बेगमी

इष्कात रंगणार्‍यांची पंचमी असावी
होळी परी फुलांची त्या संगमी असावी

मानस सरोवराची शोभा असावयाची
निष्पाप पंकजा का या कर्दमी असावी ?

डोळ्यात खोल अश्रू ती साठवून घेते
पुढल्या अवर्षणाची ती बेगमी असावी

भिजवून एकदा जी गेली, पुन्हा न आली
बहुधा उनाड सर ती बेमोसमी असावी

भिजताच गंध कैसा मातीस येत नाही ?
या पावसात काही नक्की कमी असावी असावी...


क्या बात है!
शेवटचे ३ शेर अप्रतिम आहेत!! या पावसात काही नक्की कमी असावी -- वा वा!
बहारदार गझल...



डोळ्यात खोल अश्रू ती साठवून घेते
पुढल्या अवर्षणाची ती बेगमी असावी

भिजताच गंध कैसा मातीस येत नाही ?
या पावसात काही नक्की कमी असावी असावी...

वा वा.....
खूप आवडले हे २....



तिसरा, शेवटचा शेर आवडला. गझलेला नावही समर्पक स्मित

आणि हो मायबोलीवर १लीच रचना सादर केलेली दिसत्ये आपण, तेंव्हा आपलं स्वागत. स्मित



सुंदर. सगळेच शेर बेदम आहेत... (मला स्वतःला दुसरा नीटसा कळला नाहीये.)
शेवटचे तीन खूप आवडले.
स्वागत आहे, तुमचं करकोचा (?? मजेशीरच वाटतय असं लिहिताना).



सही! शेवटचे तीन मस्त. त्यातही शेवटचा आणखीनच जास्त आवडला.
गझल छान आहे.
फक्त पहिल्या शेरात उला मिसर्‍यात ' गागाल गालगागा' नंतर यती हवा होता. तो नाही.
इष्कात रंगणार्‍यां चीपंच मी असावी. असे होते वृत्तानुसार वाचताना...



डोळ्यात खोल अश्रू ती साठवून घेते
पुढल्या अवर्षणाची ती बेगमी असावी

भिजवून एकदा जी गेली, पुन्हा न आली
बहुधा उनाड सर ती बेमोसमी असावी

भिजताच गंध कैसा मातीस येत नाही ?
या पावसात काही नक्की कमी असावी असावी...

एकापेक्षा एक सरस शेर...!



बेगमी आणि गंध मातीचा हे दोन्ही शेर आवडले.गझल आवडली.
कर्दमी चा अर्थ बहुतेक चिखल असावा:) -
सोनाली



नमस्कार,
गझल छान आहे. मतला डोक्यावरून गेला मात्र.



शेवटचे तीनही शेर सुंदर. पहीले दोन शेर नाही कळले मलाही. स्मित



सुवर्णमयी, तुमचं बरोबर आहे.
कर्दमी म्हणजे चिखलात.

मीनू,
मानस सरोवराची शोभा असावयाची
निष्पाप पंकजा का या कर्दमी असावी ?
याचा अर्थ, जिने मानस सरोवराची शोभा असायला हवी, ती पंकजा इथे चिखलात का आहे?

पण मला यात "निष्पाप" शब्दाचं प्रयोजन नाही कळलं. अरेरे
करकोचा, स्पष्ट कराल का?
मतला मलाही नाही कळला....