श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ८

Submitted by बेफ़िकीर on 5 July, 2010 - 01:05

सगळ्यांना असते तशी आपल्याला आई नाही, पवार आजींनी आपल्या आईची भूमिका बजावलेली आहे, वाड्यातील प्रत्येक माणसाने आपल्याला सांभाळलेले आहे, तारामावशी व उषाआत्या या दोघींमुळे आपल्या आयुष्याचे पहिले काही दिवस अत्यंत व्यवस्थित जाऊ शकले, आपल्या बाबांची आर्थिक परिस्थिती इतरांसारखी चांगली नाही व साधे सरळ वागायचे, भांडायचे नाही आणि मुख्य म्हणजे कधीही... रडायचे नाही.

इतके सगळे संस्कार महेशवर पहिलीत जायच्या वेळेलाच झालेले होते. आता त्याच्या दृष्टीने त्याचे बाबा म्हणजे सबकुछ झालेले होते. समीरदादाने केलेल्या दुखावणार्‍या थट्टेवर आता तो दिलदारपणे हसू शकत होता. समीर आता चवथीत तर राजश्रीताई तिसरीत होती.

वाड्यात आता क्रिकेट खेळायचे वेड निर्माण झालेले होते. चितळे आजोबा या क्रीडाप्रकाराचा विरोध करत होते. रबरी बॉलनेसुद्धा आजपर्यंत प्रमिलाकाकूच्या खिडकीची एक काच फुटलेली होती. तेव्हापासून एक टप्पा आऊट, हाफ पीच वगैरे नियम सर्वानुमते अस्तित्वात आले होते. हळूहळु अशी परिस्थिती निर्माण झाली होती की प्लेग्रूपमधे मित्र झालेले प्रसाद गोडबोले, चिंगी, कल्पना, रेखा आणि दौलत हे इतर वाड्यांमधील खेळाडूही दास्ताने वाड्यात यायला लागले खेळायला. आता वरच्या मजल्यावरील अनेकजण संध्याकाळी वरूनच मुलांचा हा खेळ पाहू लागले. त्यात कॉमेंट्स करून सहभागी होऊ लागले. पवार मावशी सोडून! त्या वरून असा काही आवाज करायच्या की मुलांचा एकत्रित आवाज थिटा पडावा.

वर्षभरात श्रीच्या कंपनीला पुर्वपदावर येता आले होते. डिफरन्सही चक्क मिळाला होता. त्या खुषीत त्याने गट्टूसाठी जेवढ्या वस्तू, खेळणी आणि पहिलीत जाण्याची तयारी म्हणून कराव्या लागणार्‍या गोष्टी आणता येतील तेवढ्या आणल्या होत्या. गट्टू आनंदांची एकेक शिखरे पादाक्रांत करत होता.

गट्टू आणि श्रीची जोडी आता इतकी जमली होती की रमाची म्हणजे गट्टूच्या आईची अनुपस्थिती जाणवल्यामुळे नकोसे वाटणे या प्रकारातून श्रीही बाहेर आला होता. कालाय तस्मै नमः! दुसरं काय? मोठमोठी दु:खे विसरायला लावणारा काळ संथ, एकाच गतीने जात असूनही नकळत वर्षेच्या वर्षे पार पाडत होता. १९७६! त्याकाळी पुणे म्हणजे पुणे होते! पुणे तिथे काय उणे या म्हणीला शोभेलसे! थंडी म्हणजे अशी थंडी की गट्टूची गारठलेली बोटे सकाळी दहा वाजेपर्यंत हालचालच करू शकायची नाहीत. तरी सकाळी पावणेसात वाजता श्रीनिवास त्याला अभिनव शाळेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत मात्र सोडून यायचा. सायकलला खास पुढे एक सीट बसवून घेण्यात आले होते छोटे! गट्टूला त्यावर बसवून त्याचे दप्तर कॅरिअरला लावायचे, डबा आणि वॉटरबृग हँडलला लावायचे आणि सुटायचे आपले थंडीत! लकडी पूल क्रॉस करताना मात्र श्रीलाही हुडहुडी भरायची! एकेका टप्प्यावर एकेक आठवणी निर्माण होऊ लागल्या होत्या. केसरी ऑफिसपाशी आले की 'लोकमान्य टिळकांचा???? विजय असो' इथून पहिली घोषणाबाजी सुरू व्हायची! भाजीराम मंदिरापाशी ', राम लक्ष्मण जानकी.... जय बोलो हनुमान की' सुरू झाले की पार लकडी पुलाच्या सुरुवातीला अर्चना ही वर्गमैत्रीण तिच्या बाबांबरोबर तशीच सायकलवर बसून चाललेली दिसेपर्यंत राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाला स्वतःच्या घोषणा ऐकून घ्याव्याच लागायच्या. मग अर्चनाला गट्टू हात करणार आणि लिमयांना श्री! मग लकडी पुलावर गाणे सुरू व्हायचे! 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे'! लिमये हसत हसत पुढे जायचे. ते पुढे गेल्याची खंत वाटणे गट्टूने केव्हाच सोडून दिलेले होते. मग 'शास्त्राभ्यास नको, श्रूती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको व्रते मख नको, तीव्रे तपे ती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, ज्याचीया स्मरणे पतीत तरती, तो शंभू सोडू नको' हे गीत संपेपर्यंत डेक्कन कॉर्नर!

