सोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग १०

Submitted by बेफ़िकीर on 13 April, 2010 - 09:27

तारांकित हॊटेल रेव्हन्सला मध्यरात्री अडीच वाजता आमदार बंडाभाऊ चेक इन झाले तेव्हा त्यांना कधी एकदा पाठ टेकतोय असे झाले होते. उस्मानाबादहून तडक ध्यानीमनी नसताना सोलापूरला यावे लागले होते. तेही केवळ अडीच तीन दिवसात पुन्हा! मधे कुठल्यातरी हायवेवरील चांगल्याशा हॊटेलमधले जेवण सोडले तर बंडाभाऊ सतत गाडीतच बसून प्रवास करत होते. अंग अवघडले होते. त्यातच सचिव माने अन जिल्हाध्यक्ष हेही उद्या पहाटे पोचतायत कळल्यावर आमदारांना आणखीच काळजी पडली होती. आपण अगदी वाजत गाजत इथून परवा गेलो तेव्हा मीना आपल्या या निर्णयाचे सोने करेल असे वाटले होते. या पोरीने दोन दिवसात जे गुण उधळले ते बघता बाबा नाराज होणे साहजिकच होते. पार्टीचा कार्यकर्ता आत गेला. पाठोपाठ माधवलाही आत घेतले. अचानक पार्टीचा चेहराच काळवंडल्यासारखा झाला. बदनाम झाल्यासारखा झाला. त्या हॊस्पीटलमधल्या.. राठी का कोण तो... त्याला नेमके आत्ताच कसे काय माधवविरुद्ध दंड थोपटावेसे वाटले? साली चाल आहे चाल! पदावर बसून वैयक्तीक सूड उगवतीय पोरगी! आपण काही बोलायची गरजच पडणार नाही उद्या! सचिवच तिचा राजीनामा मागतील. त्यांनी नाही मागीतला तर आपण मागू!

आमदार हिंस्त्र चेहरा करून रूममधे बसले होते.

आपले मोठेच चुकले. दलदलीतल्या पोरीला आपण सिंहासनावर बसवले. आता उद्याचा दिवस कंटाळवाणा, रटाळ अन कष्टाचा जाणार होता. पहाटेपासूनच चक्र हलवावी लागणार होती. भाऊंना ते पद देऊन टाकावे. सचिव स्वत:ही तेच करतील म्हणा! बाबांना काही भाऊंना सोडावेसे वाटणार नाही. एकदा आपल्याला आपली भूमिका वार्ताहरांसमोर स्पष्ट करावी लागेल. नवीन हातांमधे, युवा हातांमधे पार्टीचे नेतृत्व देण्याचा आमचा विचार होता. महिलांना राजकारणात सक्रीय करण्याचा व आत्मनिर्भर करण्याचा आमचा विचार होता. पण दोन दिवसात पार्टीमधील कार्यकर्त्यांवर जी निष्कारण धूळफ़ेक करण्यात आली ती याच नवीन नेतृत्वाने घडवून आणलेली होती हे आम्हाला समजले. असले दिशाहीन नेतृत्व आम्ही बदलत आहोत. वैयक्तीक सुडाने पेटलेले नेतृत्व आम्हाला नको. आम्ही आमचा निर्णय बदलून जिल्हा उपप्रमुखपद श्री. भाऊसाहेब बनसोडे व आमचे प्रिय भाऊ काका यांच्या अनुभवी व समर्थ हातांमधे देत आहोत.

मनातल्या मनात तर भाषण कधीच तयार होते. पण आत्ताची वेळ इतरांच्या पुढे राहण्याची होती. ’वन हू इज प्रॊपरली इन्फ़ॊर्म्ड, कॆन टेक बेटर डिसीजन्स’ या उक्तीला स्मरून आमदारांनी सहाय्यकाला रूममधे बोलवून घेतले.

बंडा - जरा इन्फ़र्मेशन काढा... काय काय घटन घडल्यात त्याची.... काय? तासात रिपोर्ट करा.... आम्ही झोपायच्या आधी

सहाय्यक मान लववून बाहेर गेला. उद्या सकाळीच सचिवांची गाठ घेण्याचा प्रसंग येणार म्हणजे आत्ता ड्रिंक घेणे योग्य नाहीच.

पण झोपही येत नाहीये. काय करावे? भाऊंना फ़ोन करावा?

भाऊंच्या बंगल्यातला फ़ोन नुसताच वाजत होता. चार वेळा रिंग दिल्यावर आमदारांनी तो प्रयत्न सोडला. म्हातारा पिऊन उताणा पडलाय की काय! असो. उद्या थयथयाट बघायचाच आहे त्याचा! मानेकाका येणार म्हंटल्यावर आधीच मांस चढलं असेल अंगावर त्याच्या!

बाबाही घाई फ़ार करतात. एखादा डिसीजन, तोही मुलानेच घेतलेला, असा फ़िरवायचा म्हणजे काय राहिली आपली? बर, पुन्हा आपणच लोकांना असं दाखवायचं की आम्ही स्वत:हूनच आमचा डिसीजन फ़िरवलाय! माणसाने व्हायचं तरी किती बेरकी?

मीनाची आठवण आली तसे मात्र बंडाभाऊ अस्वस्थ झाले. काही म्हणा, पोरगी कमाल आहे. बेडवरही अन राजकारणाच्या मैदानातही! पण नंदन अन माधवने तिचं काय बिघडवलंय? काही समजत नाही. तिचा माधवशी तर संबंधच मुळी जिल्हा उपप्रमुख झाल्यावर आलाय. दोन दिवसात एवढं काय झालं? या पोरीला आपली वैयक्तीक सल्लागार करुयात काही दिवसांनी! जरा रस तरी निर्माण होईल या धावपळीत!
आमदारांचे विचार वाट्टेल त्या दिशेला जात होते. वयाचा अन सत्तेचा परिणाम होता तो. आपण स्वत:च घाई करून मीनाला उगाच पद दिले हे त्यांना जाणवतच नव्हते.

त्यातच सहाय्यक आला. त्याच्याकडे फ़ारच किरकोळ माहिती होती. भाऊ बंगल्यावर नाहीयेत, पोलीस चौकीवर माधव अन नंदन बरोबर फ़क्त दोन शिपाई आहेत, बाकीचा स्टाफ़ कोणत्यातरी अपघाताच्या केसमधे गुंतलेला आहे अन मीनाताई घरी गेलेल्या आहेत.

या माहितीचा बंडाभाऊंना काहीही उपयोग नव्हता. त्यांनी कडू नजरेने सहाय्यकाकडे पाहिले अन तो निघून गेला.

दिवे विझवून आमदारसाहेब आडवे झाले. रेव्हन्समधील या स्विटमधे एकट्याने झोपायची त्यांना सवय नव्हती. त्यामुळे पहाट होईपर्यंत डोळे उघडेच होते. साडे चारला कसेबसे डोळे मिटतायत तोपर्यंत सहाय्यकाचा इंटरकॊमवर मेसेज आला. मानेसर पोचलेले आहेत. सकाळी सहा वाजता मीनाताईंबरोबर कार्यालयातच मीटिंग आहे. जिल्हाध्यक्ष तेथे डायरेक्ट येणार आहेत. पण अजून भाऊसाहेब बनसोड्यांशी कॊन्टॆक्ट झालेला नाही.

रात्रभर झालेले जागरण अन कटकट सेकंदात बाजूला सारत आमदारसाहेब फ़्रेश व्हायला उठले.

राठीला हाकललेले असले तरी सेटलमेंट होईपर्यंत तो कॊलनीतच आठवडाभर राहणार होता. आज पहाटे अचानक त्याच्या घरचा फ़ोन अडीच वाजताच वाजला. तो इंटरकॊम होता. तांबे नर्सने सांगीतले की भाऊसाहेब बनसोडे आलेले आहेत. रक्ताची तपासणी करून घ्यायला. खरे तर राठी कामावर जाऊ शकतच नव्हता. तो गेलाही नाही. पण भाऊसाहेब कसे काय रात्रीचे उपटले हे त्याला समजत नव्हते. त्यातही एच. आय. व्ही. ची तपासणी करायला? राठी मनातल्या मनातच हसला. आपली नोकरी गेली तर गेली... पण या माणसाची टेस्ट पॊझिटिव्ह यावी अशी त्याने प्रार्थना केली.

मात्र भाऊसाहेब बनसोडे बिनडोक होते. नुसते कुणी धमकी दिली की तसे काही होत नसते हे समजायची शुद्ध त्यांना राहिली नव्हती. एवढासा चेहरा करून ते बावळटासारखे बसलेले होते. टेस्ट रिपोर्ट उद्या - म्हणजे खरे तर आजच, पण दिवसा - मिळेल असे सांगीतल्यावर ते निघून गेले. जाताना एका डॊक्टरशी जुजबी बोलून गेले. खरे तर ही असली टेस्ट जाहीर रीत्या करण्याची त्यांना लाज वाटत होती. पण पर्याय नव्हता. जे काय आहे ते लवकर समजले की बरे असा त्यांचा विचार होता.

तेथून ते त्यांना माहीत असलेल्या एका आयुर्वेदीक वैद्याकडे पहाटे चारलाच गेले. त्याने घाबरतच दरवाजा उघडला. आत्ता या वेळेस पूर्णपणे दारू प्यायलेला जखमी तोंडाचा बनसोडे इथे का यावा हे त्याला समजत नव्हते. भाऊंनी त्याला विश्वासात घेऊन सांगीतल्यावर तो हसत म्हणाला की तपासणी करून घेता आहातच ना? मग काही आढळले तर बघू. बाकी सध्या ही दोन औषधे घेऊन जा... आणि आता हे सगळं बंद करा...
त्याचा चेहरा पाहून भाऊंच्या जीवात जीव आला. पाच वाजत ते बंगल्यावर आले तेव्हा दाराच्या आतच चिठ्ठी लटकत होती.

’सकाळी सहा वाजता कार्यालयात यावे असा मानेसाहेबांचा निरोप आहे. अर्जंट मीटिंग आहे.’
तोंडाचा मंगल वास घालवण्यासाठी पंधरा मिनिटे भाऊंनी अव्याहत प्रयत्न केले. पण ती जाणीव काही जाईना!

तिच्यायला या मान्याच्या! सकाळी सहा ही काय वेळ आहे मीटिंगची?

