"आज्जी ओsss, ते काय आहे? "
तळ्यात पटापट उमटणारी असंख्य वलयं बघून मी आजीला विचारलं
"पवणार. आता चल बघू पटापट... म्हादेवाची आरती चुकंल आपली! "
"पवणार..... म्हणजे काय असते? "
"काय असतं मंजी?... पाण्यात पवणारा किडा असतो, केकरावानी. "
"केकर म्हणजे? "
"केकर मंजी झुर्रळ.. आता चल बघू! "
माझ्या प्रश्नांची मालिका मध्येच सोडून आजीनं तळ्याच्या बांधावरून झपाझप पुढं चालायला सुरुवात केली.
मी एक चपटी दगडाची कपची उचलून, आडव्या हातानं पाण्यावर मारली. पाच-सहा टप्पे घेऊन ती तळ्यात बुडली. आमच्या वर्गातला गज्या दहा-पंधरा टप्पे करायचा. जे मला अजूनपर्यंत जमले नव्हते. मी अजून तीन चार प्रयत्न केले. पण सहा टप्प्याच्या वर काही नाही गेलो. जवळपासच्या सगळ्या कपच्या संपल्या. वैतागून एक मोठा धोंडा उचलला आणि पाण्यात फेकला. ड्ब्ब करून मोठा आवाज झाला... गारवेलातनं दोनतीन पक्षी केकाटत उडाले. या तळ्याच्या आसपास बरेच मला नांव माहीत नसणारे पक्षी होते. आज्जीला त्यांची नावं विचारायची होती. पण आजी तर गेली पुढं!
तळ्याचा बांध उतरून आजी डोंगराच्या वाटेला लागली होती. धावत जाऊन पाच मिनिटांत आजीला गाठलं... आणि तिचं बोट पकडलं.
"का रं ए ईपार्या... का वात आणलायंस... गुमान बरुबर चल आता!... न्हायतर पुढच्या येळंला घरात बस"
"............ "
पडेल चेहरा करून मी शांतपणे आजीबरोबर चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याला दगड रचून त्याची दीड-दोन फूट उंचीची भिंत तयार केलेली होती. तिला आम्ही बाऊंड्री म्हणायचो. दुष्काळाच्या वेळेत लोकांना रोजगार मिळावा म्हणून सरकारने ती भिंत बांधून घेतली होती. भिंतीच्या पलीकडचा भाग फॉरेस्ट खात्याकडे होता. आणि आतली झाडे तोडायला परवानगी नव्हती. जवळपास सगळी झाडे सुबाभळीची होती. ही सगळी माहिती आजीनेच सांगितलेली.
बर्याच दिवसांपासून मला गिलोर तयार करायला Y फाटा असलेली एक फांदी पाहिजे होती. तसले बरेच फाटे इथल्या झाडांना होते. आज्जी जवळच्या खुरप्याने ते आरामात तोडता आले असते.
"आज्जी ओ"
"हं"
"तुम्ही खुरपं आणलंय का? मला त्या झाडाची फांदी पाहिजे... गिलोरी तयार करायला. "
" गुमान चल. ही झाडं तोडनं सरकारी गुना हाय! "
"मला एकच फांदी पाहिजे" मी काय हेका सोडायला तयार नव्हतो.
"गिलोरी करून काय चिमण्या मारणार हायंस का? फ़ासंपारध्याचा हायंस व्हय तू?? "
".......... "
"साळंत मास्तर हीच शिकवत्यात का तुमास्नी? "
आजी नेहमीप्रमाणे शेवटी आमच्या मास्तरांच्या शिकवणुकीवर आल्या.
"आरं बाबा..... दुस्काळात लोकांनी रगात आटवून ही झाडं लावल्यात. तवा कुठं पाऊस पडाय लागलाय आता. ही झाडं जर आज आपुन तोड्ली तर परत दुस्काळ येणार न्हाय का?