आता कर्वे रोड जसा आहे त्याच्या एक तृतियांश तरी होता की नाही अशी शंका येते. दोन्हीबाजूनी इतकी घनदाट झाडी की जणू बोगद्यातून आपण जातोय असे वाटायचे. मग मधेच गरवारे कॉलेज आणि आयुर्वेद रसशाळेपाशी 'आजचा डबा' या विषयावर चर्चा व्हायची. आजच्या डब्यात दिलेल्या भाजीने अंगात अशि अशी ताकद येते वगैरे वगैरे! मग गट्टू त्याच्या वर्गातील एक निलेश सोडला तर कुणाच्याच अंगात माझ्याइतकी ताकद नाही आहे हे रोज सांगायचा. तो पर्यंत स्वप्ननगरी अन सुवर्णनगरी मागे पडल्या की श्रीचा वेग वाढायचा. कारण नेमके तिथेच तो घड्याळ बघून म्हणायचा की 'सहा पन्नास?? बाप रे?? दुसरी घंटा वाजेल आता'! मग गट्टूचे सगळे लक्ष त्या प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर अन बाबांच्या स्पीडवर एकाग्र व्हायचे. फारच रहदारी! किमान एखादे तरी गावठी कुत्रे, झाडांवर अनेक पक्षी, नळस्टॉपपाशी रोज बसणार्‍या गायी आणि अर्चना लिमयेप्रमाणेच नळस्टॉपपाशी अचानक दिसू लागणारी पंधरा, वीस मुले अन त्यांच्या आईबाबांपैकी कुणीतरी! केवढी ही रहदारी? सायकल अगदी रस्त्याच्या मधूनच चालवावी लागायची त्यावेळेस इतकी वाहतूक!

नळस्टॉप क्रॉस केला की मात्र शाळेचे वातावरण गट्टूच्या मनावर व्यापायचे! आत्तापर्यंत बाबांबरोबर येताना आपण काय काय गाणी म्हंटली, काय काय बोललो.. सगळेच विस्मृतीत जायचे. कधी एकदा गिरीश सप्रे, निलेश काळे, प्रमोद पत्रे, श्रीकृष्ण पाटणकर, जयंत मणेरीकर अन बॉबी, नीता, रागिणी अन स्वरूपा भेटतायत, कधी एकदा अभिजीत, हेमंत, अतुल, पुष्कर आणि मकरंदबरोबर डबा खातोय असे होऊन जायचे!

सायकलवरून अक्षरशः उडी मारून उतरायचा तो गेटपाशी! सगळे लक्ष मित्रांना हात करण्यात असताना बाबांकडे पाठ करूनच कशीतरी वॉटर बॅग, डबा अन दप्तर घ्यायचा अन बाबांकडे न बघताच पाठीमागे नुसता हातच करून 'अच्छा' म्हणून पळत आत जायचा!

थक्क झालेल्या श्रीला त्याक्षणी खूप एकटे एकटे वाटायचे. काहीच कसे समजत नाही याला? निदान आपल्याकडे बघून.. म्हणजे.... पापा वगैरे देण्याचे वय नाही आहे हे मलाही समजते.. पण... निदान बघून एक.. एकदा मान डोलावून 'अच्छा'सुद्धा कसे म्हणावेसे वाटत नाही याला?? इतका रमला मित्रांमधे तर मग.. आपल्याबद्दल काही राहील की नाही कुणास ठाऊक पुढे??

मग तेवढ्यात कुणाचे तरी बाबा, कुणाची तरी आई वगैरे भेटायच्या! श्रीला असायची मरणाची घाई! त्या लोकांशी एक दोन शब्द बोलून तो टांग मारून जो सुटायचा तो लकडी पुलावर आल्यावरच एकदम घड्याळ पाहायचा! 'सात वीस व्हायला आले, बोंबला'! असे म्हणून खरे तर सात पंधरालाच वैतागायचा अन सात पंचवीसला वगैरे घरी सुद्धा पोचायचा!

कपडे बदलून पावणे आठला स्वातीबरोबर बसस्टॉपवर उभाही राहायचा!

इकडे पावणे अकराला पवार मावशींच्या कर्णकर्कश्श आवाजाने दास्ताने वाड्याला हादरे बसायचे अन त्या वाड्याबाहेर पडायच्या. 'माझा सासरा पुन्हा जन्माला आलाय पेंढारकरांकडे' असा त्या गट्टूचा उल्लेख करायच्या. ही बाई एक पैसाही न घेता रोज बसने गट्टूला शाळेतून का घरी आणायची हे मधूसुदन कर्वेलाही समजत नव्हते. किमान बसच्या पासचे पैसे तरी घ्यावेत माणसाने? पण नाही. श्री दहा वेळा त्यांना म्हणाला, इतकेच काय तर हेही म्हणाला की तुम्ही जाणे बंद करा मी दुसरा कुणी मिळतोय का बघतो. त्यावर त्या म्हणाल्या 'दुसर्‍या कुणी त्याला आणल्यावर माझ्या घरी सोडले तर याद राख, दुसरा कुणी आणणार असेल तर त्याला म्हणाव त्याच्याच घरी घेऊन जायचे'!

