चांदोबाच्या जगात... राजमाचीला

Submitted by विमुक्त on 9 April, 2010 - 02:35

सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र ह्या प्रत्येक वेळेचा एक वेगळा सुर असतो... डोंगर-द्ऱ्यां मधून भटकताना हा सुर अगदी सहज जाणवतो... एकांत, शांतता, रातवा, घुबड, दरी मधून वाहणारा वारा ह्यांच्या स्वरांनी रात्रीचा सुर सजलेला असतो... रात्रीच जग जसं आपल्याला गुढ वाटतं अगदी तसाच रात्रीचा सुर देखील फार गुढ असतो... पण ही गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे...

मध्यरात्र उलटून गेली होती आणि आम्ही चौघे राजमाचीच्या दिशेने चालत होतो... मंद चंद्रप्रकाशात रात्रीच जग वेगळच भासत होतं... मेघा-हायवे मागे टाकला आणि लहानसा चढ चढून आम्ही तुंगार्ली तलावाजवळ पोहचलो... रात्रीच्या उजेडात तळ्यातलं पाणी मस्त चमकत होतं... गार वाऱ्यामुळे घामेजलेलं शरीर फार सुखावलं... ठाकरवाडी मागे टाकून उतरायला सुरुवात केली... दूरवर दरीच्या पल्याड श्रीवर्धन आणि मनरंजन चांदण्या मोजण्यात दंग होते... दुपारच्या उन्हात भाजून निघालेली माती रात्रीच्या गारव्याने तृप्त आणि सुगंधीत झाली होती... मातीचा ओला सुगंध, गार वारा, एकांत आणि शितल चंद्रप्रकाश अशा मंतरलेल्या वातावरणात आम्ही भटकत होतो...

दरीच्या अगदी टोकावर थोडावेळ विसावलो... दरीचा तळ दिसत नव्हता, पण खोली मात्र जाणवत होती... वाऱ्याचा स्वर दरीत घुमत होता... डोकं, मन आणि शरीर सगळच फार हलकं झालं होतं... जणूकाही दरीतल्या वाऱ्याशी एकरुप झालं होतं... कसल्याच यंत्राचा आवाज नाही... माणसांचा गोंगाट नाही... केवळ रात्रीची शातंता होती... मधूनच एखादा रातवा, घुबड खालच्या जंगलातून साद घालत होता... भान हरपून बराच वेळ हे सगळं अनुभवलं... मग घोट-घोटभर पाणी प्यायलो आणि पुन्हा वाटचाल सुरु केली... आता दाट झाडीतून पुढे सरकत होतो... झाडीत हालचाल जाणवायची, पण दृष्टीस काही पडत नव्हतं... साधारण पहाटेचे ४.३० वाजले होते... चंद्र आता जरा तांबूस-पिवळा भासत होता... पहाट होत होती मात्र काळोख वाढत होता... हळूहळू चंद्र राजमाचीच्या मागे अस्त पावला आणि सारं नभांगण नक्षत्रांनी, तारकांनी भरुन आलं... पहाटेच्या ऐवजी रात्र झाल्या सारखं भासू लागलं... आयुष्यात पहिल्यांदाच चंद्रास्त अनुभवला आणि तो देखील जंगलात, राजमाचीच्या सहवासात...

श्रीवर्धनाच्या माथ्यावरुन सुर्योदय बघायचाय म्हणून आम्ही झपाझप चालायला सुरुवात केली आणि साधारण ६ वाजता माथ्यावर पोहचलो... गार वाऱ्यात सभोवताल न्याहाळला... सारं जग शांत झोपी गेलं होतं... थोड्याच वेळात उगवतीचं आकाश जरा तांबूस वाटू लागलं... आणि हळूहळू शिरोटा तलावातून सुर्यबिंब वर आलं... सारा आसमंत सोनेरी प्रकाशात न्हावून निघाला... आळस झटकून मांजरसुंबा, ढाक जागे झाले आणि राजमाचीला साद घालू लागले... भवतालच्या जंगलातून पक्ष्यांची चिवचिवाट सुरु झाली... साऱ्या सृष्टीत चैतन्य पसरलं...

(मांजरसुंबा डोंगर आणि मागचा ढाक)

नारायणाला वंदन करुन उधेवाडीकडे निघालो... गावात एका घरात सामान ठेवलं आणि गावामागच्या तळ्याकाठी पोहचलो... तळ्याच्या गार पाण्यात मस्त पोहलो, ताजेतवाणे झालो आणि शंकराच दर्शन घेतलं...

पुन्हा गावात आलो... मस्त जेवलो... पोट भरल्यावर गुंगी आली आणि घराच्या अंगणात आडवे झालो... जाग आली तेव्हा दुपारचा १ वाजला होता...

(ह्यानं उठवलं वेळेत...)

चहा घेतला आणि लगेचच कर्जतच्या वाटेला लागलो...

(राजमाचीहून दिसणारं तळकोकण)

भर दुपारच्या उन्हात चालायला मजा येत होती... काटेसावर फुलून गेली होती, पण तिचा कापूस मात्र सगळीकडे पसरला होता... पांगारा, टबुबीआ अजून बहरलेले होते...

(पांगारा)

(टबुबीआ)

(ओळखता नाही आलं... रेन ट्रीचं फुल आहे का हे?)

इतकी नाजूक फुलं रणरणत्या उन्हात सुध्दा किती सुंदर दिसतात!...

कर्जतच्या बाजूला उतरताना वाटेत बरेच घोस्ट ट्री आहेत... रात्री चंद्राच्या प्रकाशात हे झाड चकाकत असतं म्हणून ह्याला घोस्ट ट्री म्हणतात...

(घोस्ट ट्री... मराठीत बहूतेक तरी ह्याला ‘सालदोड’ म्हणतात)

साधारण ३ तासात तळात पोहचलो... मग टमटमने कर्जतला... कर्जतहून पुण्यासाठी रेल्वे... लोणावळ्याकडे जाताना रेल्वेतून पुन्हा राजमाची आणि संपुर्ण डोंगररांग न्याहाळली... कितीही वेळ डोंगराच्या कुशीत घालवला तरी मनाचं काही समाधान होत नाही... आता परत कधी येणार अशीच हुरहुर असते...

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ते रेन-ट्रीच फुल नाहिये.
इकडे मायबोलीवर एक झाडबाबा (दिनेशदा असा आयडी आहे) आहे त्याच्या रंगीबेरेंगीत शोधल तुला रेन-ट्रीच फुल दाखवण्यासाठी पण ते पान सापडल नाहिये.
ते कदाचित ह्या फुलाच नाव सांगु शकतील.
फोटो आणि वर्णन जबरी आहे. Happy

सही ट्रेक आणि फोटोज रे . पण एक सल्ला , रात्रीचा ट्रेक करु नका , न जाणो कधी कुठे एखाद्या जंगली श्वापदाशी गाठ पडायची. बाकी योगेश म्हणतो तसा " असाच फिरत रहा आणि आम्हालापण Virtual Tour घडवत रहा."

विमुक मस्तच ट्रेक झाला तुमचा.
प्रत्तेकाने आयुष्यात एकदा तरी राजमाचीचा ट्रेक केला पाहीजे (प्रत्तेक ऋतुमधे !!).

ती फुले पाचुंडी ची आहेत., दिनेशजीच बरोबर ना ??
अरे श्री या दिवसात रात्रीच्या ट्रेक मधेच तर खरी मजा आहे.