तुला येक फांदी पायजे. गावातल्या परत्येक पोरांनं जरका अशी एकेक फांदी तोडली, तर काय र्हायील का शिल्लक? "
"हम्म्म.... मला नको गिलोरी, आजी! "
"शाना पोरगा हायेस तू! " म्हणून आजीनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला.
चढाच्या पायवाटेनं धावत धावत मी आजीला मागे टाकून पुढे आलो. डोंगराच्या मध्यापर्यंत पोहोचल्यावर दम लागल्यामुळे थांबलो. तोंडालाही कोरड पडली होती. इथून आता दूरापर्यंतचे दिसत होते. मला हे दृश्य पाहायला जाम मजा वाटायची. त्यासाठी तर पुढे धावत यायचा एव्हढा आटापिटा! चटया अंथरल्यासारखी शेते, छोटी छोटी घरे, गावाच्या मधोमध दिसणारे शिदोबाच्या देवळाचे शिखर, आमची शाळा, गावामागच्या टेकडीवरची पाण्याची टाकी, सगळं गांवच दिसत होतं! रस्त्यावरची माणसे मुंग्यांएवढी दिसत होती आणि बस काड्याच्या पेटीएवढी! मगाशी आम्ही ज्या तळ्याच्या बांधावरून आलो, ते तळे माझ्या तळहाता एव्हढे दिसत होते.
आज शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने महादेवाच्या वाटेवर बरीच गर्दी होती. तसेच आज गर्दीचे अजूनही काहीतरी खास कारण होते.... महादेवाच्या डोंगरावर भागीर्ती आली होती म्हणे. "दहाबारा वर्षानंतर भागीर्ती आली ”, असे काहीतरी आज्जी सकाळी निघताना म्हणत होती. बहुदा कोणीतरी पुजारी बाई वगैरे असावी, असा माझा अंदाज होता.
आजीला देवदेव करायची फार हौस! पूर्णं श्रावण महिना ती उपवास करायची. दर श्रावणी सोमवारी महादेवाच्या डोंगरावर अनवाणी जायची... आणि त्यादिवशी तर कडक उपवास.... फक्त पाण्यावर!
माझ्या घशाला कोरड पडली होती. आजीजवळच्या टोपलीत पाण्याची चरवी होती. त्यामुळे ती वर यायची मी वाट बघत होतो. आजी एका हातानं डोक्यावरची टोपली सांभाळत अनवाणी पायाने वर चढत होती. मध्येच ती थांबली... जरा पाठीमागे गेली आणि डोक्यावरची टोपली सांभाळत वाकून तिने काहीतरी रस्त्यावरून उचलले आणि बाजूला फेकले.
"काय होतं ओ आज्जी? "
"काट्याची फ़ांजर हुती बाळा. ती रस्त्यावरनं बगलंला टाकली. "
"पण तुम्हाला तर दिसली होती ना! "
"व्हय मला दीसली हुती. पर मागनं येणार्या कुनाच्या पायात घुसली असती!.... तुझ्यावानी अजून कुनाचा नातू टणाटण हरणावाणी उड्या मारत आला, आन तेचा पाय जरका काट्याच्या फ़ांजरीवर पडला.... तर तेच्या आज्जीचं काळीज किती तुटलं असतं! "
मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. फार अभिमान वाटला त्यावेळी तिचा. आणि तो प्रसंग कोरला गेला मनावर... कायमचा!
"तान लागली अशील..... वाईच हात लाव पाटी खाली उतरायला. "
आजीची ही एक खासियत होती. कसं काय माहीत तिला सगळं आपोआपच कळायचं.
पाणी पिऊन झाल्यावर तिनं बटव्यातून खडीसाखरेचा एक खडा काढून माझ्या हातावर ठेवला. तो तोंडात टाकून आम्ही पुढे निघालो.
