घरखुळ (भाग ४: इथेच टाका तंबू)

Submitted by योग on 21 May, 2008 - 19:51

दिवसभर अस भटके, विमुक्त, पारधी असल्यागत हुन्दडायच अन रात्री परत आल की पेपर, पुरवण्या वाचून खुणा करून ठेवायच्या. घर घेण्याच्या त्या धुन्दीत अस १२ तास रोजची अन्ग अन मेन्दूची मेहेनत होत होती. एरवी देशवारीत मस्त आईच्या हातच गरम गरम जेवायच, इकडे न दिसणारा अल्फा मराठी लावून आगा पिछा माहित नसलेल्या मालिका उगाच बघत बसायच, जमलच तर जुन्या मित्र मन्डळीन्शी भेटी गाठी करायच्या, कॉलेज कट्ट्यावर फेरी मारून यायची... असा मस्त दिनक्रम असे.

पण आता भारताबाहेर राहून वेळेच महत्व अन गणित अधिक सहज समजल्याने प्रत्त्येक क्षण कामी लावू पहात होतो.
"आज कुठे फिरून आलात..? बहिणीची विचारणा... मग मि कुठे कुठे भटकून आलोय हे सन्गितल्यावर म्हणजे अजून "ब" च्या गावी (बाणेर, बावधन, बिबवेवाडी..) गेलाच नाहीस होय? अस म्हणून माझ्या आगीत पळी पळी तूप घालायच काम मात्र करत होती.

खरच पुणा केव्हड पसरलय... मला आठवत आमच्या लहानपणी कोथरूड ला मामाने घर घेतल तेव्हा कुठे माळरानात (आताच वनाज?) गावाबाहेर जातोय म्हणून आमच्याच लोकानी त्याला वेड्यात काढल होत. आम्ही मुल तेव्हा कोथरूड ला जायला भारी कुरुबुरत असू. कायम लोड शेडींग, रस्त्यावर गाय, म्हैस, घोडे, शेण चारा, गटारे चुकवत कस तरी "मामाच्या गावाला जावूया"म्हणत आम्ही जात असू...गेल्या दहा वर्षात तेच कोथरूड अस पहिल बाळंतपण होवून धष्टपुष्ट झालेल्या ओल्या बाळंतिणीसारख इतक झपाट्याने वाढल की बघता बघता पुण्याचा center point होवून बसल. बिबवेवाडीचही तसच्..मला आठवतय VIT नामक अभियान्त्रिकी विद्यालय नुकतच उघडल तेव्हा तिथ अर्ज द्यायच्या निमित्ताने पहिल्यान्दा बिबवेवाडी ची सफर झाली होती. MIT च्या बाजूचा परिसरही तसाच, गेल्या दहा वर्षात हा हा म्हणाता वटवृक्षासारखा फोफावला (या फोफावण्यात कराडांचा मोठा हत्तीवाटा आहे असा माझा समज). एकन्दरीत आम्ही लहानणी येत असू ते पुणे, अन आताच हे मि हुन्दडलेल पुण यातला फरक अक्षरशा: शब्दशा: जमिन आसमानाचा म्हणता येईल.
मामाच्या गावाची एक १८६ क्रमांकाची (शास्त्रीनगर?) PMT काय ती अजूनही धावते आहे इतकाच "प्राचीन" सांस्कृतीक पुण्याशी उरलेला संबंध..

असो. मुळा मुठाच्या पाण्यावर वाढलेले पुणेकर यातील बारीक सारीक तपशिलात चूक असेल तर सुधारतीलच.. मि फक्त जबानी/साक्ष नोन्दवतोय.

तर पहिले दोन दिवस असे शोधाशोध केल्यावर मग पुन्हा तिसरे दिवशी बाहेर पडलो. आज मिस्टर धान्डे यानी सकाळी फोन करून फक्त चार ठिकाणी जावून येवू अस सान्गितल. त्यातल्या पहिल्याच ठिकाणी मि नऊला जाऊन पोचलो. इमारत चारच मजली होती पण आवडली. व्यवस्थित बान्धकाम, स्वच्छ, मोकळी, सफाईदार, प्रशस्त floor plan, बाजूला चान्गली वसाहत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे टॉवर नाही-पण चौथ्या मजल्यावर, अन बन्गला नाही-पण तशीच privacy.. असा एकन्दरीत वास्तूरंग मनाला आवडून गेला. घर पहाण्याच एक आहे, टेक्निकल अन इतर अन्ग जरा बाजूला ठेवलीत तर जिथ पाय ठेवल्यावर मन प्रसन्न होत तिथ हमखास सौख्य लाभत असा अनुभव आहे. वरचे फक्त दोन terrace flat शिल्लक होते. गम्मत बघा, मला आवडलेला flat अर्धा तास पूर्वी एका Australian NRI मूलीने घेवून टाकला. सकाळी साडे आठ वाजता त्या इमारतीतील गुरख्याचा काळा कुत्राही जागेवर ("जाग") नसेल या माझ्या समजाने नेमकी मला इथे दगा दिला. मग त्याच्याच बाजूचा दुसरा Flat पसंत केला, आणि नशीब की काय तर या flat ला वरती अक्खी attached terrace होती.

