

किल्ल्याच्या तटावर मारा करण्यासाठी सात तोफा मोगलांनी रोखल्या होत्या. त्या तोफांमधून दगडी गोळ्यांचा वर्षाव करण्यात येत असे. वास्तविक पाहता लोखंडी गोळ्यांचा उपयोग अधिक परिणामकारक झाला असता. नॉरीसने त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलेले आढळते. मोगलांचा तोफखाना अवजड आणि किल्ले (विशेषत: डोंगरी) जिंकून घेण्याच्या दृष्टीने कमी फलदायी होता. हरीहर दास यांनी म्हटल्याप्रमाणे,
'The Mughal's heavy artillery was so inadequte because it was cumbrous, unmanageable and ill-mounted by the Indian gunners, who were at the period unskilled in the management of ordnance.' यावरून दमदमे उभारणे आणि भुयारी मार्ग खोदणे या दोन्ही गोष्टी डोंगरी किल्ले घेण्याच्या दृष्टीने सोयीच्या नव्हत्या हे दिसून येईल. डोंगरी किल्ले जिंकण्यासाठी दोराच्या सह्याने किंव्हा शिड्यांच्या मदतीने कडेकपारी आणि तट चढून जाणे हाच खरा मार्ग होय.
मोगलांना हा मार्ग अपरिचित आणि दुष्कर होता. पुष्कळ ठिकाणी त्यांनी स्थानिक मावळे लोकांना भरपूर पैसे देऊन त्यांचा उपयोग करून घेतला. परंतु शिड्यांचा किंव्हा दोराच्या सह्याने (नरदुबान) किल्ला जिंकून घेणे मोगलाना जमलेच नाही.

एप्रिल १७०१ मध्ये औरंगजेबाने पन्हाळा आणि पावनगड या दोन्ही किल्ल्यांवर निकराचा हल्ला करण्याची आज्ञा मोगल अधिकार्‍यांना केली. पावनगड हा पन्हाळ्याजवळचा दुसरा डोंगरी किल्ला होय. एका अर्थाने हा किल्ला म्हणजे पन्हाळ्याचा उपदुर्ग, त्यामुळे पन्हाळ्याबरोबर पावनगड जिंकून घेण्याची योजना औरंगजेबाने आखलेली होती. पन्हाळा व पावनगड यांच्या दरम्यान असलेली एक टेकडी महमद मुरादखान याने सर केली आणि टेकडीवरून मोर्चे बांधण्याचा उपक्रम सरू केला असे खाफीखान सांगतो. परंतु मुरादखानचे वर्चस्व सहन न होणार्‍या रुहुल्लाखान, हमीदुद्दीनखान इत्यादी अधिकार्‍यानी मुरादखानला अडचणीत पकडून त्याचा कार्यभाग उधळून लावण्यात यश मिळविले. दोन किल्ल्यांच्या दरम्यान असलेल्या टेकडीवर मोगलानी ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अपयशी ठरला असे नॉरीस लिहतो.

किल्ले (पावनगड आणि पन्हाळा) जिंकण्याची आशा मावळू लागल्यामुळे मोगल अधिकार्‍यांनी नॉरीस आणि त्याच्या सहकार्‍यांना मदत करण्याची विनंती केली. या प्रसंगी बादशहाला मदत केली तर मागाल त्या सवलती मिळतील असे आमिषही नॉरीसला दाखवण्यात आले. या ब्रिटिश राजदूताने आपल्याबरोबर बारा पंचधातूच्या तोफा आणल्या होत्या. या तोफांमधून लोखंडी गोळे उडविले पाहीजेत अशी अट घालून नॉरीसने औरंगजेबाला तोफा देण्याचे मान्य केले. नॉरीसबरोबर आलेल्या सर्व ब्रिटिश सोल्जरांनी किल्ला जिंकून घेण्यासाठी मोगल सेनेला मदत करावी अशी औरंगजेबाची इच्छा होती. परंतु त्यात धोका वाटल्यामुळे नॉरीसने फक्त सहा कुशल गोलंदाजांना मदतीस देण्याचे कबुल केले. बादशहा आणि ब्रिटिश राजदूत यांच्यामध्ये मतैक्य होऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात शहजादा महमद कामबक्ष आणि तरबियतखान यांनी किल्लेदाराबरोबर बोलणी सुरु केली. अखेरीस भलीमोठी रक्कम घेऊन मराठा किल्लेदारांने २८ मे १७०१ रोजी पन्हाळा आणि पावनगड हे दोन्ही किल्ले मोगलांच्या हवाली केले. साकी मुस्तेदखान मात्र लिहतो की किल्ल्यातील लोक शहाजाद्याला शरण आले. तेंव्हा बादशहाने मोठ्या उदार मनाने त्यांचे अपराध माफ करुन त्यांना किल्ले सोडुन जाण्याची परवानगी दिली.

पन्हाळ्याच्या वेढ्यासंबधी खाफीखान, साकी मुस्तैदखान आणि विल्यम नॉरीस या लेखकांनी दिलेला तपशील काळजीपूर्वक पाहील्यास प्रामुख्याने खालील गोष्टी स्पष्ट होतात.

