चिमणे जग

Submitted by प्राची on 30 April, 2008 - 05:38

"भ्यांssss मम्मीके पास जाना है.....भ्यां.."
"पापाsssssपापा कहां है?"
अरे बाप रे, कसे थांबवायचे ह्यांना?? कसे गप्प करायचे??? एकदम गोंधळुन गेले मी...
घरी नुसते बसण्यापेक्शा काहीतरी करावे म्हणुन धरलेली ही नोकरी.. तशी २-३ वर्षे झाली वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करुन पण सत्राच्या पहिल्या दिवसाचा हा पहिलाच अनुभव.
अर्थात आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की एका बालवाडी वर्गाचे वर्णन आहे हे...
१० एप्रिल २००८ हा शाळेचा १ला दिवस... आपापल्या आईबाबांचे बोट धरुन ही चिमणी पिल्ले शाळेत आली. काही अगदी टगी... आरामात बाsssssय करुन वर्गात रमलेली.... तर काही गोंधळलेली...काहीनी सुर काढलेला तर काही त्याच बेतात असलेली....
कसे समजावावे ह्यांना??? आणि सांगणार तरी काय आणि कसे? काही सुचेना मला...
एकदोघांना आंजारुन गोंजारुन चुप केले, काही जणांना खेळणी दाखवुन चुप केले.... पण काही महाहट्टी... ऐकायलाच तयार नाहीत.
जमिनीवर अंग टाकुन भोकांड पसरलेले...जवळ घ्यायला, उचलायला जावे तर काबूच येईनात... एकच हट्ट... 'मम्मी के पास..'
एका मुलीचा तर भाषेचा प्रोब्लेम.. तिला फक्त तेलगुच येते... आता ती काही तरी सांगायचा प्रयत्न करत होती तिच्या भाषेत... पण मला कुठे येते तेलगु..?:)
मी आपली बोलतेय हिंदीच तिच्याशी... सगळाच गोंधळ...:)
शेवटी डबे उघडुन दिले... म्हटले आता तरी गप्प होतील... पण छे... अजुनच सुर काढला सगळ्यांनी... काही जण जे सकाळी गप्प होते त्यानीही आपला आवाज ऐकवायला सुरुवात केली... डोके फिरायची वेळ आली.
नशीब १ला दिवस म्हणुन शाळा लवकर सुटली... नाहीतर आहेत नाहीत तेवढे केसही....:)
सगळी मंडळी घरी गेली आणि माझे डोके जर शांत झाले तसे विचारचक्र सुरु झाले...
नक्की काय वाटत असेल त्या चिमण्यांना??
माझा शाळेतला १ला दिवस आठवत नाही.... पण आई सांगते की मी अज्जिबात रडले नव्हते... उलट रडणार्‍या मुलांना (मुलींना नाही हो...:))रागावुन गप्प करत होते...
लेकीने तर असे रडे-बिडे अजिबात केले नाही... उलट स्कुलबसमध्ये बसुन मस्त टाटा केला....'आज तरी येते पोचवायला' या माझ्या हट्टाला 'तुला नाही बोलावले, तु नको येउस..' असे उत्तर देउन मलाच निरुत्तर केले..
त्यामुळे, मुले का रडतात किंबहुना मुले रडतात हेच मला माहित नव्हते..आज या पिल्लांमुळे मला विचार करायला भाग पाडले..
एकतर आपले आईबाबा असे लांब चालले आहेत आणि एका 'मॅम' नामक अनोळखी व्यक्तीकडे आता बर्राच वेळ आपल्याला राहायचे आहे ही भावनाच किती दु:खदायक असेल त्यांच्यासाठी....:( त्यातुन आजुबाजुलाही आपल्यासारखीच बाळे रडताना पाहुन या दु:खाची जाणीव अजुन तीव्र होत जाते...मग काय्...करा भ्यांssssssss Happy
'रोज या वेळेला आपण किती छान झोपलेलो/खेळत्/दुदु पीत/ टि.व्ही बघत असतो... ते सोडुन इथे कुठे घेउन आलेत आपल्याला... बर आलेत ते आलेत आता आपण चालले टाटा करुन... आत्ता किती छान कार्टुन चालु असेल... मी कधी बघणार ते???'
ओहो....रोजचे रुटिन बदलले तर आपणही नाही का चिडचिडे होत..?
महत्वाचे म्हणजे आपले घर, आपले घरचे यांबाहेरही काही जग आहे याची नव्यानेच होणारी जाणीव आणि या अनोळखी जगात आपण एकटेच आहोत अशी समजुत... यातुनच रडे फुटत असेल ना???
अजुनही असतील काही कारणे....वेगवेगळी.... काय माहित????
आज २० दिवस झाले .... आता मुले रमली आहेत बरीच... शाळेत आनंदात येतात्....पालक सोडुन निघाले की पाsssर ते दिसेनासे होईपर्यंत बघत राहतात त्यांच्या दिशेकडे... डोळ्यांत कडेला थोडे पाणी जमा झालेले असते, पण 'मॅम' कडे बघुन गोड हसत ते पाणी पुसले जाते...
'शाळेत कित्ती मज्जा येते ना... खेळणी आहेत्...ससे आहेत, बदकं आहेत... आणि मॅम पण कित्ती माया करतात...मांडीवर घेतात, भरवतात, खेळताना पडले तर 'गिलीगिली छूssss' करतात.खाऊ देतात्...गाणी-गोष्टी सांगतात आणि हे सगळे होईपर्यंत पापा येताच न्यायला...'
आता सगळे खुष आहेत्...'ती' तेलगु मुलगी अजुनही तेलगुच बोलते आणि मी हिंदीच, पण आता कळते आम्हांला एकमेकांची भाषा.. एक 'साहेब' आहेत जे माझ्या मागेमागे फिरत राहतात... जरा नजरेआड होऊ देत नाहीत... चुकवुन मी गेलेच तर रडुन गोंधळ.....'मैं चली जाऊंगी' या धमकीवर सगळे काही करायला तयार......:)
मॅमही खुष आहेत... डोके जागेवर शाबुत आहे आणि केसही.....:)
आणि गम्मत म्हणजे... शाळेतल्या आयांना 'बुआ','दादी' बनवुन या चिमण्यांनी आपले एक घरच बनवले आहे इथे....

