धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३

Submitted by अर्धवट on 30 August, 2010 - 11:11

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २

मी इथे येउन पडलो तेव्हाचा करूण आणि हृदयद्रावक प्रसंग तुम्ही मागच्या भागात वाचला आहेच, ते एकदोन दिवस तसेच काढून इथल्या लोकांच्यावर आरडाओरडा करून, माझ्या राहण्याची नवीन ठिकाणी बर्‍यापैकी सोय करून घेण्यात यशस्वी ठरलोय. ह्या दोन ठिकाणांमधे अगदी जमीन-अस्मानाचा फरक आहे. ही एक स्वतंत्र बंगल्यांची वसाहत आहे, युनिवर्सीटीच्या सीमेवरच. इथल्या शेजार्यांवर एक लेख पाडतोच नंतर, म्हणजे त्या सगळ्यांना स्वतंत्र लेखाचा मान दिलाच पाहिजे. पण तुर्तास सफारीकडे वळूया.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इकडच्या २-३ दिवसांच्या अनुभवाने, हा अंदाज नक्की आला होता की इथे युनिवर्सीटीत माझ्या सहाय्याला म्हणुन जो अधिकारी दिला होता, त्याचा उपयोग यथातथाच असणार आहे. तो किती उपयोगाचा होता हे पुढे सांगतोच. पण या देशात, आपली अस्तित्वनौका आपल्यालाच तारून न्यावी लागणार आहे अशी मनाची तयारी केली होतिच. मला माझ्या इथल्या प्रवचनांच्या वेळापत्रकाप्रमाणे केवळ गुरूवार आणि शुक्रवार असे दोनच दिवस मोकळे मिळणार होते. त्या दोन दिवसांतच काहीतरी डाव केला पाहिजे ही खुणगाठ इथे आल्याआल्याच नक्की केली होती.

बुधवार दुपारपर्यंत कुठे बाहेर जाता येइल का, काही व्यवस्था होइल का असं जमेल त्या मार्गानं. इथल्या लोकांना विचारत होतोच. कुणी ताकास तूर लागू देइनात साले... माझ्या आधी इथे येउन गेलेल्या सहकार्यांनाही विचारलं, भारतात फोन करून, त्यांनी अजुनच घाबरवलं, 'कुठेही जाउ नकोस एकटा', 'सार्वजनीक वाहनानं प्रवास करू नकोस' वगैरे वगैरे. यामागे काळजी होती की असूया होती कोण जाणे...

मग मीच माझ्या दोन तीन शिष्यगणांना थोडं घोळात घेतलं. बुधवारी संध्याकाळचं प्रवचन संपल्यावर त्यातले दोघे मला सोडायला आले, बहुदा माझ्या प्रवचनांवर खूश असावेत. त्यांच्यापुढे माझी अडचण मांडल्यावर त्यांनी आपापसात काही चर्चा केली आणि मला सागितलं की तुला आम्ही आमची गाडी आणि ड्रायव्हर गाठुन देउ शकतो. अथवा तुझी तयारी असल्यास तू बसनेही जाउ शकतोस. काय, कुठे, कसं ते आम्ही समजावून देउ. अत्यंत दु:खी स्वरामधे सुट्टी काढता येत नसल्याबद्दल माफीपण मागितली वारंवार.

आधीच खुप भीती असल्यामुळे निर्णय होत नव्हता. पण क्षणभर विचार केला. आपण नक्की कशाचा विचार करतोय? आपण भारतात एवढ्या प्रोटेक्टेड वातावरणात फिरतो का? आपण आत्ता या पदावर नसतो तर बसनं जायला एवढा विचार केला असता का? आपण नक्की काय कमावतोय आणि काय गमावतोय? आपल्याला भीती नक्की कशाची वाटतेय? आपल्या जीवाची की जवळ असलेले पैसे गमावण्याची? जिवाची वाटत असेल तर आत्ता आहोत तेही ठिकाण अनोळखीच आहे की. आणि पैसे गमावण्याची वाटत असेल तर... इथे जेवढी भीती आहे तेवढीच तिथे असणार आहे? आपल्याकडच्या शहरातला अनुभव काय आहे? लोक शहरात जास्त वास्तपुस्त करतात की खेड्यात? मग इथेही शहर सोडुन खेड्यात का जाउ नये?