*****
महादेवाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आडाजवळ एका मोठ्या काहिलीमध्ये प्रसादाची खीर शिजत होती. मंदिराच्या तोंडाशी जबरदस्त गर्दी झालेली होती. बहुतेक आरतीची वेळ झाली असावी. आज आधीच्या सोमवारापेक्षा जवळपास दहापट जास्त गर्दी होती. आजीने डोक्यावरची टोपली उतरवून नारळवालीजवळ ठेवली आणि माझी चप्पल तिच्याजवळच काढायला लावली. आम्ही आडाजवळ जाऊन हातपाय धुऊन आलो. नारळवालीकडून अगरबत्ती नारळ घेऊन, गर्दीच्या मागे आरतीसाठी उभे राहिलो. बाहेर फक्त मंदिरातल्या घंटांचा आवाज ऐकू येत होता आणि बाहेर टाळ्यांचा गजर. काहिलीत शिजणार्या खिरीच्या वासामुळे माझ्या पोटात वेगळाच गजर सुरू झाला होता! मी आजीकडे पाहिले, ती शांतपणे डोळे मिटून हात जोडून उभी होती. तिच्याकडे पाहिल्यावर थोड्या वेळासाठी मीही शांतपणे डोळे मिटून हात जोडले.
एरव्ही मला खीर हा प्रकार नाही आवडायचा. पण प्रसाद आवडला. आजीने थोडी खीर एका डब्यामध्ये भरून घेतली आणि तिच्या टोपलीमध्ये ठेवून दिली.
"चल... आता भागिर्तीला जाऊया. "
"... कुठे? "
"तिकडं खालच्या अंगाला आल्या वाटतं.. ती काय लोकं चालल्यात. "
"मी नाही येत.... तुम्ही जाऊन या. मी इथेच थांबतो वाट बघत. "
"आरं बाळा म्हादेवाच्या डोंगराव, बारा वर्सानं आल्या भागिर्ती... चल बघू! "
मला अजून चालायची इच्छा नव्हती..... पण आज्जीसाठी....
"बरं.. चला. "
भागिर्ती म्हणजे कुणी व्यक्ती नसून एक पाण्याचा झरा आहे, हे जेव्हा कळले तेव्हा तर माझी अजूनच निराशा झाली. त्या एव्हढ्याश्या झर्यामधले पाणी छोट्या भांड्याने काढून लोक बाजूला अंघोळ करत होते. काही लोक झर्यातले पाणी पीत होते. काही लोक बाजूला उदबत्त्या लावून दगडावर नारळ फोडत होते. झर्यामध्ये पैसे टाकत होते. चरव्यांमधे झर्यातले गढूळ पाणी भरून घेत होते. आजीनेही चरवीतले घरुन आणलेलं चांगलं पाणी ओतून दिलं आणि ते गढूळ पाणी भरून घेतले. झर्याला नमस्कार केला. मलाही करायला लावला. पाणी मात्र प्यायला मी साफ नकार दिला! माझे भागिर्तीबद्दलचे कुतूहल मावळले. चकार शब्द न काढता मी आजीच्या पाठोपाठ परतीच्या रस्त्याला लागलो. जाताना कितीही तहान लागली तरी, ते गढूळ पाणी अजिबात प्यायचे नाही असं पक्कं ठरवून टाकलं.
जाताना तर सगळा उताराचा रस्ता. त्यांवरून तोल सांभाळत पळत उतरायला मजा यायची. वरच्या कड्यांतून खाली आल्यावर मला पायथ्यापर्यंत यायला फक्त पाच मिनिट लागली. आज्जी अजून मधल्या कड्यांतच होती. तिला खालीपर्यंत यायला अजून अर्धा तास तरी लागणार. तोपर्यंतचा वेळ, अर्थात मी तळ्याजवळ घालवणार होतो.
तळ्यात तीन चार म्हशी मस्तपैकी डुंबत होत्या. म्हशींच्या पाठीवर, डोक्यावर बसून काही पक्षी टोच्या मारत होते. एका म्हशीला त्यांचा मालक दगडाने घासून स्वच्छ करत होता. मला बघून त्याने विचारलं, " कुनाचा रं तू? "
"अंताक्काचा नातू. " हे संबोधन सांगितले की अजून जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही पडायची.
