प्रिय पप्पा

प्रिय पप्पा,

स. न. वि. वि. पत्र लिहण्यास कारण की, खुप दिवसापासुन काही गोष्टी मी सर्वांना सांगत आलोय, पण कोणीच ऐकत नाहीत. म्हणुन विचार केला, त्या बद्दल थोड स्पष्टीकरण देऊ. पप्पा मी आशा करतोय की आपण वडीलकीच्या नात्यापेक्षा थोडावेळ ’मित्र’ म्हणुन हे पत्र (पुर्ण) वाचाल !

दिवस कसे झर झर सरतात ना ? मी कधी एवढा विचारच केला नव्हता. पण त्या दिवशी जेव्हा पहील्या पगाराचे पेढे भरवताना तुमच्या डोळ्यात पाहीले तेव्हा जाणवले. पर्वा पर्यंत शाळा कॉलेज करणारा तुमचा मुलगा आज कमवता झाला याचा अभिमान चमकत होता डोळ्यात तुमच्या. आईचे डोळे तर पदर सोडत नव्हते. माझ्यासाठी मुली पहायला केव्हा कशी सुरवात झाली हे तसं आठवतही नाही, वर्ष झाले असेल बहुदा. पण किती सहजपणे काढुन घेतल्या होत्या तुम्ही माझ्या कडुन माझ्या अपेक्षा. ’आरे मंदी चालू आहे ना, स्थंळं लवकर मिळत नाहीत." तुमचे हे वाक्य आठवले की आजही माझे मलाच हसायला येतं. पण खरंच मंदीचा परिणाम ’स्थळं’ पाहण्यावर सुध्दा होऊ शकतो हे गेल्या ३-४ महीन्यात कळले.....

पप्पा, आता पुन्हा मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरु करताहात, पण खरं सांगायचं तर मी त्या मन:स्तिथीतच नाहीय. इच्छा होत नाही पुन्हा ’ना’ ऐकण्याची. आणि त्या पेक्षा जास्त म्हणजे तुमचं झालेलं खच्चीकरण पाहण्याची. तुमचा मुलगा हुशार आहे, कमवता आहे, स्वभाव चांगला आहे हे तुम्हाला माहीत आहे. कारण तुम्ही मला गेले २६ वर्षे वाढवलंत. पण तुमचा मुलगा एवढाही चांगला दिसत नाहीय की त्याला बाजारात उभं केल्यावर कोणी शिकलेली मुलगी द्यायला मगे लागतील. कारण मुलगी शिकली आहे म्हंटल्यावर जोडा (मुलगा) दिसायला नी परिस्थितीने चांगला असावा ही अपेक्षा असणं सहजीकच आहे. मी तर हा असा, आणि त्यात आपल्या समाजात कितीसे शिकतात मुली ? गेली वर्षभर आपण मुली पाहत आलोय त्या अनुभवाबद्दल माझ्या पेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. आता पुन्हा तेच सत्र सुरु करायचं म्हंटल्यावर मन तयार होत नाहीय. कोणी मुलगी देणारच असतील तर ती तुमची प्रतिष्ठा पाहुनच द्यायला येतील त्यात वाद नाही. वाटतं मी एक नुसता बाहुला बबुन राहीलोय, कधी कधी लाज वाटते मुलगी पहायला गेल्यावर की आपण शोभुनतरी दिसतो का या मुलीला ? ना इलाजास्तव ’हो’ म्हणायचे आणि ’ना’ ऐकुन घ्यायची. एखाद्या मुलीने ऐकले नसतील एवढे ’ना’ प्रतिष्ठा, शिक्षण, नाव असुन तुम्ही नि तुमच्या मुलाने ऐकले आहेत.