आपले घर....आपली शाळा.....आपले एक जग.... चिमणे जग......

गुलमोहर: 

क्युट लिहिलय. जॉब आता मजेत चाललाय तर Happy
-प्रिन्सेस...

गोड लिहिलं आहेस Happy
या वयाची मुलं घरात नसते उद्योग करायला लागतात म्हणून पालक त्यांना अडकवायला बघतात आणि या चिमण्यांना तो त्यांचा 'घोर अपमान' वगैरे वाटतो.. मग निषेध म्हणून रडणं, डबा न खाणं वगैरे..
पण मुलं कसली ऍडजस्टेबल असतात ना? Happy ४-५ दिवसात रमायला लागतात नवीन वातावरणात, आणि हीच का ती रडणारी मुलं असा प्रश्न मॅमना पडतो! हो ना? Happy

प्राचे...... घाबरवू नकोस गं मला Happy .. आता जूनपासून माझ्या दोन वर्षाच्या लेकीला घालायचंय शाळेत... बेबीसिटींगमध्ये कोणी रडलं तर ही बया त्यांच्या चेहर्‍याकडे वाकून वाकून बघते, मग ती मुलं अजूनच मोठा भोंगा काढतात... शाळेत काय करील देव जाणे. अश्या मांडीवर बसवणार्‍या गोड 'मॅम' भेटल्या तर मग बघायलाच नको.... Happy

गोडच लिहिलयंस ग.
मला एकदम माझ्या छकुल्यांना सोडायला मी शाळेत जायचे ते आठवलं. मी समजावून सांगत असायची, 'शाळेत रडायचं नाही. मिम्मी (मम्मी) घ्यायला येते.'
तर माझा लेक रस्ताभर बहिणीला सांगत असायचा ते एकच वाक्य ...'शालेत ललायचं नाई.. मिम्मी घ्यायला येत्ते..' अन हे सांगताना स्वत: पण रडत रडत जायचा रस्ताभर...
अन शाळेतला त्यांचा गोंधळ बघून माझ्या डोळ्यातून पाणी. पाय निघत नसायचा. मग आईचं रागावणं, 'चल निघ आता. अशीच मी तुझ्यावेळी रडले असते तर इतकी शिकली असतीस का आज?'
आता आठवून मजा वाटते. Happy

मला पण तुमच्या शाळेत यायचे आहे..!!!!!!!!!! ........ भ्यां ..........भ्यां ..........भ्यां ..........भ्यां ..........भ्यां ........