नंतर त्यांना आठवले. साला आपल्याच भल्यासाठी आहे मीटिंग!

तुफ़ान वेगात त्यांनी आवराआवर केली. पावणेसहाला आपल्या गाडीत बसून ते कार्यालयाकडे निघाले तेव्हा त्यांच्या बंगल्यातला फ़ोन वाजत होता. पण तो घ्यायला आता कुणीच बंगल्यावर नव्हते. तो फ़ोन होता हरजिंदरसिंग बग्गाचा! शर्मिलाची सी.डी. बनवलेली तिला कशाला सांगीतले हा प्रश्न आपण भाऊंना विचारू शकतो हे त्याला सकाळी त्याची उतरल्यावर आठवले होते. उगाचच मधल्यामधे शर्मिलाला दोन लाख द्यावे लागणार होते. आणि त्या सी.डी.ची कॊपी तरी आहे का हेही कन्फ़र्म करायचे होते. कॊपी असती तर शर्मिलाला ’तुझी सी.डी. नकोच आहे असे सांगायचे’ आणि भाऊंकडून सी.डी. घेऊन ती नेटवर अपलोड करून संपूर्ण पैसे आपणच घ्यायचे व भाऊंना त्यांचा शेअर द्यायचा असा त्याचा प्लॆन होता.

त्याचवेळेस सोलापुरातील एका वेगळ्या रुग्णालयात कावेरीचे पोस्ट मार्टेम चाललेले होते अन डिपार्टमेंटच्या ड्रायव्हरबाबत जमावामधे असंतोष निर्माण झाला होता. लोक हळूहळू जमू लागले होते अन पेटू लागले होते. वाघमारे हादरून बसलेला होता. शर्मिलाला कधीच चौकीवर पुन्हा पोचवण्यात आले होते. तिच्या सगळ्याच स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. भाऊंनी त्या दिवशी आपला अल्वरचा प्लॆन मान्य केला असता तर आत्ता आपण या राज्यातच नसतो हे तिला आठवले. चौकीत बसूनच ती एकटीच भाऊंना शिव्या द्यायला लागली. भाऊ तिथे नव्हतेच. तिला महिला पोलीस गप्प करत होत्या. पण शर्मिलाला काल कावेरीकडून जो मार खावा लागला अन नंतर दहा मिनिटे वाघमारेने जी जबरदस्ती केली त्यामुळे अंग तर ठणकत होतेच पण अपमानही झाला होता. तिने महिला पोलिसालाच शिव्या दिल्या. मग ती कशाला सुटतीय? दोन महिला पोलिसांनी तिला आक्रोश करेपर्यंत बडवले. एकूण स्कॆंडलमधील एक एक मोहरा पिटला जात होता. शर्मिलाला आयुष्यात असे प्रसंग कधी सहन करावे लागले नव्हते.

त्याचवेळी नंदन अन माधव कसेबसे खुरडत हालचाली करत होते व पाणी मागत होते. मी सांगेपर्यंत त्यांना पाणी द्यायचे नाही ही वाघमारेची सूचना सर्वजण आनंदाने पाळत होते. त्या दोघांच्या तोंडात आता वाघमारेला शिव्या देण्यासाठी लागेल इतकाही ओलावा उरल नव्हता.

आणि रस्त्याने जाताना भाऊ अवाकच झाले होते. हे कधी झाले? कुणी केले? आपल्याला काहीच कसे माहीत नाही? यात काय हेतू आहे? चाल आहे कुणाची ही? की फ़ालतूपणा आहे हा काहीतरी?

रस्त्यावर टप्प्याटप्प्यावर, वळणावळणावर फ़लक लागले होते. माननीय आरोग्यमंत्री दादासाहेब व अहिंसा क्रान्ती पक्षाचे माननीय आमदार बंडाभाऊ यांना सोलापुरवासीयांचा सलाम! मीनाताईंना जिल्हाप्रमुखपद देऊन त्यांनी स्त्रीचा सन्मान केला. तसेच नीतीमुल्ये पुनर्प्रस्थापित करण्याचा आरंभ स्वत:च्या पक्षापासून केला. बहिणीप्रमाणे ज्यांना सन्मानीत करायला हवे अशा युवतींना फ़सवणारे अधम टोळके आमदारसाहेबांनी उद्ध्वस्त केले. समस्त सोलापुरामधील भगिनींना आज खराखुरा बंधू लाभला. बंडाभाऊंचा सत्कार आज! सर्वांनी कृपया उपस्थित राहावे. आरोग्यमंत्र्यांना कोटी कोटी प्रणाम!

मजकुरात काही काही वैविध्य होते हे सोडले तर असे फ़लक सर्वत्र होते. आरोग्यमंत्र्यांचा, बंडाभाऊंचा अन अगदी छोटासा असा मीनाचा फ़ोटो असलेले फ़लक होते हे.

लोकांना सकाळचा पेपर मिळून नंदन अन माधवची बातमी कळायच्या आधी हे फ़लकच दिसले होते अन टोळकी जमा होत होती. या फ़लकांवर भाऊंचा काहीच उल्लेख नव्हता. अहिंसा क्रान्तीचा फ़लक सोलापुरात अन त्यावर बनसोडेंचा उल्लेख नाही ही एक ऐतिहासिकच बाब मानावी लागली असती.

आणि पाच वाजल्यापासूनच मीना कार्यालयात होती.

सहाला पाच मिनिटे कमी असताना पाच गाड्या वेगात कार्यालयापाशी येऊन थांबल्या. गाड्यांमधे बसलेले यच्चयावत लोक येतानाच अवाक झालेले होते. आमदार, त्यांचा सहाय्यक, माने, जिल्हाध्यक्ष, सगळ्यांचे खंदे निष्ठावान कार्यकर्ते अन ड्रायव्हर्स! हे काय? आपण सोलापुरात आलो कशासाठी अन हे काय चालले आहे? जिथे पाहावे तिथे आरोग्यमंत्र्यांचा आशीर्वाद देणारा फ़ोटो, बंडाभाऊंचा हात जोडलेला फ़ोटो अन कुठतरी अगदी लहानसा मीनाचा फ़ोटो? अन सोलापुरवासींयांना खराखुरा भाऊ मिळाला?

रेव्हन्समधून निघताना आमदार अन माने एकाच गाडीत बसले होते. जिल्हाध्यक्ष वेगळ्या मार्गाने कार्यालयात त्याचवेळी पोचले होते. गाडीत बसले तेव्हा बंडाभाऊ मानेंसमोर खजील वाटत होते. पण जसजशी गाडीने तीन चार वळणे घेतली... आमदारांची छाती फ़ुगली. मानेच खजील झाले. जिकडे पाहावे तिकडे अहिंसा क्रान्ती पक्षाचा जयजयकार अन आरोग्यमंत्री अन बंडाभाऊंचा जयघोष!

गाडीत सुरुवातीला स्वत:च्या पदाचा सार्थ अभिमान असलेले माने कार्यालयात पोहोचेपर्यंत गरीब गाईसारखे झाले होते. केवळ दहा मिनिटे, पण दहा मिनिटांत सगळ्यांची रस्त्यावरील फ़लकांमुळे मानसिकताच बदलली होती.

कार्यालयाबाहेर तर तिसराच प्रकार होता. किमान साठ बायका बंडाभाऊंच्या नावाचा उदो उदो करत होत्या. सौ. भेंडेंनी आपले मंडळ मीनाच्या म्हणण्यावरून कामाला लावले होते. बंडाभाऊ गाडीतून उतरताच घोषणांचा आवाज तिपटीने वाढला. इतक्या सकाळी सोलापूरने घोषणाबाजी पाहिलेली नव्हती. पाच सुवासिनींनी सुहास्य मुद्रेने बंडाभाऊंना ओवाळले. दोघींनी सर्वांना, अगदी ड्रायव्हरसकट सर्वांना राख्या बांधल्या. सगळे नुसते अवाकच झाले होते. हा सोहळा बघायला शंभर एक पब्लिकही जमले होते. पाच पेपरांचे वार्ताहर कॆमेरे अन लेखण्या सज्ज करून तयार होते. लखलखाट, झमगाट चाललेला होता. आमदारांना अक्षरश: भरून आले होते. माने नि:शब्द झाले होते. जिल्हाध्यक्ष मानेंकडे विचारी नजरेने पाहात होते. ड्रायव्हर आपल्यालाही राख्या बांधल्या म्हणून खुष झाले होते.

मीना! पांढरी शुभ्र साडी, कोणताही मेक अप नाही,.... प्रसन्न मुद्रेने पुढे झाली. तिने मानेकाकांना वाकून नमस्कार केला. आपोआपच मानेंनी मनापासून आशीर्वाद दिला. मग मीनाने आमदारांकडे बघून मान लववली. जिल्हाध्यक्षांकडे बघून हात जोडून मान लववली. भाऊ बाजूलाच उभे होते. ते भयानक दिसत होते. नाकावरील जखम, रात्रभर जागरण, प्रचंड अपेयपान आणि जोडीला अपमान! मीनाने त्यांच्याकडे पाहून हात जोडून प्रसन्न मुद्रेने नमस्कार केला व ’भाऊ, तुम्हीच व्हा ना पुढे, तुम्ही आमच्यात सगळ्यात वरिष्ठ आहात सोलापुरात’ असे म्हणून भाऊंना अजिबात अंदाज येऊ शकला नसता असा धक्का दिला.
सगळे शूरवीर कार्यालयात आले. मीनाच्या जागेवर आज बसण्याचा मान अर्थातच जिल्हाध्यक्षांचा होता. त्यांच्या शेजारी माने बसले. डाव्या बाजूला, नेमके शेजारी असे नाहीत, पण समोर असेही नाहीत, अशा पद्धतीने आमदार बसले. समोर अर्थातच भाऊ बसले. काका म्हस्केंना भाऊंच्या शेजारची खुर्ची देण्यात आली. मीना मात्र बाजूला, दहा फ़ूट अंतर ठेवून उभी राहिली.

आता निराळाच प्रश्न निर्माण झाला. उद्याच्या पेपरात आपला आत्ताच झालेला उत्स्फ़ुर्त सत्कार फ़ोटोंसकट येणार याची माने, जिल्हाध्यक्ष अन आमदारांना पुर्ण कल्पना आली होती. आता इथे बोलायचं काय?

