मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी

Submitted by अभय आर्वीकर on 28 March, 2010 - 10:17

मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी

८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि.कुळकर्णी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भाषा शुद्धी आणि समृद्धतेच्या अनुषंगाने काही मौलीक विचार व्यक्त केले आहेत. त्यावर अधिक चर्चा होऊन भाषालेखनासंबधात काही निटनेटके,सुस्पष्ट आराखडे तयार होणे गरजेचे आहे.

मी साहित्यीक नाही,पण अधून-मधून गद्य-पद्य लिखान करण्याची उर्मी काही पिच्छा सोडत नाही त्यामुळे फ़ुटकळ स्वरूपात का होईना लिखान चालूच असते त्यामुळे मी साहित्यीक नसलो तरी साहित्यापासून अलिप्तही नाही.

भाषेची शुद्धता आणि समृद्धी या दोन्ही अंगाचा विचार करतांना दोन्ही बाबी लवचिक असल्या तरच दोन्हीचा समन्वय साधून भाषाविकास साधला जाऊ शकेल.

शुद्धतेचा ध्यास हवा पण भाषेच्या समृद्धीसाठी नवनविन शब्दांचा स्विकार करण्यासाठी दरवाजे सताड उघडे असले पाहीजेत. परभाषेतील काही शब्द मायभाषेत वापरतांना निसंकोचपणे वापरले गेले पाहीजेत कारण त्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द असेलच याची शाश्वतीच नसते. जसे की एन्डोसल्फ़ान, सायपरमेथ्रीन, पॅरासिटामॉल वगैरे. तर काही शब्दांना मराठीत पर्यायी शब्द तयार केले जाऊ शकते जसे की सॉफ़्टवेअर, हार्डडिस्क, ब्लॉग वगैरे. पण ह्या संशोधनाचा उगम ज्या भाषेत झाला असेल, सहाजीकपणे त्याच भाषेतील शब्द प्रथम सर्वश्रुत होतात. ब्लॉग या शब्दाने जेवढा लवकर बोध होईल तेवढा बोध अनुदिनी या शब्दाने होणार नाही हे उघड आहे. तरी पण हे मराठीशब्द शक्य तेवढे वापरायलाच हवे. मात्र तसा अट्टाहास धरणे फ़ारसे लाभदायक ठरणार नाहीत.

याउलट मराठी भाषेच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मराठी बोली बोलल्या जातात. त्या स्थानिक बोलीभाषा असल्यातरी समृद्ध आहेत. प्रत्येक बोलीभाषेचे स्वत:चे शब्दभांडार आहेत. स्वत:ची ढब,ठेवन, लहेजा आहे. या बोलीभाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत की त्याला पर्यायी शब्द प्रमाणभाषेमध्ये आज उपलब्ध नाहीत.उदाहरणार्थ,

विदर्भात मुख्यत्वे वर्हाडी आणि झाडी भाषा बोलली जाते हे सर्वश्रुत असले तरी नागपुर,वर्धा आणि आसपासच्या क्षेत्रात जी भाषा बोलली जाते ती ना झाडीबोली आहे ना वर्हाडबोली आहे,तर ती स्वतंत्र बोलीभाषा आहे. ज्याला मी

नागपुरी बोली म्हणतो. ही नागपुरीबोली सुद्धा परिपुर्ण,समृद्ध बोली आहे. या बोलीत बोलतांना एखादा शब्द नसल्याने मी कुठे अडखळलो अथवा जे म्हणायचे होते तसे सक्षमपणे बोलताच
आले नाही, असे कधी घडल्याचे मला स्मरत नाही. पण या बोलीमधील चांगले- चांगले शब्द सुद्धा प्रमाणभाषेत वापरात आलेले नाहीत.
उदा :- टोंगळा,घोटा,वज,हिडगा,गंज,गुंडी,कोपर,भेद्रं,चारं,टेंबरं,धान,आंबिल,सुतना,मनिला,
खकाणा,भोकणा,लमचा,इच्चक,चेंगड,सांडशी,बुहारा,पिलांटू,बंबाड,लल्लाऱ्या,माहुरा,बोथर,टालगी,
जित्रुब,पहार,बाज,जुप्न,सुदा,नावकुल,नावनाव,बंदा,सप्पा,सिद्दा,अध्धर,ऐनक,बेकुब,आव, कवटा,खाती, कंदोरी,शायवान,तुत्या,इरित,वार्त,वार्ती हे सर्व अर्थबोधक शब्द असूनही यापैकी बहूतांश शब्दांना प्रमाणभाषेत अजिबात पर्यायी शब्द नाहीत. टोमॅटोला भेद्र हा पर्यायी शब्द प्रमाणभाषा का स्विकारीत नाही हे गौडबंगालच आहे.प्रमाणभाषेत टोमॅटोला बेलवांगे हा मराठी शब्द आहे पण अर्थसुचक नसल्याने तो मराठीत वापरला जात नसावा.