चांगल लिहीलय.
मला पण माझ्यामुलीचा पहिला दिवस आठवला. तिला शाळेत सोडल्यावर तिने थोडे भोकाड पसरले पण तेथील मिस म्हणाली तु जा म्हणुन. तिला तेथे सोडताना मलाच अगदी कसेतरी झाले होते. शिवाय भाषेची अडचन. आम्ही घरात मराठी शिवाय काही बोलत नाहीत आणि घराबाहेर इंग्रजीशिवाय दुसर काही चालत नाही. मग मिस ला अगदी su, she, pani असे लिहुन त्यासमोर त्याचा अर्थ लिहुन दिला. लगेच रुळली. दुसर्या दिवशीच माझी शाळा कधीये असा प्रश्न.

प्राची ......मस्तच लिहिलय.
मलाही माझ्या मुलाच्या शाळेचा पहीला दिवस आठवला. तो ही रडला नाही कधी.
kedarjoshi...मी पण त्यच्याबरोबर लीस्ट दिली होति. तुमच्यासारखीच....मराठी to Enlish
फुलरानी

छानच लिहिलय.
मी लहान होतो तेव्हा इतक्या लहान वयात शाळेत घालत नव्हते.
त्यावेळी बालवाडीत साधारण ५ वर्षाच झाल की घालत असत.
मला माझ्या शाळेचा पहिला दिवस अजुन आठवतोय.
मॅडम कोण ते आता बिलकुल आठव्त नाहिये. पण आजुबाजुला पोरानी आणि पोरीनी रडुन गोंधळ घातला होता नुसता.
आईने सांगितलेल्या सुचनेनुसार मी रडत नव्हतो पण आई बाहेर उभी असेल म्हणुन खिडकीतुन दिसते का ते बघत होतो आणि दिसत नव्हती म्हणुन हळुच डोळे पुसत होतो. फार मोठ मोठ्याने नाही पण हळु हळु कोणाला नकळत रडत होतो.
पण बाईच्या ते लक्षात आल होतच. Happy
त्यातच माझी एक मैत्रीण (जी आमच्या घराशेजारीच रहायची) वर्षा तिने मात्र सॉलिड रडणं सुरु केल होत. कधी तिला बाई कडेवर घेवुन खेळत होत्या तर कधी त्या आमच्या शिपाई बाई. पण ही तर बिलकुल थांबत नव्हती. मग बाई तिला घेवुन माझ्याकडे आल्या आणि म्हणत होत्या की बघ हा रडत नाहिये तु पण असच शांत बस अस काहिस.
सगळ नीट आठवत नाहिये पण काहितरी खेळणी दिली होतीत तेव्हा बरेच जण शांत झाले होते. त्या वर्षाने मात्र स्टार्ट टु एन्ड अधे मधे खुपच शोर्ट ब्रेक घेत रडण्याचा कार्यक्रम सुरुच ठेवला होता. Happy
मस्त आठवण आली आज. त्यानंतरचे दिवस आठवत नाहियेत पण हा पहिला दिवस मात्र चांगला लक्षात राहिलाय. Happy

प्राची , खुप छान लिहिलय ... Happy

धन्यवाद मंडळी.
झकास, शाळेतले दिवस नाही आठवले तरी चालेल,पण जे काही शिकलास ते तरी लक्षात आहे ना?? Happy

प्राची...गोड लिहिलं आहेस गं....!! माझ्या पिल्लांना सोडून जायची ते दिवस आठवलेत.

मस्त लिहीलय. Happy

माझं पिलु मस्त टाटा करुन जातं अगदी पहिल्या दिवसापसुन. पहिल्या दिवशी चेहरा अगदी एवढासा केला होता पण फिरभी ओके...केदार जोशींच्या मुलीसरखीच आमची अवस्था होती.
मला माझे दिवस आठवले. मस्त लिहिलं आहेस. हा जॉब करण्यासाठी मला दुसरा जन्म घ्यावा लागेल. Happy

प्राची, मस्तच लिहिलयस. दु:खी असतात तेव्हा निषेध नोंदवतात, रडून मोकळी होतात. मुलं किती ऍडजस्टेबल असतात नाही? विसरून मग रमतात म्हणजे 'नक्की' रमतात. आपण मोठे होतो तेव्हा हे सगळं आत आत दाबून, लपवून ठेवायला शिकतो... रमलोय ह्याचं नाटक करायला शिकतो. छ्छे, मोठं होणच नको!

