मुलीची जात

"अगं....... तू इकडं कुठं"? सानन्द आश्चर्यातून (प्लेझंट सरप्राइज्) आपोआप आलेला किंकाळीसदृश प्रश्ण!!!!
स्थळ : माझ्या माहेरगावातील केळकर हॉस्पिटल. वेळ : सकाळी सहा वाजताची. मी हॉस्पिटलच्या खोलीतून बाहेरच पडत होते......... !
तिच्या त्या किंकाळीसदृश प्रश्णामुळे आजूबाजूच्या खोल्यातले पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक आपापल्या खोल्यांच्या खिडक्यातून डोकावले. लगबगीने इकडून तिकडे जाणारा हॉस्पिटलचा स्टाफही थोडा सतर्क झाला.
मी अक्षरशः अंगठा व तर्जनी या दोन बोटांच्या सहाय्याने माझेच डोळे मॅन्युअली विस्फारले. कारण अजून डोळयावरची झोप आणि मनातला शीण गेला नव्हता. अजून पूर्णपणे उजाडलं नव्हतं. त्या अन्धुक प्रकाशात डोळ्यावरची झोप निग्रहाने बाजूला सारून समोरच्या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करू लागले. अर्थातच ही प्रक्रीया अर्ध्या सेकन्दाच्या वर नाही चालली. ती माझ्या शाळेतली, माझी खूप जुनी मैत्रीण निघाली.
मी माझ्या वहिनीच्या ऑपरेशन साठी माहेरी आले होते. तेवढच निमित्त माहेरी जायला!!! असं मी नाही म्हणत , पण कोणी माहेरी निघालं की असं म्हणायची आपल्यात पद्धत आहे. तर रात्री वहिनीबरोबर हॉस्पिटलमध्ये झोपायाला जायचं, सकाळी मोबाईलचा गजर वाजला की ताड्कन उठून भराभर चालत घर गाठायचं.........घरातली सकाळची कामं आवरून भावाबरोबर वहिनीला जेवणाचा डबा पाठवायचा आणि दुपारनंतर कधीतरी पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं. मग रात्री झोपेपर्यंत वहिनीशी मनसोक्त गप्पा! साधारण असं माझं रूटीन होतं त्यावेळचं.
त्या दिवशी मी अशीच सकाळी उठून माझी एक्स्प्रेस सोडण्याच्या बेतात होते, तेव्हा ही माझी मैत्रीण भेटली. तशी तिची माझी वैयक्तिक जीवनात अशी खास मैत्री नव्हती. पण एका टीममधून खेळत असल्याने एकत्र खूप प्रवास केला होता, मॅचेससाठी वेगवेगळ्या गावी एकत्र राहिलो होतो.
तर मीही तिला अचानक पाहून चकित!! मीही तिला विचारलं, " अगं..........तू इकडे कुठे सकाळी सकाळी ते सांग आधी!!"
तीही झोपेतून उठून घरच्या अवतारातच आलेली होती.
"अगं गोळी न्यायला आले होते.........हे.............माझे मिस्टर........ अल्कोहोलिक आहेत ना!!!"
मी अवाक! केसरीमधलं व्यसनाधीन लोकांवरचं मुक्ता पुणतांबेकरचं लिखाण अगदी नेमानं वाचते मी आणि वाटतं खरंच काय काम करतेय ही मुक्तांगण संस्था.....व्यसनाधीन लोकांसाठी! आणि ते वाचतानाही त्या लोकांचं ते जग खूप अनोळखी वाटतं , तसेच त्यांच्या समस्या सुद्धा. पण तसलंच काही तरी इतक्या सकाळी सकाळी ते ही इतक्या जवळच्या माणसाकडून समोरासमोर ऐकायला मिळेल असं वाटलच नाही. आणि ती इतक्या शांतपणे सांगत होती!!
" हो पण मग गोळी कसली?" मी या विषयातलं आपलं घोर अज्ञान प्रकट करीत बाळबोध प्रश्ण विचारला.
ती म्हणाली ,"अगं........काय होतं.... मधेच सोडतात .....परत चालू करतात ना .....त्याचा त्यांना त्रास होतो गं खूप ."
माझ्या हळू हळू लक्षात येत गेलं. मी गाळलेल्या जागा भरत गेले. मधेच आणि सोडतात याच्या मध्ये 'दारू' हा शब्द अन्दाजाने घालून पाहिला. अर्थ लागला. मनातलं धूसर चित्र स्पष्ट होत गेलं.
"मग........ अशी मध्येच सोडली ना.......की त्यांना कापरं भरतंय बघ सकाळीच." तिच्या बोलण्यात माझ्या माहेरगावचा एक टिपिकल असा ऍक्सेंट होता. अतिशय कडाक्याच्या थंडीत स्वेटर काढल्यावर हुडहुडी भरते हे आपण जितक्या सहजपणे सांगू तितक्याच सहजपणे ती हे सांगत होती.
"अगं हो, पण तू केमिस्ट कडून का नाही घेत गोळ्या, डायरेक्ट हॉस्पिटल मधे येतेस ती ?" पुन्हा माझा बाळबोध प्रश्ण.
तिच्या तोंडावर हताश भाव!!! "असं काय करतेस ?" तिने पूर्वीचाच शाळेतला सूर लावला होता. ती पुढे म्हणाली "अगं पहाटे पाच बीच वाजता तुला कुठलं दुकान उघडं मिळणार आहे? त्यांना सकाळी खूप लवकर ......अगदी पहाटेच म्हणेनास... कापरं भरतंय गं .... "
