"पोलीसी खाक्या! "

त्या दिवशी गाडीला नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तरीही मी कसाबसा चढलो. मागून लोक लोटतच होते त्यामुळे थोडा आत आणि सुरक्षित जागी पोचलो. हातात असलेली जड ब्रीफकेस वरती फळीवर ठेवायला दिली आणि व्यवस्थित तोल सांभाळून उभे राहता यावे म्हणून दोन्ही हातांनी वरच्या कड्या पकडल्या. मालाडला चढलो होतो तेव्हा जेवढी गर्दी होती त्यात अंधेरी पर्यंत वाढच होत गेली आणि मग तर श्वास घेणेही मुश्किल होऊन गेले. एकमेकांचे उच्छ्वास झेलत लोक कसे तरी प्रवास करत होते. त्यात काही पंखेही बंद होते. कुणीतरी उत्साही तरूण त्यात कंगवा घालून त्याचे पाते फिरवून पंखा सुरु होतो का असला प्रयत्नही करून पाहात होता.

जलद गाडी (फास्ट ट्रेन) असल्यामुळे अंधेरी-वांद्रे,वांद्रे-दादर आणि दादर-मुंबई सेंट्रल ह्या दरम्यानच्या स्थानकांवर ती थांबणार नव्हती त्यामुळे आता अंधेरीहून गाडी सुटल्यावर तरी निदान पुढचे स्थानक(स्टेशन) येईपर्यंत गर्दी वाढणार नव्हती. भर उन्हाळ्याचे दिवस,त्यात काही पंखे बंद म्हणजे आधीच दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना असा प्रकार होता. भरमसाठ गर्दीने आणि उकाड्यामुळे घामाने भिजलेली अंगं,त्यात पाशिंजरांच्या आपापसातील बडबडीमुळे होणारा कलकलाट आणि गाडी वेगात धावत असल्यामुळे होणारा खडखडाट ह्या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही मला झोप येत होती. मी उभ्या उभ्या पेंगायलाही लागलो. एक-दोन वेळा मानही लुढकली पण पुन्हा मी मोठ्या निर्धाराने झोपेचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करू लागलो.

ह्या सगळ्या प्रकारात वांद्रे स्थानक आले केव्हा तेच कळले नाही पण वांद्र्याकडून गाडी जेव्हा माहीमच्या दिशेला निघाली तेव्हा त्या खाडीच्या थंडगार वार्‍याने मी जागा झालो. वांद्र्याला गाडी थोडी रिकामी झाल्याचे जाणवले आणि हात खाली करून कोणताही आधार न घेता उभे राहाता येईल अशी परिस्थिती असल्यामुळे मी कड्या सोडल्या आणि हात खाली केले. हातांचा स्पर्श पँटच्या खिशांना झाला आणि मी ताडकन उडालो. ज्या खिश्यात पास-पाकीट होते तो चक्क सपाट लागत होता. मी खिशात हात घालून पाहिले आणि माझ्या सगळा प्रकार लक्षात आला. माझे पाकीट त्या गर्दीत मारले गेले होते. त्यात नुकताच काढलेला तीन महिन्यांचा रेल्वेचा पास, माझे ऑफीसचे ओळखपत्र आणि काही किरकोळ रक्कम त्यात होती. पास पुन्हा काढता येत होता पण मला चिंता होती ती त्या ओळख पत्राची.कारण मी ज्या केंद्र सरकारी कार्यालयात काम करत होतो ते जरा विचित्र खाते होते. धड ना पोलीस ना नागरी. पोलिसांसारखे आम्ही २४ तास बांधील होतो पण आम्हाला गणवेश नव्हता. पोलीसांसारखे अधिकारही नव्हते पण सेवाशर्ती सगळ्या पोलिसांसारख्या. म्हणजे शिस्तीला एकदम कडक आणि अधिकार काहीच नाही. म्हणजे आमची अवस्था वटवाघळासारखी अधांतरी! ओळखपत्र हरवले म्हणजे आता चौकशीला सामोरे जावे लागणार, कानपिचक्या,दंड आणि रेकॉर्ड खराब होणार. मग आता काय करायचे?तर दादरला उतरून रेल्वे पोलीसात तक्रार करणे इतकेच माझ्या हातात होते.