त्यांच्यासमोर काही चालतच नसल्यामुळे शेवटी श्री 'काय करायचे ते करा' असे म्हणून गप्प बसायचा.

आणि गट्टूचे एक होते. वाड्यातील तो एकच असा सजीव होता जो पवार आजी या व्यक्तीला यत्किंचितही घाबरायचा नाही. उलट या बाईला आपण कितीही त्रास देऊ शकतो, तसा काहीतरी वहिवाटीसारखा आपला हक्क आहे असा समज झालेला होता त्याचा! मानेकाकांसमोरही तो घाबरायचा नाहीच, पण मानेकाकांना पवार आजींइतके जवळचे समजणे शक्यच नव्हते. काही झाले तरी ते एक पुरुष होते अन गट्टूचे वय इतके दिवस आईस्वरूप बायकांबरोबर असण्याचे होते.

शाळेतल्या मुसळे बाईंची त्याला फार भीती वाटायची आणि तितकेच प्रेम वाटायचे निर्मला जोशी बाईंबद्दल!

साडे अकरालाच मावशी शाळेच्या प्रवेशद्वाराशी पोचायच्या! त्यांच्या बडबडीमुळे सुरुवातीला त्यांची किमान पाच पालकांशी भांडणे झाली. पण त्यांच्या अभुतपुर्व म्हणी ऐकून सगळ्यांनी धास्तीच घेतली. मग हळूहळू त्यांना चिडवायला सुरुवात झाली. त्यावरही त्या उद्धार करू लागल्या. आता या बाईशी कुणी बोलायचेच नाही. एकदोघांनी सकाळि श्रीशी हा विषय काढलेला होता. श्रीने त्यांना सांगीतले की या बाईने महेशच्या आईची भूमिका बजावायचे ठरवले आहे, नाहीतरी हिच्यासमोर उभे राहण्याची ताकद आमच्या वाड्यात फक्त एक मानेकाका म्हणून आहेत त्यांच्याकडे आहे.

वर्गात इतर मुलांबरोबर राहून राहून मात्र गट्टूमधे हळूहळू फरक पडायला लागला. त्याच्यात किंचित खोडकरपणा प्रवेशला. एकेकाच्या सवयी समजल्या. प्रमोद पत्रे शाई सांडतो, श्रीकृष्ण रुमाल पाणी चांगले खेळतो, नीताचे अक्षर सुंदर आहे व त्यामुळे तिच कौतूक होत असते, जयंत हा धिप्पाड आहे व त्याला सगळे वचकून असतात वगैरे वगैरे! मग गट्टुचाही आपोआप स्वभाव बनायला लागला.

दुसर्‍याहून आपली शारिरीक ताकद जास्त असणे ही भावना त्या वयात फार मोठा फरक पाडू शकते. कारण एक दोघे सोडले तर सगळेच आपल्याला वचकून असणार हे त्याला समजू लागले. मुलींचा तर प्रश्नच नव्हता.

त्यातच निर्मला जोशी या आपल्या वर्गशिक्षिका आहेत व आपले खूप कौतूक करतात याचा अभिमान वाटू लागला.

त्यामुळे एखादे शिक्षक सगळ्यांसमोर आपल्याला काही बोलले की आपल्याला खूप अपमान वाटतो हे समजायला लागले. त्यामुळे अशा शिक्षकांची भीती बसायला लागली. त्यातच विचारलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला येतात यामुळे इतरांपेक्षा कुठेतरी आपण किंचित श्रेष्ठ आहोत असे वाटायला लागले.

मधल्या सुट्टीत डबा खाताना मात्र फारच पंचाईत व्हायची. निलेश आणि गिरीशच्या डब्यात नावीन्यपूर्ण पदार्थ असायचे. ते फक्त एकमेकांनाच चव म्हणून आपल्यातले थोडे थोडे द्यायचे. हेमंत जोशी रोज ब्रेड व सॉस आणायचा. गट्टूला सॉसचा तो चमचमीत वास फार आवडायचा. ब्रेडच्या बाजूने दिसणार्‍या सॉसच्या लाल रंगाच्या कडा पाहून तो क्षणभर विचार करायचा की आपल्याला ब्रेड का देत नसावेत? पण भूक इतकी लागलेली असायची की हा विचार मागे पडायचा. मग आपल्याचसारख्या परिस्थितीतले कोण कोण आहेत तर बाबा अभिजीत, प्रमोद आणि श्रीकृष्ण! मग त्यांच्याबरोबर कुठेतरी बसून डबा खायचा एकत्र! पाच मिनिटात डबा खाऊन झाला की शिवाशिवी अन रुमाल पाणी खेळायला मोकळे!

अर्ध्या तासाची मधली सुट्टी म्हणजे पाच मिनिटे जेवण आणि पंचवीस मिनिटे नुसता हल्लकल्लोळ!