वेगवेगळ्या बोलीभाषेतील नवनविन शब्द प्रमाणभाषेत रूजविने फ़ारसे कठीन काम नाही. लिखान करतांना ते वापरले पाहीजेत आणि वाचणाराला कळावे यासाठी तळटीप देऊन अर्थ दिले पाहीजेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मराठीभाषा शुद्धी आणि समृद्धतेची अपेक्षा व्यक्त केली तर त्यासाठी सर्वांनी काही ना काही प्रयत्न करून अमलात आणले पाहीजेत आणि त्या पदाची बुज राखली पाहीजे. तोच त्या पदाचा यथोचित सन्मान ठरेल असे मला वाटते.

गंगाधर मुटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मान्य आहे. सन्मान केला गेला पाहिजे.

वात्रट मोड ----------
काही शब्द मराठीमधे सध्याही जसेच्या तसे आहेत. जसे
की बेकुब च्या पुढचे दोन शब्द.
वात्रट मोड समाप्त----------------

ऋयामजी,

दर्जेदार,प्रभावी आणि परिणामकारक शिव्या पण भाषेत असायलाच हव्यात.
शेवटी शिव्या हे सुद्धा एक शब्दशस्त्रच आहे.

मुटेसाहेब, मी कोल्हापूरचा आहे. Happy => शिव्यांचा नितांत आदर करतो.

हे शब्द सध्याही आहेत इतकंच म्हणायचं आहे. कृपया गैरसमज नसावेत Happy

तुम्ही अत्यंत चांगला उपक्रम सांगितला आहे. रुढ मराठीत वेगवेगळ्या बोलीभाषांमधील शब्द, इंग्रजीला पर्यायी शब्द आणले तर मराठीची समृध्दी अजूनच वाढेल!

सांडशी
खकाणा
ऐनक
मेकुड
आव
गंज
गुंडी
कोपर
आंबिल

हे शब्द माझ्या मते बोलीभाषेत व लिखित भाषेत प्रचलित आहेत. हे शब्द आमच्या घरी [आम्ही नागपुरी नसलो तरी] बोलण्यात आहेत. फक्त ते त्याच अर्थी आहेत का हे माहित नाही Happy

ढोबळ मानाने शब्दार्थ

सांडशी = स्वयंपाक घरात वापरतात ती पकड
खकाणा = साचलेला धुळ
ऐनक = चष्मा
आव = आवभर म्हणजे दोन्ही हात दोन दिशेला तानल्यानंतर डाव्या हाताच्या मध्यबोटाच्या नखापासून उजव्या हाताच्या मध्यबोटाच्या नखापर्यंत होणारे अंतर.
गंज = मोठी गंजी
गुंडी = सदर्‍याचे बटन

/////////////////////////////////////////
<< शिव्यांचा नितांत आदर करतो >> Happy

मुटेसाहेब, हे शब्द ह्या अर्थांनीच मला ठाऊक होते :-)! हुश्श! फक्त आव हा शब्द अ‍ॅमिबायोसिस किंवा पोटात आव पडणे ह्या अर्थी माहित होता. किंवा 'कसला आव आणतो अमका तमका माणूस हुशारीचा' अशा अर्थी. तुम्ही दिलेला अर्थ माहित नव्हता. Happy गंज हा शब्द एका प्रकारच्या भांड्यासाठी वापरला जातो. स्वयंपाकघरात गंज, कुंडा, सतेले, कावळा, तामली, गुंडा, तसराळे, कलथा -उलथने, सांडशी/ चिमटा, ताट, ताटली, बगुणे, कळशी, तांब्या, फुलपात्र, ओगराळे, घंगाळे इ. इ. नावे आजही टेफ्लॉन वेअर, नॉनस्टिकच्या जमान्यात टिकून आहेत हेदेखील नवलच आहे.

अरुंधतीजी,
<< आव हा शब्द अ‍ॅमिबायोसिस किंवा पोटात आव पडणे ह्या अर्थी माहित होता >>
आव हा शब्द अशाकाहीशा अर्थी वापरला जातो असे पुसटसे माहीत होते. नक्की अर्थ माहीत नव्हता.

