'काही गोष्टी कधीच बदलत नाहीत'....
शंकर पाटलांचं 'टारफुला' वाचताना ही गोष्ट अधिकाधिक ठळक होत जाते.
टारफुला म्हणजे शेतात उगवणारं तण. त्याला काढून टाकलं की ते तेवढ्यापुरतं निघून जातं. पुन्हा नव्या जोमाने उगवतं. गावातली परिस्थिती काहीशी अशीच आहे. कधीकधी ती पूर्णपणे नियंत्रणात असलेली दिसते, पण नियंत्रित करणारी व्यक्ती बाजूला झाली की पुन्हा हा 'टारफुला' डोकं वर काढतो.
गावच्या पाटलांचा (हृदयविकाराच्या झटक्याने?) अचानक मृत्यू होतो आणि गावाला तोलून धरणारा खांब गेल्यामुळे सगळंच डगमगायला लागतं.
गाव तसं आडबाजूचं, आजूबाजूच्या डोंगरातल्या घळयांमध्ये फरारी, तडीपार गुंडांना, दरोडेखोरांना निर्भयपणे लपू देणारं. गावातले गट तट, तालेवारांमधली भांडणं, गावातल्या या लोकांनी दरोडेखोर गुंडांची लागेल तशी मदत घेणं आणि त्यांना पोसणं... पाटील हे जाणून असतातच... भक्कमपणे सगळं सांभाळत असतात. आणि एक दिवस अचानक, सगळं काही सोडून, निपुत्रिक म्हणून जगातून निघून जातात.
गावची पाटिलकी आणि पाटलांची भलीथोरली, काळीशार जमीन... खेरीज पाटलाचा वाडा! सगळंच आता बेवारस झालेलं. लोकांच्या तोंडाला पाणी न सुटतं तर नवल. पाटलीणबाईंनी कुणाचं पोर दत्तक घ्यावं, यावरून गावात वातावरण बिघडू लागतं.
आबा कुलकर्णी पाटलाच्या जवळचे समजले जाणारे. आपलं काम इमानानं करणारे. पाटील जातात आणि त्यांचा आधारच जातो. गाव त्यांच्यानं सांभाळेनासा झालेला. त्यातच पाटलीणबाई वाडा सोडून माहेराला निघून जातात आणि आबा कुलकर्ण्यांची अवस्था अधिकच बिकट होत जाते. रोज घरी गड्यांचा पहारा नसेल तर त्यांना झोप लागेनाशी होते.
पाटलीणबाईंनी स्वतःच्या भावाच्या पोराला दत्तक घ्यायचं ठरवलेलं. गावात ही बातमी फुटलेली. आबा कुलकर्ण्यानं बाईंकडे दत्तकाचा विषय आधीच काढून गावातल्याच पोराला दत्तक घ्यायला लावायला हवं होतं, ही गावातल्या काही मंडळींची ठाम समजूत. बाई काय नि पाटील काय, कुलकर्ण्याच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत, हे मनात ठसलेलं. आबांना त्रास व्हायला लागतो.
शंकर पाटलांनी पहिल्या भागात आबा कुलकर्ण्यांची सगळी घुसमट, भीती, गावातलं बिघडत जाणारं वातावरण शब्दांतून जिवंत केलं आहे. आबांची बायको... तीही नवर्यासोबत ताणाखाली जगतेय. तिची मनःस्थितीदेखील बिघडली आहे. पण रोज जे घडेल ते निमूटपणे बघत राहण्यावाचून तिला दुसरं काही करताही येत नाही.
भीतीची सीमारेषा एकदा ओलांडली की माणूस निर्भय होतो, भीतीला सामोरं जायची त्याच्या मनाची तयारी होते जणू! पहिल्या भागाच्या शेवटी आबांचं हेच होतं. आयुष्याविषयी हा माणूस निरिच्छ होत जातो. घटकाघटका गावाबाहेरच्या देवीच्या देवळाजवळ जाऊन बसू लागतो.
आबा कुलकर्ण्यांच्या खुनापाशी पहिला भाग संपतो.
गावाचं आता काय होणार? हा प्रश्न घेऊन दुसरा भाग सुरू होतो.
पाटलाची जमीन बेवारस झालेली. गावकरी बिनघोर त्या जमिनी गिळंकृत करतायत, मोठ्या माशांच्या नादाने छोटे मासेही माजले आहेत. तडीपार झालेले गावगुंड खुशाल गावात येऊन मुक्काम टाकून राहतायत. गावावर कुणाचाच अंकुश राहिलेला नाही.
