निमगिरी - हडसर - शिवनेरी ... !

Submitted by सेनापती... on 19 August, 2010 - 08:30

जानेवारी महिन्यात माणिकडोह - जुन्नर परिसरात भटकंतीसाठी गेलो होतो. उदिष्ट होते किल्ले शिवनेरी आणि जवळच असलेले हडसर आणि निमगिरी हे किल्ले. गेल्या सुट्टीमध्ये आम्ही जास्त बाइकनेच फिरलो. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बाइक घेउन जायची, मग पुढे चढाई सुरु. सकाळी माळशेज घाटाच्या रस्त्याने निघालो. कल्याण ते मुरबाड रस्ता एकदम मस्त आहे. सकाळी फारसे ट्राफिक नसते आणि वातावरण पण एकदम मस्त. आमच्या अत्यंत महत्वाच्या अश्या 'नाश्ता ब्रेक'साठी मुरबाडला थांबलो आणि मग गाड़ी दामटवली. उजव्या हाताला सिद्धगड़ आणि गोरख-मछिन्द्र आमची साथ करत होते. टोकावडे गाव गेल तसा समोर नाणेघाट दिसायला लागला आणि त्यामागे जीवधन साद घालत होता. सकाळी ९ ची वेळ. माळशेजघाट अतिशय सुंदर दिसत होता. भैरवगड़ची डाइक भिंत आता डोक्यावर होती पण ऊन समोरून येत असल्याने काही फारसे फोटो काढला आले नाहीत. माळशेज घाटात लागणारा छोटा बोगदा पर करून आम्ही जरा वेळ थांबलो. अलिकड़े असणार्‍या मंदिरापाशी बोर विकणारी गावातली माणसे, विकत घेणारे आणि माकडे ह्यांचा एकच गलका होता. म्हणून तिकडून लगेच निघालो, ते पण बोर न खाता. डावीकडे आजापर्वत, हरिश्‍चंद्रग़डाचा थरारक कोकणकडा दिसत होता. घाट संपला आणि पुढे खिरेश्वर धरण लागले.

आम्हाला जायचे होते आधी किल्ले निमगिरी आणि मग तिकडून हडसरला. हवा तसा नीरव शांततेचा आनंद शनिवारी शिवनेरीला मिळणे अशक्य होते. तो मिळणार होता आडवाटेवरच्या ह्या किल्ल्यांवर. निमगिरी गावच्या वाटेला लागलो. मध्ये एका गावातल्या माणसाला रस्ता विचारला. बाइक नीट जाइलना अस नक्की करून घेतल. तो बोलला 'टेंशन घेऊ नका. आख्खा डांबरी रास्ता आहे. बिनधास्त जा.' पुढे रस्ता कसा होत ते सांगायला नकोच. ताशी १० की.मी.च्या पुढे गाड़ी न्यायचा प्रयत्न जर मी किंवा आदित्यने केला असता तर, एकतर आमची तरी वाट लागली असती किंवा गाडीची तरी. माझी आणि आदित्यची 'स्लो-बाईकिंग' रेस सुरु होती. त्यारस्त्याने मध्ये लागणारी चढण पार करत पलीकड़े उतरून अखेर निमगिरीच्या पायथ्याला पोचलो. पहिल्याच घरासमोर गाड्या लावल्या. गावातली लोक इतकी अथत्यशील असतात. त्या घरातल्यांनी आम्हाला पाणी दिले, जेवायला आत बसा असे सांगितले. अगदी किल्ल्यावर जाताना आम्ही आमचे सामान सुद्धा तिकडेच ठेवून गेलो.