"कितवीला हायंस? "
"सहावीला. "
गावातल्या सगळ्यांचे जवळपास ठरलेलं प्रश्न असायचे. तेव्हढे सगळे विचारून त्या माणसाने दुसरी म्हैस घासायला घेतली. तळ्याच्या बांधाच्या पालीकडच्या बाजूला बरीच झाडे होती. त्यात लोळुंब्यांची पण काही झुडपे होती. जांभळ्या रंगाची ती छोटी छोटी तुरट्गोड फळे छान लागत.... आणि जीभ मस्तपैकी जांभळी होऊन जायची. आमच्या वर्गातली काही मुलं या फळांची शाई तयार करत. इथल्या झाडांना भरपूर लोळुंब्या लागल्या होत्या. मी आधी भरपूर खाल्ल्या मग खिशातला रुमाल काढून त्यात भरून घेत होतो.
तेवढ्यात आज्जीची हाक आली. घाई घाईत वर चढताना माझ्या चपलेच्या बाजूने एक काटा खसकन पायात घुसला... "आई ग्गं " ओरडून कळवळत तीथंच जाग्यावर बसून गेलो. घोट्याच्या खालच्या बाजूला असलेल्या मांसात काटा घुसला होता.
"आरं देव्वाsss केलास का उद्योग! " म्हणून आज्जी खाली आली. तिने पाय हातात घेतला, मला दुसरीकडे बघायला लावून एकाच हिसक्यात काटा बाहेर काढला... तशी त्यातून रक्ताची धार लागली. त्यावर बोट दाबून आज्जीनं त्या म्हैसवाल्या माणसाला बोलावलं. त्याच्याजवळचा डबीतला चुना, काटा घुसला होता त्या जागी लावला. रक्त वाहायचे थांबले आणि आज्जीचे तोंड सुरू झाले.
"डोळं काय कपाळावर लावल्यात का तुझं?... सरळ रस्त्यानं जायला येत न्हाय का?.... कुठं न्यायची म्हनुन सोय न्हाय तुमाला! "
तिचा वैताग आणि हळहळ दोन्ही एकाच वेळी चालू होतं.
चरवीतलं थोडं पाणी टोपणात काढून तिनं मला दिलं.
"पी"
"नको मला ते पाणी. "
"असं येड्यावाणी करु नगं... भागिर्तीचं तीर्थ हाय. एक हजार वर्स तप केलं हुतं भागिरत राजानं ह्या पाण्यासाठी! "
"म्हणजे? "
"भागिर्ती मंजीच गंगा नदी.. तिला स्वर्गातनं पृथ्वीवर आणायला भागीरत राजानं लै कठोर तप केलतं"
"अगं आज्जी गंगा नदी हिमालयात आहे" मी माझं थोडंफार भूगोली ज्ञान पाजळलं.
"व्हय म्हाईत हाय मला.... पर ही आपल्या म्हादेवाच्या डोंगरावरची भागीर्तीबी गंगाच हाय. "
"असं कसं असेल? "
"चल... तुला भागीरत राजाची गोस्ट सांगते वाटंत. पाणी पी हे आधी. तिथंबी पाणी प्यायला न्हाय म्हणलांस म्हणून ही शिक्षा मिळाली. "
तिचंपण बरोबरच होतं. मी ते चरवीच्या टोपणातले पाणी पिऊन घेतले. थंड आणि चवदार होतं... आणि आता तेव्हढे गढूळपण दिसत नव्हते. बहुतेक सगळा गाळ चरवीच्या तळाला बसला असेल.
