अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खली वली नाही आठवत का कोणाला???
जाम नाचायचो त्यावर!
ले गयी दिल मेरा मनचली..................खली वली, खली वली. खली वली>>> मी अजुनही ऐकते...

याउपर लिहिलेले सगळे गाणे अजुनही ऐकते..
यगळं फोल्डरच करुन ठेवलय मी यांच..

छुई मुई सी..भारी होतं. आवडायचं तेव्हा..
एका गाण्यात स्टोरी ..म्हणून अल्बम आवडत होते.
सोनू निगम चा दीवाना पण फेवरेट अल्ब्म..

फा अरे हिंमतवाला बघ नक्की. त्यात आपल्या महेश मांजरेकरचा अ अ अभिनय आहे. त्यावर तमन्ना आणि अजय देवगणची फोडणी Lol

लोक्स गाण्यांवर काहून बोलून रैले? ते अचाट आणी अतर्क्य सीन्स विषयी लिहायचं मनावर घ्या की राव! << +१ आणि गाण्यांसाठी वेगळा धागा काढा प्लिज. युट्युब वर परत बघायला मजा वाटतेय.

dhaga highjack jhalela aahe. tyamule achat scene aani atarkya logic naav change karun purani jeans nav theva. ha ha ha ha ha

दफ्तार मैन एक लाडकी हेय नाम हे राधिका>>
हो, मी ऐकलं आहे. किती वर्षांनी ऐकलं, मज्जा आली. मी आणि माझा भाऊ खुप enjoy करायचो हे गाणं.

पण आता back to अ आणि अ.
त्या ढिंचाक पुजा आणि सनी देओल चा हा video
https://youtu.be/yjI-hbXSgf4

या ढिंचॅक पोजा आणि हिटलर चा हा रिअ‍ॅक्शन वाला विडिओ>>> वा:, फारच सुंदर व्हिडीओ आहे. फार मेहनत घेतलेली दिसतेय, व्हिडीओ बनवायला.

अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक-
यासाठी मिथूनच्या 'गुंडा' सिनेमाबद्दल चर्चा झालीये का आधीच ?
नसेल तर (स्वत:च्या जबाबदारीवर तो सिनेमा पहावा. तूनळीवर लिंक आहे त्याची)
केवळ अ आणि अ नव्हे तर सयमक संवादांची फोडणीसुद्धा आहे.

मी परवा गिरफ्तार पहात होतो आणि मला या धाग्याची आठवण झाली.
लिहीलाय का त्यावर कोणी.
एक तर ऐन उमेदितला अमिताभ आणि त्याच्याबरोबर दोन अ अ साऊदिंडीयन हिरो.
व्हिलन ट्रेलर किंवा जेसिबी सारख काहीतरी चालवतो आणि त्याच्या पुढ्यात बाजूला व्हायच सोडून
पूनम ढिल्लों आणि कमल दोघ जनरली त्याकाळी बागेतल घालयचे तशा लोळण फुगड्या घालतात. मग त्यांना अमिताभ वाचवतो. त्यात त्याचे हात चाकाखाली येतात.
मग पुढे व्हीलनला गोळी मारताना रजनीच लॉकेट जे आता त्याच्या गळ्यात आहे ते बंदुकीत अडकवून गोळी मारतो. मला लिहीण शक्य होत नाही

दुसरा एक अ अ चित्रपट पहात होतो . राज तिलक . हा त्याकाळी थेटराट पाहीला होता.
जो मिळेल तो स्टार भरलाय. इतकी लांबलचक पल्लेदार वाक्य . एकतानाच दमायला झाल.

गिरफ्तार मधे बराच अचाटपणा आहे. फार पूर्वी बघितलेला आहे. रजनीकांत मरायच्या आधी एक सिगरेट ओढतो इतके लक्षात आहे. व अमिताभ चा जेल मधून कसे पळालो हे सांगताना प्रत्यक्ष पळून जाण्याचा सीन.

बाय द वे गिरफ्तार अमिताभच्या आजारपणा व इलेक्शन नंतरचा आहे. उतरणीच्या काळातला.

गिरफ्तार मध्ये कादर खान कडे एक कवटी दाखवली आहे, थेट रामसेंकडून उधार घेतलेली. तो तिला आयडियाची खोपडी म्हणत असतो. आयडिया की खोपडी खुल जा म्हटलं कि एखाद्या कपाटासारखी ती उघडते आणि त्यातून चिठ्ठीवर लिहून आयडिया मिळत असतात.
गिरफ्तारचा क्रेडिट सीक्वेन्स पण स्पेशल आहे - अ‍ॅन्ड अबॉव्ह ऑल ... अमिताभ बच्चन इन अ व्हेरी स्पेशल रोल. अमिताभने उतरणीच्या काळात असे बरेच स्पेशल रोल केले.

