ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती ....

Submitted by जिप्सी on 10 February, 2011 - 23:51

ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती.......

"गाव" प्रत्येक शहरवासी/चाकरमानी यांच्या मनातील एक हळवा कोपरा. जेंव्हा जेंव्हा या कोपर्‍याला गोंजाराल तेंव्हा तेंव्हा याची सय आणखीनच गडद होते. कौलारू घर, सारवलेलं अंगण, अंगणातील रांगोळ्या, तुळशी वृंदावन, गावाशेजारी खळाळत वाहणारी नदी, चारही बाजुंनी डोंगर आणि मध्ये वसलेले छोटेसे गाव,आज्जी/आजोबा आणि गावातील इतर प्रेमळ माणसं यामुळेच तर गावात जायची ओढ सर्वांनाच. गावी जाण्याचा अजुन एक बहाणा म्हणजे गावची वार्षिक यात्रा/जत्रा. प्रत्येक गावात किंवा पंचक्रोशीत असलेल्या एखाद्या गावात वर्षातुन एकदा आपआपल्या कुलदैवतांचा हा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. कुठे तीन दिवस तर कुठे चार दिवस रंगणारा हा जत्रौत्सव आबालवृद्धांना आनंद देणारा असतो.

अशीच दरवर्षी चैत्र अष्टमीला असणारी माझ्या गावची यात्रा. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यापासुन साधारण ४-५ किमी अंतरावरील माझे गाव आहे. जवळच तालुका असल्याने आणि गावाशेजारूनच वाहणारा निरा नदिवरचा (उजवा) कालवा यामुळे बराचसा संपन्न असा हा गाव. (फलटण तालुक्यात श्रीराम मंदिर, निंबाळकरांचा राजवाडा, महानुभव पंथाचे मंदिर आणि ३०-३५ किमी अंतरावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेले शिखर शिंगणापूर, गोंदवले महाराज मठ असे बरेच काहि बघण्यासारखे आहे.) आजोबा पेशाने शिक्षक असल्याने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात बदली झाली आणि आम्ही सगळेच तिथेच स्थायिक झालो. दौंड तालुका शहरच असल्याने गावपण मला कधी जाणवलंच नाही Sad पण फलटण शहरापासुनच साधारण २५-३० किमी अंतरावर असलेल्या जावली या गावी आमचे कुलदैवत "श्री सिद्धनाथ" वसले आहे (निंबाळकर ट्रस्ट). तेथे दरवर्षी चैत्र महिन्यातील अष्टमी/नवमीला भरणार्या देवाच्या यात्रेला आम्ही न चुकता जात असतो. खरंतर हा संपूर्ण महिनाच गावच्या यात्रेचा असतो. साधारण शे-दोनशे उंबर्‍याचे हे गाव गाव कमी पर्जन्यवृष्टीच्या प्रदेशात येतं. जवळच असलेला माण तालुका (दहिवडी) हा तसा दुष्काळीच प्रदेश. एरव्ही शांत असलेला हा गाव मात्र यात्रेच्या दिवसात सारा परिसर माणसांच्या गर्दीने फुलुन जातो. पुरातन असे हे मंदिरही बघण्यासारखे आहे, सध्या ऑईलपेंट दिल्याने याचे मूळे सौंदर्य हरवले आहे. प्रत्येक गावच्या यात्रेची काहि वैशिष्ट्ये असतात. आमच्या गावची यात्राही इतर गावांसारखीच असते, पण सार्‍या पंचक्रोशीत हि यात्रा प्रसिद्ध आहे ती धडका, बगाडं यासाठी. अगदी दुरदुरून माणसे खास यासाठी यात्रेला दरवर्षी न चुकता येत असतात.

"श्री सिद्धनाथ" नवसाला पावणारा असल्याने "जर मला मुलगा झाला तर मी त्याला धडका सोडेन" असा नवस केला जातो. देऊळ परिसरातच देवाचा एक दगड आहे त्या दगडाला तीन वेळा जोरात धडक देणे म्हणजेच "धडका". खास हे पाहण्यासाठी लोक येतात. जेंव्हा या धडका चालु असतात तेंव्हा अक्षरशः नारळ फोडल्याचा आवाज ऐकु येतो. देवावर असलेल्या अपार श्रद्धा असल्याने यामुळे आजवर एकही दुर्घटना घडलेली नाही ऐकीवात नाही. जे या धडका घेतात ते "धडके" म्हणजेच नवसाचे असे म्हणतात. त्यांना या जत्रेच्या दिवसात खुप मान असतो. पण काही वर्षांपासुन हि प्रथा अंधश्रद्धेच्या नावाखाली बंद करण्यात आली आहे.

या जत्रेचे दुसरे आकर्षण म्हणजे "बगाडं". यात देवळाच्या मुख्यद्वाराच्या समोर एका उंच चौथर्‍यावर एका उंच सरळ लाकडाला दुसरे एक लाकुड आडवे लावुन, एका बाजुल नवस करणारे (यात जर एखाद्या महिलेने "मला मुल होऊ दे, मी बगाडं घेईन" असा जर नवस केला असेल तर तिला त्या लहान मुलासहित बगाडं घेऊन नवस फेडावं लागतो.) तर दुसर्‍या बाजुला मानकरी असतात. नवस फेडणार्‍यांचे हात त्या लाकडाला बांधुन त्यांना लोंबकळत देवळाच्या कळसाएव्हढे उंच नेऊन एक चक्कर फिरवतात. हे बघण्यासारखे असते.