छगन नळ बघ, कमळ घर बघ वगैरे वगैरे! त्या कमळ, छगन, नळ आणि घर यांना काना, मात्रा, वेलांट्याच नसायच्या! सगळे नुसते नीरस शब्द! ही एवढाल्ली चित्रे! काय तर म्हणे छगन एक नळ बघतोय! त्यावरून 'हा छगन आहे आणि हा नळ आहे' ही अ‍ॅडिशनल माहितीही मिळायची!

पाटी फुटू शकते हा नवीन दु:खद प्रकार शाळेत अनुभवायला मिळाला होता त्याला! एक दोघांच्या पाट्या फुटल्या. त्यातील एक मुलगी होती. ती तर सरळ भोकाड पसरून रडलीच! स्वरुपा फडणीस! अतिशय चुणचुणीत अन स्मार्ट मुलगी! गट्टुला ती फार आवडायची. तिने मान हलवली की तिचे केस कसे मस्त हलतात याचे त्याला कुतुहल निर्माण झाले होते. बबली उर्फ बॉबी उर्फ अनुराधा ही त्या स्वरुपाची मैत्रिण होती! ती गट्टूला नेहमी सांगायची! 'माझं नाव बॉबी नाहीये काही, बबली आहे'! आणि बॉबी नुकताच प्रदर्शित झालेला असल्याने अन गाजलेला असल्याने बबली असे ती चुकून म्हणत असणार, तिला माहीत नसणार आणि तिचे नाव नक्कीच बॉबी असणार असे गट्टुला वाटायचे.

आणि नेमकी गट्टूची पाटी फुटली तेव्हा श्रीने अवाक्षरही न काढता त्याच दिवशी दुसरी आणून दिली. मनात गट्टूला समजले होते की बाबा रागवलेले असणार! त्यामुळे तोही दोन दिवस स्वतः खूप पश्चात्तापदग्ध असल्याप्रमाणे वावरत होता. पण पुन्हा कालाय तस्मै नमः!

आणि मुळे नावाच्या नवीन बाई आल्या! त्या आकडे शिकवायच्या! त्यांनि आल्या आल्या स्वतःची ओळख करून दिली. बाई फारच गंभीर चेहर्‍याने वावरत होत्या. मग त्यांनी मुलांना आपापली ओळख करून द्यायला सांगीतली. वडील काय करतात तेही सांगा म्हणाल्या.

गट्टूने त्याच्यावर वेळ आल्यावर उठून उभे राहात सांगीतले.

"महेश श्रीनिवास पेंढारकर, दास्ताने वाडा शनिवार पेठ! बाबा किर्लोस्कर कंपनीत आहेत."

सगळे व्यवस्थित चाललेले होते. पण अज्ञानातून अनेक गोष्टी घडतात. कोणत्या वेळेस काय बोलायला पाहिजे याचे लहान मुलांना ज्ञान नसते. त्यांना वाटते त्यांना असलेली माहिती ही दुसर्‍याला मिळायलाच पाहिजे.

सचिन उभा राहात बाईंकडे बघत म्हणाला..

"बाई, याला आई नाहीये...."

क्षणभर सगळेच चुपचाप! गट्टू नुसताच बाईंकडे बघत होता. सगळी मुले गट्टूकडे! आणि बाई म्हणाल्या 'असूदेत, तू रे? तुझे नाव काय?"

"गिरीश पद्माकर... ........ "

तो प्रसंग टळला असला तरीही गट्टुच्या मनावर एक व्रण नक्की बसला. इथे असलेल्या सगळ्यांच्या दृष्टीने 'आई नसणे' ही एक मोठी कमतरता आहे. अगदी बाईंना जाहीररीत्या सांगण्याइतकी मोठी!

मधल्या सुट्टीत तो जरा वेगळा वेगळाच राहू पाहणार होता. पण डबा खायला नेहमीच्या मित्रांबरोबर बसावेच लागले. पुन्हा चर्चा झाली.

हेमंत - मग डबा कोण करतं?
गट्टू - बाबा..
अतुल - म्हणजे.. वारली आई?

गट्टुने मान डोलावली.

अभिजीत - कशी?
गट्टू - माहीत नाही.. मी जन्माला आलो तेव्हाच ...
प्रमोद - तू बघितलीच नाहीस..
गट्टू - अंहं..
हेमंत - असुदेत... आपण आहोत ना सगळे... काळजी करू नकोस हं??

हेमंतच्या त्या विधानावर मात्र सगळेच सहमत झाले. गट्टूला 'आईला मित्र रिप्लेस करू शकतात की नाही' याबाबत काही ठामपणे ठरवता येत नव्हते. पण त्याला बरे वाटले. आजपासून हेमंत त्याच्या दृष्टीने सगळ्यात जवळचा मित्र ठरणार होता असे त्याला वाटले. पण तरीही त्याने ब्रेड आणि सोस काही मागीतला नाही. हेमंतला गट्टूची 'ती' व्यथा माहीतच नव्हती. रुमाल पाणी खेळताना मात्र ही चर्चा मागे पडली.