नुसतेच एकमेकांकडे बघण्यात पाच मिनिटे गेली. त्यात पुन्हा जिच्याशी बोलायचं आहे ती तर तिसरीकडेच उभी आहे. आपल्यासमोर आहेत भाऊ अन काका म्हस्के!

बाहेर घोषणा चालूच होत्या. अचानक मीना बाहेर गेली व आतल्यांना ऐकू येईल अशा पद्धतीने बाहेरच्या बायकांना म्हणाली की आज पक्षाची महत्वाची मीटिंग आहे तेव्हा काहीकाळ घोषणा कृपया थांबवा. नऊ वाजता मानेकाका, जिल्हाध्यक्ष आणि आमदारसाहेबांचा सत्कार आहे त्यावेळेस पुन्हा उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा.

आता आणखीन काय सत्कार करणार? सगळ्यांच्या मनात हाच विचार चाललेला होता.

जे जे घडेल ते ते पहावे असा दृष्टीकोन ठेवून सगळे बसलेले होते. मीनाने अचानक भाऊंवरील प्रेम व आदर व्यक्त करायला सुरुवात केली. संजयला बोलवून तिने ताबडतोब भाऊंसाठी औषध आणायला सांगीतले. नाकाला काय झाले आहे असे कुणीतरी विचारेपर्यंत मीनाने भाऊंच्या पाठीशी उभे राहात ’या वयात किती कष्ट करता भाऊसाहेब, आम्हाला लहान लोकांना मार्गदर्शन करत राहा ना फ़क्त’ असे लाडीक उद्गार काढले. राजकारण राजकारण म्हणजे काय याचा खरा धडा माने, जिल्हाध्यक्ष अन आमदार यांना आज मिळाला होता. एका कोवळ्या पोरीकडून...

मात्र आता विषयाला तोंड फ़ोडायलाच हवे होते. म्हणजे ही इच्छा आमदारांना अजिबात्चह होत नव्हती. पण मानेंना त्याच मिशनवर पाठवलेले होते. अन जिल्हाध्यक्षांना तर हे महत्वाचे कामच दिले होते.

पण आत्ताचा झालेल्या घटनांचा प्रभाव विरत नव्हता, त्याचे प्रेशर सगळ्यांवरच होते.

जिल्हाध्यक्ष - मीनाताई.. आपणही बसा ना...

नम्रतेची पराकाष्ठा करत मीना पाच फ़ुटांचे अंतर ठेवून एक खुर्ची घेऊन बसली. सगळ्यांची नजर तिच्याकडेच वळत होती. ही कालची पोरगी भलतीच शक्तिवान दिसतीय! केवळ दोन दिवसात इतकी माणसं जमवली?

माने - अं! आज एका महत्वाच्या डिस्कशनसाठी आपण इथे जमलो आहोत...

मीना भलतीच स्मार्ट निघाली. काय डिस्कशन आहे याची तिला संपूर्ण कल्पना होती. तिने आपला वार करायचे ठरवलेच होते.

मीना - सर... एक विनंती आहे.. अर्थात.. आपल्याला योग्य वाटले तरच....
माने - काय?
मीना - आपली चर्चा सुरू होण्यापुर्वी...
माने - बोला.. बोला..
मीना - अं! ... माधवसाहेबांच्या पत्नीचा अर्ज आलाय सर.. तेवढे एकदा उरकले असते म्हणजे मग...
माने - माधवची मिसेस? .... कसला अर्ज?
मीना - जरा विचित्र केस आहे सर... इथेच बोलू.... की...

आमदार ऎलर्ट झाले. आपल्या अपरोक्ष काहीही संवाद होऊ नये अशी त्यांची इच्छा होती.

बंडा - काहीच हरकत नाही... सगळे पार्टीचे जुने जाणते नेते आहेत..

मानेंनी अचानक आमदारांकडे बघितले. दोघांचेही एकमेकांवर प्रेशर होते. आमदार हे संस्थापकांचे चिरंजीव असण्याचे प्रेशर मानेंवर तर माने हे बाबांच्या गळ्यातला ताईत असण्याचे प्रेशर आमदारांवर!

मीना - सर.... त्यांनी म्हंटलंय की त्यांच्या सख्ख्या बहिणीलाही..... माधवसाहेबांनी...

अर्धवट विधान ऐकूनच सगळे जागच्याजागी उडाले.

जिल्हाध्यक्ष - काय? ... बहिणीला काय?
मीना - अं! ... सर.. मला सांगायला...
माने - संकोच करू नका...
मीना - सर मेहुणीवरही त्यांनी....

आमदार डोळे फ़ाडून मीनाकडे बघत होते. मीनाच्या हातात कागद होता. सगळेच तिच्याकडे डोळे फ़ाडून बघत होते. जिल्हाध्यक्षांनी तो कागद स्वत:कडे घेऊन नीट तपासला. मानेंची मान खाली झुकलेली होती. भाऊ ’हे काय चाललंय काय’ असा विचार करत होते.

अचानक मीना जोरात उठली. भाऊंपाशी पोचली अन भाऊंच्या पाठीवर हात फ़िरवत म्हणाली:

मीना - भाऊ! नका हो असा त्रागा करून घेऊ. मला माहितीय, तुमचा माधवसाहेबांवर खूप विश्वास होता, खूप जीव होता... या वयात तुम्हाला त्यांचं खरं रूप कळलं याचा त्रास होणारच, ....... पण मन आवरा भाऊ!

कार्यालयात एकदम नाट्य़मयता निर्माण झाली. जिल्हाध्यक्ष अजूनही तो अर्ज वाचत होते. ’माधव या नराधमाला अजिबात सोडू नये, उलट शक्य आहे तितकी शिक्षा करावी’ असे त्याची बायकोच म्हणत होती.
भाऊंना या क्षणी तरी ’माधवने विश्वासघात केलाच कसा’ असा चेहरा करणं भाग होतं! आणि आमदार हतबुद्ध झालेले होते. मीनाने दोन दिवसात केलेल्या गोष्टी तर पक्षाच्या इमेजसाठी चांगल्याच होत्या की?
’माधवच्या बायकोचा अर्ज’ असे सांगून एक बोगस पत्र दाखवून मीनाने पुढील डिस्कशनमधील हवाच काढून टाकली होती. ’माधवला का पकडले जाऊ दिले’ हा मानेंचा पहिला प्रश्न असणार होता. त्या प्रश्नाला आता काही अर्थच उरला नव्हता. माधवला पकडावे अशी मागणी खुद्द माधवच्याच घरातून लेखी स्वरुपात झाली होती.

अर्जाचे बोगस स्वरूप कळायला खरे तर इतकेच करायला हवे होते की माधवच्या मिसेसला विचारायचे. पण आत्ता या क्षणी ते करत बसायला कुणाला वेळच नव्हता. कारण अर्ज बोगस आहे म्हंटले तरी मीनाने साठ सत्तर बायका जमवून दाखवल्याच होत्या. बंडाभाऊंना सोलापुरातील भगिनींचा खराखुरा बंधू अशी पदवी जाहीररीत्या देऊन दाखवलीच होती. त्यामुळे अर्जाच्या सत्यासत्यतेवर आत्ता कुणालाच शंका वाटत नव्हती.

मीना - सर... मी आणलेल्या व्यत्ययाबद्दल खरंच सॊरी! आपण आपल्या अधिकारात एकदा वाघमारेंशी बोलून घ्याल का सर?.. माधवसाहेबांवरची कंप्लेंट मागे घ्यायला.. इतका जुना माणूस पक्षापासून दूर जायला नको.. पण... सध्या जरा दबाव वाढलाय इतकंच सर....

माने - नाही नाही.. काहीतरी काय? माधवला कसं सोडवता येईल?

मानेंच्या या वाक्यावर सन्नाटा पसरला. आपण इथे का आलो होतो अन इथे येऊन आपण काय करतोय हे मानेंनाच समजेनासे झाले होते. आमदार मात्र खुष झाले होते. पण जिल्हाध्यक्ष या सभेचे प्रमुख होते. काही झाले तरी पदाच्या दृष्टीने माने हे केवळ एक सचिव होते.

मीना - माफ़ करा सर.. चर्चेच्या आधीच हा मुद्दा काढला... कृपया चर्चा सुरू व्हावी अशी विनंती करते...

कसली बोडक्याची चर्चा करायची राहिली होती आता? तरी मानेंना आपली पोझिशन टिकवायलाच हवी होती. ’मी चर्चा करायला खास मुंबईहून आलो अन मला आता काही बोलायचंच नाहीये’ असं लहान मुलांसारखं कट्टी वगैरे करणं त्यांना अशक्यच होतं!

माने - तुम्हाला... नाकाला काय लागलं बनसोडे?

मानेंनी अचानक असंबद्ध प्रश्न विचारला.

भाऊ - पडलो काल.. घरातच..
मीना - तरीच लंगडतायत... पायाला पण लागलंय का? सर... भाऊंना खरे तर विश्रांतीची गरज दिसतीय
माने - तुम्ही घरी जा बनसोडे..
भाऊ - नाही नाही... विशेष काही नाही...

इतकीच चर्चा झाली असे वाटणेही ठीक नव्हते.

माने - आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे...पक्षाच्या प्रतिमेबाबत गेल्या दोन दिवसात सोलापुरात घडलेल्या घडामोडी... माननीय संस्थापक व आरोग्यमंत्री दादासाहेबांनी मला व्यक्तीश: या प्रकरणात सहभागी व्हायची सूचना केलेली होती. त्यांचेही मत असेच होते की ज्यांच्याबाबत जनमानसामधे असंतोष आहे ते लोक आपल्या पार्टीत असता कामा नयेत. पण एकदा हे लोक खरच वाईट आहेत का याची जातीने शहानिशा करण्यासाठी मी सोलापुरात आलेलो आहे. आपल्या मीटिंगचे प्रमुख ... जिल्हाध्यक्ष साहेबांच्या नोंदीस मी विनंतीपुर्वक अशी बाब आणू इच्छितो की पकडले गेलेले दोन्ही कार्यकर्ते हे मुळातच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले होते. जनमानसांत त्यांची इमेज अत्यंत वाईट होती. त्याचा आपल्या पार्टीच्या प्रतिमेवर अतिशय वाईट परिणाम होत होता. परिणामत: माझे असे स्पष्ट मत आहे की या दोन्ही नालायक कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्षांनी पक्षातून हकालपट्टी करावी आणि तसे पत्रक वर्तमानपत्रांना व सर्व कार्यकर्त्यांना द्यावे, जेणेकरून पक्षाने स्वच्छता मोहीम उघडल्याची भावना नागरिकांमधेही पसरेल व कार्यकर्त्यांमधेही....

