"गुरूपौर्णिमा" निमित्ताने गुरू-शिष्यत्व ह्या विषयावर एक मुक्त चिंतन
सुकलेल्या उजड माळरानावर पावसाच्या एकथेंबी शिडकाव्याने हिरवळ कशी दाटून येते ?......
कळी उमलल्यावरच गंध कसा दरवळतो ?......
झाडावरच वाळून गळून पडलेल्या पाकळ्यांमधून रोपे कशी उगवतात ?......
समुद्राच्या झालेल्या वाफेचे ढग जमिनीकडे कसे झेपावतात ?......
आणि फुटल्यावर; पाणी सागराकडेच कसे वळते ?......
आदिमानवाचा मानव कसा झाला ?......
मानवाचा माणूस आणि त्याचा आजचा विश्ववेधी अविष्कार कसा घडला ? कुणी घडवला ? ......
त्या घडवणार्या हातांचा शोध युगे युगे चालू आहे. अशा असंख्य अदृष्य हातांचे दृष्य अंश "गुरुपौर्णिमा" निमित्ताने कृतज्ञतापूर्वक पूजले जातात.
गाणी गायिली जातात. चित्र काढली जातात. नृत्य केली जातात. आणि शिल्पं घडवली जातात.
घडलेला माणूस हे एक; सर्वमान्य; अत्यंत प्रगल्भ असं शिल्पच आहे.
ह्याची गुरू-शिष्य परंपरा काय आहे ? शिष्यत्व काय असतं ?
"सर्वव्यापी निसर्ग" हा "गुरू" आणि " सर्वसामान्य प्राणी " हा "शिष्य", हे नातं, जगण्याची प्रक्रिया समृद्ध करत असतं...... अविरत........अथक..........अखंड....
वन्य अवस्थेपासून परग्रहांवर स्वारी करण्याइतपत प्रगत मानव "घडवला" निसर्गानेच. विविध प्रदेशांतली जमात ही त्या त्या परिस्थिती अनुरूप घडली. मूळ एकच असलं तरी रूपं वेगवेगळी झाली. प्रत्येक शिल्प वेगळं, त्याची वैशिष्ठ्ये वेगळी, स्वभावधर्म वेगळे, सौंदर्य वेगळं. जीवन्क्रम- आहार-विहर- विकार सारंच वेगळं.
ह्या उत्क्रांतीचं पहिलं हत्यार "बुद्धी" जी सर्व चरांना मिळाली. मानवाला त्या पलिकडल्या " प्रज्ञा, प्रतिभा, मेधा आणि श्रिया" मिळाल्या.
"बुद्धी" ही सर्वसाधारण तर-तम आकलन शक्ती, जी जगण्यासाठी गरजेची. "मेधा" निरिक्षण/ स्मरणशक्ती; जगणे नियमित करण्यासाठी, ही ही सर्व प्रणिमात्रांमधे कमीअधिक प्रमानात असते. मात्र "प्रज्ञा"- शोधबुद्धी, "प्रतिभा'-क्रियाशील वृत्ती, आणि "श्रिया" - व्यवहार चातुर्य, ह्या बाबी फक्त मनुष्यात असल्याने त्याच्या वाटचालीची "घडण" वेगळी आहे.
निसर्ग जेंव्हा 'प्रज्ञा' आणि 'प्रतिभा' छेडतो तेंव्हा 'शिल्प' तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. 'मेधा' निरिक्षण आणि त्याचं स्मरण करू लागते.
मानवाने 'पहिलं शस्त्र' दगडापासून बनवलं. त्या शिल्पचा " पहिला गुरू- १) त्याची गरज, २) काम सोपं साधं सरळ कमी कष्टाचं होण्यासाठी विचार करायला लावणारी 'श्रिया' ३) काय काय करता येईल ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायला प्रवृत्त करणारी 'प्रज्ञा' आणि ४) सुचलेली प्रत्येक गोष्ट करून बघायला लावणारी-तडीस नेणारी 'प्रतिभा' ", हे होते. म्हणजेच त्याचा तो स्वतःच गुरू ठरला.