मी दादरला उतरलो. रेल्वे पोलीस चौकी शोधून काढली आणि माझी तक्रार सांगितली. माझे पाकीट कुठे मारले गेले ? तर अंधेरी ते वांद्रे ह्या दरम्यान. हे त्यांनी माझ्याच तोंडून वदवून घेतले आणि आपले हात वर केले. म्हणाले की ही केस वांद्रे रेपोंची आहे तेव्हा तुम्ही तिथे जा. मग काय मी तसाच वांद्र्याला पोचलो. ह्या सर्व धांदलीत आता आपल्याकडे पास किंवा तिकीट नाही हे देखिल लक्षात आले नाही.पण सुदैवाने कुणी अडवले नाही. वांद्र्याच्या त्या पोचौ मध्ये मी पोचलो तेव्हा तिथे दोन पोलीस बसले होते. दोघे आमने सामने बसले होते. त्यातला एक जमादार(एक तारा) फोनवर कुणाशी तरी गप्पा मारत होता आणि दुसरा हवालदार त्याच्या समोरच्या बाकड्यावर बसून अगदी मन लावून कान कोरत होता. माझ्या तिथल्या आगमनाची जरादेखिल जाणीव त्यांना झाल्याचे दिसले नाही. मी आपला त्यांचे माझ्याकडे कधी लक्ष जाते ह्याची वाट पाहात चुळबुळ करत उभा होतो पण रामा शिवा गोविंदा. दोघेही आपल्याच तारेत होते. शेवटी एकदाचे त्या जमादाराचे फोनवरचे बोलणे संपले आणि आता तो आपल्याकडे नक्की पाहील आणि विचारेल... वगैरे वगैरे विचार मी केला पण पुढे काहीच घडले नाही. त्या जमादाराने हवालदाराशी बोलणे सुरु केले.
"बरं का वाघमार्‍या,तिच्या आयला........ ह्या मा**** साहेबाच्या *** बांबू सारला पाहिजे. फुकटचोट भे** तरास देतोय."
"सायेब.तुमाला काय सांगू? ते म्हनजे बगा एकदम बारा बोड्याचं बेनं हाय.लय मा**** बगा.त्येच्या फुडं नुस्तं हांजी हांजी म्हनायचं. अवो धा वर्सं काडलीत त्येच्या संगट.लई हरामी जात हाय. तुमी त्येच्या नादी लागू नका.... वगैरे वगैरे वगैरे"!
त्यांचे ते बोलणे असे सुरुच राहिले असते म्हणून त्यात व्यत्यय आणण्यासाठी मी जोरात खाकरलो आणि मग नाईलाजाने त्यांना माझ्या अस्तित्वाची दखल घ्यावी लागली.

