उद्योजक आपल्या भेटीला - मिलिंद देशमुख

Submitted by Admin-team on 21 February, 2011 - 01:07

किचन डेकोर. उत्कृष्ट मॉड्युलर किचन्ससाठी पुण्यातले अग्रगण्य नाव.

मिलिंद देशमुख हे 'किचन डेकोर' चे सर्वेसर्वा. सर्वोत्तमतेचा अविरत ध्यास, कामातली सततची शिस्त, प्रयोगशीलता आणि हेवा वाटेल अशी उद्यमशीलता यांच्या जोरावर अकरा वर्षापुर्वी डेक्कनच्या पुलाच्या वाडीत थाटलेल्या छोट्या ऑफिसपासून कोथरूड आणि औंध इथे मोक्याच्या जागेवर उभ्या केलेल्या प्रशस्त आणि आधुनिक शोरूम्सपर्यंतचा केलेला प्रवास आपल्याला थक्क करून सोडतो. आणि त्यांच्याशी बोलताना चिकाटी, आत्मविश्वास आणि 'एंडलेस जर्नी फॉर द एक्स्लन्स इज माय डेस्टिनेशन' या उक्तीचा प्रत्ययही येतो.
Milind Deshmukh.jpg
मिलिंद देशमुखांशी साजिरा यांनी केलेले हे छोटेसे हितगुज, खास मायबोलीकरांसाठी.

modular kitchen 1.JPG
प्रश्न- कसा सुरू झाला ह्या व्यवसायाचा हा प्रवास?

मिलिंद- बी.ई. सिव्हिल पर्यंत शिकल्यावर इंटेरियरमधे आवड असल्याने यात काहीतरी चांगले काम करून दाखवण्याची मनाने उचल खाल्ली. किचन इंटेरियर हा त्यातल्या त्यात जिव्हाळ्याचा विषय. मग विचार जुळणार्‍या एका मित्रासोबत डेक्कनच्या अगदी छोट्या जागेत ऑफिस थाटले. 'आम्ही किचन ट्रॉलीज करून देतो' अशा छोट्या जाहिरातीपासून सुरुवात झाली. आपण यात उत्तम काम करू शकतो असा आत्मविश्वास वाटत होता. सुरुवातीचा प्रवास खडतर असतोच. पदोपदी निराशा आणि अडचणी. पहिला क्लायंट मिळाला, तेव्हा मात्र हुरूप आला. सुरूवातीला आधीच अस्तित्वात असलेल्या किचन ओट्याला ट्रॉलीज करून द्यायच्या- अशा कामांपासून ते थेट 'संपूर्ण किचन इंटेरियर' इथेपर्यंत हा प्रवास येऊन ठेपला आहे. आज आमची वारज्याजवळ शिवणे येथे अत्याधुनिक जर्मन मशिनरीने सुसज्ज अशी फॅक्टरी आहे. आणि आमच्या कोथरूड आणि औंधच्या दोन्ही शोरूम्स मध्ये २१ मॉड्युलर किचन्स फक्त डिस्प्लेसाठी आम्ही ठेवली आहेत. आमच्या ग्राहकांना निवडीची संधी जास्तीत जास्त मिळावी, जागेचा सर्वोत्तम उपयोग आपण कसा करू शकतो- तसेच या क्षेत्रात वापरली जाणारी नवनवीन तंत्रज्ञाने आणि आधुनिक कच्चा माल आणि वस्तू यांचा उपयोग हे सारे बघायला मिळावे- हा हेतू.
स्पेशालायझेशन विचाराल, तर 'मॉड्युलर किचन्स' असेच उत्तर द्यावे लागेल.

प्रश्न- या धंद्यामध्ये कोणत्या प्रश्न-समस्यांचा सामना सतत करावा लागतो..? म्हणजे 'इश्युज- हार्ड टू डील' असं काहीतरी?