पाहिलेल्या पंधरा (मी मोजलेत सारे) मुलींपैकी फक्त दोघांकडुनच होकर आला. त्यात माझ्यासाठी ’त्या’ स्थळाचं पारडं नेहमीच जड आहे. आणि तो विषय काढल्यावर तुम्ही त्रागा करण्याशिवाय दुसरं काही विचार करत नाही. वयात अंतर कमी आहे हे एवढंच तुम्हला दिसतं. ’तुझं तु बघ’, ’आम्ही मेलो तुझ्यासाठी’, ’पळुन जा’, ’हे कर ते कर’ हिच वाक्ये ऐकायला मिळतात. मग आपली प्रतिष्ठा, संस्कार सारं धाब्यावर ठेऊन तुम्ही आज म्हंटल्यासारखं पळुन जाउन लग्न करता आलं असतं (करायचेच होते तर कॉलेज च्या दिवसातच केले असते तसे). पण आपल्याच प्रतिष्टेची राख रांगोळी कसं करायची हे अजुन तुम्ही आम्हाला शिकवलं नाही.

तुम्ही त्रागा करुन घ्यायला मी काही कॉलेज मधल्या किंवा दुस-या जातीच्या मुली ’मागे लागलेलो नाही’. तुम्हीच दाखवलेल्या, पसंत केलेल्या मुलीचा ’विचार करतोय’. वयात अंतर कमी आहे या एकच गोष्टीमुळे ’नकार देणे’ मला पटले नाही. मान्य आहे कि पती-पत्नी मध्ये ठराविक वयाचे अंतर असावे. पण कधी कधी काही गोष्टी अपवाद म्हणुन घेउ शकतो आपण ! एकतर आपल्या जाती मध्ये मुलेच कमी शिकतात तेव्हा मुलींकडुन उच्च शिक्षणाची अपेक्षा करणे खुपच अवघड ठरते. आणी मला तर शिकलेली मुलगी हवीय. एवढ्या मुली पाहिल्यात पण खुपवेळा शिक्षणामुळेच अडलंय हे तुम्हालाही माहीत आहे. पप्पा असंही आजकाल लोकांना आपल्या मुलींसाठी कमी जबाबदा-या असणारेच सासर हवे असते. आणि मी तर थोरला आहे. घरात आणखीन दोघेजण शिकणारे. मग जबाबदारी न सांगुनही दिसते त्याचं काय ? मग मुलींकडचे ’मुलगा डोळ्य़ांत भरत नाही’, ’मुलगा लहान वाटतो’, ’तब्येतीने खुपच नाजुक आहे’ म्हणत माझेच दिसणे मला दाखवुन देतात. या सगळ्या उठाठेवीत ’त्या’ एका स्थळानेच आपल्याला पसंती दर्शवली आहे. फक्त वयाचा मुद्दा करुन नाकारु नका. तेव्हा तुम्ही सबुरीनं विचार करुन जुळवुन घ्यावं एवढंच! फक्त मी एवढंच म्हणुशकतो की जमलं तर माझी मन:स्तिथी समजुन घेउन ’त्या’ स्थळाचा पुन्हा विचार करावा. बाकी माझ्या पेक्षा उन्हाळे पाउसाळे तुम्ही जास्त पाहीलेत आणि मी तुमच्या शब्दाबाहेर नाही हे तुम्ही ओळखुनच आहात. विचार करणार नसाल तरी काही हरकत नाही. पण मग माझ्या लग्नाचा विचार सध्याला बाजुला ठेवा. जेव्हा माझी पुन्हा ’ना’ ऐकण्याची तयारी होईल, डोकं जेव्हा ठिकाणावर येईल तेव्हा विचार करुत.