पूर्वीच्या काळी लोकांत असामान्य सहनशक्ती असावी असे आम्हांस अलीकडे फारच प्रकर्षाने वाटू लागले आहे. काही क्षणांपूर्वी 'गहरा दाग' ह्या चित्रपटाचा शेवटचा भाग पाहताना तर हे पुन्हा एकदा जाणवले. आम्ही दूरचित्रवाणी संच 'ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट' ह्या चॅनेलवर ट्यून केला तेव्हा गं.भा. ललिता पवारजी हातात पूजेचं तबक घेऊन कोण्या तरुण मुलाच्या फोटोसमोर उभ्या होत्या. पुन्हा एकवार लक्षात आलं की पूर्वीच्या काळी चित्रपटात नायक अथवा नायिकेस आई आणि वडिल ह्या दोघांचे छत्र असण्यास सेन्सॉरची सक्त मनाई असावी. आई आहे तर वडिल नाहीत त्यामुळे सांपत्तिक स्थिती बेताची ही अवस्था बहुधा नायकाच्या घरची. तर वडिल आहेत (चिरूटासकट!) आणि आई नाही म्हणून नायिका थोडी हट्टी. हे पाहून आम्हांस बर्‍याचदा असे वाटते की नायक-नायिकेचं लग्न लावून देण्याऐवजी त्यांच्या आई आणि वडिलांचं लग्न लावून दिलं तर त्यांचे उरलेले दिवस सुखाचे जातील. असो.

तर ललिताजी पूजेचं तबक घेऊन सावकाश एक भलाथोरला जिना उतरू लागल्या. कोणी असे जिना उतरू लागले की आमच्या छातीत धडकी भरते कारण मधली पायरी चुकून लोक (विशेषतः गर्भवती स्त्रिया!) धडपडतात, मग बेशुध्द पडतात, मग ऑपरेशन थियेटरवरचा तो लाल दिवा, जुळणारं रक्त मिळण्यास येणार्‍या अनंत अडचणी, हॉस्पिटलमध्ये आयत्या तावडीत सापडलेल्या देवासमोर 'भगवान मैने आजतक तुमसे कुछ नही मांगा' असं म्हणत धरलेले धरणे, 'हम मां और बच्चेमेसे किसी एककोही बचा सकते है' हा कळकटशिरोमणी डॉक्टरचा अल्टिमेटम, ह्यातून पेशन्ट वाचलाच तर एनव्हलपवरच्या पोस्टाच्या स्टँपसारखी कपाळावर पांढरी पट्टी लावलेला नायक अथवा नायिका, 'मै कहा हू', 'अब आप धीरे धीरे आंखे खोलिये' आणि 'डॉक्टरसाहब मुझे कुछ दिखाई नही दे रहा है' हे अजरामर डायलॉग वगैरे अनंत दिव्यातून बापड्या प्रेक्ष्कास जावे लागते. त्यामुळे ललिताजी जिना उतरेपर्यंत आमचा जीव टांगणीला होता. शेवटच्या दोन पायर्‍यांवर त्या पिसाच्या मनोर्‍यागत कलल्यावर तर काळीज हललं. पण देव दयाळू आहे. 'देवाक काळजी' म्हणतात ते खोटं नाही. त्या सुखरूप उतरल्या.

पण हाय रे दैवा! समोर बघतात तर राजेन्द्रकुमार उर्फ आद्य ठोकळा नं. १. ह्याच्याशी डील करण्यापरीस त्या जिन्यावरून पडल्या असत्या तर सुखी जाहल्या असत्या. तर राकुच्या चेहेर्‍यावर नेहमीप्रमाणेच कसल्याही भावांचा पूर्ण अभाव. त्यामुळे तो आनंदाची बातमी द्यायला आलाय का दु:खाची हा पत्ता लागेना. ललिताजींना ह्याची सवय असावी. कारण त्यांनी अगदी तोंड भरून त्याचं स्वागत करून त्याला ताटातला प्रसाद देऊ केला. राकुने तोंड जरासं वाकडं करून 'मै इस लायक नही' हे वाक्य टाकलं. ह्याला डायबिटीस असावा काय अशी शंका मनाला चाटून गेली. म्हटलं आता हा काय झालंय ते सांगायला किती पिदवतोय काय माहित. बरं तो पुरुष असल्याने 'घरानेकी इज्जत मिट्टीमे मिलायी' वगैरे पण शक्य नाही....निदान तेव्हाच्या काळात तरी. पण शेवट जवळ असल्याने त्याला जास्त फुटेज न देण्याचा शहाणपणा दिग्दर्शकाने दाखवला. त्यामुळे राकुने लगेच 'अभी तुम जिसकी तसबीरके सामने दिया जलाकर आयी हो तुम्हारे उसी बेटेका हत्यारा मै हू' हा बाँब टाकला. लगेच 'खिलौना' मध्ये संजिवकुमार आपले हात जिन्याबाहेर काढतो तस्से दोन्ही हात त्याने ललिताजींसमोर धरले. का ते एक त्याला माहित आणि दुसरं त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला! बहुतेक 'मै तुम्हारा गुनहगार हू' हा अर्थ त्यात अभिप्रेत असावा. राकुने त्या मुलाला कसं मारलं असावं हे खूप विचार करूनही मला काही इमॅजिन करता येईना. बहुतेक त्याच्यासमोर दोन भावनाप्रधान वाक्यं म्हटली असतील. आणि त्या मुलाने स्वतःच स्वतःची जीभ ओढून घेऊन आत्महत्या केली असेल. असो.

