पोटभरीची पालेभाजी - वन डिश मील

लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) आवडती पालेभाजी, (मेथी, माठ, चवळी, राजगिरा यापैकी ) कोवळ्या देठासकट बारिक चिरुन, तीन कप
२) एक मोठा कांदा (वगळल्यास चालेल) बारिक चिरुन
३) एक मोठा बटाटा, उभे चार तूकडे व नंतर पातळ कापा करुन (कींवा रताळे)
४) ताजे मटार वा तूरीचे दाणे किंवा इतर आवडीचे दाणे एक कप किंवा दाण्याचे कूट अर्धा कप
५) ओले खोबरे किंवा तीळ , दोन टेबलस्पून
६) साजूक तूप १ टेबलस्पून
७) जिरे, हिंग, मीठ, गूळ

क्रमवार पाककृती: 

१) सर्व घटक सांगितल्याप्रमाणे तयार करुन घ्यावेत.
२) पालेभाजीचे कोवळे देठ शक्यतो घ्यावेतच.
३) तूपाची हिंग जिर्‍याची फोडणी करावी.
४) त्यावर कांदा, बटाटे व वापरत असाल तर दाणे पसरावेत.
५) त्यावर पालेभाजीचा थर द्यावा
६) झाकण ठेवून मंदाग्नीवर आठ ते दहा मिनिटे ठेवावे.
७) एवढ्या वेळात बटाटे व दाणे शिजतात. मग झाकण काढून नीट ढवळावे.
८) मीठ, कूट व इतर जिन्नस घालावेत.
९) जरासे परतून आचेवरुन उतरावे.
सोबत दही घ्यावे.

वाढणी/प्रमाण: 
वन डिश मील म्हणून एकासाठी
अधिक टिपा: 

याचा फोटो मी काढला नाही, पण रविवारीच केली होती. माझ्यासाठी पोटभरीचा प्रकार. सोबत चपाती, भाकरी लागत नाही कारण पिष्टमय पदार्थांची गरज बटाटा भागवतो. दाण्यातून प्रथिनेही मिळतात.
पालेभाजी आवडत असेल, तर हा प्रकार नक्कीच आवडेल.

फोडणीला चिमूटभर मेथी घातली तरी चालेल. पण ही भाजी फार परतायची नाही, पाणी घालायची पण गरज पडत नाही.

Submit to kanokani.com

दिनेशदा,
वाह ! छान माहिती !
एकदा ट्राय करुन बघेन !
स्मित

सह्हीच दिनेशदा.
पण ह्यात मिरची किंवा मसाला नाही का घालायचा ?

मला नाही लागत मिरची. पण घातली तर फोडणीत घालता येईल. यात नुसत्या पालेभाजीचीच चव लागते, आणि बटाट्यामुळे तिचा उग्रपणा अजिबात रहात नाही.

पालेभाजी आहे म्हणून मिरची चांगली लागेल मसाल्यापेक्षा.

करुन बघणार. नुसती पालेभाजी स्पेशली मेथी किंवा नुसता बटाटा (उकडून, उपासासाठी केलेला खीस, परतून भाजी अश्या कोणत्याही फॉर्ममध्ये) हे माझे कंफर्ट फुड आहे. स्मित

मीही करुन पाहिन.

दिनेशदा, नवीन भाजीबद्दल धन्यवाद.

छान आहे कृती. लसूण ठेचून फोडणीत घालावा का?

अमि एक वेगळा प्रकार म्हणून लसणाच्या पाकळ्या अख्याच वरुन टाकायच्या (फोडणीत नाही) त्या मस्त शिजतात. आणि छान लागतातही. (आमच्या कडे अळूच्या पातळ भाजीत घालतात.)

स्मित छान मील.. मी यात लसूण आणी मिरच्या (भरपूर) घालणार

मस्त्.....मला कोणतीही पालेभाजी आवड्ते.

पालेभाजी आहे म्हणून मिरची चांगली लागेल मसाल्यापेक्षा.> सहमत..!

चांगली पाकक्रुती..