खरंतर या गोष्टी समोरा समोर बोलता आल्या असत्या मला. पण मी बोलायला लागलो की तुम्ही ऐकण्याच्या किंवा विचार करण्याच्या मन:स्तिथीत नसता. तुम्हाला एवढंच दिसत असतं की आज पर्यंत शब्दात असलेला मुलगा आज माझ्या शब्दाबाहेर जाउन विचारतरी कसा करायला लागला ? पप्पा, जेव्हा रातकिडा किरकिरतो ना, तेव्हा त्रास होतो. पण तो त्रास त्याच्या किरकिरण्याचा होत नाही, तर तो नक्की कुठे बसुन किरकिरतो हेच कळत नाही याचा होतो. किती शोधले तरी सापडत नाही म्हणुन चिडचिड होते. घरात तुम्हा सर्वांचं तसच होत आहे. कधी कधी विचार करतो, खरंच मी जास्त शिकलोय हीच माझी चुक आहे, की मी नेहमी उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहुन त्यांच्या माघे धावतो हे चुकतंय ? अजुन उत्तर नाही मिळलं. कदाचीत मी ’थोरला’ म्हणुन जन्मलो हेच चुकलं. जन्मलो ते जन्मलो पण स्वभावाला थोडा तरी उद्धट पणा सोबत आणता आला नाही हे चुकलं. की कदाचीत जबाबदारीची जाण आहे हे चुकलं ? असो या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात अर्थ नाही. कारण मला तुम्ही चुकत आहात असंही म्हणायचं नाही. तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, मी माझ्या जागी. तुम्ही अनुभवलेली परिस्तिथी वेगळी; आम्हाला डोळे उघडल्यावर पंखा, टी. व्ही. दिसलेले. असो, मला वाटतं विषयांतर खुप होतंय. मी इथेच थांबतो.

तुमचा मुलगा,
मधु.

Submit to kanokani.com

घरोघरी मातीच्या चुली.
छान हृदयस्पर्शी लेख आहे स्मित

छान लिहिलय्स मल्ली.. पण ही अशी मनःस्थिती मुलांच्या वाट्याला फार कमी वेळा येत असावी.

छान आहे लेख. मला वाटत होते फक्त मुलींनाच असे अनुभव येतात.

मल्ल्या.. भारी रे स्मित आवडल..

जेव्हा रातकिडा किरकिरतो ना, तेव्हा त्रास होतो. पण तो त्रास त्याच्या किरकिरण्याचा होत नाही, तर तो नक्की कुठे बसुन किरकिरतो हेच कळत नाही याचा होतो. किती शोधले तरी सापडत नाही म्हणुन चिडचिड होते.>>>>खरय अगदी

मुलिंच्या लग्ना बाबत जरी जास्त प्रमाणात असे खटके बिटके दिसत असले तरी माझ्या पहाण्यात आलेत हे असे तणाव मुलाच्या लग्ना बाबत झालेले/होत असलेले.

चला पण त्या निमित्ताने मधुला कळल तरी एखाद्या मुलीला देखील नकार पचवताना कसा त्रास होत असेल ते डोळा मारा

जोक्स अपार्ट पण "न" कार येण म्हणजे काही आपण लगेच अलाणा फलाणा ठरत नसतो. अर्थात हे मी मधुलाच नव्हे असच जे वाटल ते लिहील

जोक्स अपार्ट पण "न" कार येण म्हणजे काही आपण लगेच अलाणा फलाणा ठरत नसतो.
बरोबर आहे कवे, पण काही गोष्टी ज्या वेळात घडले पाहीजेत त्या वेळात नाही घडले तर माणसाचे मन साशंक होउन विचारांना (आणि विषयालाही) फाटे फोडायला लागतं.... स्मित त्यामुळे असं होण साहजिकच आहे... आणि हे माझं मत...

चला पण त्या निमित्ताने मधुला कळल तरी एखाद्या मुलीला देखील नकार पचवताना कसा त्रास होत असेल ते...
अगदी अगदी... आणि तेही दिसण्यावरुन नकार येत असेल तर सांगायलाच नको.. अरेरे अश्या वेळेस कारणेही न पटण्यासारखी मिळतात. (सरळ सरळ नाही सांगु शकत...)

मल्ली छान लिहिलंय.

मधूला म्हणावं, होईल सगळं ठीक आणि मनाची ही आंदोलनंही थांबतील स्मित

मुलीचं शिक्षण झालेलं नसलं पण ती जर डोक्यानं चांगली असली आणि तिला पुढे शिकायची इच्छा असेल तर मधु लग्न करून मग मुलीला शिकवू शकतो की..