<< 'कसला आव आणतो अमका तमका माणूस हुशारीचा' >>
हा अर्थ माहीत होता.

चला आव या शब्दाचे तीन अर्थ माहीत झाले. Happy

चांगला लेख मुटे साहेब. मी पण इथे जाणीव पूर्वक मराठी चांगले लिहायचा प्रयत्न करते. वर अकू ने लिहीलेले शब्द मी पण वापरते. माझ्याकडे दोन गंज आहेत. एक ताकाचा छोटा दुसरा पाण्याचा मोठा. मुलगी लहान असताना तिला काही मैत्रीणी गुंडी म्हणत. गुंड चे स्त्रीलिंग या अर्थाने. माझे मेव्हणे नागपुरी आहेत त्यामुळे त्यांच्या कडे भैताड, देउन देशील वगैरे शब्द्प्रयोग नेहमीचेच. चाळीशीपलिकडील ते मुलगे आईला माय म्हणतात ते एवढे छान वाटते सांगू.

>>तरी पण हे मराठीशब्द शक्य तेवढे वापरायलाच हवे. मात्र तसा अट्टाहास धरणे फ़ारसे लाभदायक ठरणार नाहीत.<<
अट्टाहास धरण्यात अर्थ नाही. खरेच. माझे गुरू आहेत त्यांच्याशी एकदा यासंदर्भात मी चर्चा करत होते. ते मला प्रयोगकलांचे सौंदर्यशास्त्र शिकवायला होते आणि त्यांचा भाषाशास्त्राचा अभ्यास आहे. एक लेख लिहित असताना आयकॉनोग्राफी, सेमिऑटिक्स या शब्दांना मराठी पर्याय काय लिहावा हा मला प्रश्न पडला होता. आम्ही बराच वेळ विविध शब्द बघत होतो. चिन्हमिमांसा, चिन्हशास्त्र पासून अनेक. किमान १५ तरी शब्द काढले होते प्रत्येकी पण दरवेळेला ह्या शब्दाचा अर्थ तंतोतंत लागू पडत नाहीये हेच जाणवलं. मग नवीन शब्द तयार करायचा प्रयत्नही केला जो अजूनच समजण्यासाठी अवघड बनतोय असं लक्षात आलं. माझ्याकडून हा सगळा अभ्यास करून घेतल्यावर सरांनी काही शब्दांना मराठी पर्याय शोधण्याच्या अट्टाहासातला फोलपणा समजावून सांगितला. वेगवेगळ्या शास्त्रा/ तंत्रांच्या संदर्भातले ठराविक शब्द/ संज्ञा हे भाषांतरीत करण्यापेक्षा ती संकल्पना समजण्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे हे ही अधोरेखित करून दिलं. माझ्यामते सॉफ्टवेअर आणि हार्डडिस्क आणि ब्लॉग यांना पण आपण याच यादीत घालू शकतो.

बाकी प्रदेशाप्रमाणे भाषेचा पोत बदलतो आणि त्या पोताला अनुसरून लिहिलेली भाषा (मराठीच नव्हे इतर कुठलीही!) ही अशुद्ध असू शकत नाही. परंतू कार्यालयीन कामकाजामधे किंवा तत्सम काही ठिकाणी सुसूत्रता ठेवण्यासाठी प्रमाण भाषा असण्याची गरज पडते. आता अमुकच प्रमाण भाषा का? इत्यादी वादात जाण्यात अर्थ नाही. आपल्या आपल्या प्रदेशाच्या लहेजाबरोबरच ही प्रमाण भाषा पण माहित असणे अतिशय गरजेचे आहे असे मला वाटते.

त्याबरोबरच इतर भाषांतून अनुवाद केल्यासारखे जे वाकप्रचार(अजून पाय मोडता येत नाहीये) हल्ली प्रचलित झालेले आहेत ते मात्र मराठी भाषेची हानी करणारे आहेत. उदाहरणार्थ माझी मदत, त्याची मदत इत्यादी.. हिंदीमधे मेरी मदद, उसकी मदद असं म्हणतात त्याचं हे तसंच्या तसं भाषांतर. मराठीत मला मदत करणे, त्याला मदत असं योग्य आहे खरंतर. पण बिनदिक्कतपणे टिव्हीवर आपल्याला तेच सतत ऐकवले जाते (याठिकाणी काही जण ऐकवल्या जाते असेही म्हणतील. ते मी कधी एरवी ऐकले नसले तरी असा प्रयोग कुठून आला असावा याबद्दल कुतूहल आहे.)