"हां! बोला. काय काम हाय?" एक तारा.
"साहेब, त्याचं काय आहे की माझं पाकीट उडवलं"! मी
"उडवलं? ते कस काय बुवा? "
"आता ते मला कळलं असतं तर मी इथे कशाला आलो असतो?" मी. मी देखिल तिरकस बोलण्यात कमी नव्हतो. इथे आपला हात दगडाखाली आहे हे माहित असल्यामुळे त्यातल्या त्यात सौम्य भाषेत बोललो.
"बर का वाघमार्‍या,ह्ये सायेब बग काय म्हनताहेत. त्येंचं पाकीट उडवलं तरी बी त्यांना काहीच कळालं न्हाय". एकतारा.
एकतार्‍याच्या बोलण्याने आता वाघमार्‍या मैदानात आला.
" बर सायेब मला सांगा तुमी ते पाकीट काय असे दोन बोटात धरून उंच धरले व्हते की काय? म्हंजी आसं बगा की ह्ये पाकीट हाय आनि ह्ये मी आसं धरलंय उंच(वाघमार्‍या अगदी प्रात्यक्षिक करून दाखवत होता) आनि तुमी त्या पाकीटमारांला आवतन देत व्हता काय की या,उडवा माजं पाकीट?" वाघमार्‍या. आणि दोघे खो-खो हसत सुटले.
"काय तिच्या आयला लोक बी कंप्लेंटी आनत्यात? पाकीट उडवले म्हनं?" एकतारा.
"बर माला सांगा,पाकीट उडवला तवा तुमी काय करत व्हता? न्हाय म्हन्जे बसला व्हता,उबा व्हता? नक्की काय करत व्हता?" वाघमार्‍या.
"अहो गर्दी चिक्कार होती गाडीला....
मी माझे वाक्य पूर्ण करण्याच्या आधीच दोघे ठो ठो हसू लागले.
" आरं तेच्या मायला,वाघमार्‍या! सायेब काय म्हन्तायेत की गाडीला लय गर्दी व्हती. आता मुंबैच्या गाडीत गर्दी आसनार न्हाय तर मग कुटं आसनार? मुंबैत नवीनच दिसतंय बेनं! भटाचं दिसतंय ! भासा बग कसी एकदम सुद्द वापर्तोय". एकतारा.
"ओ साहेब शिव्या द्यायचं काय काम नाही सांगून ठेवतोय आणि माझी जात काढायची तर अजिबात जरूर नाही. मीही बक्कळ शिव्या देऊ शकतो. उगीच माझे तोंड उघडायला लावू नका". मीही चिडून बोललो.
"च्यामारी वाघमार्‍या! हिथं पोलीस कोन हाय? आपून की ह्ये बेनं? चायला हाय तर किडूक-मिडूक. पर आपल्याला दम देतोय. घे रे ह्याला आत आन दाव आपला इंगा". एकतारा.
"ओ,हात लावायचे काय काम नाही सांगून ठेवतो. उगीच पस्तावाल". आता माझाही संयम संपत चालला होता. ते दोघे माझ्याकडे एक टाईमपास म्हणून बघत होते आणि स्वतःची करमणूक करून घेत होते. माझा आवाजही आता तापला होता आणि आजूबाजूची फलाटावरची दोनचार पासिंजर मंडळीही ही करमणूक बघायला आतमध्ये डोकावली.
माझ्या आव्हानाने वाघमार्‍या चवताळला. पटकन उठला आणि माझा दंड त्याच्या राकट हातांनी धरायला म्हणून पुढे सरसावला. पण मी सावध होतो. चपळाईने दूर झालो आणि वाघमार्‍याचा तोल जाऊन तो जमिनीवर कोसळला. जणू मला तो साष्टांग नमस्कार करत होता कारण त्या अवस्थेतही त्याने त्याचे हात मला पकडण्यासाठी लांब केले होते.
आता गप्प बसून चालणार नाही हे मी ताडले आणि माझा हुकुमाचा एक्का काढला. खरे तर मी एक सामान्य नागरिक म्हणून जगू इच्छित होतो पण ह्या दोघा टोणग्यांनी मला माझे खरे स्वरूप उघड करायची वेळ आणली होती जे मी स्वतःहून करू इच्छित नव्हतो.
"अतिरिक्त आयुक्त,विशेष शाखा(ऍडिशनल कमिशनर स्पेशल ब्रँच) श्रीयुत अमूक अमूक ह्यांच्या ऑफिसात मी काम करतोय. मला जायला उशीर होतोय. ते तिकडे माझी वाट पाहात आहेत आणि मला तुमच्यामुळे हा उशीर होतोय. वर मला मानसिक त्रास तुम्ही जो देताय हे सगळे त्यांना कळले ना तर माझ्याऐवजी तुम्हीच आत जाल. तेव्हा मुकाट्याने माझी तक्रार नोंदवून घ्या आणि मला त्याची पोचपावती द्या. नाहीतर पुढच्या परिणामांना तयार व्हा". माझ्या ह्या खणखणीत बोलण्याने दोघेही हतबुद्ध होऊन माझ्याकडे पाहातच राहिले.

अत्यंत कृश शरीरयष्टी(अगदी क्रिकेटच्या यष्टीसारखी),मध्यम उंची,पट्ट्यापट्ट्याचा टी शर्ट्,खाली भडक रंगाची पँट,केस अस्ताव्यस्त, हनुवटीखालची बोकडदाढी आणि हातात ब्रीफकेस असा माझा त्यावेळचा अवतार हा कोणत्याही अशा तर्‍हेच्या पोलीसी खात्याला शोभणारा मुळीच नव्हता त्यामुळे त्या दोघांना कळेना की नक्की काय प्रकार असावा ते. हा म्हणतोय ते खरे असेल तर आपले काही खरे नाही पण हा उगीचच दमबाजी करत असेल तर? अशा पेचात ते दोघे सापडले असतानाच एक सब इन्स्पेक्टर आत आला. त्याच्या आगमनाने त्या दोघांना हायसे वाटले असावे असे त्यांच्या चेहर्‍यावरच्या हावभावावरून वाटले. त्या दोघांनी सइला एक कडक सलाम ठोकला. सइ खूर्चीत स्थानापन्न झाला आणि त्याने प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहिले. ही संधी साधून मी माझी खरी ओळख दिली आणि तक्रार घडाघडा सांगून टाकली.
माझ्या साहेबांचे नाव ऐकले मात्र सइची पण कळी खुलली . हे साहेब मूळातले मुंबई पोलीसातलेच होते.पण आमच्या कडे पाहूणे कलाकार म्हणून(डेप्युटेशनवर) आले होते. राष्ट्रपती पदक विजेते आणि अतिशय कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष म्हणून त्यांचा लौकिक होता.सइदेखिल त्यांचा लौकिक जाणून होता.