चार दिवस चालणार्‍या या जत्रेत पहिला दिवस देवाचे हळद/लग्न, दुसरा दिवस मांसाहारी जेवणाचा, तिसरा दिवस धडका/बगाड याचा आणि शेवटचा दिवस हा "छबिना" म्हणजेच देवाच्या पालखीचा. या चार दिवसांपैकी शेवटच्या दिवशी पहाटे तीन-साडेतीन वाजता "सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं", "जावलीच्या नाथाच्या नावानं चांगभलं", "नाथसाहेबाच्या नावानं चांगभलं" अशा घोषात आणि गुलाल खोबर्‍याच्या वर्षावात, सासणकाठ्या नाचवत देवाची पालखी निघते. या पालखीवर गुलाल खोबरे टाकल्याशिवाय हि यात्रा पूर्ण होत नाही. भल्या पहाटे हजारो/लाखो लोकांच्या साक्षीने देवाची पालखी निघते आणि गावची प्रदक्षिणा घालते. पालखीसोबत असलेले सारे भक्त देवाच्या जयघोषात आणि गुलाल खोबर्‍याच्या वर्षावात न्हाऊन निघतात. गुलाल खोबरे पालखीवर उधळ्यावरच सगळे आपआपल्या मार्गी रवाना होतात.

"श्री सिद्धनाथ" हे बहुतेकांचे कुलदैवत असल्याने यात्रेच्या दिवशी आजही वेगवेगळ्या गावातुन लोक आपआपल्या बैलगाडीला सजवून येतात. गावच्याच शेतात बैलगाडी लावून पाल ठोकुन तीन दिवस मुक्काम करतात. शेतात मांडलेली चूल, त्यातुन निघणारा धूर, त्यातच केलेली ज्वारीची भाकर आणि पिठलं, ठेचा हे कुठल्याही स्टार हॉटेलातील जेवणापेक्षा सुंदर लागत असे. आजही लहानपणी जत्रेत फिरताना आकाशपाळण्यात बसण्याचा केलेला हट्ट, तंबूतल्या थिएटरमध्ये बघितलेला चित्रपट (आजही गावच्या जत्रेत हे हमखास असतेच :-)) हॉटेलातील ती गोल भजी, साखरेच्या पाकातील शेंगदाणे असलेली गुडदाणी, रेवडी, लाल गोडी शेव, कुरमुरे/फरसाण टाकुन केलेली ओली/भेळ, तिखट चरचरीत मिसळ, तालुक्यापासुन गावी जाण्यासाठी खास यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या "जादा" एस्टीतुन (लाल डब्बा) केलेला प्रवास हे सारे अजुनही आठवतंय. प्रत्येकजण आज काहि ना काहि कारणापासुन आपल्या मूळ गावापासुन, गावच्या नातेवाईकांपासुन दुरावलेला आहे. कामाच्या व्यापातुन गावी भेट द्यायला सवड मिळत नाहि पण या अशा प्रकारच्या यात्रा/जत्रा म्हणजेच सर्वांनी एकत्र येण्याचे साधन आणि ते आजही तेव्हढ्याच मोठ्या प्रमाणात साजर्‍या केल्या जातात हे हि नसे थोडके.

=================================================
=================================================
प्रचि १
मंदिराचे प्रवेशद्वार

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६
मंदिर परिसरातील दीपमाळा

प्रचि ७

प्रचि ८
मंदिराच्या प्रवेशद्वाराआधीचा परीसर

प्रचि ९

प्रचि १०
मुख्य गाभारा

प्रचि ११
श्री सिद्धनाथ प्रसन्न

प्रचि १२

प्रचि १३
गुलालाने माखलेली देवाची पालखी

प्रचि १४
या ठिकाणी धडका घेतल्या जातात

प्रचि १५
मंदिर परिसर

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
यात्रेच्या दिवशी

प्रचि २०
बगाडं

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
गावातील डाळिंबाच्या बागा

प्रचि २४

प्रचि २५

=================================================
=================================================

गुलमोहर: 

योगी.. प्रचि नेहमीप्रमाणे सुंदरच.. पण आता लिखाणही समोर येतेय हळुहळू.. मस्त लिहीले आहेस रे.. क्या बात क्या बात क्या बात !!
शिखर शिंगणापूरचे फोटोदेखिल सुंदरच

प्रची २१ आणि २२ दाखवलं आहे असे करून नवस केला अथवा फेडला जातो कि काय..........कारण असेच कुठेतरी लहान बाळाला कुठून उंचावरून सोडून खाली झेलण्याची पद्धत आहे. मी बघितला आहे.

इतका जुना धागा पण आज वाचला. छानच वर्णन आहे देशावरच्या जत्रेचे. पूर्वी मुंबईतसुद्धा प्रभावती देवीची जत्रा खूप मोठी असायची. दोन तीन दिवस चालायची. आता सिद्धीविनायकापुढे रोजच जत्रा असते. प्रभादेवी बिचारी भक्तांची वाट पाहात उभी असते.
बाय द वे, नंतरच्या फोटोंपैकी एक वीरगळ नसून सतीशिळा असावी. कारण बांगड्या भरलेला हात दिसतोय त्या शिळेवर.

Pages