धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १

Submitted by अर्धवट on 26 August, 2010 - 00:18

आजवर कामाच्या स्वरूपामुळे अनेक ठिकाणी फिरण्याचा योग आला. अजूनही येतच आहे, पायाला चक्र लागलंय कधी थांबणार माहिती नाही. ताकद आहे तोवर फिरतोय, घरट्याची ओढ वाढलीये, भरारीची झेपही. नवीन मुलूख बघतोय, अनवट वाटा शोधतोय, नवीन माणसं धुंडाळतोय. चालूच आहे माझा शोध आणि ‘माझा’ शोध.

माझे सगळे प्रवास तसे लहानसे असतात, दहा-पंधरा-वीस दिवस फारतर एक महिना. आतापर्यंतची सगळी भ्रमंती, सगळे प्रदेश तसे नेहेमीच्या पठडीबाहेरचे, इंग्लंड अमेरिकेत आम्हाला कुणी बोलावत नाही. तिथे जाण्याची तीव्र इच्छा एकेकाळी होती तशी आता जाणवत नाही, तिथे जायचं नाहीच असेही नाही. (‘२२१बी, बेकर स्ट्रीट’ वर मात्र अजूनही जायचंय एकदा तरी ) अजूनही खूप भ्रमंती होणार आहे, सुरुवातीचा ‘लाजते पुढे सरते, फिरते’ चा काळ आता गेलाय. आता मजा वाटतेय... चष्मा काढून बघितलं तरी धूसर नाही दिसत आता.

जगात कुठेही गेलो तरी रंगपेटी सारखीच, तुम्हाला कुठला खडू मिळणार हा शेवटी ‘गेम ऑफ चान्स’. कधी काळा, कधी करडा, कधी छान गुलाबी, कधी शांत निळा. कुठलाही खडू हाताशी आला तरी, बाकीचे रंग त्याच्या शेजारीच असतात हे विसरायचं नसतं. कित्येक वेळा आपलं रंगाकडे लक्ष जातं, प्रत्येक रंगातल्या समान स्निग्धतेकडे जातच नाही पण ती असतेच ना. जाणवतो हा समान धागा या सगळ्या रंगांमध्ये कधीतरी. असो, पाल्हाळ आवरतो नाहीतर रूपक होऊन जायचं.

आजच्या टंकनकळा आहेत, एका नवीन रंगपेटीसाठी. निमंत्रीत प्राध्यापक म्हणून आफ्रिकेतील एका विश्वविद्यालयात यायचा योग आहे. मला त्यांच निमंत्रणपत्र आलेलं, मुद्दाम कुणा मित्रांना दाखवलेलं नाहीये, माझा माझ्या मित्रांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचे त्यावरचे कुत्सित कटाक्ष, आणि हलकट्ट हास्य, हे कुणाचाही आत्मविश्वास गमावण्यासाठी पुरेसे आहेत. तर ते एक असो. मी ह्या विश्वविद्यालयात तात्पुरता का होईना पण प्राध्यापक म्हणून दाखल झालो आहे.

आफ्रिकेतला गरीब देश असल्यामुळे विजा, अर्ज, विनंत्या वगैरे भानगड नाही, अगदी ‘येवा, टांझानिया आपलाच असा’ हा घोष सुरुवातीपासूनच ऐकू येतोय. इथे या, साधा अर्ज भरा, सही करा, थोडे डॉलर द्या, लगेज विजा. त्या इमिग्रेशन वाल्या महिला अधिकाऱ्याने, गोड हसून ‘वेलकम’ म्हणाल्यावर डोळे अंमळ पाणावले. कुठल्याही गणवेशधारी अधिकाऱ्याला, सामान्य जनतेकडे बघून हसताही येतं ही भारतात केवळ अफवाच. थोडक्यात काय, तर जगाकडे बघून आपलं ते सुंदर मोहक आफ्रिकन हास्य करत लोकं स्वागताला उत्सुक आहेत.

१०-१२ तासाचा कंटाळवाणा प्रवास करून गेल्यावर, नेहेमीचे कंटाळवाणे सोपस्कार करायला अगदी जीवावर येत होतं. सामान वगैरे शोधाशोध झाल्यावर, स्थानिक चलन घ्यायला गेलो आणि पहिला सुखद धक्का, टांझानियन शिलीन्गाची भलीमोठी गड्डीच घेऊन बाहेर पडलो, चक्क साडेसात लाख शिलिंग मिळाले अवघ्या पाचशे डॉलरला. अगदी खरं लक्षाधिश झाल्यासारखं वाटलं काही क्षण.