लगेच मला बसायला खूर्ची दिली गेली आणि वाघमार्‍याला चहा आणायला पिटाळले. एकतारा आता खाली मान घालून उभा होता. आता आपले काही खरे नाही असेच भाव त्याच्या चेहर्‍यावर होते कारण आतापर्यंत झालेला प्रसंग मी सइला सविस्तर सांगितला. त्याने त्या दोघांना असे काही झापले की त्यांची ती दयनीय अवस्था पाहून मलाच वाईट वाटले.पण त्या माजोरड्यांना त्यांच्या भाषेत डोस मिळणे अत्यावश्यक होतेच. त्यानंतर विद्युत वेगाने हालचाली झाल्या. माझी तक्रार नोंदवून त्याची पोचपावती दिली गेली. स्पेशल चहा आलाच होता. तो पिऊन मी त्यांचा निरोप घेऊन जायला निघालो.

एकतारा आणि वाघमार्‍यांनी माझ्याकडे दयेची याचना केली.
"सायेब, गलती जाली. एक डाव माप करा. आमी वळकलं न्हाय तुमाला. आता मोट्या सायबांस्नी काय सांगू नकासा. न्हाईतर आमची नोकरी जाईल. तुमी आदीच सांगतल आस्तं तर आसं जालं नसत. पुन्यांदा आसं न्हाय व्हनार. आयच्यान!" एकतारा.
"बाबांनो, तुमी पोलीस लोक सामान्य माणसाशी कसे वागता हेच मला बघायचे होते आणि मी जर सामान्यच आहे असे सिद्ध झाले असते तर तुम्ही माझे काय हाल केले असते ह्याची कल्पनाच करवत नाही. तेव्हा एक अनुभव म्हणून मी हे साहेबांना सांगणार आहे हे नक्की".
माझ्या त्या बोलण्यावर दोघे माझ्या पाया पडायला लागले आणि मग जास्त तमाशा नको म्हणून मी त्यांना माफ करून साहेबांकडे त्यांची तक्रार करणार नाही असे वचन दिले.

आज मी जर एक सामान्य नागरिक असतो तर माझे काय झाले असते?


सामान्यांचे यापेक्षा वाईट हाल होतात हो. तूम्ही शेवटी हुकुमाचा एक्का काढलात, सामान्यानी काय करावे ?
अगदी जिवंत अनुभव.



त्यांने गयावया केली म्हणून तुम्ही त्यांची तक्रार केली नाहीत का? तसे असेल तर त्यांच्या अरेरावीला हातभार लावल्यासारखेच नाही का?
जर तुम्हाला शक्य होतं आणि तुमच्या तक्रारीने त्यांच्यावर कारवाई होण्याइतके तुमचे 'वजन' होते तर तक्रार करायलाच हवी होती.
तुम्हाला उपदेश करायचा हेतू मुळीच नाही. प्रामाणिकपणे मला जे वाटलं ते सांगितलं.
चूभूद्याघ्या!



तुम्ही जर त्यांची तक्रार नसेल केली तर अयोग्य केले. अश्या माणसांची नोकरी जाणे इष्टचं.



देवसाहेब खर्‍या चोरापेक्षाही हे सरकारी चोरच (कामचुकार) फार भयंकर. पहिले काम याच चोरांना योग्य शिक्षा देणे मग आपोआप खरे चोरही पकडले जातील. तुम्हाला सांगणे नकोच परंतु हेच पोलिस या खर्‍या चोरांना पोसतात. सामान्य नागरिकाच्या हातात नशिबाला दोष देण्याशिवाय काहीच नसते. तुमचा हा अनुभव मायबोलीकरांना सांगितल्याबद्दल धन्यवाद.



