रीटा

Submitted by प्रज्ञा९ on 2 February, 2011 - 14:28

"रीटा" चित्रपट बघितला. खरंतर आधीच बघायचा होता, पण डीवीडी वगैरे आणून बघणं नाही जमलं. परवा आपलीमराठी वर बघितला. मला आवडला खूप. त्याचं परीक्षण वगैरे करण्यापेक्षा एकदातरी बघायला हवा असं वाटत होतं.

"रीटा" ही शांता गोखले यांची पुरस्कारप्राप्त कादंबरी. आईच्या या कादंबरीवर रेणुका शहाणे या गुणी अभिनेत्रीने काढलेला हा चित्रपट.

मुंबईमधे राहणारं वेलिणकर हे एक सुखवस्तू कुटुंब. वडील सरकारी ऑफिसर. आई टिपिकल क्लासवन अधिकार्‍याच्या पत्नीच्या दिमाखात सतत वावरणारी. आईचं आईपण विसरून स्वतःचं तारुण्य सांभाळणारी. आईबद्दलच्या रीटाच्या निबंधात तिचं हे एकच रूप दिसतं. रीटाला ३ लहान बहिणी. या सगळ्यांना सांभाळणारी त्यांची मेड व्हिक्टोरिया. प्रियकराची वाट बघणारी....

चित्रपटाला सुरुवात होते ती रीटाच्या माईल्ड नर्व्हस ब्रेकडाऊन ची पेशंट म्हणून सुरु असलेल्या ट्रीटमेंट प्रकाराने. रीटाची बालमैत्रीण सरस्वती...रीटा तिला पत्र लिहून मन मोकळं करत असते.

लहानपणापासूनच आई-वडिलांचं प्रेम, त्यांचा सहवास फारसा मिळत नाही या ४ मुलींना. एका अफरातफरीच्या आरोपाखाली वडिलांची नोकरी जाते, आणि हळूहळू बाजारातले शेअर्स, घरातलं उंची सामान...सगळं सगळं जातं. पूर्ण कफल्लक अवस्था येते तेव्हा रीटा १६-१७ वर्षांची अल्ल्ड मुलगी असते, पण परिस्थितीची जाणीव मनात ठेवून पुढे कॉलेज न करता टायपिंग वगैरे शिकून नोकरीला सुरुवात करते. जात्याच हुशार असल्यामुळे नवीन गोष्टी शिकत प्रगती करत असते. घरी बहिणींना सांभाळणं, त्यांचे हट्ट पुरवणं....सगळं काही तीच करते. आई-वडील अजूनही आपल्याच मोठेपणाच्या तोर्‍यात.
अशीच प्रगती करताना तिची बदली विठ्ठल साळवी या बॉसची पीए म्हणून होते. तिच्या हुशारीची कदर असलेला साळवी तिला पुढच्या शिक्षणासाठी मदत करतो. पुढे एका कंपनीत तिला ट्रेनी आणि मग चांगल्या पोस्टवर नोकरी मिळेल असं दिसताच तिला त्यासाठीही प्रोत्साहन देतो.
(तिच्या बहिणींची शिक्षणं चलूच असतात, पण डॉली आणि शेरी या दोघीना शिक्षणात फार रस नसतो. संगीता मात्र रीटासारखीच हुशार असते.)
तिच्या या नोकरी बदलण्याने आई-वडील मात्र नाखूष होतात. फक्तच शिकायला मिळेल्..पगार कमीच असेल म्हणून.. "बीए झालीस ना....आता अजून काय सिद्ध करायचंय.." असं त्यांचं म्हणणं.
पण या सगळ्यावर मात करून ती नव्या नोकरीतही रुळते. साळवीशी चांगली मैत्री झालेली असते. एकमेकांच्या घरी ये-जा सुरु झालेली असते.