१-२ मिनिटेच असा स्तब्ध उभा होतो. मनाचा वेग मोठा विलक्षण असतो नाही!! त्या मोजक्या क्षणांत कायकाय विचार येउन गेले मनात, कायापालट इतका झर्र्कन होत असेल... मी पटकन त्यांना म्हणालो.. 'ठिक आहे, कुठून बस पकडायची'....

त्या क्षणापासून पुढचे २ दिवस, सगळी आवरणं गळून पडली आपोआप. युनिवर्सीटीचा प्राध्यापक, कंपनीचा उपाध्यक्ष, कुठल्यातरी विषयातला ख्यातनाम तज्ञ वगैरे वगैरे सगळे खोटे मुखवटे विरून गेले .. माझा मी उरलो... सगळं विसरून पुन्हा एकदा गावाकडे फिरायचो तसा पाठीवर सॅक टाकून एक पाण्याची बाटली घेउन, नवीन जग बघायला, नवीन अनुभव घ्यायला, नवीन नजरेन सिद्ध झालो... नवा मी..

त्या देवमाणसांनी, मोठ्या बारकाइनं आणि काळजीपुर्वक आराखडा समजावून दिला आणि मी त्यांचा निरोप घेतला. दारापर्यंत पोचवायला गेलो तोच त्यातला एक जण मागे वळून म्हणाला. 'त्यापेक्षा आपण असं करू.... मी सकाळी ५ वाजता तुला न्यायला येतो, तुला गाडीत बसवून देइन म्हणजे काळजी नको'... मी काय बोलणार यावर..
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळी सकाळी त्या 'रॉबर्ट' बरोबर उबुंगो बस स्टेशनावर येउन पोचलो, थोड्याच वेळात अंधाराला डोळे सरावले आणि तो कोलाहल समजून घ्यायला लागलो...

साधारणतः बंगळूरूच्या मॅजेस्टीक सर्कलच्या बसस्टेशनएवढा आकार, तशीच काहीशी रचना. शिवाजी टर्मिनसला असते त्याच्या ७०% गर्दी, रत्नागिरी च्या येष्टी ष्ट्यांडावरची माणसं आणि चिपळूणच्या ष्ट्यांडावरचे वास एवढा मालमसाला एकत्र केला तर हे उबुंगो स्थानक डोळ्यासमोर येउ शकेल. वीविध आकाराच्या, प्रकाराच्या आणि रंगाच्या ८०-१०० बस लागलेल्या. सगळ्या बस खाजगी कंपन्यांच्या . सार्वजनीक वाहतूक अजुन सरकारच्या ताब्यात नाही.

तो सगळा कोलाहल बघुन, मी अनोळखी ठिकाणी आलोय असं वाटेचना. माणसं अस्सल देशी, अगदी आपल्या ष्ट्यांडावर पहाटे असते तशीच गर्दी, गर्दीत आपापली व्यवधानं सांभाळणारे तसेच पाशींजर, सराइतपणाच्या तोर्‍यातले तसेच डायवर-कंडाक्टर, लहान पोरांच्यावरती तसेच खेकसणारे मायबाप, गर्दीत पळापळ करून जागा धरणारी पोरं, तुमच्या अगदी नाकापर्यंत आणून केळी, वेफर्स, पाणी, कोक, उशी, काठ्या असे असंख्य चित्रविचित्र वस्तू विकणारे फेरीवाले, जड सामान डोक्यावरून नेताना अगम्य आवाज काढीत वाट मोकळी करून घेणारे हमाल, लगबगीने 'सुरक्षीत' जागेतुन पैसे काढुन देणार्या् तशाच अफ्रिकन महिला. सगळं जग आपल्याकडेच बघुन राहिलय अशा तोऱ्यात इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याचा अभिनय करणारे तरूणतरूणीही अगदी तस्सेच....

केवळ भाषा आणि पोषाख बदलले तर भारतातल्या कुठल्याही तालुक्याच्या गावी सहज नेवुन चिकटवावं हे चित्र.. अजिबात ओळखू येणार नाही या दोन खंडातलं अंतर.