सर्वसाधारणपणे कुठलीही गोष्ट शिकण्या- शिकवण्यासाठी; गुरू-शिष्य परंपरा मानली जाते. शिल्पकलेत मात्र, "निसर्ग आणि बुद्धीचे विविध पैलू" हे "गुरू" आणि त्याच्याशी "समरस होण्याची प्रमाणिक इच्छा" हा "शिष्य", असं असतं असं माझ्या निदर्शनास आलंय. ह्याचं मुख्य कारण हे की, जेंव्हा एखादी गोष्ट प्रथमच केली जाते तेंव्हा; तिच्याशी फक्त पूर्वानुभवाचे संदर्भ निगडित असतात. स्वतः वेळोवेळी केलेली स्मरणातली निरिक्षणे तिला आधारभूत ठरतात. बाहेरून दुसरा कुणी ते त्यात भरू शकत नाही. जरी एखाद्याने त्याबद्दल कांही मर्गदर्शन केले तरी " समज-आकलन- आणि जाणीव" ह्यांच्या मंथनातून 'नवनीत' तयार होण्यासाठीचं 'संगर' स्वतःलाच करावं लागतं.
सृजनशील शिल्पकाराला त्याने घडवलेल्या शिल्पातल्या तृटी अस्वस्थ करतात.विचारांचं वादळ आंतर्मनात जगृत ठेवतात आणि मग यथावकाश त्यांची उत्तरं पृष्ठावर तरंगून येतात.
स्व. मदन गर्गे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शिल्पकार, आमचा मित्र. त्यामुळे त्याने घडवलेल्या शिल्पाकृतींबद्दल- त्यांच्या निर्मिती प्रक्रियेतील त्याच्या संकल्पना आणि विचारांबद्दल, अनेकदा, सविस्तर गप्पांच्या स्वरूपात आत्मीयतेने चर्चा होत असत. पिंप्रि-चिंचवड महानगरपालिकेने, पुणे-मुंबई रस्त्यावर बसविलेल्या, त्याच्या सुप्रसिद्ध "भक्ती-शक्ती" शिल्पातील खांद्यवर घोरपड घेतलेला मावळा (तानाजी), त्याने तीन वेळा मोडला आणि उभारला होता. मदनच्या "प्रतिभेचा" ध्यास इतका प्रबळ होता की, 'तो मावळा' त्याच्या स्वप्नात येऊन ' मी असा नाही' असं सांगत असे. मदन हा त्याच्या "प्रतिभेचा" आजन्म "शिष्य" होता.
"एकलव्य' हेही एक असंच उत्तम उदाहरण !! इथेही "कल्पनाशक्तीचे" शिष्यत्व आहे. हा उल्लेख करण्यामागे, माझा एक, जवलचा इंजिनिअर मित्र कारणीभूत आहे शिल्पकलेचं आकर्षण असणारा. हौस म्हणून माती लाकूड दगड ह्यांच्यावर प्रयोगशील संस्कार करून आनंद घेणारा, या संदर्भात अंतर्भाव असलेल्या सर्व बाबींचे अस्वादात्मक निरिक्षण करणारा आणि विविध क्षेत्रांतील विशिष्ठ प्रक्रियांना एकमेकांशी जोडून; नवीन कांही करता येईल का; ह्याचा ध्यास घेणारा.
व्यवसय निमित्तानं त्याच्या पहाण्यात एक दुर्मिळ मशीन आलं. त्या मशीनवरच्या कामाचा तीन पिढ्यांचा वारसा आणि ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तीशी त्याचा संपर्क ही झाला. ह्या मित्राची जिज्ञासा; कल्पकता; शिक्षण; काम करण्याची पद्धत आणि इच्छाशक्ती पाहून त्यांनी त्याला प्रोत्साहनाचा शब्द दिला.
त्यानंतर सधारणतः १२ वर्षांनी, त्या गृहस्थांच्या सल्ल्यानेच, मित्रानं ते मशीन घेतलं.