एव्हाना, डॉली आणि शेरीच्या लग्नच्या गोष्टी घरी होत असतात. तेही प्रयत्न तिनेच करावेत अशी आईची (रास्त!!) अपेक्षा असते. लग्नात अडचण येते ती जातीची. आई माहेरची ब्राह्मण, आणि वडीलांना जातच नाही..त्यामुळे लग्न जमण्यात अडचणी येतातच. पण नशिबाने एकामागोमाग एक अशी लग्नं जमतात. पुढचा प्रश्न असतो तो लग्नखर्चाचा!
कारण आई-वडील, डॉली किंवा शेरी..कोणीच हा विचार करण्याइतकं समंजस नाही...खूप महाग साड्या, दागिने, आवडलं की घे विकत हे वृत्ती....आणि रीटा आहेच सगळं करायला...शेवटी एक दिवस सहन न होउन रीटा हे सगळं साळवीला सांगते...तो तिला आधार देतो..आणि..

तेच होतं..रीटा त्या क्षणी स्वतःला पूर्णपणे त्याला अर्पण करते.
खरंतर तो तिच्याहून १५-१६ वर्षांनी मोठा, बायको आणि २ मोठी मुलं असलेला. पण ती त्याच्यावर खूप खूप प्रेम करते. सगळं माहिती असूनही करते. त्याच्या घरी येणं-जाणं, त्याच्या मुलांशी आणि बायकोशी जवळीक हे सगळं ती खूप मनापासून करते. त्य दोघांमधले खरे संबंध जगापासून लपवूनच असतात, पण कधीतरी हे सगळं बदलेल या आशेवर रीटा आनंदी असते.

एक दिवस मात्र साळवीच्या घरी सगळं समजतं, आणि रीटाच्या वाट्याला येतो फक्त तिरस्कार! ती कोलमडते. त्यांना चोरून्-लपून भेटावं लागतं. रीटाच्या घरी एव्हाना संगीताच्या हे लक्षात आलेलं असतं. मुळातच समजुतदार असलेली ती, ताईला-रीटाला नवीन स्वतंत्र घर घ्यायचं सुचवते. साळवीला मोकळेपणी भेटता येइल, स्वतःचं आयुष्य हवं तसं जगता येइल म्हणून. आई-बाबांचा खर्च शेअर करायचीही तयारे असते तिची. "तुझ्याकडून खूप घेतलं, आता पुरे.." म्हणून.

रीटा स्वतंत्र राहु लागते. साळवीला घर दाखवते. "आपल्याला स्वच्छपणे भेटता यावं म्हणून" असं जेव्हा ती साळवीला सांगते तेव्हा मात्र, ते कधीच शक्य नसल्याचं साळवी तिला सांगतो. ती खूप त्रागा करते, साळवीला त्रास व्हावा म्हणून इतर पुरुषांशी मैत्री वाढवणं वगैरे..

पण त्यातलाही फोलपणा तिला जाणवतो. साळवीच्या मुलांची लग्नं झाली की तो आपलं प्रेम जगासमोर कबूल करेल या आशेवर ती पुन्हा सावरते. लग्न न करता रहायचीही तिची तयारी असते, पण जे काही असेल ते चोरून नको, स्वच्छ, उघड असावं ही तिची अपेक्षा. आणि नेमकी तीच पूर्ण करणं साळवीसारख्या घर-संसार असलेल्या पुरुषाला अशक्य!

या सगळ्याचा परिणाम म्हणजे तिचं झालेलं नर्व्हस ब्रेकडाऊन..

सरस्वतीला लिहिताना ही गोष्ट आपल्यासमोर उलगडत जाते.
रीटाचं साळवीमधे गुंतत जाणं..त्यातून येणारी अपराधीपणाची जाणीव..एका असहाय्य क्षणी तिचं स्वतःला झोकून देणं..एका वेगळ्याच विश्वात रमणं..
साळवीचं अगतिक होणं, संगीताचं ताईसाठी झटणं, आई-बाबांचं कमालीचं आत्मकेंद्रित वागणं, आपलं प्रेम न मिळाल्यामुळे वेडी झालेली व्हिक्टोरिया..