घरी जायच्या वाटेत आजीने भगीरथ राजाची गोष्ट सांगितली. भगीरथ राजाचे ६० हजार पूर्वज कपील मुनींच्या शापाने भस्मसात झाले. त्यांची राख पाताळलोकांत पडून होती. कित्येक वर्षापासून त्यांच्या आत्म्यांना मुक्ती(मोक्षप्राप्ती) मिळत नव्हती. त्यावर एकच उपाय होता, तो म्हणजे स्वर्गातली गंगा नदीचे पाणी. गंगेचा स्पर्श जर त्यांच्या राखेला झाला तरच त्यांना मोक्षप्राप्ती होणार होती. भगीरथाने त्यांना मोक्ष मिळवून द्यायचा ठाम निश्चय केला होता. त्यासाठी भगीरथ राजा, राज्याचा सगळा कारभार मंत्रिमंडळाकडे सोपवून हिमालयात निघून गेला. एक हजार वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर ब्रम्हदेव प्रसन्न झाले. स्वर्गातील गंगा नदीला पृथ्वीवर पाठवण्यास ब्रम्हदेव तयार झाले. पण तरीही अजून एक फार मोठी समस्या होती. गंगा नदी जर स्वर्गातून पृथ्वीवरून आली तर तिचा भार सहन करायची ताकद पृथ्वीमध्ये नाही, हे ब्रम्हदेव जाणून होते. त्यांनी भगीरथाला सांगितले की गंगेच्या प्रवाहाने पृथ्वीतलावर भयंकर संहार होईल. गंगेच्या प्रवाहाला आवरण्याची ताकद पृथ्वीवर फक्त भगवान शंकरामध्ये आहे. ते जर ही जबाबदारी घ्यायला तयार झाले तरच गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणता येईल.
भगीरथाने मग शंकराला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या सुरू केली. लवकरच भगवान शंकर भगीरथावर प्रसन्न झाले आणि गंगेचा भार सहन करायची जबाबदारी घ्यायला तयार झाले.
पण गंगेला हे रुचले नाही. तिला वाटलं अंगाला भस्म फासलेला, एक फकीर काय माझा भार सहन करणार. तीच्या मनातला हा उद्दाम विचार भगवान शंकरांना लगेच समजला. गंगेचा प्रवाह स्वर्गातून पृथ्वीवर येताच भगवान शंकरांनी तिला आपल्या जटांमध्ये कैद केलं. सगळेच देव घाबरले. गंगेला जटांमधून मुक्त करण्यासाठी शंकराच्या विनवण्या करू लागले.
शेवटी भगीरथाने शंकराचे पाय धरले. गंगेच्या स्पर्शाशिवाय माझ्या पूर्वजांना पाताळलोकातून मोक्ष मिळणार नाही.. एक हजार वर्षे कठोर तप केलं आहे मी गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी. देवा तिला कैदेतून मुक्त करा. भगवान शंकरांना माहीत होतं की गंगेला जर असंच सोडलं तर ती नक्कीच पृथ्वीवर संहार करेल. त्यावर उपाय म्हणजे हीच्या प्रवाहाला विभागणे. पाच वेगवेगळ्या प्रवाहांमध्ये त्यांनी गंगेचं पाणी विभागलं. त्यातला एक प्रवाह पाताळलोकामधून सोडला. ज्याच्या स्पर्शाने भगीरथाच्या सर्व पूर्वजांना मुक्ती मिळाली. भगीरथामुळे गंगा पृथ्वीवर आली त्यामुळे गंगेचं भागीरथी हेही नांव आहे. पाताळातून वाहणारा गंगेचा प्रवाह पृथ्वीतलावरील अनेक शंकराच्या मंदिराजवळ वर येतो. तिला लोक भागीरथी म्हणतात.
आजीची गोष्ट संपता संपता आम्ही गावाजवळ येऊन पोहोचलो. माझा काटा बोचलेला पायही दुखायचा कमी झाला होता.
"तर अशी हाय भागिर्तीची गोस्ट.... आपल्या देव्हाऱ्यातल्या शंकराच्या चित्रांत बघीतलंस का न्हाय... शंकराच्या जटांत एक बाय काढलेली हाय... जिच्या तोंडातनं पाण्याची येक कारंजी उडताना दिसते. तीच गंगा नदी. "
"हो आज्जी... पाहीलंय मी. "
"मंग आत्ता कळ्ळं का भागिर्तीला का पुजत्यात ते लोकं? खऱ्या गंगा नदीएव्हढाच मान हाय तीचाबी.
