बारा-मति

http://harkatnay.blogspot.com/2010/02/blog-post_10.html

आपल्याला जगण्यासाठी काय काय लागतं? बापरे हा माणूस आता जीवन, आयुष्य असं काय काय बडबडत चावणार असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण नाही मी पकवणार नाहीये. म्हणजे अर्थात प्रयत्न तरी तसाच आहे. बघू. तर काय काय लागतं? ते अन्न, वस्त्र, निवाराच्या चालीवर नका सांगू. मी जिवंत राहायला काय काय लागतं ते विचारत नाहीये. जगायला (हो. फरक आहे दोन्हींत) काय काय लागतं असं विचारतोय. तर एखादी कला, नाट्य, नृत्य, खेळ असं कोणी सांगेल. पण कुठलीही कला किंवा खेळ येत नसलेल्या माझ्यासारख्या जमातीतल्या एखाद्याला विचारलं तर? तर मी सांगेन की अशाच कुठल्या कला किंवा खेळ यांचा आस्वाद घेणं. तर माझ्यासारख्याला जगायला आवश्यक म्हणजे पुस्तकं, संगीत, चित्रपट, क्रिकेट किंवा तत्सम काहीतरी. अर्थात लॅपटॉप, इंटरनेट, ब्लॉग हेही आहेत त्या यादीत. पण त्याच्यावर नंतर (म्हणजे नंतर कधीतरी) बोलू. त्यातही पुन्हा काही पुस्तकं, गाणी, चित्रपट आपण (मी) पुन:पुन्हा, वारंवार बघतो/ऐकतो एवढी त्यांची सवय झालेली असते आपल्याला. मला तर पार्टनर, व्यक्ती आणि वल्ली, फुलोंके रंग से, (आशाताईंचं) जीवलगा, शोले, आनंद, अब तक ५६, मैने प्यार किया या सगळ्या गोष्टी दर २-४ महिन्यांनी पुन्हा पुन्हा वाचायला, ऐकायला, बघायला लागतातच. नाहीतर चुकल्याचुकल्या सारखं वाटतं. (अर्थात 'मैने प्यार किया' आणि 'अब तक ५६' वर प्रचंड मतभेद होतील. इतके की मी अल्पमतातही जाईन कदाचित.. नाही मला खात्रीच आहे तशी. पर नाविलाज्य को क्या विलाज्य).

तर माझ्या या सवयींमधला असाच एक चित्रपट म्हणजे "12 Angry Men". १९५७ चा ऑस्कर नॉमिनेटेड. ऑस्कर विजेत्या (या चित्रपटासाठी नाही) हेन्री फोंडाच्या संयत अभिनयाने नटलेला. पण हा चित्रपट बघितला कि आपल्याला वाटतं याला याच चित्रपटासाठी का नाही मिळाला ऑस्कर.
१९५७ चा म्हटला म्हणजे अर्थातच कृष्ण-धवल. पूर्वी मला कृष्ण-धवल चित्रपट विशेष आवडत नसत. पण नंतर आवडायला लागले. (मॅच्युरिटी का कायसं म्हणतात ते हेच असावं) कारण आत्ताचे साय-फाय, हायटेक, कॉम्प्युराईज्ड, अॅनिमेटेड, कृत्रिम टेक्नो-थ्रिलर्स (सरसकट सगळे नव्हे) बघितले की ५०-६० च्या दशकात यातलं काहीही नसतानाही निव्वळ मनाला भिडणारी कथा, संवाद, पार्श्व-संगीत, दिग्दर्शन या सगळ्यांतून निर्माण झालेल्या कलाकृती मनाला जास्तच भिडतात. कारण त्या सच्च्या असतात. आणि कधीही आपल्या आजूबाजूला घडू शकतील असं वाटायला लावणा-या असतात. त्यामुळे एकाच वेळी हव्याशा आणि नकोशा वाटणा-या असू शकतात. माझं "दो बिघा जमीन" बघताना असं झालं होतं.