वा! मनात मि म्हटले, राणीला बागकामाची भारी आवड, या निमित्ताने पूरी होईल... अन्यथा मुम्बईत बाल्कनीत एका दोरीवर टांगलेले कपडे, तर दुसर्‍या दोरीवर टांगलेल्या झाडा फुलांच्या कुंड्या. एकाला कायम सुकवायचे तर एकाला कायम ओले ठेवायचा आटापिटा... एव्हडाच काय तो गार्डनिंगशी संबंध!

मि खाली येईपर्यंत धान्डे त्यान्च्या बुलेट वरून आत येत होते..
ओळख करून घेतल्यावर, "काय साहेब कसा काय वाटला flat" धान्ड्यान्नी विचारले.. मला त्यान्ची ती "मिस्स्ड कॉल" न देता थेट भरत-भेट घेण्याची पध्दत खूप आवडली.
वा! मस्तच! आज काम व्हायचा दिवस आहे बघा...मि धान्ड्यान्च्या कश्टमर सर्विस, बिझनेस सेन्स, अन एकन्दर नशिबाला अशी पोचपावती देवून टाकली.

धान्ड्यान्नी लगेच जागेचे मालक बिल्डरला फोन लावला अन पार्टीला flat लगेच घ्यायचे आहे सान्गून टाकले. इकडे "मिळाला एकदाचा" म्हणून मि फोन करून बहिणीला अन घरी कळवून टाकले. तितक्यात फोन ठेवून धान्डे अगदी हिरमुसल्या चेहेर्‍याने सान्गू लागले.
"एक प्रॉब्लेम झालाय साहेब.. तुम्ही जो white रकमेचा कर्जाचा चेक देणार आहात त्या बॅन्केबरोबर हे बिल्डरसाहेब व्यवहार करत नाही म्हणले"...
"ऑ? म्हणजे काय? अहो ती भारतातील सर्वात मोठी National Bank आहे, त्यान्चा चेक घेत नाही म्हणले...?" मला हसाव का रागवाव तेच कळेना. हे काहितरी भलतच!
"आता बघा ना..मि पण सान्गून बघितल डायरेक्ट साहेबाना, पण डील करायची नाही म्हणतात.. तुम्ही दुसर्‍या बँक चा चेक मॅनेज करू शकाल काय?" धान्ड्यान्नी अगदी काकूळतीला येवून विचारल.
"छे हो...आत्ता अशा ऐन वक्ताला एव्हडी मोठी रक्कम कुठून दुसर्‍या बॅन्क मधून उभी करू...? बघा काहीतरी करा".. माझी घायकुती.
"नाही हो साहेब हे बिल्डर, आमच्या "खास" ओळखीतले नाहीत ना... "य्-पाटील" असते तर आता करून दिली असती डील...

एकन्दरीत इथे काही वेगळीच strategy वापरायला हवी हे कळत होत. अन नेमकी एक युक्ती सुचली. म्हटल जरा त्या बिल्डर साहेबाना फोन लावा मि स्वता: बोलतो.
धान्ड्यान्नी फोन लावून दिला:
फोन वर, मी मुम्बईहून आलोय, flat आवड्ला, घ्यायचा आहे, साहेब आपल्याच जातकुळीतला आहे, तुमच्या बाजूच्या गल्लीत राहणारे ते संघाचे ज्येष्ट सेवक माझे सख्खे काका, इत्त्यादी इत्त्यादी सर्व लागेबान्धे वापरल्यावर साहेबानी "बर इथ ऑफिस वर या मग बघुया" म्हणून सम्मती दिली.
चला निदान एक शक्यता तरी होती. धान्ड्यान्ना दुपारच्या गाडीने देविच्या नवसाला गावाला जायचे होते.. तेव्हा हिला (धान्डे मॅडम) ना पाठवून देतो तुमच्या बरोबर म्हणून ते निघाले..मग दुपारी पुन्हा धान्डे मॅडम ची बजान अन मागे माझी रिक्षा अशी आमची वरात त्या बिल्डरच्या घरी जावून पोचली.

या सद्गृहस्थानं स्वताच्या बन्गल्यातील खालच्या मजल्यावरच ऑफिस केल होत. बाहेर- बाप, लेक, आई तिघान्च्या नावाच्या पाट्या.