आणि दुसर्‍याच दिवशी सकाळी सचिन शाळेत आला तो तडक गट्टुपाशी!

सचिन - मला आईने खूप मारले.. म्हणाली उद्या गेल्या गेल्या महेशला 'चुकलो' असे म्हणायचे आणि.. ती तुला विचारणार आहे दुपारी 'मी चुकलो असे म्हणालो का' ते! चुकले माझे महेश! मी असे बोलायला नको होते.

यावर 'अरे? काहीतरी काय, त्यात काय एवढे' वगैरे म्हणायचे असते हेही गट्टूला माहीत नव्हते. त्याने आपली मान खाली घातली.

आणि तेवढ्यात मागून रागिणी कुलकर्णी म्हणाली की 'महेश, हे दहा पैसे मागच्या खिशात ठेवून दाखव की'!

रागिणी कुलकर्णी! काय अभिमान होता तिच्या डोळ्यात की महेशच्या 'पांढरा शुभ्र शर्ट आणि नेव्ही ब्लू हाफ पँट' या युनिफॉर्ममधे हाफपँटला मोठ्या माणसांसारखा मागच्या बाजूलाही खिसा आहे. आणि आपल्याजवळचे दहा पैशाचे नाणे त्याने त्याच्या त्या खिशात ठेवून दाखवावे अशी तिची इच्छा होती.

कोण अभिमान वाटला गट्टूला! आपण कुणीतरी मोठे माणूस आहोत जणू! 'मी काय? रोजच मागच्या खिशात पाकीट, पैसे वगैरे काय काय ठेवतो' असा चेहरा करत त्याने अगदी सहज ते नाणे मागच्या खिशात टाकले अन रागिणिच्य चेहर्‍यावरचे भाव न्याहाळले. ती अगदी 'देव पाहिल्यासारखा' चेहरा करून अभिमानाने स्मितहास्य करत होती. गट्टू तिला ते नाणे काढून 'घे' म्हणाला तेवढ्यात मुसळे बाई आल्या अन त्यांनी आल्या आल्या दटावणीच केली 'ए बसून घ्या रे, हुंदडू नका, चला, चला सचिन, महेश!'

रागिणीकडे वळून पाहिल्यावर रागिणीने 'तास संपल्यावर नाणे दे' अशा अर्थाची खूण केली. गट्टूनेही मान डोलावली.

आणि त्या दिवशी तो प्रसंग घडला.

तो तास संपल्यानंतर जवळपास पंधरा मिनिटे दुसर्‍या कुणीच बाई येत नव्हत्या त्या कालावधीत गट्टूने ते नाणे मागच्या खिशात अन सगळ्या बाकांखाली शोध शोध शोधले. जाम सापडेना! चोरी वगैरे झाली असेल हा विचारच त्याच्या मनाला शिवला नाही. रागिणीही प्रचंड काळजीत शोध घेत होती. शेवटी तिच म्हणाली. 'असुदेत, गेले असतील'! पण गट्टूला मात्र तो विचार सोडावासा वाटत नव्हता.

... पण शेवटी... सोडूनच द्यावा लागला. आपण ही गोष्ट एखाद्या बाईंना सांगीतली तर कदाचित त्या सगळ्या मुलांना विचारू वगैरे शकतील हे त्याला सुचलेच नाही.

शाळा सुटल्यावर सचिनच्या आईने विचारले. 'सचिन सॉरी म्हणाला का रे?' त्यावर गट्टू मान खाली घालून 'हो' म्हणाला आणि सचिनच्या आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तेवढ्यात मावशी आल्या. आणि नळस्टॉपपर्यंत बससाठी चालत जाताना गट्टूने पहिल्यांदा रागिणीच्या दहा पैशांचा प्रसंग मावशींना सांगीतला. वाट्टेल तशी बडबड करणार्‍या मावशी ते ऐकून मात्र एकदम गंभीर झाल्या. त्यांनी संध्याकाळी बाबांना नेमके काय सांगीतले ते गट्टूला समजले नाही. पण भर क्रिकेट मधून गट्टूला त्यांनी घरात बोलवून बदड बदड बदडले तेव्हा मात्र गट्टू निराधारासारखा रडत होता. त्याही वेळेस मावशीच मधे पडल्या.

श्री हा तसा नाजूक प्रकृतीचा व नाजूक प्रवृत्तीचा माणूस होता. हात उचलणे हे त्याच्या स्वभावातच नव्हते. तो कष्टाळू अन 'आपण बरे, आपले बरे' या विचारांचा होता. पण गट्टूला आजवर कधीच शिक्षा मिळालेली नव्हती. शिक्षा आवश्यक असते हेही त्याला माहीत नव्हते. क्रिकेट खेळणारी सगळी मुले वर येऊन आपल्याला मारताना बघत आहेत हा अपमान त्याला सहन होत नव्हता. पण तो असहाय्य होता. बाबंशिवाय त्याला कुणीही नव्हते. आजीने आपल्या बाबांचा हात धरला ही त्यातल्यात्यात आश्वासक बाब होती. आजीसमोर बाबाही गप्प बसायचे हे त्याला नवीन नव्हते. आपले नेमके काय चुकले हेच त्याला कळत नव्हते. आपण जर ते नाणे पळवलेच नाही तर आपल्याला का मार मिळावा??