आणि हो अजून एक. हा लेख म्हणजे त्या चित्रपटाचं समीक्षण नाही. चित्रपटाचं परीक्षण किंवा समीक्षा करायला त्या क्षेत्राचं सखोल ज्ञान लागतं जे पूर्वीचे कमलाकर नाडकर्णी किंवा आताचे मुकेश माचकर, श्रीकांत बोजेवार, जयंत पवार, गणेश मतकरी अशा लोकांकडेच आहे. मी तर एक सर्वसामान्य नेत्रसेन (कानसेनच्या तालावर). सामान्य प्रेक्षक. त्यामुळे हा चित्रपट मी फक्त माझ्या नजरेतून मांडतोय.

तर नावात आल्याप्रमाणे हा चित्रपट १२ भिन्न प्रकृतीच्या, स्वभावधर्माच्या लोकांचा एक ठाम, सक्षम, सुयोग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीने (न ठरवता केलेला) प्रवास. कथा आणि चित्रपटाची रूपरेषा बघण्याआधी एक गोष्ट पटकन सांगतो. ही कथा अमेरिकन न्याय-व्यवस्था, कोर्टखटला आणि ज्युरींचा अंतिम निर्णय यावर आहे. अमेरिकन न्यायव्यवस्थेत प्रत्येक खटला हा ज्युरींसमोर चालतो. वकील मुद्दे मांडतात, न्यायाधीश खटल्याच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतात. पण सगळे मुद्दे, साक्षी, पुरावे ऐकून, तपासून आरोपी दोषी आहे कि नाही याचा अंतिम निर्णय देतात ते ज्यूरीच. हे ज्युरी म्हणजे विशेष कोणी नाही तर तुमच्या आमच्यासारखेच सामान्य (अमेरिकन) नागरिक असतात. प्रत्येक खटल्यासाठी न्यायालय अशा ज्युरींची रँडमली निवड करतं. त्यांचा त्या खटल्याशी, निकालाशी, साक्षीदारांशी काही संबंध नाही हे बघून घेऊनच अर्थात. आणि कोणालाही असं कोर्टाचं 'ज्युरी ड्युटी' साठी उपस्थित राहण्यासाठीचं पत्र आलं की ते बंधनकारक असतं. आणि एखादी व्यक्ती ज्युरी ड्युटीसाठी अनुपस्थित राहिली तर तो गुन्हा मानला जातो.

तर चित्रपटाची सुरुवात होते एका १८ वर्षांच्या मुलावरचा खटला संपतानाच्या प्रसंगातून. आपल्या वडिलांचा खून केल्याचा आरोप असतो त्या मुलावर. सगळे साक्षी, पुरावे त्याच्या विरुद्ध असतात. घटना प्रत्यक्ष पाहिलेले साक्षीदार असतात, गुन्ह्यातलं हत्यार सापडलेलं असतं. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायाधीश ज्युरींना आरोपी दोषी आहे किंवा काय यावर चर्चा करायला सांगतात आणि निर्णय देताना तो एकमताने असावा असं सांगतात. म्हणजे दहा जणांना वाटतंय दोषी आहे आणि दोघांना नाही असं व्हायला नको अशी विनंतीही करतात. एक तर खटला ऐकून ऐकून कंटाळलेले, घरी जायची घाई असलेले, वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि निरनिराळ्या पार्श्वभूमीचे लोक आणि त्यातही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ पुरावे पाहून अर्थातच आरोपी दोषी आहे असं घोषित करून चर्चा संपवण्याच्या मार्गावर असतात. पण हेन्री फोंडाला हे मान्य नसतं. तो म्हणतो कुठलाही पुरावा निर्भेळ नाही. प्रत्येकात संशयाला थोडीफार जागा आहेच. आणि अशी संशयाला जागा असताना एखाद्या व्यक्तीला मी असं सरळ सरळ चर्चा न करता दोषी ठरवू शकत नाही. काहीच निष्पन्न होत नाहीये हे बघितल्यावर प्रमुख ज्युरी म्हणतो कि आपण मतदान घेऊ. अर्थात फोंडा सोडून सगळे ताबडतोब आरोपीला दोषी ठरवण्याबद्दल मतदान करतात. मग फोंडाला विचारलं जातं कि तू एवढा विरोध करतो आहेस शिक्षेला तर तुझं काय म्हणणं आहे किंवा तुला तो का निर्दोष वाटतोय हे तरी सांग. आणि त्याचं पुन्हा पुन्हा हेच उत्तर असतं कि "I Don't know. माझ्याकडे काहीही पुरावा नाहीये तो दोषी नसल्याचा. पण मी फक्त एवढंच म्हणतोय की तो दोषी असेलच असं मला ठामपणे वाटत नाहीये आणि त्यासंदर्भात आपण चर्चा करू.". तर अशा रीतीने चर्चा करत करत, वादविवाद होत, प्रसंगी ऑलमोस्ट हाणामारी करत करत एकेकाचं मत बदलत जातं. या सगळ्या चर्चांमधून समाजाची प्रवृत्ती, स्वभाव, निष्क्रियता, निष्काळजीपण, 'मला काय त्याचे' हा भाव अशा विविध छटा दिग्दर्शकाने अप्रतिमरित्या टिपल्या आहेत.