मग मि अन धान्डे मॅडम आत जावून बसलो. जेमतेम तीन माणस बसू शकतील अशी ती ऑफिस बाहेरची वेटींग जागा. आम्हाला गेल्यावर कोण काय कुठून अशी तिथल्या नोकराकरवी विचारणा केल्यावर बसवून ठेवण्यात आलं. खर तर दुपारच्या उन्हाने अन धावपळ करून घसा तहानलेला..पण पाणि विचारायचही नाव नाही. बाहेरच्या या वेटींग जागेत जळमटलेला खेतान चा पंखा. तोही "जरा लावता का" अस विचारल्यावर आढे वेढे घेत तिथल्या एका बाईनी लावला. तेव्हड्यात साहेबानी आत बोलावून घेतल.
आत गेलो तर तिथल दृष्य बघून टपाल कचेरीची आठवण झाली. एका 10 x 10 च्या खोलीत मधोमध एक टेबल टाकून त्यावर एक भला मोठ्ठा कळकट्ट PC ठेवून त्याच्या एका बाजूला लेक तर दुसर्‍या बाजूला वडील असे बसले होते. सभोवताली नव्या जुन्या कागदपत्रांचा नुसता ढीग पडला होता. टेबलच्या कडांचे टवके उडालेले, बसायला ठेवलेल्या खुर्चीवर रेघोट्या ओढलेल्या, अन एकही खिडकी नसल्याने भरून राहिलेला कुबट वास. या अशा लहान मुलाला कोंडता येईल अशा खोलीत हे दोघे कडक, इस्त्रीचा शर्ट घालून का बसले होते हे कळेना.
"बॉस थोडी हवा आने दे" अशी मुम्बैय्या विनंती करायला हवेलाही तिथ जागा शिल्लक नव्हती. अन त्याच टेबलावर खट्ट(start/stop), खाट्ट(slow), खुट्ट(medium), खिट्ट(full) अशा क्रमाने पत्र्याची रन्गीत बटणे दाबून पळणारा पुर्वीपैकी एक पंखा त्या बाप्-साहेबाच्या तोंडाकडे करून नुसताच ठेवला होता.. "जरा लावता का", हे माझे शब्द तिथे मि फणसाच्या अडकलेल्या गुठळीसारखे कोरड्या घशातून कसेबसे गिळले. त्या खोलीत तो उजळमाथ्याचा मुलगा अन मि एव्हडाच काय तो उजेड होता बाकी सर्व black sea सारखे पसरले होते.. नाही म्हणायला वडीलान्च्या डोक्यावर चप्प तेलाने बसवलेल्या शुभ्र लाटा काय त्या दिसत होत्या..

माझ्या इन्जीनीयरीन्ग च्या External Oral च सेटींग देखिल इतक वाईट कधिच नव्हत.

मी माझी ओळख करून द्यायच्या आधी घाम टिपला (त्याकडे त्या दोघानी पाहून न पाहिल्यासारखे केले) अन त्या खुर्चीत बसलो. धान्डे बाई देखिल कशाबशा आपला बोजवारा सम्भाळत बसल्या. त्या आधी इथे यान्चेकडे आल्या नव्हत्या हे उघड होते. निदान बाई माणूस समोर असेल तरी थोडी आदब दाखवावी पण छे, या बाप लेकानी स्वताची ओळख सुध्धा करून दिली नाही.
"(नेमकी मालक कोण ) बर कुणाशी बोलू"? असा थेट प्रश्ण मि विचारल्यावर.. त्यातल्या मुलाच्या नाकावरची माशी हलली.."
"माझ्याशी" त्याने निव्वळ खुणेने सान्गितले.
मि एकन्दर सर्व परिस्थिती समजावून सान्गितली. गेली पस्तीस वर्ष आमचे कुटुम्बीय या bank बरोबर खातेदार आहेत, व्यवहार करत आहेत, इतकी मोठी Bank
असूनही काय प्रॉब्लेम आहे, शिवाय तुम्हाला चेक वटल्याशी मतलब ना? मि सरळ विचारले..
"एक मिनिट मि बोलतो"... इतका वेळ पुतळा होवून बसलेल्या वडिलान्च्या केसावरील कावळा त्या प्रश्णाने बहुदा उडाला.
"जसा तुमचा चांगला अनुभ आहे तसाच आमचाही आहे, पण वाईट... घर कर्जाच्या बाबतीत तुमची bank नावाला nationalised आहे.. तिथे boss बदलला की व्यवहार बदलतात. भले आमचा flat रिकामा राहिला तरी चालेल पण या Bank शी व्यवहार करणार नाही"... २०-२० चा सामना एकाच षटकारात सम्पवून टाकल्यासारखे ते धो धो बरसले.
त्यान्च्या त्या अवताराने धान्डे बाईन्ना तर चक्क घाम फुटला..
"पन मि काय म्हनत्येss..." त्यान्नी थोडि धडपड केलि...
"काही म्हणू नका हो...जोशी बोला काय करताय्..इथे बाजूला HDFC Bank आहे हव तर त्यान्च्या कडे अर्ज द्या.त्यान्चा चेक मि घेतो".. साहेबानी बाईन्ना "आउट" च बोट दाखवायच शिल्लक ठेवल होत.
"अहो पण साहेब, चेक सात दिवसात तुमच्या घरी पोचेल याची गॅरेंटी मि देतो ना.." माझ अपिल.
"ते काही नाही मि डील करणार नाही, मि तुम्हाला flat विकणार नाही".. साहेब.