आणि त्याच वेळेस श्री करत असलेला विचारही अत्यंत योग्य व पटण्यासारखा होता. एक पैशाला चिक्की अन पाच पैशांना बसचे तिकीट मिळण्याचे दिवस होते ते! एक, दोन व तीन पैशांची नाणी सर्रास वापरात होती. त्या काळी इतक्या लहान वयात खिशात पाच पैसे असणे म्हणजे कोण अभिमानाची गोष्ट होती. श्रीच्या खिशात कित्येकदा ऑफीसला जाताना चार आणेही नसायचे. पाच पैशात एखादा चहा मारला की झाले, बाकी दुपारच्या डब्यावर राहता येत होतेच अशी त्याची स्वतःचीच परिस्थिती होती! आणि अशा परिस्थितीत गट्टूने निष्काळजीपणे रागिणीचे दहा पैसे घालवले होते यावर्न त्या रागिणीला उगीचच तिच्या घरचे किती ओरडतील आणि आपल्या गट्टूबद्दल त्यांचे काय मत होईल या विचाराने श्रीनिवास संतापला होता. त्याने पाठीतच धपाटे मारले होते, पण तेही जवळपास पंधरा वीस! आणि गट्टू वेदनेपेक्षा अपमानाने जास्त रडत होता. आपल्याला बोलूच दिले जात नाही आहे म्हणून अधिकच रडत होता.

मावशींकडेच जेवला. रात्री मावशींच्या घराचे दार उघडेच होते. श्रीनिवासला वाईट वाटले. तो त्याला बोलवायला गेला. मावशींनी सांगीतले की आज इथेच झोपुदेत! पण गट्टूलाच काय वाटले कुणास ठाऊक! तो सरळ उठून आपल्या बाबांबरोबर आपल्या खोलीत झोपायला आला. आपल्या बाबांना खूप वाईट वाटले आहे आणि आज आपण त्यांच्या बरोबर झोपणे आवश्यक आहे इतके त्याला निश्चीतच जाणवले होते.

बाबांनी प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला.

श्री - गट्टू.. रडू नकोस हां! हे बघ! पैसे कमवायला ना? खूप कष्ट पडतात. बघतोस ना कशी धावपळ होते बाबांची? मग त्या रागिणीच्या बाबांनीही अशीच धावपळ करून पैसे कमवले असतील की नाही? मग केवढे नुकसान झाले त्यांचे आपल्या चुकीमुळे? हो की नाही? असे करायचे नाही हं? उद्या सकाळी मी तुला दहा पैसे देईन! ते तिला देऊन टाक.. काय?

गट्टुने कुशीत पडल्यापडल्याच मान डोलावली आणि पाचच मिनिटांत झोपूनही गेला. श्री मात्र रमाच्या फोटोकडे पाहून म्हणाला..

श्री - नाही.. रागवली असशील तू.. नाही म्हणत नाही मी.. पण.. हे वेळच्यावेळीच समजलेले बरे असते रमा.. तू असतीस तर... कदाचित.. तूही.. आपल्या गट्टूला ...

'मारले असतेस' हे शब्द जसे त्याच्या ओठांवर आले तसे मात्र त्या शब्दांच्या आधी डोळ्यातील पाणी बाहेर आले.

गट्टुला आयुष्यातील पहिली शिक्षा आज मिळाली होती... तीही त्याच्याच चांगल्यासाठी!

आणि दुसर्‍या दिवशी त्याला शाळेत सोडताना.......

लोकमान्य टिळकांचा विजय असो... यातील 'विजय असो' हे रोज गट्टू म्हणायचा... आज श्रीलाच म्हणावे लागले...

'राम लक्ष्मण जानकी.. जय बोलो हनुमानकी'... यातही 'जय बोलो हनुमानकी' हेही श्रीलाच म्हणावे लागले..

अर्चनाकडे पाहून आज गट्टूने लकडी पुलावर हात हलवला नाही... तिचे बाबा भर्रकन सायकलवरून पुढे गेले तरी... 'चला की बाबा पटापट' अस गट्टू आज म्हणाला नाही..

जगाला प्रेम अर्पावे हे संपूर्ण गाणे एकट्याने म्हणताना श्रीला सतत आठवत होते की प्रेम अर्पायच्या ऐवजी गट्टूला त्याने काल मारलेले आहे...

'ज्याचीया स्मरणे पतीत तरती.. तो शंभू सोडू नको' म्हणताना श्रीचा आवाज त्याला स्वतःलाच ऐकू येत नव्हता..

शाळा आली एकदाची..

श्रीनिवासला रागिणी कुठे दिसलीच नाही. 'ती आली की तिला हे नाणे देऊन टाक' असे म्हणून अजूनही जरा गंभीरच असलेल्या गट्टूच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून श्रीने त्याला शाळेत सोडले व स्वतःच गंभीर होत मागे फिरला. आज त्याने मुद्दाम हाफ डे काढलेला होता. दुपारी गट्टूला घ्यायला आज तोच येणार होता.