निमगिरीचा किल्ला हा जोड़किल्ला आहे. गावातून निघाल की शेता-बांधाच्या मधून थेट खिंडीच्या दिशेने जायला लागले की वाट मस्त बाजरीच्या शेतामधून जाते. जोड़किल्ल्यांच्या मधल्या खिंडीमधून उजव्या बाजूने वर जायला स्पष्ट वाट आहे. उजवीकड़े दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. काही मोडल्या आहेत, काहींवर मातीचा घसारा आहे. पण चढून जाऊ शकतो. अगदी वरपर्यंत कोरलेल्या पायऱ्या असल्याने वाट चूकायचा कुठेच प्रश्न नाही. किल्ल्याचे प्रवेशद्वार पडले आहे. पण ह्या ठिकाणी आहे किल्ल्याचा 'फोटो स्पॉट'. तिकडे आम्ही थोडी फोटोग्राफी केली आणि थेट वर पोचलो. निमगिरी चढ़ताना पाठीमागे शहाजीसागर जलाशयाचे म्हणजेच माणिकडोहचे विहंगम दृश्य दिसत राहते. त्याच्या प्राश्वभूमीवर किल्ले शिवनेरी आपल्याला खुणावत राहतो. ग़डावर मध्यभागी एक उंचवटा आहे. त्याच्या चारही बाजूने खुप पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. काहींमधले पाणी पिण्यायोग्य आहे. एक पडके मंदिर आहे आणि त्यासमोर थोड़े वरती काही समाधीचे अवशेष विखूरलेले आहेत.

पायऱ्या उतरून पुन्हा खिंडित आलो आणि समोर असलेल्या जोड़किल्ल्यावर गेलो. तेथेसुद्धा पुन्हा कोरीव पायऱ्या आणि शत्रूला चकवा देइल अशी प्रवेश रचना. मी सर्वात पुढे होतो आणि चकणार सुद्धा होतो. पण मला डावीकडे वर जाणाऱ्या पायऱ्या आधी दिसल्या. उजवीकडच्या बाजूने एक थोडी मळलेली वाट पुढे जाते. समोर किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे असे वाटते, तसे बुरुजाचे बांधकाम सुद्धा आहे. पण समोर गेलो की काहीच नाही. रस्ता बंद. डावीकडे वर जाणाऱ्या पायर्‍यांनी वरती गेलो, तिकडून परत खाली उतरून आलो आणि पायथ्याच्या मार्गाला लागलो. किल्ला चढून आणि बघून उतरायला साधारण तीन-साडेतीन तास पुरले.

पायथ्याला पोचलो तेंव्हा दुपारचे ३ वाजून गेले होते. आम्ही पुन्हा आमचा एक छोटासा फ़ूड ब्रेक उरकला आणि हडसरच्या दिशेने निघालो. नागमोडी वळणा-वळणाचा रस्ता आता जलाशयाच्या कड़े-कड़ेने जात होता. मध्येच ख़राब तर मध्येच सुसाट गाड़ी पळेल इतका छान. हडसर गावात पोचलो, एके ठिकाणी गाड्या लावल्या आणि फटाफट निघालो. अंधार पड़ायच्या आत आम्हाला वर जाउन पाणी आणि राहती जागा शोधणे आवश्यक होते. गावाच्या मागून वर निघालो आणि वरच्या पठारावर पोचलो. ५ वाजून गेले होते आणि हातात अजून फार तर दीडतास होता. वरती जायला ३ मार्ग आहेत. एक पाण्याची वाट तर दूसरा बांधीव पायर्‍यांचा मार्ग. याशिवाय उजव्याबाजूने थेट तटबंदीवरून सुद्धा चढून जायची वाट आहे. पण आज आम्ही तो मार्ग घेणार नव्हतो. पाण्याच्या वाटेने तासाभरात वर जाता येते पण खडा चढ आणि थोडा घसारा आहे. तर पायर्‍यांचा रस्ता पाण्याच्या वाटेच्या बरोबर विरूद्ध दिशेने वर जातो. त्यासाठी डावीकडच्या टेकाडाला वळसा मारावा लागतो. आम्ही त्या टेकाडावर तिरप्या रेषेत वर चढत जाउन वळसा मारून पायर्‍यांकड़े पोचलो.