मिलिंद- समस्या म्हणता येईल की त्याला, ते नाही सांगता येणार, पण प्रत्येक ग्राहकाच्या घरातल्या जागा आणि गरजांनुरूप सर्वच बदलते- याचा थोडा त्रास होतो. आमच्या कामाचे स्टँडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करणे खूप अवघड आहे. कमीत कमी भारतात तरी सध्या ते शक्य नाही. म्हणजे थोडक्यात प्रत्येक कामाची सुरूवातच गमभन पासून करायची! ग्राहकाच्या जागा-गरजा-बजेट यांचा मेळ आमच्या कामाशी घालण्याची सुरूवात डिझाईनपासून होते. मग त्यात एकदा किंवा अनेकदा चर्चा करून झाल्यावर फेरफार-बदल; त्यावरून होणारे कमी-जास्त होणारे बजेट इ. मग शेवटी अ‍ॅप्रुव्हल, आता या सार्‍यात अनेकदा आपली स्वतःची जागा, गरजा आणि बजेट याबद्दलच्या ज्याच्या त्याच्या स्वभावानुसारचे गैरसमज निस्तरणे हेही आलेच. लहरी किंवा थोडे 'हटके' असे स्वभाव असले, तर हे प्रकरण बरेच लांबते. कधी कधी खूप संयम बाळगूनही सारेच बारगळते.
दूसरे म्हणजे या धंद्याचे काही प्रमणात असलेले 'लेबर ओरिएंटेड' असे स्वरूप. कितीही अत्याधुनिक यंत्रणा, मशिनरी वापरली, तरी फॅक्टरीत थोड्याफार प्रमाणात आणि मग ग्राहकाच्या घरी बर्‍याच अंशी कामगार वर्गावर अवलंबून राहावे लागते. ग्राहकांच्या स्वभावांसारखेच कुशल-अर्धकुशल कामगार वर्गांच्या लहरी देखील सांभाळाव्या लागतात.
ग्राहकाला कमीत कमी त्रास होईल असे बघावे लागते. डिझाईन एकदा अ‍ॅप्रूव्ह झाले, की सारे काही काम आमच्या कारखान्यात. आणि शेवटी थेट फक्त इन्स्टॉलेशन /असेंब्लीसाठीच क्लायंटच्या साईटवर, म्हणजे त्यांच्या घरी. फर्निचरच्या निमित्ताने घरात अनेक दिवस अव्याहत आवाज, पसारा, धूळ, त्यानिमित्ताने होणार्‍या त्यांच्या गैरसोयी, हे सारेच टळते. यात काम चालू असताना क्लायंटने अचानक काहीतरी सुचून बदल केले तर त्रास होतो, फेर्‍या वाढतात, काम वाढते, लांबते. पण त्याला इलाज नाही.
एकंदरित आता या सार्‍या गोष्टी आम्ही कामाचा भाग म्हणून स्वीकारू लागलो आहोत. समस्यांचे- अडचणींचे निराकरण करण्याचा सतत प्रयत्न करत राहणे हा कामाचा भागच नाही का?

प्रश्न- या व्यवसायात आणखी कोणत्या नवीन संधी खुणावत आहेत? किंवा या व्यवसायाशी संबंधित नसलेले एखादे काम भविष्यात हाती घेण्याची इच्छा?

मिलिंद- 'मॉड्युलर किचन्स' ही आमची इतक्या वर्षांनंतर खासियत झाली आहेच. पण संपूर्ण घराचे इंटेरियर- असे काही प्रोजेक्ट्स हाती घ्यायचे आहेत. 'नुसते किचन का? सारेच घर आम्हाला करून द्या नव्याने' असं सांगणारे अनेक ग्राहक आहेत. मूळ कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, आणि पुरेसे यंत्रबळ, मनुष्यबळ आणि आत्मविश्वास आल्याशिवाय हे करणे योग्य नाही, म्हणून आजवर टाळत आलो. पण आता अकरा वर्षांनंतर, इतक्या वर्षांच्या अनुभवाने आणि अनेक ग्राहकांनी आमच्यावर टाकलेल्या गाढ विश्वासामुळे हे सारे सहज शक्य होईल असे वाटते आहे. सर्व प्रकारच्या माध्यमांत सततच्या जाहिराती आमच्या चालू असल्या, तरीही चांगले काम केल्यामुळे झालेली कर्णोपकर्णी प्रसिद्धी- हा मुद्दा आम्हाला बरीच मदत याबाबतीत करेल, असे वाटते.
'अनरिलेटेड डायव्हर्सिफिकेशन'चा सध्या तरी काहीही विचार नाही. भविष्यात केव्हा जमले तर बघू या.
modular kitchen 2.jpgप्रश्न- नव्याने हा व्यवसाय करू बघणार्‍यांना काही सांगू इच्छिता? काही आवडते, स्वतःला पटलेले असे 'कोट' वगैरे?