गट्टू मात्र वर्गात आला आणि रागिणीला वेगात शोधू लागला. तब्बल दहा मिनिटांनंतर रागिणी वर्गात आली. म्हणजे ती अजून शाळेतच आलेली नव्हती हे गट्टूला समजले. तास सुरू व्हायला अजूनही पाच एक मिनिटे होती.

गट्टू - हे दहा पैसे... तुझे... काल हरवलेले..
रागिणी - मिळाले??
गट्टू - अंहं! दुसरेत हे.. ते हरवलेच..
रागिणी - मग हे??
गट्टू - बाबांना सांगीतलं मी पैसे हरवल्याचं.. त्यांनी दिलेत दुसरे..
रागिणी - अंहं! ... मला नको..
गट्टू - घे ना.. बाबा आज दुपारी येणारेत... मग ते तुला विचारतील..
रागिणी - नाही... मला आई नाही म्हणाली पैसे घ्यायला..
गट्टू - काय म्हणाली??
रागिणी - की तू आज पैसे देशील बाबांकडून घेऊन.. ते घ्यायचे नाहीत..
गट्टू - का?
रागिणी - कारण तू चांगल्या घरचा आहेस.. ते चुक्न हरवलेत पैसे.. तुझी चूक नाही..

गट्टुने आणखीन पाच, सहा वेळा म्हणून पाहिले. पण ती ऐकेचना! शेवटी त्याने नाद सोडला. मधल्या सुट्टीत खेळताना मात्र त्याने त्या नाण्याची अतिशय काळजी घेतली.

शाळा सुटली. बाबा आलेले दिसत नव्हते. रागिणी कुठे पसार झाली कळेना! मग अभिजीत आणि अतुलबरोबर तो चालत नळस्टॉपपर्यंत जायला निघाला. कारण नाहीतरी बाबा त्याच रस्त्याने येताना दिसणार होते.

भूक लागलेली होती. अतुलने खिशातून पाच पैसे काढले अन एक पेरू विकत घेतला. चांगला कापून फोडी वगैरे करून अन तिखट मीठ लावून घेऊन! मग गट्टूला मोह झाला. त्याने पाच पाच पैशाचे दोन पेरू घेतले. एक अभिजीतला दिला अन एक स्वतः खायला सुरुवात केली. पेरू खाऊन होईपर्यंत सगळेच नळस्टॉपला उभे राहिले.

पेरू खाऊन संपले तरी बाबा येईनात! मग अभिजीत आणि अतुल 'आम्ही जातो' असे म्हणणार तोच

"गट्टूराव... आले बाबा" असे जोराने म्हणत श्रीनिवास सायकलवरून तिथे पोचला. त्याचा आनंदी चेहरा पाहून गट्टुलाही खूप आनंद झाला.

किती निरागस वय असतं ते! ज्या माणसाने काल आपल्याला मारलं त्याच माणसाशिवाय आपण जगू शकत नाही या अगतिकतेतून आलेल्या निरागस प्रेमामुळे आलेले हास्य! किती गोड हास्य होते ते!

श्री - इथे का उभा राहिलास?
गट्टू - आम्ही चालत चालत आलो
श्री - होना.. जरासा उशीर झाला मला... घेतले?? रागिणीने पैसे??
गट्टू - नाही म्हणाली... तिच्या आईने नाही घ्यायचे सांगीतले होते तिला..
श्री - का?
गट्टू - ऐकतच नाहीये ती.. नाही घेतले..
श्री - बर.. चला.. ते पैसे दे माझ्याकडे... मीच देतो उद्या तिच्या आईकडे..
गट्टू - आम्ही.... .. पेरू खाल्ला...

खाड! अभिजीत आणि अतुलला काही समजलेच नाही! महेशच्या बाबांनी त्याला का मारले ते??

श्री - पेरू खाल्ला? मोठा झालास इतका?? घरी खायला मिळत नाही? कुणाला विचारून खाल्लास?? कुणाला?? तुला पेरू खायला पैसे दिले होते मी?? पेरू खायला दिले होते पैसे?? इथे मर मर मरून मी कमवतोय अन तू सरळ पेरू खाल्लास??

प्रत्येक वाक्यागणिक श्री दोन दोन फटके लावत होता. गट्टूला ध्यानीमनी नसताना रोज ज्या मित्रांबरोबर खेळतो त्यांच्यासमोर मार मिळालेला होता. एक अश्रूही गट्टुच्या डोळ्यातून निघत नव्हता. फक्त तो अत्यंत व्यथित नजरेने फटके खात होता.

त्याला तसेच उचलून श्रीने सायकलवर बसवले अन घरी आणले. आजीला पाहिल्यावर मात्र गट्टू जो रडत तिच्या कुशीत शिरला....

त्या दिवशी पवार मावशींनी गट्टुला झोप लागल्यावर बाहेर येऊन वाड्याच्या गॅलरीतच उभे राहून श्रीला असे काही झापडले की...

आपली बाप व्हायची लायकी तरी आहे की नाही असा श्रीला प्रश्न पडावा.