मला साक्षात तिथे लोकमान्य टीळक उभे राहून "मि शेन्गा खाल्ल्या नाहीत मि टरफले उचलणार नाही" असे म्हणत असल्याचा भयावह भास झाला.. पण कुठे ते लोकमान्य अन कुठे हे मुजोर! तरिही त्या कथेतील शिक्षक बनून या साहेबाना किमान पक्षी त्या ठेवलेल्या पंख्याला वेताच्या छडीने राप्-राप फोडून काढावसं वाटल.

आता मात्र मि पेटलो(च). एक तर तीन दिवस फिर फिर फिरून यान्चा flat शोधला, उद्या परत जायची वेळ आली अन हा मनुष्य मक्खपणे मला माझे आजपर्यंतचे आम्च्या Bank शि असलेले जुने संबन्ध तोडून नविन ठिकाणि अर्ज द्या म्हणतो..वर माझा flat खपला नाही तरी चालेल हा खवटपणा अन समोरच्याशी दोन शब्द व्यवस्थीत बोलायच साध औदार्यही नाही.

"Okay enough! तुम्ही फोन वर या म्हणालात म्हणून आलो..दुसर म्हणजे, काहिही झाले तरी मी माझ्या बॅन्केचे इतक्या वर्षाचे संबन्ध तुमच्या सांगण्यावरून तोडणार नाही. तुमच्या पुण्यातली HDFC ची इथली शाखा आज "शनिवारी" बन्द आहे.. परवा मला मुम्बई ला परत जायच आहे.. अन एव्हड करूनही मी दुसरीकडून रक्कम मॅनेज केली तरी तुमचा Flat निश्चीतच घेणार नाही. Have a nice day! " म्हणून मि तडक बाहेर पडलो देखिल.

बाहेर आल्यावर धान्डे बाईन्नी माझे मन वळवायचा खूप प्रयत्न केला. त्यान्च्या कमिशनखेरीज माझी गेल्या चार दिवसांची धावपळ उगाच अशी फुकट जावू नये ही त्यांची इच्छा मला स्पष्ट कळत होती. पण इथे प्रश्ण तत्वाचा होता. कबूल आहे, त्या बिल्डर महाशयाना यातून काहीच नुकसान होणार नव्हते, दुसरे कुणी गिर्‍हाईक मिळालेही असते.. पण सर्वच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत एव्हडा माझा प्रामणिक मुद्दा मि त्यान्ना निश्चीत पोचवला होता.

"मि शेन्गा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" या लोकमान्यान्च्या पुण्यनगरीचा मला "तात्त्विक"वाण नाही पण गुण लागला म्हणायला हरकत नाही.

मुम्बईपासून लागलेली ही डील नो डील ची पन्वती काही संपत नव्हती हेच खर. मि स्वताची समजूत घालून उरलेल्या दोन दिवसात काय करात येईल याचा हिशेब करत बहिणीच्या घरी पोचलो.

बहीणीला व तीच्या मिस्टरान्ना कहाणि ऐकवल्यावर तेही थक्क झाले.. आपलेच लोक इतके खत्रूड कसे याचा पुन्हा ल.सा.वी. काढत आम्ही त्या चर्चेला विराम दिला.

**********************************************************************************
मग त्या दिवशी सन्ध्याकाळी पुन्हा एकदा मुंबई पुण्यातील काही हितचिन्तक, व्यावसायिक ओळखी वापरून पुण्यातील चार मोट्ठी नाव असलेल्या बिल्डर्सचे थेट मोबाईल नंबर मिळवून, त्यान्च्याशी बोलणी करून दुसर्‍या दिवशी "इस पार या उस पार" अशा चार निवासी सन्कुलान्च्या साईट्स वर जाणे फिक्स केले. माझ्या National Bank कडून कर्जाचा चेक त्यान्ना चालेल असे दोन तीनदा वदवून घेतल्यावर, "देवा सर्वाना सुखी ठेव" ही नेहेमीची bed time prayer करून मी झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी सक्काळीच (म्हणजे दहा वाजता: Pune Local Time) मि पहिल्या ठिकाणी पोचलो.
दारावरच मोठी पाटी होती: "घराला घरपण देणारी माणसं"