या सिनेमात प्लस पॉइंट जर काही असेल तर तो म्हणजे सगळ्यांचा अभिनय. खास करून पल्लवी जोशी. अकाली समज येऊन नोकरी करणारी षोडषा आणि सगळं पुन्हा नव्याने सुरु करताना चाळीशीच्या उंबरठावरची, एक मोठं वादळ पचवलेली रीटा तिने कमालीच्या ताकदीने उभी केलिये. मी दुसर्‍या वेळी ठरवून हा चित्रपट पाहिला, फक्त पल्लवी जोशीसाठी!
(ही कादंबरी ११-१२ वर्षांपूर्वी वाचली तेव्हा नकळत्या वयात यातल्या अनेक गोष्टींचे अर्थ समजले नव्हते. हे असं का होतं..रीटाला एवढी कशी अक्कल नाही...असं बरंच काय काय वाटलं होतं तेव्हा! Happy )

बाकी या चित्रपटासंदर्भात इतर आवश्यक माहिती जाणकार देतीलच. मला बाकीच्या अनेक गोष्टी कळत नाहीत. पण पल्लवी, रेणुका शहाणे, सई, डॉ. मोहन आगाशे, सुहासिनी मुळे या सगळ्यांनी ती ती पात्रं जिवंत केली आहेत. एक प्रश्न होता, की साळवीचं काम करायला जॅकी श्रॉफ का? पण रेणुका शहाणेंनीच कुठेतरी ,मुलाखतीत म्हटलं होतं, की त्या व्यक्तीरेखेला तेच न्याय देऊ शकतील असं वाटलं..
असो. त्यांनीही साळवी चांगला रंगवलाय.

या चित्रपटात अनेक लूपहोल्स (लूपहोल्सच म्हणायचं ना?) असतील, पण तरी नक्की बघावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंतर या चित्रपटाबद्द्ल जे आणि जेवढ मनात आलं होतं त्याच्या निम्म्यानेही लिहू शकले नाहिये मी. निसटलंय बरंच. खूप भावलेली गोष्ट कधीकधी शब्दात नाही मांडता येत तसं झालंय.
काही कमी-अधिक झालं असेल तर तो माझा दोष म्हणायला हरकत नाही.
चु.भू.द्या.घ्या.

रच्याकने,
"रीटा"साठी पल्लवीला बाकीच्या गोष्टी (सारेगमप चं अँकरिंग वगैरे) माफ!! Wink

तुम्ही चित्रपटाची संपूर्ण कथाच लिहिलीत. त्यापेक्षा तुम्हाला आवडलेल्या गोष्टी अजून विस्तारीत लिहिता आल्या असत्या.

खरंय सिंडरेला. मला हे लिहितानाच जाणवत होतं. पण नक्की कसं लिहू ते कळत नव्हतं. लिहिल्याशिवाय स्वस्थ बसवेना! म्हणून मग कथाच लिहिली सरळ.
पुढच्या वेळी असं काही लिहिताना नक्की सुधारणा करीन.
प्रतिसादाबद्दल धन्स! Happy

मी पुस्तक वाचलंय. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक.
माझ्या आवडत्या पुस्तकांवर चित्रपट निघाले की मी ते सहसा बघायला जातच नाही- बहुतेक वेळा अपेक्षाभंगच होतो.
पण हा चित्रपट मी पल्लवी जोशीकरता बघितला.
पल्लवी रिटाला न्याय देणार यात वादच नव्हता पण सगळ्या पिक्चरचा अनुभव सांगायचा झाला तर वरच्या अनुभवात एक आणखी जमा.
सईशिवाय कोणी मिळालं नसावं काय?
साळवी म्हणून जॅकी श्रॉफ म्हणजे हद्दच वाटली मला. पण ठिकच. वाचताना तरी डोळ्यासमोर सचिन खेडेकरच उभा ठाकायचा पण आय गेस, ते स्टीरीयोटाईप झालं असतं मग-सचिन खेडेकरला आणखी एका आत्मकेंद्रीत भूमिकेत दाखवलं असतं तर.