अनुभव नाही. मशीनची माहिती नाही. कुठून आणि किती काम मिळु शकेल ह्याचा अंदाज नाही. अभ्यास तर नाहीच नाही. फक्त त्यावर काय काय करता येऊ शकतं ह्याची कल्पना आणि ते करण्याची तीव्र इच्छा हे भांडवल.
ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यावर; त्या गृहस्थांनी; मित्राला; जे जे कमी पडेल ते सर्व देण्याचे वचन देऊन दिलासा दिला. अडचणीचे अवघड जॉब करून देण्याच्या हमी बरोबर, प्रसंगी, जागेवर जाऊन त्याच्या ऑपरेटर्सना आवश्यक ते मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली. कामाची कमतरता भासल्यास त्यांच्याकडील कांही जॉबस ह्याच्याकडे वळविण्याचा; अश्वासक औदार्याचा आधार दिला.
मशीन आलं -सुरु झालं. कामं येत गेली- होत गेली. अवघड अवघड सोपं वाटू लागलं. मात्र ज्यांच्या "गुरुत्वाखाली" त्याने हे धाडस केलं होतं; त्यांचा "सहवास- अनुभव अथवा ते स्वतः" त्याच्या वाट्याला कधीच येऊ शकले नव्हते.
आता तो त्या क्षेत्रातला तज्ञ गनला जाऊ लागला होता हे एका अनपेक्षित प्रसंगानं दाखवून दिलं होतं. त्या मशीनची निर्मिती करणार्या कंपनीनं, मुंबईत अशा मशीनची मुबलक संख्या असूनही, एका व्यक्तीला एका विशिष्ठ जॉबसाठी,त्याच्याकडे पाठवलं होतं, " हा जॉब झाला तर इथेच होईल नाहीतर कुठेच होणार नाही" ह्या आत्मविश्वासानं....... !!
हा एकलव्यच नाही का ?.......... स्वतःचा गुरू स्वतः ??? .........................
"मला विविध भारती" वर झालेली; गायक "सोनु निगम" ची मुलाखात आठवते. सोनू निगम हे माझ्या बटव्यातलं, एक उत्तम-लोभस-विनम्र आणि म्हणून आकर्षक व्यक्तिमत्व !! त्या श्रवणीय मुलाखतीच्या अखेरीस त्याला विचारला गेलेला एक साधा सरळ सोपा सर्वसाधारण प्रश्न " ह्या प्रगतीत तुमचा गुरू कोण ? हे श्रेय तुम्ही कुणाला द्याल ?" यावर त्याने दिलेलं जगावेगळं; अत्यंत बोलकं; सयुक्तिक; धाडसाचं पण विनयशील उत्तर असं होतं.......
.................... " हे सर्व श्रेय मी मला स्वतःला देईन. तुम्हाला विचित्र वाटेल कदाचित. कदाचित आत्मकेंद्रीही वाटेल. माझ्यावर संस्कार करणार्या श्रेष्ठींचा मी उपमर्द करतो की काय असं पण वाटेल कुणाला. पण ते तसं नाहीये. ह्या माझ्या समृद्ध वाटचालीत त्यांचा सहभाग निर्विवाद आहे परंतु त्यांनी भरभरून दिलेलं मी स्वीकारलं-पेललं आणि पचवलं म्हणून मी असं म्हणेन".
निसर्गानं दिलेलं प्रत्येक दान सर्वांसाठी सारखंच असतं, तरीही त्यापासून घडलेली "व्यक्तिमत्वं" वेगवेगळी असतात ती त्यांच्यातल्या कमीअधिक समरसतेमुळे.
साध्या दगडातून घडवलेलं शिल्प कसं घडतं यावरचा एक विचारप्रवाह असा आहे की, " ती सुंदर कलाकृती त्या ओबड्धोबड दगडात आधीच असते. आजूबाजूचा अनावश्यक भाग काढला की झालं". ......... त्यातला कुठला भाग किती काढायचा हे समजण्याची- समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे "शिष्यत्व".