पण इतक्या मोठ्या आन्तरराष्ट्रीय ख्याती असलेल्यांच मेन ऑफिस मात्र इतक गुदमरलेल का अस राहून राहून वाटल.
ते जीन्यातील काही कोपर्‍यान्मधे पान्-पिचकाराचीची रंगोटी, जन्मभर काळेपाण्याची शिक्षा भोगत असल्यागत कुलरला साखळीने बान्धलेला तो अगम्य धातूचा ग्लास, बूड टेकल्यावर बोवारणीच्या झोळीगत खोल जाणारे वेटींग एरीया मधले कोच, पुन्हा पुन्हा तुमच शेवटच नाव विचारणारी रिसेप्शनीस्ट, दहाची वेळ देवून साडे दहा पर्यंत तुम्हाला बसवून ठेवणारी सिस्टीम, टेबलावर ठेवलेला कालचा सकाळ.. मोठ्या अपेक्षेने जाव अन अचानक कधी नवे ते नळाच पाणि गेल्यावर मग "आज अंघोळ नाही" अस जे एक अस्वच्छ फिलींग येत तसच वाटल.

तरिही माझ्या सारख्या नवख्या अन लहान माणसाची दखल घेवून आवर्जून बोलावून घेतल्यातच मि समाधान मानल. मग रितीनुसार त्यान्च्या माणसाने दोन नावजलेले प्रकल्प साईट वर नेवून दाखवले. पुण्यातील वर लिहीलेल्या इतर साईट पेक्षा फार वेगळा असा काही अनुभव इथेही नाही आला. किम्बहुना मोठ्या नावाला अपेक्षित किमान गोष्टी दिसल्या नाहीत.

आता सन्कुलात नविन घर बघायला गेल्यावर, "बोला काय पाहिजे"? असा प्रश्ण कुणि विचारू कस शकत? मग काय उत्तर द्यायच? "आत्ता घाई आहे, आठ वीस ची फास्ट पकडायची आहे, जे काही available आहे ते बान्धून द्या!" यातील "बान्धून" द्या ची द्विरूक्ती केवळ मुम्बैतील "डबेवाल्यांनाच"काय ती कळो जाणे.

त्या गडावरील नावाजलेल्या प्रकल्पाची फेरी केल्यावर मात्र, इतक्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणि डोंगर फोडून इमारत बान्धायची तर अजून कितीतरी सुबक, सुंदर, उत्कृष्ट बांधता आली असती अस राहून राहून वाटून गेलं. अन हे झाल फक्त बाह्यास्वरूपाबद्दल, आतल interior तर त्याहीपेक्षा कमी दर्जाचं. बाजूलाच दुसरीकडे row houses प्रकल्प चालू होता. गम्मत आहे, ह्या आधीच्या इमारती कुठल्या "कष्ट-मर" वर्गा साठी आहेत अन row houses "कुठल्या" customer वर्गा साठी आहेत हे लक्षमण रेषा आखल्यागत अस ढळढळीत स्पष्ट करायय्ची खरच काय गरज? शेवटी कुठलाही कस्टमर हा(च) तुमचा देव असायला हवा नाही का? मग एकाला जन्मभर फक्त शेन्दूर लावून वडाच्या पारावर उभ करायच तर दुसर्‍याला रत्नजडीत बालाजी बनवून बसवायच हा दूजा न्याय का?
असो मला फक्त घराशी देण-घेण होत. काहिही न घेता आभार देवून परत मेन ऑफिस मधे आलो.

"आज सन्ध्याकाळी आमचे मोठे साहेब किव्वा मॅडम तुम्हाला भेटणार आहेत.." तिथल्या HR अधिकार्‍याने सान्गितल. मि सकाळी साईट वर जाता जाता त्याच्याकडे माझा resume देवून गेलो होतो बहुदा त्याचा परिणाम?
असो. एव्हड्या मोठ्या साहेबान्नी माझ्या शुल्लक व्यावसायिक अनुभवाची दखल घेतली इतपतच मला पुरेस होत.

