आपल्या आवडीप्रमाणे कडधान्ये. पण कडधान्ये घेताना शिजल्यावर ज्यांच्या साली मऊ पडतात अशीच घ्यावीत.
राजमा, डबल बीन्स, बटर बीन्स, मका, काबुली चणे, लाल चवळी, पांढरी चवळी, बीन्सचे अनेक प्रकार परदेशात उपलब्ध असतात फावा बीन्स, कोको बीन्स त्यापैकी आपल्याला आवडतील ती घ्यावी.
चवीप्रमाणे मीठ आणि मिरपूड.
बेसिक कृतीत एवढेच घटक लागतात.
चव वाढवण्यासाठी, हिंग, जिरे, ओवा, लसूण, कापलेला लाल किंवा हिरवा कोबी, सेलरी, साजूक तूप
लोणी, आल्याचा किस, टोमॅटो सॉस, बीट, लिंबू रस वगैरे.
सोबत घेण्यासाठी टोष्ट
आपल्याला आवडतील ती सर्व कडधान्ये घ्यावीत. ती रात्रभर भिजत घालावीत. मग मीठ घालून उकडून घ्यावीत. गळतील एवढी उकडू नयेत. आकार राहिला पाहिजे.
पण त्यातले पाणी पूर्ण काढू नये. काबुली चणे आणि डबल बीन्स वापरले तर पाणी आपोआप दाट होते. मग सगळे मिश्रण परत गरम करावे व त्यात ताजी मिरपूड घालावी. शक्यतो तिखट नकोच.
हळद हिंग वापरायचे असेल तर यावेळी घालावे.
जिरे वा ओवा वापरायचा असेल तर तो कोरडा गरम करुन, जरा भरड पूड करुन वापरावा.
लसूण कच्चाच बारीक करून घ्यावा.
तूप वा लोणी वापरायचे असेल तर वरुन घ्यावे.
बीट वापरायचे असेल तर ते उकडून, किसून वापरावे.
कोबी बारीक कापून कच्चाच घ्यावा. सेलरी कापून घ्यावी.
लिंबू वरुन पिळावे, टोमॅटो सॉस वरुन घ्यावा.
यापैकी आपल्याला आवडतील ते पदार्थ घ्यावेत. (सगळेच नाहीत)
सोबत ब्रेड टोष्ट करुन घ्यावा.
सकाळच्या थंडीत हा प्रकार खाऊन बघाच. अगदी उत्साह संचारतो अंगात.
यात अंडे पण वापरत येईल, मिश्रण शिजत असतानाच वरुन अंडे फोडून टाकावे.
मायबोलीकर थंड च्या, खास फर्माईशीवरुन...
गिथेरी हा शब्द खास केनयाचा. मका आणि इथला खास राजमा, रात्रभर शिजवून हा करतात. त्यात मीठाशिवाय बाकी काहीच लागत नाही.
असाच एक प्रकार आपल्याकडे हिमाचल प्रदेशात करतात असे ऐकले आहे. त्याला रास, असा शब्द आहे असेही मित्राने सांगितल्यासारखे आठवतेय. पण त्यासाठी शिजलेली कडधान्य घोटून घेतात.
राजमा बरोबर बाकीचे कडधान्य शिजवले तर सगळ्याचाच रंग लाल होतो.लाल राजमा, पांढरा वा पिवळा मका, पांढरे बटर बीन्स वेगवेगळे शिजवले तर आणखी छान.
ज्यांची साल शिजल्यावरची कडकच राहते, असे साधे चणे, पावटे वगैरे घेऊ नयेत.



तुम्ही हिमाचलमधला प्रकार म्हणताहात तश्या प्रकारची डाळ माझ्या सासरी करतात. यात घरात असणारी सगळी कडधान्यं, इच्छा असल्यास सगळ्या डाळी एकत्र शिजवतात.
मी सहसा आख्खे मसूर, उडीद, राजमा, चवळी, मुग,काळे चणे / काबुली चणे असल्यास मटकी अशी सगळी कडधान्ये घेते. कधीकधी यातच थोडी तुरीची डाळ अन चणे घातले नसले तर हरबर्याची डाळ पण घालते. कडधान्यं २-३ तास कोमट पाण्यात भिजवून घेते. शिजवतानाच त्यात हिंग, हळद, भरपूर अद्रक, जीरे, एखादी अख्खी हिरवी मिरची, गरम मसाला (ऐच्छिक), मीठ वैगरे घालते. कधीकधी कांदा पण घालते. शिजल्यावर किंचित घोटून त्यावर चिरलेला लसूण घालून तुपाची फोडणी देते.
या दिवसात ही डाळ प्यायला /खायला मस्त लागते.
आभार अल्पना, त्याला खास शब्द आहे ना ?
माहित नाही, सासुबाईंना किंवा नवर्याला विचारावं लागेल काय म्हणतात ते. आमच्याकडे एक हिमाचली ड्रायव्हर आहेत, त्यांनी एकदा केला होता हा प्रकार. ( ते ड्रायव्हरकाका अन त्यांची बायको दोघं अप्रतिम स्वयंपाक करतात.
) मग नवर्याला विचारलं तर तो म्हणाला की हिवाळ्यात करतात अशी डाळ चुलीवर.
नवीन प्रकार, करुन पाहीन
अरे दिनेश दा लग्गेच फर्माइश पुर्ण केलीत, धन्स!
नक्कि करुन पहिन , माझ्या आई कडे नउ प्रकार कडधान्याची उसळ करतात , फोड्णीला फक्त हिंग मिरच्या असतात, आणि उसळीत मिठ , सोबत ज्वारीची भाकरी , श्रावणातल्या नवमीला करतात, मस्त लागते