मला वारंवार हेन्री फोंडा, फोंडा असं म्हणावं लागतंय कारण चित्रपटात कुठल्याही पात्राच्या (अपवाद शेवटच्या प्रसंगातली दोन पात्र) नावाचा उल्लेख नाही कारण ज्युरींनी आपली ओळख गुप्त राखायची असते असा नियम आहे. त्यामुळे पूर्ण चित्रपटात "हे यु जंटलमन" किंवा "ज्युरी नंबर ५" अशाच नावाने सगळेजण एकमेकांना उल्लेखतात. अर्थात त्या 'यु जंटलमन' वरून प्रसंगी 'यु बास्टर्ड' पर्यंतची वाटचाल श्वास रोखून धरायला लावणारी आहे. तर फोंडा एका प्रसंगात त्या साक्षीदाराप्रमाणे चालतो तो प्रसंग, किंवा भाषा, उच्चार, व्याकरण, बोलण्याची पद्धत यावरून माणसाची योग्यता ठरवणा-या एका ज्युरीला दुस-याने त्याच प्रकारे तोंडघाशी पाडण्याचा प्रसंग, फोंडाचे तळमळीने मुद्दा मांडण्याचे, आपला विषय पटवून देण्याचे अनेक लहान-मोठे प्रसंग हे वर्णनातीत आहेत. त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा.

चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे सशक्त संवाद. कथेचा जीव छोटा असताना पटकथा आणि त्यापेक्षाही संवाद हे कुठल्याही चित्रपटाला कसे सर्वोच्च पातळीला पोचवू शकतात याचं उत्तम उदाहरण आहे हा चित्रपट म्हणजे. नाहीतर अनेक चित्रपट वर सांगितलेलं सगळं सशक्त असूनही निव्वळ दुर्लक्षिलेल्या संवादांमुळे कोसळू शकतात किंवा अपेक्षित उंची गाठत नाहीत. (माझ्या मते) उत्तम उदाहरण म्हणजे '१९४२, लव्ह स्टोरी'. कलाकार, संगीत, कथा, दिग्दर्शन सगळं उच्च दर्जाचं असूनही निव्वळ सक्षम संवाद नसल्याने हा चित्रपट मनात घर करत नाही. नाहीतर गेल्या वर्षी आलेला नानाचा एक सारखा बकवास चित्रपट.. (हो. 'एक' हेच चित्रपटाचं नाव आहे).. तो खरं तर २ दिवसही चालला नसता पण नानाच्या जबरदस्त संवादामुळे तो थोडीफार तरी तग धरू शकला. यात मी १९४२ हा एक पेक्षा चांगला होता वगैरे असलं काही म्हणत नाहीये.