काय ठावं आमच्या मुखात मरताना तरी गंगेचं पाणी पडतंय का न्हाय. ही मिळालं म्हादेवाच्या कृपेनं तीच नशीब! "
"............... "
*********
सकाळी धुक्यात हरवलेलं हारीद्वाराच गंगेचं विशाल पात्र बघता बघता आजीनं सांगितलेली भगीरथाची कथा त्या श्रावणी सोमवाराच्या सगळ्या प्रसंगांसहित आठवली.
अंतीमसमयी गंगाजल काय आजीच्या नशिबात नव्हतं. तेव्हा मी तिच्याजवळही नव्हतो. तिला पाणी पाजायची तर लांबची गोष्ट! तिला जास्त झालं होतं तेव्हा मी नोकरीनिमित्त दूर होतो. तिचं शेवटचं दर्शनही नाही झालं, मातीला पोहोचलो होतो. ती गेलीये असे मात्र अजूनही कधीच वाटत नाही. तिच्या आठवणी अगदी काल घडलेल्या गोष्टींपेक्षाही ठळक आहेत मनांत.
बर्याच गोष्टींमधलं आजीचं देवभोळेपण बुध्दीप्रामण्यवादी नसलं तरीही ते माणुसघाणीही नव्हतं! खूप कष्टाळू होती ती. स्वतःच्या कामावर तीचा देवापेक्षाही जास्त लोभ होता. स्वच्छता, प्रामाणिकपणा यातही तीचा देव अखंड होता.
माझ्याबद्दल सांगायचं तर..तसं पाहता आताशा बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. बाहेरच्या बदलतातच, आतल्याही बदलल्या आहेत. आज देवावर विश्वास आहे.... पण तो माणुसकीमधल्या देवावर. देवळामधल्या देवावर तेव्हढा नाही! अंधश्रद्धा जोपर्यंत माणुसकीच्या आणि निरागसतेच्या चौकटीत आहे तोपर्यंत ती असह्य नाही होत. त्याविषयी अनादर तर नक्कीच नाही वाटत. पण ती चौकट पार झाली की मात्र कधीकधी शिसारी येते. एका नदीचे पाणी प्यायल्यामुळे अथवा तीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे सगळी पापे धुतली जातात, हे जसेच्या तसे नाही पटत.अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर हरिद्वारला आवर्जून जावे असं काही पुर्वनोयोजित नव्हते. तीर्थक्षेत्र म्हणाले की तिथली गर्दी, अस्वच्छता, पुजार्यांचे पैशासाठी पाठी लागणे आणि जबरदस्ती करणे हे जीवावर येतं. अशा ठिकाणी देव राहत असेल हेच कधीकधी खरं नाही वाटत!
********
पण यावेळी सासूसासर्यांमुळे हारीद्वार-ह्रिशीकेशला जायचा योग जुळून आला. मुहूर्त वगैरे पाहून नव्हतो गेलो, पण अनायासे दुसर्या दिवशी सोमवती अमावस्या होती. गंगास्नानासाठी हा दिवस फार शुभ मानतात. त्यामुळे अर्थात त्यादीवशी भरपूर गर्दी होती. हारीद्वार म्हणजे, टिपीकल गजबजलेलं तीर्थक्षेत्र असेल, असं मी मनात चित्र तयार केलं होतं... तसं बिलकुल नाही वाटलं हारीद्वार. प्रथमदर्शनी इथली स्वच्छता(अपवाद वगळता) सुखद धक्का देऊन गेली. इथल्या वातावरणातही कमालीची प्रसन्नता आहे. गंगेच्या प्रथम दर्शनाने तर डोळे निवळले.
दर बारा वर्षातून एकदा इथे कुंभमेळा भरतो. नुकताच इथे महाकुंभमेळा(जो १४४ वर्षांतून एकदा येतो) झाला. आम्ही भेट दिली तेव्हा हरिद्वारमध्ये या कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू होती.