छान लिहिला आहेत तुमचा अनुभव. आमच्या घराच्या कोपर्‍यावरील विहिरीत अधूनमधून कुणीतरी मरून पडत. आमच्या शिवाय कुणी पोलिसांना कळ्वीत नाही म्हणून राग येइ. पण आमच्या ओळ्खीतील एकाने कोपर्‍यावर मरून पडलेल्या माणसाची वर्दी पोलिसांना दिली, तर नंतर पोलीस पैसे मागून त्रास देतात म्हणून त्यांना वकीलाकडे सल्ला मागावा लागला. सामान्य माणस यामुळेच सगळ्याविषयी उदास राहतात.



असा कडवट अनुभव मला आला होता. सामान्य माणुस म्हणूनच दूर रहातो असे पोलीस वागतात म्हणून. असाच बसचा संप पुकारला गेला अचानक दंगा उसळला हिंदू मुस्लीम का काय ते. शाळा लवकर सुटली. शाळेच्या बसचालकाने पण नाही सांगीतले नी घरी गेला(नंतर कळले की तो मुस्लीम होता म्हणून घरी निघून गेला). रीक्क्षा हा एकच मार्ग होता त्यामुळे त्यांनाही माज आला होता. जेमतेम ७ ते १० मीनीटे घर होते बसने वा रीक्षाने पण चालत २० -२ ५ एक मीनीटे लागली असती. रीक्षा तुरळकच होत्या.कशीतरी रीक्षा पकडली तर त्याने आम्ही ४ लहान मुली पाहून ३५ रूपये सांगीतले. (९३ ची गोष्ट जेव्हा असेच सगळे ठीक असताना मध्येच दंगे उसळत). आणि आम्हाला म्हणाला रोजच्या रस्त्याने नेवू शकत नाही म्हणून. बराच वेळ नको असलेल्या गल्लीतून तो आपली रीक्षा नेत होता. आम्ही मुली घाबरलो. अतीशय घाणेरड्या गल्लीतून तो रीक्षा नेत असल्याने चारा न्हवता म्हणून उतरलो नाही. त्यातील एकच मैत्रीण जरा मोठी होती (१४-१५) वर्षाची तीने ताकीद दीली की हे असे गल्लीतून फिरण्यापेक्षा रस्ते साफ नजर आहेत आम्ही सांगतो तीथून ने इतका वेळ लागणार नाही. अचानक रीक्षावाल्याला माज आला नी आम्हाला त्याने त्या एकाकी गल्लीत तिथेच सोडले ते ही ३५ च्या एवजी ४० घेवून(कारण सगळ्या मुलींकडे मिळून तेव्ढेच पैसे होते) की त्याला पोलीस अडवतील पुढे गेला तर. आम्ही मुली घाबरलेलो. दुकाने बंद, रस्त्यावर बर्‍यापैकी शुकशूकाट. इतक्यात पोलिसांची गाडी दिसली,त्यांची मदत मिळेल ह्या आशेने त्यांना गाडी थांबवायला सांन्गीतली नी विचारले इथे इथे सोडाल का? गाडीतील हलकट हवालदार का पोलीस(गणवेष पाहून त्यावेळी काही कळत न्हवते हा हवालदार आहेत का पोलीस?) त्याने आम्हा मुलीना वरून खालून पाहीले(१२ - १३ वर्षाच्या मुली आम्ही). हसत हसत काहीबाही प्रश्ण विचारले. अश्या ह्या वेळेला तुम्ही मुली इथे कश्या? ह्या वेळेला काय करत होतात? राहता तिथे तर ह्या इकडे कश्या काय आलात? इकडे कोणाबरोबर आलात?तुम्हाला कोणी मुलगा मित्र नाही का सोडायला आला? असले फालतू प्रश्ण. सगळ्यांची पुर्ण नावे विचारली, जात ही विचारली. फक्त एकच मैत्रीण ख्रीस्चन होती. अर्थात पोलीस हिंदू होते.( बरे हे प्रश्ण काळजी म्हणून नक्कीच विचारत न्हवते. शाळेचा युनीफॉम होता तरी असले प्रश्ण. बरे विचारताना इतके विचीत्र हसणे त्याही वयात ते भीतीदायक वाटले पोलीस असूनसुद्धा.) हे सर्व झाल्यावर आम्हाला म्हणाले पोलीसस्टशनात जावून तुमची तक्रार लिहा रीक्षावाल्याबद्दल. हा सगळा प्रकार पोलीस गाडीत बसून नी आम्ही रस्त्यावर उभे राहून घाबरलेल्या अवस्थेत.आम्ही म्हटले आम्हाला माहीती नाही त्या रीक्षाचा नंबर नी अम्हाला फक्त घरी जायचेय. रीक्षा ही मिळत नाहीये तर जरा पुढच्या नाक्यावर सोडाल तर बरे, तिथे रीक्षा मिळेल जर तुम्ही तिथेच जात असाल तर. आपसाआपसात अचकट विचकट हसत काहीतरी बोलत राहीले असे विचारल्यावर. पण का कूणास ठावूक अचानक माझ्या त्या मोठ्या मैत्रीणीने ठरवले की आपण पोलीसांबरोबर नको जावूया त्यांचे अवतार पाहून. चौघी आहोत, हातात हात घालून नाक्यापर्यन्त जावूया. जे काही होईल ते. तर असे हे पोलीस सामान्य जनतेलाच असे वागवतात. त्यांनाच कोणीतरी फटके दीले तर सुधारतील.