मिलिंद- "बी सिरियस" इतकेच. अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवी प्रत्येक गोष्ट. कितीही छोटी, कमी महत्वाची असू देत. तिचे आता महत्व कमी आहे म्हणून गांभीर्याने घेतले नाही, तर नंतर तिचे वाढलेले महत्व ही किंमत आपल्याला मोजावीच लागते. 'हसतखेळत'ही अनेक गोष्टी घ्याव्याच लागतात, किंवा क्वचित प्रसंगी नाईलाजाने दुर्लक्षही करावे लागते, पण मनोमन तिचे महत्व ओळखून असावे. ते तसे ओळखलेच नाही, तर मग काही पुढे काही गोष्टी बिघडत, फसत जातात.

***

मिलिंदचे शेवटचे बोलणे ऐकले, तेव्हा हे याच नाही, तर जगातल्या कुठच्याही, छोट्या मोठ्या व्यवसायात, कामात हे तंतोतंत लागू होते- असा विचार मनात आला. 'किचन डेकोर'च्या भरभराटीसाठी शुभेच्छा देऊन आणि त्यांनी मायबोलीला दिलेल्या शुभेच्छा स्वीकारून मी निघालो.

***
kothrud showroom- opp. yashwantrao chavan natyagruha, kothrud, pune
Aundh showroom- near sony world, near parihar chauk, aundh, pune

मिलिंद देशमुखांसाठी मायबोलीकरांचे काही प्रश्न असल्यास प्रतिसादांत कृपया विचारावेत. शक्य असल्यास इथेच प्रतिसादांत ते उत्तर देतील. धन्यवाद.

***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली ओळख करुन दिली आहे. Happy
फोटोतली दोन्ही मॉडेल्स छान दिसतायत. 'मॉड्युलर' काम झटपट होते हा मोठा फायदा आहे. बाकी पब्लिकने वर योग्य प्रश्न विचारलेच आहेत.

छान, छोटीशी आणि सुटसुटीत झाली आहे मुलाखत.
इतर लोकांनी प्रश्न विचारलेच आहे, त्याचीही उत्तरे वाचायला आवडतील.

छान आहेत ही युनिट्स !
भारतात असताना माझा जॉब पण इटालिअन मॉड्युलर डिझाय्निंग मधेच होता :).
तेंव्हा पुण्या बर्‍या पैकी नवी होती ही कॉन्स्पेट होती ही.
कोचिन ला जाऊन माझ्या बॉस नी सुरवातीला इटालिअन मॉड्युलर युनिट्स, ट्रॉलीज चे डिटेल्स वगैरे ट्रेनिंग घेतले, नंतर अरोरा टॉवर्स ला शो रुम आणि ऑफिस काढलं.

Floor units 45 x 75 , 60 x 75 , Wall units 45 x 60, 30 x 60 , Electrical chimneys, Same width tall units, pelmet, skirting 10 cm, lazy susan ( corner rotating trolley) अशी स्टँडर्ड युनिट्स असायची.
सुरवातीला कोचिन हून ऑर्डर करावी लागायची, नंतर विश्रान्तवाडीला सरांनी स्वतःचं प्रॉडक्षन हाउस सुरु केलं.
तेंव्हाचे कस्टमर्स अनुभव अजुनही आठवतात :).
तेंव्हा मी स्वतः शून्य घरकाम करायचे पण कुठे काय कसं असावं य बाबतीत आईला उगीच लेक्चर द्यायचे.
कस्टमर्स ( विशेषतः बायका) किती एक एक प्लेट ट्रॉली मधे बसावी यासाठी क्लिअर असतात ते अनुभवताना/ पहाताना फार मजा यायची :).
खूप भटकायचो आम्हीही साइट व्ह्जिट्स ला.. सगळे कस्टमर्स कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, विमान नगर, काँढवा , सोपानबाग, सॅल्स्बरी पार्क या एरीआज मधले असायचे.
माझं मेन काम डिझायनिंग चं असायचं त्यामुळे माझ्या व्हिजिट्स डिझायनिंग साठी असायच्या, नंतर execution ची जवाबदारी वेगळ्या टिम कडे .
मजा यायाची पण, खूप सुंदर दिसायची आमची किचन्स.. MDF Polyurethane coated shutters , S.S. 304 trolleys आम्ची स्पेशॅलिटी होती.