(रच्याकने, माझ्या एका भावानं लग्नाच्या वेळेस सांगितलेलं घरच्यांना - मी काही रिक्रुटमेंट करत नाहीये.. त्यामुळे शिक्षण काहीही असूदेत - फक्त तोची बौद्धिक/भावनिक पातळी मला अनुरुप असली, भेटल्यानंतर- बोलल्यानंतर मुलगी आवडली की झालं..)

मल्ली छानच लिहिलयस रे स्मित

अगं नानबा मधु च लग्न झालय आतापर्यंत स्मित मल्ली "मधुला" खुप सार्‍या शुभेच्छा

फार छान लिहल आहे.

मल्ली,लय झ्याक लिवलया स्मित

जे चांगल असण्यापेक्षा चांगल दिसण्याला महत्व देतात त्यांच्याकडे तु.क. टाकावा .लग्नाच्या गाठी
स्वर्गात बांधल्या जातात त्यामुळे योग्य वेळी भेट होतेच असा आशावाद ठेवून धीर धरण उत्तम .पत्र
मुद्देसूद ,ओघवती भाषा ,एकदम अपीलींग आणि वास्तवाला धरून .आपल्याला शुभेच्छा .

स्मित आता कसं...

मल्ली छान लिहिल आहेस्..स्मित

चांगल लिहीलयत मल्लिकार्जुन महाराज स्मित

सुंदर लिहिलय. आवडल.

लाजो.. फिदीफिदी

सर्वांना धन्यवाद... स्मित

मुलीचं शिक्षण झालेलं नसलं पण ती जर डोक्यानं चांगली असली आणि तिला पुढे शिकायची इच्छा असेल तर मधु लग्न करून मग मुलीला शिकवू शकतो की..
नानाबा, हाही मुद्दा बरोबर आहे, पण खुप वेळेस घरची परिस्थिती अशी असते की लग्नानंतर मुलीला शिकवणे/शिकणे जमत नाही. जसे घरातली जबाबदारी, घरात महिला मंडळ कमी असणे किंवा आर्थीक परिस्तीथी.....

आता कसं...

लले सर्व आपलीच क्रुपा.. स्मित

मल्ली ... चांगलं लिहिलं आहेस स्मित

चांगलं लिहिलय, मल्लिनाथ. विषय चांगला हाताळलाय.

दाद ची दाद मिळाली म्हंजे भरुन पावलं... स्मित
धन्स......

मल्ली मस्त लिहिलयसं रे !
पण मी म्हणतो जे झेपत नाही ते मधु ने करावच कशाला Emoticon

मल्ल्या लेका,केवळ तुझा म्हणून वाचायला घेतला लेख आणि खरंच तुझ्याबद्दल अभिमान वाटला. कसला मस्त विषय हाताळलास तू. ग्रेट. मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे वडीलात आणि मुलामधे भीडेस्तव, भितीमुळे जो सुसंवादाचा अभाव असतो ना तो अगदी अचूक मांडलास तू.
आजही ९० टक्के लग्न हे केवळ आंधळी कोशिंबीर खेळ खेळल्यासारखे होतात. शरीराच्या अनुरूपतेबरोबरच आवडी-निवडी, मनात ठरवलेली एक प्रतिमा, स्वप्न यांचा काहीच मेळ लागत नाही. केवळ आईबाबांनी करून दिले म्हणून किंवा प्रेमविवाह करायची भिती किंवा नशीबात जे असेल ते या पद्धतीने लग्न झाले की मग समांतर रूळासारखा आयुष्याचा प्रवास सुरू होतो. अशा जोडप्यांमधे प्रेम खरंच निर्माण होते का? किंवा जे असते त्याला प्रेम म्हणतात का?
साध्या बसमधे देखील आपण नावडती व्यक्ती थोडा वेळही जवळ सहन करू शकत नाही. येथे संपूर्ण आयुष्य न आवडणार्‍या, वेगळ्या व न पटणार्‍या विचारांच्या व्यक्तींसोबत कुढत, राग करीत लोक कसे काढतात काय माहित?
असो. खुप मोठा चर्चेचा विषय होईल.
मल्ल्या, पुन्हा अभिनंदन.