ही काल्पनिक कथा आहे ना? म्हणजे मलातरी ही लेखकाच्या आयुष्यातली सत्यघटना आहे असे लिहिलेले दिसले नाही.
मग बर्‍याच प्रतिक्रिया; ही लेखकाच्या आयुष्यातली सत्यघटना असावी आणि त्याने कसे वागणे बरे दिसले असते, या पद्धतीच्या का आहेत?

असो. कथा चांगलीच आहे.



कथा छान जमली आहे , प्रश्न आहे तो हा की ही कल्पनीक आहे की सत्यकथा आहे ... पण हया प्रश्नाला तुम्ही वाचा फोडली हे विशेष !



मन:पूर्वक धन्यवाद मंडळी.
ही कथा काल्पनिक नसून माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेली घटना आहे.
इथे बर्‍याच जणांनी म्हटलंय की त्या पोलिसांना शिक्षा व्हायला हवी होती. मलाही त्यांचे म्हणणे पटते. माझ्या ’वर’ तक्रार करण्याने त्यांना शिक्षा झाली असती आणि माझा अहं ही सुखावला असता इतकेच. तरीही असे वाटते की अशा एकदोघांना शिक्षा होऊन पोलिसांची मानसिकता सुधारेल काय? नक्कीच नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते.
मी पोलिसांचे जीवन जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांचे उध्वस्त होणारे कौटुंबिक स्वास्थ्य आणि खालावणारी प्रकृती हे देखिल अनुभवलेलं आहे. मग काय करायला हवंय? १)पोलिसांना अधिक चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण द्यायला हवे आहे. २)त्यांची संख्या वाढवायला हवी आहे ज्यामुळे त्यांचे कामाचे (१२-१२ तास) कमी करता येतील आणि आपापल्या कुटुंबियांसमवेत जास्त वेळ घालवता येईल. ह्याचा दृष्य परिणाम म्हणजे त्यांच्या वागण्यात चांगले बदल होतील. पोलिस हाही आपल्यासारखाच एक माणूस आहे हे समजून जर त्याला जरूर त्या सुखसोयी पुरवल्या तर तो आपली जबाबदारी जास्त चांगल्या तर्‍हेने पार पाडू शकेल असे वाटते.
हे काम केवळ सरकारच करू शकते. अशा घटना जाहीर व्यासपीठावर सातत्याने आपण मांडत राहिलो तर एक ना एक दिवस त्याची योग्य ती दखल सरकारकडून घेतली जाईल आणि त्यावर उचित कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.
एका रात्रीत परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याकडे जादूची कांडी नसल्यामुळे वाट पाहणे हेच आपल्या हातात आहे.



विचित्र प्रकार आहे एकुणाच्.छान लिहिलिय कथा



ही काल्पनिक कथा आहे ना? म्हणजे मलातरी ही लेखकाच्या आयुष्यातली सत्यघटना आहे असे लिहिलेले दिसले नाही.
मग बर्‍याच प्रतिक्रिया; ही लेखकाच्या आयुष्यातली सत्यघटना असावी आणि त्याने कसे वागणे बरे दिसले असते, या पद्धतीच्या का आहेत? >>>>>>>

ही कथा वाचताना सर्वांना खरी वाटली म्हणुन त्या प्रतिक्रीया.
अस मानल की तुम्हाला जरी खरी वाटली नाही तरी लोकांनी कसा प्रतिसाद द्यावा हे तुम्ही का ठरवत आहात?