मी कितीतेरी वेळ त्या रॉबर्ट बरोबर आलोय हे अजिबात विसरून हे सगळं पाहात बसलो होतो. तेवढ्यात तो कुठल्यातरी कंडक्टरशी बोलून, माझ्या जाण्यायेण्याचं तीकीट वगैरे व्यवस्था करून आला होता आणि त्या कंडक्टरशी 'पावने मुंबैवाले हायत, हौसेनं गावाकड चाल्लेत, जरा ध्यान ठिवा' वगैरे चालीवर बोलत होता. आता त्याला थँक्यु तरी कसं म्हणावं ते कळेना.... 'असांते' 'असांते' म्हणजे 'धन्यवाद' चा गजर करत गाडीत बसलो, आणि ठिक साडेसहा वाजता निघालो. अंतर कापायचं होतं तब्बल ४००-४५० किलोमीटर....

हाच तो रॉबर्ट, आणि पाठिमागे दिसणारं उबुंगो ष्ट्यांड

भाजून केळ खाणारे लोकं पहिल्यांदाच बघितले

गुलमोहर: 

अर्धवट, ती केळी नाहीत, ते प्लांटेन. (मटोका ) ते भाजूनच खावे लागतात. कच्चे खाता येत नाहीत.
तिथल्या लहान बाळांना पण ती देतात.
रताळी पण भाजून खातात. छान लागतात.
उगाली, गिथेरी, कोयरो खाल्ले कि नाही ?
हकुना मटाटा, वाचा ई मनेनो बाना.

मस्त माहिती देतोयस रे..फोटो टाक ना अजून
इन्डोनेशिया.थायलॅण्ड मधे पिकलेली केळी भाजून वर आणखी गुळाच्या पाकात बुडवून खातात Happy

तिथं तुम्हाला येष्टी ष्ट्यांडाची आठवण झाली, इथं वाचून आम्ही उबुंगोला पोचलो ना राव ! छान !!
<< आपल्या जीवाची की जवळ असलेले पैसे गमावण्याची? जिवाची वाटत असेल तर आत्ता आहोत तेही ठिकाण अनोळखीच आहे की.>>:P Proud Proud

मस्त, बसेस बाहेरून तरी बर्‍यापैकी दिसताहेत, आतून आरामदायी होत्या की नाही हा महत्त्वाचा प्रश्न Happy अजून फोटो टाकता आले तर पहा.

खुप मस्त....पटकन संपून गेला हा पण भाग....वाचत रहावासा वाटत होता एकदम....

दिनेशदांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद! Happy
आपण अशाच बर्‍याच गोष्टी गृहित धरुन चालत असतो.... जसे आफ्रिका खंड म्हटले की डोळ्यासमोर येतात फक्त कुपोषित आणि गरिबीने ग्रासलेली माणसं...
पण माझी एक डॉक्टर असलेली जर्मन मैत्रीण नमिबियाला इंटर्नशीपसाठी गेली होती. फार प्रयत्न करुन तिने ती इंटर्नशीप मिळवली होती.

मला प्रश्नच पडला, एवढं काय आहे त्या देशात पाहण्यासारखं, की ती एवढी हट्टाने चाललीये????
परत आल्यावर तिने तिथले फोटो दाखवले आणि मी थक्कच झाले!!! किती सुंदर देश तो...तेही साऊथ आफ्रिकेतला...मोठे मोठे रस्ते आणि निसर्गाने नटलेला... तिथे जर्मन वसाहत असल्याने बरेच बोर्ड्सपण जर्मन भाषेत लिहिलेले होते. बरेचसे जर्मन्सपण पिढ्यानपिढ्या तिथे वसलेले आहेत.....

तुमच्या लेखामुळे मला आठवलं, त्या माझ्या मैत्रीणीने-कॉन्स्टांसीने मला तिने आवर्जून काढलेल्या तिथल्या किड्यांची चित्रं दाखवली... मी म्हणाले, अगं हे किडे भारतात पण दिसतात ढिगाने... तिला फार आश्चर्य वाटलं...

तिथली माणसंच नाही तर किडेपण भारतातल्यासारखे आहेत Lol