मला इंटिरिअर्स चं प्रोफेशन सोडून जवळपास १० वर्षं झालीयेत त्यामुळे मिलिंद देशमुख यांना या व्यवसायात काय काय नवीन गोष्टी आल्या आहेत विचारायला आवडेल.

१) शटर्स चा फिनिश कुठला वापरतात ( एम डी एफ पी यु. कोटेड/ प्रि लॅमिनेटेड / टिक वुड इ.)
या व्यतिरिक्त काय काय नवीन फिनिशेस आले आहेत का ?

२) ट्रॉलीज चा फिनिश कुठला कुठला उपलब्ध आहे ?

३) शेल्फ्स साठी पार्टिकल बोर्ड वापरतात कि अजुन काही नवीन मटेरिअल ?

४) साधारण 10 x 12 L shaped किचन च्या execution ला किती दिवस लागतात ?

छान मुलाखत! डेकोर ला अनेक शुभेच्छा..
एक थोडासा वेगळा प्रश्ण ईतर ऊपप्रश्णांसहित: मॉड्युलर किचन कितपत पोर्टेबल आहे? समजा घर बदलायचे असेल आणि नव्या घरात अत्ताचे मॉड्युलर किचन उचलून पुन्हा बसवायचे असेल तर कितपत शक्य आहे? सिव्हिल वर्क सोडल्यास ईतर लाकूड काम आयकीया स्टाईल मध्ये पुन्हा डिस्-अ‍ॅसेंबल करून नविन जागी पुन्हा अ‍ॅसेंबल करणे कितपत शक्य आहे? डेकोर ची अशी काही सेवा ऊपलब्ध आहे का? किंवा तसे करावे/ करू नये याबद्दल काही व्यावसायिक सूचना?

नमस्कार मित्रहो.
हा विषय इथे इतक्या गांभीर्याने घेतला जाईल, असं सुरूवातीला वाटलं नव्हतं. हे सारे वाचल्याबद्दल आणि इतका रस दाखवून प्रतिक्रिया दिल्याबद्दल, तसेच प्रश्न विचारल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. या प्रश्नांची जमतील तशी उत्तरे थोड्याच वेळात इथेच देण्याचा प्रयत्न करतो आहे.

या सार्‍या मित्रांशी बोलण्यासाठी उद्योजक भेटींच्या रूपाने मायबोलीचं इतकं सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मायबोलीच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेशन टीमचे आभार मानतो. Happy

भारतीय स्वैपाक प्रचंड 'हाय मेंटेनन्स' स्वरूपाचा आहे, पाण्याचा वगैरे वापर एकुणात जास्त, सांडलवड/डाग पडण्याची शक्यता जास्त, स्वैपाकघराचा वापर खूप. त्यादृष्टीने डिझाईनमध्ये काय वेगळेपणा आणावा लागतो?

'भारतीय स्वयंपाक' हाच मुख्य कळीचा मुद्दा आहे. परदेशी मॉड्युलर किचन्सपेक्षा वेगळेपण, वेगळे डिझाईन असतेच असते. पाणी, तेले इत्यादींची सांडलवंड आपल्या इथे जास्त आणि सतत असते. शिवाय भांडी देखील तुलनेने मोठी व जड असतात. यामुळे ग्रॅनाईट टॉप्स वापरावे लागतात. द्रवरूप पदार्थ ओसंडून खाली ट्रॉलीजमध्ये / जमिनिवर वाहून येऊ नये म्हणून अटकाव करण्यासाठी ग्रॅनाईटला पट्टी लावावी लागते. स्टेनलेस स्टीलच्या बास्केट्स वापराव्या लागतात. एमडीएफ न वापरता शक्यतो वॉटरप्रुफ / मरीन प्लाय वापरावे लागते. भांड्यांचे साईझ आणि उपयोग यानुसार ट्रॉलीज आणि शेल्व्ह्ज मधल्या जागा रिअ‍ॅरेंज कराव्या लागतात. 'मॉड्युलर किचन' हे 'तत्व' एकच असते- हे सोडले तर बाकी युटिलिटीच्या दॄष्टीने भारतातले डिझाईन फारच वेगळे असते. तसे नाही केले तर कालांतराने भरपूर तक्रारी येतात. किचनचे आयुष्य कमी होते.