माने हा लांबलचक डायलॊग बोलत असताना भाऊंच्या दोन्ही हातांची बोटे पालीच्या पंजाप्रमाणे टेबलावर रुतलेली होती. काका म्हस्के उगाचच अनुमोदन दिल्यासारखी मान हालवत होते. जिल्हाध्यक्ष अजूनही माधवच्या बायकोच्या अर्जाकडेच पाहात होते. संजय चहा बिस्किटे घेऊन आत येत होता. मीना पर्समधून मोगर्‍याचा गजरा काढून दातांत पीन धरून हात उंचावून गजरा माळत लाजून आमदारांकडे पाहात होती... आणि आमदार बंडाभाऊ मीनाकडे बघताना हरखलेल्या अवस्थेत मगाशी कुणीतरी हातावर बांधलेली राखी ओढून तिचा चोळामोळा करून फ़ेकून देत होते.

सभा संपली तसे भाऊ त्यांच्या गाडीतून, आमदार त्यांच्या गाडीतून आणि काका म्हस्के अन मीना पक्षाच्या गाडीतून निघाले तेव्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष अन सचिव यांच्यापुढे ’मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी’ हा गंभीर प्रश्न पडला होता.

वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमाडे त्वरेने चौकीवर दाखल झाले होते. अनेक विचित्र प्रकार घडल्यामुळे केस आता त्यांच्याकडे गेली होती. बायकांचा मोर्चा येणे, एका स्त्री आरोपीला एका अनोळखी स्त्रीने चौकीतच गुरासारखे मारणे, खुद्द वाघमारेला कुणीतरी थप्पड लगावणे, जिच्यावर केस करणे शक्य आहे अशा स्त्रीला एका पक्षाच्या प्रमुखपदी असलेल्या स्त्रीने सरळ घेऊन जाणे, हे पोलिसांनी बघत बसणे आणि शेवटी जिला अडकवलेले आहे तिलाच अज्ञात कारणासाठी वाघमारेने चौकीच्या बाहेर काढणे व त्यात कावेरी नावाच्या एका तरुणीचा अपघती मृत्यू होणे!

नेमाडे आल्यापासून शर्मिलाचे विव्हळणे अन आशा दोन्ही संपुष्टात आले होते. हा माणूस रॆकेटशी संबंधीतच नाहीये तर याला आपण काय ऒफ़र करणार याची तिला व्यवस्थित जाणीव होती. माधव अन नंदनकडे पाहून तिला वाईट वाटत होते. हे तेच दोघे ज्यांच्याबरोबर आपण कित्येकदा पार्ट्या करायचो, गप्पांना ऊत यायचा, नुसती धमाल असायची. आज असे मार खाऊन पडले आहेत की पाणि मागण्याचीही त्यांच्यात ताकद नाही आहे.

भाऊंवरचा तिचा राग मात्र कमी न होता क्षणाक्षणाला वाढतच चालला होता. अजून सी.डी. प्रकरण निष्पन्नच झालेले नव्हते. मधेच कधीतरी पहाटे सुंदरमल येऊन वाघमारेला शोधून निघून गेला होता. हा का आला असावा ते शर्मिलाला समजत नव्हते. पण आपल्याला पकडल्याचे भाऊंना निश्चीतच समजलेले आहे. या नालायक माणसाने स्वत:ची कातडी बचावण्यासाठी आपल्याकडे इतके दुर्लक्ष करावे? ज्याच्यासाठी आपण काय काय केले नाही त्याने?

नेमाडेंनी त्यांच्या अधिकारात सौ. भेंडे, मीना कातगडे व मोर्चातील बायका या सगळ्यांची तक्रार नोंदवली. सौ. भेंडेंना आणायला महिला पोलीस पिटाळले. मीना कातगडे कोण आहे याचा मात्र आधी शोध घेतला. अहिंसा क्रान्ती पक्षाचे नाव ऐकल्यावर नेमाडे जरा नरमले. काहीतरी विचार करून त्यांनी दोन्ही तक्रारी रद्द केल्या. सौ. भेंडेंना आणायला गेलेल्या महिला पोलिसांना परत आणण्यासाठी दुसरे पोलीस पाठवले.
नंतर त्यांनी सर्वांदेखत वाघमारेला फ़ायर करायला सुरुवात केली. त्यांचा आवेश बघून वाघमारे गर्भगळीत झाला होता.

आणि सकाळी नऊ वाजता पुन्हा ढेबे सभागृह कार्यकर्त्यांनी फ़ुल्ल भरले होते. यावेळेस त्या दिवशीच्या खोलीतील बाथरूममधे लपणारी मीना बिनदिक्कत आमदारांच्या शेजारी त्याच खोलीत बसली होती. माने, जिल्हाध्यक्ष आणि सगळेच हसून खेळून एकमेकांशी बोलत होते. एक भाऊ सोडले तर सगळे आनंदात होते. मात्र आरोग्यमंत्र्यांना आजच्या सकाळचा निर्णय कुणी सांगायचा यावर माने आणि जिल्हाध्यक्ष यांचे काही एकमत होत नव्हते. तो तिढा बंडाभाऊंनी सोडवला. त्यांनी सर्वांदेखतच वडिलांना फ़ोन लावला. सगळे याच खोलीत बसलेले आहेत असे आधी त्यांना सांगीतले. त्यानंतर त्यांनी मीनावर स्तुतीसुमने उधळवली. सकाळची सगळी हकीगत साद्यंत कथन केली. माधवच्या बायकोच्या अर्जाबद्दल सांगीतले. मला सोलापुरच्या सर्व भगिनींचा भाऊ म्हंटले जात आहे हे सांगीतले. महिला वर्ग कमालीच्या उत्साहाने पक्षाकडे वळलेला आहे असे ते म्हणाले. एवढे सगळे झाल्यावर मग जिल्हाध्यक्ष अन माने साहेबांशी बोलले. त्यांच्याही आवाजात कुठेही शंका आली नाही तसे आरोग्यमंत्री चपापले. हा उलटा प्रकार कसा काय घडला असावा याची त्यांना सेकंदातच कल्पना आली. त्यांनी मीनाला फ़ोन द्यायला सांगीतला.

मीना - नमस्ते सर... मीना बोलतीय
मंत्री - हं! अभिनंदन! अशीच धडाडी दाखव कार्यात! मोठी होशील...
मीना - आपले आशीर्वाद असूदेत सर...
मंत्री - फ़क्त काम जास्त अन जाहिरातबाजी कमी करायची एवढं लक्षात ठेव
मीना - .......
मंत्री - काय?
मीना - .... हो सर... हो...

फ़ोन ठेवला तेव्हा मीनाला घाम फ़ुटला होता. या माणसाने आपली युक्ती ओळखलेली आहे हे तिला जाणवले. संजयला सांगून तिने पक्षनिधीतून सर्वत्र जाहिरातींचे फ़लक लावले होते. भेंडेबाईंचा मोर्चा आमदारांवर स्तुतीसुमने उधळवण्यासाठी कार्यालयात आणला होता. झालेल्या आदरसत्कारामुळे माने, जिल्हाध्यक्ष अन बंडा भारावलेले व आनंदलेले आहेत हे त्यांच्या स्वरांमधून दादासाहेबांना सहज समजले होते. याच्या मुळाशी काय आहे हे त्यांनी क्षणार्धात ताडले होते. फ़क्त, या सगळ्या प्रक्रियेत पक्षाचीच मान उंचावली होती यामुळे ते फ़ार नाराज झाले नव्हते इतकंच! मात्र, बनसोडे निकालात निघालेला असणार हे त्यांना बसल्या जागी समजलं होतं!

भाऊ नुसतेच कसेनुसे हसत असल्यासारखे हसत होते. मात्र त्यांच्या तोंडावर पराजयाचे शल्य सहज कळण्यासारखे होते.

पक्षाच्या सभेत सर्वप्रथम आमदार, नंतर माने व शेवटी जिल्हाध्यक्षांचे भाषण झाले. सर्वांनी मीनाताईंचे कौतूक केले. कार्यकर्ते टाळ्यांचा कडकडाट करत होते. माधवचे निष्ठावंतही आता माधवला विसरलेले होते. जिकडे विजय तिकडे टाळ्या असे चालले होते.

सभा संपल्यावर मात्र माने व जिल्हाध्यक्ष आपापल्या परतीच्या प्रवासाला निघाले.

मात्र मीनाने त्यांना अजिबात जाऊ दिले नाही. आज त्यांचा सत्कार होणार होता. तो स्विकारल्याशिवाय आमच्या सोलापुरातून कसे काय जाता असा प्रेमळ प्रश्न मीनाने हक्काने विचारला होता. नाही म्हंटले तरी सत्कार म्हंटल्यावर आजही त्यांना गुदगुल्या व्हायच्याच. दोघेही थांबले.

महिला मंडळातर्फ़े तिघांचाही जोरदार सत्कार झाला.

शेवटी ते दोघे जायला निघाले तसे अचानक एक स्त्री धावत जिल्हाध्यक्षांच्या गाडीपाशी आली.

जिल्हाध्यक्ष गाडीत बसलेले होते. माने त्यांच्या वेगळ्या गाडीत बसलेले होते.

दोन, तीन जण सोडले तर कुणालाच माहीत नव्हते की ती स्त्री कोण होती...

ती स्त्री रडत रडत जिल्हाध्यक्षांना म्हणाली:

ती - माझी मुलगी आहे हो वर्षाची...हे सगळं कारस्थान रचलंय.. हे असे नाहीच्चेत... सोडा ना.. यांना सोडा

भाऊंच्या तोंडावर विकट हास्य पसरलं! सगळे त्या स्त्रीकडे पाहात होते. भाऊ मधे पडले...

भाऊ - वहिनी.. अहो तुम्हीच तर अर्ज केलात ना माधवला सोडू नका म्हणून...

तोंडावर बॊम्ब फ़ुटावा तसे माने अन जिल्हाध्यक्ष एकमेकांकडे पाहात होते. मीना शेवटच्या क्षणी हारली होती. पण हार तिला मान्य नव्हती.