यात हातघाईच्या एका प्रसंगात आपले रोजच्या जीवनातले बोल हे कधीकधी कसे अगदी निरर्थक आणि निव्वळ नेहमीच्या बोलण्याच्या सवयीतून आलेले असतात यावर एक उत्तम प्रसंग आहे. त्या प्रसंगातले संवाद, त्यांचं टायमिंग हे एवढं अफलातून आहे कि तो प्रसंग, त्यातली पात्र अक्षरश: त्याक्षणी लगेच आपल्या मनात घर करतात.

मी त्यातल्या त्यात कथा न उलगडू देण्याचा प्रयत्न केला आहे (आणि त्यात मी सपशेल फसलो आहे हे पण मला माहित आहे.) पण तरीही काही चित्रपट असे असतात कि त्यांची कथा कळली तरी चित्रपटाची मांडणी, सादरीकरण, विषय, संवाद यांच्या वेगळेपणामुळे कथा थोडी माहित असली तरीही चित्रपट बघायला खूप मजा येते. तर सांगायचा मुद्दा हा की अशाच वर्गातला चित्रपट आहे हा.

मागे एकदा "100 movies you should watch before you die" असं एक इ-मेल फॉरवर्ड आलं होतं मला बऱ्याच वर्षांपूर्वी आणि त्यात या चित्रपटाचा उल्लेख होता. आणि तो किती किती किती योग्य होता हे मला तो बघितल्यावरच कळलं.

तर बघताय काय बघाच लगेच.. भेटूच !!

एक राहिलंच : आपल्याकडे पण मागे याच कथेवर बेतलेला पंकज कपूरचा 'एक रुका हुआ फैसला' नावाचा चित्रपट आला होता. पण (बहुतेक) त्याच्या आर्टफिल्म किंवा समांतर सिनेमा (आत्ताच्या भाषेत मल्टीप्लेक्स सिनेमा ) सदृश्यतेमुळे तो विशेष चालला नाही.

Submit to kanokani.com

अहो काय सांगताय याच कथेवरचा हिंदी चित्रपट एक रुका हुवा फैसला. यात अनेक गुणी स्टेज आर्टीस्ट आहेत. आपल्या कडे जुरी नसतात हा भाग सोडला तर संपुर्ण सिनेमा भारतीय करुन सुरवातीला टी.व्ही वरुन प्रदर्शित झाला साधारण १९८४ साली. आता त्याची डी.व्ही.डी उपलब्ध आहे. हासिनेमा आता एच आर मॅनेजर्स ट्रेनिंग प्रोग्रामसाठी वापरतात.

बघितलाय बघितलाय तो "एक रुका हुआ फैसला." लहानपणी आवडला नव्हता.
२-३ वर्षांपुर्वी परत पाहिला तेव्हा आवडला! स्मित

इंग्रजीही बघु मिळाला तर....

नितीनचिंचवड, ऋयाम,
उगाच आकस वगैरे म्हणून असं नाही पण मनापासून सांगायचं तर मला हिंदी चित्रपट अजिबात आवडला नाही. अक्षरशः फ्रेम-टू-फ्रेम कॉपी करूनही कित्येकदा तो उथळ, कृत्रिम आणि आक्रस्तळा वाटला मला. तुम्हाला कदाचित पटणार नाही ते. पण मूळ इंग्रजी '12 Angry men' बघितलात की मग लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. प्रतिक्रियेबद्दल आभार.. !! स्मित

अर्थात 'मैने प्यार किया' आणि 'अब तक ५६' वर प्रचंड मतभेद होतील. इतके की मी अल्पमतातही जाईन कदाचित..
काय राव ! आमचं बी मत तुम्हालाच की , बाकीची बी ५-५० मतांची खात्री मी तुमासनी देतो,तुम्हाला नक्की "बहुमत" मिळेल ! दुसरं म्हंजे आपल्या भाग्यश्री आणि नानाचं उपकार कोण विसरल बरं ?

अनिल, अरे वा.. AT56 आणि MPK ला बहुमत आहे तर.. वा वा !!