झालं बाँब फुटला. आणि ललिताजींनी पवित्रा बदलला. खास गिर्हाईक आलं की साडीवाले कश्या ठेवणीतल्या साड्या काढतात तशी त्यांनी 'मुझ बुढियाके आंखोकी रोशनी छीन ली', 'बुढापेकी लाठी छीन ली' वगैरे ठेवणीतली वाक्यं काढली. आम्ही म्हटलं माते, त्या मुलाने शशिकलासारखी बायको आणली असती तर तिने तुझं जिणं हराम केलं असतं किंवा त्याची बायको निरुपा रॉयसारखी असती तर तू तिला वात आणला असतास. त्यापेक्षा आहे हे बरं आहे की. तो वर सुखी, तुम्ही इथे खाली सुखी. बरं, ललिताजींचं तांडव चालू पण समोर राकु ढिम्म. त्यांनी 'यहासे चलो जाओ' म्हटलं तरी ह्याच्या चेहेर्‍यावरची माशी हलेना का हा तिला हलवेना. तेव्ह्ढयात तोच जिना धाडधाड उतरून माला सिन्हाजींचं आगमन झालं. ललिताजींनी लगेच त्यांजपुढे राकुच्या पापांचा पाढा वाचला. मालाजींनी बायका झुरळ (मध्यम साईजचं, मोठं नव्हे!) बघून जेव्ह्ढ्या दचकतील तेव्हढं दचकायचा अभिनय केला. आणि लगेच रडायला समोरचा खांब गाठला. ललिताजी कोचावर जाऊन पडल्या. बायका नीट खुर्चीवर बसून का नाही रडत? एक तर बेडवर धप्पकन जाऊन पडतात आणि त्याच्या स्प्रिंगांची वाट लावतात. किंवा खांबाला जवळ करतात. एव्हढ्या बायकांचे अश्रू वर्षानुवर्ष सहन करणार्या खांबाची 'क्या खंबे जैसा खडा है' म्हणुन संभावना केली जाते हा अक्षम्य गुन्हा आहे. खांबाचा छताला टेकू द्यायला उपयोग असतो पण असा वेगळा उपयोग फक्त बायका आणि कुत्रीच करू जाणे.

तर आता आपला मख्ख चेहेरा बघायला कोणी नाही हे बघून राकु बाहेर पडला. म्हटलं चला, मॅरेथॉन चालू झाली. तेव्हढ्यात राकुला बाहेर मनमोहन कृष्ण (कोहरातला वहिदा रहमानचा काका) दिसला. त्याने 'शंकर, कहा जा रहे हो बेटा' असं विचारलं मात्र राकुने अगदी दिलीपकुमारची आठवण व्हावी अश्या रीतीने एक बोट त्याच्यासमोर नाचवत काहीतरी भावनाप्रधान डायलॉग मारला. त्याचं सार 'झक मारली आणि खरं बोललो. परत कोणाला खरं बोलायला सांगू नका' असा होता. मग आणखी अ‍ॅक्टींग करायला लागेल ह्या भीतीने तो लगेच तिथून निघाला. मकृ घरात गेला तर मालाजी आई जिवंत आहे का बेशुध्द का शुध्दीत ह्याची पर्वा न करता तिला शंकरला माफ करायला सांगत होत्या. त्यांना पुढल्या मॅरेथॉनची कल्पना आली असावी कारण 'खुदकुशी' हा शब्द आम्ही ह्या कानांनी ऐकला. मग मकॄने ललिताजींना तुम्ही स्त्री आहात, स्त्री जीवन देते, घेत नाही, तुम्ही शंकरला माफ करून तुमच्या महानतेचं दर्शन घडवा वगैरे महान उपदेश केला तरी ललिताजी हलेनात. कोच भलताच कम्फर्टेबल असावा. मग मकृने मालाजींना शंकरच्या मागे जायला सांगितलं. एव्हढ्यात घराबाहेर ५-६ लोकांना घेऊन टांगा आला. हा मॅरॅथॉनचा ऑडियन्स. मालाजी टांग्यात बसायचं सोडून लगेच रस्त्याने धावत निघाल्या. जीव द्यायला निघालेला नायक अथवा नायिका कुठे चाललेत ते लोकांना कसं कळतं हे आम्हाला अनेक वर्षं न सुटलेलं कोडं आहे.