मग दुपारी पुन्हा डहाणूकर मधल्याच दुसर्‍या नावाजलेल्या बिल्डरच्या नविन पॉश सन्कुलात गेलो... सर्व काही छानच होत, कंस्ट्रक्शन वगैरे सर्व उच्च दर्जाच, भरपूर मोकळी जागा, भरपूर उजेड, किम्मत बरीच जास्त पण सर्वाला अनुसरून, खाली मोठ बेसमेंट पार्किंग, इत्यादी सर्व. पण घरात पाऊल ठेवल अन एक गोष्ट प्रकर्शाने खटकली: घराच्या Living Rm मधे उभ राहिल की किचन मधे घरची बाई कुठली साडी घालून पोळ्या लाटते आहे, किव्वा दोन्ही मास्टर बेड्-रुम मधिल चादरीन्वर किती सुरकुत्या पडल्या आहेत, किव्वा पॅसेज मधल्या गेस्ट शिंक मधे कोण शिंकरत आहे, याच एकाच फटक्यात दर्शन होईल असा floor plan. दिवाळीत दाराबाहेर रान्गोळी काढतो तसा..

निव्वळ FSI पूर्ण वापरायच्या भानगडीत प्लॅनर च्या नजरेतून सुटलेली इतकी छोटी गोष्ट, अन किम्मत सत्तर लाखाच्या घरात! हे म्हणजे प्रिती झिन्टाला "माहेरची साडी" चित्रपटात प्रमूख भूमिका देण्यासारख आहे.. तीच्या खळ्या वसूल न करण्याची इतकी खुळी चूक करणारा करंटाच म्हणायला हवा.

पण तीथेही जवळ जवळ सर्व घरे फूल्ल!

मला एव्हाना प्रचंड अपराधी वाटू लागल होत.. जिथे इतकी लोक/कुटुंब इतके प्रचंड पैसे मोजून राहतात त्या सन्कुलात "तुज सगुण म्हणो की निर्गुण रे" असा अभंग तरी मनात का यावा? बोहोल्यावरून पळून जाणार्‍या समर्थान्नी तरिही "आधी संसार करावा नेटका" हे का बरे लिहून ठेवले..? काय हा छळ! मि स्वताला अन नशीबाला दोष देत तिथून निघालो..

पुढचा स्टॉप होता "Scheme-Fem" बिल्डरचा. त्यान्च्या अशाच एका महाकाय स्कीम संकुलात गेलो. येवून जावून तिथेही तोच प्रकार. किम्बहुना, आम्हाला घर दाखवायला कुणी available नाही इतका धन्दा तेजीत. शेवटी बर्‍याच वेळाने मुक्ख्य साईट इन्जीनियरनी तो इमारतीन्चा भुल-भुलैय्या फिरवून आणला. एकन्दरीत घरान्ची थेट एकमेका समोरील arrangement बघता, फार तर अती आधुनिक चाळ म्हणता येईल असा प्रकार होता. घरात शिरल्यावर, ही लिविंग रूम, ही किचन, ही मास्टर बेड रूम, ही गेस्ट रूम, ही ड्राय बाल्कनी, अशी खोल्यान्ची फक्त ओळख करून देवून तो मनुष्य "आता आणिक काय विचारायचे आहे" या थाटात स्त्बध झाला.

इतके करोडो रुपये ओतून, कमिन्स च्या वर्कशॉप च्या भिंतीला लागून-फेसिंग मास्टर बेड रूम बांधणार्‍याचे पायच (जमिनीवर असले तर) धरायला हवेत. मास्टर बेड रूम मधे मेकप केल्यावर बाईने एखादा गुंतवळ खिडकीतून बाहेर फेकला (का टॉवर मधले लोक खिडकीतून बाहेर कचरा फेकत नाहीत असे वाटले का तुम्हाला? असे न करण्याचा कुठे कायदा आहे का?) तो या वर्कशॉप च्या पत्र्यावर पुढील अनेक दिवस हमखास पडून राहील इतकी जवळीक, अन तुमच्या सन्कुलात काश्मिरी अतीरेक्यान्नी (पुण्यात ते पोचणार नाहीत अशी वेडी आशा कुणी ठेवू नये) अगदी serial blasts केले तरी तुम्हाला रोजच्या वर्कशॉप च्या महाकाय मशिनरी च्या घणाघातापूढे त्या serial blast मधल "फुस्स" ही ऐकू येणार नाही इतका आवाज आजूबाजूला असलेल्या अशा परिसरात घर बांधणारे अन तिथे जावून राहणारे यान्च्या आधुनिक आगतीकतेला माझा साष्टांग दंडवत घालून मि तिथून निघू लागलो तेव्हा,
"हे वर्कशॉप दोनच वर्षात पाडून तिथे फक्त administration office बान्धणार आहेत्..तेव्हा हा रोजचा आवाज बंद होईल्"..त्या साईट इन्जीनियरने माझ्या अंतर्-आत्म्याचा आवाजही त्या वाक्याने दडपल्यागत मला वाटलं.
"आमच्या साहेबानी सर्वात वरचे दोन flats खास तुम्हाला दाखवायला सांगितलय.. पण आजच बूक करा, उद्याच सांगता येत नाही, फुल्ल होईल.." त्यान्नी आवर्जून सांगितल.