ती पुढे झाली... तिने माधवच्या बायकोच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवत तिला जवळ घेतले व म्हणाली:

मीना - वहिनी... मला सांगा... कुणी जबरदस्तीने लिहून घेतला अर्ज?

असे वाक्य बोलून मीनाने रोखून भाऊंकडे पाहिले. तिने पाहिले म्हणून माधवच्या बायकोनेही पाहिले. तिच्या त्या नजरेचा अर्थ माने अन जिल्हाध्यक्षांना समजला. भाऊंची भुवई वर व्हायच्या आत दोन्ही गाड्यांमधील नेत्यांनी एकमेकांकडे हसून पाहिले अन आपापल्या ड्रायव्हरला निघायची सूचना केली.

डोळ्यातून माने अन जिल्हाध्यक्ष दोघांनाही एकमेकांचे संदेश समजलेले होते. भाऊंनी माधवचा बळी दिला होता. आता भाऊंबद्दल ते दोघे कधीच मंत्र्यांना चांगला फ़ीडबॆक देणार नव्हते.

मीना - अं? ... कुणी लिहून घेतला?

हा मीनाचा प्रश्न पुन्हा ऐकू आला तेव्हा दोन्ही गाड्या धूळ उडवीत निघून गेल्या होत्या.

शाळेचा चवथा तास संपल्यावर मधल्या सुट्टीची घंटा होते तेव्हा मुले जशी बेभानपणे वागतात तसे आत्ता आमदारांना वागावेसे वाटत होते. पक्षाचे शिक्षक तर निघून गेले होते. आता उस्मानाबादला जाऊन काम फ़ारसे काहीच नव्हते. आता सोलापूरमधे चैन करायला एक संपूर्ण दिवस अन एक संपूर्ण रात्र होती. पण इतक्या कार्यकर्त्यांसमोर मीनाला कसे विचारायचे हा प्रश्न होताच. त्यामुळे इकडची तिकडची चर्चा चालली होती. आमदारांचे प्रश्न कोणत्या दिशेला जाणार आहेत याची मीनाला पूर्ण कल्पना असल्यामुळे ती जमेल तशी उत्तरे देत होती. आमदारांच्या नजरेतूनच तिला भवितव्य समजले होते. कार्यकर्ते आजूबाजूला उभे होतेच.

बंडा - मीनाताई, तुमच्या रुपाने पार्टीला तडफ़दार नेतृत्व लाभलेले आहे
मीना - आपलं मार्गदर्शन मिळत राहिलं की झालं...
बंडा - बर शाळेच्या बांधकामाचं काय झालंय त्याची चौकशी केलीत का?
मीना - अं! दोन दिवसात जरा वेळ नाही मिळाला... पण आता करते...
बंडा - बर... तुमच्या त्या महिला मंडळाच्या मागण्यांचं काय झालं? ते बोलायचंय ना?
मीना - हो.. आपल्याला वेळ असेल तर...
बंडा - माझं अवघड आहे.. मला आज पाच मीटिंग आहेत अन रात्री ते फ़ंक्शनही आहे... मोरे.. मीनाताईंकडून तो सगळा रिपोर्ट घ्या अन मला हॊटेलवर दाखवा...
मीना - अं! ... मला जरा.. त्या संदर्भात चर्चा करायची होती....
बंडा - अं! आत्ता.. घाई आहे.. पण.. बर.. पाच मिनिटात उरका.. चला कार्यालयात
आता मोरे मधे पडला.
मोरे - सर... कार्यालयात भयंकर गरम होईल...
बंडा - मग?
मोरे - रेव्हन्सच्या कॊन्फ़रन्समधे...
बंडा - आत्ता पुन्हा हॊटेलवर कुठे जात बसायचं...
मोरे - पाच मिनिटात पोचाल सर...
बंडा - बर चला.. मीनाताई तुम्ही तुमच्या गाडीतून या... आणि कागदपत्रं सगळी बरोबर घेऊन या.. आम्ही पुढे होतो... लवकर या

मोरेने सगळे ओळखून मधे पडून मार्ग निर्वेध केलेलाच होता.

आमदार स्वत:वर खूष होऊन गाडीत बसले. मीना एक वीस मिनिटांनी कामे वगैरे आटोपल्याप्रमाणे निघाली. बरोबर कोणताही कार्यकर्ता घेतला नाही.

मात्र....

सरळ रेव्हन्सला न जाता ती ’कामत’ या उडुपी रेस्टॊरंटमधे गेली. तेथेही तिला ओळखू लागलेले काही लोक भेटलेच. त्यांना सस्मित नजरेने मान तुकवून ती एका टेबलवर बसली.

जरा विचित्रच वाटत होतं ते! मीना... आणि ते दोघं! एक पुरुष.. एक स्त्री...

पुरुष अगदीच सुमार दर्जाचा पोषाख करून बसला होता. असेल सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा! दाढी वाढलेली, फ़ॆशन या नावाखाली विटलेली जीन्स अन लाल रंगाचा टी शर्ट! मात्र तो मीनाला अतिशय सन्मानाने वागवत होता. त्याच्या नजरेत कमालीची नम्रता होती.

आणि ती स्त्री मात्र त्या हॊटेलचे भूषण ठरावे अशी होती. मीना तिच्याकडे न पाहताच तिच्याशी काहीतरी बोलत होती. ती स्त्री विचारी नजरेने कॊफ़ी पीत बसली होती. उंच, सडपातळ बांधा, गोरापान रंग, तलम गुलाबी रंगाची साडी अन गळ्यात एकच खोट्या सोन्याचे गळ्यातले.

एक माणूस नव्हता जो तिच्याकडे मान वळवून पाहात नव्हता. अत्यंत साध्या मेक अपनेही ती खुलत होती. खरे तर तिच्यामुळेच प्रसाधने खुलत असावीत असे वाटत होते. त्या स्त्रीची मुळीच चलबिचल होत नव्हती... मात्र मीनाची अतिशय होत होती.

शेवटी ’येते’ हा एक शब्द म्हणण्यापुरतेच केवळ मीनाने तिच्याकडे पाहिले. तिनेही किंचित हसल्यासारखे करत मान हालवली. मीना उठून निघून गेल्यावरही ती स्त्री अन तो पुरुष बराच वेळ तिथेच बसले होते... ते तर अगदीच विसंगत दिसत होते. मात्र.. ते एकमेकांशी एक शब्दही बोलत नव्हते.

बरोब्बर अर्ध्या तासाने दोघेही उठले. त्या स्त्रीच्या हातात एक जुनाट फ़ाईल होती. दोघेही रिक्षेत बसले. एखादा किलोमीटरच रिक्षा गेली असेल. तो पुरुष मधेच उतरला. त्याने आपली मोटरसायकल घेतली. ती स्त्री मात्र त्याच रिक्षेतून पुढे निघाली. तो पुरुष हळूहळू त्या रिक्षेच्या मागे जाऊ लागला. आणि... तो पुरुष मागून येतोय हे रिक्षेवाल्यालाही माहीत हो्ते अन त्या स्त्रीलाही... आणि ते त्या दोघांनाही माहीत आहे हे त्या मोतरसायकलवरच्या पुरुषालाही माहीत होते.

नेमाडेंना अचानक आमदारांच्या सांगण्यावरून त्यांच्या सहाय्यकाचाच फ़ोन आला. नंदन अन माधव यांची पक्षातून हकालपट्टी केलेली असून त्यांच्याबाबतची केस जोरात चालवावी. मात्र चौकशीत कोणतेही नाव पुढे आल्यास त्याची माहिती आधी साहेबांना द्यावी अन मग पुढच्या सूचना मिळतील.

पोलीस डिपार्टमेंट जणू अहिंसा क्रान्ती पक्षानेच स्थापन केले असावे अशा थाटात सहाय्यक बोलत होता. नेमाडेंना मनातून कितीही राग आला तरीही शांत राहून ’हो’ म्हणणे हेच हिताचे होते हे त्यांना माहीत होते.
नंदन अन माधवच्या जबाबात एक विलक्षण साम्य होते.

नंदनने योगिताला फ़सवून अंमली पदार्थ पाजून तिचे नग्नावस्थेतील फ़ोटो काढले होते व त्या जोरावर तो तिच्याकडे सतत लैंगीक सुखाची मागणी करत होता. तिचे वैवाह्क आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झाले होते आणि तिच्या मनावर परिणाम झाला होता. तिला मनोरुग्णालयात कायमसाठी भरती करावे लागले होते. त्यातच तेथेही तिच्यावर अतीप्रसंग ओढवला होता.

योगिता या मुलीला सोडून नंदनने आजवर इतर कुणालाही फ़सवले नव्हते. तो अहिंसा क्रान्ती पक्षाचा कार्यकर्ता होता आणि पक्षाच्या यादीत त्याचे नावही होते.

पण त्या योगिता प्रकरंणामुळे एका वेगळ्याच आरोपाखाली चौकीत आणला गेलेला माधव भलत्याच आरोपात बद्ध झाला होता. माधववर खोट्या मुलाखती घेऊन नोकरीचे आमिष दाखवण्याचा आरोप होता. मात्र कसून चौकशी केल्यावर त्याने कावेरी या स्त्रीचेही तसेच फ़ोटो काढल्याचे सिद्ध झाले होते. त्याने ते कबूल करण्याचे कारण इतकेच होते की कावेरी पहाटे मेली हे त्याला कळले होते. ते फ़ोटो कुठेही मिळाले नव्हते. माधव इतकेच सांगत होता की वर्षभराने त्याने ते फ़ोटो कावेरीला परत केले होते व ते तिने नक्कीच नष्ट केलेले असणार होते.

वाघमारेने काल दोघांना तुडवल्याचा फ़ायदा आज नेमाडेंना झाला.

नंदनने काढलेले योगिताचे फ़ोटोही मिळाले नाहीत याचे कारण योगिताच्या घरच्यांनीच सांगीतले की शेवटच्या भेटीत त्याने ते तिला परत केले व ते योगिताने नष्ट केले.

हाती कुठलाच पुरावा नव्हता. योगिता अन कावेरीशिवाय कुणी फ़िर्यादीही नव्हता. योगितावर अतिप्रसंग करणारा शांताराम फ़रार होता. त्याला पकडण्याचे प्रयत्न चालूच होते.