जनरली इंटीरीअर करणारे आणी करुन घेणारे टॅक्सेस भरण्याचा विचार करत नाहीत.. शक्यतो कंसल्टन्सी चार्जेस किंवा विदाउट बील चार्जेस हे प्रकारच खुप असतात.. तर या कामासाठी अ‍ॅप्लीकेबल टॅक्सेस कोणते व किती असतात.. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे त्यात रीबेट कुठला व कसा मिळतो???

आम्ही कन्सल्टसी, डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, इन्स्टॉलेशन असा संपूर्ण प्रोजेक्ट करत असल्याने यात रीतसर सर्व्हिस टॅक्स, सेल्स टॅक्स, वॅट इत्यादी बाबींचा समावेश होतो. ट्रेडर असला, तर तो रिबेटसाठी क्लेम करू शकतो. व्यक्तिगत एंड युजर असला, तर रिबेटचा अर्थातच प्रश्न येत नाही.
आजकाल बहुतांशी ग्राहक सजग झालेले असल्याने, आणि शिवाय नंतर गॅरंटी, वॉरंटी टर्म्सचाही विषय असल्याने ते स्वतःच रीतसर टॅक्स इन्व्हॉइसची मागणी करतात.

स्वयंपाकघराच्या रचनेत व्हेंटीलेशनचे महत्व सांगाल का? सध्याच्या नव्या स्वयंपाकघरांमधे खिडकी जवळजवळ नसतेच, तर अशी रचना स्वयंपाक करायच्या दृष्टीने योग्य असते का?

व्हेंटिलेशन अत्यंत आवश्यक आहे. कितीही कृत्रिम प्रकाशाचा वापर केला, तरी नैसर्गिक हवा आणि प्रकाश आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. 'हायजीन' च्या व इतर सर्वच दृष्टीने. आजकाल 'चिमणी'चा वापर केला जात असला, तरी तेले, धूर व फोडण्या यांचे वास शंभर टक्के नाहीसे होत नाहीत. भारतीय स्वयंपाकात मसाल्यांचा वापर अधिक असल्याने हा प्रश्न जास्तच उद्भवतो.

स्वयम्पाकघरातील सोईसुविधान्चे आरेखन करताना वास्तुशास्त्रातील तत्वान्चा वापर करता का? तसे गिर्‍हाईकाला सुचवता का? गिर्‍हाईकच तसे सुचवित असेल तर अंमलात आणता का?

ग्राहकांना आम्ही स्वतःहून सूचवत नाही. कारण ग्राहकाच्या घरातली जागा, आमचे डिझाईन, तयचे बजेट आणि त्याच्या गरजा- उपयोगिता- या सर्वांचे एकत्र गट्।ओडे बांधणे फारच अवघड. परंतू ग्राहकाची तसे म्हणणॅ असेल, तर मग वास्तूशास्त्राचे नियम पाळावे लागतात. शेवटी हे संपूर्ण प्रकरणच 'ग्राहकाभिमुख' असे आहे. प्रत्येकाचे प्रॉयॉरिटीज सेटिंग वेगळे. काहींचे बजेट, काहींचे वस्तूशास्त्र, काहींचे डिजहईन आणि लूक्स. काहींचे फक्त युटिलिटी-उपयोगिता इ. पैसे तो स्वतःच टाकणार असतो, त्यामुळे त्याच्या प्राधान्यक्रामाला प्राधान्य- हे ओघाने आलेच. अनेक जण 'तसा विश्वास नाही. पण इतका खर्च करतोच आहोत तर पाळू या वास्तूचे नियम देखील' असं म्हणतात. अशा वेळी त्याप्रमाणे डिझाईनमध्ये बदल करायला आमचीही काहीच हरकत नसते.

मॉड्य्लर किचनसारख्या मार्केटमधे जिथे एस्टॅब्लिश्ड इंपोर्टेड ब्रँड्स आहेत, शिवाय चौकाचौकात लोकल सप्लायर्स आहेत, काही चांगले इंडिअन ब्रँड्सही आहेत....... अश्यावेळी काँपिट कसं करता????
आपलें वेगळेपण टिकवण्यासाठी काय योजना आखल्या आहेत????