१. पन्हाळ आणि पावनगड जिंकून घेण्यात मोगलांना यश आले नाही.
मराठ्यांनी स्विकारलेल्या तंत्राप्रमाणे किल्लेदाराने पावसाळा तोंडावर आल्या नंतर भलीमोठी
रक्कम मोगलांकडून घेऊन दोन्ही किल्ले त्यांच्या हवाली केले. २८ मे रोजी किल्ले स्वाधीन
करण्यात आले ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.
२. डोंगरी किल्ले जिंकून घेण्यासाठी मोगलांनी स्वीकारलेले युध्दतंत्र (दमदमे उभारणे, साबात तयार
करणे इत्यादी ) खर्चिक, क्लेशकारक आणि हास्यास्पद स्वरुपाचे होते. या पध्दती मुळेतीन तीन महीने
वेढा रेंगाळत चालत असे.
३. मोगलांन जवळ तोफा फारश्या परिणामकारक नव्हत्या. तोफांमधून दगडी गोळे उडविण्याचे तंत्र
स्वीकारल्यामुळे त्यांचा प्रभावही पडू शकत नव्हता.
४. मोगल अधिकारी एकमेकांचा द्वेष करीत होते. साधी टेकडी हस्तगत करण्याचे यशही महंमद
मुरादखानला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी लाभू दिले नाही. स्वत: बादशहा संशयी स्वभावाचा होतां.
नॉरीस लिहतो, "The old king is very cunninge and has spys upon everybody"

पन्हाळ्याप्रमाणे इतर डोंगरी किल्ले घेण्यासाठीही मोगलांनी चुकीचे तंत्र स्वीकारले आणि परिणामी औरंगजेबाची दक्षिणमोहीम अखेरीस अपयशी ठरली.

दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग १
http://www.maayboli.com/node/27603

दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग २
http://www.maayboli.com/node/27608

साल्हेरची लढाई
http://www.maayboli.com/node/27578

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

. Happy

छान लेख, अशा स्वराज्यातिल अनेक लढायाबाबत माझ्याकडे तरी अज्ञानच आहे. अजुन असे वाचायला आवडेल.
वरचा प्रतिसाद बेफिकीर यांचा नसुन बेफकिर यांचा आहे असे दिसते.

खरच की म्हणजे माबोवर लवकरच "तोतयाचे बंड" होणार तर >>>> म्हणजे आता आम्ही बंड वाचायचे की इतिहास ???

लेखा बरोबर प्रतिसाद नेहमीच वाचनीय असतीलच असे नाही.

हा सुद्धा लेख आवडला Happy

छान माहिती! Happy
जमल्यास सातारच्या अजिन्क्यताराच्या लढाईवेळची माहीती देखिल द्या ही विनन्ती

नक्कीच लिंबुदा, लवकरच प्रयत्न करीन...:स्मित:
सातारची लढाईही मराठा इतिहासात एक अभुतपूर्व लढाई आहे.
या लढाई दरम्यान औरंगजेब थोडक्यात मरता मरता वाचला होता.

चांगल्या आणि वाईट प्रतिसांदाबद्दल सर्वांचे आभार

लेखा बरोबर प्रतिसाद नेहमीच वाचनीय असतीलच असे नाही. >>> अगदी बरोबर

संभाजीराजांनंतरचा इतिहास मला फारसा माहीत नाही. लेखातील माहीतीबद्दल धन्यवाद!
अजुन माहीती वाचायला नक्कीच आवडेल. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

बेफकीर यांनी लिहिलेली प्रतिक्रिया का उडवली? 'टुकार लेख' म्हणे.. असे काय टुकार आहे त्यात?

अरे मस्तच लिहीतोयस रे मित्रा....
फारच सुरेख माहीती दिली आहेस. मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आत्ता कुठे काही ठिकाणी वाचायला मिळत आहे. ज्या तडफेने महाराष्ट्र निर्नायकी लढला त्या मानाने त्याबद्दल फारसे कुठे लिहूनच आलेले नाही.
अतिशय स्त्युत्य उपक्रम..अजून लेख येऊ देत

वेताळ_२५

छान लेखन. तुमच्या लेखना मुळे आमचे ज्ञान वाढत आहे. धन्यवाद. Happy

पुढिल लिखाणाच्या प्रतिक्षेत....

वेताळ,

सुरेख माहिती आहे. भिक्कार निधर्मी सरकारने मराठ्यांचा हा वैभवशाली इतिहास दडपून ठेवला आहे. तुमच्यासारखे वीरच तो खोदून जगाला दाखवणार आहेत. त्रिवार अभिनंदन.

असो.

एक कळंत नाही, ते म्हंजे औरंगजेबाचं डोंगरी लोकांविषयीचं अज्ञान. अफगाणिस्तानात पठाणांविरुद्ध बराच लढला होता तो म्हणे. तरीही काहीच कसा शिकला नाही? नवल आहे!

-गा.पै.