केवळ एक लैंगीक शोषणासाठी फ़सवून फ़ोटो काढणारे सापडण्याची केस होती ही! नेमाडेंना नुकताच हा उलगडा झाला होता. योगायोग म्हणजे त्यातला एक, म्हणजे माधव, उगाचच हाती लागला होता.

आणि....... ही टोळी नव्हती. कितीही मारले तरी दोघे हेच सांगत होते की मी जे करायचे ते केले... बाकीचे मी काय सांगणार? मी माझ्याच इच्छेने हे सगळे करत होतो.

नेमाडेंच्या मते किरकोळ केस होती. असल्या अनेक केसेस अनेक गावात झालेल्या होत्या. हे कोणतेही वासनाकांड वगैरे नव्हते. एकावर आरोप झाला म्हणून तो सापडला. दुसरा आपोआपच सापडला. खरे तर दोघेही एकाच पक्षात असून व एकमेकांना चांगले ओळखत असूनही आपल्यासारखाच दुसराही फ़ोटो काढणारा आहे हे त्या दोघांपैकी कुणालाच माहीत नव्हते. दोघांच्याही घरातील तपासणीत कॆमेरे सोडले तर हरकत घेण्यासारखे काहीच सापडले नव्हते. आणि कॆमेरे असणेही हरकत घेण्यासारखे नव्हतेच, पण यांनी नुकतेच कबूल केलेले आरोप बघता त्यांच्याकडील कॆमेरे महत्वाचे ठरणार होते. आजच्या आज यांना पोलीस कोठडी मिळवून घ्यायला हवी होती.

हा विचार चालू असतानाच आमदारांच्या सहाय्यकाचा फ़ोन आला होता. होकार भरून नेमाडे स्वस्थ झाले होते.

दोन आघाड्यांवरून तरी नेमाडे सुटले होते. एकापाठोपाठ एक चहा अन गोल्ड फ़्लेक ओढत ते सतत विचार करत होते. एक गोष्ट त्यांना अजिबात समजत नव्हती.

हे दोघे ऎरेस्ट झाले आहेत हे ठीक आहे... पण... ही बाई कशी काय इथे आली?

केवळ ती कावेरी का कोण ती मरायच्या आधी हिचं नाव घेऊन मेली म्हणून?

अन वाघमारे हिला भल्या पहाटे कुठे घेऊन चालला होता? हिच्या घराच्या तपासणीसाठी हिला न्यायची कुठे गरज आहे?

नेमकी त्यांच्या गाडीखाली ती कावेरीच कशी मेली?

अती सुदैवी असतात काही काही लोक! त्यातली एक शर्मिला होती. प्रत्येक सावज हेरण्यात तिचा काही ना काही सहभाग असला तरीही प्रत्यक्ष पिक्चरमधे ती फ़क्त कावेरीच्याच बाबतीत आली होती. आणि कावेरी मेली होती. तिची मैत्रीण, हॊटेलवरची अनघा काही रडायची थांबत नव्हती. कावेरीच्या भावाला बातमी समजली होती व तो मुंबईहून यायला निघाला होता. कावेरी ज्या हॊटेलवर नोकरी करायची तिथल्या मालकांनी चांगल्या मनाने कावेरीच्या मृत्यूनंतर फ़ोर्मॆलिटिजच्या बाबतीत जितके करता येईल तितके करायचे असे ठरवले होते.

पण बातमी फ़ुटलेलीच होती. सकाळच्या पेपरचे हेडिंगच होते की सोलापूरमधे वासनाकांड! तरुणींचे अश्लील फ़ोटो काढून त्यांना फ़सवणारे गजाआड! एक स्त्रीही सामील! खाली नावासकट सगळी बातमी होती.

त्या हॊटेलच्या मालकांना कावेरीचे हे स्वरूप अजिबात माहीत नव्हते. पण अनघाने त्यांना तो सगळा बनाव असल्याचे सांगीतले होते. त्यांनाही पटले होते. पोस्टमोर्टेममधे कावेरीने अल्कोहोल वगैरे घेतलेच नव्हते असा निष्कर्ष निघाला होता. अपघात, आत्महत्या की खून?

आणि यच्चयावत स्टाफ़ अन शर्मिला सांगत होते की वाघमारे शर्मिलाला घेऊन तिच्या घराच्या तपासणीसाठी चालला होता.

शेवटी सकाळी दहा वाजता अनघाकडून कावेरीचा किस्सा खणून काढल्यानंतर असे समजले की कोणत्यातरी चित्रपटात तिला ऒफ़र मिळाली होती काही वर्षांपुर्वी! आणि त्याचे शुटिंग हॊटेलमधेच झाले होते. आणि त्या चित्रपटाच्या संदर्भात हीच बाई, म्हणजे शर्मिला, सतत हॊटेलमधील एका रूममधे कावेरीबरोबर असायची. आणि हाच माधव त्या रूममधे असायचा. रामन नावाचा माणूस यात उगाचच फ़ोनवर ओढला गेला. त्यांनी आपले वजन वापरून स्वत:चे नावच कट करून घेतले.

अकरा वाजता जेव्हा दोन महिला पोलिसांना सहाय्याला घेऊन शर्मिलाची कसून तपासणी केली तेव्हा तिचे थोबाड उघडले.

हे रॆकेट होते. या रॆकेटचे प्रमुख होते भाऊसाहेब बनसोडे! सेकंड लेव्हलला शर्मिला, थर्ड माधव अन चवथा साथीदार होता नंदन!

वाघमारे संरक्षक होता. दादू बातमीदार अन किरकोळ कामे करणारा!

शर्मिला विव्हळत त्याच खोलीत पडलेली होती.

नेमाडेंना शॊक लागला होता. कशासाठी? सी.डी. कशासाठी बनवतात? काय करतात? वाघमारेला त्यांनी स्थानबद्ध केले. वार्ताहर अजून येऊन थडकले नव्हते ते बरे होते. बनसोडेला मुसक्या बांधून आणायचा त्यांचा विचार चालला होता. तेवढ्यात आमदारांच्या निरोपाची आठवण झाली.

आमदारांना सगळी माहिती आत्ताच नको द्यायला असा विचार नेमाडे करत होते. नुसतीच शोषणाची केस आहे असे सांगुयात असे त्यांच्या मनात येत होते.

याचे कारण त्यांच्यामते उघड होते. ज्या अर्थी आमदारांनी असा निरोप पाठवला होता त्या अर्थी आमदारांना बनसोड्यावर संशय असणार होता. आनि त्याचेच नाव फ़ुटू नये म्हणून त्यांनी तसा निरोप ठेवलेला असणार होता.

ही.सी.डी. का बनवतात यावर मात्र शर्मिला काही केल्या बोलत नव्हती. आणि ते तिला माहीतच नसावे किंवा पुन्हा नुसताच शोषणाचा हेतू असावा असे नेमाडेंना वाटले. पण असे शोषण करणारी टोळी असली तरी त्यात स्त्री कशाला? म्हणजे अर्थव्यवहार असणार हे उघड होते.

आत्ता आमदारांना ’किरकोळ केस आहे’ असे सांगावे अन एखादा वार्ताहर आला की त्याच्यासमोर शर्मिला बरळली की ’बनसोडेला धरा, तो मुख्य आहे, असे म्हंटल्यावर आम्हालाही काही करता आले नाही’ असे सांगून बनसोडेला इथे आणावा हे नेमाडेंचे ठरले.

त्यांनी रेव्हन्सला फ़ोन लावला. सहाय्यकाला आमदारांशी बोलायचे आहे असे सांगीतले. त्याने स्वत:च निरोप काय आहे विचारल्यावर नेमाडेंनी ’साधी केस आहे’ असे सांगीतले. सहाय्यकाच्या मनात विचार आला की आता आमदारसाहेब निराश होणार. त्यांना माधवला जरा चांगले अडकवायचे होते. आणि नेमाडेंच्या मनात विचार आला की सहाय्यकाला आपले बोलणे पटले असावे.

शेवटी नेमाडेंनी ’साहेबांशी बोलता येईल का’ असे विचारल्यावर ’ते आत्ता मीटिंगमधे आहेत’ असे सहाय्यकाने सांगीतले व फ़ोन ठेवला.

साहेब मीटिंगमधेच होते. पण वेगळ्या! त्यांच्या आलिशान स्विटमधे ते आणि मीना दोघंच होते!
आपल्यानंतर इतका वेळ झाला तरी मीना का येत नाही यामुळे ते सतावलेले होते. आता मानेकाका वगैरे गेलेले असल्यामुळे त्यांनी त्यांची खास ऒर्डर दिलेली होती. हळूहळू नशा सगळ्या शरीरावर पसरत असतानाच सहाय्यकाने मीनाताई आल्याची बातमी दिली. तिला आत सोडून तो रूमच्या आसपासच उभा राहणार होता. हॊटेलच्या स्टाफ़लाही आता आत प्रवेश मिळणार नव्हता.

सकाळचीच पांढरी साडी मीनाच्या अंगावर होती. तिला रूममधे बघून आमदार क्षणातच पाघळले. हॊस्पीटलच्या गेस्ट हाऊसवरील रात्र त्यांच्या डोळ्यासमोर तरळली. त्याही दिवशी तिच्या केसांमधे गजरा होता.

मीनाने वेगळाच भाव तोंडावर ठेवला होता. ताटातूट झालेली असताना अचानक प्रियकराची भेट व्हावी अन प्रेयसीने बेभानपणे धावत जाऊन त्याच्या मिठीत शिरावे असा हिंदी पिक्चरसारखा भाव तिने तोंडावर ठेवला होता. क्षणभरच आमदारांकडे पाहून ती जोरात येऊन त्यांना बिलगली.

’त्या मुलीचा राजीनामा घेऊनच उस्मानाबादला जा’!

बाबांचे वाक्य आठवून आमदारांना हसू आले. किती कमी वेळात प्रकरण उलटले होते. आपल्या निर्णयावर तर मानेकाका आणि जिल्हाध्यक्षही ठाम राहिले होते. आले होते काय करायला अन काय करून गेले... बाबाही आता समाधानी होते. आता मीना आपलीच...

मीना बिलगल्यावर क्षणार्धातच आमदारांचा संयम सुटला. त्यांनी तिला करकचून आवळली. मीना अजिबात सुटायचा प्रयत्न करत नव्हती. उलट आपला संपूर्ण देह आमदारांच्या स्वाधीन करायला तयार असावे असे स्पर्श करत होती. प्रतिसाद देत होती.

