काळीज

'हो! हो!' म्हणून झाले, 'ना! ना!' म्हणून झाले!
ठरल्यानुसार दैवा जगणे जगून झाले.

मीही तसाच आहे, तीही तशीच आहे...
लांबून एकमेकां हे चाचपून झाले.

करशील काय आता उचलून तू कुर्‍हाडी,
आतून पूर्ण माझे जर उन्मळून झाले!

मज राहिला अताशा कसलाच शौक नाही.
दु:खातला विदूषक माझे बनून झाले!

माझा मलाच मी का कोठेच सापडेना?
आयुष्य भोवताली सगळे खणून झाले.

काळीज आज बहुधा झाले सुरू कण्हाया...
आत्ताच कालपरवा माझे हसून झाले!
- मयूर


गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा
सुंदर आहे रे गजल.

फक्त
लांबून एकमेकां हे चाचपून झाले.
आणि
काळीज आज बहुधा लागेल हे कण्हाया
ह्या दोन ओळी मात्रांसाठी बघणार का?.

- अनिलभाई



सगळेच शेर अगदी 'शेर' आहेत, मयूर... सुंदर गजल. त्यातही कुर्‍हाडीचा आणि आयुष्याचा शेर जबरदस्तच. काळीजही आरपार...



धन्यवाद अनिलभाई , दाद...
मात्रांबद्दल...
लां बू न ए क मे कां हे चा च पू न झा ले
का ळी ज आ ज बहु धा ला गे ल हे क ण्हा या
गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा

मला वाटते 'कण्हाया' मधला 'क' हा लघूच असावा.



मस्त!
चाचपून आणि काळीज हे शेर खूप आवडले.
"ठरल्यागतच" जरा वाचताना अडचण होतेय. "अगर" ऐवजी दुसरा (आतून पूर्ण माझे असे काहितरी...) योजता आला तर बघ. भरीचे "हे" टाळता आले तर आणखी सफाईदार होईल (हे चाचपून, हे उन्मळून, ह्या कुर्‍हाडी, हे कण्हाया)!



पुलस्तिशी सहमत. 'हे'च म्हणायचे होते!!!



धन्यवाद पुलस्ति आणि नचिकेत. स्मित
आतून 'पूर्ण' हा बदल सुचविल्याबद्दल आभार.
दोघांशीही सहमत. 'हे' काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
काही ठिकाणी अजून 'हे'च आहे.



मयूर,
छान गझल...
फक्त शेवटच्या शेरात कण्हणे हे हसण्याशी थेट जोडता येत नाहीये...
तो शब्द बदललास तर बरं होईल... चुभूद्याघ्या..



धन्यवाद आनंदयात्री... स्मित
'कण्हणे' हे हसण्याशी थेट जोडता येत नसले तरी त्या शब्दातून साधणारा परिणाम दुसर्‍या कोणत्या शब्दाने साधता येईलच असे नाही.
मुळात 'कण्हाया' च्या जागी 'रडाया' वापरता येईल...पण शेराचा अर्थही तेव्हा बदलेल.
केवळ दोनेक दिवस झाले असतील नसतील हसून तितक्यात काळजाची अवस्था दु:खी झाली.
अर्थात 'रडू' येतेय असे नव्हे...पण वेदनांनी ठणकायला मात्र सुरूवात केलीय असे दिसतेय.
'रडण्या'पेक्षा 'कण्हण्या'तून होणारी घुसमट जास्त आहे असे मला वाटतेय.
चुभूद्दयाघ्या.



मयूर,
छान आहे गजल. कुर्‍हाडीचा शेर विशेषच आवडला.
'कण्हणे' च्या शेराबद्दलची मतं (आनंदयात्रींचं आणि तुमचं) दोन्ही बरोबर वाटतात. पण हा शेर तुम्ही आणखीन चांगला नक्की लिहाल असं मलाही वाटलं. 'हसून झाले' म्हणताना हसणं संपल्याचा उल्लेख आल्याने दोन्ही ओळीतल्या विरोधाभासाची धार कमी झाली असं मला वाटलं.
-सतीश