मल्ली भारी लिहिल आहेस रे. स्मित
माझा एक दोस्त होता नाव मल्लुच. लिंगायत. ग्रॅज्युएट मुलगी मिळु दे. आणि आमच्या वयात फार अंतर असु नये एवढीच त्याची अपेक्षा होती. त्यांच्यात चालणारा हुंडा प्रकार त्याला आवडत नाही. मुलीकडुन कसलेही पैसे, दागदागिने नकोत अशा साध्यासरळ अपेक्षा होत्या पण त्याला बरच वधुसंशोधन कराव लागल होत रे. आणि ह्याप्रकारत घरुन आणि नातेवाइकांकडुन येणारा दबाव फारच वाइट्ट...
आता जी मुलगी बघायला जाणार तीच्याशी तुझ लग्न लावायचच आहे फक्त तारीख काढायची राहीली आहे असा दबाव मुलगी बघायला जायच्या आधीच... असो..

धन्यवाद रे उम्या... स्मित

साध्या बसमधे देखील आपण नावडती व्यक्ती थोडा वेळही जवळ सहन करू शकत नाही. येथे संपूर्ण आयुष्य न आवडणार्‍या, वेगळ्या व न पटणार्‍या विचारांच्या व्यक्तींसोबत कुढत, राग करीत लोक कसे काढतात काय माहित?

ही माझ्याही मनातली घालमेल आहे... फिदीफिदी
आजही खुप वेळा मित्र-मैत्रीणींशी मी जेव्हा या विषयावर बोलतो, ते म्हणत अस्तात खरे की दिसायला निट नसला तरी चालेल, पण स्वभावाने, शिक्षणाने, मनाने कसा अनुरुप नि छान हवा. पण प्रत्यक्षात ते त्या वाक्याशी स्वतः किती सहमत अस्तात हेच कळत नाही. 'अनुरुप' नि 'छान' याचं डेफिनेशन अजुनही फुल-न-फायनल झालेलं नाही या बाबतीत तरी.... तरी सर्रास्स या शब्दाचा वापर वधु-वर शोधतान केला जातो. अरेरे वयाचं अंतर ही एक मोठी बाब ठरते खुप वेळेस. मुळात ते घरच्यांना पटत नसते कधी कधी... घरच्यांशी याविशयावर निट बोलणे होतेच असे नाही. मुलगी एक वेळ आइशी या विषयावर मोकळेपणाने बोलु शकते, पण ति मोकळीक मुलाच्या नि वडिलांच्या नात्यात नसते. (अपवाद असतीलही फिदीफिदी)

झकासराव, क्षणभर वाटले की तो मल्लु मीच आहे कि काय... स्मित कारण या स्टेज मधुन मी ही गेलोय.. अरेरे इतकी चिडचिड व्हायची तेव्हा... मी म्हणायचो की मग तारीख ठरवा, मी येतो लग्नाला.. फिदीफिदी पहायचा कार्यक्रमात कशाला वेळ घालवताय... राग पण, काही उपयोग नसाअयचा... अरेरे परत मग बे एक्के बे.. फिदीफिदी

पण मी म्हणतो जे झेपत नाही ते मधु ने करावच कशाला
निरोप कळवतो रे मधु ला... फिदीफिदी हाहा हसून हसून गडबडा लोळण

लेख आवडला. मल्ल्या गुड वन.

किती वेळ घेतलास राजा हा लेख टाकायला. मला वाटते जवळ जवळ सहा-सात महिन्यांपुर्वी तु या लेखाचा कच्चा मसुदा पाठवला होतास मला. गणेशोत्सवाच्या सुरुवातीला बहुदा. बरोबर ना?

त्यावेळीही आवडला होता आणि आताही. स्मित लिहीता हो मित्रा........ पुलेशु स्मित