खर आहे "कल हो ना हो (मि मनात). "राहू दे धन्यवाद! मी तुमच्या साहेबाना सांगीन मग फोन करून"..ठरलेले उत्तर देवून मि निघालो.

पुढील दोन ठिकाणी बाणेर ला जाण्याइतपत उत्साह शिल्लक नव्हता.. शिवाय मुद्दामून इतक्या लांबच घर घ्यायच कशाला, भले थोडे रेट्स कमी का असेनात असा एक विचार मनात होताच.

त्यातल्या त्यात जाहिरातीत "बंगले विकणे आहे"बघून ठेवलेच आहेत तर कोथरूड, Law College, प्रभात परिसरातले बंगले तरी बघून घेवू म्हणून तिथे चक्कर मारून आलो. बाकी सर्व ठीक असलं तरी अर्थातच टॉवर इतका भरपूर ऊजेड अन मोकळी हवा जवळ जवळ प्रत्त्येक बंगल्यात नसतेच... त्यातूनही हे जुने(च) बंगले या कन्स्ट्रक्शन बूम मधे काहिही अव्वाच्या सव्वा किमती लावून लोक विकू पहात होते.
पुन्हा बंगल्यांच्या एकन्दर बान्धकामाबद्दल विचारल तर "छे तीस वर्षात एक भेगही गेलेली नाही भिंतीला".. म्हणून ऐकायला मिळाले. मग या अशा "अभेद्य"(बाहेरील बगीचा अन भिन्तीवरील उंच वाढलेल्या वेली फुलान्च्या आडून आतल काहिही दिसणार नाही या अर्थी) भिन्ती पाडून नविन डागडूजी करून पैसे घालवण्यात काय अर्थ होता?

थोडक्यात आता पुण्यातही टॉवर मधे जायचे तर बार्‍याच गोश्टी चालवून घ्यायला लागतील अन बंगला बान्धायचा तर कुठल्यातरी उंच टेकडीवर फक्त जमिन घेवून मग कालांतराने बांधकाम करायचे एव्हडाच पर्याय शिल्लक होता.. पण परदेशात राहून अशा ऊंटावरून शेळ्या हाकणार कोण?

त्या दिवसाची घर्-घर सम्पवून मि बहिणीच्या मुक्कामी परतलो.

*******************************************************************************

दुसरे दिवशी पुन्हा परत संध्याकाळी मुम्बईला निघायचे. सकाळीच मग इतर आप्त स्वकीयान्च्या भेटी गाठी घेतल्या. रविवार असल्याने सर्व मंडळि निवांत घरात सापडली. त्या कुणालाही आजवरच्या ससेहोलपटीचा पत्ता लागू न देता सटकायचे बेत होते ("पुण्यात उगाच वाच्यता नको रे तुझ्या घर घेण्याची.. माहिती आहे न तिथे किती भोचक चौकशा करतात ते"....आईने बजावले होते). सर्व उरकून दुपारी आमच्या बायकोच्या एका ओळखिच्या ज्योतिष बुवान्कडे गेलो. तसे व्यावसायाने ज्योतिषी असले तरी हे अगदीच आधुनिक. म्हणजे उगाच हे करा ते करा याव मन्त्र त्याव तन्त्र असले प्रकार नाहीत. मुम्बई पुण्यात तसे खूपच नावाजलेले. घरचे स्नेही. काही निव्वळ एक दोन प्रश्ण, थोड्या गप्पा म्हणून गेलो होतो.

"या वर्षी तुमच्या व तुमच्या बायकोच्या दोघांच्या पत्रीकेत जबरदस्त योग आहेत हा.. घर, नोकरी बढती, प्रवास काय हवे ते"
ते गम्मत करत होते का माझ्या जखमेवर मीठ चोळत होते, क्षणभर कळेना.. एकदा दूधाने जीभ पोळली की ताकही फुंकून प्यावे तशी माझी अवस्थ झाली होती.

वास्तविक मि इतके दिवस घर बघतो आहे यातली काडिचिही बातमी त्यान्ना ठावुक नव्हती. पण विषय काढलाच म्हणून सर्व झाला प्रकार सांगितला..
"अरे, मग मलाच आधी का नाही बोललात, माझ्या माहितीत अगदी तुम्हाला हमखास पटेल असा प्रकल्प आहे, एक्स्प्रेस वे वरून इकड यायला लागलात की लगेच आहे..तुम्हा मुम्बई करना अगदी सोईच लोकेशन बघा..चला मिच घेवून चलतो तुम्हाला... आणि मला काही फी, कमिशन वगैरे नको हा.. आपल्या स्नेहाखातर प्रेमाने दिलेली भेट समजा.." साहेबान्नी मला त्यान्च्या बाईकवर घातला अन आम्ही त्या साईट वर गेलो.