'मॉड्य्लर किचन' हे जगभरातले 'तत्व' म्हणून एकच असले, तरी भारतात येताना ते खूपच बदलते- हे मी वरती म्हटलेच आहे. इम्पोर्टेड किचन्स तशीच्या तशी आपण इथे वापरू शकत नाही. ती इथल्या वातावरणात, हाताळणीत टिकत नाहीत. शिवाय किंमतही जास्त असते. कालपरत्वे त्यांत ठिकठिकाणी लिकेजेस, क्रॅक्स- असे प्रश्न उद्भवू शकतात. आपले कुकिंग 'हेवी' स्वरूपाचे म्हणता येईल- असे असते. खरे तर आपली इथे तयार झालेली मॉड्युलर किचन्स काय, आणि इंपोर्टेड काय- हार्डवेअरमध्ये फारसा फरक नसतो. उत्तम प्रतीची हार्डवेअर आणि फिटिंग्ज आपल्याही इथे आता सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. डिझाईन आणि लुक्स मध्ये आपण देखील तो फील, फिनिश, फॉर्म आणू शकतो. या सार्‍या कारणांमुळे परदेशी ब्रँडेड किचन्स वापरणारा सेगमेंट इथे फारच कमी आहे. सर्व चांगल्या गोष्टी एकत्र करून आता आपल्या मॉड्युलर किचन्स बनवणार्‍यांनी स्वतःचे ब्रँड्स यशस्वीरीत्या प्रस्थापित केले आहेत- असे म्हणायला हवे खरे तर.

साधारण किती किंमत असते ह्या किचनची? म्हणजे वर चित्रात जे दाखवलय त्याची काय किंमत असेल?

आणि ट्रॉलीज बाहेर काढता येतात का? (आतल्या जागेची साफसफाई करण्यासाठी)

अश्याप्रकारच्या इंडस्ट्रीत सध्या "मनुष्यबळ" विशेषत: कामगार हा कळीचा मुद्दा झालाय. तो प्रश्न कितपत भेडसावतो??? कसा सोडवता???

हा प्रश्न सार्‍याच ठिकाणी आहे. सर्व्हिस इंडस्ट्री असो, की मॅन्युफॅक्चरिंग. लेबर मॅनेजमेंट हे महत्वाचे काम होऊन बसते. कामाच्या डेडलाईन पाळण्याच्या दॄष्टीने हे खूपच महत्वाचे होऊन बसते. अशात क्लायंटसची गोची होऊ नये म्हणून यासाठी नेहेमी जास्तीचे मनुष्यबळ ठेवावे लागते. नवनवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने त्यांना सारखे प्रशिक्षित करत राहावे लागते. कुशलतेच्या पातळ्यांनुसार त्यांना भरपूर वाटेल असा मोबदला, तसेच इतर सोयी-सवलती द्याव्या लागतात. क्लायंटने दिलेला किंवा आपण त्यांना कमिट केलेला वेळ व कामगार वर्गाच्या कामाच्या पद्धती यांचा मेळ सारखा घालत राहावा लागतो.

आफ्टर सेल्स सर्व्हिसही द्यावी लगत असेलच..... त्यासाठी काही उपाययोजना???? "अ‍ॅन्युअल मेंटेनन्स सर्व्हिस" सारखी इंडस्ट्र्रीज मध्ये चालणारी सिस्टीम आपण राबवली आहे का??? मॉड्युलर किचनमधे "AMC (Annual Maintenance Contract)" मुळात ऑफर केली जाते का???

Annual Maintenance Contract सारखा प्रकार अजून अस्तित्वात नाही. परंतू हे देखील येईलच हळूहळू आपल्याकडे. आता आपले मॉड्ल्युलर किचन्स बनवणारे केलेल्या कामानुसार २ किंवा ३ वर्षांची वॉरंटी-गॅरंटी देतात. या काळात सर्व्हिस द्यावी लागते.

डिस्प्ले साठी ठेवलेल्या डिझाईन्समधून किचन निवडायचे की अजूनही ग्राहकाला वेगळे काही डिझाईन हवे असले तर तसेही करुन देता?

