दाल माखनी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाउण वाटी आख्खे उडीद, पाव वाटी राजमा, पाव वाटीपेक्षा कमी हरबर्‍याची डाळ, २ चमचे बारीक चिरलेले अद्रक, ४-५ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, १ हिरवी मिरची चिरुन, १ कांदा किसून, २ टॉमेटो किसून, १/२ वाटी ताजी साय, एक मोठा चमचा सायीचं दही
फोडणीसाठी थोडं तेल, जीरे, मेथ्या, हळद, १ चमचा धण्याची पावडर, १/२ चमचा गरम मसाला, १/२ चमचा देगी मिर्च पावडर, चवीप्रमाणे मीठ, चुटकीभर हिंग

क्रमवार पाककृती: 

राजमा व आख्खे उडीद ३-४ तास भिजत ठेवावेत. नंतर यामध्ये हरबर्‍याची डाळ व मीठ व हिंग घालून साधारण्तः तिपटीपेक्षा थोडं जास्त पाणी घेवून कुकरमध्ये ३-४ शिट्ट्याकाढून शिजवून घ्यावं. जर तिन तासापेक्षा जास्त वेळ डाळ / राजमा भिजला असेल तर ३ शिट्ट्यात शिजतं.
बाजूलाच कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करावे.. त्यात जीरे व मेथ्या घालून फोडणी करावी. यात आधी चिरलेलं आलं, लसूण व मिरची घालावी.१-२ मिनिटं मंद आचेवर परतावे. नंतर त्यात किसलेला कांदा टाकून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतावे. हळद घालून घ्यावी. (हळद फोडणीत न टाकता डाळ शिजत असताना कुकरमध्येच टाकली तरी चालेल). कांदा परतल्यावर टॉमेटो घालून परत परतावे. त्यात धण्याची पूड व गरम मसाला घालून परतावे. ५-१० मिनिटं झाकून ठेवावं. यामध्ये आता शिजलेली डाळ घालावी. व एक उकळी येवू द्यावी. नंतर ताजी साय फेटून घालावी. व दाल माखनी मंद आचेवर ठेवावी. मधून अधून हलवत रहावे. किमान १०-१२ मिनिटं तरी नक्कीच उकळू द्यावी. त्यात फेटलेलं सायीचं दही घालून अजून एक उकळी येवू द्यावी.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणं
अधिक टिपा: 

मी शक्यतो मिक्सर वापरत नाही म्हणून कांदा, टॉमेटो किसून घेते. मिक्सर किंवा फुडप्रोसेसर मधून अगदी बारीक केले तरी चालते.
नवरात्रात किंवा सणासुदीला / करवा चौथ वैगरेला कांदा लसूण खात नाहीत. त्यावेळी आल्याचं प्रमाण थोडं वाढवून बाकीचे पदार्थ तसेच ठेवले तरी छान होते.

माहितीचा स्रोत: 
सायोची पनीर माखनी वाचल्यानंतर मी केलेले प्रयोग
Submit to kanokani.com

छान वाटतेय रेसिपी!

पहिलि गोश्त म्हन्जे डल मख्नि मधे..दहि घलत नहित. अनि फोदनि पन देत नहित्...रेसिपि मधे सुधर करवा

चैत्राली, तुम्ही कशी करता? दा मा? तुमची रेसिपी टाका.

अल्पना, मीही दही न घालता करते दाल माखनी. चव छान येत असेल ना दह्यामुळे? आता दही घालून बघेन. स्मित

मस्त रेसिपी आहे ग. एकदा करून बघीन.

अल्पना, तुझ्या पद्धतीने केली आज दाल माखनी. मस्त झालीये एकदम. आख्खे उडीद मोड काढून घेतले. सायीच्या ऐवजी हेवी क्रीम घातले.

छान.
वाचणं सोपं पण करणं आवघड.. स्मित