हरिद्वारमध्ये गंगा नदीवर बरेच घाट आहेत. त्यातला "हर की पौडी" हा सर्वांत जास्त महत्त्वाचा. तिथल्या पाण्यात अमृताचा अंश आहे, असा समज आहे. त्यामुळे इथल्या स्नानाला सर्वांत जास्त महत्त्व आहे. इथेच घाटावर बरीच मंदिरे आहेत. त्यातले एक गंगा नदीचे मंदिर आहे. रोज सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर हर की पौडी घाटावर गंगा नदीची आरती होते. तो सोहळा खरोखर बघण्यासारखा असतो.
आरतीसाठी इथे फुलांनी सजवलेले पानांचे द्रोण विकत मिळतात. त्यामध्ये दिवाही असतो. आरती झाल्यानंतर हे द्रोण गंगेच्या प्रवाहात विसर्जन केले जातात....आणि गंगेचा प्रवाह हजारो दिव्यांनी उजळून निघतो.
गंगेचा प्रवाह हिमालयातून उतरून हरिद्वारला प्रथम सखल प्रदेशात येतो. इथून पुढे गंगेचं पात्र विस्तारत जाते.
हर की पौडीच्या आधी एक धरण बांधलेलं आहे. गंगा आरतीच्या आधी या धरणातले पाणी सोडल्याने प्रवाह एव्हढा गतिमान दिसतो. नाहीतर एव्हढा वेग नाहीये पाण्याला.

[गंगा आरती- हर की पौडी,हरिद्वार.]
चंडीदेवी आणी मन्सादेवी(मनीषा देवी?) ही हरिद्वारची प्रसिद्ध मंदिरे आहेत. दोन्ही पर्वतावर आहेत...वर जाण्यासाठी रोप वे (उड्डाण पाळणा..हा मजेशीर शब्द आहे. तिथे 'उडन खटौला' म्हणतात. ) ची सुविधा आहे.
[चंडी मंदीर]
चंडीदेवीच्या मंदिराशेजारी दोन उंचवटे आहेत. चंडीदेवीने ज्या दोन असुरांचा नि:पात केला त्यांच्यावरून या उंचवट्यांची नांवे आहेत- शुंभ आणि निशुंभ.
इथून हरिद्वारच्या दुसर्या बाजूला असलेलं मन्सादेवीचे मंदिर दिसते. वेळेअभावी आम्हाला तिथे जाता नाही आले.
या घाटाचे नांव आता आठवत नाहीये. पण इथे जास्त गर्दी नसल्याने, इथल्या ब्रिजवरून गंगेचे पात्र निवांतपणे न्याहाळता येते.




मस्तच रे प्रकाश ! माहिती तर छानच पण प्रत्येक फोटोमधल्या प्रकाशयोजना अफ़लातुनच रे....! ते खालून ९ क्रमांकाचं चित्र मुद्दाम थोडं ब्लर केलं आहेस का? मस्त एखाद्या पोर्ट्रेटचा फ़ील येतोय त्यात.
मस्त लिहिलय! शेवटचा फोटो सगळ्यात मस्त आलाय!
मन्सादेवीच्या देवालयाचाही भारी.
विशाल, त्या चित्राचं एक्स्पोजर टाइम १ सेकंद आहे. बिना ट्रायपॉडचे गर्दीमधुन एव्हढे लाँग एक्स्पोजर मिळवल्याबद्दल मीच माझी पाठ थोपटली होती.
धन्स रे.
सुरवातीचा आजीसोबतचा प्रसंग जबरा वर्णन केला आहेस.
डोळ्यासमोर उभा राहिला बघ.
फोटो तर मस्तच आहेत.
छान लिहिलंय. फोटो तर नेहेमीप्रमाणे मस्तच.
३,४, ७,८, अन शेवटचा फोटो भारी ! लेखही मस्त झालाय.