हडसरच्या बांधीव पायऱ्या खुपच सुंदर आहेत. आणि त्या अश्या बांधल्या आहेत की समोर येईपर्यंत काही दिसत नाहीत. साधारण १००-१५० पायऱ्या चढून गेलो की समोर तटबंदीची भिंत लागते. दरवाजा एकसंध व कोरीव आहे आणि वरच्या बाजूला डावीकड़े लपलेला आहे. तिकडून आत गेल की आतली तटबंदी लागते. एकसंध पाषाणामधून कोरुन काढलेल्या ह्या पायऱ्या म्हणजे दुर्गबांधणीमधला एक उत्तम नमूना आहे. गेल्या काही वर्षांपासून मला हडसरला याकारणासाठी यायचे होते. आम्ही ती कारागिरी पाहून पुरते भारावलो होतो.

शेवटच्या टप्यातल्या पायऱ्या चढून आम्ही वर पोचलो तेंव्हा सूर्य अस्ताला टेकत होता. अगदी वेळेत आम्ही ग़डावर पोचलो होतो. समोर स्वच्छ पाण्याचे टाके आणि त्याच्या मागे दुरवर सफ़ेद रंगाचे शिवमंदिर उठून दिसत होते. पचिमेकड़े क्षितिजावर कडा लालसर होत जात होती आणि त्याचे प्रतिबिंब माणिकडोहामध्ये चमकत होते. आम्ही आमचा मोर्चा मंदिराकड़े वळवला.

आमचा आजचा मुक्काम तिकडेच असणार होता. गडावर गुहा आहेत पण त्या राहण्यायोग्य नाहीत. मंदिरात पोचलो आणि बघतो तर काय ... सगळीकड़े गुरांचे शेणच शेण. उजवीकड़े हनुमान, पवनदेव आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या, तो भाग मात्र स्वच्छ होता. पण आम्ही पूर्ण मंदिर स्वच्छ करून घेतले. आता जागा राहण्यायोग्य झाली होती. सगळीकड़े अंधार पसरत होता. माझ्या मनात एक विचार घर करत होता, जो काही वेळात १०० टक्के ख़रा ठरणार होता.

८ च्या आसपास आम्ही जेवण उरकले आणि मंदिराबाहेर गप्पा मारत बसलो. स्वच्छ चांदणे पडले होते पण हवी तशी ठंडी मात्र नव्हती. साधारण १० नंतर आम्ही सगळेजण आडवे झालो. पडल्या- पडल्या ऐश्वर्या गुडुप झाली होती तर आदित्य आणि अमृता निवांत पहुडले होते. माझ्या मनात मात्र काही वेळात सुरु होणाऱ्या मजेशीर गोष्टीबद्दल विचार सुरु होते. मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशत मी सुद्धा पहुडलो होतो. रात्री १२ च्या आसपास अचानक घंटीचा आवाज आला... आणि अपेक्षित होते तेच झाले. एक गाय मंदीराच्या पायऱ्या चढून आत मध्ये आली. आम्हाला बघून ती चांगलीच दचकली होती. आम्ही तिच्या घरात होतो. माझ्या अगदी समोर गाय उभी होती आणि अमृता तिला बघून ताड़कन उठली होती. ऐश्वर्याने एक वेळ उठून गाईकड़े पाहिले आणि माझ्या झोपेपेक्षा हे महत्वाचे नाही असे ठरवून ती झोपली, ती सकाळपर्यंत उठली नाही. आदित्य सुद्धा निवांत झोपून होता पण बहुदा त्याला काही नीट झोप येत नव्हती. मला आता झोप यायला लागली होती पण अमृता काही मला झोपू देईना. अखेर मी कधी झोपलो मलाच माहीत नाही. बहुदा अमृता काही रात्रभर झोपलीच नाही. रात्रभर रवंथ करणार्‍या गाईला ती कंपनी देत बसली होती. बिचारी गाय इतकी घाबरली होती की ती रात्रभर बसलीच नाही.