मीनातला हा बदल कावेरीसारखा नव्हता. मीनाला चटक लागलेली नव्हती. मीनाला शिसारी येत होती. मात्र अभिनय करणे अत्यावश्यक होते. इतके सगळे चांगले झाल्यावरही आमदार सोलापुरात आलेले असताना ती त्यांना भेटायला आली नाही असे होणेच आमदारांना पटले नसते. त्यामुळे अत्यंत आतूर असल्यासारखे भासवत होती.

आमदारांनी तिचे डोके हातात धरून केसातल्या फ़ुलांचा भरभरून सुगंध घेतला. तिच्या ओठांचा चावा घेताना त्यांच्या तोंडाला येणारा व्हिस्कीचा वास... मीनाला असह्य झाला. पण ती त्यांच्याहूनही बेभान असल्याप्रमाणे वागू लागली.

दहा मिनिटांनंतर तिच्या स्पर्शाने आग लागल्यावर आमदारांनी तिला उचलून बेडवर टाकले. मीना क्षणार्धात उठून बसली.

बंडा - काय झालं?
मीना - सोनलताई येणारेत आत्ता...

आमदारांना हे नावही माहीत नव्हतं अन ती कोण सोनल का कोण तिच्या येण्याचं कारणही माहीत नव्हतं! त्यांनी मीनाला जवळ ओढत विचारलं:

बंडा - कोण सोनल?
मीना - मानसी महिला मंडळाच्या अध्यक्षा...
बंडा - येऊदे.. थांबेल... मोरे आहे बाहेर

आमदारांना मोरे बाहेर असणे हे त्या बाईला थोपवण्यास पुरेसे वाटत होते. ते मीनाचे अंग कुरवाळत होते. त्यांच्या खडबडीत हातांची धाडसे वाढू लागली.

मीना - सर..
बंडा - अंहं! आत्ता बोलू नकोस...
मीना - ऐका सर... त्या येऊन गेल्यावर मी येणार होते....
बंडा - वर घे...
मीना - सर.. ऐका.. मी पुन्हा येतीय.. आत्ता त्यांना येऊन जाउदेत..
बंडा - साडी वर घे... मोरे तिला कटवेल..
मीना - नाही सर... मी आत आहे समजले तर पक्षाचं सगळं बिंगच फ़ुटेल...

धुंदी उतरली. आमदाराची धुंदी खाडकन उतरली. मोरे त्या बाईला आत येऊ देणार नाही हे ठीक आहे. पण ही मीना आत आहे हे तिला समजल्यावर आपलं काय राहिलं?

आमदार तटकन उठून बसले. मीनाही बाजूला झाली. आरश्यात पाहात तिने कपडे नीटनेटके केले.

मीना - सर... मी हे सांगायला आले होते की सोनलताईंची कुठलीच मागणी पुरी करू नका. सगळ्या गोष्टी स्वार्थीपणे करतात त्या. हे इतरांकरवी तुम्हाला सांगणं शक्यच नव्हतं! कोण कुणाला सामील आहे मला माहीत नाहीये अजून! म्हणून आले होते. तुम्हाला भेटायला दुपारी पुन्हा येणारे सर मी... पण सोनलताईंना कटवलंत तर बरं होईल. मग त्यांच्या मंडळातल्या आणखीन एक चांगल्या बाई आहेत त्या त्याच मागण्या घेऊन माझ्याकडे येणारेत तेव्हा मी तुमचे ऎप्रूव्हल दाखवून त्या मान्य करीन! म्हणजे आपल्याला साथ देणारी बाई त्या मंडळाची अध्यक्ष बनेल... हे सांगायला आले होते सर..... पण ...सॊरी.. तुम्हाला पाहून माझंच भान सुटलं.... ती सोनल सगळे पैसे स्वत: खाते...

आमदार जोरजोरात हसत होते. त्यांना मीनाची उडालेली गडबड पाहून मजा वाटत होती. त्याचवेळेस ती पक्षासाठी किती विचार करते अन पुन्हा आपल्याला पाहून तिचं भानही सुटतं हे ऐकून त्यांच पौरुषत्व सुखावलं होतं!

बंडा - गुड गर्ल! आत्ता जा.. पण... दुपारी बरोब्बर एकच्या आत यायचं!

मीनाने मंद हसून मान हलवली व ती निघून गेली.

सहाय्यकाच्या मते आता किमान सायंकाळी सहा वाजेस्तोवर साहेबांची रूम बंद राहणार होती. पण अचानक मीनाताई निघून गेलेल्या पाहिल्यावर त्याला नवलच वाटले. तो पटकन आत आला व साहेबांना सांगीतले की नेमाडेंचा फ़ोन होता.. केस अगदीच साधी आहे..

आमदारांनी मान डोलावली. म्हणजे बाबांच्या नजरेत माधवला अजून जास्त अपराधी सिद्ध करता येणार नव्हतं तर.. असो! झालं ते काही कमी नाही.

ही सोनलताई कोण आहे च्यायला? सगळा मूड घालवला....

आणि गेलेला मूड आधीच्याहून कित्येकपटींनी चांगला झाला... केवळ पाच मिनिटात...

सहाय्यक ’अध्यक्षा सोनलताई आल्या आहेत’ सांगून परवानगी घेऊन बाहेर गेला आणि सोनल आत आली. ती रूममधे जात असताना सहाय्यक तिच्या पाठमोर्‍या रुपाकडे अविश्वासाने पाहात होता. स्त्री इतकी सेक्सी असू शकते? आपला साहेब साला कोणतं नशीब घेऊन जन्माला आला आहे समजत नाही... पुढच्या जन्मी तरी आमदार कर देवा... उस्मानाबादचाच...

अलगद दार लोटून सोनल रूममधे गेली आणि सहाय्यक तिचे रूप आठवत बाहेर येऊन बसला.

आणि आमदार बंडाभाऊ बसल्या जागीच बेशुद्ध व्हायची वेळ आली होती.

बंडा - या... बसा (तिच्यावरची नजर हटवणंच शक्य होत नव्हतं आमदारांना)
सोनल - सोनल... मानसी महिला मंडळाची...
बंडा - अध्यक्षा..
सोनल - काही मागण्या होत्या आमच्या (तिचा मुलायम आवाज ऐकूनच आमदारांची पंचाईत व्हायची वेळ आली होती.)
बंडा - करू ना...
सोनल - अं?
बंडा - करू ना मागण्यांचा विचार.... आमच्याकडे लोक मागण्या घेऊनच येतात...

सोनल खळखळून हसली.

काय हसते ही बाई? नाहीतर आपली बायको...

ती मीना गे...अं... हो... खरंच... ती मीना गेली तेच बरं झालं... हिला तरी कधी पाहणार आपण... इतक्या जवळून?

सोनल - ऐकल्याच नाहीत आपण अजून.... मागण्या
बंडा - बोला... काय मागण्या आहेत?
सोनल - गरीब महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून निधी हवा होता
बंडा - किती?
सोनल - पाच..
बंडा - हे तर मोठं चांगलं काम आहे...
सोनल - पण लोक माझ्या विरुद्ध आहेत...

आमदारांना अचानक आठवलं की हिच्या मागण्या पुर्ण करण्याची हमी द्यायची नाहीये. पण हे सांगणारी मीना कोण? या सोनललाच पक्षाकडे वळवलं तर? मीनाच्या नुकत्याच घेतलेल्या सौंदर्याच्या पुसटश्या आस्वादाला क्षणात विसरायला लावणारं लावण्य समोर बसलं होतं!

बंडा - विरोधकांचे अस्तित्व गृहीत धरल्याशिवाय महत्कार्ये करताच येत नाहीत.

कुठून इतकं भारी वाक्य आपल्याला आठवलं असं झालं आमदारांना स्वत:लाच!

सोनल खाली बघत होती. आणि आमदार तिच्याकडे!

पारदर्शक गुलाबी साडी अन ब्लाऊजमधून तिचे सर्वांग डोळ्यांनी पीता येत होते. त्यात ती आणखी थोडी झुकून बसल्यामुळे तर आमदारांची नजरच हटत नव्हती. ही स्त्री पक्षात आली तर आपलं डोकंच ठिकाणावर राहणार नाही हे त्यांना समजत होतं!

बंडा - निधी... दिला तर...
सोनल - काय?
बंडा - नाही... निधी देण्याचा म्हंटलं आमच्या पार्टीला काय उपयोग?
सोनल - पार्टीला उपयोग होईल ना...

हे वाक्य बोलताना सोनलने आमदारांकडे असे काही पाहिले की त्यांना उठून आरोळी मारून उड्या माराव्याश्या वाटल्या. पण ते पोझिशन सांभाळून शांत होते.

बंडा - काय उपयोग होईल?
सोनल - त्या रोजगार मिळालेल्या महिलांची मतं.. मिळणारच ना... पार्टीला..
बंडा - ती काय आम्ही डायरेक्ट त्यांना रोजगार मिळवून देऊनही मिळवू शकू...
सोनल - म्हणजे?
बंडा - उद्या आम्ही एक महिलामंडळ काढू अन त्याच्यातर्फ़े हे काम करू... तुमच्या मंडळाला कशाला निधी द्यायचा?
सोनल - आमच्या महिलाही मते देतीलच ना...?
बंडा - ती किती? शे दोनशे....
सोनल - ... मग? काय केलं तर निधी मिळेल...?

हे वाक्य बोलताना सोनलने आपले डोळे आमदारांच्या डोळ्यात मिसळले. सरळ सरळ आव्हान तिच्या डोळ्यात दिसत होते. पण आमदारांना भान ठेवणे आवश्यक होते.

बंडा - पार्टीमधे सामील करा... तुमचं मंडळ... सगळा खर्च मंडळाचा आम्ही करू...

आमदार बोलत होते एकदम मुरब्ब्यासारखे... पण त्यांचे डोळे फ़िरत होते सोनलच्या दुधाळ अंगावरून...

सोनल - मंडळ कसं सामील करणार?
बंडा - ते तुम्ही बघा...
सोनल - त्यापेक्षा....
बंडा - काय?

सोनलने डावीकडे मान फ़िरवली. आता ही काय बोलते याच्याकडे आमदारांचे लक्ष होते..