माझ्या डोक्यात आत्तापर्यन्त चांगलाच प्रकाश पडला होता.
ती हसर्‍या चेहेर्‍याने पुढे म्हणाली , " तुला गंमत सांगू? आता मला इथला स्टाफ सुद्धा ओळखायला लागलाय बघ की ! मी दिसले की लगेच गोळी फुडं करतात. आहे की नाही गंमत?"
बाप रे! यात हिला काय गंमत वाटते? तरी काही तरी विचारायचे म्हणून मी विचारले, "काय गं? एकदा सोडलेली, परत कशाला चालू करतात ते? तू कसं चालवून घेतेस? भांडत नाहीस का त्यांच्याशी?"
"हॅ: , मी भांडून काही होत नाही आता. ते विसर आता. संध्याकाळी कोर्टानंतर त्यांचे सगळे वकील मित्र लावायला बसतात..............मग काय ....हे पण जातात बघ की त्यांच्यात." ती म्हणाली. पुन्हा तोच टिपिकल माझ्या माहेरगावचा हेल!!
इथे मी विचारणार होते की वकील मित्र काय लावायला बसतात संध्याकाळी म्हणून. पण मी पूर्वानुभवाने शहाणी झालेली असल्याने, लावायला बसणे याचा अन्दाजे अर्थ दारू पिणे असा लावला व परत आपले घोर अज्ञान प्रगट केले नाही. तिचा नवरा वकील असावा हाही अन्दाज आला.
पुढे ती हसत हसत म्हणाली "रोज लावायला बसण्यापेक्षा गोळ्या घेणं परवडलं नाही का?" मी आपलं हो हो केलं.
आतापर्यंत चांगलंच उजाडलं होतं!
"चल, तू कशी जाणार आहेस घरी? तुला सोडू का स्कूटीवरून?" ती विचारत होती. माझ्या भावाचं घर तिच्या वाटेवरंच होतं. पण मला सोडून ती बाहेरच्या बाहेरच गेली. कारण तिच्या नवर्‍याला तातडीने गोळ्या द्यायच्या होत्या.
ती गेल्यावर माझं विचार चक्र चालू झालं. आम्ही एकाच टीमकडून कबड्डी खेळायचो. ती नेहमीच एकेका पॉइंट साठी भांडायची. शेवटी बहुदा तीच जिंकायची भांडणात. स्वता:च म्हणणं नेहमीच खरं करायची! खेळाडूंशी ,अम्पायरशी , अगदी कधी कधी कोचशी देखिल भांडायची!!!
तिचं वागणं नेहमीच अग्रेसिव्ह असायचं. तसंच खेळणंही...........जोरदार!!!
अशा या मुलीचं हे असं का व्हावं? शालेय आणि कॉलेज जीवनात एकेका पॉइंट साठी भांडणारी वैयक्तिक जीवनात अशी माघार का घेतेय? का ही तिची माघार नाहीच? ती तिच्या नवर्‍याला सुधारण्याची संधी देतेय का?
असं तर झालं नसेल .........हिच्या स्वभावामुळेच नवर्‍याने व्यसन जवळ केले नसेल ना? पण दारू पिणे हे कोणत्याच समस्येचे उत्तर होऊ शकत नाही. आणि आधी व्यसन लावून घ्यायचे आणी मग ते सोडताना त्रास होतो म्हणून गोळ्या घ्यायच्या, त्यासाठी बायकोने त्रास घ्यायचा हे कुठले गणीत? आणि त्याच्या व्यसनाला जबाबदार त्याची बायको कशी काय होऊ शकते?
ही मध्यम वर्गीय सर्वसामान्य ग्रॅज्युएट मुलगी स्वता: कुठेतरी छोटी मोठी नोकरी करून संसाराला हातभारही लावत होती. मुलं वाढवत होती. शिवाय दारुड्या नवर्‍यासाठी खस्ताही खात होती. वर कुठेही तक्रारीचा सूर नव्हता. खरं म्हणजे ती माझ्यापासून सगळं लपवू शकली असती.
आता बहुदा तिनं सगळं होतं तसं स्वीकारून परिस्थिती सुधरवण्याचा प्रयत्न चालवला असावा. किंवा आहे त्या परिस्थितीची तिला सवय झाली असावी.
किंवा आपल्याकडे मुलींच्या ना (मला वाटते आमच्या पिढीपर्यन्त तरी) खूप लहानपणापासून ऍड्जस्टमेंट व मनावर तडजोड या गोष्टींचं महत्व ठसवलं जातं, त्यामुळे हे घडलं असावं. मुलीच्या जातीला हे बरं दिसत नाही , ते चालत नाही वगैरे लहानपणापासून खूप ऐकले असल्यामुळे ती खूप तडजोडींसाठी तयार झालेली असावी.
आणि "दिल्या घरी तू सुखी रहा" टाइप विचारसरणीमुळे आता ती काही कठोर निर्णय घ्यायला धजावत नाहीये असं असेल का? कारण काही टोकाचा निर्णय घ्यायची वेळ आली तर ती मुलगी शेवटी आपल्या आई वडिलांनाच काळजीत टाकते ना? मी खूप शक्याशक्यता तपासून पहात रहिले.
पुढे खूप दिवस हा प्रसंग व ती मैत्रीण डोळ्यापुढून जात नव्हती. त्या दिवशी हॉस्पिटलमधला तो वरवर साधा वाटणारा प्रसंग मला खूपच स्ट्राँग डोस देऊन गेला!!!