प्रमोद,
हा खरा अनुभव आहे हे सांगायची गरज नव्हती इतके प्रभावी लेखन होते हे.
पोलिसांच्या बाबतीत कामाचे वाढीव तास, अपुरा पगार हि कारणे मला पटत नाहीत. कारण सगळ्याच क्षेत्रात असे आहे. त्यांच्या हातात अमर्याद सत्ता आणि अधिकार, तसेच दंडेली करुन सहज मिळणारा पैसा, हि कारणे आहेत.
त्याचीच माजोरी आलीय त्याना. तक्रार करणेच योग्य आहे.



छान अनुभव. सामान्यांचे यापेक्षा वाईट हाल होतात . तूम्ही शेवटी हुकुमाचा एक्का काढलात. आमच्या सारख्यानी काय करावे ?
अगदी जिवंत अनुभव.



हे असच चालायच....



तरीही असे वाटते की अशा एकदोघांना शिक्षा होऊन पोलिसांची मानसिकता सुधारेल काय? >>>
का नाहि सुधारणार? सुरवात तर होइल!.. एका रात्रित बदल होत नाहित हे तुम्हिच लिहलेय...मग्,अंश रुपाने हातभार तर लागेल..
आज मी जर एक सामान्य नागरिक असतो तर माझे काय झाले असते?>>>
तुम्हि सामान्य(?) नागरिक नाही म्हणुन सुटलात.. अधिकारी नसता तर त्या हवालादारांना शिक्षा व्हावि अस तुम्हाला ही वाटलच असत ना??
(तुम्हाला चुका दाखवतेय अस नाहि. अनुभव वाचुन जे वाटल ते लिहल ..गैरसमज नसावा)



छान अनुभव कथन.. परंतु तुम्ही तक्रार करायला हवी होतीत. तुमच्या त्यांना सोडून देण्याने त्यांना जरब तर बसली नाहीच पण त्या अनुभवानंतर आजवर इतर अनेक जणांना त्यांची अरेरावी सहन करावी लागली असणार हे नक्की.. एखाद्या गोष्टीचा क्षणिक परिणाम बघण्याऐवजी जास्त मुदतीत त्याचा सगळ्यांना किती उपयोग होणार असतो ते बघणं महत्वाचं.. सामान्य माणसाच्या हातात तसेही चरफडण्याव्यतिरिक्त काही नसतं. त्यामुळे अधिकार असणार्‍यांनी योग्य तिथे वाजवी प्रमाणात त्याचा वापर जरूर करावा असे मला वाटतं. अर्थात अशा अधिकार वापरण्याचा तुम्हाला दुसरा काही त्रास होउ शकला असता का हे माहित नाही. असो.



अनुभव छान बोध घेण्यासारखा असला तरी आपली पोलिसांकडे बघण्याची द्रुष्टी बदलली पाहिजे. आपणच मुळात पोलिसांकडे नेगेटिव्ह विचार करुन जातो. त्यामुळे आपल्याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारची आत्मियता नसते. खरंतर आपले रक्षणकर्ते म्हणुन आपली पोलिसांकडे बघण्याची द्रुष्टी बदलली पाहिजे. समाजात त्यांना मानाचे स्थान दिले पाहिजे. कित्येकदा आपणच त्यांना हसण्याचा विषय बनवतो आणि गैरसमज पसरवितो. आणि मग असे प्रकार घडतात.



मला ही या पेक्षा वेगला अनुभव नाही. माझा नात्यात ही पोलीस खात्यात काम करणारे आहेत्.तरी तुम्ही तक्रार करायला हवी होतीत. तुमच्या त्यांना सोडून देण्याने त्यांना जरब तर बसली नाहीच पण त्या अनुभवानंतर आजवर इतर अनेक जणांना त्यांची अरेरावी सहन करावी लागली असणार हे नक्की.. एखाद्या गोष्टीचा क्षणिक परिणाम बघण्याऐवजी जास्त मुदतीत त्याचा सगळ्यांना किती उपयोग होणार असतो ते बघणं महत्वाचं.. सामान्य माणसाच्या हातात तसेही काहीच नाही. माणसाला माणुस म्हणुन बघण्याची शुद्धच नाही.कारण नोटा हातात आहे.