पहाटे मला जाग आली ती तिच्या बाहेर जाण्याच्या आवाजानेच. मंदिराच्या दरवाजातून बाहेर पाहिले तर थेट समोर सूर्यनारायण उगवत होता. अमृता जागीच होती. अक्षरशः घोडे विकून झोपलेल्या ऐश्वर्या आणि आदित्यला जागे केले. फटाफट आवरले आणि किल्ला बघायला निघालो. आज आम्हाला हडसर किल्ला पुर्ण बघून १२वा. पर्यंत शिवनेरी गाठायचा होता. गड़ बघताना मध्यभागी असलेल्या उंचवटयाला प्रदक्षिणा मारावी. शिवमंदिराच्या बाजुलाच एक मोठा पाण्याचा तलाव आहे.

तिकडून थोड पुढे गेल की उतारावर जमिनीखाली बांधलेल्या कोरीव गुहा लागतात. गुहेचे तोंड चुकू नये म्हणुन शक्यतो कडेच्या जवळून चालावे. गुहेचे मुख वक्राकार असून आत गेल्यावर समोर, डावीकडे आणि उजवीकडे असे ३ भाग आहेत. प्रत्येक भागात आतल्या बाजूला २०-२० फुट लांब-रुंद आणि १०-१५ फुट खोल अशी २-३ कोठारे आहेत. यात बहुदा धान्य, शस्त्र आणि ग़डावर लागणारे सर्व सामान साठवण्याची सोय असावी. सध्या ह्या गुहा वाइट स्थितीत आहेत. तिथून पुढे गेले की गडाच्या उत्तर टोकावर तूटका बुरुज आहे. बाकी गडावर कुठलेच बांधकाम शिल्लक नाही. वाड्यांचे जोते मात्र तेवढे दिसून येतात. एक गड़फेरी पूर्ण करून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो.

हडसरच्या बांधीव पायऱ्या उतरताना मध्येच मी आणि आदित्य धावायला लागलो. आम्ही त्या पायऱ्या अक्षरशः १-२मी. च्या आत उतरलो. आणि मग खाली येउन पाय मोकळे करत बसलो. पाय कसले सॉलिड भरून आले होते. आल्या मार्गानेच हडसर गावात आलो आणि पुन्हा आमच्या बाइक्स घेउन शिवनेरीच्या दिशेने सुटलो. आता शहाजीसागर जलाशयाची भिंत दिसू लागली होती. ती पार करून आम्ही जुन्नरचा शिवाजीचौक गाठला. शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला त्रिवार मुजरा करत शिवनेरीचा दरवाजा गाठला.

किल्ल्याचा पहिला दरवाजा समोर येताच माझ्या डोळ्यासमोर इतिहास उभा राहू लागला. किल्ले शिवनेरी - आपल्या शिवबांचे जन्मस्थान. जेँव्हा राजेशहाजी जिजाऊ मासाहेबांना घेउन येथे आले तेंव्हा निजामशाहीचे सरदार, जिजाऊंचे वडिल लखुजी जाधवराव शहाजीराजांच्या मागावर होते. खरे तर शिवनेरी हा निजामशाहीचा किल्ला. पण किल्ल्याचे किल्लेदार विश्वासराव हे शहाजीराजांचे व्याही. थोरल्या संभाजी राजांचे सासरे. किल्ला निजामशाहीचा, त्यामुळे जिजाऊ मासाहेबांना येथल्यापेक्षा सुरक्षित जागा नव्हती. अखेर शहाजीराजे जिजाऊ मासाहेबांना शिवनेरीच्या हवाली ठेवून गेले आणि फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी शिवरायांचा जन्म झाला. मनातल्या मनात त्यांना वंदन करत आम्ही शिवनेरीच्या पायऱ्या चढायला लागलो. आता सरकारने संवर्धनाच्या नावाखाली इकडे सगळे बांधकाम नवीन केले आहे. शिवाय रविवार असल्याने खुपच गलका होता. त्यामुळे आम्हाला ना हवा तसा गड बघायला मिळाला ना हवे तसे फोटो काढता आले.