लेख आणी फोटो दोन्ही मस्तच नेहमी प्रमाणे,
मस्त लेख आणि फोटो.. शेवटचा सूर्यास्ताचा तर कातिल...
वा. छान गोष्ट आणि फोटू.
चित्रदर्शी लेख....जबरीच..... आजी आणि नातू, ते वातावरण डोळ्यांसमोर उभं केलंत!!
हरिद्वारचे फोटोजही सुरेख. हर की पौडी वरील गंगारतीचे फोटो घ्यायला जमले का हो? खूप धम्माल येते ते सारं अनुभवायला.
इतक्या सुंदर फोटोजबद्दल (विशेषतः फुलांनी सजवलेल्या पानांच्या द्रोणाचा....) आणि लेखाबद्दल धन्स!
छान लिहीलं आहे
वृतांत आणि फोटोज मस्तच रे.
सगळेच फोटो आवडले
>> तीर्थक्षेत्र म्हणाले की तिथली गर्दी, अस्वच्छता, पुजार्यांचे पैशासाठी पाठी लागणे आणि जबरदस्ती करणे हे जीवावर येतं. अशा ठिकाणी देव राहत असेल हेच कधीकधी खरं नाही वाटत!
अगदी मनातलं! त्यामुळे बरीच चांगली चांगली ठिकाणं बघाविशीच वाटत नाहीत!
सगळे फोटो मस्त, खासकरून वाहत्या गंगेचा आणि शेवटचा सूर्यास्ताचा!
फार छान लिहीले आहे! फोटोज अर्थातच सुरेख!
छान! उत्तम लिखाण!
छानच. आजीच्या आठवणी खासच.
सुरेख फोटो आणि तितकाच उत्तम लेख
क्या बात है प्रकाश.... तुम्ही लोकांनी जाम धमाल उडवलीय राव...
फोटो - अप्रतीम , विवेचन , शैली त्याहुन अप्रतीम !!!
""""अंधश्रद्धा जोपर्यंत माणुसकीच्या आणि निरागसतेच्या चौकटीत आहे तोपर्यंत ती असह्य नाही होत. त्याविषयी अनादर तर नक्कीच नाही वाटत. पण ती चौकट पार झाली की मात्र कधीकधी शिसारी येते."""---- बहोत खुब !!! जियो भाई !!!
प्रकाश : यु शुड ट्राय अन राईट मोर... छान लिहीता.. चिअर्स !!!
सुरेख !! माझ्या गावावरुन ही गोदावरी नदी वाहते, जिला तिकडे सगळे गंगाच म्हणतात ते आठवले. प्रचंड वाळू उपसा केल्याने आता फक्त भले मोठे पात्रच उरले आहे
फोटो आवडले आणि त्याहूनही लेखन. श्रद्धा-अंधश्रद्धा यावरचे चिंतन आणि आत्मपरीक्षण खूप आवडले.
उत्तम लेख ,फोटो आवडले .
मस्त ! खुप छान फोटो ! .... अजून वाचल नाही.
वा मस्त. आजीची गोष्ट छानच.
शेवटचा फोटो फारच छान आलाय
छान लिहिलय तुम्ही. फोटोपण सुरेख आहेत.
प्रकाश छानच लेख आणि फोटोसुद्धा !
१ से. एक्स्पोजरचा फारच उत्कृष्ट !
छान लेख. सुरूवातीचा आजीचा लेख तर एक स्वतंत्र ललितच आहे..
आणि मस्त फोटो. शेवटला फोटो तर भन्नाट आहे.
मनःपुर्वक धन्यवाद सर्वांचे.
लेख आवडला हे आवर्जून सांगीतल्याबद्दल जास्त धन्स....कारण थोडी धाकधूक होती,पोस्ट करायच्या आधी....मी बराच वेळ घेऊन लिहीलं होतं.
लेखाची गुंफण छानच रे...
छान. फोटो तर आवडलेच पण लेखसुद्धा खुप सुरेख जमलाय.