उत्तम लेख! एक रुका हुआ फैसला ओरिजनलपेक्षा एवढा वाईट नाही वाटला मला.यावरच सध्या 'निखारे' म्हणून नाटक जोरात चाललयं.
मैप्याकि ने मला मळमळायला होतं,मात्र अब तक ५६ कितीही वेळा बघायला तयार!

आभार आगाऊ..
असेल.. कदाचित. 12 angry men च्या जास्तच प्रेमात पडल्यामुळे मला एक रुका हुआ फैसला आवडला नसेल.
हो.. निखारे बद्दल ऐकलं आहे. अजून बघण्याचा योग आला नाही.
मैप्याकि आणि अब तक ५६ दोन्ही परमप्रिय आहेत मला स्मित

mpk आणि at 56 माझेही A T F (all time favrite ) आहेत.
रच्याकने, तुमच्या नावाचा उच्चार काये ?

हेरंबभाऊ, आमच्या थिअरी ऑफ नॉलेज कॉर्स मधे आम्ही '१२ अँग्री मेन' दाखवणार आहोत.सत्य-असत्याच्या सीमारेषा,पुरावा म्हणजे नक्की काय, भावना आणि तर्क यासारख्या मुद्द्यावर चर्चा घडवण्यासाठी त्याचा प्रीकर्सर म्हणून वापर करायचा विचार आहे.

छान लेख. या सिनेमाबद्दल, हिंदी आवृत्तिबद्दल आणि नाटकाबद्दलही खूप वाचलेय. कधी बघायला मिळतोय, ते बघायचं.
(बाकी या बीबी च्या शीर्षकावरुन जरा गोंधळ झाला. मला वाटलं पवार साहेबांबद्द्ल काहितरी असावे !! )

मला वाटलं पवार साहेबांबद्द्ल काहितरी असावे>>> पवारसाहेबांकडे तर १२ खासदारही नाहिएत!

अस्मानी,

हेरंब ओक हे माझं नाव स्मित

आगाऊ,

"सत्य-असत्याच्या सीमारेषा,पुरावा म्हणजे नक्की काय, भावना आणि तर्क" हे सगळं समजावण्याचा सगळ्यात सोपा आणि उत्कृष्ठ मार्ग म्हणजे हा चित्रपट.

दिनेशदा,

ते शीर्षक आपलं जरा उगाच. शब्दांशी खेळायला, त्यांची फिरवाफिरवी करायला आवडतं जरा.. आणि ते एकदम चपखलही बसलं यावेळी (कधी नव्हे ते स्मित )

आगाऊ,
>> पवारसाहेबांकडे तर १२ खासदारही नाहिएत!
हा हा

काही महिन्यांपूर्वीच बघीतला मी हा सिनेमा. मला खूप आवडला होता. पहिल्यांदा सहजच बघायला घेतला तेव्हा कसा असेल वगैरे काहीच कल्पना नव्हती पण या सिनेमाने जबरदस्त पकड घेतली. प्रत्येकाने नक्कीच बघायला हवा.

इतके दिवस लेखाचे शीर्षक बघून हे नक्कीच शरद पवार, राजकारण या विषयावरचा एखादा भडक मराठी चित्रपट आलाय आणि त्याबद्दल काही तरी लिहीले असेल असे समजून हा दुवाच उघडला नव्हता. तात्पर्य लिखाणाचे शीर्षक फसवे आहे.

रूनी पॉटर, खुपच सुंदर आहे हा चित्रपट. वादच नाही.

>> तात्पर्य लिखाणाचे शीर्षक फसवे आहे.

मला 'शीर्षक अतिशय उत्कृष्ठ आहे, उत्तम आहे' अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया मिळाल्या.

तात्पर्य : आपापल्या नजरेवर अवलंबून.. किंवा 'मति' वर स्मित ..... ह.घे..

'शीर्षक अतिशय उत्कृष्ठ आहे, उत्तम आहे म्हणजे ते फसवे नाही असे थोडीच आहे. स्मित

हा.. त्ये बी हाय म्हना डोळा मारा