माझ्या लेकाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी तो नाही, मी रडले होते घरी येऊन.... तो रडला नाही म्हणून. एकदाच मागे वळून टाटा केलन आणि गेला सुद्धा आत उड्या मारत. पुढचे दोन तास नवरा मला समजावत होता... Happy अजून चिडवतात ते दोघं मला त्यावरून. परवाच त्याच्या यूनिव्हरसिटीच्या पहिल्या दिवशी दुष्टासारखा 'आई... आई...' असं नाटकीपणे गळ्यात पडून खोटं रडलाही!

मजा वाटली वाचायला.
मला माझे दिवस आठवले. मला बर्‍यापैकी आठवतात नी त्याच्यापेक्षा ही रडी होती ही सारखे आठवून (नावे ठेवणे) प्रकार चालायचा अजून बाकीच्यांचा. रडण्यात जबरी होते. अगदी चार तास non-stop. आणि एकच वाक्य तोंडी.. मला झोपायचेय.. मला झोपायचेय. teacher ने मग झोपायला नेले तरी रडत मी उठून बसून मला झोपायचेय एवढेच म्हणायचे. (का ते देवालाच माहीती .. इती आई. कारण मी चौदा तास झोपायची अगदी ७ वर्षाची होईपर्यन्त ):). teacher ने हेही विचारले की हीची झोप पुरी होत नाही का?(चौदा तास झोपून?). आणि कायम ही रडारड शाळेत पहीले चार तास,अगदी third grade पर्यन्त.. Happy

आत्ता मनाच्या खुप जवळ आनि 'सॉफ्ट कॉर्नर' असलेला विषय त्यामुळे सगळे रीलेट करता आले ! आवडले.
माझी मुलगी पण पहिल्यांदा थोडी रडायची. पण आता इतकी रुळली आहे की घरी पण काही झाले की एकदम बंगलोर स्टाइल मधे 'अय्यो' करते. Happy शिवाय मला कधी मम्मा तर कधी चक्क 'अम्मा' म्हणते. Sad

प्राचे, गोड लिहिलयंस गं!! मज्जा आली!! मी कधीही रडले नाही. पण माझ्या लहान बहिणीला आज्जी ओरडुन न्यायची ते आठवलं!! Happy

प्राची, खूपच छान लिहिलेस !!! मी सुध्दा शाळेचे पहिले काही दिवस मुसमुसून रडायचे. एकएक येणार्‍या मुलाला आत घ्यायला बाई दरवाजा उघडत तेव्हा आधी आलेली मुले दाराकडे धाव घेत असू, आई बाहेर कुठे दिसते का पहायला (वर्गाच्या दाराला ग्रील्स होते पण आमच्या उंचीच्या वर होते). मग हताश होऊन आम्ही खिडकीवर चढून बसत असू, तिथून आई दिसते का बघायला. मग माझे लक्ष divert करायला बाईंनी लाकडी लाल रंगाच्या डुलणार्‍या घोड्यावर बसवले पण झाले उलटेच पहिल्याच बैठकीत मी तो घोडा एवढा जोराने हलवला, की तो मागे उलटला आणि मी डोक्यावर आपटले. पुन्हा भ्याSSSSS ! नंतर आमच्या वाडीतील १ली, २रीच्या मुली मला त्यांच्या मधल्या सुट्टीत हिरवी बडीशेपेची छोटुश्शी काडी हळुच ग्रील्समधून बोट घालून द्यायच्या मग मला आई नाही तर निदान वाडीतील मैत्रिणी तर दिसतात यात समाधान वाटे. (अजून मी आईवेडी आहे !)

खुप छान वाटले वाचुन, मस्त आहे तुमचा जॉब.
मला माझे बालवाडितले दिवस आठ्वत नाहित पण माझ्या लहान भावाने आजीला खुप त्रास दिला होता.
माझी लेक आजिबात रडली नाही शाळेत जाताना उलट उड्या मारत जायची शाळेत पण पावसाच्या दिवसात जमीन ओली असते म्हणुन चार महिने या पठ्ठीने उभे राहुन काठले होते शाळेतले तीन तास.

माझा अनुभव काही वेगळाच होता. बछडी ला शाळा इतकी आवडली की रविवारि देखिल शाळेत जायचा हट्ट. Happy मग काय नेउन दाखवावे लागले की शाळा बंद आहे.