मस्त चितारलय ... स्मित



माधुरी, चांगलं लिहिलयस. किती किती कंगोरे आहेत ह्या छोट्या घटनेलाही... माणसाचे, स्त्री म्हणून, समाज म्हणून, एक मैत्रिण म्हणून.... आवडलाच लेख.



>>> हिच्या स्वभावामुळेच नवर्‍याने व्यसन जवळ केले नसेल ना?

काहीतरीच!! uhoh.gif बाईलाच दोष देणं किती सोपं!!
.
लेख आवडला.



लेख छान, पण व्यसन का लागले ते नीट कळले नाही. व्यवसायातले अपयश, हे कारण असण्याची शक्यता जास्त आहे.



व्यसन लागायला काही कारण असतचं असं नसावं. व्यसन लागत आणि कारण दिली जातात.
वैवाहिक आयुष्य ही दोघांसाठी तडजोड असते. कुणा एकाला अधिक तर दुसर्‍याला कमी करावी लागते.
असेल ते न लपवता सकारात्मकतेने हसत हसत स्वीकारणारी ही तुझी मैत्रीण ग्रेट आहे.
तडजोड न स्वीकारता वेगळी वाट निवडली तरीही तिथेही वेगळी दु:ख आहेतच.
त्यापेक्षा सवयीच्या दु:खांचा त्रास कमी वाटतो माणसाला. शिवाय सहवासानी माणूस आपल होतं.
त्यानी कापलं तरी वेदनाही सहन करता येते.
छोटासा प्रसंगही छान लिहिला आहेस. आणि त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्नही छानच.



धन्यवाद दीपुर्झा, दाद, आय टीगर्ल, दिनेशदा, मीना.
मला या घटनेचा फक्त हाच अँगल माहिती आहे. मैत्रीण अचानक आणि खूपच वर्षांनी भेटली, त्यामुळे बाकी मलाही तिच्याबद्द्ल कळू शकले नाही. व्यसन का लागले वगरे. म्हणून तर घटना छोटीशी पण इतकं लिहावंसं वाटलं.
आणि मीना या घटनेवरचा तुझा दृष्टीकोनही बरोबर आहे. या दिशेनेही विचार करायला हवा.
धन्यवाद सर्वाना!!



मधेच आणि सोडतात याच्या मध्ये 'दारू' हा शब्द अन्दाजाने घालून पाहिला. स्मित
मी दारु अन गोळा असा शब्द जुळवायचा प्रयत्न केला स्मित
छान लिहीलेस .



माझ्या ओळखित पन अशा एक बाइ आहेत. नवरा मोठया पोस्टवर होता. पण दारुमुळे नोकरि सुटलि. पन त्या बाइ नवर्याचे खुप मनापासुन करतात. कधि चिडचिड नाहि.

लेख छान



माधुरी, आवडला लेख. त्रास झाला पण हे वाचुन!! खरंच स्ट्राँग डोस!!



छान लिहिले आहे. आवडलं.



सर्वांना धन्यवाद athak gauravi ramani Anaghavn!!!!!!!!!!!!!!!!!!
लिहायला हुरुप येतो.