तरी गाव तसंच आहे. ही आतली खदखद सोडली तर सगळं काही वेळेवारी होतंय. पेरण्या, लावण्या, पिकांची कापणी...
अशातच दादा पाटलांचा गावात प्रवेश होतो.
पाटलीणबाईंनी कोल्हापूरला जाऊन अधिकार्यांकडे पदर पसरलेला. 'गावाला पाटील हवा' म्हणून. गावावर कुणाचा तरी वचक हवा आहे त्याशिवाय पाटलीणबाईंनाही त्यांच्या हक्कांच्या जमिनींकडे, वाड्याकडे निर्धोकपणे जाता येणार नाही. दादा पाटील मूळ शिपाईगडी. जोडीला वाघासारखे तीन भाऊ. दादा पाटील कुटुंबकबिला घेऊन गावात येतात नि पुन्हा गावाची विस्कटलेली घडी नीट बसायला सुरुवात होते.
गावात वडील असे राऊनाना आहेत. त्यांना गावच्या भल्याची चिंता आहे. गावातल्या प्रत्येक माणसाला ते बरोबर जोखून आहेत. त्यांच्या मसलतीनं दादा पाटलांचा कारभार सुरू होतो नि गाव शांत व्हायला लागतं. चावडीवरचे उनाड, कामचुकार नोकर मुकाट दादा पाटलाचं ऐकायला लागतात.
तिसर्या भागात राऊनानांचा काटा काढला जातो. घडलेल्या काही गोष्टींमुळे राऊनानांचा मुलगा दादा पाटलांवर चिडतो. सत्तेला सरावलेले दादा पाटील त्याला जेलात अडकवतात. दादांचा प्रभाव कमी व्हायला लागतो नि गावातली जुनी वैरं पुन्हा उफाळून येतात.
.... थोरले पाटील गेले, दादा पाटील आले... कदाचित पाटलीणबाईंनी दत्तक घेतलेला वारस पुढे येऊन आपल्या जमिनी ताब्यात घेईल नि पाटिलकीदेखील. ते चक्र अव्याहत चालू राहणार आहे. गाव आहे तसंच राहणार, बदल होतील ते वरवरचे! हा विचार कादंबरी संपल्यावरही मनात घोळत राहतो.
कादंबरीला रूढार्थाने नायक नाही. 'गाव' हा या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. तरीही तीन भागांपैकी दोन भाग आपल्या व्यक्तिमत्त्वाने व्यापणार्या दादा पाटलांचं चित्र शंकर पाटलांनी तपशीलवार रेखाटलं आहे. गावात ते येतात तेव्हाचा त्यांचा करारी, निर्भय स्वभाव, बेधडक निर्णय घेण्याची वृत्ती, त्याचवेळी करणी, भविष्यासारख्या गोष्टींनी मनातून भयभीत होणे... पुढे गावावर वचक बसल्यावर हट्टी, एककल्ली होत जाणारी वृत्ती, चुकीच्या वेळी घेतलेले चुकीचे निर्णय.... कादंबरीचे जणू मुख्य नायक असल्यासारखे दादा पाटील साकार होत जातात.
गावातलं वातावरण, तिथली बोलीभाषा यात शंकर पाटलांचा हातखंडा आहे. 'टारफुला' देखील याला अपवाद नाही. एकदा जरूर वाचावी अशी कादंबरी.
श्र!! मस्तच लिहिलयसं!! अजुन ही कादंबरी वाचलेली नाहीस, पण हा आस्वाद बघुन वाचाविशी वाटतेय!!
तुंबाडचे खोत, पडघवली वगैरे वाचल्यापासून एखाद्या गावातील काही पिढ्यांच्या गोष्टी असलेली अशी पुस्तके वाचायची आवड निर्माण झाली आहे. हे आता वाचायला पाहिजे. तीन भाग दिसतात. केव्हाचे आहे हे पुस्तक - म्हणजे केव्हा लिहिलेले आहे आणि काळ कोणता दाखवला आहे?
अमोल ते तिन भाग नाहीत. एकाच दिर्घ कथेत ते आपोआप उलगडात. मलाही शंकर पाटील फार आवडतात.
श्रध्दा चांगले लिहीलेस. थोडक्यात पुर्ण माहीती येते.
श्रद्धा,
टारफुला वाचून मला पांगिराची आठवण झाली.
पांगिरा ही विश्वास पाटलांची कादंबरी. पांगिरा हे गावच मुख्य नायक. त्यातील माणसे, त्यांचे स्वभाव, हेवे दावे, राजकारण हे सर्व त्यातून ठळकपणे अधोरेखीत होतं.
अनिकेत वैद्य.
श्रध्दा छान लिहिलय!!!!!!!