त्या रात्री गट्टू आजीकडेच झोपला. रमाच्या फोटोंना फुलांऐवजी आसवांचा हार घातला गेला.

आणि दुसर्‍या दिवशी सकाळी???

ध्यानीमनी नसतानाच ... मिस्टरांना कामानिमित्त महिनाभर मद्रासला राहावे लागणार असल्यामुळे...

तारामावशी चार, पाच दिवस राहण्यासाठी आपला चार वर्षांचा मुलगा दिनेश याला घेऊन सहा वाजताच प्रकटली....

आणि तिने आणलेले निळ्या रंगाचे दप्तर, नवीन शूज आणि एक परफेक्ट बसणारा युनिफॉर्म पाहून गट्टू हरखूनच गेला. हिला कसे माहीत आपल्या शाळेचा युनिफॉर्म?? काय माहीत..

समीरदादा वर येऊन त्या वस्तू पाहून जाताना हळूच कुजबुजत अन घाबरून... तरी पण म्हणालाच...

"आपण नाही बाबा कुणाचं फुकटचं घेत..."

त्या दिवशी गट्टूला शाळेत सोडायला तारा मावशी अन दिनेश चक्क रिक्षेतून गेले. गट्टू तर उतरल्यावर जमेला त्याला हात करत होता. सगळ्यांना कळावे की आम्ही रिक्षेतून आलो म्हणून!

आणि... त्याच वेळेस त्याचे कालचे अन परवाचे शाळेचे कपडे एकदम भिजवताना...

श्रीनिवास पेंढारकरांच्या हातात हाफ पँटच्या मागच्या खिशातील कोपर्‍यात दडून बसलेले दहा पैशाचे नाणे आले होते...

रागिणी कुलकर्णीचे दहा पैसे.... गेलेच नव्हते ते..

कंबरेत वाकून मोडून पडून कसे रडावेसे वाटते याचा अनुभव आज एक बाप घेत होता...

आणि त्याच वेळेस आपल्या घरातून बाहेर येत पवार मावशी ओरडत होत्या...

मावशी - हे घे दहा पैसे.. काल रात्री त्याच्या खिशातून पडले... त्याला स्वतःलाच सापडत नव्हते....

अंध प्रेम आणि स्पष्ट प्रेम या दोन्हीकडे एकाचवेळेस बघत फोटोतील रमा मिश्कील हसत होती.

आणि त्याचवेळेस सकाळचे फिरायला गेलेले व अत्यंत घाईघाईत परत आलेले मानेकाका खालून कर्कश आवाजात ओरडत होते...

मानेकाका - ए श्री... ताबडतोबड धाव.. ती तुझ्याबरोबर नटवी येते ना कंपनीत.. स्वाती का कोण ती.. तिला धडक बसलीय गाडीची... जहांगीरला नेलय रिक्षेतून... धाव..

गुलमोहर: 

befikir,

kai lihawe hech kalat nahi. Ekach bhaga madhe kiti variations, haan?, mala saglyat jast Gattu chya manatale bhav aawadale, tyachya maitrini baddal ani mitra baddalche.

Ani kai chitra ubhe karta rao, Shri la te 10 paise sapadtat ani Mavashi la pan 10 paise.

hats off to you!!!
tumhi great aahat Happy

mafi aasawi, karan mala marathi madhe reply denya baddal sagun sudha me english madhe lihile manun, me prayatne suru kele le aahet, lavakarach result milel. Happy

मी फक्त हाच भाग वाचलाय. तोसुद्धा सहज म्हणून... चार ओळी वाचून सोडून द्यायचे म्हणून. पण सोडवलेच नाही. गट्टू, श्री, आजी, त्यांच्या मनाला काय वाटले असेल ती भावना, सगळं सगळं जिवंत समोर उभं राहिलं! Happy

अत्यंत सुंदर!!

शरद

वा! आज खुप दिवसांनी न रडवता भाग संपवलात...म्हणजे स्वातीच्या अ‍ॅक्सिडेंटची बातमी तशी वाईटच...पण तिची तुमच्या कथेतील एक पात्र म्हणून विशेष ओळख नसल्याने त्या वाईट बातमीची तीव्रता जाणवली नाही.

गट्टू आणि श्री चाळ सोडून गेले नाहीत, श्रीची कंपनी पुन्हा सुरळीत चालू झाली. हे वाचून आनंद झाला. गट्टू आणि पर्यायाने कथेचे वाचक दुसाने चाळीला आणि त्यातील गमतीदार पात्रांना अजूनतरी दूरावले नाहीत ह्या जाणीवेने आनंद झाला.

गट्टूचे शाळेचे सुरुवातीचे दिवस, तो दहा पैशाचा किस्सा, यात अगदी गुंतून पडायला झालं होतं...नेहमीप्रमाणेच कथानकाची अप्रतिम मांडणी!!!

पुढच्या भागाची वाट पाहात आहे.

मी फक्त हाच भाग वाचलाय. तोसुद्धा सहज म्हणून>>>मी देखील. पण आवडला हा भाग. छान चालू आहे कथा Happy