बापरे! प्रचंड मोठे संकुल.. अजूनही नव्या फेज चे काम चालू होते. इमारतींखेरीज, भली मोठी गार्डन्स, प्ले पार्क, ऍम्फिथियेटर, लायब्ररी, सौरुउर्जेचा वापर, वर, खाली पार्कींग, सर्व अद्द्ययावत सोयी, सुविधा, सेक्युरिटी, interntaional std चे सर्व बांधकाम. अगदी अलिशान साईट ऑफिस पासून (गेल्या गेल्या चहा, पाणी, बिस्कीटे..), तिथल्या सुस्वभावी स्टाफ पासून ते टॉवर च्या थेट वरच्या मजल्यापर्यंत सर्व गोष्टी "quality" ची साक्ष देणार्‍या! लोकेशनही अगदी सोयीच, एक्स्प्रेसवेवरून जवळ, अन बहिणीच्या घरापासून फार तर २० मिनीटावर.. परत IT Park जवळच असल्याने अनेक समवयस्क जोड्प्यान्ची वसती...
कुठ्ठेही नाव ठेवायला जागा नाही. सर्व प्लॅन अन इमारती, घरे ही वास्तूशास्त्रानुसार बान्धलेली.. ब्रोशर च्या मागे सगळी दर्जाची अन नावाजलेली आर्किटेक्ट, सिवील कन्सल्टन्ट, वास्तुतज्ञ, बिल्डरची नावे! साईट स्टाफ ने आवर्जून दिलेली FSI, NOC, अन कन्स्ट्रक्शन बद्दलची टेक्निकल माहिती. कुठेही लपवा लपवी वा डील करायची घाई नाही. अन कहर म्हणजे बिल्डर निघाला मूळचा मुम्बईचा, अगदी आमच्या पूर्वीच्या माहितीतला!

मला आवडलेला टेरेस फ्लॅट या आमच्या ज्योतिष अन वास्तू तज्ञ साहेबानी पास केलेला.. त्या घरातून मागे छान हिरवागार परिसर, डोन्गर तर एका बाजूला शहराचे दिसणारे विहंगम दृष्य.

वा! दिल खुश झाला! बरोबर आई बहिण असल्याने सर्वान्च्या साक्षीने मि आवश्यक ती पहिली रक्कम अदा करून घर घेवून नारळ फोडला!!! उरलेली रक्कम घर बान्धून पुरे होईल तशी बँकेकडून द्यायची होती..

"अरे हे मला कशाला" मि दिलेली छोटीशी दक्षिणास्वरूपी भेट ज्योतिष्-साहेब नाकारू लागले. मी काय परका आहे का"?
"अस कस, तुमच्यामूळेच तर हे घर मिळाल.. आमची ही स्नेहाची भेट आणि आठवण म्हणून ठेवा"अस म्हणून मि नम्रपणे अन प्रेमाने त्यान्चे आशीर्वाद घेतले.

इतके दिवस पुण्यनगरीचा चहूदिशांचा फेर फटका अन तर्‍हे तर्‍हेच्या लोकांशी बोलून वेळेला असा हजरजबाबीपणा शिकला नसता तरच नवल होते.

सन्ध्याकाळी सहा वाजता परत निघायचे ठरवले होते अन पाच वाजता असे मनासारखे घर घेईन असे साक्षात ब्रह्मदेवाने सांगितले असते तरी मि विश्वास ठेवला नसता, अन तेही मूळ माझ शहर गाव सोडून पुणेकरांच्या पुण्यात?

"काय मग आता राणीला कळवणार का, तुम्ही पुणेकर झालात ते"? बहीणीने नाटक संपल्याची शेवटची बेल वाजवून घेतली.

सोपस्कार आटोपून आम्ही मुम्बईच्या मार्गाला लागलो. इतके दिवस गावा गाव भटकणार्‍या माझ्या सर्कशीचा तंबू असा एकदाचा कायम मुक्कामी ठोकला होता.

आता हे घर "कागदोपत्री" स्वताचे करायचे शिल्लक होते बस्स!

(क्रमशा:)

गुलमोहर: 

खट्ट(start/stop), खाट्ट(slow), खुट्ट(medium), खिट्ट(full)
आवडेश....

निखिल.

योग्या घरखूळ आख्यान एकदम झकास...! नावासकट.
कोणत्या संकूलात घर घेतलस तेही सांगून टाक म्हणजे इतर कष्ट मर चा थोडा त्रास वाचेल. शिवाय माहितीतल्या शिव्हील विंजिणेरने तपासलेले संकूल आहे असा विश्वास असेल Happy

खुप छान लिहीले आहे. खुप आवडले.