बाकी तुम्ही सांगितलेली ही यादी >>टोंगळा,घोटा,वज,हिडगा,गंज,गुंडी,कोपर,भेद्रं,चारं,टेंबरं,धान,आंबिल,सुतना,मनिला,
खकाणा,भोकणा,लमचा,इच्चक,चेंगड,सांडशी,बुहारा,पिलांटू,बंबाड,लल्लाऱ्या,माहुरा,बोथर,टालगी,
जित्रुब,पहार,बाज,जुप्न,सुदा,नावकुल,नावनाव,बंदा,सप्पा,सिद्दा,अध्धर,ऐनक,बेकुब,आव, कवटा,खाती, कंदोरी,शायवान,तुत्या,इरित,वार्त,वार्ती <<
अर्ध्याहून अधिक शब्द आम्हाला माहित सुद्धा नाहीत. कारण बहुतांश शब्दांना प्रादेशिक सीमा आहेत. गंज, गुंडी, धान, आंबिल, खकाणा, सांडशी, जित्रुब (म्हणजे जित्राबं = जनावरं असंच ना?), पहार, बाज, ऐनक (हिंदी, चष्मा?), आव इत्यादी सोडल्यास. कोकणातल्या माणसाला तर हे पण शब्द माहित नसतील. त्यांचे शब्द आम्हाला नवीन, नागपुरापर्यंत तर ते अजूनच अनोळखी.
असं असताना या सगळ्यांना प्रमाणभाषेत स्थान मिळावं कसं?
बाकी सर्वच शब्दांचा अर्थ कृपया स्पष्ट करावा म्हणजे आमच्या ज्ञानातही भर पडेल.

>>टोमॅटोला भेद्र हा पर्यायी शब्द प्रमाणभाषा का स्विकारीत नाही हे गौडबंगालच आहे.प्रमाणभाषेत टोमॅटोला बेलवांगे हा मराठी शब्द आहे पण अर्थसुचक नसल्याने तो मराठीत वापरला जात नसावा.<<
टोमॅटो हे फळ मिरची, बटाटा यांच्याप्रमाणेच मुळात भारतीय नाही हे तुम्हाला माहित असेलच. बटाटा हा मूळचा पोर्तुगीज शब्द आपण मराठीत सहजपणे घेतलेला आहे हे ही माहित असेलच तुम्हाला. दुर्दैवाने मला तरी भेद्रं म्हणजे टोमॅटो हे माहित नव्हते. ते सांगितल्याबद्दल आभार पण भेद्र हा शब्द ठराविक भागातच प्रचलित आहे असा माझा समज झालाय. तर तो प्रमाणभाषेत कसा वापरावा?

खरंतर असे अनेक शब्द विविध भाषांच्यातून आपण घेतलेले आहेत. आपले मानलेले आहेत. ज्याचा उगम विसरला गेलाय ते मराठीच झालेत ज्यांचा उगम अजून आपल्याला माहितीये ते परके वाटतायत.
भाषा अशीच वाढत असते. संपन्न होत असते. हे प्रत्येक भाषेच्या बाबतीत आहे.

बाकी आधी घरातल्या वातावरणामुळे आणि मग नंतर सतीश आळेकर, समर नखाते, राजीव नाईक या गुरूंच्यामुळे पूर्ण मराठीच बोलायची सवय लागलीये. त्यामुळे शक्य तेवढं पूर्ण मराठीच बोललं जातं.

माझी एक शंका कोणत्या बाफवर योग्य होईल हे समजत नाहीये. या बाफचा विषय योग्य वाटतोय.

मराठी भाषेतले काही उच्चार हे पेठीय आणि इतर वेगवेगळे आहेत. च च्या उच्चारावरून ते लगेच. लक्षात येतं.

ज आणि ज़ , च आणि च़, छ आणि छ़
याशिवाय फ़ (दंतव्य) आणि फ ( ओठांचा वापर करून उच्चार)

असे काही फरक काढूनच टाकावेत का अशा काही चर्चा पाहण्यात आल्या. ऋ आणि रु यातही हल्ली खूपसा फरक केला जात नाही. तर हे फरक काढूनच का टाकू नये असा एक प्रश्न चर्चेत आहे. त्यावर दोन्ही बाजूनी अनुमोदने येत आहेत. असे आणखीही काही शब्द, अक्षरं, उच्च्चार आज बदलताहेत. त्यांची शुद्धी करावी कि आपणच बदलावे ?

याबद्दल काय वाटतं ?