एकदा प.पू. भक्तराज महाराजांच्या गुरूपौर्णिमेला, त्यांच्या पायावर डोकं ठेवून एक भक्त म्हणाला, " बाबा; आजपासून मी तुम्हाला गुरू केलंय" त्यावर बाबा त्वरेने बोलले, " गुरू मोठा की शिष्य मोठा ?" "अर्थात गुरू" - तो. " हो ना मग टांगा केला, रिक्षा केली तसा गुरू केला असं काय म्हणतोस ? मी म्हणायला पाहिजे तुला शिष्य केला म्हणून."
यातून मतितार्थ मी असा काढीन की, निसर्गासारख्या एवढ्या बलाढ्य असीम गुरूचं शिष्यत्व पत्करण्यासाठी आवश्यक ती कुवत-क्षमता-प्रबळ इच्छाशक्ती आणि तो निभावून नेण्यासाठी लागणारी ताकद ही कृपाभिलाषी स्वतःलाच उभारावी लागते. निसर्ग आपोआप तुमच्याशी तादात्म्य पावू लागतो. आजतागायत नेहमीच, गुरू शिष्याला शोधत त्याच्यापर्यंत पोहचत आला आहे. शिष्याने त्याच्यातील "विजिगिषा" जागृत ठेवायला हवी.
गुरू चरित्रात, स्वतः दत्तप्रभूंनी, मर्त्य जगातले कीटक-मुंगी-सर्प-अजगरांसारखे चोवीस गुरू मानले असल्याचा उल्लेख आहे.
शिल्पकलेत, घडलेल्या शिल्पाची परिपूर्णता, ही फक्त शिल्पकारच जाणू शकतो, कारण "साकार आणि मनातील संकल्पित आकार" हे दोन्ही त्यालाच माहिती असतात. म्हणूनच रसिकांनी गौरवलेली कलाकृती शिल्पकाराला समाधान देईलच असं सांगता येत नाही. शिल्पकाराचं " असामाधान " हेच कायम त्याच्या सृजनशील नवनिर्मितीला प्रेरणा देत असतं.
संकल्पित समाधानापाठची धाव म्हणजे "शिष्यत्व" आणि कल्पित समाधान हा "गुरू" असंच म्हणावं लागेल.............
................अज्ञात



खुप सुंदर लेख, आवडला !
खुप वर्षापूर्वी एकदा गुरूपोर्णिमेच्या पवित्र दिवशी माझ्या वडीलांचे सदगुरू श्री. शिवलाल स्वामी महाराज यांनी एका ओळीत सदगुरु कसे असावेत, किंवा श्रेष्ठ गुरूंची लक्षणे सांगितली होती.
"युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा, कर कटावरी ठेवोनिया."
अठ्ठावीस...: म्हणजे ज्याला चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे यांचे ज्ञान आहे अशी व्यक्ती,
युगे अठ्ठावीस... : म्हणजे युगानुयुगे आपल्याकडे असलेले ज्ञान वाटायचा जयाला कंटाळा येत नाही अशी व्यक्ती,
वीटेवरी उभा....: ज्याला कुठलेली मान, सन्मान लागत नाहीत, जो या सगळ्यांच्या पल्याड जावून पोचला आहे अशी व्यक्ती (आजकालाचे सोकॉलड गुरू सिंहासनाशिवाय बसत नाहीत, मर्क शिवाय प्रवास करत नाही, एसी शिवाय कुठे मुक्काम करत नाहीत
)
कर कटावरी ठेवोनिया : कट म्हणजे कंबर हा आपल्या शरीराचा मध्य मानला जातो, कंबरेच्या वरचा भाग जिथे हृदय असते, मन असते, मेंदू असतो म्हणजे आत्मिक, बौद्धीक जगाशी मानवाला जोडणारा भाग, तर कंबरेच्या खालचा भाग हा 'विषय'- वासना (प्रपंच) यांचे प्रतिक मानला जातो... कर कटावरी ठेवोनिया म्हणजे या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य साधणे ज्याला जमते (तुकोबांच्या भाषेत प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा सुवर्णमध्य साधणारा) अशी व्यक्ती.
मस्तच... खुप आवडला..
अज्ञात, लेख आवडला.
उत्तम लेख .