बाहेर येऊन विमानतळावर जरा शोधाशोध करतो तर कुणीच माझ्या नावाची पाटी घेऊन दिसेना. मी हल्ली या प्रकाराला वैतागणे सोडून दिले आहे, तरी जरा अचंबाच वाटला. सगळ्या जपानी नावांच्या पाट्या, दोनचार अमेरीकन, ओळखीचे काहीच दिसेना.

त्यातल्यात्यात एका ओळखीच्या पाटीकडे नजर गेली, चांगला हसतमुख कार्यकर्ता होता, बहुतेक त्याने माझा फोटो आधी बघितला असावा किंवा माझ्या चेहेर्‍यावर केवळ ड्रायवर, रिक्षावाले यांनाच ओळखू येणारा, एक यडबंबु सारखा भाव गोंदून ठेवला असावा. पण तो लगबगीने माझ्याजवळ येऊन पाटीकडे बोट करू लागला. नीट वाचलं आणि दचकलोच. माझा नकळत का होईना पण एवढा मोठा सन्मान बघून मला शब्दच सुचेनात. मनात दणकून खुश झालो, म्हणालं चला सुरुवात तर चांगली झाली. आता ह्या देशात कुणाची माय व्यालीये माझ्या वाटेला जायची.

धक्का ओसरल्यावर मी विचारलं, ही पाटी कुणी लिहिलीये, तेव्हा त्यानं मला अत्यानंदानं आणि अभिमानानं माझ्या तिकीटाची प्रत दाखवली, त्यावरच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या विमानतळाचं नाव त्यानं माझंच नाव समजून अगदी न चुकता पाटीवर लिहून आणलं होतं. मी निरुत्तर. हे बघा काय ते...

क्रमशः

नमस्कार माबोकर्स,

काहि दिवसांपुर्वी एक लेखमाला लिहिली होती माझ्या इराण प्रवासावर. बर्‍याच माबोकरांना ती आवडली होती. पण खुप नविन होतो तेव्हा. टंकताही येत नव्हतं नीट.
आता ही टाकतोय माझ्या आफ्रिकाभ्रमंतीवर. मागच्याच आठवड्यात इतरत्र प्रकाशीत केली होती. पण माबोवर टाकायची राहिली होती काहि तांत्रीक अडचणींमुळे.
आवडल्यास आणि विशेषतः काहि सूचना / सुधारणा असल्यास जरूर कळवा.

गुलमोहर: 

प्रवासाच्या सुरुवातीच्या विमानतळाचं नाव त्यानं माझंच नाव समजून अगदी न चुकता पाटीवर लिहून आणलं होतं <<<<< हे हे हेहे
भारीच आहे नाव.

जगात कुठेही गेलो तरी रंगपेटी सारखीच, तुम्हाला कुठला खडू मिळणार हा शेवटी ‘गेम ऑफ चान्स’. कधी काळा, कधी करडा, कधी छान गुलाबी, कधी शांत निळा. कुठलाही खडू हाताशी आला तरी, बाकीचे रंग त्याच्या शेजारीच असतात हे विसरायचं नसतं. कित्येक वेळा आपलं रंगाकडे लक्ष जातं, प्रत्येक रंगातल्या समान स्निग्धतेकडे जातच नाही पण ती असतेच ना. >>> मस्तच लिहिलंय.
नाव तर खूप भारी.. लवकर पूर्ण करा लिहून Happy

प्रवासाच्या सुरुवातीच्या विमानतळाचं नाव त्यानं माझंच नाव समजून अगदी न चुकता पाटीवर लिहून आणलं होतं <<<<<
भर दूपारी कामाच्या वेळेत वाचत होतो. फोटो बघून राक्षसा सारखा खदाखदा हसलो.

साहेबाची बोलणी खाता खाता बाचलो

>>जगात कुठेही गेलो तरी रंगपेटी सारखीच, तुम्हाला कुठला खडू मिळणार हा शेवटी ‘गेम ऑफ चान्स’. कधी काळा, कधी करडा, कधी छान गुलाबी, कधी शांत निळा. कुठलाही खडू हाताशी आला तरी, बाकीचे रंग त्याच्या शेजारीच असतात हे विसरायचं नसतं. कित्येक वेळा आपलं रंगाकडे लक्ष जातं, प्रत्येक रंगातल्या समान स्निग्धतेकडे जातच नाही पण ती असतेच ना. >>
फार फार छान Happy

छत्रपती शिवाजी महाराजांचा, विजय असो!!! Happy

पुढे लिहा लवकर...
(खरं तर, दुसरी लिंक बघुनच इथे आलोय. आता तिथे जातो... Wink )

Pages