सोनल - पार्टीच करा की सामील... मंडळात...

इतका मोठा विनोद आमदारांनी यापुर्वी ऐकला नव्हता. धबधबा फ़ुटावा तसे आमदार हसू लागले.

सोनल ’यांना काही समजलंच नाही’ असा भाव करून तोंड फ़िरवून बसली.

बराच वेळाने आमदारांचा हसण्याचा जोर कमी झाला.

बंडा - मानलं बाई तुम्हाला.. मानलं! ज्याच्याकडे निधी मागताय त्यालाच आपली संघटना विलीन करायला सांगताय.. हा हा हा हा....!

सोनल पायांनी रेघोट्या मारत होती गालिच्यावर! आणि हातांची बोटे एकमेकात गुंफ़वत होती. आमदारांचं लक्ष पुन्हा क्षणभर हसण्यात लागलेलं पाहून तिने आपल्याच उजव्या करंगळीने आपलाच पदर खाली ओढला.

झुळझुळीत साडी असल्याने तो पदर अचानक खाली पडला. तरी एका क्षणाहून जास्त अवधी घेऊनच तिने पदर सावरण्याची ऎक्शन केली.

मात्र... आमदार तो पर्यंत पागल झालेलाच होता.

सोनल - मला वाटलं होतं! मदत मिळेल...

अशी बाई खोलीत येऊन उठून फ़ुकट चाललेली आमदारांना सहन झाले नाही.

बंडा - समजा... दिला आम्ही निधी...

पाठमोरी सोनल पुन्हा आमदारांकडे वळली अन भिंतीला टेकून उभी राहिली.

सोनल - तर?
बंडा - तर आमची अन तुमची भेट कशाला होईल?
सोनल - म्हणजे?
बंडा - एकदा निधी दिला की तुम्हा आम्हाला विसरणार..
सोनल - छे? काहीतरी काय?
बंडा - नाहीतर आत्ता आलात तशा पाच मिनिटे बसून जाणार..
सोनल - .... मग... काय करू... निधीसाठी?
बंडा - अधून मधून भेटत जा... आमचं राजकारण फ़ार रुक्ष असतं! आम्हालाही जरा विरंगुळा..

सोनलला जाणीव झाली. याच क्षणी आपल्याला पुढाकार घ्यायला हवा.

आमदार एका जाडजूड मखमली खुर्चीवर बसले होते. त्या खुर्चीला दोन रुंद हात होते. आमदारांनी आपले दोन्ही हात त्या खुर्चीच्या हातांवर ठेवले होते. एक एक पाऊल टाकत सोनल सरळ आमदारांच्या जवळ आली अन काही कळायच्या आतच त्यांच्या डाव्या हातावर बसली. आमदारांनी ती बसल्यावर आपला हात काढून घेतला अन तिच्या पाठीवर ठेवून तिला आपल्याकडे झुकवले.

मूर्ख आमदार! कोणत्याही मंडळाची अध्यक्षा मंडळाच्या निधीसाठी स्वत:चे समर्पण कशाला करेल?

सत्ता! माणसाला बेभान करते. आमदारांनी कसलाही विचार न करता सोनलला उचलले अन ते बेडकडे निघाले. सोनलसारखा स्पर्श आजवर कुठल्याही स्त्रीमधे त्यांना अनुभवता आला नव्हता. रेशीम! तिच्या निकटच्या सहवासामुळे त्यांना तिचा सुगंध बेभान करत होता. एक मात्र होते. सोनलच्या प्रतिसादांमधे काहीही उत्सुकता नव्हती. अत्यंत थंड शरीराने ती आमदारांचे स्पर्श सहन करत होती.

आमदारांना ते जाणवलेच नव्हते. अहिंसा क्रान्ती पक्षाचा एक मस्तवाल आमदार आत्ता फ़क्त ताब्यात असलेल्या स्त्रीदेहावर तुटून पडण्याच्या इच्छेने आतूर झाला होता.

दोन तास झाले. दोन तास झाले तरी आमदारांना तिच्यापासून लांब व्हायची इच्छाच होत नव्हती. सोनलला मात्र काहीच वाटत नव्हते. ती विरोधही करत नव्हती अन इन्व्हॊल्व्हही होत नव्हती.

जवळपास अडीच तासांनी आमदारांनी पूर्ण समाधानी होत तिला दूर केले.

दोन वाजले होते. मीना केव्हाच आलेली असण्याची शक्यता होती. घोळ होणार होता.

सोनल थंडपणे उठली अन बाथरूममधे गेली. आमदारांनी पटकन सहाय्यकाला इंटरकॊमवर मीनाताई आल्या होत्या का म्हणून विचारले. ती अजून आलीच नव्हती. आमदार शांत झाले.

सोनल बाहेर आल्यावर आमदारांनी ’उस्मानाबादच्या ऒफ़ीसला कळवतो, चार, पाच दिवसात चेक येईल’ असे सांगीतले. सोनलने यावेळेस मात्र स्वत:हून त्यांचा एक प्रदीर्घ किस घेतला अन ती निघून गेली. या किसमधे मात्र तिने स्वत:ची इच्छा भरल्यामुळे हा किस आमदारांना आत्तापर्यंतच्या तिच्या सगळ्या स्पर्शांपेक्षा वरचढ वाटला.

सोनल निघून गेली तरीही आमदारांचा विश्वासच बसत नव्हता की इतकी सुंदर स्त्री आत्ता आपल्या सहवासात होती. त्यांना त्यांच्या पत्नीबद्दल तर काहीच वाटत नव्हते. पण सोनलसमोर उस्मानाबादच्या दोन मैत्रिणी, सोलापूरची शर्मिला, मीना कातगडे अन इतर अनेक नावे पुसट होत होती. दहा मिनिटांनी आमदारांनी निर्णय घेतला की सोनलला पार्टीत सामील करून घ्यायचे. अन त्यावेळेला त्यांना सोनलच्या वाक्याचा अर्थ कळला. गेले अडीच तास पार्टीच सामील झाली होती की मंडळात! हेच तर म्हणत होती सोनल! आता तर त्या विनोदावर ते एकटेच हसायला लागले.

मीनाला कामत हॊटेलमधे भेटून ज्या रिक्षेतून सोनल रेव्हन्सला आली होती ती रिक्षा रेव्हन्ससमोरच एका आडोशाला कधीची थांबलेली होती. आता त्यात मीना बसलेली होती. रिक्षावालाही नव्हता. इतका वेळ? मीनाला वाटले होते अर्धा तास, फ़ार तर पाऊण तास... जवळपास अडीच पावणेतीन तास? आमदार अन सोनल एकाच खोलीत होते? मीना घामाघूम झालेली होती. तितक्यात सोनल चालत येताना दिसली. अस्पष्टपणे मागून तो मगाचचा लाल टी शर्ट वाला माणूसही येताना दिसला .... सोनलपासून काही अंतर ठेवून... आणि मग काही वेळाने रिक्षावाला स्वत:ही आला...

तिघेही रिक्षेपाशी पोचल्यावर मीना रेव्हन्समधे प्रवेश करायला सज्ज झाली. पण त्यापुर्वी तिने सोनलला विचारले...

मीना - इतका वेळ?
सोनल - सोडत नव्हते....

हा संवाद त्या दोन पुरुषांसमोर वाढू नये या उद्देशाने मीनाने लाल टी शर्टवाल्याला विचारले...

मीना - झालं का?
तो - होय... व्यवस्थित..

पुन्हा सोनल त्या रिक्षेत बसली. रिक्षेवाल्याने रिक्षा रस्त्याला लावली. लाल टी शर्टवाला मोटरसायकलवरून दुसरी दिशा पकडून गेला. अन उन्हात घामाघूम झालेल्या मीनाने आपल्या पर्समधील सगळ्या सी.डी. आहेत ना हे पुन्हा एकदा तपासले. तिची सोडून सगळ्या सी.डी. ती घेऊन आली होती.
आमदारांना दाखवायला...

मग संध्याकाळी रूममधून बाहेर येणार होती.

आणि मग आयुष्यातल्या कदाचित शेवटच्या आहुतीसाठी रात्री पुन्हा त्यांच्या मिठीत असताना ....

त्यांचीच सोनलबरोबरची सी.डी. दाखवता येणार होती त्यांना...

ती सी.डी. संध्याकाळपर्यंत मिळणार होती विकी बारटक्के कडून...

लाल टी शर्ट वाला विकी बारटक्के होता.... सोनल ही त्याच्या माहितीतली एक पॊश कॊलगर्ल होती... रिक्षेवाला मणी होता...

आणि...

म्हंटले नव्हते? उद्या काय होणार आहे याची जराशीही कल्पना असती तर आमदार सोलापूरला आलेच नसते...?

सोलापूर सेक्स स्कॆंडलशी प्रत्यक्ष संबंध नसलेला... पण हरामखोर आमदार मीनाच्या जाळ्यात अडकणार होता.. आज रात्री....

गुलमोहर: 

माझ्या आईला पंधरा दिवसांपुर्वी कर्करोग डायग्नोस झाला आहे. सध्या केमोथेरपी व रेडिएशन ट्रीटमेंट चालू असल्याने जरा विलंब होत आहे. त्यातच लेपटॉप बिघडला आहे. चार वेळा अकराव्या भागाचेह ३०% लिखाण झाल्यावर उडून गेले.

मात्र आपल्या सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनामुळे भरून येते. आजच अकराव्वा भाग प्रकाशित करू शकेन असे वाटते.

धन्यवाद!

बेफिकीर, आईचे ऐकुन फार वाईट वाटले. काळजी घ्या, बाकीच्या गोष्टी होत राहतील हो, सध्या त्यांची ट्रीटमेंट महत्वाची.
तुम्हाला मागेही असंच काही भाग पुन्हा टाईप करावे लागले होते ना. तुम्ही प्रत्येक भाग टाईप करुन झाल्यावर ते बॅकअप म्हणुन एखाद्या पेन ड्राईव्ह किंवा सी.डी वर कॉपी करुन ठेवु शकलात तर असा प्रॉब्लेम होणार नाही.
कादंबरी अतिशय छान रित्या चालली आहे. आणि लिखाणही भरपुर झाले आहे. तेव्हा आताही आता पर्यंतच्या सगळ्या भागांचा बॅकअप घेऊन ठेवा. पु.ले.शु.