हा साराच प्रकार ग्राहकाभिमुख आहे- हा मुद्दा वरती आलाच आहे. काय प्रकारचे फिनिश, मटेरियल, क्वालिटी मिळेल, तसेच कशा जागेचा जास्तीत जास्त कशा प्रकारे वापर करून घेता येऊ शकतो- याची ग्राहकांना सर्वसाधारण कल्पना येण्यासाठी आम्ही आमच्या शोरूम्समध्ये डिस्प्लेला जवळपास २१ किचन्स ठेवली आहेत. ही डिझाईन्स अर्थातच कस्टमाईज्ड- म्हणजे ग्राहकाच्या उपलब्ध जागेनुसार, गरजांनुसार आणि बजेटनुसार बदलतात, बदलावीच लागतात.

ऑर्डर दिल्यापासून, कारखान्यातून सर्व काम पूर्ण करुन ते ग्राहकाच्या घरी इन्स्टॉल करणे हे साधारण किती दिवसांत पूर्ण होते?

कामाच्या आणि किचनच्या साईझनुसार १५ ते ४५ दिवसांत.

डिझाईन्स बनवताना भारतीय स्वयंपाक पद्धतीचा विचार करून डिझाईन्स बनवलेली आहेत का?

अर्थातच. याचे उत्तर वरती विस्तृत स्वरूपात आले आहेच.

ह्या कामाची गॅरॅंटी/ वॉरंटी असते का?

याचेही उत्तर वरती आलेच आहे. आधी हे नसायचे. आता केलेल्या कामानुसार आणि बजेटनुसार २ ते ३ वर्षांच्या गॅरंटी-वॉरंटी टर्म्स येऊ लागल्या आहेत.

या मॉड्युलर किचन साठी कुठल्या प्रकारचे मटेरियल्स वापरले आहेत?

पॉलिअ‍ॅक्रिलिक शटर्स व टॉप्स, वॉटरप्रुफ (मरीन) प्लायवुडची कॅबिनेट्स, स्टेनलेस स्टील बास्केट्स, जर्मन हार्डवेअर इत्यादी.

रंगसंगती आणि प्रकाशयोजना खूपच आकर्षक, पण नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग (जो आपल्याकडे मुबलक आहे)का नाही केला जात? दिव्यांचा झगझगाट, खिडक्या कमी आणि एक्झोस्ट पंखे बसवून वीज बिलं वाढ्वायची....असं का? की हे सगळे शीतकटीबंधीय देशांचे अंधानुकरण ?

किचनमध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा अत्यावश्यक आहे- याची चर्चा वरती झालेलीच आहे. आपल्याकडल्या घरांत किचनमध्ये इतका दिव्यांचा झगमगाट वगैरे फारसे कुणी करत नसावे. दिवे व पंखे किती लावावेत हे ज्याचे त्यानेच ठरवावे. वरती दाखवलेली किचन्स ही आमच्या शोरूममधल्या डिस्प्लेमधली आहेत. तिथे सर्व डिस्प्लेजच्या ठिकाणी खूप सार्‍या खिडक्या व व्हेंटिलेशन-लाईट शक्य नाही. ते एक प्रकारचे एक्झिबिशन आहे. त्यामुळे एक्झिबिशन मध्ये मांडलेल्या डिस्प्लेला करावे लागतो तसा अर्थातच तिथे झगमगाट आहे. जे काय मांडले आहे, ते नीट दिसेल, व्यवस्थित समजेल- एवढाच हेतू. बाकी काही नाही. कुणाचेही अंधानुकरण करण्याचा प्रश्नच नाही. मॉड्युलर किचन्स- या तंत्रातले जे चांगले आहे- तेच आपण घेत आहोत.

मिलिन्द, सविस्तर उत्तरान्बद्दल धन्यवाद.
तसेच, सर्व उत्तरे (इथे नव्यानेच येऊनही, तन्त्र समजुन घेऊन) "देवनागरीतुन" दिल्याबद्दल विशेष धन्यवाद! Happy

शटर्स चा फिनिश कुठला वापरतात ( एम डी एफ पी यु. कोटेड/ प्रि लॅमिनेटेड / टिक वुड इ.)
या व्यतिरिक्त काय काय नवीन फिनिशेस आले आहेत का ?

पॉलिअ‍ॅक्रिलिक फिनिश तर आहेच. शिवाय सॉलिड वुड, मरीन प्लायवर पोस्ट फॉर्मिंग इत्यादी.

ट्रॉलीज चा फिनिश कुठला कुठला उपलब्ध आहे ?