चित्रपटाचा ह्यापुढला काही भाग काही अपरिहार्य कारणाने आम्हाला पाहता आला नाही. पण पुन्हा चॅनेल लावलं तेव्हा राकु नदीत चक्क पोहताना दिसला. अरे पोहता येतं तर आत उडी कशाला मारलीस बाबा? नद्या आधीच काय कमी प्रदूषित आहेत का? बहुतेक मालाजींनी त्याला वाचवायला आत उडी घेतली असावी. आता स्वतःला पोहता येत नाही तर कशाला उडी घ्यायची आत? हेही एक कोडं. मग राकुने त्यांना नीट सांभाळून काठावर आणलं तर तिथे टांग्यातली तमाम जनता हजर. त्यात उषा किरण, मुमताज, मदन पुरी वगैरे लोक दिसत होते. मकृ, ललिताजी बहुतेक टांग्याच्या घोडयावर बसून आले असावेत. कारण त्यांच्या घरी येतानाच टांगा फूल्टू भरलेला होता.

ललिताजींनी राकुला हाक मारून 'अब तुमही मेरे बुढापेका सहारा हो' वगैरे म्हटलं. आजकाल "सहारा" म्हटलं की मला तुरुंग, सेबी काय काय आठवतं. पण तेव्हा सहाराचा अर्थ वेगळा होता. राकुने यथाशक्ती हसायचा प्रयत्न केला. किंवा रडायचा केला असेल. आम्हाला त्यातला फरक ध्यानी येत नाही. मालाजी मात्र टांग्याच्या घोडासारख्या बसून होत्या. राकुने खेचून आणल्याने दमल्या असाव्यात. पुन्हा एकदा बरीच डायलॉगबाजी झाली त्यात मुमताज राकुची बहिण असल्याचं कळलं. शेवटी मालाजींना उभं करून मंडळींनी बरोबर चालवलं तेव्हा त्या लंगडत का होत्या हे मात्र कळलं नाही. शेवटी मदन पुरी उषा किरणकडे पाहून अत्यंत सात्त्विक हसून दोन पोरांना बरोबर घेऊन जाताना पाहिला आणि आमचा धीर सुटला. शुध्दच हरपली. अश्या धक्क्यांची सवय नाही.

शुध्दीवर आलो तेव्हा स्क्रीनवर 'समाप्त'ची पाटी झळकत होती.

कहर लिहीले आहेस स्वप्ना Lol

उरलेला पिक्चरही पाहा आणि वेगळा बाफच काढ. धमाल आहे.

बर्‍याचदा असे वाटते की नायक-नायिकेचं लग्न लावून देण्याऐवजी त्यांच्या आई आणि वडिलांचं लग्न लावून दिलं तर त्यांचे उरलेले दिवस सुखाचे जातील >>>
शेवटच्या दोन पायर्‍यांवर त्या पिसाच्या मनोर्‍यागत कलल्यावर >>>
तो आनंदाची बातमी द्यायला आलाय का दु:खाची हा पत्ता लागेना >>>
बायका नीट खुर्चीवर बसून का नाही रडत? एक तर बेडवर धप्पकन जाऊन पडतात आणि त्याच्या स्प्रिंगांची वाट लावतात. >>>
झक मारली आणि खरं बोललो. >>>

ही वाक्ये विशेष Happy

@ स्वप्ना_राज, अगदी जबरदस्त लिहिलंय. पण इथे का? वेगळा धागा काढायचा होता ना!

कणेकरांची आठवण झाली.

फारएण्ड, सचिन, लिहायला सुरुवात केली तेव्हा एव्हढा मोठा होईल असं वाटलं नव्हतं. प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद Happy

स्वप्ना खतरनाक लिहिलं आहे Lol
त्याचं सार 'झक मारली आणि खरं बोललो. परत कोणाला खरं बोलायला सांगू नका' असा होता. >> ठोकळ्याच्या बहुतांशी चित्रपटांचे सार हेच असल्याचे माझे प्रामाणिक मत आहे.

Pages