ग़डावरील गंगा-जमुना टाकी, धान्यकोठार, राजवाडा, शिवजन्मस्थान, त्या पुढे असलेला कड़ेलोटकडा आणि नविन बांधलेले बाल शिवाजी मंदिर बघून आम्ही साखळीच्या वाटेकडे मोर्चा वळवला. साखळीची वाट म्हणजे शिवनेरीची चोरवाट. उभ्या कडयामधून पायऱ्या खोदून बनवलेला हा छुपा मार्ग. ह्या वाटेने फारसे कोणी येत जात नाही. गावातली माणसे आणि डोंगरवेडे. मुळात ही चोरवाट फार कोणाला माहीत पण नाही. आम्ही ह्या वाटेने उतरायचे ठरवले. पण आमच्या गाड्या रस्त्याला असल्याने आमची नंतर पंचाइत झाली असती. आम्ही त्यावाटेने खाली उतरून पुन्हा चढून वर यायचे ठरवले. साखळीच्या वाटेवर पायर्‍यांचा पहिला टप्पा सोपा आहे तर दुसरा थोडासा कठीण. पावसाळ्यात ही वाट थोडी निसरडी असते. पण आता उतरून जायला फारसे प्रयास पडले नाहीत.

पायर्‍या संपल्या की डावीकडे कोरीव गुहा आहेत. हे आम्हाला माहीतच नव्हते. दुर्लक्षित स्थितीत असलेल्या ह्या गुहा सुंदर आहेत. जुन्नर शहराचे इकडून छान दर्शन होते. शिवनेरीवरच्या गर्दीत जो निवांतपणा मिळाला नव्हता तो येथे येऊन मिळाला.

पुन्हा चढून वर आलो आणि बालेकिल्ला बघायला गेलो. वरती तसे फार काही बांधकाम उरलेले नाही. एक तटबंदी सदृश भिंत उत्तम स्थितीत आहे. येथून भोवतालचा अप्रतिम नजारा दिसतो. ४ वाजत आले होते आणि आता आम्हाला परतायला हवे होते. मुख्य मार्गाने आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. माळशेजघाटमार्गे अंधारपडेपर्यंत आम्हाला किमान मुरबाड गाठायचे होते. गाडी पुन्हा दामटवली. आणि कुठेही न थांबता सुसाट वेगात २ तासात थेट टोकावडेला थांबलो. मस्तपैकी पोटपूजा आटोपली आणि अजुन एका जबरदस्त धमाल ट्रेकची सांगता केली. मी आणि अमृताने; ऐश्वर्या - आदित्यला टाटा केला पण त्या आधी पुढच्या ट्रेकचे प्लॅनिंग करायला विसरलो नाही...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भटक्या, मस्तच रे वर्णन आणि फोटो सुद्धा Happy
मी पण शिवनेरी साखळदंडाच्या मार्गाने दोनदा उतरलोय. ज्याम मजा येते Happy

अरे योगेश... वाटा मोडून हे लोक पायऱ्या बांधतात... आपल्यासारख्या भटक्या लोकांना ते जमत नाय आणि पटत देखील नाय.. तेंव्हा आपल्यासाठी हे आड रस्ते उत्तम.. Happy काय!!!

पक्क्या मी पन प्रथम शिवनेरी वर साखळीची वाट म्हणजे साखळदंड म्हनतात त्याला, त्यानेच गेले होतो, मी आनी माझी बायको, कारन तीचे घर मह्न्जे माझी सासरवाडी शिवनेरीच्या पायथ्याशीच आहे ना (कल्यानपेठ मह्नुन.) फार मजा आली होती, कारन माझ्या लाईफ मधील पहीला गड मी सर केला होता.... Happy