स्टेनलेस स्टील आणी पावडर कोटेड या प्रकारांत.

शेल्फ्स साठी पार्टिकल बोर्ड वापरतात कि अजुन काही नवीन मटेरिअल ?

मरीन (वॉटरप्रूफ) प्लायवुड.

साधारण 10 x 12 L shaped किचन च्या execution ला किती दिवस लागतात ?

१५ ते ४५ दिवस. 'स्कोप ऑफ वर्क' वर अवलंबून.

मॉड्युलर किचन कितपत पोर्टेबल आहे? समजा घर बदलायचे असेल आणि नव्या घरात अत्ताचे मॉड्युलर किचन उचलून पुन्हा बसवायचे असेल तर कितपत शक्य आहे? सिव्हिल वर्क सोडल्यास ईतर लाकूड काम आयकीया स्टाईल मध्ये पुन्हा डिस्-अ‍ॅसेंबल करून नविन जागी पुन्हा अ‍ॅसेंबल करणे कितपत शक्य आहे? डेकोर ची अशी काही सेवा ऊपलब्ध आहे का? किंवा तसे करावे/ करू नये याबद्दल काही व्यावसायिक सूचना?

'मॉड्युलर किचन' प्रकारात मुळातच फारसे स्टँडर्डायझेशन नाही. प्रत्येकाची जागा, गरजा, आणि बजेट वेगळे. म्हणून एका जागेतले किचन दुसर्‍या जागेत तसेच्या तसे बसवणे जरा अवघडच. पण जागा सारखीच असेल, तर हे शक्य आहे. मात्र असे करताना सध्याचे किचन किती जुने आहे, नव्याने गरजा वाढल्या / बदलल्या आहेत का, कुणी बनवले आहे- इत्यादी विचार करायला हवा. आम्हीच बनवले असेल, आणि जागा सारखीच तर ते आम्ही शिफ्ट करून नव्या ठिकाणी इन्स्टॉल करून देतो. किचन ३-४ वर्षांपेक्षा जास्त जुने असेल, तर ते शिफ्ट न करता नव्याने बनवावे, असा सल्ला मी देईन.

साधारण किती किंमत असते ह्या किचनची? म्हणजे वर चित्रात जे दाखवलय त्याची काय किंमत असेल? आणि ट्रॉलीज बाहेर काढता येतात का? (आतल्या जागेची साफसफाई करण्यासाठी)

ट्रॉलीज साफसफाई / मेंटेनन्स साठी बाहेर काढता येतात.
कंप्लीट किचन इंटेरियरसकट साधारण दीड ते अडीच लाख रुपये. छायाचित्रात दाखवलेले सार्‍यांनाच उपयोगी पडेल असे नाही, त्यात गरजांनुसार कमी अधिक होऊ शकते- असे गृहित धरून.

धन्यवाद. Happy

या सगळ्या प्रश्नांना इतक्या सविस्तर उत्तरे दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
तुमच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी हार्दिक शुभेच्छा. Happy

मिलिंद,
धन्यवाद! पुढील व्यावसायिक चौकशी/संपर्कासाठी ईमेल पत्ता दिलात तर बरे होईल.

छान झालीये मुलाखत. मुलाखतीतल्या प्रश्नांची आणि नंतर दिलेली सगळी उत्तरे छान सविस्तर आहेत. साजिरा आणि मिलिंद देशमुख दोघांना धन्यवाद .

मायबोली, मस्त उपक्रम...
मिलिंद देशमुख ,तुम्हाला शुभेच्छा.

वेळात वेळ काढून सविस्तर समाधानकारक उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद मिलिंद. साजिर्‍याचेही आभार. उद्योजक व ग्राहक यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा मायबोलीचा हा उपक्रम असाच यशस्वी होवो!

Very interesting, and all the points beautifully manage to explain
I am having one query
1. Regarding the ventilation in modular kitchen
2. Do you make all the the kitchen decor arrangement according to vaastu shastra

If you can help me to know about the same it will be really appreciable

निकिता, सगळा ताफा तिकडे आणणे परवडण्याइतके बर्‍यापैकी मोठे काम असेल, तर नक्कीच घेतो मुंबईत कामे.

mayuri_1, तुमच्या प्रश्नांची उत्तरे आधीच वर दिली आहेत.

धन्यवाद मित्रहो.:)

Pages